सोमवार, २९ जून, २०१५

या आठवड्यात बहुतेक सगळ्या मराठी वृत्तपत्रांना, तिथं काम करणाऱ्या बोरूबहाद्दरांना `छान किती दिसते फुलपाखरू...` या कवितेची आठवण झाली. याचं कारण अर्थात `ब्लू मॉरमॉन` प्रजातीला राज्य सरकारने दिलेला राज्य फुलपाखराचा दर्जा. त्याची बातमी देताना शीर्षक म्हणून सरसकट ही कवितेची ओळ वापरलेली दिसली. फुलपाखराच्या छान दिसण्याचं हे कौतुक गेले तीन-चार दिवस चालल्यानंतर रविवारी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखाचं शीर्षक पुन्हा तेच आहे.

ही कविता कोणाची, हे त्यातल्या किती जणांना सांगता येईल? माहीत नाही. ग. ह. पाटील या नावाचे कवी होते, हेही खूप जणांना माहीत नसणार. शीर्षकासाठी वापरलेली ती ओळ सोडून त्या कवितेतल्या अन्य ओळी कुणाला सांगता येतील का, हे सांगणंही कठीणच. `तेच ते आणि तेच ते` यानुसार सर्वांनी या छान कवितेतल्या ओळीला कंठाळी शीर्षकाचं स्वरूप देऊन टाकलं. यानिमित्तानं आपणंही एखादं काव्यमय शीर्षक द्यावं, असं कुणाला वाटलं नाही. कुणाला एका ओळीची कविता शीर्षकाच्या रूपात प्रसवता आली नाही. याला कल्पनादारिद्र्य एवढंच म्हणता येईल!

मराठी पत्रकारितेला अलीकडं भाषादारिद्र्य, अभ्यासदारिद्र्य, कल्पनादारिद्र्य, माहितीदारिद्र्य, संदर्भदारिद्र्य, ज्ञानदारिद्र्य आदींचा शाप लागला आहे. अठराविश्वे दारिद्र्य यालाच म्हणत असावेत बहुतेक!
----
`दरिद्री` आम आदमी

1 टिप्पणी:

  1. आजच्या आपल्या या लक्ष वेधून घेणा-या लेखामुळे मला एक आठवण आली. आमच्या किंवा त्याही पूर्वीच्या पिढीच्या पाठ्यपुस्तकातील कविता आजही आठवतात. त्या कविता मोठ्या परिश्रमाने आणि चिकाटीने गोळा करून त्यांचा संग्रह एक नव्हे तीन खंडातून प्रसिद्ध झाला होता. " आठवणीतल्या कविता " या नावाने १९९३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अनमोल संग्रहाचे संपादक होते सर्वश्री पद्माकर महाजन, दिनकर बरवे, रमेश तेंडुलकर आणि राम पटवर्धन. प्रकाशक होते प्रा. एकनाथ साखळकर, अध्यक्ष 'आठवण'. या तिन्ही पुस्तकांची एकत्रित किंमत होती रुपये एकशे ऐंशी. मित्रानो, ही पुस्तके आजही मी अधून मधून काढून काही कवितांची उजळणी करतो.
    मंगेश नाबर

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...