मला कविता कळत नाही! ती समजून घेण्याचा पद्धतशीर प्रयत्नही कधी केला नाही. तरीही अधूनमधून कविता पाहत असतो, पुढे जावं वाटलं तर वाचतही असतो. त्यातल्या काही कधी आवडून जातात. `समकालीन भारतीय साहित्य` द्वैमासिकाचा मार्च-एप्रिलचा अंक आता दोन दिवसांपूर्वी मिळाला. हे द्वैमासिक एखाद्या पुस्तकासारखंच असतं. दहा-बारा कथा, तेवढ्याच कवींच्या कविता, एखादं नाटक, समीक्षा आणि एखाद्या लेखक-कवीवर विशेष विभाग. या अंकामधील विशेष विभागाचे नायक आहेत, गजानन माधव मुक्तिबोध. हे नाव ऐकलेलं; पण तरीही फारसं माहीत नाही.
या अंकाचं संपादकीय स्वाभाविकपणे मुक्तिबोधांवरच आहे. त्यात पहिल्याच दहा-पंधरा ओळींमध्ये त्यांच्या कवितेतील दोन ओळी दिल्या आहेत.
तुम छिपा चलो जो कुछ तुम हो
यह काल तुम्हारा नहीं।
यह काल तुम्हारा नहीं।
फक्त दोन ओळी. त्यांनी पिच्छा पुरविला. काय आहे त्यात? आजचं निखळ वास्तव? की निव्वळ उपहास? आजूबाजूला दिसणाऱ्या उदासवाण्या परिस्थितीवरचं भाष्य? की आहे त्यात थोडा दिलासा? हा काळ, हे सध्याचं जग तुझ्यासाठी नाही, हे कवी सामान्य माणसाला सांगतो आहे की, तो तीव्रपणे टिप्पणी करतो आहे? काय लपवायला सांगतोय कवी? अंगभूत चांगुलपणा? उपजत स्वार्थ? मुखवटा घालून वावरू नकोस असं? की तुझा खरा चेहरा इथं दाखवायला उपयोगी नाही, असं?
पूर्ण कविता वाचल्यावर या दोन ओळींचा अर्थ लागेल कदाचित. पण तशी ती वाचूनही अर्थ लागेलच याची खात्री नाही. कारण कविता शब्दाशब्दांनी पचवावी लागते. दिसणारा अर्थ आणि असणारा अर्थ यात महद्अंतरही असतं कैकदा. ते काहीही असो. या दोन ओळींनी अस्वस्थ करून टाकलं...कदाचित माझ्यासाठीच असाव्यात त्या, असा दिलासाही देऊन गेल्या एका सामान्य माणसाला!
-----
अस्वस्थ आम आदमी
-----
अस्वस्थ आम आदमी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा