नगरमध्ये
लिहिला गेला बेस जंपिंगचा नवा अध्याय
|
वर आकाश, खाली जमीन. आणि मध्ये साजिद! .......................
|
नगर.
पाचशे वर्षांहून अधिक वय असलेल्या ह्या शहराच्या इतिहासाबद्दल बरंच काही बोललं जातं.
इथल्या वर्तमानाबाबत मात्र काही नवंनवं नि हवंहवं ऐकायला मिळत नाही. इथं वेगळं
काही घडतच नाही, ही सर्वसामान्य नगरकरांची भावना. तिला छेद दिला, गेल्या
रविवारच्या (दि. १८ नोव्हेंबर) वेगळ्या उपक्रमानं.
साहसी खेळामधला, हवाई क्रीडाप्रकारातला एक नवा अध्याय त्या दिवशी लिहिला गेला.
त्याच्या दोन आवृत्त्या दीड-दोन तासांच्या अंतरानेच आल्या. पॉवर ग्लायडरमधून
(किंवा पीपीसी – पॉवर्ड पॅराशूट) उडी मारण्याचा हा पराक्रम त्या दिवशी झाला. ‘पॅरामोटर बेस जंप’ अशी त्याची ओळख असून, या
क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार भारतात हे पहिल्यांदाच झालं त्या रविवारी,
नगरमध्ये! त्या दोन पराक्रमी आवृत्त्यांचे दोन शिलेदार होते
मुंबईकर साजिद चौगले आणि पुणेकर (मूळचे राहुरीकर) विजय सेठी. आकाशातून जमिनीवर उडी
मारली साजिद ह्यांनी नि त्यासाठी त्यांना ‘पीपीसी’मधून आकाशात नेलं होतं विजय सेठी ह्यांनी.
विमानामुळं
माणूस आकाशात उडू लागला, त्याला फार वर्षं झाली. पण म्हणून पक्ष्यांसारखा गगनविहार
करण्याचं स्वप्न पाहणं माणसानं काही थांबवलं नाही. उलट ह्या स्वप्नात अनेक नवनवे रंग
भरले गेले. हँगग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, पॉवर-ग्लायडिंग ह्या आणि अशा साहसी
खेळांनी. पॅरामोटरिंग हा त्यातलाच एक प्रकार. नगरजवळच्या डोंगर-पठारावर अलीकडच्या
काही वर्षांमध्ये बहुतेक दर रविवारी आकाशात अशा काही छत्र्या उडताना दिसतात. बरेच
हौशी तरुण, अनुभवी मंडळी तिथं गगनभरारी घेत असतात. नगरपासून सहा-सात किलोमीटरवर
असलेल्या आलमगीरजवळच्या पठारावरच्या आकाशात गेल्या रविवारी दिवसभर असंच दृश्य दिसत होतं. त्या दिवशी उडणाऱ्या ह्याच दोन छत्र्यांनी विक्रम घडवला.
उद्योजक
असलेल्या विजय सेठी यांना साधारण दोन दशकांपूर्वी या साहसी खेळानं भुरळ घातली.
ग्लायडिंगचे विविध धडे गिरवून गेल्या काही वर्षांपासून त्यांनी ‘पीपीसी’ला आपलंसं केलं आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःच ऑस्ट्रेलियन बनावटीचं ‘हमरशूट’ खरेदी केलं. ते आणि त्यांचे सहकारी शक्य
होईल तेव्हा सराव करतात. त्यासाठी नगरचा परिसर त्यांना फार आवडतो. इथं त्यांची एक
टीम तयार झाली आहे. भिंगारजवळच्या आलमगीरपासून थोडं पुढं गेलं की, एक पठार दिसतं.
ते ‘गुगळे एअर स्ट्रिप’ म्हणून ओळखलं
जातं. ज्येष्ठ अभियंता आणि घरच्या घरी विमान तयार केलेले विजय सुलाखे, विजय सेठी,
मुदस्सीर खान आदींनी हे मैदान आपल्या छंदासाठी विकसित केलं आहे.
|
विक्रमासाठी सज्ज - विजय सेठी आणि साजिद चौगले. ................... |
जवळपास
दीड महिन्यानंतर रविवारी तिथं येऊन आपल्या लाडक्या ‘हमरशूट’मधून आकाशभराऱ्या घेण्याचं सेठी ह्यांनी ठरवलं. त्याच्या पाच दिवस आधी ‘फ्लाइंग कम्युनिटी’मधल्या एका बुजुर्ग
मार्गदर्शकाकरवी मुंबईच्या साजिद ह्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. साहसी हवाई
क्रीडाप्रकारातलं साजिद चौगले हे मोठं नाव. स्कायडायव्हर, विंगसूट फ्लायर, बेस
जंपर अशी त्यांची ओळख. त्यांच्या गाठी विविध अनुभव. पण ‘बेस
जंप’चा हा पराक्रम नगरच्या भूमीत करावा, हे त्यांच्या मनात
आलं. त्याचं कारण विजय सेठी ह्यांच्या कौशल्याबद्दल त्यांनी ऐकलं होतं. सेठी बऱ्याच
वर्षांपासून ग्लायडिंग-पॉवर ग्लायडिंग करीत असले, तरी आपल्या भराऱ्यांची चोख नोंद
ठेवायला त्यांनी चार-पाच वर्षांपासून सुरुवात केली. त्यानुसार त्यांच्या खाती ११५ तासांच्या उड्डाणाचा अनुभव जमा आहे. ‘बेस जंप’ म्हणजे
मानवनिर्मित उपकरणातून आकाशात जायचं आणि तिथून पॅराशूटच्या मदतीनं उडी मारायची.
सेठी यांना ह्याचा अनुभव नव्हताच. पण कुठलंही नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी ते नेहमीच
उत्सुक असतात. त्यातूनच त्यांनी साजिद ह्यांना होकार कळवला आणि नगरला येण्याचं
आमंत्रण दिलं.
आलमगीरजवळच्या
पठारावर रविवारी सकाळी नऊपासूनच सेठी ह्यांनी सराव सुरू केला. दीड महिन्यांच्या
खंडानंतर ते छंदासाठी वेळ देत होते. तीन-चार भराऱ्यांनंतर ‘हमरशूट’सह त्यांच्यातील पायलटही ‘फाईन ट्यून्ड’ झाला. त्या दिवशी सकाळी हवा स्वच्छ होती. वाऱ्याचा संथ वेग आणि आकाशात
कुठेही ढग नव्हते. सरावानंतर सेठी आणि साजिद ह्यांनी एक फेरी मारली. खाली उतरल्यावर
त्या दोघांची छोटी ‘कॉन्फरन्स’ झाली.
किती फुटांवर जायचं, साजिद कशी उडी मारणार, त्यांनी उडी मारल्यावर ‘हमरशूट’चं नियंत्रण कसं करायचं ह्यावर त्यात त्यांची
चर्चा झाली. त्या नेमक्या वेळी करायच्या खाणाखुणा ठरल्या. सज्ज झाले दोघेही नव्या
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी!
|
ऑल द बेस्ट..! ............. |
‘हमरशूट’मध्ये बसण्यापूर्वी पायलट आणि जंपर ह्यांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या.
साजिद ह्यांच्या पाठपिशवीत होतं पॅराशूट. त्याच्याच मदतीनं ते आकाशातून जमिनीवर
येणार होते. काही क्षणातच ‘हमरशूट’चं
इंजिन सुरू झालं. त्याची पाती गरागरा फिरली आणि धूळ उडू लागली. ‘हमरशूट’ची मागची केशरी-पिवळ्या रंगांतली विस्तीर्ण
छत्री पिसारा फुलवत आकार घेती झाली. जंपर व पायलट ह्यांना घेऊन ते यंत्र आकाशाकडे
झेपावलं.
हवा
चांगली असल्याने ‘हमरशूट’ सहजपणे उडालं. दोघेही
स्थिरावले. आपापल्या कामात गुंतले. पाचशे, हजार, दीड हजार फूट करीत हमरशूट अडीच
हजार फुटांपर्यंत गेलं. आता तो क्षण आला होता. विजय व साजिद, दोघांनी एकमेकांकडं
पाहिलं आणि उजव्या हाताचा अंगठा उंचावून ‘ऑल इज वेल’ची खूण केली. पुढच्याच क्षणी साजिद यांनी उडी मारली. तोच तो क्षण -
दोघांच्याही काळजात एकाच वेळी धस्स झालं! पॅराशूट व्यवस्थित
उघडतंय ना, आपला जमिनीकडे प्रवास व्यवस्थित होईल ना आणि पायलटला पॉवर ग्लायडर
व्यवस्थित नियंत्रित करता आलं आहे ना, अशा सगळ्या शंका त्या एकाच वेळी साजिद
यांच्या मनात आल्या. विजय सेठी त्याच वेळी नेमका हाच विचार करत होते. धडकी भरवणारा
तो क्षण आला आणि गेलाही. साजिद ह्यांचा प्रवास हळू हळू आणि पद्धतशीरपणे जमिनीकडे सुरू
झाला. सेठी ह्यांनीही शंका-कुशंका झटकून ‘हमरशूट’ उतरवण्याची तयारी सुरू केली.
|
पाय जमिनीवर टेकले! ..................... |
ह्या
दोघांचे जमिनीवरचे साथीदार एवढा सारा वेळ आकाशाकडेच डोळे लावून होते. त्यांच्या
साक्षीनेच हे दोघे काही मिनिटांनी जमिनीवर व्यवस्थित उतरले आणि हवाई
क्रीडाप्रकारात नवा इतिहास बनविणारे लेखक बनले! तिथं असलेले सगळेच
विलक्षण आनंदाने त्यांच्याकडे धावले. अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आपण हे केलं,
यश मिळालं, नगरच्या भूमीवर हे झालं, ह्यावर दोघांचाही विश्वास बसत नव्हता. दोघांचेही
डोळे आणि चेहरे ह्या भावना स्पष्टपणे दाखवित होते. साजिद म्हणाले, ‘‘खरं सांगू? उडी मारली तेव्हा जाम टरकलो होतो.’’ त्याची ही कबुली ऐकून सेठी हसत हसत म्हणाले, ‘‘माझी
अवस्था तरी कुठं वेगळी होती?’’
पहिल्याच
उडीत भीमपराक्रम. पण तो करूनही साजिद-विजय जोडगोळीचं समाधान झालं नव्हतं. त्यांनी
दुसऱ्या उडीची तयारी सुरू केली. पोटपूजा करून, थोडी विश्रांती घेऊन साधारण दोन
तासांनी ते पुन्हा सज्ज झाले. आता दुपार झाली होती आणि वातावरण थोडं बदललं होतं.
आकाशात थोडे थोडे ढग दिसत होते. ‘ऑक्टोबर हीट’सारखं उन्ह पोळत होतं. वारा पडला होता. दुसऱ्या ‘बेस
जंप’चं व्हिडिओ शूटिंग करायचं ठरलं. त्यासाठी व्हिडिओग्राफर
डेल्टन डी’सूझा तयार होते. त्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी
होती अमितराज सिंग ह्यांच्यावर. दुसरं ‘हमरशूट’ घेऊन ते दोघं आकाशात झेपावले आणि या पराक्रमी जोडीची वाट पाहत घिरट्या
घालत राहिले.
|
वावटळ... नंतर ती विक्रमात परावर्तित झाली. ........................... |
विजय आणि सादिक ह्यांचं ‘हमरशूट’ उडण्याच्या तयारीत असताना वेगळीच अडचण दिसू लागली. बऱ्यापैकी लांब, पण
अगदी समोरच मोठी वावटळ सुरू झाली. धुळीचा मोठा स्तंभ तिच्यामुळे तयार झाला होता.
ती वावटळ स्थिर होती आणि इकडच्या दिशेने सरकत नव्हती, हीच काय ती समाधानाची बाब. त्याचा
अंदाज घेऊन आणि पूर्ण कौशल्य वापरून सेठी ह्यांनी ‘हमरशूट’ उडवलं.
पाहता
पाहता सेठी-सादिक ह्यांच्या पॉवर्ड पॅराशूटनं मोठी उंची गाठली. अमितराज-डेल्टन ह्यांचं
‘हमरशूट’ त्यांच्याहून खाली होतं. आता कोणत्याही
क्षणी आकाशातून खाली येणारा साजिद दिसेल, अशा तयारीत खाली असलेले सहकारी होते. त्या
दोघांच्या मनात मात्र वेगळंच काही होतं. तब्बल साडेतीन हजार फुटांची उंची
गाठेपर्यंत ते वर जात राहिले. आधीपेक्षा एक हजार फूट अधिक उंच. तिथून साजिद ह्यांनी उडी
मारली. पण हवेचा नूर काही वेगळाच होता. उडी मारल्यानंतर साजिद जवळपास पाच मिनिटं
आकाशात स्थिर होते. साजिद कुठे दिसत नाही, म्हणून सेठी ह्यांनी हमरशूट आणखी वर घेतलं
आणि ते साडेचार हजार फुटांवर स्थिरावलं. हा सारा चित्तथरारक प्रकार जवळपास पंधरा
मिनिटे चालला. साजिद आणि सेठी यथावकाश जमिनीवर उतरले आणि ‘हॅपी
लँडिंग’बद्दल पुन्हा एकवार जल्लोष झाला.
‘बेस
जंप’साठी प्रसिद्ध असलेल्या निवृत्त लेफ्टनंट कर्नल
सत्येंद्र वर्मा यांनी ह्या उडीची चित्रफित पाहिली आणि ‘भारतात
पहिल्यांदाच पॅरामोटरमधून बेस जंपिंग झालं,’ असं विजय सेठी
यांना फोनवर सांगितलं. साजिद-विजय ह्यांच्या या विक्रमासाठी इतरांचीही मोलाची मदत
झाली. मुदस्सीर खान, विजय सुलाखे, संजय साळवे, उमेश कुलकर्णी, प्रवीण परेरा, नादिर
खान, कर्नल शर्मा यांनी ‘टेक ऑफ’ आणि ‘लॅंडिग’ ह्याची दोन्ही वेळा चोख व्यवस्था पाहिली.
नगरमध्ये
नवीन काही घडतच नाही, ह्या समजाला रविवारी साजिद-विजय जोडीनं छेद दिला.
पक्ष्यांसारखं मुक्तपणे उडण्याचा आनंद देणारी ही ‘फ्लाइंग ॲक्टिव्हिटी’
नगरमध्ये अलीकडच्या काळात वाढली आहे. अशा हौशी आणि अनुभवी ‘पक्ष्यां’ची संख्या लक्षणीयरीत्या वाढताना दिसते. मीरावली पहाड किंवा आलमगीरजवळच्या
पठारावर सतत काही ना काही उपक्रम चालू असतात. साजिद व सेठी ह्यांच्या या
पराक्रमामुळं या उपक्रमांना आता अधिक गती येईल, दिशा मिळेल.
(सर्व छायाचित्रे : शब्दकुल shabdkul@outlook.com)
....
#बेस_जंपिंग #पॅरामोटर_बेस_जंप #विजय_सेठी #साजिद_चौगले #नगर #पॉवर_ग्लायडिंग
#फ्लाइंग #हमरशूट #पॅराशूट #पॉवर्ड_पॅराशूट #पीपीसी