नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यानंतर बरोबर 11 दिवसांनी अस्मादिकांनाही स्वप्न पडलं. खरं म्हणजे स्वप्न साकार झालं होतं. आपलेही `अच्छे दिन` आता सुरू झाले, असं वाटलं. गोड-गुलाबी स्वप्न. उन्हाळा अजून संपला नसताना, पावसाळा जवळ आला असताना आणि थंडी फाssर लांब असताना हवीहवीशी शिरशिरी उठवणारं स्वप्न. मनाला गुदगुल्या करणारं स्वप्न.
तो दिवस होता गुरुवारचा. दुपारी कधी तरी दूरध्वनी किणकिणला. (मोबाईल होता ना हो... लँडलाईन असता, तर खणखणला असता!) पलीकडून बोलणाऱ्या सद्गृहस्थांनी सांगितलं, 'तुमचं पार्सल पाठवलंय. एक-दोन दिवसांत मिळून जाईल.' म्हटलं पुण्याहून नगरला यायला एक-दोन दिवस कशाला लागतात? उद्याच मिळून जाईल ते. त्या रात्री झोप नीट अशी लागलीच नाही. स्वप्नपूर्ती झाल्याचंच स्वप्नात येत होतं.
मुलाला त्या दिवशी काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सांगितलं. कल्पना होतीच त्याला तशी. पण 'नेमकं कधी?' हे काही नव्हतं त्याला माहीत. 'आजच!', असं सांगितल्यावर गेला की हुरळून. सांगितल्याबरोबर गाडी काढली. निघालो नगरच्या जुन्या बसस्थानकावर. तिथल्या पार्सल अॉफिसात गेलो. क्रमांक सांगितला आणि पार्सल आलंय का विचारलं. त्यानं कधी टाकलं, कुठनं टाकलंय अशी जुजबी चौकशी केली, टेबलावरची नोंदवही चाळली आणि म्हणाला, ''नाही आलं अजून! या दोन दिवसांनी.''
आणि मग अचानक आली निराशेची लाट. अंगभर दाटून आलेल्या उत्साहावर पाणी पाडणारी. तेवढ्यात मुलाची भिरभिरणारी नजर त्या खोक्यावर गेली. त्यानं क्रमांकाची चिठ्ठी घेतली, एकदा पडताळून पाहिलं आणि म्हणाला, "हे काय आलंय की. हेच आहे ते.'' निराशेचं रूपांतर एकदम उत्तेजनेमध्ये. पार्सलवाला निवांत उठला. त्यानं तपासून पाहिलं. पुन्हा एकदा नाव विचारलं. पुन्हा नोंदवही पाहिली. त्यात होती नोंद. हमालीचे पाच-पंचवीस रुपये मागितले आणि दिलं ते खोकं आमच्या ताब्यात!
मोठं होतं ते पुठ्ठ्याचं खोकं. भरपूर जडही होतं. कसंबसं मांडीवर ठेवून आलो. वडील होतेच घरी. त्यांनी ते पाहू नये, काय आहे असं विचारू नये, याची काळजी घ्यायला मुलाला सांगितलं. खोकं आधी बाहेरच्या खोलीत ठेवलं. मग पडद्याच्या आडून ते आतल्या खोलीत नेण्याची कसरत यशस्वीपणे पार पाडली. या सगळ्या हालचाली वडिलांच्या नजरेपासून दूर ठेवण्यात आम्ही बाप-लेक यशस्वी झालो होतो. कात्री, सुरी घेऊन मुलगा तयारच होता. तो थोडा अधिकच उत्साहित, थोडा अधिकच उत्तेजित. माझ्यापेक्षाही. गाठीबिठी सोडवायचा माझा आग्रहही त्यानं खोक्यावरच्या दोऱ्यांबरोबरच कचाकच कापून टाकला.
खोकं उघडलं. वरती असलेले दोन-तीन रद्दी कागद भरकन काढून चोळामोळा करून टाकले. एक खोल श्वास घेतला. डोळे मोssठ्ठे करून पाहिले.
स्वतःवर बेहद्द खूश होत खोक्यातून पुस्तक उचललं. पहिलं पुस्तक. माझं पहिलं पुस्तक! एवढे दिवस वाट पाहायला लावून, अनेक अडथळे ओलांडून अखेर ते माझ्या हाती आलं होतं. सहा जून 2014. त्याच्यावर आवृत्तीची तारीख होती, 29 मे 2014. त्यानंतर नऊ दिवसांनी ते माझ्याकडे आलं होतं. बाळाचं आईला पहिलंच दर्शन!
पहिली प्रत घेतली आणि थेट देवापुढे गेलो. त्याच्यापुढं पुस्तक ठेवलं. क्षणभर डोळे मिटले, हात जोडले.
आणि मग वडिलांना उठवायला मुलाला सांगितलं. ते बाहेर येताच त्यांच्या हाती पुस्तक ठेवलं. हे काय, म्हणून ते पाहू लागले. मुलानं पुस्तकावरंच नाव दाखवलं - सतीश स. कुलकर्णी! त्यांना आश्चर्याचा धक्काच.
मुलानं एका प्रतीचा ताबा घेतला आणि मी दुसऱ्या. पण काय वाचणार त्यात? मीच लिहिलेलं. अनेकदा वाचलेलं. तिन्ही मुद्रितं मीच तर वाचली होती. त्यामुळं लेख उघडला की, पुढची ओळ काय असेल ती लगेच आठवायची. जणू पाठ झाल्यासारखंच. तरीही पानं उलटत उलटत पाहत राहिलो. सगळं व्यवस्थित झालंय का, काही चुकलंय का ते...
एव्हाना संध्याकाळ झाली होती. दोन-चार मित्रांना फोन करून बोलावून घेतलं. तातडीनं या, असं बजावलं. घरी आल्याबरोबर त्यांच्या हाती पुस्तक. लफ्फेदार सही करून. त्यांना आश्चर्याचा धक्का. मग त्यांच्याकडून कौतुक. खऱ्या मित्रांचे मनातून येणारे शब्द. किती सुखावतात ते, हे तेव्हा कळलं. 'प्रकाशन केलं नाही का? का नाही केलं? आपण करू...' असं सुरू त्यांचं...
गावाला गेलेली बायको दुसऱ्या दिवशी परतली. तिलाही असाच धक्का. जबरी. मग मित्रांना पुस्तक दिल्याचं सांगितल्यावर तिची तक्रार. आपण कार्यक्रम केला असता ना... थोड्या वेळानं आलेल्या मित्रासमोर पुन्हा तोच विषय. प्रकाशनाचा समारंभ. त्यांची समजूत काढता काढता पुरेवाट.
प्रकाशकाकडून तब्बल 100 प्रती मागवल्या होत्या. पहिलं पुस्तक. नातेवाईक-मित्र-स्नेही-लिहिण्यामुळे झालेले काही मित्र... या सगळ्यांना आनंदात सहभागी करून घ्यायचं म्हणून, त्यांनी आपलं कौतुक करावं म्हणून आणि थोडी कृतज्ञतेची, बरीचशी कृतकत्यतेची भावना म्हणून पुस्तक पाठवायचं ठरवलंच होतं. त्यासाठीच एवढ्या प्रती. त्याची यादी करायला बसलो. वडिलांनी एक-दोन नावं सांगितली. बायकोनं दहा एक प्रती लगेच नोंदवून टाकल्या. मुलानं हळूच विचारलं... त्याला मित्राला द्यायचं होतं. आनंदाच्या भरात होकार निघाला तोंडून लगेच! यादी सुरू झाली, पत्ते शोधून टिपून ठेवू लागलो.
शंभर जाड पाकिटं, डिंक, चिकटपट्टी, पेस्ट-अप स्लिप याची खरेदी झाली. ज्यांचे पत्ते नव्हते, सापडत नव्हते त्यांना एसएमएस पाठवून पत्ता विचारला. त्या काळात रजाच होती. रविवारचा अख्खा दिवस पुस्तकांवर पेस्ट-अप स्लिप लावून त्यावर मजकूर लिहिण्यात गेला. पेस्ट-अप स्लिप कशासाठी? तर बुवा नाही आवडलं एखाद्याला पुस्तक, तर त्यानं ती स्लिप काढून कुणाला तरी द्यावं. पुस्तकावर आपलं नाव लिहिलेलंय, मग ते दुसऱ्या कुणाला कसं द्यायचं, असा संकोच त्याला वाटू नये म्हणून. पुस्तक न वाचताच राहू नये म्हणून.
मग पाकिटावर पत्ते लिहिणं आलं. पुस्तकावरचं आणि पाकिटावरचं नाव एकच आहे ना, याची दोन-दोन वेळा खात्री करून घेऊन ते पाकिट व्यवस्थित बंद करणं. दोन दिवस चाललं हे काम. बुधवारी (11 जून) सकाळी पहिला गठ्ठा घेऊन टपाल कार्यालयात आणि तिथनं कुरिअरकडं. पहिल्या टप्प्यात चाळीस-एक पुस्तकं रवाना. एक ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. त्याच दिवशी मग इ-मेल पाठविली खूप जणांना. माझं पहिलं पुस्तक आलंय, असं सांगणारी.
दुसऱ्या दिवशी उठलो तेच कुणाचा फोन येतोय का, याचा अंदाज घेत. वाटत होतं, सकाळी सकाळी लोकांच्या हाती पुस्तक पडेल. आणि ते लगेच फोन करतील. जरा जास्तच उत्तेजित झालो होतो. इ-मेलला काही जणांची उत्तरं आली होती. आनंद व्यक्त करणारी, अभिनंदन करणारी, पुस्तक कुठं मिळेल याची चौकशी करणारी. मुखपृष्ठाबद्दल आणि द. भि. कुलकर्णी यांच्यासारख्या महत्त्वाच्या समीक्षकानं मनापासून `ब्लर्ब` लिहिल्याचं कौतुक करणारी.
पहिला फोन दुपारी बाराच्या सुमारास आला. तो होता मुंबईहून वि. वि. करमरकर यांचा. 'अरे! तू हे काय केलंयस...' असं कौतुकानं म्हणणारा. मग पुस्तक वाचून पुन्हा त्यांचा दोन-तीन दिवसांनी फोन आला. त्यातल्या काही लेखांबद्दल सांगणारा. आणि सल्ला देणारा - की बुवा हे ठीकच आहे. पण तू आता एखाद्या विषयाचा सविस्तर, सखोल अभ्यास करून त्यावर पुस्तक लिही.
मग दिवसभर फोन करीत राहिलो. पुस्तक मिळालं का विचारत राहिलो. एका अत्यंत जवळच्या स्नेह्याला संध्याकाळी फोन केला. त्यांना पाकीट मिळालं होतं. मग बायकोच्या आग्रहानं रात्री त्या स्नेह्यांच्या पत्नीला पुन्हा फोन. त्यांनी फोन पतिराजांकडं दिलां. माझं त्यांच्याशी बोलणं झालंय, हे न ऐकताच त्यांनी तो सोपवला त्यांच्या हाती. मग मुलाची समजूत काढावी त्या थाटातलं बोलणं. पुस्तक आल्याचं कौतुक नको होतं मला त्यांच्याकडून. मी काय लिहिलंय ते वाचून त्यावर मत हवं होतं त्यांचं. वाटलं होतं, `माझं पुस्तक` म्हणून ते हाती पडल्या पडल्या एक-दोन तरी लेख वाचून काढतील. त्यावर आपणहून काही तरी बोलतील. पण तसं काहीच घडलं नाही...अजून तरी!
तो सगळा आठवडा त्याच धुंदीचा होता. फोन करणे, इ-मेल तपासणे, आलेल्या उत्तरांना आभार मानणारं काही लिहिणे. जागेपणीचा एक क्षणही त्या पुस्तकावाचून गेला नाही. राहिलेल्या मंडळींना पुस्तक पाठवण्यासाठी पत्ते गोळा करीत राहिलो. यथावकाश पत्ते गोळा झाले. पोस्टातून, कुरिअरने पुस्तकं रवाना झाली.आणि मग वाट पाहणं सुरू झालं. कुणी कुणी वाचलं? त्यांना कसं वाटलं? की कसंसंच वाटलं? आवडलं की नाही? आवडलं असेल तर त्यातलं काय आवडलं? नसेल तर का नाही आवडलं?
मागे `लोकसत्ता`त असताना नगरच्या वर्धापनदिन पुरवणीत एक विषय केला होता. आपल्या पहिल्या पुस्तकावर लेखकांना लिहायला सांगितलं होतं. प्रा. रंगनाथ पठारे यांनी फार छान लिहिलं होतं. पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर लेखकाला (आणि कवीलाही) वाटत असतं की, जिकडेतिकडे आपलीच चर्चा आहे. आपल्याच पुस्तकाबद्दल लोक भरभरून बोलताहेत वगैरे वगैरे... अगदी तस्संच वाटत होतं. वृत्तपत्रांना परीक्षण लिहायला पुस्तकंच नाहीत. आपलं पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलं की, लगेच त्याच्यावर छापून येणार. सविस्तर, आपल्या दर्जाचं-शैलीचं कौतुक करणारं इत्यादी इत्यादी. ज्यांना ज्यांना पुस्तक मिळालंय, ते हातातलं सगळं काम टाकून देऊन आधी वाचणार. वाचून झाल्या झाल्या लगेच सविस्तर पत्र लिहायला बसणार. लिहून झालं की, तातडीने टपालात टाकणार. आणि माझ्यासारखंच फोन करून विचारणार, पत्र मिळालं की नाही? (प्रसिद्ध लेखक-समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी `ब्लर्ब`मध्ये लिहिलंय - हे काही एका दमात वाचून संपवायचं पुस्तक नाही. आता लक्षात येतंय, हा सल्ला वाचकांपेक्षा त्यांच्या झटपट प्रतिसादाची वाट पाहणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या लेखकालाच होता!)
हळुहळू काही काही प्रतिक्रिया येत गेल्या. प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम बोरकर यांनी पुस्तक मिळाल्यावर एका बैठकीत वाचलं. त्यांनी मग त्याचं परीक्षण करणारी प्रतिक्रियाच दिली. इ-मेलनी पाठवून दिली ती. आणि मग अनुभवी लेखक या नात्यानं काही युक्तीच्या गोष्टीही सांगितल्या. दौंडच्या डॉ. अमित बिडवे यांची कधी भेट नाही झाली. पण त्यांनी त्यांचं पहिलं पुस्तक ओळख नसतानाही पाठवलं होतं. ते वाचून लिहिलेलं पत्र त्यांना आवडलं होतं. मग त्यांनीही पुस्तक मिळाल्यावर लगेच पत्र लिहिलं. 'आपल्या माणसाची पुस्तकं भेट म्हणून घ्यायला संकोच वाटतो. पण त्याच्या सहीनिशी ती हवीशीही वाटतात. म्हणून मग मी भेट द्यायला म्हणून त्यांची पुस्तकं विकत घेतो,' असं लिहून त्यांनी तीन पुस्तकं पाठवून देण्यासाठी कळवलं. त्याचे पैसे कुठं, कसे पाठवू असंही त्याच पत्रात विचारलं होतं.
विजय सेठी म्हणजे पत्रकारितेमुळं ओळख झालेला माणूस. नंतर आयुष्यभराचा मित्र. पुस्तक आल्याचं सांगितल्यावर त्यानं हक्कानं दोन प्रती मागितल्या. त्यातली एक मित्राला वाचायला दिली. आणि मग एके दिवशी त्यानं अचानक 50 प्रतींची मागणी केली. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या सगळ्या माणसांना त्यानं हे पुस्तक भेट दिलं!
आनंद आणि धनंजय देशपांडे या मामेभावंडांना पुस्तक आवडलं. त्यांनी परस्परांशी बोलून भेट देण्यासाठी म्हणून 15 प्रती घेतल्या. हाही एक सुखद अनुभव.
मुंबईचा आत्येभाऊ नाना, पुण्याच्या संजीवनीवहिनी, नगरचा भाचा श्रीकांत जोशी यांनी आवर्जून पत्र लिहिलं. हे सगळे माझे जवळचे नातेवाईक. त्यामुळे त्यांच्या पत्रात अर्थातच कौतुक होतं. 'आपल्यातला एक' 'लेखक' झाला, याचा त्यांना मनस्वी आनंद झालेला त्यातून सहज दिसला. स्तुती कुणाला प्रिय नसते? मला तरी आहेच. त्यामुळंच त्यांच्या पत्रांनी सुखावून जायला झालं. श्रीकांतनं हे पुस्तक त्याच्या एका मित्राला भेट दिलं. बँकेतून निवृत्त झालेल्या या सद्गृहस्थांनी त्यांच्या कोरीव अक्षरात अभिप्राय लिहून तो थेट माझ्या हातात दिला. फार छान वाटलं त्या दिवशी.
पण त्याहून दोन विलक्षण अनुभव. पूर्वी नगरमध्ये असलेल्या आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या रवींद्र देशपांडे यांना इ-मेल पाठवली. त्यांना पत्ता विचारला. पण आपल्या माणसाचं पुस्तक फुकट घ्यायचं नाही, असं सांगत त्यांनी पुण्यातली दोन-तीन दुकानं हिंडून पुस्तक विकत घेतलं आणि वाचून प्रतिक्रियाही कळवली.
अशीच गंमत केली डॉ. उज्ज्वला दळवी यांनी. त्यांच्याशी ओळख झाली इ-मेलच्या माध्यमातून. त्यांचं 'सोन्याच्या धुराचे ठसके' पुस्तक प्रदर्शनात पाहिलं. आणि एकदा इ-मेलमध्ये तसं सहज लिहिलं. त्याच्या उत्तरादाखल लिहिताना त्यांनी कळवलं, 'आम्ही तुमचं पुस्तक इथं मिळवून वाचलंसुद्धा!' `इथं` म्हणजे सौदी अरेबियात!! त्या क्षणी मला माझ्या करंटेपणाची फार लाज वाटली. त्यांचं पुस्तक समोर असूनही मी 'नंतर घेऊ' म्हणत उद्यावर ढकललं. आणि त्यांनी लांब तिथे कुठे तरी पुस्तक मिळवून वाचलंही. त्यानंतर पुढच्याच वेळी प्रदर्शनात जाऊन ते झकास पुस्तक आणलं. एका बैठकीत संपवलं. आणि मध्यरात्री अडीच-तीन वाजता त्यांना सविस्तर लिहिलं, तेव्हा कुठं थोडं बरं वाटलं.
मग कधी तरी तीन महिन्यांनी ह. मो. मराठे यांनी करून दिलेला परिचय 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर पुन्हा एक कौतुकाचं छोटंसं वादळ. काही इ-मेल, काही फोन, काही प्रत्यक्ष भेटीतलं बोलणं. पण ते तेवढंच. त्यानंतर त्या पुस्तकावर कुठं काही आलं नाही. एक मात्र झालं. आभार मानण्यासाठी मराठे यांना फोन केला. ते मोकळेपणानं बोलले. पुस्तक खरंच आवडलं, असं त्यांनी सांगितलं. दुखरेपणावर तेवढीच एक मलमपट्टी.
दहा-एक मंडळींनी पत्रं लिहिली. वीस-एक जणांनी इ-मेलवरून सविस्तर किंवा थोडक्यात कळवलं. तेवढ्याच मंडळींनी फोनवरून अभिप्राय दिला. बाकी ज्यांना पुस्तक पाठवलं, त्यातल्या 50 ते 60 टक्के मंडळींनी काहीच कळवलं नाही. वाचल्याचं नाही किंवा वाचून राहिल्याचंही नाही. आवडल्याचं नाही किंवा नावडल्याचंही नाही. अगदी जवळच्या मंडळींनीही पुस्तक वाचायची तसदी अजून घेतलेली नाही, हे लक्षात येतं तेव्हा आत कुठं तरी कळ येते.
असाच एक मित्र. पहिल्याच दिवशी त्याला पुस्तक दिलं. अजून वाचलेलंच नाही त्यानं. एके दिवशी त्याला म्हणालो, 'तू वाचत नाहीस, तोवर जेवणाचा खर्च तुझा.' त्यानं तीन जेवणं दिली. मुकाटपणे बिल भरलं. पुस्तक वाचण्याचं धाडस त्याला होत नसावं बहुतेक.
फेसबुकवरून ओळख झालेल्या दोन मित्रांनाही असंच पुस्तक पाठवलं. त्यातल्या एकानं काहीच कळवलं नाही. आणि एका मैत्रिणीनं अर्धवट प्रतिक्रिया दिली. 'सविस्तर लिहायचंय, नंतर लिहिते' असं म्हणत. अशाच एका इ-मेल-ओळखीच्या बाईंनी मेल वाचून विचारलं, 'मला पुस्तक कुठं मिळेल? की आपण एक्सचेंज करायचं? म्हणजे माझं पुस्तक मी पाठवते, तुझं तू पाठव.' नको वाटली ही बार्टर पद्धत. पत्ता विचारून त्यांना पुस्तक पाठवलं. त्यांची साधी पोहोचही नाही आली. एकदा विचारल्यावर दोन ओळीत लिहिलं. नंतर दोन वेळा विचारल्यावर उत्तरही नाही दिलं.
वर्षभरात असे बरेच अनुभव. सुखावणारे, दुखावणारे, विचार करायला लावणारे. 'पुस्तक प्रकाशित झालं' असं सांगितल्यावर एकानं 'किती पैसे दिले प्रकाशकाला?' असं थेट विचारल्यावर माझा अहं दुखावलाच. 'हौस म्हणून खिशातले पैसे खर्चून पुस्तक काढायचं असतं, तर आतापर्यंत 10 पुस्तक आणली असती,' असं सुनावलं त्याला. भेटीच्या यादीतून त्याचं नाव कटाप करून टाकलं. त्यानं दोन-तीन वेळा विचारल्यावर मग विकतच दिलं पुस्तक! पुस्तक समारंभपूर्वक प्रकाशित का केलं नाही, असा 'जाब' विचारणाऱ्या बऱ्याच जणांनी नंतर त्याच्याबद्दल काहीच कळवलं नाही.
पहिला महिनाभर रोज आपण 'लेखक' झालो, याची आठवण यायची. किती तरी वेळा पुस्तक हातात घेऊन पाहिलं.
असंच चाळता चाळता एकदा लक्षात आलं की, एक-दोन चित्रांमध्ये थोडी गडबड झालीय. तीन-तीन वेळा वाचूनही 'आशा भोसले'ऐवजी 'अशा भोसले' अशी चूक राहिलीच आहे. आणखी एकानं शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका आहेत, असं सांगितलं. पण त्यावर माझा विश्वास नाही.
दिवस पुढे पुढे जातच असतात. हळुहळू पुस्तकाची आठवण रोजच्या ऐवजी तीन-चार दिवसांनी येऊ लागली. मग तो कालावधी आठवड्यावर गेला. मग महिन्यावर. आता तर माझ्याकडचीच एक प्रत कपाटात आहे. ती प्रत, काही पत्रं, काही इ-मेल... मी `लेखक` असल्याचे माझ्याकडचे काही पुरावे! गेल्याच महिन्यात बायकोला सहज विचारलं, ''बाई गं तू तरी माझं पुस्तक पूर्ण वाचून काढलंस का नाही?'' तर तिचं उत्तर होतं, ''चार-पाच लेख राहिलेत अजून.'' आता बोला!
परवा असाच विचार करताना लक्षात आलं, आपण तरी किती लोकांना त्यांनी पुस्तक भेट दिल्यावर आवर्जून लेखी कळवलंय? अगदी 100 टक्के नाही; पण बऱ्याच जणांना कळवलंय. पत्रकार या नात्यानं जी मंडळी पुस्तक भेट देतात, ती वाचण्याची आणि त्यावर अभिप्राय देण्याची सक्ती मी स्वतःवर कधीच केली नाही.
'लेखक' बनल्याच्या या वर्षानं काय दिलं? 'अच्छे दिन'चं स्वप्न दाखवलं हे तर खरंच. अपेक्षिले तेवढे ते आलेही नाहीत. पण उद्या कदाचित ते येतीलही. झोपेतून जागा झालो असलो, तरी स्वप्नाचे सारेच रंग अजून फिकुटलेले नाहीत. कुणी सांगावं, उद्या ते इंद्रधनुषीही होतील.
जवळच्या वाटणाऱ्यांनी वाचलं नाही, कठोर परीक्षण केलं नाही, चुका सांगितल्या नाहीत, याची खंत आहेच. पण अनपेक्षितपणे झालेल्या कौतुकाचा भरभरून आनंद आहे. बरोबर आज वर्ष झालं त्या गोष्टीला. पहिल्या (लांबलेल्या) गोष्टीत तूर्त एवढंच!!