शुक्रवार, १५ मार्च, २०१९

संन्याशाकडून व्यवहाराचा ‘धडा’



प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाचं दर्शन चिरंजिवाच्या कॅमेऱ्यातून.

चिरंजीव अलाहाबादला गेले होते गेल्या आठवड्यात. हल्लीचं प्रयागराज. तिथं पोहोचल्यापासून तीन-चार दिवस आणि आता घरवापसी झाल्यानंतरही त्याच्या बोलण्यात शहराचं नाव इलाहाबाद असंच येतं. लोकांनी बिनचूक मराठी बोलावं, ह्याची जबाबदारी आपल्या (एकट्याच्याच) खांद्यावर असल्यागत मी नेहमी टोकत असतो. त्या बाण्याला जागून त्यालाही म्हटलं, अरे बाबा, इलाहाबाद नाही, ‘अलाहाबाद!’ हे ऐकून त्यानं शांतपणे उत्तर दिलं, ‘‘अहो बाबा, तिथं सगळे इलाहाबादच म्हणतात. मग आपण कशाला वेगळं काही नाव घ्यायचं?’’

ज्या कामासाठी चिरंजीव गेले होते, ते काम पाचऐवजी दोन दिवसांतच आटोपलं. थोडक्यात अपेक्षित काम झालं नाही. तिथून पुढं लखनौला जायचं होत. त्याला अवकाश होता. आता तीन दिवस मिळालेले. काय करणार? त्याला सांगितलं की, गेलाच आहेस, तर प्रयागराज पाहून घे. कुंभमेळा झाला आहे. नवीन काय काय झालं आहे ते बघ. तिथं खाण्यासाठी कुठं नि काय प्रसिद्ध आहे, याचा शोध इंटरनेटवर घेतला. ठिकाणांची ती यादी पत्त्यासकट त्याला इ-मेलने पाठवून दिली. अपेक्षा होती की, त्यातलं काही चांगलंचुंगलं तो आठवणीनं घेऊन येईल. त्यानं त्या चांगल्याचुंगल्याच्या फक्त चविष्ट आठवणी आणल्या सोबत.

मुलगा आणि त्याचा मित्र, असे दोघे होते. ते दोन-तीन दिवस इलाहाबादमध्ये भटकत राहिले, चवीनं इथे तिथे चरत राहिले. आनंदभवन पाहिलं. त्याचा पंडित नेहरूंबद्दलचा आदर थोडा वाढला. एका संग्रहालयाला भेट देऊन आले दोघेही. त्रिवेणी संगम पाहून, नद्यांच्या पात्रांचं भव्य स्वरूप डोळ्यांत साठवून दोघं परतत होते. अर्थातच कुठे तरी, काही तरी नवीन खायचं, याची चर्चा करीत.

खाऊगल्लीचा शोध सुरू असताना रस्त्यात एक नागा साधू या दोघांच्या मागे लागला. कुंभमेळा अगदी परवाच संपल्यानं साधू-संन्यासी बरेच होते अजून तिथं. तसंही तीर्थक्षेत्र असल्यानं तिथं ते कायमच असणार.

'कुछ दे दो, खाने के लिए कुछ तो दो...' या नागा साधूनं दोघांच्या मागे लकडा लावला. जाऊ द्या कटकट असं स्वतःलाच सांगत मुलाच्या मित्रानं त्याला दहा रुपयाचं नाणं दिलं. काही दिलं, तर काही मिळायलाही हवं ना! ते तत्त्व लक्षात ठेवून साधूला मागं सोडून जाता जाता तो हळूच म्हणाला, 'बाबाजी, आपने दान लिया, फिर आशीर्वाद तो दिया नही...'


अलाहाबादेत कुंभमेळ्यासाठी आलेला नागा साधू.
(प्रातिनिधिक छायाचित्र संकेतस्थळावरून साभार)
ही 'पासिंग कमेंट' नागा साधूनं ऐकली नि लगेच या दोघांना परत बोलावलं. एकानं दिलं नि दुसऱ्यानं खिशात हातही घातला नाही, हे त्याच्या लक्षात आलं होतंच. त्यामुळे त्यानं चिरंजीवांवर लक्ष केंद्रित केलं. त्याच्या अंगावरच्या छान दिसणाऱ्या जर्कीनला हात लावत साधूनं विचारलं, ‘ये फाड दूँ क्या?’’

मुलगा म्हणाला, ‘‘नही बाबाजी...’’

'हाँ, कह दो' साधूनं फर्मावलं. मुलानं 'होय' असं उत्तर दिल्यावर तो म्हणाला, ‘‘नही, ऐसा कभी नही करूँगा। भगवान शिवजी ने कहां तो भी नही।’’

पुढं लगेच त्यानं थप्पड मारण्यासाठी हात उगारला आणि विचारलं, ‘‘मारू का?’’

मुलाचं उत्तर स्वाभाविकपणे नकारार्थी होतं. नागा साधू म्हणाला, ‘‘पुन्हा नाही? होय म्हण.’’

त्यानंतर मुलाच्या तोंडून निघालेला होकार ऐकल्यावर साधूबाबा म्हणाले, ‘‘नाही रे बाबा, तुला मारणार नाही. कशाला मारू? भगवान शिवशंकरांनी सांगितलं, तरी नाही मारणार तुला.’’

आता साधूमहाराजांचे डोळे मुलाच्या बुटांकडे वळले. ते बऱ्यापैकी किमतीचे आहे, हे लक्षात घेऊन विचारता झाला, ‘‘याच्यावर पाय देऊ का?’’

पुन्हा तोच संवाद - नाही आणि होय. होय म्हटल्यावर साधूकडून पुन्हा भोळ्या सांबाची साक्ष. तसं काही करणार नाही. कदापि!

‘‘तुम्हारा पर्स कहाँ है?’’, नागा साधूनं विचारलं आणि फर्मावलं, ‘‘दिखाओ तो जरा...’’

पँटच्या खिशातलं पाकीट काढून मुलानं उघडून दाखवलं.

साधूनं त्यातली एकमेव नोट उचलत विचारलं, ‘‘ही मी घेऊ का?’’

तोच खेळ पुनःपुन्हा. हे माहीत झाल्यानं आणि आधी झालेल्या संवादांवर (आणि साधूबाबांवर) (नको तेवढा) विश्वास ठेवून चिरंजीव उत्तरले, ‘‘हो, घ्या की!’’

तीच संधी साध बेटा, ठीक है। पैसे कोन छोडता..?’’ असं म्हणत नागा साधूमहाराजांनी ती नोट जवळच्या झोळीत टाकली!

ती नोट पाकिटातून झोळीत स्थलांतरित होत असताना, आपण कुठं नि कसं फसलो, याची जाणीव चिरंजीवांना झाली. कुछ लिया, मगर कुछ दिया तो नही, हे विचारलं जाईल, एवढं लक्षात घेऊन साधूबाबा या वेळी वागले. त्यांनी त्या नोटेच्या बदल्यात चिरंजीवांना रुद्राक्ष दिलं एक. आपण कसे फसलो, याचा विचार करतच हे दोघं वाटेला लागले. दुःखात सुख एवढंच होतं की, पाकिटातली एकमेव नोट पन्नासची होती.

घरी परतल्यावर एक दिवसानं हा सगळा किस्सा सांगून चिरंजीव म्हणाले, ‘‘पन्नास रुपये गेले. बरं झालं तेवढीच नोट होती पाकिटात. पण मार्केटिंग कसं करायचं असतं, हे शिकलो त्याच्याकडून.’’

त्याचा किस्सा आणि शिक्षणाबद्दल वाटणारी ओढ ह्याबद्दल सगळं शांतपणे ऐकून म्हणालो, ‘असो! मी नाही फसलो, तर पन्नास रुपयांत खूप काही शिकलो,’ हे सांगण्याचं मार्केटिंग तू आता करतो आहेस, एवढंच!’’

५ टिप्पण्या:

  1. मला पण पाठवा तो मेल...खाण्याच्या ठिकाणांचा :-)

    उत्तर द्याहटवा
  2. वा, व्वा! ... सुंदर. आपण स्वतः न जाताही चिरंजीवांनी सांगितलेला प्रसंग तू असा रंगवला आहेस की, अगदी डोळ्यांसमोर उभाच राहतो. साधू नागा असो वा नागडा... पैसा पाहिला की सगळे आपल्या मूळ सामान्य मानवी रूपात येतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

    जॉनी वॉकर किंवा आगा यांच्यासारख्या विनोदवीरांच्या एखाद्या चित्रपटात विनोदी प्रसंग म्हणून खुलला असता, असाच हा प्रसंग म्हणता येईल.

    चिरंजीवाने समर्थन केले असे नाही, तर तो नव्या पिढीचा दृष्टिकोन आहे. असे अनुभव आल्याशिवाय समृद्ध होताही येत नाही. त्यानं या प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले इतकेच...

    मस्त... तुझं लेखन वाचताना मजा येतेच. शिवाय वेगळं काही ना काही वाचायला मिळतं...
    - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त...पुन्हा एकदा सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...