गुरुवार, १८ जून, २०१५

कधी रे (धो धो) येशील तू...



(प्रसन्न ढगोबाचं चित्र ह्यांच्या सौजन्याने -
linsdevasconcellos.org.br)
----------------
वाट तरी किती बघायची? बास की आता. नजरा तुझ्याकडेच लागल्यात सगळ्यांच्या. ये आता. लवकर ये. तूच आहेस आमच्या या वर्षाच्या भविष्याचा शिल्पकार. अगदीच नाही असं नाही; आलास तू. काही ठिकाणी वर्दी लावून गेलास. काही ठिकाणी थोडा अधिक वेळ थांबलास. पण स्वागताची द्वाही मिरवावी, असं आणि एवढं जोरकस आगमन नाही झालेलं तुझं अजून. म्हणूनच तुला हे आवाहन. (सभ्य, सौम्य भाषेत लिहिलेल्या या मजकुराला 'आव्हान' समजून आलास तरी चालेल. वाजत-गाजत-उधळत आलास तरी चालेल. हसवलंस तर चालेल आणि रडवलंस तरी चालेल रे. पण तू ये!)

हल्ली आम्ही 'सुशिक्षित' झालो आहोत. त्यामुळे मान्सून, एल-निनो, जागतिक तापमान वाढ, पर्यावरण वगैरे शब्द वाचून-ऐकून पाठ झाले आहेत. कमी दाबाचा पट्टा, कुठल्या तरी महासागरात झालेल्या वादळाचे तुझ्यावर होणारे परिणाम अशी काही माहिती आम्ही येता-जाता वाचतो आणि मग त्यावर पांडित्यपूर्ण पद्धतीने बौद्धिक ठोकत राहतो. "जीवन आम्हालाच कळले हो..!' शिकून शहाणे झाल्याचा गैरसमज एवढा की, सात जूनला तू आलाच पाहिजेस, असा आमचा आग्रह! आता दर वर्षी असं ठरल्या दिवशी न चुकता यायला तू काय ७.५७, ८.१३ची 'फास्ट' किंवा 'स्लो' लोकल आहेस होय? इकडे आम्ही वक्तशीरपणा दाखवणार नाही, वेळेवर काही करणार नाही. ठरलेल्या आणि दिलेल्या वेळी कधी, कुठे पोचणार नाही. (आता बघ ना, हा लेखही सात जूनलाच लिहायचा ठरवलं होतं. पण आज-उद्या करत करत झाला उशीर.) कुणी काही म्हटलंच तर दात काढत "इंडियन स्टॅंडर्ड टाईम' असं समर्थन करणार! तू मात्र वेळेवर आलंच पाहिजेस, असा आग्रह. दोन-चार दिवस इकडे-तिकडे झाले की, आम्ही काळजीत पडल्याचं दाखवणार. 'हल्ली तुझं काही खरं नसतं,; असं कण्हणार. जुने दाखले देत राहणार.

तू 'फेसबुक'वर आहेस का रे? म्हणजे गेल्या पाच वर्षांत सुशिक्षित-अशिक्षित-नुसतेच शिक्षित-मध्यमवर्गीय-गरीब-श्रीमंत-नवकोट नारायण आदी सर्व स्तरांत आणि थरांमध्ये लोकप्रिय झालेल्या या 'सोशल मीडिया'च्या साईटवर तुझं अकाउंट आहे की नाही? तिथं तू नित्यनेमानं 'स्टेट्‌स अपडेट' करतोस की नाही? नसावास बहुतेक. त्यामुळं तुला इतरांच्या भिंतीवरही जाता येत नसावं. त्या कधीच्या ओल्याकच्च झाल्या आहेत. तुझ्या स्वागताच्या कविता, चारोळ्या, किरकोळ्या, आठवणी, कढ... असं किती तरी झरतंय त्या भिंतींवरनं. हा मोसम कवितांचा आहे, वठलेल्यांनाही मोसमात पालवी फुटते, त्यांना 'शब्दकळा' सुरू होतात. नेहमीचीच ही परिस्थिती जाणून काही जणांनी आधीच वैधानिक इशारे टांगून ठेवलेत भिंतीवर. पण असल्या इशाऱ्यांना जुमानतो कोण? तुझी चाहूल लागताच कवितांचा महापूर वाहू लागलाय.

तर अशा या मोसमी कवींना तू यायलाच हवा आहेस. त्यांच्या प्रतिमेला अंकुर फुटायचे असतील, तर तू पाझरलंच पाहिजे. आणखी काही रसिकराज असतात. त्यांना कविता नाहीत स्फुरत. जुन्या जमान्याच्या आठवणी काढून राहतात ते झुरत. मग त्यांना आठवत राहतात सिनेमातली गाणी. विरहाची गीतं, चिंब भिजवणारी, व्याकूळ करणारी, हुरहूर लावणारी. मग त्या गाण्याच्या मुखड्यांनी सजते त्यांची भिंत. उमटतात त्यावर लाईकचे उद्‌गार आणि कमेंटांचे चित्कार. अधिक रसिक असतात, ते काही 'ओलेचिंब' फोटो टाकतात. त्यावरही बरसतात उसासे...अधिक चिंब करणारे, कुडकुडायला लावणारे.

दिवस थोडे पुढे सरकतात, तशी काहींना आठवण होते सहलींची. तुझ्या सहली. तुझ्यासाठी आणि तुझ्यासह. ठरावीक लोकप्रिय ठिकाणी शनिवार-रविवार गर्दी होते. तुझ्या आनंदाचं स्वागत म्हणायचं, पण ते तुला विसरूनच करायचं. आनंद साजरा करण्यासाठी लागतो दणकेबाज आवाज. विचित्र बोल आणि तेवढाच विचित्र ठेका असलेली फिल्मी गाणी. हातात ग्लास आणि 'थिरकणे' या नावाखाली अंगविक्षेप. संध्याकाळ झाली की, तिथे उरतात रिकाम्या-फुटलेल्या बाटल्यांच्या काचा, पोटात ढकललेल्या पदार्थांच्या प्लास्टिकच्या पिशव्या. कचराकुंडी झालेली असते त्या जागेची. सहल म्हणायची नि सहन करायचं सारं.

आलं घातलेला मसालेदार चहा, वाफाळलेली किंचित कडवट फिल्टर कॉफी, खेकडा भजी किंवा खमंग बटाटवडा, भाजणीची थालिपीठं, भाजलेलं मक्‍याचं कणीस, कोळशावर भाजलेले कबाब... अशा अनंत आठवणींचं रवंथ करीत मंडळी आणत बसतात तोंडाला पाणी. त्याचंही निमित्त तूच असतोस, हे काय वेगळं सांगायला हवं! बाल्कनीत बसून तुला न्याहाळण्याचं, चहाचा कप ओठांना लावण्याचं आणि संगीत कानामध्ये साठवून घेण्याचं सुखही अनुभवतात काही. 'तेचि पुरुष भाग्याचे...' असं बहुतेक त्याच पुरुषांना (आणि क्वचित स्त्रियांनाही) उद्देशून लिहिलं गेलं असावं.

ह्या काळात तुझ्याचसाठी असतात वृत्तपत्रांचे मथळे. छायाचित्रेही हवी असतात तुझी आणि तुझीच. तू आलास तीही बातमी आणि रुसलास तीही बातमीच. 'चातक', 'पावशा', 'बळिराजा', 'झिम्माड', 'मुसळधार', 'संततधार', 'बुरबूर', 'सरीवर सरी' असे काही शब्द याच दिवसांसाठी राखीव असतात. (महानोर वाचला असेल, तर या दिवसांत हमखास उपयोगी पडतो म्हणतात.) शेती, बियाणे, पेरणे, धरणे अशा शब्दांची खूप दिवसांनी गाठभेट होते उपसंपादकांची आणि बातमीदारांची. हेच दिवस असतात भावनांनी भिजलेल्या शीर्षकांचे आणि साहित्यरसात मुरलेल्या फोटो-ओळींचे. कविमनाचा एखादा उपसंपादक होड्या सोडणाऱ्या पोरींच्या छायाचित्राला 'आला, आला तो आला...नाव सोडते बाला' अशी ओळ देऊन फोटोग्राफरला धन्य करतो आणि स्वतः धन्यधन्य होतो. अवचित कधी तरी इंद्रधनुष्य दिसते आणि कुणाच्या तरी मनात रुतलेल्या शान्ता ज. शेळके यांच्या 'नभी घुमते इंद्रधनू, मदनाचे चाप जणू...' ओळी फोटोखाली दिसतात. आणि मग 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहें थे; अशाही ओळींतून कुणी कधीच साकार न झालेलं चिंब स्वप्न पाहत असतो.

खरं तर हे दिवस पेरणीचे. पण 'दिवस सुगीचे सुरू जाहले...' असं डॉक्‍टरमंडळींना वाटत राहतं. खरंही असतं ते. तू 'व्हायरल' झालास की, सर्दी-पडसं-ताप-अपचन आदी रोगही 'व्हायरल' होतात. दवाखाने भरभरून वाहतात. डॉक्टरांची सुगीच की. 'धन्य ती लेखनी कळा' अवगत असणारे डॉक्टर तयारच असतात. वृत्तपत्रांच्या कार्यालयातून फोन आला की, त्यांचा '...तब्येत सांभाळा' अशा शीर्षकाचा लेख तयार होतो.

रस्तेही वाट पाहत असतात तुझी. एरवीही त्यांची तब्येत नाजूकच असते तशी. पण तुझ्या येण्यानं निमित्त मिळतं. डांबराचं तुझं नातं विळ्या-भोपळ्याचं. तू आलास म्हणजे, त्याला रुसाय-फुगायची संधीच. मग 'इक दिल के टुकडे हजार हुए'च्या धर्तीवर त्यानं झाकून ठेवलेली खडी इकडं-तिकडं विखुरते. खड्डे पडतात रस्त्यांवर. मग 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते' असा कृष्णविनोद करून नागरिक त्यांना चुकवत हाकत राहतात वाहने. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना होणाऱ्या पाठदुखीच्या बातम्याही प्रसिद्ध होतात मग पेप्रांमधून.

तशी तर खूप मंडळी वाट बघत आहेत तुझी. महागडे ब्रँडेड रेनकोट विकणारे दुकानदार, खत-बियाण्याच्या पिशव्या दाबून ठेवलेले आणि त्या चढ्या भावानं विकण्याचं स्वप्न बघणारे व्यापारी, रंगबिरंगी छत्र्या तशाच रंगबिरंगी नोटांच्या मोबदल्यात विकणारे, जुन्या छत्र्यांची डागडुजी करून पोट भरणारे, प्लास्टिकच्या चपला रस्त्यावर विकणारे, कौलांची दुरुस्ती करणारे, यंदाही घराचं जुनाट छत किंवा भिंत तग धरून राहील अशी आशा बाळगणारे, पाण्यासाठी आता पायपीट थांबेल अशी आशा बाळगणारे... खूप जण आहेत रे.

आणि तो बळिराजा म्हणविला जाणारा शेतकरीही आहेच. कसं चालेल त्याला विसरून? त्याच्या तर साऱ्या आशा तुझ्यावरच. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या त्याचा 'स्टॉक फोटो' बघतोस ना तू दर वर्षी? तू कधी येतोस, कसा येतोस, किती येतोस, किती काळ थांबतोस, कधी थोडी विश्रांती घेतोस...या सगळ्याचंच त्याला महत्त्व असतं. गोठ्यातली दोन-चार जनावरं कडबा चघळून दाभाड दुखवून घेतलेली असतात. मालकाच्या जोडीनं तीही हिरव्या दुनियेची स्वप्नं बघत असतात. जगाचा पोशिंदा असलेला तो तुझ्यापुढे लाचार असतो.

चर्चा तर होणारच. तू आल्यावरही, आणि तुझं आगमन लांबल्यावरही. '...हे सृष्टीचे कौतुक तू जाण बाळा' असं अनेकांनी लहानपणी कुठल्या तरी धड्यात वाचलेलं असतं. अनेकांना हे कौतुक माहीत होतं, ते अनेक लेखकांनी वेगवेगळ्या वेळी लेखामध्ये ही ओळ वापरल्यामुळं. 'झाडं तोडल्यामुळे तू येत नाहीस, तुझं प्रमाण कमी झालंय' वगैरे शास्त्रीय अंधश्रद्धा वापरतात मंडळी. पण ज्या अंधश्रद्धा जोपासल्यामुळं समाजाचं भलं होतं, त्या अवश्य पाळाव्यात असं आमचा नेमस्त पंथ सांगतो.

खरोखर सांगतो. आमच्यासाठी तू जगावेगळाच आहेस. अख्ख्या जगात केव्हाही, कुठेही तू जात राहतोस. अपवाद फक्त भारतीय उपखंडाचा. इथं मात्र तुझं वेळापत्रक ठरलेलंय. म्हणून तर तुझं कौतुक आणि डोळ्यांत आस.

सांगायचं तात्पर्य एवढंच - वाट पाहतोय तुझी. कधी रे धो धो येशील तू, पावसा...

----
(टीप : दैनिक लोकसत्ताच्या नगर आवृत्तीमध्ये 'नगरी-नगरी' सदरामध्ये याच शीर्षकानं असाच लेख १७-१८ वर्षांपूर्वी लिहिला होता. त्याचं कात्रण काही शोधूनही सापडलं नाही. पण मनामध्ये असणारच तो कुठं तरी. सबब या आणि त्या लेखामध्ये काही साम्यं आढळल्यास तो योगायोग नक्कीच नाही! कारण लेखक एक, भावना एक आणि पाऊसही तो एकच एक!!)
----
#पाऊस #सात_जून #कवी_कविता #उपसंपादक_बातमीदार #शेतकरी #मान्सून 

७ टिप्पण्या:

  1. " नेमेचि येतो तो पावसाळा " हे आम्हा मुंबईकरांना माहित असले तरी तो येण्यापूर्वी एक महिना सबंध वृत्तपत्रांतून उलट सुलट अंदाज आणि आम्हाला पाणी पुरवणा-या तलावांच्या पातळ्या प्रसिद्ध होत असतात. त्याच्या पार्श्वभूमीवर साध्य पावसाचे संगीत चालू झाले आहे. त्यात तेवढाच रोचक असा तुमचा लेख खिडकीतून डोकावला. आवडला. लिहित बसलो तर किती लिहू असे होईल.

    उत्तर द्याहटवा
  2. मस्तच...
    प्रत्येक घटकाच्या बाबतीत पावसाचं महत्त्व लिहिणं, त्याहीपेक्षा जाणणं, हेच संवेदनशीलता आणि सजगता दर्शवितं. बारीकसारीक निरीक्षणं नोंदवण्यासाठी आपल्या अवतीभवती असलेल्या चराचराविषयी आपुलकी असावी लागते.
    त्यामुळेही हे लेखन उच्च ठरते. किरकोळ्या हा शब्द खासच आवडला.
    लिहिते रहो...

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर!!!
    मस्त भट्टी जमून आलीये.
    लेख आवडला.
    पावसाशी गप्पा करत किती विषयांना स्पर्श केला आहे.
    एवढ्या छान लेखाबद्दल आभार.
    - दीपा देशमुख

    उत्तर द्याहटवा
  4. सतीश, मस्त, मस्त! तुझ्या लेखामुळे मुंबईत मस्त जोरदार पाऊस सुरू झालाय.
    - पी. बी. देशमुख

    उत्तर द्याहटवा
  5. पावसावर एकदम नव्या धर्तीचे लिखाण आहे. मजा आली.
    - प्रियंवदा कोल्हटकर

    उत्तर द्याहटवा
  6. पावसाला `धो धो` येण्याचे आमंत्रण लेख वाचला. लिखाणाची पद्धत सहज, सोपी, भावपूर्ण आहे. धकाधकीच्या जीवनात तेवढेच चार तुषावर अंगावर पडल्यामुळे मिळाली आनंदाची अनुभूती.
    - विनायक कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...