चॅम्पियन्स करंडक - ५
![]() |
हा घ्या विजयाकडे नेणारा षट्कार...कांगारूंविरुद्ध हार्दिक. (छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी.) ............................... |
‘एक दिवशीय क्रिकेटमधला तो अफ्लातून खेळाडू आहे!’
‘त्यानं संघासाठी अशी कामगिरी अनेक वेळा केलेली आहे.’
अनुक्रमे गौतम गंभीर आणि रोहित शर्मा ह्यांची ही विधानं अर्थात
विराट कोहलीचं महत्त्व ठळक करणारी.
कांगारूंविरुद्ध विजय मिळवून वनवास संपवणाऱ्या भारतीय संघानं
दुबईत मंगळवारी एका दगडात बरेच पक्षी मारले.
----------------------
दोन्ही संघांची मिळून विजेतेपद मोजली तर ती १६ होतात. अशा दिग्गज संघांमधील उपान्त्य सामन्यात पाच झेल सुटत असतील तर काय म्हणावं! अर्थात ह्या लढतीचा निकाल कमी झेल सोडणाऱ्या संघाच्या बाजूनेच लागला.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या चॅम्पियन्स करंडकाच्या पहिल्या उपान्त्य सामन्यात भारतानं विजय मिळविला. हे करताना भारतीय संघानं एका दगडात बरेच पक्षी मारलेले दिसतात. आय. सी. सी.च्या कोणत्याही स्पर्धेत असं चित्र दिसलं आहे की, बाद पद्धतीच्या सामन्यात भारतीय संघ कांगारूंपुढे नांगी टाकतो. त्याचं ताजं उदाहरण विश्वचषक स्पर्धेतला अहमदाबादचा अंतिम सामना!
संपता वनवास विजयाची गुढी
हा १४ वर्षांचा वनवास दुबईत संपला. विजयाची गुढी उभारली विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या ह्यांनी. कांगारूंचं आणि त्यांच्याविरुद्धच्या पराभवाच्या इतिहासाचं दडपण त्यांनी घेतलं नाही.
ह्या विजयी दगडाने दुसरा पक्षी टिपला तो यजमान पाकिस्तानचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेचं यजमानपद घेऊनही स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या देशात खेळला जाणार नाही, ह्याचं दुःख त्यांना दुसऱ्यांदा होईल. ह्या आधी आशियाई चषक स्पर्धेत तसंच झालं.
स्पर्धेचा दुसरा सामना लाहोरमध्ये होईल. त्यातील विजेत्याला अंतिम सामना खेळण्यासाठी हवाई मार्गाने दोन हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. त्यात त्यांची दमछाक होणं गृहीत आहे. त्यातही दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला, तर दुबईतला त्यांचा तो पहिलाच सामना असेल. भारतानं टिपलेला हा अजून एक पक्षी.
‘खरोखर अद्भुत खेळाडू!’, अशी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर ह्यांनी ज्याची स्तुती केली, तो विराट कोहली ह्या सामन्याचा मानकरी ठरला, ह्यात आश्चर्य नाही. लक्ष्याचा नियोजनपूर्वक पाठलाग कसा करायचा, हे त्यानं ह्या स्पर्धेत दुसऱ्यांदा दाखवून दिलं. त्याच्या ९८ चेंडूंच्या खेळीत (८४ धावा) फक्त पाच चौकार होते. त्याच्या तंदुरुस्तीला सलामच करावा लागेल.
विराटच्या महत्त्वाच्या भागीदाऱ्या
सलामीवीर झटपट परतल्यावर कोहलीनं डावाला आकार दिला. तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचत त्यानं धावसंख्येला आकार दिला आणि संघाला विजयाच्या दारापर्यंत नेलं. श्रेयस अय्यरबरोबर ९१, अक्षर पटेलबरोबर ४४ आणि के. एल. राहुल ह्याच्या बरोबर त्यानं ४७ धावांच्या भागीदाऱ्या केल्या. म्हणजे २०९ चेंडूंमध्ये ह्या चौघांनी १८२ धावांची भर घातली.
सामाजिक माध्यमांवर अलीकडच्या काळात जल्पकांचं सर्वाधिक आवडतं गिऱ्हाईक म्हणजे के. एल. राहुल. ‘केळ्या’ ही त्याची ओळख. ‘त्याला का खेळवतात? वशिल्याचा तट्टू म्हणून!’ ट्रोलरमंडळींनी काढलेला हा निष्कर्ष. पण राहुलची आजची फलंदाजी ह्या ट्रोलरना सीमापार करणारी होती.
चेंडूंपेक्षा धावा अधिक असं समीकरण भेडसावू लागल्यावर राहुल कोशातून बाहेर पडला. तन्वीर संघा ह्याला दोन चौकार आणि ॲडम झम्पा ह्याला उत्तुंग षट्कार मारत त्यानं इरादा स्पष्ट केला होता. म्हणूनच झम्पाला फटकावण्याच्या नादात कोहली बाद झाल्यावर राहुल काहीसा नाराज झालेला दिसला.
तणाव वाढवला नि संपवलाही!
पहिले सहा चेंडू शांतपणे खेळणाऱ्या हार्दिक पंड्याने तणाव काहीसा वाढविला होता. तो त्यानंच तीन षट्कार खेचत संपवला. गोलंदाजीत सर्वांत महागडा ठरलेल्या हार्दिकनं मोक्याच्या क्षणी फटकेबाजी केली. श्रेयस अय्यर ह्या स्पर्धेत प्रेयस खेळताना दिसतो आहे. त्यानं कोहलीबरोबर महत्त्वाची भागीदारी केलीच; त्या बरोबर भरात आलेल्या कॅरीला थेट फेकीवर धावचित करण्याची कामगिरीही बजावली.
कर्णधार रोहित शर्मानं सुरुवात तर झकास केली होती. तीन-तीन जीवदानं मिळूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही. कूपर कॉनली ह्यानं डावऱ्या फिरकीवर त्याला पायचित पकडलं. कॉनली ह्याच्यासाठी तो ह्या सामन्यातला सर्वांत आनंदाचा क्षण असावा.
![]() |
आनंदाचा क्षण. कूपर कॉनली ह्यानं रोहितला पायचित केलं. (छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी.) ............... |
शमीनं सामन्याची सुरुवातच वाईड चेंडू टाकून केली, तेव्हा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची आठवण झाली. त्याचा कित्ता हार्दिक पंड्यानंही पहिल्याच षट्कात गिरवला. आपल्याच गोलंदाजीवर ट्रेव्हिस हेडचा झेल पकडण्यात शमीला यश आलं नाही. हे जीवदान महाग पडणार, असं वाटलं होतंच. हेडनं मग ३३ चेंडूंमध्ये ३९ धावा करताना कर्णधार स्टिव्हन स्मिथबरोबर अर्धशतकी भागीदारी केली. वरुण चक्रवर्तीनं त्याचा अडथळा दूर केला.
कोहलीप्रमाणंच स्मिथनेही तीन महत्त्वाच्या, अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या - आधी हेडला घेऊन, मग लाबुशेन ह्याच्या जोडीने ५६ धावांची आणि कॅरीला घेऊन ५४ धावांची. स्टिव्ह स्मिथ ७३ (९६ चेंडू) व ॲलेक्स कॅरी ६१ (५७ चेंडू) ह्यांनी भारतीय फिरकी चौकडीला चांगले तोंड दिले.
ह्या जोडीला सूर सापडला असताना भारताच्या मदतीला धावला महंमद शमी. त्यानं स्मिथचा त्रिफळा उडवला. ग्लेन मॅक्सवेलला अक्षर पटेलचा चेंडू यष्ट्यांवर आदळल्यावरच कळाला! ड्वारशुईस ह्यानं मात्र कॅरीच्या जोडीला उभं राहायचं ठरवलं होतं. जमू लागलेली ही भागीदारी वरुण चक्रवर्तीनं संपुष्टात आणली.
पाच षट्कांमध्ये चौघे बाद
अय्यरच्या अचूक फेकीनं कॅरी बाद झाला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या पाच षट्कांमध्ये चार गडी गमावले ते फक्त २९ धावांची भर टाकून. जाडेजाने बऱ्याच दिवसांनी गोलंदाजीत चमक दाखविली. अलीकडे फारसा यशस्वी ठरत नसलेल्या मार्नस लाबुशेन व जोश इंग्लिस ह्यांचे बळी त्यानं मिळविले. शमीनं तीन गडी बाद करून आपली जबाबदारी चोख बजावली. त्यानं आपल्याच माऱ्यावर हेड आणि स्मिथचे झेल पकडले असते, तर कांगारूंच्या डावाचं चित्र विचित्र झालं असतं, एवढं नक्की. कुलदीपची पाटी मात्र आज कोरीच राहिली.
रोहितचा झेल लाबुशेन ह्यानं सोडला, तेव्हा अहमदाबादच्या सामन्याची आणि हेडनं घेतलेल्या अफलातून झेलाची आठवण होणं स्वाभाविकच. अर्धशतक पूर्ण केलेल्या कोहलीवरही मॅक्सवेलनं कृपा केली. तेव्हा दुर्दैवी गोलंदाज कॉनली होता!
धावांचा पाठलाग करताना पहिली सहा षट्कं भारत कांगारूंच्या पुढे होता. नंतर चाळिसाव्या षट्कापर्यंत पारडं थोडं इकडे, थोडं तिकडे झुकत राहिलं. चाळिसावं षट्क संपलं तेव्हा भारत १३ धावांनी मागं होता. जमेची बाजू म्हणजे आपण दोन गडी कमी गमावले होते. शेवटची पाच षट्क राहिली तेव्हा कांगारू दोन धावांनी पुढे होते. मग हार्दिकच्या षट्कारांनी धमाल केली.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या पहिल्या उपान्त्य सामन्याची ही कहाणी... सोडलेल्या झेलांची, विराटच्या हुकमी डावाची आणि भारताच्या सफाईदार विजयाची!
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #उपान्त्य_सामना #भारत_ऑस्ट्रेलिया #विराट_कोहली #एका_दगडात #श्रेयस_अय्यर #स्टिव्ह_स्मिथ #कूपर_कॉनली #हार्दिक #ॲलेक्स_कॅरी #ICC_Champions_Trophy #ICC_Champions_Trophy #first_semifinal #Ind_Aus #Virat_Kohli #Shreyas_Iyer #Hardik_Pandya #Steve_Smith #Alex_Carey #Cooper_Connolly
Correct analysis....
उत्तर द्याहटवामॅचच्या हायलाईट्स बघतोय की काय, असं वाचताना वाटलं.
उत्तर द्याहटवा- अनंत दसरे, नगर