मुख्य सामग्रीवर वगळा

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

संन्याशाकडून व्यवहाराचा ‘धडा’



प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाचं दर्शन चिरंजिवाच्या कॅमेऱ्यातून.

चिरंजीव अलाहाबादला गेले होते गेल्या आठवड्यात. हल्लीचं प्रयागराज. तिथं पोहोचल्यापासून तीन-चार दिवस आणि आता ‘घरवापसी’ झाल्यानंतरही त्याच्या बोलण्यात शहराचं नाव ‘इलाहाबाद’ असंच येतं. लोकांनी बिनचूक मराठी बोलावं, ह्याची जबाबदारी आपल्या (एकट्याच्याच) खांद्यावर असल्यागत मी नेहमी टोकत असतो. त्या बाण्याला जागून त्यालाही म्हटलं, ‘‘अरे बाबा, ‘इलाहाबाद’ नाही, ‘अलाहाबाद’!’’ हे ऐकून त्यानं शांतपणे उत्तर दिलं, ‘‘अहो बाबा, तिथं सगळे इलाहाबादच म्हणतात. मग आपण कशाला वेगळं काही नाव घ्यायचं?’’

ज्या कामासाठी चिरंजीव गेले होते, ते काम पाचऐवजी दोन दिवसांतच आटोपलं. थोडक्यात अपेक्षित काम झालं नाही. तिथून पुढं लखनौला जायचं होत. त्याला अवकाश होता. आता तीन दिवस मिळालेले. काय करणार? त्याला सांगितलं की, गेलाच आहेस, तर प्रयागराज पाहून घे. कुंभमेळा झाला आहे. नवीन काय काय झालं आहे ते बघ. तिथं खाण्यासाठी कुठं नि काय प्रसिद्ध आहे, याचा शोध इंटरनेटवर घेतला. ठिकाणांची ती यादी पत्त्यासकट त्याला इ-मेलने पाठवून दिली. अपेक्षा होती की, त्यातलं काही चांगलंचुंगलं तो आठवणीनं घेऊन येईल. त्यानं त्या चांगल्याचुंगल्याच्या फक्त चविष्ट आठवणी आणल्या सोबत.

मुलगा आणि त्याचा मित्र, असे दोघे होते. ते दोन-तीन दिवस ‘इलाहाबाद’मध्ये भटकत राहिले, चवीनं इथे तिथे चरत राहिले. आनंदभवन पाहिलं. त्याचा पंडित नेहरूंबद्दलचा आदर थोडा वाढला. एका संग्रहालयाला भेट देऊन आले दोघेही. त्रिवेणी संगम पाहून, नद्यांच्या पात्रांचं भव्य स्वरूप डोळ्यांत साठवून दोघं परतत होते. अर्थातच कुठे तरी, काही तरी नवीन खायचं, याची चर्चा करीत.

खाऊगल्लीचा शोध सुरू असताना रस्त्यात एक नागा साधू या दोघांच्या मागे लागला. कुंभमेळा अगदी परवाच संपल्यानं साधू-संन्यासी बरेच होते अजून तिथं. तसंही तीर्थक्षेत्र असल्यानं तिथं ते कायमच असणार.

'कुछ दे दो, खाने के लिए कुछ तो दो...' या नागा साधूनं दोघांच्या मागे लकडा लावला. ‘जाऊ द्या कटकट’ असं स्वतःलाच सांगत मुलाच्या मित्रानं त्याला दहा रुपयाचं नाणं दिलं. काही दिलं, तर काही मिळायलाही हवं ना! ते तत्त्व लक्षात ठेवून साधूला मागं सोडून जाता जाता तो हळूच म्हणाला, 'बाबाजी, आपने दान लिया, फिर आशीर्वाद तो दिया नही...'


अलाहाबादेत कुंभमेळ्यासाठी आलेला नागा साधू.
(प्रातिनिधिक छायाचित्र संकेतस्थळावरून साभार)
ही 'पासिंग कमेंट' नागा साधूनं ऐकली नि लगेच या दोघांना परत बोलावलं. एकानं दिलं नि दुसऱ्यानं खिशात हातही घातला नाही, हे त्याच्या लक्षात आलं होतंच. त्यामुळे त्यानं चिरंजीवांवर लक्ष केंद्रित केलं. त्याच्या अंगावरच्या छान दिसणाऱ्या जर्कीनला हात लावत साधूनं विचारलं, ‘‘ये फाड दूँ क्या?’’

मुलगा म्हणाला, ‘‘नही बाबाजी...’’

'हाँ, कह दो' साधूनं फर्मावलं. मुलानं 'होय' असं उत्तर दिल्यावर तो म्हणाला, ‘‘नही, ऐसा कभी नही करूँगा। भगवान शिवजी ने कहां तो भी नही।’’

पुढं लगेच त्यानं थप्पड मारण्यासाठी हात उगारला आणि विचारलं, ‘‘मारू का?’’

मुलाचं उत्तर स्वाभाविकपणे नकारार्थी होतं. नागा साधू म्हणाला, ‘‘पुन्हा नाही? होय म्हण.’’

त्यानंतर मुलाच्या तोंडून निघालेला होकार ऐकल्यावर साधूबाबा म्हणाले, ‘‘नाही रे बाबा, तुला मारणार नाही. कशाला मारू? भगवान शिवशंकरांनी सांगितलं, तरी नाही मारणार तुला.’’

आता साधूमहाराजांचे डोळे मुलाच्या बुटांकडे वळले. ते बऱ्यापैकी किमतीचे आहे, हे लक्षात घेऊन विचारता झाला, ‘‘याच्यावर पाय देऊ का?’’

पुन्हा तोच संवाद - नाही आणि होय. होय म्हटल्यावर साधूकडून पुन्हा भोळ्या सांबाची साक्ष. तसं काही करणार नाही. कदापि!

‘‘तुम्हारा पर्स कहाँ है?’’, नागा साधूनं विचारलं आणि फर्मावलं, ‘‘दिखाओ तो जरा...’’

पँटच्या खिशातलं पाकीट काढून मुलानं उघडून दाखवलं.

साधूनं त्यातली एकमेव नोट उचलत विचारलं, ‘‘ही मी घेऊ का?’’

तोच खेळ पुनःपुन्हा. हे माहीत झाल्यानं आणि आधी झालेल्या संवादांवर (आणि साधूबाबांवर) (नको तेवढा) विश्वास ठेवून चिरंजीव उत्तरले, ‘‘हो, घ्या की!’’

तीच संधी साधत ‘‘बेटा, ठीक है। पैसे कोन छोडता..?’’ असं म्हणत नागा साधूमहाराजांनी ती नोट जवळच्या झोळीत टाकली!

ती नोट पाकिटातून झोळीत स्थलांतरित होत असताना, आपण कुठं नि कसं फसलो, याची जाणीव चिरंजीवांना झाली. ‘कुछ लिया, मगर कुछ दिया तो नही,’ हे विचारलं जाईल, एवढं लक्षात घेऊन साधूबाबा या वेळी वागले. त्यांनी त्या नोटेच्या बदल्यात चिरंजीवांना रुद्राक्ष दिलं एक. आपण कसे फसलो, याचा विचार करतच हे दोघं वाटेला लागले. दुःखात सुख एवढंच होतं की, पाकिटातली एकमेव नोट पन्नासची होती.

घरी परतल्यावर एक दिवसानं हा सगळा किस्सा सांगून चिरंजीव म्हणाले, ‘‘पन्नास रुपये गेले. बरं झालं तेवढीच नोट होती पाकिटात. पण मार्केटिंग कसं करायचं असतं, हे शिकलो त्याच्याकडून.’’

त्याचा किस्सा आणि ‘शिक्षणाबद्दल वाटणारी ओढ’ ह्याबद्दल सगळं शांतपणे ऐकून म्हणालो, ‘‘असो! ‘मी नाही फसलो, तर पन्नास रुपयांत खूप काही शिकलो,’ हे सांगण्याचं मार्केटिंग तू आता करतो आहेस, एवढंच!’’

टिप्पण्या

  1. मला पण पाठवा तो मेल...खाण्याच्या ठिकाणांचा :-)

    उत्तर द्याहटवा
  2. वा, व्वा! ... सुंदर. आपण स्वतः न जाताही चिरंजीवांनी सांगितलेला प्रसंग तू असा रंगवला आहेस की, अगदी डोळ्यांसमोर उभाच राहतो. साधू नागा असो वा नागडा... पैसा पाहिला की सगळे आपल्या मूळ सामान्य मानवी रूपात येतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

    जॉनी वॉकर किंवा आगा यांच्यासारख्या विनोदवीरांच्या एखाद्या चित्रपटात विनोदी प्रसंग म्हणून खुलला असता, असाच हा प्रसंग म्हणता येईल.

    चिरंजीवाने समर्थन केले असे नाही, तर तो नव्या पिढीचा दृष्टिकोन आहे. असे अनुभव आल्याशिवाय समृद्ध होताही येत नाही. त्यानं या प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले इतकेच...

    मस्त... तुझं लेखन वाचताना मजा येतेच. शिवाय वेगळं काही ना काही वाचायला मिळतं...
    - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त...पुन्हा एकदा सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्ही गावं एक होतात. बातमी नेमकी कुठली ते कळायला मार्ग नाही. लोणावळे, जळगाव, भुसावळ, करमाळा आदी स्थाननामांतील आणि काळे, साळी, माळी, जगदाळे, बाळू आदी व्यक्तिनामांतील ‘ ळ ’ जाऊन तिथं ‘ ल ’ कसा येतो ? हिंदीमध्ये ‘ ळ ’ च्या जागी ‘ ल ’ का, हा प्रश्न पुण्यातील आयुर्विमा अधिकारी प्रकाश निर्मळ ह्यांना छळत होता. हा अक्षरबदल खटकत होता. त्यांनी दाद मागायचं ठरवलं. अक्षरांतर होऊ नये, ह्यासाठी २०१८ पासून प्रयत्न सुरू केले. ' ळ ' ऐवजी ' ल ' चा वापर चुकीचा आहे. हिंदीमध्ये ' ळ ' च वा...

द. मा. - पाहिलेले, ऐकलेले

'परमेश्वर प्रसन्न झाला, तर पुढचा जन्म मी लेखकाचाच मागीन! उत्तम लेखक होणे, हीच माझी महत्त्वाकांक्षा होती. माझ्या भाषेतील हजारो, लाखो लोकांच्या जीवनात माझ्या लेखनामुळे आनंद निर्माण करावा, हीच माझी इच्छा आहे...' ...आपल्या हजारो, लाखो चाहत्यांना हळहळ करायला लावीत, ह्या जगाचा काल निरोप घेतलेल्या प्रसिद्ध लेखक प्रा. द. मा. मिरासदार ह्यांचे हे म्हणणे आहे. नगरमध्ये २४ वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत झाली. तिचा समारोप करताना त्यांनी ही इच्छा बोलून दाखविली. द. मा. मिरासदार आपल्या अनेकांचे आवडते लेखक. लहानपणी कधी तरी त्यांच्या कथांची ओळख झाली. बहुतेक जुन्या मॅट्रिकच्या (अकरावी) मराठी पाठ्यपुस्तकात त्यांची नागू गवळीची कथा होती. मी ऐकलेली-वाचलेली त्यांची ती पहिली कथा. आपल्या म्हशींवर लेकरांप्रमाणे प्रेम करणारा, कुंभकर्णी झोपेतच दोन-तीन चोरांना लोळवणारा नागू फार आवडला. मग संधी मिळेल, तेव्हा करमाळ्याच्या ज्ञानेश्वर वाचनमंदिरातून त्यांची पुस्तके आणून वाचू लागलो. भोकरवाडी आणि नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, आनशी, महादा, ज्ञानू वाघमोडे ह्य...

गावसकर नावाचं गारूड आणि 'क्रीडांगण'चा विशेषांक

  ते वर्ष महत्त्वाचंच होतं. आता इतिहासात स्थान मिळवलेल्या अनेक घडामोडी त्या वर्षात घडल्या. उदाहरणार्थ, इदी अमिन ह्यांनी लष्करी उठाव करून युगांडाची सत्ता ताब्यात घेतली. चीननं अमेरिकेच्या टेबल टेनिस संघाला आमंत्रण देऊन ‘ पिंगपाँग डिप्लोमसी ’ सुरू केली. अमेरिकेनं सव्विसावी घटनादुरुस्ती करून मतदाराचं वय १८ वर्षावर आणलं. भारत आणि सोव्हिएत रशिया ह्यांनी २० वर्षांच्या मैत्री करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ‘ द न्यू यॉर्क टाइम्स ’ नं ‘ पेंटॅगॉन पेपर्स ’ प्रसिद्ध करून युद्धखोर अमेरिकी सरकारचा खोटारडेपणा उघडकीस आणला. ‘ वॉल्ट डिस्ने वर्ल्ड थीम पार्क ’ चं उद्घाटन झालं. वगैरे वगैरे... ते वर्ष होतं १९७१. हिमाचल प्रदेशाच्या रूपानं भारतात अठरावं राज्य निर्माण झालं. पश्चिम बंगालला महापुराचा आणि ओडिशाला (तेव्हा ओरिसा) वादळाचा महाभयंकर तडाखा बसला. वरच्या सगळ्या घटना-घडामोडी महत्त्वाच्या आहेत. पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याहून खूप खूप महत्त्वाचं असं ह्याच वर्षानं दिलं. पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनीच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या सैन्यदलानं पाकिस्तानची नांगी ठेचली ती हेच वर्ष संपता संपता. बा...