बुधवार, १७ जून, २०१५

हा तो नव्हेच?

लल्लू. त्याच्या पायावर भोवरा होता बहुतेक. भटकत असायचा नेहमी. ट्रेकिंग, हायकिंग, असं सारं करीत राहायचा. कधी गाडीनं, कधी रेल्वेनं, तर कधी कधी पायी पायीच बराच लांबचा पल्ला मारायचा. एकटाच होता तो. आठ महिने नोकरी करायचा नि चार महिने भटकंती. कॅमेऱ्याचा क्लिकक्लिकाट करायचा नि परतला की फेबुची भिंत त्या फोटोंनी भरून टाकायचा.

असाच भटकत होता एकदा लल्लू. कोल्हापुरातनं गोव्याकडं चाल्ला होता. मध्येच बस सोडली नि निघाला की पायी पायी. दोडामार्गमधनं जाता जाता अचानक थबकला. झुडपामागं दडला. त्याला दिसला होता हत्ती. पेपरातनं वाचलं होतं त्यानं, कर्नाटकातनं इकडे कसे हत्ती येतात नि कोकणवासीय कसे या कर्नाटकी गजराजांना घाबरलेले असतात. लल्लू बघत राहिला. हत्तीनं एक पाय वर उचलून धरलेला. बराच वेळ तसाच होता तो. शंका येऊन लल्लू दबकत दबकत हत्तीच्या दिशेनं निघाला. थोडं जवळ गेल्यावर निरखून पाहिलं, तर गजराजाच्या चेहऱ्यावर त्याला वेदना दिसल्या. त्या पायालाच दुखापत झाली असावी.

धीर चेपून लल्लू रांगत रांगत हत्तीजवळ गेला, नेमका त्या उचलून धरलेल्या पायाच्या खाली. बघतो तर काय, त्या पायात एक भलामोठा काटा घुसलेला. लल्लूमधला प्राणिप्रेमी जागा झाला. खुडबूड करीत बॅगेतनं त्यानं दोन-चार हत्यारं काढली आणि अल्लादपणे हत्तीच्या पायातला काटा काढला. दाभणाएवढा होता तो! हत्तीनं हळूच पाय खाली ठेवला आणि मान वळवून तो लल्लूकडं पाहू लागला. तंतरलीच लल्लूची. श्वास कोंडलेलाच राहिला. वाटलं, आता कुठल्याही क्षणी हा आपल्याला तुडवणार, पायानं चेंदामेंदा करणार, संपलं. घ्या देवाचं नाव!

आणि चमत्कार झाला. हत्तीनं सोंडेतनं दीर्घ आणि कर्णकर्कश्श तुतारी फुंकली. मान वळवली आणि चालू पडला. लल्लू बचावला! बालंबाल!! त्याला वाटलं, आपण केलेले उपकार स्मरूनच या जंगली हत्तीनं आपल्याला सोडून दिलं.

नंतर बरीच वर्षं गेली. रीतीप्रमाणं लल्लूचे दोनाचे चार झाले. मंडई, किराणामालाची दुकानं असं त्याचं ट्रेकिंग सुरू झालं. बायकोच्या शॉपिंगच्या पिशव्या उचलत जिने चढत तो हायकिंग करू लागला.

एके दिवशी लल्लूला थोडा फावला वेळ मिळाला. प्रिय बायकोची किटी पार्टी असल्यामुळं त्याला काही तासांचं स्वातंत्र्य होतं. चार वर्षांच्या बिल्लूला घेऊन तो प्राणिसंग्रहालयात गेला. जुन्या आठवणी जागवत. बिल्लूला सगळे प्राणी दाखवत लल्लू हत्ती होते तिथं आला. जाळीच्या भिंतीला अगदी टेकून उभा राहिला. तेवढ्यात लांबवर उभा असलेला एक हत्ती त्यांच्या जवळ आला. त्यानं लल्लूकडं अगदी निरखून पाहिलं. आणि मग लल्लूला जंगलातला तो काटा काढण्याचा प्रसंग आठवला. त्याला वाटलं, येस, तोच हत्ती आहे हा! तेवढ्यात त्या हत्तीनं चित्कार केला.

लल्लूची खात्रीच पटली, हत्तीनं आपल्याला ओळखलंय. अनावर उत्साहानं तो जाळीची भिंत चढून आत उतरला नि अगदी त्या हत्तीजवळ गेला. आश्चर्यानं त्याच्याकडं पाहत राहिला. त्या हत्तीनं पुन्हा एकदा सोंड उंचावली आणि तुतारी फुंकली.

क्षणार्धात हत्ती वळला. त्यानं सोंडेनं लल्लूचा एक पाय पकडला नि त्याला हवेत उचलला, भिरभिर फिरविला, कुंपणाच्या जाळीवर त्याला आदळत राहिला. दोन-चार मिनिटांमध्ये खेळ खल्लास!

असं कसं झालं?
.
.
.
दुसरं काय? `हा` हत्ती बहुदा `तो` नसावा!!!

(पूर्वप्रसिद्धी - `फेसबुक`च्या भिंतीवर 15 जानेवारी 2014)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...