Tuesday, 26 March 2019

कृतार्थ शतकवीर


जास्त जगणं म्हणजे पुण्याचं काम नाही. पापाचं काम आहे. नको ते ऐकावं लागतं हो. माझा मुलगा मला सांगतो, दादा, अहो मी म्हातारा झाला हो!’ बघा गंमत, मुलगा वडलांना सांगतो की, म्हातारा झालो...

मला म्हातारपणाची व्याख्या विचारतात. मी तरुणपणाची आणि म्हातारपणाचीही व्याख्या सांगतो - जे जातं आणि येत नाही, ते तारुण्य. आणि जे येतं पण कधीच जात नाही, ते म्हातारपण!'

...ही फटकेबाजी अलीकडेच केली स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री श्री. बी. जे. खताळ पाटील यांनी. संगमनेरमध्ये. त्यांच्याच गावात. त्यांनी लिहिलेल्या माझे शिक्षक पुस्तकाचं प्रकाशन १० मार्च रोजी झालं. याच कार्यक्रमात त्यांचा खास सत्कारही करण्यात आला. सत्कार कशामुळे? वयाचं शतक गाठत असल्याबद्दल. त्याचाही त्यांनी मिश्कीलपणे उल्लेख केला. म्हणाले, ‘‘माझ्या एका कार्यक्रमात दोन मांडव घातले जातात बघा नेहमी. आता आज आधी सांगितलं की, पुस्तकाचं प्रकाशन आहे म्हणून. आणि आता इथं मला न विचारताच सत्कारही केला. मीही माणूस आहे. स्तुती, कौतुक कुणाला आवडत नाही?’’

खताळ पाटील. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वेळचं मोठं नाव. वेगवेगळ्या चार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मंत्री म्हणून काम केलं. दोन दशकांहून अधिक काळ विधिमंडळात काढला. नियोजन, पाटबंधारे आदी खात्यांचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी ठसा उमटवला. पण पासष्टीनंतर निवडणुकीच्या राजकारणातून त्यांनी निवृत्ती पत्करली आणि पुन्हा तिकडे पाहिलंही नाही. त्यांनी आज (२६ मार्च रोजी) वयाचं शतक पूर्ण केलं. त्यांना विचारलं तर सरळ म्हणतील की, अहो शतक २५ मार्चलाच पूर्ण झालं; २६ मार्चला नवं वर्ष लागलं! तसं ते एकदा म्हणालेही आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना वाढदिवसाच्या एक दिवस आधीच फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यांना म्हणालो, दादा, तुम्हाला उद्या खूप लोकांचे फोन येतील. त्यात बोलता येणार नाही, म्हणून आधीच शुभेच्छा देतो. उद्या ९७ पूर्ण होतील ना तुम्हाला?’ तेव्हा ते म्हणाले होते, उद्या कसले, आजच ९७ पूर्ण झाले की. उद्या अठ्ठ्याण्णवावं सुरू होईल.

सगळेच खताळ पाटलांना दादा म्हणतात म्हणून मीही तेच संबोधन वापरतो. अन्यथा त्यांच्याशी फार जवळचा परिचय नाही किंवा त्यांच्या खूप वेळा गाठीभेटीही झाल्या नाहीत. पाच वर्षांत त्यांची फक्त तीनदा भेट घेतली. त्यातल्या पहिल्या दोन भेटी दोन-अडीच तासांच्या झालेल्या. फोनवर बोलणं मात्र आठ-दहा वेळा झालेलं. या भेटींमधून आणि फोनवरच्या नेमकं बोलण्यातून दादा पूर्ण समजले, असं मुळीच नाही. पण त्यांच्याशी अजून बोलायला हवं आणि अजून एकदा भेट घ्यायला हवी, असं प्रत्येक फोननंतर, भेटीनंतर वाटत राहिलं.

दादांना पहिल्यांदा भेटलो ते साधारण पावणेपाच वर्षांपूर्वी. लोकसभेची निवडणूक नुकतीच झालेली. अच्छे दिनचं स्वप्न लाटेवर स्वार झालं होतं. त्यानंतरच्या महिन्यात मी काम करीत असलेल्या दैनिकाची विशेष पुरवणी प्रसिद्ध होणार होती. निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुरवणीतला एक विषय होता - राजकारणाचा बदलता परीघ. त्यासाठी नगर जिल्ह्यातल्या विविध पक्षांच्या नेत्यांकडून लेख मागविले होते. त्यात एक होते दादा. त्यांना लिहिणं शक्य होणार नाही, असा अंदाज करून शब्दांकनासाठी गेलो होतो. त्यांनी दुपारी अडीच-तीनची वेळ दिली होती. संगमनेरमध्ये भर वस्तीत त्यांचं घर. वरच्या मजल्यावर त्यांची अभ्यासिका. हारीनं भरलेली पुस्तकांची कपाटं. गेल्याबरोबर दादा सामोरे आले - उघडेबंब, खाली ट्रॅक पँट, वयानुसार बारीक झालेली अंगकाठी.

सुरुवातीचा अर्धा-पाऊण तास दादांनी मला बरंच खेळवलं. मी काही कुणाला जाहिरात देऊ शकत नाही. मग माझं कोण कशाला छापतंय?’, असा शालजोडीतला त्यांनी हसतहसत ठेवून दिला होता. निवडणूक निकालाविषयी थोड्या गप्पा मारल्यानंतर म्हणाले, पुरे की एवढं तुम्हाला. मी नकार दिला. म्हणालो, ‘‘एवढ्यानं काय होणार दादा? दोन हजार शब्दांचा लेख करायचा आहे तुमचा.’’

माझ्याबद्दल दादांना खात्री वाटत नसावी तेवढी. पहिल्यांदाच त्यांनी माझं नाव ऐकलं होतं,  मला पाहिलं होतं. आमचे तिथले सहकारी नंदकुमार सुर्वे यांनी मागितल्यामुळेच त्यांनी वेळ देऊ केला होता एवढंच. माझा लेख छापून येईलच कशावरून?’, असा त्यांचा प्रश्न होता. मी हर प्रकारे त्यांना खात्री देत होतो. त्यांचा विश्वास बसत नव्हता, असं वाटतं. तुमचा लेख छापायचा नाही, असा निर्णय झालाच, तर त्या क्षणी मी राजीनामा देईन, असं शेवटी सांगितलं!

दादांनी घेतलेल्या परीक्षेत काठावर का होईना उत्तीर्ण झालो असणार. कारण त्यानंतर ते पुन्हा बोलू लागले. त्यांची रसवंती वाहत होती. कुठली कुठली उदाहरणं देत होते, आठवणी सांगत होते. त्यांचा अभ्यास, वाचन, स्मरणशक्ती सगळंच दांडगं असल्याचं त्यातून ठळकपणे जाणवत होतं. लेखाचे मुद्दे सांगताना मधूनच ते काही गंमतीशीर आठवणी सांगत. मध्येच थांबून म्हणत, लिहून नका घेऊ. ऐका फक्त. पेनाचं झाकण बंद केल्यावरच ते पुढं सुरू करीत.

महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक इतिहासातील काही निवडक प्रसंगांचा खजिना समोर खुला होत असल्यानं भारावून जाऊन विचारलं, ‘‘दादा, आत्मचरित्र का लिहीत नाही?’’

त्यांचं उत्तर होतं, ‘‘वय झालं हो माझं आता. बैठक मारून बसणं होत नाही. लिहून घेणारेही चांगले मिळत नाहीत. कंटाळतात ते म्हाताऱ्याला.’’

‘‘मला सांगा दादा. येतो मी महिनाभर रजा टाकून. लिहू आपण.’’ माझा हा प्रस्ताव दादांनी ऐकून न ऐकल्यासारखा केला आणि पुढच्या मुद्द्याकडे वळाले.

त्यांचं बोलणं ऐकताना खूप काही नव्याने कळत होतं. अरुण साधूंच्या सिंहासन किंवा मुंबई दिनांकमधल्या अतिशय विद्वान, व्यासंगी (अर्थ)मंत्र्यांची आठवण झाली. न राहवून त्यांना विचारलं, ‘‘अरुण साधूंनी कादंबरीतले ते मंत्रिमहोदय तुमच्यावरूनच रंगवलेले दिसतात. खरं ना?’’

‘‘मला काय माहीत? साधूंनाच विचारा ना ते,’’ असं म्हणत दादांनी प्रश्नाचा चेंडू वेल लेफ्ट केला! लेखासाठी निवडणूक, निकाल, पक्ष, आधीच्या निवडणुकांचा इतिहास या अनुषंगाने ते बोलत होते. टिपणं काढताना दमछाक होत होती. मध्येच एका इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातमीचं उदाहरण त्यांनी दिलं. मुख्यमंत्री बदलणार अशा शीर्षकाच्या बातमीत भावी मुख्यमंत्री म्हणून नगर जिल्ह्यातल्या दोन नावांचा उल्लेख होता. तो संदर्भ देत दादा म्हणाले, ‘‘काहीही छापतात, तुमचे पत्रकार. आताच्या निवडणुकीत यांच्या मतदारसंघात पक्ष पन्नास-पन्नास हजारांनी मागं आहे. ज्यांना मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते काय राज्य सांभाळणार?’’ मग मोदींची लाट असा मी उल्लेख केल्यावर त्यांनी ही लाट कशी नाही, हे सविस्तर सांगितलं. ते मला पटलं आहे, हे वदवूनही घेतलं!

गप्पांच्या ओघात दादांनी मध्येच एक अफलातून किस्सा सांगितला. (तो फक्त ऐकून घ्यायचा, ही वैधानिक सूचना आधीच दिली होती!) तो किस्सा ऐकल्यावर पुन्हा म्हणालो, ‘‘दादा, आत्मचरित्राचं राहू द्या. पण या आठवणी तरी लिहायला पाहिजेतच हो.’’

‘‘अहो, मी म्हणालो ना मघाशी तुम्हाला, मला लिहिणं जमत नाही आता,’’ दादांचं तेच उत्तर ऐकून मीही पुन्हा म्हणालो, ‘‘लिहाच. लिहून घ्यायला मी येतो. रजा टाकतो तुम्ही म्हणाल तेवढे दिवस.’’

दादांनी तावातावानंच विचारलं, ‘‘तुम्ही काय स्टेनो आहात का?’’

या प्रश्नापुढं गप्प बसणंच व्यवहार्य होतं. माझा चेहरा उतरला असावा बहुतेक. मग ते म्हणाले, ‘‘मंत्री असताना मला चार चार स्टेनो बाजूला लागायचे.’’ तरीही मी गप्पच बसलेला पाहून ते म्हणाले, ‘‘का म्हणून विचारा ना!’’

त्यांनीच सांगितलं म्हणून विचारलं. त्यावर हळू आवाजात म्हणाले, ‘‘कुणा एकावर विश्वास नाही ना!’’ कुणालाच हसू आवरेना हे ऐकून.

लेखाला आवश्यक तेवढे मुद्दे झाले होते. निघताना दादांनी मला त्यांचं एक पुस्तक भेट दिलं. त्यावर लिहिण्यासाठी नाव विचारलं. सतीशमधली वेलांटी ऱ्हस्व का दीर्घ हेही विचारलं. दीर्घ असं सांगितल्यावर हळूच म्हणाले, ‘‘माझ्या धाकट्या मुलाचं नाव सतीशच आहे.’’ तेवढ्यात त्यांनी माझं शुद्धलेखन बरंय की नाही, याची परीक्षा घेतली होती. माझ्या नावामागं त्यांनी काही आदरार्थी विशेषण लिहिलं होतं. हे कशाला असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘माझ्या घरी आलेला पाहुणा कोण आहे, त्याला काय म्हणायचं हे मी ठरवणार. तुम्ही कोण ते सांगणार?’’ आम्ही हसतच बाहेर पडलो.

दुसऱ्या दिवशी लेख पूर्ण करून इ-मेलने संगमनेरच्या प्रतिनिधीकडे पाठवला. लेखाची सुरुवात कशी करायची, असा प्रश्न पडला होता. त्यावर उत्तरही सुचलं. दादांच्याच धिंड लोकशाहीची पुस्तकातला एक परिच्छेद घेतला. मला उत्सुकता होती, त्यांना लेख पसंत पडतो की नाही? ते काय काय नि किती बदल सुचवतात?

संमगमनेरच्या प्रतिनिधीचा फोन आला. म्हणाला, ‘‘दादांना लेखाची सुरुवात मान्य नाही. माझ्याच पुस्तकातला परिच्छेद त्यात नको, असं त्यांनी सांगितलं.’’ बस! एवढा एकच कट. दादांच्या कसोटीला उतरल्याचं समाधान वाटलं. पण आता लेखाची सुरुवात कशी करायची? त्यांनी काय सांगितलं, त्यांना काय अपेक्षित आहे? कुलकर्णींना योग्य वाटेल तशी सुरुवात त्यांनी करावी, असा त्यांचा निरोप होता!

विशेष पुरवणी प्रसिद्ध झाली. दादांचा त्यात छान लेख लागला. त्यानंतर काही दिवसांनीच बातमी समजली की, दादांचं निवृत्तीवेतनच बंद झालं. त्यांची मुलगी आहे, असं म्हणत कुणी तरी फोन करून त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं आणि त्यावर विश्वास ठेवून जिल्हा कोषागार कार्यालयानं तातडीनं कार्यवाही केली! संगमनेरच्या वार्ताहराला दादांनी सांगितलं, कुलकर्णींना कळवा. ते देतील बरोबर बातमी. त्या वेळी फोनवर बोललो त्यांच्याशी. त्यांना हा सगळा प्रकार मजेशीर वाटल्याचं बोलण्यावरून समजत होतं. आपुले मरण पाहिले म्या डोळा...ची आठवण तेव्हा त्यांना झाली होती.

पुढे मग दादांशी संपर्क साधण्याचं काही निमित्त मिळालं नाही. वर म्हटलं तसं एका वाढदिवसाच्या आदल्या दिवशी फोन केला. एखादा दुसरा मिनिट आम्ही बोललो. नाव सांगितल्यावर त्यांना लेखाची आठवण झाली. लाट नाही, हे मी म्हणालो ते बरोबर आहे ना?’, असं त्यांनी पुन्हा विचारलं.
...xxx….
दादांचे गेल्या वर्षी मुलाखतीच्या वेळी घेतलेले छायाचित्र.
मागच्या वर्षी अचानक दादांची आठवण झाली. यंदा ते शंभरीत पदार्पण करणार आहेत म्हटल्यावर मुलाखत घ्यावी असं वाटलं. चौकशी केल्यावर कळलं की, ते दोन-तीन महिन्यांपासून पुण्यात आहेत. त्यांच्या वाढदिवशी पुण्यात मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. तो झाल्यावरच ते संगमनेरला परतणार.

दादांना फोन केला. साडेतीन वर्षांपूर्वी येऊन गेल्याची आठवण दिली. त्यांनाही आठवलं. गप्पा मारायला यायचं आहे. येऊ का?’ असं विचारल्यावर त्यांनी होकार दिला. मग पुण्याचा पत्ता घेतला. त्यांनी तो सविस्तर सांगितला. दरम्यानच्या काळात मी नोकरी सोडलेली होती. तेही त्यांना सांगितलं. पण त्यांनी होकाराचा नकार केला नाही. त्यानं त्यांना काही फरक पडणार नव्हता, असं दिसलं.

जाण्याच्या आदल्या दिवशी फोन करून दादांची वेळ ठरवून घेतली. घरी गेल्यावर पाहिलं, तर दादा थोडे अधिक वाकल्यासारखे दिसले. स्वाभाविकच आहे ते. वय साडेतीन वर्षांनी वाढलं होतं. मध्यंतरीच्या काळात त्यांना थोडा खोकल्याचा त्रास चालू झाला होता. दादा, हे प्रश्न लिहून आणले आहेत. तुम्ही एक एक वाचून उत्तर द्या, असं म्हणाल्यावर त्यांनी कागद हातात घेतला. पहिल्या प्रश्नावर नजर टाकून कागद परत देत म्हणाले, ‘‘विचारा तुम्हाला काय विचारायचं ते.’’

त्यानंतर सव्वा ते दीड तास प्रश्नोत्तरं सुरू होती. दादा मोकळेपणानं बोलत होते. पण काही वेळा तीच वैधानिक सूचना देत – लिहून नका घेऊ, फक्त ऐका! त्यात काही अफलातून किस्से होते. काही गंमती होत्या. राजकारणातून निवृत्ती म्हणजे निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती असं स्पष्ट करताना त्यांनी राजकारणाची व्याख्याही सांगितली - आपलं अस्तित्व जगाला भासणं, त्यासाठी धडपड करणं, हेच खरं राजकारण! संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा म्हणजे आमचं ते भावनिक राजकारण होतं, असं आता वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे बोलताना ते वेद-उपनिषदांचे दाखले अगदी सहज देत होते. कुठल्याही शब्दासाठी अडत नव्हते. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचं आणि स्मरणशक्तीचं पुन्हा एकदा दर्शन घडलं.

लिहून नेलेल्या सगळ्या प्रश्नांना दादांनी मनमोकळी उत्तरं दिली होती. माझं काम संपलं होतं. ते निवांत होते. घरी फक्त एक नातू. कॅमेरा नेला नाही, याची चुटपूट लागली होती. फोटो काढू का, असं विचारत दादांना मोबाईल दाखवला. त्यावर त्यांनी विचारलं, ‘‘कपडे बदलून येऊ का?’’ मला त्यांचे अनौपचारिक फोटो हवे होते. मला हवी तेवढी, हव्या त्या पद्धतीनं छायाचित्रं काढू दिली.

या मुलाखतीत दीर्घायुष्यावरही बोलणं झालं. शतक पूर्ण केल्यावरही मला मुलाखत हवी. त्या वेळी मात्र मी हे छापायचं नाही आणि ते फक्त ऐकून घ्यायचं, असलं काही मानणार नाही, असं सांगितल्यावर दादा हसले. ‘‘मला तर काही वेळा वाटतं की, मी सव्वाशे वर्षंही जगतोय बहुतेक,’’ असं ते म्हणाल्यावर मी चटकन म्हणालो, ‘‘नक्कीच.’’ ‘‘अहो, कशाला म्हाताऱ्याला शाप देताय!’’ अशी त्यांची त्यावर प्रतिक्रिया होती.

प्रश्न संपल्यावर बऱ्याच गप्पा झाल्या. माध्यमांमध्ये नोकरी कशी मिळते, पगार काय असतो, निवृत्तीचं वय किती असतं, अशा बारीकसारीक गोष्टी दादा विचारत राहिले. माध्यमांमधील उठवळपणाबद्दल मनात असलेली नापसंतीही त्यांनी बोलून दाखवली. दोन एक दिवसांपूर्वीच एका टीव्ही. वाहिनीनं त्यांची मुलाखत घेतली आणि त्यात त्यांचं नावच चुकीचं दाखवलं-सांगितल्याचा किस्साही सांगितला. मुख्यमंत्रिपद हवं असं कधीच वाटलं नाही. कारण सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी सन्मानाची वागणूक दिली, असंही ते म्हणाले. हे ऐकल्यावर त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली होती, हा ऐकलेला किस्सा सांगून त्यांची प्रतिक्रिया विचारण्याचं धाडस अर्थातच झालं नाही.

निरोप घेताना दादा म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्यासाठी फार कष्ट घेतले हो! एवढ्या लांबून इथं आलात मुलाखत घ्यायला.’’

मग क्षणभर थांबून ते म्हणाले, ‘‘दुपारची वेळ आहे. खरं तर जेवून जा असंच म्हणायला पाहिजे मी तुम्हाला.’’ पण घरी कुणीच नव्हतं. ती अडचण त्यांनी सांगितली. मला उगीचंच कानकोंडं वाटू लागलं होतं. मी वेळ मारून नेण्यासाठी काही तरी म्हणत होतो. तेवढ्यात अडवून ते म्हणाले, ‘‘तसं नाही हो. आलेल्या पाहुण्याला दुपारच्या वेळी जेवायला घालणं हा गृहस्थधर्म आहे.’’ शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या या मोठ्या माणसाला नेमक्या वेळी गृहस्थधर्माची आठवण व्हावी आणि तो पाळता येत नसल्याबद्दल त्याला वाटत असलेली खंत पाहून मला भरून आलं.
...xxx….
यंदा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दादांची पुन्हा आठवण झाली. तेवढ्यात बातमी दिसली – दादांच्या सहाव्या पुस्तकाचं प्रकाशन. त्यांना फोन केला. लेखाची, मुलाखतीची आठवण सांगितली. आहे ना माझ्या लक्षात, असं म्हणाले ते. पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल विचारल्यावर म्हणाले, ‘‘आहे बुवा उद्या-परवा कधी तरी...’’ कार्यक्रमाला यायचं आहे, असं सांगितल्यावर या ना, या असं खुशीत आमंत्रण दिलं.

संगमनेर तालुक्यातल्या बहुतेक सर्व संस्थांची पायाभरणी करण्यात दादांचा मोठा वाटा आहे. पण संस्थेचं कामकाज सुरळीत झाल्यावर कुठंही ते अडकून पडले नाहीत. कोणत्याही संस्थेला त्यांचं नाव नाही. असं माणसांचं नाव देणं, त्यांना आवडत नाही. त्यांच्या बोलण्यातून दोन-तीनदा ते स्पष्ट जाणवलेलं आहे. वकिली करणारे, न्यायाधीश म्हणून नेमणूक झालेले, मंत्री म्हणून काम केलेले (नियोजन खातं मला सगळ्यात जास्त आवडतं. पण ते लोकांशी थेट संबंध असलेलं खातं नाही, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.) दादा जुने पाश तोडून आता लिहिण्यात रमले आहेत. त्यांनी ब्याण्णवाव्या वर्षी लिहायला सुरुवात केली. सात वर्षांत त्यांची सहा पुस्तकं झाली. आता बहुतेक पुढच्या वर्षी आत्मकथनही येईल. वीरेंद्र सेहवागनं पहिलं त्रिशतक षट्कार खेचून पूर्ण केलं. दादांनीही लेखणीच्या षट्कारानं शतक गाठलं आहे.

संगमनेरच्या कार्यक्रमातलं दादाचं भाषण मिश्किल होतं. लिहिण्याला लोकसत्तामुळे कशी सुरुवात झाली, मानधन कसं मिळालं, हे त्यांनी रंगवून सांगितलं. मोदींची लाट कशी नाही, हे पत्रकाराला कसं समजावून सांगितलं याची आठवणही त्यांना सांगावी वाटली. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना भेटायला आणि पुस्तकावर सही घ्यायला गेलो. गालावरून हात फिरवून ते म्हणाले, ‘‘दाढी फार वाढवली हो. त्यामुळे आधी ओळखलंच नाही.’’ सही करताना हात कापत होता त्यांचा. त्याचा उल्लेख करून म्हणाले, ‘‘आज हात कसा कापतोय कुणास ठाऊक? बहुतेक आजपासूनच सुरुवात झाली असावी...’’

दादा सगळ्यांनाच अहो-जाहोने संबोधतात. विपश्यनेवर त्यांचा भर आहे. त्याला ते बुद्धानं सांगितलेल्या पद्धतीनं ध्यान असं म्हणतात. आयुष्याच्या या वेगळ्या टप्प्यावर ते कृतार्थ आहेत. त्यांच्या बोलण्यातून ही कृतार्थता पाझरत असते.

14 comments:

 1. सुंदर लेख आणि आठवणी

  ReplyDelete
 2. सतीश लेख खूप सुंदर.

  ReplyDelete
 3. दादांसारखाच स्पष्टपणा लेखणीतून जाणवला... आता दादांबाबत लिहायचं म्हणजे ते हवंच...!

  ReplyDelete
 4. वाचनीय लेख...ओघवती भाषा...अप्रतिम लिखाण!
  - बालाजी ढोबळे, परतूर (जालना)

  ReplyDelete
 5. बी. जे. खताळ पाटील यांच्यावर यापूर्वी तू लिहिलं होतंस. त्या वेळीही मला आवडलं होतं. कसोटीच्या काळात अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रिपदाचा यशस्वीपणे कारभार सांभाळणाऱ्या खताळ पाटील यांना नंतरच्या काळात काँग्रेसने दुर्लक्षितच केलं. चांगल्या व अनुभवी व्यक्तीचा पक्षासाठी वापर करून घेण्यात काँग्रेस अपयशी ठरल्यानेच आज पक्षाची अवस्था जिल्ह्यात बिकट झाली आहे हे लक्षात घ्यायला हवे. बाकी लेख अतिशय उत्तम... तुझ्या लौकिकाला साजेसाच!
  - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

  ReplyDelete
 6. दादांबद्दल वाचले आणि दंग राहून गेलो.
  अशी माणसे जवळून अभ्यासता आली, या आपल्या भाग्याचा हेवा वाटला.
  तशी ती अभ्यासणे म्हणजे एक प्रकारचे graduation असेच.
  तुमचा आठवणी सांगणारा हा लेख in between the lines जास्त बोलतो.
  हे सहजी जमत नसते.
  दादा यांना शिसान आणि आपल्या लेखनास मनःपूर्वक दाद.
  - प्रदीप रस्से, जळगाव

  ReplyDelete
 7. लेख बारकाईने वाचला. आपल्यावर अशी मुलाखत घ्यायची वेळ (खरे तर योग) आला तर, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखात गवसली.

  एक शतकवीर आपण जवळून पहिला एवढा साधा याचा अर्थ नाही. एक दिग्गज राजकारणी, सुसंस्कृत माणूस, प्रसिद्धिविन्मुख, तत्त्वचिंतक, निगर्वी अन् कृतार्थ जीवन जगलेल्या जिल्ह्यातील एका महान व्यक्तिमत्वाचे पैलू आपण आजच्या पिढीसमोर आणलेत. दादांना शुभेच्छा देण्याऐवढा मी मोठा मुळीच नाही, मात्र झाकलं माणिक प्रकाशात आणल्याबद्दल लेखकाला शतशः धन्यवाद दिले पाहिजे.

  न बोलू इच्छिणाऱ्या एका तपस्वीला बोलतं करणं किती कठीण असते,ते काम लेखकाने लीलया करून वाचकांना कृत कृत केले आहे. 'ज्याचं खावं मीठ त्याचं लिहावं नीट' असे पत्रकारितेला दिवस आलेत. ( काही सन्मानीय अपवाद वगळता)अशा काळोखात 'कृतार्थ शतकवीर' अन मुलाखतकार समाजाचे दीपस्तंभ ठरावेत...

  अल्लाह करे जोरे कलम और जियादा......

  - आरिफ शेख, श्रीगोंदे

  ReplyDelete
 8. 'कृतार्थ शतकवीर' हा लेख नेहमीप्रमाणेच उत्तम, माणसं जोडण्याची तुमची शैली या लेखातून सुद्धा जाणवते. माणसं जपणं आणि ती मैत्री स्नेह टिकवणं हे तुम्हाला खूप साधतं. बाकी दादां सारखी माणसं आता दुर्मिळ होत चाललीत हे खरं.
  - डाॅ. ऊर्मिला चाकूरकर, पैठण

  ReplyDelete
 9. मला म्हातारपणाची व्याख्या विचारतात. मी तरुणपणाची आणि म्हातारपणाचीही व्याख्या सांगतो - जे जातं आणि येत नाही, ते तारुण्य. आणि जे येतं पण कधीच जात नाही, ते म्हातारपण!

  अप्रतिम काका!!
  - संकल्प थोरात, नगर

  ReplyDelete
 10. Good article on B. J. Khatal. those days he was very efficient minster.belonging to S B Chavan group.
  - B. V. Kanade, Banglore

  ReplyDelete
 11. दादांचा लेख वाचला आत्ताच; आता रडीचा डाव वाचणारंय. आपले शब्द लेखाशी बांधून ठेवतात. लेख वाचून दादांना भेटायची इच्छा झाली आहे. माझ्या वडिलांच्या तोंडून त्यांचे नाव अनेक वेळा ऐकले. आज आपल्या लेखातून भेट घडली.
  - भरत वेदपाठक

  ReplyDelete
 12. सुंदर लिहिता तुम्ही. भाषा सहज आणि जे लिहायचं ते विचार पक्के. असेच लिहीत राहा.
  - लिली जोशी

  ReplyDelete
 13. 'दो कौडी की राजनीती'साठी लाख मोलाचे आयुष्य बरबाद करणाऱ्यांपैकी खताळसाहेब नसल्यानेच आपण त्यांचा पिच्छा सोडला नाही. आपला लेख त्यांना निश्चितच दीर्घायुष्यासाठी शक्ती देईल.
  - श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)

  ReplyDelete

'हिंडता फिरता' अध्यक्ष उदगीरला लाभता

  'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्या...