शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

चंदनापुरीत भेटलेला अजिंक्य रहाणे

 


देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली!
(छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.)

..........................................

ही गोष्ट १४ वर्षांपूर्वीची. आय. पी. एल. गाजवलेल्या अजिंक्य रहाणे ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली होती. घरगुती कार्यक्रमानिमित्त
तो आपल्या मूळ गावी, म्हणजे चंदनापुरीला येणार होता.
त्याला भेटायचं, जमलंच तर बोलायचं आणि बातमी करायची,
म्हणून तिथे गेलो होतो. त्या दिवसभराची त्या वेळी केलेली ही बातमी...
त्याच्या निवृत्तीनंतर ही भेट आठवली.
.............

अजिंक्‍य रहाणेच्या शब्दांत...

क्रिकेट : क्रिकेटची आवड कशी लागली, कधी लागली असं काही नेमकं नाही सांगता येणार; पण लहानपणापासून खेळायला आवडतं हे नक्की. डोंबिवलीत जेथे राहत होतो, त्या इमारतीत खेळायला सुरवात केली. पुढे खेळतच गेलो. खातू सर माझे पहिले मार्गदर्शक. त्यांच्याच हाताखाली क्रिकेटचे पहिले धडे गिरवले. अर्थात, त्या वेळी सचिन तेंडुलकरचा आदर्श आणि त्याच्यासारखं बनण्याची प्रेरणा होतीच.

कसोटी, मर्यादित षटकांच्या लढती आणि टी-20 यातला कोणता प्रकार अधिक आवडतो? छे! हा प्रश्‍नच नाही. मला हा खेळच आवडतो आणि त्यामुळे त्यातल्या या तिन्ही प्रकारांमध्ये खेळायला मनापासून आवडतं.

पहिला सामना : चौदा वर्षांखालील गटात पहिला सामना ठाण्यात खेळलो. तो सामना नक्कीच लक्षात राहणारा आहे, कारण पहिल्याच सामन्यात मी मॅन ऑफ द मॅचठरलो होतो.

माझे आयडॉल’ : सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड. त्या दोघांचा खेळ पाहत मी वाढलो. त्यांच्या बरोबर खेळताही आले. तेच माझे आदर्श, प्रेरणास्थान, ‘आयडॉलआहेत. राहुल द्रविड यांच्याशी माझी जोडी जमली. ते स्वतःहून बोलतात, युक्तीच्या चार गोष्टी सांगतात; खेळात सुधारणा सुचवितात.

पहिल्या निवडीनंतर : जो कोणी क्रिकेट खेळायला सुरवात करतो, त्याचं भारताकडून खेळण्याचं स्वप्न असतंच. भारतीय संघात निवड झाली, तेव्हा साहजिकच मला मनस्वी आनंद झाला. इथं टिकायचं असेल, तर दीर्घ काळ मेहनत करावी लागेल, याचीही जाणीव झाली.

आई-बाबांविषयी : कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. मला खेळायला जाण्यासाठी, सामन्यासाठी लवकर जावं लागायचं. माझ्याबरोबर तेही लवकर उठत; कधी मला सोडायला येत. बाबांनी ऑफिस सांभाळून माझ्या खेळासाठी बरंच केलं. बाकीचे खर्च बाजूला ठेवून खेळासाठी हवे तेव्हा आवश्‍यक पैसे दिले. खरं सांगू? त्यांनी काय काय केलं, याबद्दल सांगीन तेवढं थोडंच.

खाणे, वाचणे : घरचं जेवण मला आवडतं. काहीही. त्यात अमूकच हवं, तमूकच हवं, असं काही नाही. घरी तयार केलेलं काहीही खायला आवडतं. वाचायलाही मला आवडतं. सध्या मी मेडिटेशनविषयी जरा गांभीर्यानं वाचतो आहे.

------

संगमनेरपासून जेमतेम पाच किलोमीटरवर, नाशिक-पुणे रस्त्यावर असलेले चंदनापुरी जणू आता शहराचे उपनगरच बनलं आहे. त्याची विशेष वेगळी ओळख राहिली नव्हती; पण गेल्या वर्षापासून या गावाची नवी ओळख झाली आहे - अजिंक्‍य रहाणेचे गाव चंदनापुरी! आणि या ओळखीवर अख्ख्या गावाने जणू शिक्कामोर्तबच केलं.

संगमनेरहून पुण्याला नेणाऱ्या रस्त्यावर सगळीकडे काल फ्लेक्‍सदिसत होते. चंदनापुरीसारख्या छोट्या गावात या फलकांची गर्दी होती. सगळ्या फलकांवर एकच छबी झळकत होती, ती अर्थातच अजिंक्‍य रहाणेची. त्याच्या वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरही फ्लेक्‍स दिसत होते आणि अजिंक्‍य रहाणेच्या वस्तीकडेअसे दिशादर्शक फलक त्याच्या छायाचित्रासह!

अजिंक्यचे वडील जेथे शिकले, वाढले, त्या गावातील गावकरी आणि जयहिंद युवा मंच यांनी अजिंक्‍यचा सत्कार केला. सेलिब्रिटी क्रिकेटपटू आमचा गाववाला आहे, त्याचा सत्कार करण्यात आम्हाला मनापासून आनंद होत आहे, हेच गावात सळसळलेल्या उत्साहाने दाखवून दिलं.

इंडियन प्रीमियर लीगचा पाचवा हंगाम गाजविणारा, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजासाठी असलेली ऑरेंज कॅपह्या हंगामातील पूर्वार्धापर्यंत बाळगणारा अजिंक्‍य रहाणे. राहुल द्रविडने ज्याच्याबद्दल कौतुकोद्‌गार काढले तो अजिंक्‍य रहाणे. ज्याच्यावर गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट समीक्षक आणि रसिक न थकता स्तुतिसुमने उधळत आहेत, तो अजिंक्‍य रहाणे.

सलामीच्या या फलंदाजाची श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

खरे तर अजिंक्‍यची काही पहिल्यांदाच भारतीय चमूत निवड झालेली नाही. ह्या आधी गेल्या सप्टेंबरमध्येच इंग्लंडविरुद्ध एक दिवसाच्या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं. पाहुण्या वेस्ट इंडिजविरुद्धही तो चेन्नईत शेवटचा सामना खेळला.

चंदनापुरीकरांना सत्कारासाठी त्याची वेळच मिळत नव्हती. अजिंक्‍यची पुन्हा भारतीय संघात निवड झाली आणि ही संधी साधून गावाने त्याच्यावरचं प्रेम उत्साही स्वरूपात दाखवून दिलं.

अजिंक्‍यने वस्तीवर मस्त, आलिशान घर बांधलं आहे. त्याला नाव दिलं आहे – झेलू’. त्याच्या लाडक्‍या आजीचं हे नाव. या बंगल्याची वास्तुशांती करायची होती. हा कार्यक्रम आणि गाववाल्यांकडून होणारा सत्कार, ह्यासाठी तो एक दिवस आधीच गावी पोहोचला. गावात त्याने मुक्कामही केला.

रहाणे कुटुंब मुंबईहून पहाटे साडेतीन वाजता निघालं. संगमनेरपर्यंत अजिंक्‍य स्वतः मोटर चालवत होता, असं त्याच्या बाबांनी सांगितलं. संगमनेरजवळ आल्यावर मात्र त्याने सारथ्याची भूमिका सोडली आणि नकळत उत्सवमूर्तीच्या भूमिकेत तो शिरला.

गावात दीड-पावणेदोन तास चाललेली मिरवणूक, त्यानंतर सत्कार समारंभ. व्यासपीठावर तोबा गर्दी. बाह्या दुमडलेला साधा शर्ट, तशीच पॅंट, अशा साध्या वेशातच सत्कारमूर्ती व्यासपीठावर होती. आभाळ काहीसं भरून आलेलं होतं आणि सभागृह गच्च भरलेलं होतं. त्यामुळे उकडतही होतं; पण हे सगळं सहन करीत, व्यासपीठावर शांतपणे बसून न्याहाळत, कौतुकाचे शब्द ऐकत अजिंक्य बसला होता.

तुरेबाज फेटा त्याने बांधून घेतला; तशी कौतुकाने दिलेली शिंदेशाही पगडीही काही वेळ सांभाळली. समोरच्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट त्याला सुखावून जात होता.


निवृत्तीची घोषणा आणि भावूक अजिंक्य.

....................
अब ऑटोग्राफ नही, फोटोग्राफ का जमाना हैअसं विराट कोहली एका जाहिरातीत सांगत असला, तरी अजिंक्‍यच्या सहीसाठी गर्दी उडाली होती आणि त्याच्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी झुंबडही. व्यासपीठावर वक्‍त्यांची बोलंदाजीचालू असताना अजिंक्‍य सहीसाठी पुढे केलेल्या प्रत्येक कागदावर लफ्फेदार सही करीत गाववाल्या चाहत्यांना खूश करून टाकत होता. एका छोट्या खेळाडूने त्याच्या सहीसाठी बॅटच आणली होती. त्यालाही अजिंक्‍याने खूश केलं.

फलंदाजीसारखं खणखणीत भाषण त्यानं केलं नाही; पण आपल्याला नेमका काय संदेश द्यायचा आहे, तो त्याने दोन मिनिटांच्या भाषणातून नक्कीच दिला.

अजिंक्‍यच्या आगमनाने उसळलेली उत्साहाची लाट दिवसभर गावात तशीच सळसळत होती. सत्कारानंतर त्याच्या बरोबर छायाचित्र काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तेथून तो एका बंगल्यावर गेला, तेही फोटो सेशनसाठीच.

सत्काराचा कार्यक्रम संपवून विश्रांतीसाठी अजिंक्‍य वस्तीवर गेला, तेथेही उत्साही चाहत्यांची गर्दी होतीच. शाळकरी मुले वह्या, कागद घेऊन त्याच्या सहीचा अनमोल ठेवा मिळवण्यासाठी जमले होते. छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश लखलखत होते.

दमलेला अजिंक्‍य थोडा वेळ विश्रांतीसाठी गेला, तेव्हाही दर पाच-दहा मिनिटांनी तेथे कोणी ना कोणी येत होते; चौकशी करत होते. वास्तुशांतीच्या तयारीत गुंतलेली घरची मंडळी, मामा, आत्या, काका हे सारे या चाहत्यांना थोड्या वेळाने याअसे सांगत होते.

अजिंक्‍यचे वडील मधुकर रहाणे दहावीनंतर अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमासाठी मुंबईला गेले. आझाद मैदानासमोरच तंत्रनिकेतन होतं. आझाद मैदानावर चाललेले क्रिकेटचे रंगलेले डाव पाहता पाहता त्यांनाही ह्या खेळानं वेड लावलं. त्यांनी खेळण्याचे स्वप्न पाहिलं की नाही माहीत नाही; पण त्यांच्या मुलाने ते प्रत्यक्षात आणून दाखवलं.

अजिंक्य खेळत राहिला आणि आई-वडील त्याला प्रोत्साहन देत राहिले. अजिंक्‍य कसोटी क्रिकेटचा खेळाडू आहे, असा शिक्का पडल्यासारखा होता; पण तो या खेळाच्या तिन्ही प्रकारांत उत्तम खेळतो. त्याने हे सिद्ध केले आहे,’ असंही मधुकर रहाणे ह्यांनी बोलण्याच्या ओघात सांगून टाकलं.

... त्या वेळी अजिंक्य रहाणे नवखा होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी असलेल्या करारानुसार त्याला मुलाखत देणं शक्य नव्हतं. त्यानं तसं ते सांगितलंही. पण मी आणि माझा सहकारी त्याची विश्रांती होईपर्यंत वाट बघत थांबलो. अखेर क्रिकेट सोडून अन्य विषयांवर पाच मिनिटं तो बोलला आणि बातमी तयार झाली!
.........
(दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी थोडी संपादित करून.)
.........

#अजिंक्य_रहाणे #चंदनापुरी #संगमनेर #गावचा_सत्कार #मधुकर_रहाणे #निवृत्ती

चंदनापुरीत भेटलेला अजिंक्य रहाणे

  देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली! (छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.) .......................................... ...