मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

शांत झालेला ज्वालामुखी

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्धच्या लढाईतला सेनापती.

खऱ्या अर्थाने पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी ह्यांचं निधन १६ ऑगस्ट रोजी झालं. देशानं आदल्याच दिवशी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला होता.

वाजपेयींचे मंत्रिमंडळातले खंदे (आणि विश्वासू) सहकारी जॉर्ज फर्नांडिस ह्यांचं निधन नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, २९ तारखेला झालं. प्रजासत्ताक दिन साजरा होऊन तीनच दिवस झालेले. पण सोहळा अजून पूर्ण संपलेला नाही. ह्या सोहळ्याचा समारोप आजच्या बीटिंग रीट्रीट कवायतीनं होत असतो. बीटिंग रीट्रीट लष्करी परंपरा आहे. युद्ध संपवून, शस्त्र म्यान करून सैनिक सूर्यास्ताला आपल्या छावणीत परततात, त्या वेळचं संचलन. ह्याच दिवशी आयुष्यभर लढणाऱ्या एका सैनिकानं आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. कायमचा.

जॉर्ज फर्नांडिस नावाच्या लढवय्यानं शस्त्र कधीच म्यान केलं होतं. त्याच्या लढायाही संपल्या होत्या. त्याची जाणीव त्यालाही नसावी. नियतीनंच हे केलं होतं. हजारो लोकांना संमोहित करणाऱ्या ह्या नेत्याला स्मृतिभ्रंशाच्या विकारानं कधीचं ताब्यात घेतलं होतं. जॉर्ज फर्नांडिस बरीच वर्षं सार्वजनिक जीवनापासून लांब गेले होते. त्यांचा अठ्ठ्याऐंशीवा वाढदिवस ३ जून रोजी झाला. त्यानिमित्त आठवण निघाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, त्या दिवशी.

शायनिंग इंडियाची घोषणा फसली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं केंद्रातलं सरकार गेलं. त्यानंतर वाजपेयी सार्वजनिक कार्यक्रमांतून दिसेनासे झाले. जॉर्ज ह्यांचं तसंच काहीसं झालं. त्यांचा लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत (२००९) मुझफ्फरपूरमधून पराभव झाला. पण पुढं नितीशकुमार यांनी त्यांना २००९-१०मध्ये राज्यसभेवर निवडून आणलं. त्या वेळी जॉर्ज थकले होते. एका मराठी दैनिकानं तेव्हा अभिरुचिशून्य वाटणाऱ्या भाषेत त्यांच्या विकलांग अवस्थेचं वर्णन करणारी मोठी बातमी प्रसिद्ध केली होती. जॉर्ज ह्यांनी बाजू बदलल्याबद्दलचा जुना सूड त्या बातमीतून घेतला, असं मानायला भरपूर वाव होता.

दोन शब्दांचं नातं जॉर्ज ह्यांच्याशी कायम जोडलं गेलं. पहिला शब्द म्हणजे जायंट किलर. स. का. पाटील (ज्यांचा उल्लेख आचार्य अत्रे यांनी कायम सदोबा असाच केला.) म्हणजे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणविले जाणारे काँग्रेसचे नेते. त्यांचा मुंबईतून पराभव होणं स्वप्नवत. जॉर्ज यांनी अर्धशतकापूर्वी तो चमत्कार घडवला. येस! वी कॅन... असं म्हणत बराक ओबामा यांनी इतिहास घडविला होता. त्याच्या खूप वर्षं आधी, म्हणजे त्याच १९६७च्या निवडणुकीत जॉर्ज ह्यांनी तेच सांगितलं होतं – तुम्ही स. का. पाटलांना पाडू शकता!’ तशी पोस्टर साऱ्या मुंबईत लागली होती. ह्याच पोस्टरनी दक्षिण मुंबई मतदारसंघात इतिहास घडला. संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार असलेल्या जॉर्ज ह्यांना लाख ४७ हजार ८४१ (म्हणजे ४८. टक्के) आणि स. का. पाटील यांना लाख १८ हजार ४०७ (म्हणजे ३८.८५ टक्के) मतं मिळाली.

जॉर्ज ह्यांच्याशी जोडून येणारा दुसरा शब्द म्हणजे फायरब्रँड लीडर. इंग्रजी शब्दकोशात त्याच्या दिलेल्या व्याख्या अशा :
firebrand (noun)
1 : a piece of burning wood
2 : one that creates unrest or strife (as in aggressively promoting a cause) : agitator
आणि
firebrand
When someone is known for being wildly devoted to a cause or idea, they're called a firebrand. A firebrand enjoys pushing buttons and stirring up passions.


जॉर्ज आणि मोदी.
मी जॉर्ज ह्यांना कधी पाहिलं नाही आणि त्यांचं भाषणही समक्ष ऐकलं नाही. पण त्यांच्याबद्दल वाचल्यावर हा नेता खरंच
फायरब्रँड होता, हे कळतं. त्यांना लावलेलं ते विशेषण अवाजवी, अतिरंजित नव्हतं. जॉर्ज फर्नांडिस म्हटलं की, अमिताभ बच्चन आठवतो. अँग्री यंग मॅन! व्यवस्थेविरुद्ध सतत लढणारा, तिला आव्हान देणारा नायक. ह्याच भूमिकेमुळं त्या दोघांनाही मोठ्या प्रमाणात चाहते मिळाले. सामान्य माणसाच्या मनात असलेली खदखद त्यांनी समर्थपणे व्यक्त केली – अमिताभनं पडद्यावर आणि जॉर्ज ह्यांनी थेट समाजकारणात, राजकारणात. सतत अस्वस्थ राहणं, संघर्ष करीत राहणं, हे अमिताभनं भूमिकांमधून साकारलं. जॉर्ज त्या भूमिका जगले!

अनुयायांना चिथावणी द्यायची, आंदोलनं पेटवायची आणि आपण लांब राहून मजा पाहत राहायची, असलं आधुनिक राजकारण-समाजकारण जॉर्ज ह्यांनी केलं नाही. देशभर गाजलेलं आणि ज्यामुळं त्यांचं नाव सर्वदूर पोहोचलं, ते १९७४चं रेल्वे आंदोलन ह्याची साक्ष देतं. त्याबद्दल जॉर्ज ह्यांच्या गेल्या वर्षीच्या वाढदिवशी अरुणा देशपांडे यांनी मुंबई तरुण भारतमध्ये लिहिलं आहे – साहेब, त्या आंदोलनादरम्यान तुम्ही रुळांवर झोपलात. पोलिसांनी तुम्हाला फरफटत ओढताना नकळत झालेल्या शारीरिक इजा आणि बसलेल्या मारामुळेच आज तुम्हाला अलझायमरसारख्या व्याधीशी सामना करायला लागत आहे याची जाणीव आम्हाला आहे.

आणीबाणीची चाहूल, आणीबाणीसदृश परिस्थिती किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा अशी ओरड सध्या सुरू आहे. काँग्रेसजनही त्यात मागे नाहीत. हे ऐकण्याच्या अवस्थेत जॉर्ज नव्हते, हे त्यांचं भाग्यचं. नाही तर त्यांनी आणीबाणी काय असते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं दमन कसं असतं, हे खास जॉर्ज-शैलीत सुनावलं असतं. अरुणा देशपांडे ह्यांनी त्याच लेखात लिहिलं आहे - आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून, मुजोर आणि अविवेकी सरकारविरुद्ध लढणारा नेता तुम्ही एकटेच! इतर अनेक राजकीय पुढार्‍यांचे, देशातील विविध तुरुंग हेच जणू माहेरघर बनले होते... साहेब, तुम्ही किती रात्री तुरुंगात काढल्या असतील हे, ते अविवेकी सरकारच सांगू शकेल; मात्र तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून तुमच्या सहवासात राहताना, तुरुंगातील रात्र आणि कॅबिनेट मंत्र्याच्या घरातील रात्र, यात तुमच्यासाठी काहीच फरक नव्हता हे मला मनोमन पटलं.

जॉर्ज अनेकदा बदनाम झाले. खूप वेळा खलनायक ठर(व)ले. बडोदा डायनामाईट खटल्यानं तर त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला पहिल्यांदा पराभूत करून जनता पक्ष सत्तेवर आलं आणि काही काळातच सरकार अडचणीत आलं. संसदेत मोरारजी सरकारच्या समर्थनाचं दणदणीत भाषण करणारे जॉर्ज दुसऱ्याच दिवशी चरणसिंग ह्यांच्या गोटात दाखल झाले. त्याही वेळी अनेकांना ते खलनायक भासले. जनता पक्षाच्या चाहत्यांनी त्यांना शिव्याशाप दिले.

केंद्रीय उद्योगमंत्री म्हणून जॉर्ज यांनी कोका-कोला, आयबीएम यांसारख्या विदेशी कंपन्यांना देशाबाहेर घालवलं. पण त्यामागचा त्यांचा उद्देश कोणी समजून घेतला नाही. विदेशी हटाव एवढीच त्यामागं जॉर्ज ह्यांची भूमिका नव्हती. सरकारी नियम धुडकावण्याची मुजोरी करणाऱ्या या उद्योगांना त्यांनी शिकवलेला हा धडा होता.


राष्ट्रीय लोकशााही आघाडीचे त्रिकूट.

कट्टर लोहियावादी असलेल्या जॉर्ज ह्यांच्या भूमिका जशाच्या तशा सगळ्यांनाच पटत नसल्या, तरी ते अनेकांचे लाडके जॉर्जच होते. सामान्य माणूस, कार्यकर्ता, पत्रकार, सहकारी नेते-मंत्री... सगळ्यांसाठी ते जॉर्जच होते. यात बदल झाला तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पहिले सरकार केंद्रात सत्तेत आल्यावर. जॉर्ज ह्यांनी प्रतिगामी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यावा, आघाडीचं निमंत्रक बनावं हा अनेक डावे, बुद्धिजीवी ह्यांच्या दृष्टीनं अक्षम्य गुन्हा होता. त्याबद्दल त्यांना काहींनी कधीच माफ केलं नाही. गुजरातमधील दंगलीनंतर त्यांनी नरेंद्र मोदी ह्यांना विनाचौकशी दोषी ठरवून शिक्षा देण्याचा आदेश दिला असता आणि त्यासाठी सरकारमधील आपलं पद पणाला लावलं असतं, तर कदाचित ते पुन्हा स्पृश्य झाले असते! पण ते घडलं नाही आणि मग विचारवंत, बुद्धिवादी यांच्यासाठी जॉर्ज म्हणजे कायमचा टिंगलीचा, तिरस्काराचा विषय ठरले. नौदलप्रमुख विष्णू भागवत यांच्या प्रकरणातही माध्यमे आणि विचारवंत ह्यांनी घेतलेल्या (एकतर्फी) सुनावणीत जॉर्ज ह्यांच्याविरुद्ध निकाल देण्यात आला.

संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात होती. ती समर्थपणे चालविणारे वाजपेयी आणि जॉर्ज ह्यांचं जवळपास सर्वांनाच विस्मरण झालं होतं. पण मध्यंतरी एकदा जॉर्ज ह्यांची आठवण झाली ती चीनमुळे. या देशाबद्दल त्यांनी २२ वर्षांपूर्वीच इशारा दिला होता. त्याचा प्रत्यय जुलै २०१७मध्ये पुन्हा आला. भारतासाठी सर्वाधिक धोकादायक आहे तो चीन. पाकिस्तानच्या घौरी क्षेपणास्त्राची जन्मदात्री चीन आहे. चीनच्या हेतूंबद्दल काही प्रश्न विचारावे वाटण्याची (अंतःस्थ) गरज भासत नाही, ही चिंतेची बाब आहे, असं ते मे १९९८मध्ये म्हणाले होते. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी (मार्च २००८) त्यांनी हेच पुन्हा सांगितलं होतं, आजही चीन आपला संभाव्य धोका क्रमांक एक आहे आणि तो शत्रूही बनेल. भारत चीनला विकला गेला आहे.

ज्येष्ठ पत्रकार कस्तूर जी. वासुकी यांनी दीर्घ काळ जॉर्ज यांची कारकीर्द जवळून पाहिली, त्यावर लिहिलं. जॉर्ज ह्यांच्या निधनाची बातमी आल्यावर मनोरमा ऑनलाईनच्या इंग्रजी संकेतस्थळानं वासुकी यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणतात जॉर्ज म्हणजे साधा माणूस आणि जनसामान्यांचा मंत्री. कारवारच्या दौऱ्यात ते अचानक बेपत्ता झाले. शोधल्यावर दिसलं की, कुठलीही सुरक्षा वगैरे न घेता ते मच्छिमारांशी गप्पा मारत होते. ते नेहमीच सामान्य माणसांसाठी काम करीत राहिले. आपण राजकारणातला एक खरा, लढवय्या सैनिक गमावला आहे!

धगधगतं अग्निकुंड!


मंत्री असून स्वतःच मोटर चालविणारे जॉर्ज.

श्रीरामपूरच्या रंजना पाटील यांच्याकडे जॉर्ज ह्यांच्या अनेक आठवणी आहेत. आपल्या नेत्याचं वर्णन त्या धगधगतं अग्निकुंडअसं करतात. समता पक्षाच्या महिला आघाडीच्या अखिल भारतीय अध्यक्ष असताना त्यांनी १९९८मध्ये श्रीरामपुरात महिलांचे अधिवेशन आयोजित केले होते. संरक्षणमंत्री असलेले जॉर्ज त्याला आले होते. संरक्षणासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणारा हा माणूस तेव्हाही तसाच राहत होता. मंत्री, खासदार, नेता असा काही आविर्भाव त्यांचा कधीच नव्हता. त्यांना कधी कुणी फर्नांडिससाहेब वगैरे म्हटलं नाही. सर्वांसाठी ते कायम 'जॉर्ज' राहिले. त्यांचे कपडेही साधेच असत. स्वतःच ते धूत. कडक सोडा, साधी इस्त्रीही नसे कपड्यांना. एकदा आम्ही म्हणालो, ‘कपड्यांना इस्त्री तरी...तेव्हा जॉर्ज यांनी हसून विचारलं होतं, ‘‘का बुवाह्या कपड्यात मी काय व्यंग्यचित्रासारखा दिसतो का काय?’’

‘‘हा माणूस म्हणजे कम्प्युटर होता. कोणताही माणूस एकदा पाहिला, त्याला भेटलं, त्याच्याशी बोललं कीह्यांच्या डोक्यात त्याची कुंडली तयार होई. ते त्याला कधीच विसरले नाहीत,’’ असं रंजना पाटील म्हणाल्या. मंत्री असताना त्यांच्या बंगल्याचं दार कधी बंद नसे; दारावर कधी सुरक्षारक्षक नसत. त्यांना ते मान्य नव्हतं. आपण समाजासाठी आहोत, समाज आपल्यासाठी नाही, असं ते नेहमी सांगत. कार्यकर्ता भेटल्यावर काय वाचतो, काय लिहितो, समाजासाठी काय करतोह्याचीच चौकशी ते करीत, असं रंजना पाटील यांनी सांगितलं.

---------

(छायाचित्रे विविध संकेतस्थळांच्या सौजन्याने.)

२५ टिप्पण्या:

  1. शब्द चित्र चांगलच उतरले आहे... लढवय्या जॉर्ज विषयी सर्वांनाच नेहमी आकर्षण आणि आत्मीयता वाटली आहे

    उत्तर द्याहटवा
  2. सरजी ... खूप छान चित्र उभे केले आपण जॉर्ज यांचे ...!मला त्यांच्या ॲडमिरल विष्णू भागवत प्रकरणाचे तपशील हवे आहेत ... त्या बद्दल आपण प्रकाश टाकावा ही आग्रही विनंती आहे

    उत्तर द्याहटवा
  3. लेख उत्तम झाला आहे.
    - नरेंद्र चपळगावकर, औरंगाबाद

    उत्तर द्याहटवा
  4. लेखणीतून आपण जॉर्जना जिवंत उभे केले.

    जॉर्ज केंद्रीय मंत्री असताना नगरच्या गांधी मैदानावर त्यांचे भाषण ऐकले. कामगार - कामगार नेता - खासदार - मंत्री असा त्यांचा प्रवास. कामगार असताना जो जॉर्ज होता, अगदी तसाच जॉर्ज आताही. 'मंत्री व्हायला अक्कल लागत नाही, तर प्रामाणिकपणा आणि तळमळ लागते,' असे ते तेव्हा म्हणाले होते.

    आपण लेखणीला सतत व्यायाम देता, म्हणूनच ती इतकी सशक्त आहे!
    - श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)

    उत्तर द्याहटवा
  5. दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील लेखाचे शीर्षक एकदम चपखल! पुण्यात त्यांच्या काही सभा ऐकण्याचा योग मला आला. त्या वेळी त्यांना अगदी जवळून पाहिले. या महान नेत्याला आदरांजली.
    - अशोक कानडे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान लेख. मला तर यातील बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या. लेख वाचून त्या कळल्या.
    - केतकी शहा, पुणे

    उत्तर द्याहटवा
  7. सतीश, जॉर्जबद्दल अतिशय समर्पक शब्दांत धावता आलेख आज वाचायला मिळाला. मी मुंबईतच असल्यामुळे पाच-सहा वेळा तरी जॉर्जना जवळून पाहिले आहे. एक धडाडीचा नेता, मुंबईचा 'बंद-सम्राट', निःस्वार्थी राजकारणी अशी विविध बिरुदं असलेला नेता. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि जॉर्ज यांची शिवाजी पार्कवरील एकत्रित जाहीर सभा मी ऐकली आहे.

    जॉर्जना अनेक भाषा अस्खलित अवगत होत्या. जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर जॉर्ज पहिल्यांदाच मुंबईत रेल्वेने आले. मीही पहाटेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. वेळ सकाळची असूनही अफाट जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी लोटला होता. केंद्रीय मंत्री असल्यामुळे कडेकोट सरकारी सुरक्षा होती. टॅक्सीमेन असोसिएशनचे सर्वेसर्वा असलेल्या जॉर्ज यांनी टॅक्सीने जाणे पसंत केले! मुंबई महापालिका कामगार संघटनाही पूर्णपणे जॉर्जकडे होती.

    आपल्या लोकशाहीचं नशीब एवढं चांगलं म्हणून आणीबाणीनंतर जनता पक्षाचं सरकार आलं. तसं झालं नसतं, तर एक देशभक्त देशद्रोहाच्या खटल्यात अडकला असता आणि आपण त्याला मुकलो असतो.'खिडकी'तल्या या उत्तम लेखाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन!
    - पांडुरंग देशमुख, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  8. एक धगधगतं वादळ काळाच्या पडद्याआड गेलं. बायबल कॉलेजमधील शिक्षणामुळे जॉर्ज सर्वसामान्यच राहिले. खरा चर्चमन!
    - संजय आढाव, नगर

    उत्तर द्याहटवा
  9. अभ्यासपूर्ण लिखाण आणि प्रभावी मांडणी. खूप छान.
    - बालाजी ढोबळे, परतूर (जि. जालना)

    उत्तर द्याहटवा
  10. चांगला लेख. जॉर्ज यांचं भाषण मी पहिल्यांदा आमच्या कॉलेजमध्ये १९६८मध्ये ऐकलं. मी अकरावीत असेन तेव्हा आणि त्यांचं लग्नही झालेलं नसावं बहुतेक. त्या आधी १९६६मध्ये अंबाजोगाई येथेच मी स. का. पाटील यांचं भाषण ऐकलं. तेव्हा ते रेल्वेमंत्री होते. जॉर्ज यांनी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला.
    - बी. व्ही. कानडे, बंगलोर

    उत्तर द्याहटवा
  11. अप्रतिम... निव्वळ अप्रतिम!

    लेख वाचताना तू जॉर्जला कधी भेटला नाही, हे जाणवतच नाही. किंबहुना तू बराच काळ त्याच्या जवळ वावरला असावास, असंच वाटतं. मी मुंबईत जॉर्जला खूप जवळून पाहिलं होतं. त्याची बेस्ट आणि टॅक्सीमेन युनियनच्या आंदोलनांतील भाषणंही ऐकली होती. माझ्या वडिलांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील आंदोलनाचे जवळपास दोन वर्षं रिपोर्टिंग केलं होतं. त्या काळात त्यांचा जॉर्जशी संबंध आला होता.

    'बंद-सम्राट' ही जॉर्जची ओळख शिवसेना बहरात आल्यानंतर हळुहळू पुसत गेली. त्यांनी स्थापन केलेली युनियनही त्यांच्या शिष्यांनी बळकावली. गेल्या काही वर्षांपासून जॉर्ज तसाही अदखलपात्र झाला होता. तोही इतका की, आज त्याचे निधन झाल्यावर तो अजून होता हे समजलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

    पण जॉर्ज खरंच वेगळा आणि मोठा माणूस होता. काळा चौकीत राहणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना भेटायला तो डॉक्टर शिवराम चाळीत आला होता. साधी राहणी, पण विचारांनी समृद्ध असणाऱ्या मोजक्या लढवय्या नेत्यांपैकी जॉर्ज एक होता.

    ता. क. - मी जॉर्ज असा एकेरी उल्लेख केला. याचं कारण, जसं सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, अमितभा आपल्याला इतके जवळचे वाटतात की, सत्तराव्या वर्षीही आपण अमिताभचा एकेरी उल्लेख करतो. अगदी त्याच भावनेतून मी जॉर्जचा एकेरी उल्लेख केला आहे.
    - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

    उत्तर द्याहटवा
  12. सर, लेख सुंदर. आजच्या तरुणांना त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. लेखातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कळाले.

    उत्तर द्याहटवा
  13. लेख माहितीपूर्ण आहे. त्यात तुम्ही कालच्या Beating the Retreatचा उल्लेख केलेला आहे. प्रजासत्ताकदिनाचा हा सोहळा माझा सर्वांत प्रिय समारंभ आहे.
    - पराग पुरोहित, पुणे

    उत्तर द्याहटवा
  14. जॉर्ज यांचा जीवनपट विस्मरण होण्यासारखा नाहीच. त्यांचा मी फॅन आहे. आपलं लेखन परिपक्व आणि अतिशय सुरेख. मांडणीही सुंदर.
    - वसंत कुलकर्णी, पुणे

    उत्तर द्याहटवा
  15. Hats off to the great leader. 'खिडकीत'तून हुबेहूब दिसलंय त्यांचं प्रतिबिंब!
    - डॉ. ऊर्मिला चाकूरकर, पैठण

    उत्तर द्याहटवा
  16. वाचला लेख. समयोचित. झापडबंद नसलेला आणि सहिष्णू असलेला अखेरचा समाजवादी.
    - विभाकर कुरंभट्टी, जळगाव

    उत्तर द्याहटवा
  17. खूप बारकाइने वाचला लेख. अप्रतिम.

    जॉर्जच्या बदलत्या भूमिकांमुळे त्यांना खलनायक ठरवलं. उजव्या कळपात जॉर्ज शोभूनही दिसत नव्हते.

    लढवय्ये जॉर्ज कोणीही विसरणार नाही. त्यांच्या साधेपणाला शब्द नाहीत. माझ्या आवडत्या नेत्याबद्दल आपण खूप भावपूर्ण लेख लिहिला. मनस्वी धन्यवाद. जॉर्जना लाल सलाम...
    - आरिफ शेख, श्रीगोंदे

    उत्तर द्याहटवा
  18. खुप छान व्यक्तीचित्रण... असे नेते आजच्या काळात खुप कमी आढळतात. जाॅर्ज फर्नांडिस यांना वंदन...

    उत्तर द्याहटवा
  19. अप्रतिम लेख! त्यांना मी पाहिलं नाही; मात्र त्यांच्याविषयी खूप वाचलं होतं, ऐकलं होतं. त्यांच्या निधनाच्या दिवशीच त्यांचा जीवनप्रवास डोळ्यांसमोर प्रत्यक्ष उभा केलात. आभार
    - कानिफ बांगर, ठाणे

    उत्तर द्याहटवा
  20. पुष्कळ उशिरा म्हणजे काल संपूर्ण लेख विगतवार, शांतपणे वाचला.

    जॉर्जना आपण नीटच Document केले. हा लेखनाचा नमुना त्यासाठी वेगळा ठरतो. हा साद्यंत आहे आणि तो एकांगी नाही. यासाठी अनेक संदर्भ तपासावे लागतात आणि रस कायम राहील, याची मांडणीत दक्षता घ्यावी लागते.

    फोटो लेखास अधिक गहिरे करतात. जॉर्ज यांना श्रद्धांजली!
    - प्रदीप रस्से, जळगाव

    उत्तर द्याहटवा
  21. अप्रतिम व्यक्तिचित्रण!
    - निमा कुलकर्णी, नांदेड

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...