Sunday 31 March 2019

चांगभले...तुमच्याचमुळे


वारं ते सुटलंय सुसाट
येणारे पुन्हा तशीच लाट?
लागणारे का पुरती वाट?
झिंगझिंगाट...

आता पुरती हो अडचण
म्हणूनच तुमची आठवण
पदोपद आणि क्षणोक्षण
नामसंकीर्तन तुमचे...

नवे जेव्हा केव्हा काही घडे
बडवू जुने नगारे - चौघडे
भूतकाळाचीच ही देण गडे
जयजयकार तुमचा...

ये देशी तुम्ही आणिले विज्ञान
कसले कसले भारी तंत्रज्ञान
अन्यथा सारा अंधारी अज्ञान
तुम्हांपूर्वी नि सांप्रत...

तुम्ही स्थापिली आयआयटी
तुमच्यामुळेच उभी अणुभट्टी
फळे मिळती रसाळ गोमटी
तुमच्याच कारणे...

'इस्रो' तुमची स्वप्नपूर्ती
दिल्लीमधील 'तीन मूर्ती'
देत राहिली सदा स्फूर्ती
किती गावो कीर्ती...

बांधला होता तुम्हीच चंग
मंगलयान ते उडाले बूंग
कौतुकात राही देश दंग
तुम्हीच करवियले...

लढविली होती तेव्हा युक्ती
म्हणुनी आज दिसे महाशक्ती
एवढ्या निमित्ते करितो भक्ती
तुमची आणि तुमचीच...

सीमेवरी खडे सज्ज सैन्य
कधीचे हटले देशाचे दैन्य
गाठीला बांधले गेले पुण्य
कृतकृत्य वाटे...

तुम्हीच एकमेव जंटलमन
या देशीचे लास्ट इंग्लिशमन
आता बहु दिसती धटिंगण
इकडे-तिकडे, चोहीकडे...


हे तर असती युद्धखोर
की जिवाला नुसता घोर
तुम्हा हाती शांतीचे कबुतर
शुभ्र फडफडते...

उठला सगळा बाजारू
तुम्हीच आमचे आधारू
नावाचा जप किती करू
सांगा तरी काका

भरतभूचे तुम्ही आधारू
अवघ्या जनांसी उद्धारू
विकासाचे पर्वत महामेरू
ना दुसरे कोणी...

तुमच्यामुळेच लिहू शकतो
मिठाला हो थोडे जागतो
जमेल तेवढी राळ उठवितो
वाटते मग हुश्श...

नसताच जर तुम्ही चाचा
केवढा झाला असता लोचा
माणसांचा आणि या देशाचा
काळजात धस्स...

ते म्हणती आमच्यामुळे मुमकिन
नसता तुम्ही तर होते नामुमकिन!

तुम्ही, लेक आणि नातू
नातसून नि आता पणतू
मनात नाही किंचित किंतु
चांगभले 'फॅमिली'मुळे..!
.......

वादळत्रस्त, कौतुकग्रस्त आम आदमी

(प्रातिनिधिक छायाचित्रे आंतरजालाच्या सौजन्याने)

Tuesday 26 March 2019

कृतार्थ शतकवीर


जास्त जगणं म्हणजे पुण्याचं काम नाही. पापाचं काम आहे. नको ते ऐकावं लागतं हो. माझा मुलगा मला सांगतो, दादा, अहो मी म्हातारा झाला हो!’ बघा गंमत, मुलगा वडलांना सांगतो की, म्हातारा झालो...

मला म्हातारपणाची व्याख्या विचारतात. मी तरुणपणाची आणि म्हातारपणाचीही व्याख्या सांगतो - जे जातं आणि येत नाही, ते तारुण्य. आणि जे येतं पण कधीच जात नाही, ते म्हातारपण!'

...ही फटकेबाजी अलीकडेच केली स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री श्री. बी. जे. खताळ पाटील यांनी. संगमनेरमध्ये. त्यांच्याच गावात. त्यांनी लिहिलेल्या माझे शिक्षक पुस्तकाचं प्रकाशन १० मार्च रोजी झालं. याच कार्यक्रमात त्यांचा खास सत्कारही करण्यात आला. सत्कार कशामुळे? वयाचं शतक गाठत असल्याबद्दल. त्याचाही त्यांनी मिश्कीलपणे उल्लेख केला. म्हणाले, ‘‘माझ्या एका कार्यक्रमात दोन मांडव घातले जातात बघा नेहमी. आता आज आधी सांगितलं की, पुस्तकाचं प्रकाशन आहे म्हणून. आणि आता इथं मला न विचारताच सत्कारही केला. मीही माणूस आहे. स्तुती, कौतुक कुणाला आवडत नाही?’’

खताळ पाटील. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वेळचं मोठं नाव. वेगवेगळ्या चार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मंत्री म्हणून काम केलं. दोन दशकांहून अधिक काळ विधिमंडळात काढला. नियोजन, पाटबंधारे आदी खात्यांचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी ठसा उमटवला. पण पासष्टीनंतर निवडणुकीच्या राजकारणातून त्यांनी निवृत्ती पत्करली आणि पुन्हा तिकडे पाहिलंही नाही. त्यांनी आज (२६ मार्च रोजी) वयाचं शतक पूर्ण केलं. त्यांना विचारलं तर सरळ म्हणतील की, अहो शतक २५ मार्चलाच पूर्ण झालं; २६ मार्चला नवं वर्ष लागलं! तसं ते एकदा म्हणालेही आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना वाढदिवसाच्या एक दिवस आधीच फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यांना म्हणालो, दादा, तुम्हाला उद्या खूप लोकांचे फोन येतील. त्यात बोलता येणार नाही, म्हणून आधीच शुभेच्छा देतो. उद्या ९७ पूर्ण होतील ना तुम्हाला?’ तेव्हा ते म्हणाले होते, उद्या कसले, आजच ९७ पूर्ण झाले की. उद्या अठ्ठ्याण्णवावं सुरू होईल.

सगळेच खताळ पाटलांना दादा म्हणतात म्हणून मीही तेच संबोधन वापरतो. अन्यथा त्यांच्याशी फार जवळचा परिचय नाही किंवा त्यांच्या खूप वेळा गाठीभेटीही झाल्या नाहीत. पाच वर्षांत त्यांची फक्त तीनदा भेट घेतली. त्यातल्या पहिल्या दोन भेटी दोन-अडीच तासांच्या झालेल्या. फोनवर बोलणं मात्र आठ-दहा वेळा झालेलं. या भेटींमधून आणि फोनवरच्या नेमकं बोलण्यातून दादा पूर्ण समजले, असं मुळीच नाही. पण त्यांच्याशी अजून बोलायला हवं आणि अजून एकदा भेट घ्यायला हवी, असं प्रत्येक फोननंतर, भेटीनंतर वाटत राहिलं.

दादांना पहिल्यांदा भेटलो ते साधारण पावणेपाच वर्षांपूर्वी. लोकसभेची निवडणूक नुकतीच झालेली. अच्छे दिनचं स्वप्न लाटेवर स्वार झालं होतं. त्यानंतरच्या महिन्यात मी काम करीत असलेल्या दैनिकाची विशेष पुरवणी प्रसिद्ध होणार होती. निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुरवणीतला एक विषय होता - राजकारणाचा बदलता परीघ. त्यासाठी नगर जिल्ह्यातल्या विविध पक्षांच्या नेत्यांकडून लेख मागविले होते. त्यात एक होते दादा. त्यांना लिहिणं शक्य होणार नाही, असा अंदाज करून शब्दांकनासाठी गेलो होतो. त्यांनी दुपारी अडीच-तीनची वेळ दिली होती. संगमनेरमध्ये भर वस्तीत त्यांचं घर. वरच्या मजल्यावर त्यांची अभ्यासिका. हारीनं भरलेली पुस्तकांची कपाटं. गेल्याबरोबर दादा सामोरे आले - उघडेबंब, खाली ट्रॅक पँट, वयानुसार बारीक झालेली अंगकाठी.

सुरुवातीचा अर्धा-पाऊण तास दादांनी मला बरंच खेळवलं. मी काही कुणाला जाहिरात देऊ शकत नाही. मग माझं कोण कशाला छापतंय?’, असा शालजोडीतला त्यांनी हसतहसत ठेवून दिला होता. निवडणूक निकालाविषयी थोड्या गप्पा मारल्यानंतर म्हणाले, पुरे की एवढं तुम्हाला. मी नकार दिला. म्हणालो, ‘‘एवढ्यानं काय होणार दादा? दोन हजार शब्दांचा लेख करायचा आहे तुमचा.’’

माझ्याबद्दल दादांना खात्री वाटत नसावी तेवढी. पहिल्यांदाच त्यांनी माझं नाव ऐकलं होतं,  मला पाहिलं होतं. आमचे तिथले सहकारी नंदकुमार सुर्वे यांनी मागितल्यामुळेच त्यांनी वेळ देऊ केला होता एवढंच. माझा लेख छापून येईलच कशावरून?’, असा त्यांचा प्रश्न होता. मी हर प्रकारे त्यांना खात्री देत होतो. त्यांचा विश्वास बसत नव्हता, असं वाटतं. तुमचा लेख छापायचा नाही, असा निर्णय झालाच, तर त्या क्षणी मी राजीनामा देईन, असं शेवटी सांगितलं!

दादांनी घेतलेल्या परीक्षेत काठावर का होईना उत्तीर्ण झालो असणार. कारण त्यानंतर ते पुन्हा बोलू लागले. त्यांची रसवंती वाहत होती. कुठली कुठली उदाहरणं देत होते, आठवणी सांगत होते. त्यांचा अभ्यास, वाचन, स्मरणशक्ती सगळंच दांडगं असल्याचं त्यातून ठळकपणे जाणवत होतं. लेखाचे मुद्दे सांगताना मधूनच ते काही गंमतीशीर आठवणी सांगत. मध्येच थांबून म्हणत, लिहून नका घेऊ. ऐका फक्त. पेनाचं झाकण बंद केल्यावरच ते पुढं सुरू करीत.

महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक इतिहासातील काही निवडक प्रसंगांचा खजिना समोर खुला होत असल्यानं भारावून जाऊन विचारलं, ‘‘दादा, आत्मचरित्र का लिहीत नाही?’’

त्यांचं उत्तर होतं, ‘‘वय झालं हो माझं आता. बैठक मारून बसणं होत नाही. लिहून घेणारेही चांगले मिळत नाहीत. कंटाळतात ते म्हाताऱ्याला.’’

‘‘मला सांगा दादा. येतो मी महिनाभर रजा टाकून. लिहू आपण.’’ माझा हा प्रस्ताव दादांनी ऐकून न ऐकल्यासारखा केला आणि पुढच्या मुद्द्याकडे वळाले.

त्यांचं बोलणं ऐकताना खूप काही नव्याने कळत होतं. अरुण साधूंच्या सिंहासन किंवा मुंबई दिनांकमधल्या अतिशय विद्वान, व्यासंगी (अर्थ)मंत्र्यांची आठवण झाली. न राहवून त्यांना विचारलं, ‘‘अरुण साधूंनी कादंबरीतले ते मंत्रिमहोदय तुमच्यावरूनच रंगवलेले दिसतात. खरं ना?’’

‘‘मला काय माहीत? साधूंनाच विचारा ना ते,’’ असं म्हणत दादांनी प्रश्नाचा चेंडू वेल लेफ्ट केला! लेखासाठी निवडणूक, निकाल, पक्ष, आधीच्या निवडणुकांचा इतिहास या अनुषंगाने ते बोलत होते. टिपणं काढताना दमछाक होत होती. मध्येच एका इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातमीचं उदाहरण त्यांनी दिलं. मुख्यमंत्री बदलणार अशा शीर्षकाच्या बातमीत भावी मुख्यमंत्री म्हणून नगर जिल्ह्यातल्या दोन नावांचा उल्लेख होता. तो संदर्भ देत दादा म्हणाले, ‘‘काहीही छापतात, तुमचे पत्रकार. आताच्या निवडणुकीत यांच्या मतदारसंघात पक्ष पन्नास-पन्नास हजारांनी मागं आहे. ज्यांना मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते काय राज्य सांभाळणार?’’ मग मोदींची लाट असा मी उल्लेख केल्यावर त्यांनी ही लाट कशी नाही, हे सविस्तर सांगितलं. ते मला पटलं आहे, हे वदवूनही घेतलं!

गप्पांच्या ओघात दादांनी मध्येच एक अफलातून किस्सा सांगितला. (तो फक्त ऐकून घ्यायचा, ही वैधानिक सूचना आधीच दिली होती!) तो किस्सा ऐकल्यावर पुन्हा म्हणालो, ‘‘दादा, आत्मचरित्राचं राहू द्या. पण या आठवणी तरी लिहायला पाहिजेतच हो.’’

‘‘अहो, मी म्हणालो ना मघाशी तुम्हाला, मला लिहिणं जमत नाही आता,’’ दादांचं तेच उत्तर ऐकून मीही पुन्हा म्हणालो, ‘‘लिहाच. लिहून घ्यायला मी येतो. रजा टाकतो तुम्ही म्हणाल तेवढे दिवस.’’

दादांनी तावातावानंच विचारलं, ‘‘तुम्ही काय स्टेनो आहात का?’’

या प्रश्नापुढं गप्प बसणंच व्यवहार्य होतं. माझा चेहरा उतरला असावा बहुतेक. मग ते म्हणाले, ‘‘मंत्री असताना मला चार चार स्टेनो बाजूला लागायचे.’’ तरीही मी गप्पच बसलेला पाहून ते म्हणाले, ‘‘का म्हणून विचारा ना!’’

त्यांनीच सांगितलं म्हणून विचारलं. त्यावर हळू आवाजात म्हणाले, ‘‘कुणा एकावर विश्वास नाही ना!’’ कुणालाच हसू आवरेना हे ऐकून.

लेखाला आवश्यक तेवढे मुद्दे झाले होते. निघताना दादांनी मला त्यांचं एक पुस्तक भेट दिलं. त्यावर लिहिण्यासाठी नाव विचारलं. सतीशमधली वेलांटी ऱ्हस्व का दीर्घ हेही विचारलं. दीर्घ असं सांगितल्यावर हळूच म्हणाले, ‘‘माझ्या धाकट्या मुलाचं नाव सतीशच आहे.’’ तेवढ्यात त्यांनी माझं शुद्धलेखन बरंय की नाही, याची परीक्षा घेतली होती. माझ्या नावामागं त्यांनी काही आदरार्थी विशेषण लिहिलं होतं. हे कशाला असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘माझ्या घरी आलेला पाहुणा कोण आहे, त्याला काय म्हणायचं हे मी ठरवणार. तुम्ही कोण ते सांगणार?’’ आम्ही हसतच बाहेर पडलो.

दुसऱ्या दिवशी लेख पूर्ण करून इ-मेलने संगमनेरच्या प्रतिनिधीकडे पाठवला. लेखाची सुरुवात कशी करायची, असा प्रश्न पडला होता. त्यावर उत्तरही सुचलं. दादांच्याच धिंड लोकशाहीची पुस्तकातला एक परिच्छेद घेतला. मला उत्सुकता होती, त्यांना लेख पसंत पडतो की नाही? ते काय काय नि किती बदल सुचवतात?

संमगमनेरच्या प्रतिनिधीचा फोन आला. म्हणाला, ‘‘दादांना लेखाची सुरुवात मान्य नाही. माझ्याच पुस्तकातला परिच्छेद त्यात नको, असं त्यांनी सांगितलं.’’ बस! एवढा एकच कट. दादांच्या कसोटीला उतरल्याचं समाधान वाटलं. पण आता लेखाची सुरुवात कशी करायची? त्यांनी काय सांगितलं, त्यांना काय अपेक्षित आहे? कुलकर्णींना योग्य वाटेल तशी सुरुवात त्यांनी करावी, असा त्यांचा निरोप होता!

विशेष पुरवणी प्रसिद्ध झाली. दादांचा त्यात छान लेख लागला. त्यानंतर काही दिवसांनीच बातमी समजली की, दादांचं निवृत्तीवेतनच बंद झालं. त्यांची मुलगी आहे, असं म्हणत कुणी तरी फोन करून त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं आणि त्यावर विश्वास ठेवून जिल्हा कोषागार कार्यालयानं तातडीनं कार्यवाही केली! संगमनेरच्या वार्ताहराला दादांनी सांगितलं, कुलकर्णींना कळवा. ते देतील बरोबर बातमी. त्या वेळी फोनवर बोललो त्यांच्याशी. त्यांना हा सगळा प्रकार मजेशीर वाटल्याचं बोलण्यावरून समजत होतं. आपुले मरण पाहिले म्या डोळा...ची आठवण तेव्हा त्यांना झाली होती.

पुढे मग दादांशी संपर्क साधण्याचं काही निमित्त मिळालं नाही. वर म्हटलं तसं एका वाढदिवसाच्या आदल्या दिवशी फोन केला. एखादा दुसरा मिनिट आम्ही बोललो. नाव सांगितल्यावर त्यांना लेखाची आठवण झाली. लाट नाही, हे मी म्हणालो ते बरोबर आहे ना?’, असं त्यांनी पुन्हा विचारलं.
...xxx….
दादांचे गेल्या वर्षी मुलाखतीच्या वेळी घेतलेले छायाचित्र.
मागच्या वर्षी अचानक दादांची आठवण झाली. यंदा ते शंभरीत पदार्पण करणार आहेत म्हटल्यावर मुलाखत घ्यावी असं वाटलं. चौकशी केल्यावर कळलं की, ते दोन-तीन महिन्यांपासून पुण्यात आहेत. त्यांच्या वाढदिवशी पुण्यात मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. तो झाल्यावरच ते संगमनेरला परतणार.

दादांना फोन केला. साडेतीन वर्षांपूर्वी येऊन गेल्याची आठवण दिली. त्यांनाही आठवलं. गप्पा मारायला यायचं आहे. येऊ का?’ असं विचारल्यावर त्यांनी होकार दिला. मग पुण्याचा पत्ता घेतला. त्यांनी तो सविस्तर सांगितला. दरम्यानच्या काळात मी नोकरी सोडलेली होती. तेही त्यांना सांगितलं. पण त्यांनी होकाराचा नकार केला नाही. त्यानं त्यांना काही फरक पडणार नव्हता, असं दिसलं.

जाण्याच्या आदल्या दिवशी फोन करून दादांची वेळ ठरवून घेतली. घरी गेल्यावर पाहिलं, तर दादा थोडे अधिक वाकल्यासारखे दिसले. स्वाभाविकच आहे ते. वय साडेतीन वर्षांनी वाढलं होतं. मध्यंतरीच्या काळात त्यांना थोडा खोकल्याचा त्रास चालू झाला होता. दादा, हे प्रश्न लिहून आणले आहेत. तुम्ही एक एक वाचून उत्तर द्या, असं म्हणाल्यावर त्यांनी कागद हातात घेतला. पहिल्या प्रश्नावर नजर टाकून कागद परत देत म्हणाले, ‘‘विचारा तुम्हाला काय विचारायचं ते.’’

त्यानंतर सव्वा ते दीड तास प्रश्नोत्तरं सुरू होती. दादा मोकळेपणानं बोलत होते. पण काही वेळा तीच वैधानिक सूचना देत – लिहून नका घेऊ, फक्त ऐका! त्यात काही अफलातून किस्से होते. काही गंमती होत्या. राजकारणातून निवृत्ती म्हणजे निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती असं स्पष्ट करताना त्यांनी राजकारणाची व्याख्याही सांगितली - आपलं अस्तित्व जगाला भासणं, त्यासाठी धडपड करणं, हेच खरं राजकारण! संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा म्हणजे आमचं ते भावनिक राजकारण होतं, असं आता वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे बोलताना ते वेद-उपनिषदांचे दाखले अगदी सहज देत होते. कुठल्याही शब्दासाठी अडत नव्हते. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचं आणि स्मरणशक्तीचं पुन्हा एकदा दर्शन घडलं.

लिहून नेलेल्या सगळ्या प्रश्नांना दादांनी मनमोकळी उत्तरं दिली होती. माझं काम संपलं होतं. ते निवांत होते. घरी फक्त एक नातू. कॅमेरा नेला नाही, याची चुटपूट लागली होती. फोटो काढू का, असं विचारत दादांना मोबाईल दाखवला. त्यावर त्यांनी विचारलं, ‘‘कपडे बदलून येऊ का?’’ मला त्यांचे अनौपचारिक फोटो हवे होते. मला हवी तेवढी, हव्या त्या पद्धतीनं छायाचित्रं काढू दिली.

या मुलाखतीत दीर्घायुष्यावरही बोलणं झालं. शतक पूर्ण केल्यावरही मला मुलाखत हवी. त्या वेळी मात्र मी हे छापायचं नाही आणि ते फक्त ऐकून घ्यायचं, असलं काही मानणार नाही, असं सांगितल्यावर दादा हसले. ‘‘मला तर काही वेळा वाटतं की, मी सव्वाशे वर्षंही जगतोय बहुतेक,’’ असं ते म्हणाल्यावर मी चटकन म्हणालो, ‘‘नक्कीच.’’ ‘‘अहो, कशाला म्हाताऱ्याला शाप देताय!’’ अशी त्यांची त्यावर प्रतिक्रिया होती.

प्रश्न संपल्यावर बऱ्याच गप्पा झाल्या. माध्यमांमध्ये नोकरी कशी मिळते, पगार काय असतो, निवृत्तीचं वय किती असतं, अशा बारीकसारीक गोष्टी दादा विचारत राहिले. माध्यमांमधील उठवळपणाबद्दल मनात असलेली नापसंतीही त्यांनी बोलून दाखवली. दोन एक दिवसांपूर्वीच एका टीव्ही. वाहिनीनं त्यांची मुलाखत घेतली आणि त्यात त्यांचं नावच चुकीचं दाखवलं-सांगितल्याचा किस्साही सांगितला. मुख्यमंत्रिपद हवं असं कधीच वाटलं नाही. कारण सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी सन्मानाची वागणूक दिली, असंही ते म्हणाले. हे ऐकल्यावर त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली होती, हा ऐकलेला किस्सा सांगून त्यांची प्रतिक्रिया विचारण्याचं धाडस अर्थातच झालं नाही.

निरोप घेताना दादा म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्यासाठी फार कष्ट घेतले हो! एवढ्या लांबून इथं आलात मुलाखत घ्यायला.’’

मग क्षणभर थांबून ते म्हणाले, ‘‘दुपारची वेळ आहे. खरं तर जेवून जा असंच म्हणायला पाहिजे मी तुम्हाला.’’ पण घरी कुणीच नव्हतं. ती अडचण त्यांनी सांगितली. मला उगीचंच कानकोंडं वाटू लागलं होतं. मी वेळ मारून नेण्यासाठी काही तरी म्हणत होतो. तेवढ्यात अडवून ते म्हणाले, ‘‘तसं नाही हो. आलेल्या पाहुण्याला दुपारच्या वेळी जेवायला घालणं हा गृहस्थधर्म आहे.’’ शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या या मोठ्या माणसाला नेमक्या वेळी गृहस्थधर्माची आठवण व्हावी आणि तो पाळता येत नसल्याबद्दल त्याला वाटत असलेली खंत पाहून मला भरून आलं.
...xxx….
यंदा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दादांची पुन्हा आठवण झाली. तेवढ्यात बातमी दिसली – दादांच्या सहाव्या पुस्तकाचं प्रकाशन. त्यांना फोन केला. लेखाची, मुलाखतीची आठवण सांगितली. आहे ना माझ्या लक्षात, असं म्हणाले ते. पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल विचारल्यावर म्हणाले, ‘‘आहे बुवा उद्या-परवा कधी तरी...’’ कार्यक्रमाला यायचं आहे, असं सांगितल्यावर या ना, या असं खुशीत आमंत्रण दिलं.

संगमनेर तालुक्यातल्या बहुतेक सर्व संस्थांची पायाभरणी करण्यात दादांचा मोठा वाटा आहे. पण संस्थेचं कामकाज सुरळीत झाल्यावर कुठंही ते अडकून पडले नाहीत. कोणत्याही संस्थेला त्यांचं नाव नाही. असं माणसांचं नाव देणं, त्यांना आवडत नाही. त्यांच्या बोलण्यातून दोन-तीनदा ते स्पष्ट जाणवलेलं आहे. वकिली करणारे, न्यायाधीश म्हणून नेमणूक झालेले, मंत्री म्हणून काम केलेले (नियोजन खातं मला सगळ्यात जास्त आवडतं. पण ते लोकांशी थेट संबंध असलेलं खातं नाही, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.) दादा जुने पाश तोडून आता लिहिण्यात रमले आहेत. त्यांनी ब्याण्णवाव्या वर्षी लिहायला सुरुवात केली. सात वर्षांत त्यांची सहा पुस्तकं झाली. आता बहुतेक पुढच्या वर्षी आत्मकथनही येईल. वीरेंद्र सेहवागनं पहिलं त्रिशतक षट्कार खेचून पूर्ण केलं. दादांनीही लेखणीच्या षट्कारानं शतक गाठलं आहे.

संगमनेरच्या कार्यक्रमातलं दादाचं भाषण मिश्किल होतं. लिहिण्याला लोकसत्तामुळे कशी सुरुवात झाली, मानधन कसं मिळालं, हे त्यांनी रंगवून सांगितलं. मोदींची लाट कशी नाही, हे पत्रकाराला कसं समजावून सांगितलं याची आठवणही त्यांना सांगावी वाटली. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना भेटायला आणि पुस्तकावर सही घ्यायला गेलो. गालावरून हात फिरवून ते म्हणाले, ‘‘दाढी फार वाढवली हो. त्यामुळे आधी ओळखलंच नाही.’’ सही करताना हात कापत होता त्यांचा. त्याचा उल्लेख करून म्हणाले, ‘‘आज हात कसा कापतोय कुणास ठाऊक? बहुतेक आजपासूनच सुरुवात झाली असावी...’’

दादा सगळ्यांनाच अहो-जाहोने संबोधतात. विपश्यनेवर त्यांचा भर आहे. त्याला ते बुद्धानं सांगितलेल्या पद्धतीनं ध्यान असं म्हणतात. आयुष्याच्या या वेगळ्या टप्प्यावर ते कृतार्थ आहेत. त्यांच्या बोलण्यातून ही कृतार्थता पाझरत असते.

रडीचा डाव... नियमानुसारच!

इंडियन प्रीमियर लीगच्या बाराव्या अध्यायाच्या तिसऱ्या दिवशीच सनसनाटी अनुभवायला मिळाली. उत्तुंग टोलेबाजी, दिमाखदार विजय किंवा धारदार गोलंदाजी ही काही त्या सनसनाटीची कारणे (किंवा लक्षणेही) नाहीत. त्यात नायक नव्हता. असलाच तर खलनायक होता. आणि तो ठरला, भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज, पंजाब किंग्ज एलेव्हनचा कर्णधार रविचंद्रन अश्विन. नायक ठरता ठरता राहिला राजस्तान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर. तणतण करीत तंबूत परतताना तो सहानुभूती मिळवून गेला.

जयपूरच्या मैदानावर राजस्तान रॉयल्सला पहिल्यांदाच पराभूत करण्याची कामगिरी पंजाबनं साधली. पण ही लढत त्यामुळं लक्षात राहणार नाही. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याने ४७ चेंडूंमध्ये ७९ धावा तडकावल्या. सामना त्यामुळे लक्षात राहणार नाही. बऱ्याच दिवसांनी सर्फराज खान चमकला. पण त्याचा हा डावही लक्षात राहणार नाही. चेंडू व्यवस्थित बॅटवर येऊ लागल्यामुळे सूर सापडलेल्या स्टिव्ह स्मिथचा के. एल. राहुलनं अफलातून झेल पकडला. यंदाच्या स्पर्धेतील तो महत्त्वाचा झेल होईल कदाचित. पण ही लढत त्यामुळेही लक्षात ठेवण्यासारखी झाली, असं म्हणता येणार नाही.

बटलर धावबाद अश्विन.
लक्षात राहणार आहे ते पंजाबचा कर्णधार अश्विनचं कृत्य. चेंडू टाकता टाकता थांबून त्यानं लक्ष्मणरेषेच्या किंचित बाहेर गेलेल्या बटलरला धावबाद केलं. लक्षात राहील ती ही आणि एवढीच गोष्ट.

अश्विनचं चौथं, अर्थात शेवटचं षट्क सुरू होतं. त्यातला पाचवा चेंडू. तो टाकण्यासाठी धावत गेलेला अश्विन अचानक थांबला. त्यानं पाहिलं – क्षणाच्या त्या काही अंशाच्या काळात बटलर लक्ष्मणरेषेच्या बाहेर गेला होता. अश्विननं त्याच क्षणी चेंडूनं बेल उडवल्या आणि पंचांकडं दाद मागितली. बटलर त्याच्याकडे अविश्वासानं पाहत होता. मग त्यांच्यात काही वेळ बोलाचालही झाली. (पाहा व्हिडिओ - https://www.iplt20.com/video/154683)

क्रिकेटचे नियम सांगतात, त्यानुसार बटलर बाद होता. निःसंशय! टीव्ही. पंचांनी त्यानुसारच निर्णय दिला. उद्विग्न झालेला बटलर हातवारे करत, संतापूनच मैदानाबाहेर गेला. तोपर्यंत त्याने ४३ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या होत्या. तो बाद होण्याआधी राजस्तानची धावसंख्या होती एक बाद १०८. त्याच्या संघासाठी विजय फार दूरचा नव्हता. हव्या होत्या ७७ धावा आणि चेंडू बाकी होते ४९.

पण या प्रसंगानंतर राजस्तानचे खेळाडू दडपणाखाली आलेले दिसले. संजू सॅमसन व स्मिथ यांनी ४० धावांची भागीदारी केली खरी; पण ही जोडी करन याने फोडली. नंतर अवघ्या १६ धावा करून राजस्तानचे ७ गडी बाद झाले. सामना त्यांनी गमावला. हाराकिरी केली. प्रत्येक चेंडूवर षट्कार गेलाच पाहिजे, अशी सक्ती असल्यासारखे सारे खेळत राहिले आणि प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षकांना जणू झेलांचा सराव देते झाले.

अश्विननं ज्या पद्धतीने बटलरला तंबूत पाठवलं, त्यामुळं सामना फिरला. पंजाबनं जिंकलाही. त्यावर सामाजिक माध्यमांमध्ये आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बहुतेकांनी अश्विनकडे बोट दाखवत त्याला या अखिलाडूपणाबद्दल दोष दिला आहे.

भरात असलेल्या बटलरला गोलंदाज म्हणून अश्विननं ज्या पद्धतीनं बाद केलं, ती अवैध नाही, हे नक्की. क्रिकेटच्या नियमावलीत तसं बाद करण्याची तरतूद आहे. तांत्रिकदृष्ट्या एकदम योग्य. पण एक अलिखित संकेत आहे, तो अश्विननं पाळला नाही. असं बाद करण्याआधी फलंदाजाला जाणीव करून द्यायची असते – बाबा रे, चेंडू टाकण्याआधीच तू पुढं पुढं पळतो आहेस. आता सांगून ठेवतो. पुन्हा पळालास, तर बाद करीन हं तुला.

खेळाडू वृत्तीनं हे केलं पाहिजे, अशी अपेक्षा आहे. तसं बंधन नाही. नियम तर नाहीच नाही.

लक्ष्मणरेषेच्या आतच असलेला बटलर.
सामना प्रत्यक्ष पाहताना आणि नंतर त्या प्रसंगाची ध्वनिचित्रफित पुनःपुन्हा पाहताना काही बाबी लक्षात येतात – अश्विन चेंडू टाकताना थांबला, तेव्हा असं वाटलं की, त्याला काही तरी अडचण आली आहे. धाव चुकली किंवा असंच काही तरी. त्यानं त्या क्षणी चेंडू टाकला असता, तर बटलर लक्ष्मणरेषेबाहेर नव्हताच. तो आतच होता. फक्त त्याचं अश्विनकडं लक्ष नव्हतं. संधी साधून धाव काढण्यासाठी पुढे पुढे जात राहायचं, असा त्याचा कोणताही (गैर)हेतू नसावा. गोलंदाजाच्या प्रत्येक क्षणाच्या हालचालीनुसार तो पुढे सरकत राहिला.

अश्विननं चेंडू टाकण्यासाठी हात उचलला, तेव्हा त्याच्याकडे बटलरचं पूर्ण दुर्लक्ष होतं. आता चेंडू पडणार, असं समजूनच त्यानं एक पाऊल पुढे टाकलं. हेच दुर्लक्ष त्याला नडलं. त्याच्या संघाला ते फार महागात पडलं. सामना बटलरच्या खिशात होता. तो त्याच क्षणी त्याच्या खिशातून निसटून गेला. पण...

पण, वर लिहिल्याप्रमाणं नियमानुसार बटलर बाद होताच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमावलीतील ‘Law 41.16- Non Striker leaving his/her ground early’ तेच सांगतो. हा नियम असा आहे - This was previously Law 42.15 and is the Law that enables the bowler to run out the non-striker before the delivery. In the light of much publicity and controversy, this Law has been thoroughly debated, with two changes being made :
Extending the point at which the run out of the non-striker can be attempted to the instant at which the bowler would be expected to deliver the ball. This will have the effect of keeping the non-striker in his/her ground for longer.

अश्विन चुकला का? लक्ष्मण म्हणाला, ‘‘मी कर्णधार असतो, तर हे अपील मागं घेतलं असतं. बटलरला खेळू दिलं असतं.’’ असं बाद करण्याआधी अश्विननं बटलरला सावध केलं होतं का, आधी इशारा दिला होता का? या प्रश्नाचं उत्तर पूर्ण नकारार्थी आहे.

ट्विटरवर याचे पडसाद स्वाभाविकपणे उमटले आहेत. खडूस गोलंदाज डेल स्टेन यानं झाल्या प्रकाराबद्दल असमाधान व्यक्त केलं. भारतीय क्रिकेटपटू महंमद कैफ यानंही याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत अश्विननं बटलरला आधी इशारा द्यायला हवा होता, असं म्हटलं आहे. अश्विननं चेंडू टाकण्याचा निर्णय बदलला, तेव्हा बटलर लक्ष्मणरेषेच्या आतच होता, याकडे माजी क्रिकेटपटू जेम्स टेलर यानं ट्वीटमधून लक्ष वेधलं आहे.


ट्विटरवर उमटलेल्या या काही प्रतिक्रिया

अशा रीतीने गोलंदाजाच्या बाजूच्या फलंदाजाला (नॉन-स्ट्रायकर) धावबाद करण्याचा पहिला मान जातो भारताचे महान अष्टपैलू खेळाडू विनू मनकड यांना. म्हणून तर क्रिकेटविश्वात ती मंकडिंग म्हणून ओळखली जाते. भारतीय संघ १९४७-४८मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते, तेव्हाचा हा प्रकार आहे. सिडनी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात कांगारूंचा फलंदाज बिली ब्राऊन याला मनकड यांनी अशी रीतीनं पुढं पळताना पकडून धावबाद केलं. त्या आधीच्या सरावाच्या सामन्यातही ब्राऊनला मनकड यांनी असंच बाद केलं होतं. तो इशारा त्याला पुरेसा ठरला नव्हता. महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या म्हणण्यानुसार मनकड यांनी ब्राऊनला बाद करण्यापूर्वी दोन वेळा इशाराही दिला होता. तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी चेंडूनं यष्टी उडवल्या आणि पंचांकडे दाद मागितली.

विनू मनकड
ऑस्ट्रेलियात यावरून बराच गदारोळ झाला. मनकड टीकेचे धनी बनले. विशेषतः वृत्तपत्रांनी त्यांना खलनायक ठरवून टाकलं.

त्याबद्दल सर्वकालीन महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं आहे, मनकड यांच्या खेळाडूवृत्तीबद्दल शंका का घेतली जात आहे, हे मला कळत नाही. गोलंदाजाच्या हातून चेंडू पडेपर्यंत त्याच्या बाजूच्या फलंदाजानं क्रीजमध्ये असलंच पाहिजे, असं क्रिकेटच्या नियमांमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे. तसं नसेल, तर गोलंदाजानं त्याला धावबाद करण्याची तरतूद नियमात कशाला ठेवली आहे? फार लवकर धावण्याचा पवित्रा घेऊन किंवा फार पुढे जाऊन नॉन-स्ट्रायकर फलंदाज अर्थातच गैरफायदा घेत असतो.

मंकडिंग हा शब्द वापरण्यास सुनील गावसकर यांचा विरोध आहे. ते म्हणतात की, या शब्दामुळे भारताच्या या महान खेळाडूची बदनामी होत आहे. मनकड यांनी फलंदाज बिल ब्राऊन (ऑस्ट्रेलिया) याला दोनदा इशारा दिला होता, सावध केलं होतं. बाद करण्याच्या या पद्धतीला अगदी नाव द्यायचंच असेल, तर तुम्ही त्याला ब्राऊनिंग म्हणा.

आयपीएलच्या आजच्या सामन्यासाठी समालोचक असलेले व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि इरफान पठाण मात्र मंकडिंग असाच शब्दप्रयोग वापरत होते.

चेंडू पडण्याआधीच (झटपट) धाव काढण्यासाठी लक्ष्मणरेषा ओलांडू इच्छिणारे असे काही फलंदाज नंतर बाद झाले. त्यात गाजलेली आणि टीका झालेली दोन उदाहरणं आहेत – पहिलं १९६९मधलं. वेस्ट इंडिजविरुद्धची ॲडलेड कसोटी जिंकण्यासाठी ३६० धावांची गरज असताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ९ बाद ३३९ होती. त्या वेळी चार्ली ग्रिफिथ यानं इयान रेडपाथला असंच बाद केलं होतं. दुसरं उदाहरण आहे तीन वर्षांपूर्वी झालेल्या एकोणीस वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील. गटात वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे यांच्यातला हा सामना. झिम्बाब्वेला शेवटच्या सहा चेंडूंमध्ये विजयासाठी तीन धावा हव्या होत्या. पण पन्नासाव्या षट्कातल्या पहिला चेंडू टाकण्याऐवजी केमो पॉलनं एन्गर्वा याला धावबाद केलं आणि झिम्बाब्वे संघ दोन धावांनी पराभूत झाला.

एक चांगलंही उदाहरण आहे. खेळाची, खेळाडूवृत्तीची मान कायम ताठ राहील असं. ते घालून दिलं वेस्ट इंडिजच्या कर्टनी वॉल्श यानं. रिलायन्स विश्वचषकाच्या उपान्त्य सामन्याची ही गोष्ट आहे. शेवटचा चेंडू आणि पाकिस्तानला विजयासाठी एक धाव हवी. जोडी शेवटचीच. अब्दुल कादीर खेळतो आहे आणि त्याच्या समोर सलीम जाफर. विजयासाठी अधीर झालेला जाफर वॉल्शनं चेंडू टाकण्यापूर्वीच लक्ष्मणरेषा ओलांडून खूप पुढं गेला होता. वॉल्शनं ते त्याच्या लक्षात आणून दिलं आणि नव्यानं चेंडू टाकण्याची तयारी केली. पाकिस्ताननं तो सामना जिंकला!

आयपीएलच्या या सामन्यात जे दोघं या प्रकाराशी संबंधित आहेत, त्या अश्विन आणि बटलर यांना अशा पद्धतीनं बाद करण्याचा-होण्याचा पूर्वानुभव आहे. श्रीलंकेविरुद्ध २०१३च्या दौऱ्यात अश्विननं लाहिरू तिरमान याला आधी इशारा देऊन असंच बाद केलं होतं. पण त्या वेळी कर्णधारपदाची सूत्रं असलेल्या वीरेंद्र सेहवागनं हे अपील मागं घेतलं.

बटलरला हा अनुभव आलेला श्रीलंकेविरुद्ध. २०१४च्या दौऱ्यात बर्मिंगहॅम इथं दुसरा एक दिवशीय सामना खेळला गेला. सचित्र सेनानायक याने त्याला आधी दोनदा सावध करून नंतर बाद केलं.

या दोन्ही अनुभवांवरून अश्विनं आणि बटलर काहीच शिकले नाहीत, असंच आज दिसून आलं.

कोण बरोबर? आणि कोण चूक?

या सामन्यानंतर आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्या दोन ओळी फार बोलक्या होत्या. तुम्हालाच काय ते ठरवायला लावणाऱ्या...

Ashwin Mankads Buttler
Within the rules of the game? Fair play? Would you have done it? You decide.
........
(छायाचित्रे - आयपीएल, ईएसपीएनक्रिकइन्फो व अन्य संकेतस्थळांच्या सौजन्याने.)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...