डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास
'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला.
त्याचं एक खास आकर्षण म्हणजे डॉक्टरांचं नगरी भाषेतलं
साप्ताहिक सदर - 'राम राम पावनं'. ह्याच सदराच्या
लोकप्रियतेचा आपल्याला निवडणुकीत फायदा होणारच,
असं सांगत ते १९९६मध्ये नगरमधून
लोकसभेच्या निवडणूक मैदानात उतरले.
![]() |
हातात माईक म्हणजे समोरच्यांचं संमोहन निश्चित! - डॉ. कुमार सप्तर्षी ......................... |
डॉ. कुमार सप्तर्षी ह्यांचे नाव पहिल्यांदा ऐकले ते सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाच्या वेळी. त्या वेळी करमाळ्यात प्राथमिक शाळेत होतो. महात्मा गांधी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इथे गडबड झाल्याचं ऐकायला मिळालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व डॉ. सप्तर्षी करीत होते, असं समजलं नंतर. हा एवढा मोठा माणूस आपल्या जवळच्या राशीनचा, हे ऐकल्यावर तर आश्चर्यच वाटलं. सगळी मोठी माणसे शहरातलीच असतात, असा तेव्हाचा समज. ![]()
पुढे डॉक्टरांनी करमाळ्यातून विधानसभेची निवडणूक लढविली, तेव्हा मी विशी ओलांडली होती नुकतीच. मतदानाचा अधिकार अजून मिळायचा होता. त्या निवडणुकीत त्यांची भाषणे दोन वेळा ऐकायला मिळाली. श्रोत्यांना जिंकणारं त्यांच्या भाषेतलं वक्तृत्व होतं ते.
प्रचारासाठी नामवंत अभिनेते निळू फुले ह्यांनाही डॉक्टरांनी खास आणलं होतं. त्यांचा संवाद तर एकदम मनमोकळा. त्या सभेत डॉ. सप्तर्षी ह्यांनी करमाळ्याचे तेव्हाचे नगराध्यक्ष गिरधरदास देवी ह्यांच्यावर जोरदार टीका केल्याचे आठवते. ह्या टीकेला करमाळकर कसा प्रतिसाद देतात म्हणून पाहिलं, तर गंमत म्हणजे हे ऐकायला गिरधरदास ह्यांची पुतणी व आमची वर्गमैत्रीण संगीता देवी नागर तिथे होती!
तिलाही ते कदाचित आठवणार नाही आता. मतदानाच्या आदल्या दिवशी गल्लीत काही महिला हळदी-कुंकू देण्यासाठी आल्या होत्या. चौकशी केल्यावर त्या डॉक्टरांच्या कार्यकर्त्र्या असल्याचं समजलं. ![]()
त्याच दरम्यान कधी तरी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे डॉक्टरांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एन्रॉन प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात कोल्हेसाहेब सहभागी झाले. त्या काळात कोल्हेसाहेबांच्या तोंडून डॉक्टरांचंच कौतुक ऐकायला मिळे. म्हणजे संमोहन किती तगडे असेल बघा. ह्या आंदोलनात भाग घेतल्याची काही ना काही राजकीय किंमत त्यांना बहुदा चुकवावी लागली असणार.
![]() |
तरुणपणीचे डॉ.सप्तर्षी ................ |
खास निवडणुकीच्या बातम्यांसाठी केलेल्या पानावर पट्टी होती. त्यात सर्व प्रमुख राष्ट्रीय पक्षांची निवडणूक चिन्हं दिलेली. फक्त त्यांच्या समता पक्षाची 'मशाल' नव्हती. 'त्या पट्टीत आमची 'मशाल' घ्या, नाही तर तुमच्याविरुद्ध मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे,' असं ते दर दोन दिवसांनी बजावत. अतिशय गंभीरपणे ते बोलत आहेत, असं तेव्हा वाटे. पण तशी काही तक्रार त्यांनी शेवटपर्यंत केली नाही.
ह्या निवडणुकीच्या काळातच बिंदुमाधव ठाकरे ह्यांचे अपघातात निधन झाले. रात्रीचे ११ वाजले होते. संपादकीय विभागात मी एकटाच होतो.काम पूर्ण झालेले, निघायची तयारी आणि फोन वाजला. डॉक्टर बोलत होते. 'बिंदुमाधव ह्यांना मी वाहिलेली श्रद्धांजली उद्या मुंबईच्या अंकात पहिल्या पानावर आली पाहिजे. मी सांगतो ते लिहून घे,' असं त्यांनी सांगितलं. अंकाचं सगळं काम संपलं आहे, कम्प्युटर ऑपरेटरही गेले, असं सांगण्याचा प्रयत्न केला.
पण डॉक्टर काही ऐकायलाच तयार नव्हते. बाळासाहेबांचे आणि माझे, मीनाताईंचे आणि माझे किती जवळचे संबंध आहेत, हे सांगत म्हणाले - 'माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हव्यात.' त्यांची श्रद्धांजली लिहून घेतली, पुन्हा वाचून दाखविली आणि फोन ठेवला. ती बातमी मुंबईला जाण्याचा प्रश्नच नव्हता!
असेच एका रात्री ते आले. दिवसभराच्या दौऱ्यात कोठे कोठे सभा घेतल्या, ह्याची पत्रके दिली. 'राम राम पावनं'मुळं वातावरण कसं चांगलं आहे आणि निवडून कसा येणार, हे त्यांनी (कितव्यांदा तरी) सांगितलं. त्यांना म्हणालो, 'बसा थोडा वेळ.' त्यावर त्यांचं उत्तर होतं - 'घाईत आहे आता.'
त्या वेळी (आणि आधीही काही भाषणं ऐकली होती, तेव्हा) एक लक्षात आलं की, त्यांच्या बोलण्यात विलक्षण ताकद आहे. मुद्दे पटवून देण्याची हातोटी जबरदस्त आहे. ऐकताना समोरचा संमोहित होतो.
निवडणूक काळातील त्यांच्या त्या बोलण्यानंतर मलाही काही दिवस वाटत होतं की, डॉक्टर निवडून येणार नाहीत; पण शर्यतीत असतील. दुसरा नाही तरी तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर राहतील. पण मतदारांनी त्यांना लांबूनच 'राम राम' ठोकला. डॉक्टरांना अडतीसशे (०.७ टक्के) मतं मिळाली. निकालानंतर ते पुन्हा कधीच 'लोकसत्ता' कार्यालयात आले नाहीत.
त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि ह्यासह बरंच काही आठवलं.
#Dr_Kumar_Saptarshi #Kumar_Saptarshi_Death #ram_ram_pawane #Satyagrahi_Vichardhara, #Loksabha_1996 #Loksatta #Ahmednagar #Karmala
