Tuesday 29 January 2019

शांत झालेला ज्वालामुखी

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्धच्या लढाईतला सेनापती.

खऱ्या अर्थाने पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी ह्यांचं निधन १६ ऑगस्ट रोजी झालं. देशानं आदल्याच दिवशी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला होता.

वाजपेयींचे मंत्रिमंडळातले खंदे (आणि विश्वासू) सहकारी जॉर्ज फर्नांडिस ह्यांचं निधन नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, २९ तारखेला झालं. प्रजासत्ताक दिन साजरा होऊन तीनच दिवस झालेले. पण सोहळा अजून पूर्ण संपलेला नाही. ह्या सोहळ्याचा समारोप आजच्या बीटिंग रीट्रीट कवायतीनं होत असतो. बीटिंग रीट्रीट लष्करी परंपरा आहे. युद्ध संपवून, शस्त्र म्यान करून सैनिक सूर्यास्ताला आपल्या छावणीत परततात, त्या वेळचं संचलन. ह्याच दिवशी आयुष्यभर लढणाऱ्या एका सैनिकानं आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. कायमचा.

जॉर्ज फर्नांडिस नावाच्या लढवय्यानं शस्त्र कधीच म्यान केलं होतं. त्याच्या लढायाही संपल्या होत्या. त्याची जाणीव त्यालाही नसावी. नियतीनंच हे केलं होतं. हजारो लोकांना संमोहित करणाऱ्या ह्या नेत्याला स्मृतिभ्रंशाच्या विकारानं कधीचं ताब्यात घेतलं होतं. जॉर्ज फर्नांडिस बरीच वर्षं सार्वजनिक जीवनापासून लांब गेले होते. त्यांचा अठ्ठ्याऐंशीवा वाढदिवस ३ जून रोजी झाला. त्यानिमित्त आठवण निघाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, त्या दिवशी.

शायनिंग इंडियाची घोषणा फसली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं केंद्रातलं सरकार गेलं. त्यानंतर वाजपेयी सार्वजनिक कार्यक्रमांतून दिसेनासे झाले. जॉर्ज ह्यांचं तसंच काहीसं झालं. त्यांचा लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत (२००९) मुझफ्फरपूरमधून पराभव झाला. पण पुढं नितीशकुमार यांनी त्यांना २००९-१०मध्ये राज्यसभेवर निवडून आणलं. त्या वेळी जॉर्ज थकले होते. एका मराठी दैनिकानं तेव्हा अभिरुचिशून्य वाटणाऱ्या भाषेत त्यांच्या विकलांग अवस्थेचं वर्णन करणारी मोठी बातमी प्रसिद्ध केली होती. जॉर्ज ह्यांनी बाजू बदलल्याबद्दलचा जुना सूड त्या बातमीतून घेतला, असं मानायला भरपूर वाव होता.

दोन शब्दांचं नातं जॉर्ज ह्यांच्याशी कायम जोडलं गेलं. पहिला शब्द म्हणजे जायंट किलर. स. का. पाटील (ज्यांचा उल्लेख आचार्य अत्रे यांनी कायम सदोबा असाच केला.) म्हणजे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणविले जाणारे काँग्रेसचे नेते. त्यांचा मुंबईतून पराभव होणं स्वप्नवत. जॉर्ज यांनी अर्धशतकापूर्वी तो चमत्कार घडवला. येस! वी कॅन... असं म्हणत बराक ओबामा यांनी इतिहास घडविला होता. त्याच्या खूप वर्षं आधी, म्हणजे त्याच १९६७च्या निवडणुकीत जॉर्ज ह्यांनी तेच सांगितलं होतं – तुम्ही स. का. पाटलांना पाडू शकता!’ तशी पोस्टर साऱ्या मुंबईत लागली होती. ह्याच पोस्टरनी दक्षिण मुंबई मतदारसंघात इतिहास घडला. संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार असलेल्या जॉर्ज ह्यांना लाख ४७ हजार ८४१ (म्हणजे ४८. टक्के) आणि स. का. पाटील यांना लाख १८ हजार ४०७ (म्हणजे ३८.८५ टक्के) मतं मिळाली.

जॉर्ज ह्यांच्याशी जोडून येणारा दुसरा शब्द म्हणजे फायरब्रँड लीडर. इंग्रजी शब्दकोशात त्याच्या दिलेल्या व्याख्या अशा :
firebrand (noun)
1 : a piece of burning wood
2 : one that creates unrest or strife (as in aggressively promoting a cause) : agitator
आणि
firebrand
When someone is known for being wildly devoted to a cause or idea, they're called a firebrand. A firebrand enjoys pushing buttons and stirring up passions.


जॉर्ज आणि मोदी.
मी जॉर्ज ह्यांना कधी पाहिलं नाही आणि त्यांचं भाषणही समक्ष ऐकलं नाही. पण त्यांच्याबद्दल वाचल्यावर हा नेता खरंच
फायरब्रँड होता, हे कळतं. त्यांना लावलेलं ते विशेषण अवाजवी, अतिरंजित नव्हतं. जॉर्ज फर्नांडिस म्हटलं की, अमिताभ बच्चन आठवतो. अँग्री यंग मॅन! व्यवस्थेविरुद्ध सतत लढणारा, तिला आव्हान देणारा नायक. ह्याच भूमिकेमुळं त्या दोघांनाही मोठ्या प्रमाणात चाहते मिळाले. सामान्य माणसाच्या मनात असलेली खदखद त्यांनी समर्थपणे व्यक्त केली – अमिताभनं पडद्यावर आणि जॉर्ज ह्यांनी थेट समाजकारणात, राजकारणात. सतत अस्वस्थ राहणं, संघर्ष करीत राहणं, हे अमिताभनं भूमिकांमधून साकारलं. जॉर्ज त्या भूमिका जगले!

अनुयायांना चिथावणी द्यायची, आंदोलनं पेटवायची आणि आपण लांब राहून मजा पाहत राहायची, असलं आधुनिक राजकारण-समाजकारण जॉर्ज ह्यांनी केलं नाही. देशभर गाजलेलं आणि ज्यामुळं त्यांचं नाव सर्वदूर पोहोचलं, ते १९७४चं रेल्वे आंदोलन ह्याची साक्ष देतं. त्याबद्दल जॉर्ज ह्यांच्या गेल्या वर्षीच्या वाढदिवशी अरुणा देशपांडे यांनी मुंबई तरुण भारतमध्ये लिहिलं आहे – साहेब, त्या आंदोलनादरम्यान तुम्ही रुळांवर झोपलात. पोलिसांनी तुम्हाला फरफटत ओढताना नकळत झालेल्या शारीरिक इजा आणि बसलेल्या मारामुळेच आज तुम्हाला अलझायमरसारख्या व्याधीशी सामना करायला लागत आहे याची जाणीव आम्हाला आहे.

आणीबाणीची चाहूल, आणीबाणीसदृश परिस्थिती किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा अशी ओरड सध्या सुरू आहे. काँग्रेसजनही त्यात मागे नाहीत. हे ऐकण्याच्या अवस्थेत जॉर्ज नव्हते, हे त्यांचं भाग्यचं. नाही तर त्यांनी आणीबाणी काय असते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं दमन कसं असतं, हे खास जॉर्ज-शैलीत सुनावलं असतं. अरुणा देशपांडे ह्यांनी त्याच लेखात लिहिलं आहे - आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून, मुजोर आणि अविवेकी सरकारविरुद्ध लढणारा नेता तुम्ही एकटेच! इतर अनेक राजकीय पुढार्‍यांचे, देशातील विविध तुरुंग हेच जणू माहेरघर बनले होते... साहेब, तुम्ही किती रात्री तुरुंगात काढल्या असतील हे, ते अविवेकी सरकारच सांगू शकेल; मात्र तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून तुमच्या सहवासात राहताना, तुरुंगातील रात्र आणि कॅबिनेट मंत्र्याच्या घरातील रात्र, यात तुमच्यासाठी काहीच फरक नव्हता हे मला मनोमन पटलं.

जॉर्ज अनेकदा बदनाम झाले. खूप वेळा खलनायक ठर(व)ले. बडोदा डायनामाईट खटल्यानं तर त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला पहिल्यांदा पराभूत करून जनता पक्ष सत्तेवर आलं आणि काही काळातच सरकार अडचणीत आलं. संसदेत मोरारजी सरकारच्या समर्थनाचं दणदणीत भाषण करणारे जॉर्ज दुसऱ्याच दिवशी चरणसिंग ह्यांच्या गोटात दाखल झाले. त्याही वेळी अनेकांना ते खलनायक भासले. जनता पक्षाच्या चाहत्यांनी त्यांना शिव्याशाप दिले.

केंद्रीय उद्योगमंत्री म्हणून जॉर्ज यांनी कोका-कोला, आयबीएम यांसारख्या विदेशी कंपन्यांना देशाबाहेर घालवलं. पण त्यामागचा त्यांचा उद्देश कोणी समजून घेतला नाही. विदेशी हटाव एवढीच त्यामागं जॉर्ज ह्यांची भूमिका नव्हती. सरकारी नियम धुडकावण्याची मुजोरी करणाऱ्या या उद्योगांना त्यांनी शिकवलेला हा धडा होता.


राष्ट्रीय लोकशााही आघाडीचे त्रिकूट.

कट्टर लोहियावादी असलेल्या जॉर्ज ह्यांच्या भूमिका जशाच्या तशा सगळ्यांनाच पटत नसल्या, तरी ते अनेकांचे लाडके जॉर्जच होते. सामान्य माणूस, कार्यकर्ता, पत्रकार, सहकारी नेते-मंत्री... सगळ्यांसाठी ते जॉर्जच होते. यात बदल झाला तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पहिले सरकार केंद्रात सत्तेत आल्यावर. जॉर्ज ह्यांनी प्रतिगामी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यावा, आघाडीचं निमंत्रक बनावं हा अनेक डावे, बुद्धिजीवी ह्यांच्या दृष्टीनं अक्षम्य गुन्हा होता. त्याबद्दल त्यांना काहींनी कधीच माफ केलं नाही. गुजरातमधील दंगलीनंतर त्यांनी नरेंद्र मोदी ह्यांना विनाचौकशी दोषी ठरवून शिक्षा देण्याचा आदेश दिला असता आणि त्यासाठी सरकारमधील आपलं पद पणाला लावलं असतं, तर कदाचित ते पुन्हा स्पृश्य झाले असते! पण ते घडलं नाही आणि मग विचारवंत, बुद्धिवादी यांच्यासाठी जॉर्ज म्हणजे कायमचा टिंगलीचा, तिरस्काराचा विषय ठरले. नौदलप्रमुख विष्णू भागवत यांच्या प्रकरणातही माध्यमे आणि विचारवंत ह्यांनी घेतलेल्या (एकतर्फी) सुनावणीत जॉर्ज ह्यांच्याविरुद्ध निकाल देण्यात आला.

संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात होती. ती समर्थपणे चालविणारे वाजपेयी आणि जॉर्ज ह्यांचं जवळपास सर्वांनाच विस्मरण झालं होतं. पण मध्यंतरी एकदा जॉर्ज ह्यांची आठवण झाली ती चीनमुळे. या देशाबद्दल त्यांनी २२ वर्षांपूर्वीच इशारा दिला होता. त्याचा प्रत्यय जुलै २०१७मध्ये पुन्हा आला. भारतासाठी सर्वाधिक धोकादायक आहे तो चीन. पाकिस्तानच्या घौरी क्षेपणास्त्राची जन्मदात्री चीन आहे. चीनच्या हेतूंबद्दल काही प्रश्न विचारावे वाटण्याची (अंतःस्थ) गरज भासत नाही, ही चिंतेची बाब आहे, असं ते मे १९९८मध्ये म्हणाले होते. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी (मार्च २००८) त्यांनी हेच पुन्हा सांगितलं होतं, आजही चीन आपला संभाव्य धोका क्रमांक एक आहे आणि तो शत्रूही बनेल. भारत चीनला विकला गेला आहे.

ज्येष्ठ पत्रकार कस्तूर जी. वासुकी यांनी दीर्घ काळ जॉर्ज यांची कारकीर्द जवळून पाहिली, त्यावर लिहिलं. जॉर्ज ह्यांच्या निधनाची बातमी आल्यावर मनोरमा ऑनलाईनच्या इंग्रजी संकेतस्थळानं वासुकी यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणतात जॉर्ज म्हणजे साधा माणूस आणि जनसामान्यांचा मंत्री. कारवारच्या दौऱ्यात ते अचानक बेपत्ता झाले. शोधल्यावर दिसलं की, कुठलीही सुरक्षा वगैरे न घेता ते मच्छिमारांशी गप्पा मारत होते. ते नेहमीच सामान्य माणसांसाठी काम करीत राहिले. आपण राजकारणातला एक खरा, लढवय्या सैनिक गमावला आहे!

धगधगतं अग्निकुंड!


मंत्री असून स्वतःच मोटर चालविणारे जॉर्ज.

श्रीरामपूरच्या रंजना पाटील यांच्याकडे जॉर्ज ह्यांच्या अनेक आठवणी आहेत. आपल्या नेत्याचं वर्णन त्या धगधगतं अग्निकुंडअसं करतात. समता पक्षाच्या महिला आघाडीच्या अखिल भारतीय अध्यक्ष असताना त्यांनी १९९८मध्ये श्रीरामपुरात महिलांचे अधिवेशन आयोजित केले होते. संरक्षणमंत्री असलेले जॉर्ज त्याला आले होते. संरक्षणासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणारा हा माणूस तेव्हाही तसाच राहत होता. मंत्री, खासदार, नेता असा काही आविर्भाव त्यांचा कधीच नव्हता. त्यांना कधी कुणी फर्नांडिससाहेब वगैरे म्हटलं नाही. सर्वांसाठी ते कायम 'जॉर्ज' राहिले. त्यांचे कपडेही साधेच असत. स्वतःच ते धूत. कडक सोडा, साधी इस्त्रीही नसे कपड्यांना. एकदा आम्ही म्हणालो, ‘कपड्यांना इस्त्री तरी...तेव्हा जॉर्ज यांनी हसून विचारलं होतं, ‘‘का बुवाह्या कपड्यात मी काय व्यंग्यचित्रासारखा दिसतो का काय?’’

‘‘हा माणूस म्हणजे कम्प्युटर होता. कोणताही माणूस एकदा पाहिला, त्याला भेटलं, त्याच्याशी बोललं कीह्यांच्या डोक्यात त्याची कुंडली तयार होई. ते त्याला कधीच विसरले नाहीत,’’ असं रंजना पाटील म्हणाल्या. मंत्री असताना त्यांच्या बंगल्याचं दार कधी बंद नसे; दारावर कधी सुरक्षारक्षक नसत. त्यांना ते मान्य नव्हतं. आपण समाजासाठी आहोत, समाज आपल्यासाठी नाही, असं ते नेहमी सांगत. कार्यकर्ता भेटल्यावर काय वाचतो, काय लिहितो, समाजासाठी काय करतोह्याचीच चौकशी ते करीत, असं रंजना पाटील यांनी सांगितलं.

---------

(छायाचित्रे विविध संकेतस्थळांच्या सौजन्याने.)

Friday 11 January 2019

बनवणार लखपती स्मार्ट फोन-मुक्ती!


नवं वर्ष उगवलं आणि आता अंगवळणी पडलं. नव्या वर्षाची चाहूल लागताच नवे संकल्प मनाच्या कवाडावर टकटक करू लागतात. यंदा काय करण्याचा संकल्प सोडायचा? किंवा काय सोडून देण्याचा चंग बांधायचा? वर्ष सरताना मनात जे काही ठरवलं आहे, ते पाळलं जाईल का? संकल्प पूर्ण होईल का? की नेहमीसारखंच... नव्याचे नऊ दिवस; आठ-दहा दिवसांनंतर पहिले पाढे पंचावन? केलेल्या संकल्पावर ठाम राहण्यासाठी कुणी काही प्रोत्साहन दिलं तर निश्चयाला अधिक बळकटी येईल का? आयुष्याची दिशाच बदलणारी घसघशीत रक्कम देऊ केली तर?

बाकी जगाचं माहीत नाही; पण यंदा अमेरिकी नागरिकांना ही संधी मिळाली आहे. ती देऊ केली आहे व्हिटॅमिन वॉटरनं एका स्पर्धेद्वारे. स्पर्धेचं नाव आहे व्हिटॅमिनवॉटर स्क्रोल फ्री फॉर ए यीअर कॉन्टेस्ट. विजेत्याला मिळतील एक लाख डॉलर! त्यासाठीची एक छोटी अट आहे स्मार्ट फोनपासून (आणि टॅबपासूनही) ३६५ दिवस लांब राहायचं. वापर सोडाच, स्पर्शही नाही करायचा. नाही म्हणजे नाही. अगदी दुसऱ्याचाही वापरायचा नाही.

स्मार्ट फोन वापरणं बंद. म्हणजे मग काय काय बंद?

मेसेज, फोटो, व्हिडिओ, मल्टीमीडिया मेसेज पाठविणं, इमेल... बंद.
इंटरनेटचा वापर...बंद.
जीपीएस वापरणं...बंद.
व्हिडिओ चॅटिंग...बंद.
सोशल नेटवर्किंग...बंद.
गेम खेळणं...बंद.

...आपल्यासाठी स्मार्ट फोनमध्ये सर्वांत महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सॲप. तेही बंद! एकूण ३६५ दिवस गुणिले २४ तास. राजकीय पोस्ट, विनोद, व्हिडिओ, देवादिकांची स्तोत्रं हे पाहणं आणि पुढं ढकलणं बंद. गुड मॉर्निंग-गुड नाईटचे, शुभेच्छांचे, सणांचे फॉरवर्ड बंद. जमेल हे? उत्तर काहीही असेल... हो’, प्रयत्नपूर्वक शक्य किंवा अगदीच अशक्य. पण आपल्यासाठी नाहीच ही स्पर्धा.


स्पर्धेची घोषणा करणारं 'व्हिटॅमिन वॉटर'चं ट्वीट.
..............................
व्हिटॅमिन वॉटर म्हणजे प्रसिद्ध कोका-कोला कंपनीच्या खनिजयुक्त पाण्याचं ब्रँड नेम. कशामुळं आयोजित केली आहे, ही स्पर्धा? व्हिटॅमिन वॉटरच्या संकेतस्थळावर यामागची भूमिका दिली आहे स्मार्ट फोनशिवाय जगता येणारच नाही, असं आज कोणत्याही दोघांपैकी एक जण म्हणतो, हे माहितीय तुम्हाला? तरुण पिढी आणि अगदी मुलंही आपला उत्पादक वेळ यात घालवताना दिसत आहेत. हे दुष्टचक्र मोडून काढा. तुम्ही ज्या आयुष्याचं स्वप्न पाहात आला आहात, ते आयुष्य खरंखुरं जगा.

शर्टाच्या खिशात मावणाऱ्या मोबाईलमध्ये इंटरनेट आलं, ही या दशकातली सर्वांत मोठी क्रांती. त्या क्रांतीनं मोबाईलचा झाला स्मार्ट फोन. त्यानं पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना झपाटून टाकलं. www.statista.com संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार सध्या जगभरातली दोन अब्ज ५३ कोटी माणसं स्मार्ट फोन वापरतात. पुढच्या वर्षी त्यात १८ कोटींची भर पडेल आणि अजून दोन वर्षांनी, म्हणजे २०२०मध्ये ही संख्या होईल दोन अब्ज ८७ कोटी. आपल्या देशात ही संख्या आहे ३३  कोटी ७० लाख. त्यात अर्थातच भर पडत राहील.

स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत फार झपाट्यानं वाढली. वापर एवढा की, काही दिवसांतच ते व्यसन झालं. समाजशास्त्राचे अभ्यासक, डॉक्टर, मनोविकारतज्ज्ञ असे सारे या व्यसनाधिनतेबद्दल बोलत आहेत आणि धोक्याचा इशारा देत आहेत. आभासी दुनियेत लोक नको तेवढं रमू लागले. त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होताना दिसतो. भ्रामक गोष्टींतली गुंतवणूक, बिघडणारी जीवनशैली, निद्रानाश, डोळ्यांचे विकार, वास्तव जगाशी फटकून राहणं असं बरंच काही. दैनंदिन दोन किंवा तीन जीबीच्या डाट्यात गुंतलेली दुनिया!

सीएनबीसी.कॉम संकेतस्थळानं दिलेल्या बातमीनुसार १८ ते ३४ वयोगटात स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. या वयोगटात असणारे स्मार्ट फोनवरच्या फक्त मनोरंजनासाठी रोज अडीच तास खर्च करतात! ‘निएल्सन टोटल ऑडियन्सच्या अहवालानुसार या सहस्रकाच्या सुरुवातीला तारुण्यात प्रवेश केलेल्यांमधले ४३ टक्के लोक दर २० मिनिटांनी आपला फोन तपासून पाहतातच. म्हणून तर व्हिटॅमिन वॉटरच्या या स्पर्धेचा विजेता १८ ते ३० वयोगटातला असण्याची शक्यता फारच कमी असल्याचं अभ्यासकांना वाटतं. तरुणांच्या या मोबाईल वेडाबद्दल सॅन डिएगो विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक जीन एम. ट्वेंग म्हणाले की, तरुण पिढी स्मार्ट फोनमध्ये एवढी गुंतून गेली आहे की, ती मानसिक आरोग्याच्या धोक्याच्या कड्यावर आहे. या दशकातील हे सर्वांत भयानक संकट आहे, असं वाटतं.

परिस्थिती अशी भयावह असल्यामुळंच त्यातून सुटका करून घेण्याचा एक मार्ग म्हणून या स्क्रोल फ्री कॉन्टेस्टकडं बघता येईल. आयोजकांनी आपल्या ट्विटर हँडलवर ११ डिसेंबरला स्पर्धेची घोषणा केली आणि तिला जोरदार प्रतिसाद मिळाला. अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनातील १८ वर्षांपुढील आणि स्मार्ट फोनचा नियमित वापर करणाऱ्या कोणालाही त्यात भाग घेता येईल. आयोजकांच्या ट्वीटला उत्तर देऊन स्पर्धेसाठी नाव नोंदवायचं आहे. उत्तरात दोन हॅशटॅग वापरायचे आहेत - #NoPhoneforaYear #contest. आयोजकांनी ट्वीटमध्ये सगळे नियम, अटी स्पष्ट केल्या आहेत. ट्वीट करून किंवा इन्स्टाग्रामवरून स्पर्धकांनी येत्या आठ जानेवारीपर्यंत नाव नोंदवायचं. स्मार्ट फोन न वापरता तुम्ही वर्षभर काय करणार, हेही प्रवेशिकेत लिहायचं आहे. संभाव्य विजेत्यांची निवड २२ जानेवारीला केली जाईल. त्यांच्याशी व्यवस्थित करार करण्यात येईल. या मंडळींना आयोजकांकडून एक मोबाईल मिळेल तो असेल दोन दशकांपूर्वीच्या पिढीतला, १९९६मध्ये वापरात होता तसा. त्याच्या सोबत आयोजक देतील ‘मंथली प्लॅन’. एका संभाव्य स्पर्धकानं विचारलं, पण कुणी स्मार्ट फोन वापरत असेल, तर तुम्हाला ते कसं कळेल? आयोजकांनी त्याचाही विचार केला आहे. वर्षभराचा हा करार संपल्यावर विजेता ठरविण्यासाठी ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ घेतली जाईल.


स्पर्धेत भाग घेण्याच्या ट्वीटसोबत फोडून
टाकलेल्या स्मार्ट फोनचं
सादर केलेलं छायाचित्र.
......................


एक लाख डॉलर! मोठी रक्कम. अनेक स्वप्नं सत्यात आणण्याची ताकद असलेली रक्कम. त्यामुळेच आठवडाभरात नऊ हजार ६०० जणांनी हे दोन हॅशटॅग वापरून स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. एकूण दोन हजार जणांनी री-ट्वीट केलं आणि या ट्वीटला लाईक मिळाले साडेपाच हजार. आपण या स्पर्धेत का भाग घेऊ इच्छितो हे ट्वीटमध्ये इच्छुकांनी लिहिलं आहे. पैसे हा त्यातला मोठा भाग आहेच. याशिवाय आपण यात नको एवढा वेळ घालवतो, हेही अनेकांच्या मनाला खातंय, हे दिसतं. स्टिफनी मिन्स म्हणतात - (स्मार्टफोन वापरत नसल्यामुळे) माझं आयुष्य थोडंसं कमी त्रासाचं होईल. स्मार्ट फोनमुळं खूप काही बदललं आहे, आपण काही तरी गमावलं आहे, याची खंत बऱ्याच जणांना वाटत असल्याचं त्यांच्या ट्वीटमधून सहज कळतं. @bobsonpsamuel यांनी लिहिलंय मी तयार आहे. स्मार्ट फोनपासून लांब राहिल्यानं मला चांगली झोप मिळेल, मला काही उत्पादक करता येईल आणि मित्र, कुटुंब यांच्यासमवेत वेळ घालवीन. हेन्री बार्झागा लिहितात की, मी भरपूर झोप घेईन. दिवसातले २४ तास फोनला कवटाळून बसण्यापेक्षा घराबाहेर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होईन. हे व्यसन कसं नि किती घातक आहे, हे या वर्षभरात मी इतरांना शिकवीन, त्यातले धोके समजावून देईन. या उपकरणाशिवायही कसं छान जगता येतं, हेही शिकवीन, असं जॅगर यांनी प्रवेशिकेत लिहिलं आहे.

स्मार्ट फोनच्या व्यसनावर नेमकं भाष्य करणारं
एका स्पर्धकानं ट्वीट केलेलं व्यंग्यचित्र.
....................


स्मार्ट फोनमुळे कुटुंबातला संवाद कसा संपला आहे, याचीही जाणीव काही स्पर्धकांच्या मनोगतामधून होते. @OMARIIYON या ट्वीटर हँडलनं काय लिहिलंय आयोजकांना पाहा या स्पर्धेत माझ्या आईला सहभागी करून घ्या. ती आम्हा भावंडांना पुरेसा आणि आवश्यक तेवढा वेळ देत नाही. ती सहभागी झाली, तर आम्हाला आमच्या हक्काचा वेळ तिच्याबरोबर घालवता येईल! काहीशी अशीच व्यथा शरिफा कूव्हर यांनी बोलून दाखविली आहे. त्या लिहितात की, माझ्या मुलानं मला एकदा विचारलं, माझ्या फोटोला किती लाईक मिळाले?’ तुम्ही काय करत आहात, ते मला चांगलं कळलंय. आता मी माझ्या मोठ्या कुटुंबाबरोबर थोडा अधिक वेळ घालवीन आणि त्यांच्या गप्पा-गोष्टी आनंदाने ऐकीन. डाऊड मेझन यांना खंत आहे ती आपण खऱ्या जगापासून लांब गेल्याची. मी माझं ज्ञान, कौशल्य वाढवीन आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मी ज्याला मुकलो आहे, त्या वास्तव जगातील लोकांशी संवाद साधीन, असं ते म्हणतात. फोनशिवाय जगता येतं, हे बीडी ॲड्रिआना यांना पतीला दाखवून द्यायचं आहे.

स्पर्धेत भाग घेतल्यावर वर्ष कसं घालवणार? या प्रश्नालाही स्पर्धकांनी उत्तरं शोधून ठेवली आहेत आपल्या परीनं. ॲड्रिअनला वाटतं, आता कसलाच व्यत्यय नाही. त्यामुळे आठवड्याला एक पुस्तक सहज वाचून होईल. थियो लिस्टरही असाच पुस्तकवेडा. तो लिहितो, आता मी स्मार्ट फोनऐवजी पुस्तक जवळ बाळगीन. सोशल मीडियाचा विसर पडण्यासाठी पुस्तक मोठ्यानंही वाचीन कदाचित. अतिकठीण अशा मॅरॅथॉन स्पर्धेसाठी या काळात अगदी कसून सराव करण्याचा संकल्प सारा हिनं सोडला आहे.

स्मार्ट फोनमुळे आयुष्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पनाही अनेकांना आलेली दिसते. त्याबद्दल वाटणारा खेद त्यांच्या ट्वीटमधून कळतो. काही विद्यार्थी आहेत. स्मार्ट फोनमुळे आपण अभ्यासात कमी पडतो, एकाग्रता राहत नाही, हे त्यांना जाणवलं आहे. या संधीचा फायदा घेऊन ते अभ्यासाकडं लक्ष देणार आहेत. काहींना मिळणाऱ्या बक्षिसातून जग हिंडून यायचं आहे. मानसिक आरोग्यावरचा परिणामही काहींनी लिहून दाखविला आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी, मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी ही एक मोठी संधी आहे, असं बेक्का हिला वाटतं.

या स्पर्धेच्या निमित्तानं बरेच अमेरिकी विविध पद्धतीनं व्यक्त झाले आहेत. त्यातल्या अनेकांना एक लाख डॉलर खुणावत आहेत, हे नक्की. त्याचप्रमाणे स्मार्ट फोनचा अतिवापर आपल्या हिताचा नाही, हे पटलेले अनेक जण ही स्पर्धा म्हणजे त्यापासून लांब राहण्याची, तो टाळण्याची सुवर्णसंधी मानत आहेत. काहींना मुलांमध्ये रमायचं आहे, तर काहींना अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. स्पर्धेचा निकाल २०२०मध्ये लागेल. त्या वेळी एक लाख डॉलर कोण जिंकतं, याच्यापेक्षा महत्त्वाचं असेल, ते किती अमेरिकी नागरिकांना या मिषापासून वर्षभर दूर राहण्याचं साधलं ते!

भारतीय मंडळीही होती इच्छुक

ही स्पर्धा अमेरिकी सज्ञान नागरिकांसाठीच असल्याचं आयोजकांना नियमावलीच्या पहिल्याच वाक्यात म्हटलं आहे. असं असलं तरी अमेरिकेव्यतिरिक्त अनेक देशांच्या नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ट्वीट केली आहेत. त्यात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. यातल्या काहींनी इंग्रजीची लावलेली वाट पाहून करमणूक होते. काहींनी मला पैसे हवेत असं अगदी सरळसोटपणे सांगितलं आहे. अतुल अग्निहोत्री यांनी केलेलं ट्वीट मात्र नेमकं आहे. ते लिहितात, कृपया शक्य असेल, तर ही स्पर्धा भारतीयांसाठी घ्या. इथं त्याची (स्मार्ट फोनपासून लांब राहण्याची) खरोखरच गरज आहे.

--------------
#नववर्ष_संकल्प #मोबाईल #स्मार्ट_फोन #व्हिटॅमिन_वॉटर #फोन_बंद 
#स्मार्ट_फोन_व्यसन #एक_लाख_डॉलर #आभासी_दुनिया #मानसिक_आरोग्य #ट्वीट 
#री_ट्वीट #अमेरिका 
#NoPhoneforaYear #contest
--------------
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीमध्ये ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख.)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...