Sunday 30 December 2018

इये राजकारणाचिये नगरी


इतिहासाचे जुने साक्षीदार
ऐसे एक आटपाट 'नगर'
पौरजनांचा सदा चाले गजर
शहर माझे भले

नगरी ही नावाने शेलाटी
नसे काना, मात्रा, वेलांटी
नित्य नवी मारी कोलांटी
राजकारण तिथले

पाहण्या नगराचा कारभार
पालक संस्था 'महा' फार
निधीच्या अभावी आजार
तिला सदा नि कदा

तिथे एकदा जाण्याकरिता
म्हणे सेवक होण्याकरिता
आटापिटा जिवाचा करिता
इच्छुकांची तोबा दाटी

फूल पाकळ्यांचे कोणा हाती
कुठे वाघोबाचा होतसे हत्ती
येई त्याला पावन करिती
दत्तकविधान पवित्र

निवडणुकीचा खेळ मजेदार
घ्यावे दोन नि द्यावे चार
खरे पाहता असे व्यवहार
छनछनाट सारा

कोणा गरिबा दाखवावा गुत्ता
कोणासी करून द्यावा रस्ता
कोणा एखाद्याची मालमत्ता
द्यावी छान रंगवोनी

होता जाहीर तो निकाल
लागे अनेकांचा निक्काल
फासला विजयाचा गुलाल
अडुसष्टांच्याच माथी

बहुमतासाठी संख्या अपुरी
न लागे एक नाव किनारी
नवागत अश्व उभे बाजारी
लिलावासाठी सिद्ध।

याचे आणि त्याचे जमेना
त्याला शूत्रविना करमेना
आकडेमोडीनंतरही जुळेना
सत्तेचे समीकरण।

धाकला झाला होता मोठा
त्याचा काही उतरेना ताठा
देऊन टाकू आता जमालगोटा
म्हणती थोरल्या।

युती होणार की आघाडी
का आहे सगळी बिघाडी?
पकणार वेगळीच खिचडी?
कट काही शिजला।

दिवस तो उगवला महान
प्रथम नागरिकाचे चयन
अवघ्या नगरीचे नयन
एक टक तिकडे।

चमत्कार! चमत्कार!
अवघा झाला हाहाकार
तत्त्व-भूमिकांचा विसर
पडला सोयीस्कर।

धडा शिकवण्याचा बांधला चंग
केला त्यासाठी असंगाशी संग
सत्तेच्या कैफात केवढे दंग
पक्ष म्हणे वेगळा।

वादी घाली गळ्यात गळा
आपली झाली नकोशी कमळा
सैनिकहो आता हात चोळा
वंदा चरण श्रीचे।

खड्ड्यात गेली शेवटी युती
आघाडीनेही खाल्ली माती
मित्रधर्मा लागली पनवती
पॅटर्न नवा ये जन्मा।

दलदलीतच कमळ फुले
बुडता अधिक खोल चाले
सांगुनही हे तयां न कळे
गुंता सारा दाढीत।
-----------
- अचंबित, भयकंपित आम आदमी
---------------
(महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 
युती तुटल्यावर प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार मंजूल यांनी
रेखाटलेले हे चित्र नगरमध्ये अगदी तस्सेच लागू पडले.)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...