भो, ऐतिहासिक नगरा,
उपेक्षेचे वारे सोसत,
परी ना कण्हत, ना कुथत,
संथ गतीने सुरूच आहे
तुझी वाटचाल, अखंडित
पारतंत्र्याच्या सोसून अनेक ‘शाही’
अनुभवतोयस सध्या लोकशाही,
पण तुझ्या गौरवाच्या आणि कुचेष्टेच्या
लिखाणाची अजूनही आहे ओली शाई
पाचशतकी वयाचा तुझ्या
उल्लेख होतो वारंवार,
पण बा नगरा, नाहीत दिसत
वार्धक्याच्या काहीबाही खुणा
तुझ्या अंगावर...
हां, दिसताहेत सुरकुत्या कधीच्या
झालेल्या त्या तरुणपणीच्या
उपेक्षेच्या, कुपोषणाच्या...
लढायांतल्या तलवारींचा
तू ऐकला आहेस खणखणाट
आणि मंदिरात वाजणाऱ्या
टाळ-घंटांचा किणकिणाट
तरीही स्तब्ध आणि सुज्ञ,
नेहमीसारखाच स्थितप्रज्ञ!
ऋषी-मुनी, साधू-संतांचा
नित्य लाभलाय सहवास
आणि हव्यासी सत्ताधीशही
करून गेलेत येथे वास
पण आहे तीच परिस्थिती
झकास, मानत राहतोयस खास
भरण-पोषणाच्या,
नि सुजाण पालकत्वाच्या
कल्पनाच आहेत तुझ्या वेगळ्या
देगा उसका भला,
न देगा उसका भी भला
धुंदीत जगतोयस आगळ्या...
कुणीही यावे
टिकली मारुनी जावे,
तसे कुणीही यावे नि
राज्य करुनी जावे...
तुझे त्याला ना सोयर - ना सुतक
प्रश्न पडत राहतात,
उत्तरे कधी तरीच
सापडत असतात,
अनुत्तरित समस्या
चिघळून लसलसतात...
मिरवतोस तू त्या अंगावर
लखलखत्या दागिन्यांगत!
उसाच्या हिरव्यागार मळ्यांतून
घोंगावतात दुष्काळी वारे
आणि वाहत्या कालव्यांतून
पुढे जातात तहानेचे झरे
भुकेला-तहानलेला तू,
आहेस तेथे, तसाच राहा बरे
खुणावणारे पुणे,
हिणवणारे नाशिक,
चमकणारे औरंगाबाद
या त्रिकोणात तुझा
न दिसणारा चौथा कोन
बोथट, न टोचणारा...
झगमगत्या त्या महानगरांकडे,
पाहून नाहीत तुझे दिपत डोळे
कोठून, काही कळत नाही,
पण मिळवलेस हे शहाणपण खुळे?
ग्लोबल युगापासून तू
नसशी रे लांब फार,
पण नाही तुझा हात
त्याच्या खांद्यावर
सबब, इतके जवळ
तरीही दूर,
पडले हे केवढे अंतर
नव्या जगात जगताना
कितीही आले जिवावर
रोज करावे वाटते हाऽऽय,
तरीही म्हणावे लागते बाऽऽय
फेसबुकावर तुला मानाचे पान
कितीक लाईक, कॉमेंट्स छान
दुरावा तुझा साहवेना,
परि तुझ्याजवळ राहवेना!
रविवार, २९ मे, २०१६
मत्प्रिय नगरा...
(‘अहमदनगर’ असं कागदोपत्री
नाव असलेलं आणि साऱ्यांच्या बोलण्या-लिहिण्यात कायम ‘नगर’ असाच उल्लेख येत राहिलेल्या या शहराचं वयोमान पाचशेहून अधिक आहे. त्याचा स्थापनादिन 28 मे. गेल्या अडीच दशकांपासून तो साजरा होतो. त्याच आठवणी, तेच कढ,
तीच महता आणि तीच गाथा... उत्सवी स्थापनादिनापलीकडे कधीच काही होत नाही. या
शहराबद्दलची आपुलकी व्यक्त करणारी ही कविता. अडीच वर्षांपूर्वी केलेली... आणि वर्तमान पाहता भविष्यातही तशीच लागू राहील, असंच खंतावून म्हणावंसं
वाटतं.)
(पूर्वप्रसिद्धी
: दैनिक सकाळ, 22 नोव्हेंबर 2013)
गुरुवार, २६ मे, २०१६
‘दिल की बात!’
बँड वाजवून, ढोल-ताशे बडवून दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार
सिंहासनारूढ झालं. त्या वेळच्या आनंदाच्या लाटा आता काहीशा ओसरल्या आहेत.
उत्साहाच्या वाटाही बंद झाल्या की काय, असं वाटू लागलं आहे. मोदी सरकारच्या
पहिल्या वाढदिवसानिमित्त इथेच वर्षापूर्वी ‘बाई’ आणि ‘भाई’ असा लेख लिहिला होता. त्यानंतर अजून एक वर्ष
गेलं. या सरकारबद्दल सामान्यजनांच्या मनातले ‘आम आदमी’ने जाणून घेतलेले भाव.
पुन्हा एकदा बोलबाला
सव्वीस मे जवळ आला
दिवस हॅप्पी बर्थडेवाला
कसा करावा साजरा बोला!
रांगोळीने सजवावे अंगण?
लाल किल्ल्या बांधावे तोरण?
आकाशी सोडावा मोठ्ठा फुगा?
की रोषणाईने दीपवावे जगा?
यमुनेच्या तिरी भरवू मेळा
‘भाईयों-बहनों’ साद घाला
पुन्हा भक्तजन करू गोळा
जुनाच खेळ नव्यानं खेळा
केक कापूया भला थोरला,
बर्गर नि पिझ्झा इटलीवाला?
नको! बरा अपुला तो ढोकळा
चाट-पापडी अन् मिर्च-मसाला
‘नमो-नमो’चा जपावा मंत्र
‘कॉंग्रेसमुक्त’चे शिकावे
तंत्र
‘साठ साल-साठ साल’चा जप
करीत राहावा अत्र-तत्र-सर्वत्र
नवसा-सायासाचं लेकरू
बोलतंय कधीचं चुरुचुरू
चालेल ना पण तुरुतुरू?
की तेवढंच गेलंय विसरू?
द्यावी त्याला बार्बी विदेशी.
की बरी आपली ठकीच देशी?
‘मेक इन’चा होईल दाखला
‘मेड इन इंडिया’चा बोलबाला
बिहार, जेएनयू, उत्तराखंड
तयांमुळे झाला की मुखभंग
पुण्यामधली एफटीआयआय
तिनं केलं दे माय धरणी ठाय
शिजेना डाळ, रडवतोय कांदा
त्यामुळं झाला खाण्याचा
वांधा
दुष्काळामुळं फोडलाय टाहो
सरकार असूनही दिसंना का हो?
झालीत पुरती वर्षं दोन
उरलीत आता बाकी तीन
‘भाई, कुछ देते क्यूँ नही ?’
विचारतेय जनता चिनभिन
आल्या आहेत योजना बावन
मिळू द्या घर,
जनांकडे धन
सुकन्या होईल समृद्ध-संपन्न
कोमात का हो स्वच्छता मिशन?
स्मार्ट होताहेत महानगरे
खेड्यांचेही बदला की चेहरे
स्वच्छ होतेय भगीरथाची गंगा
मंत्र राहू द्या तोच, ‘न खाऊँगा’
एवढ्यात कुठला नाही गफला
दृष्ट लागण्याएवढाही नसे घोटाळा
परदेशात रंगवली प्रतिमा छान
ताठही राहिलीय देशाची मान
तरीही घार उडू द्यावी आकाशी
चित्त असो द्यावे पिलापाशी
तळावरच राहू द्यावं विमान
आपला देश नि आपलंच इमान
सांगू नका पेंड खातंय घोडं
बदलू द्या देश,
जाऊ द्या पुढं
‘मन की बात’चं एक म्हणणं
लई न्हाई राव आमचं मागणं
नको नको लाखांच्या बाता
दिल्या वचनांची करी पूर्तता
‘अच्छे दिन’ची हवीय हमी
आशाळभूत एक ‘आम आदमी’
--------
(पूर्वप्रसिद्धी - दैनिक सकाळ, 23 मे 2016)
(व्यंग्यचित्र सौजन्य – श्रेयस नवरे, ‘हिंदुस्तान टाइम्स’)
शुक्रवार, २० मे, २०१६
विचित्र विश्व!
लिहायला-वाचायला शिकल्यापासून पेपर वाचायला लागलो की, पेपर वाचायला लागल्यापासून लिहायला-वाचायला
शिकलो, हे आठवणं अंमळ कठीणच आहे. कळतंय तेव्हापासून वाचतोय.
पण वाचतोय तेव्हापासून कळतं आहेच, असं अजाबात नाही. सदर
लेखकाची (म्हणजे सदर ‘सदर’ नव्हे,
तर हा मजकूर लिहिणारा लेखक, सदर इसम या
अर्थाने!) हीच गोची आहे.
अस्मादिकांना लहानपणापासून पेपर वाचण्याची फार्फार आवड. पण
त्यातील अग्रलेख, लेख, स्फुटे, क्रीडा, अर्थव्यवहार आदी विषयांत आम्हाला कधीच रस नव्हता. राजकारण चुलीत जावो नाही
तर (विनाअनुदानित) गॅसच्या शेगडीवर होरपळो; त्याच्याशी देणे-घेणे
नाहीच! हटके बातम्या हीच खरी आपली आवड. उदाहरणार्थ – ‘शेळीने
दिला चार करडांना जन्म’, ‘नागाच्या डोक्यावर बसला उंदीर’,
‘पपईत दिसला गणपती’, ‘दुधी भोपळ्यात आढळला
मारुती’ इत्यादी इत्यादी बातम्या आम्ही चवीनं चाखत (आय मीन
वाचत...) आलो आहोत. हल्ली हल्ली तर ‘बाईने दिला मुलीला जन्म’
अशीही बातमी चौकटीत वाचायला मिळते की काय, असे
वाटू लागले होते. ‘नारळात सापडला मोदक’ ही बातमी वाचल्यावर दिवसभर विचार करीत राहिलो. मोदकाच्या आत खोबऱ्याचे
सारण असते. मग इथे त्या नारळात मोदक कसा? आणि त्याचा
अतिविचार केल्यामुळे डोकं दुखू लागलं. नशीब. हे कुणा पत्रकाराला कळलं नाही. नसता
दुसऱ्या दिवशी वन पॉइंट ब्ल्याक रुळाच्या चौकटीत ‘नसणाऱ्याचेही
दुखू लागले डोके’ अशी बातमी आली असती!
मध्यंतरी माध्यमक्रांती झाली. मोबाईल आले, मग ते स्मार्ट (आता
ओव्हरस्मार्ट!) झाले, महाजाल आले. या साऱ्यामुळे
आमच्यासारख्या वाचकाची फार सोय झाली. अशा असंख्य बातम्या फुकटात मिळू लागल्या. ‘जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीताचे युनेस्कोचे बक्षीस भारताला’, ठणठणीत असलेल्या (आणि एवढ्यात ईहलोक सोडण्याची शक्यता नसलेल्या) माणसाला ‘आरआयपी’ अशी अल्पाक्षरी सामुदायिक आदरांजली, सिनेमाच्या कोटी-क्लबाच्या कोट्या... अशा बातम्यांमुळे टाईमपास होतो.
माहितीत उत्तम भर पडते. कट्ट्यावरच्या गप्पा गाजवायला, फॉरवर्ड
करायला संबंधित मजकूर उपयुक्त ठरतो. आपण ‘अपडेट’ असल्याचा भास होतो. ज्ञानसंपन्न होणे याला आमचे कधीच प्राधान्य नव्हते.
माहितीसंपन्न असणे आधुनिक जगात आवश्यक आहे, यावर आम्ही ठाम
आहोत.
इंटरनेटमुळे तर ‘पाँचो ऊँगलियाँ घी में’ असेच प्रत्ययास येऊ लागले. फेसबुकावर जाऊन सुंदर सुंदर चेहरे न्याहाळत लाईकचे बटन क्लिकत असताना भिंतीवर बाजूला अशा बातम्यांकडे खेचणाऱ्या पोस्ट असतात. एकदा तुम्ही एकावर क्लिकले की, दुसऱ्या दिवसापासून रतीब सुरूच होतो. वाच लेका किती वाचतोस ते. बघ लेका किती बघतोस ते. (आणि बघतोच, या महापुरातून कसा वाचतोस ते!)
पण या मोहाकडे आम्ही पाठ फिरविली. (जशी कार्यालयात जबाबदारीकडे अत्यंत जबाबदारीने फिरवितो तशी!) त्याऐवजी आम्ही ‘bizarre news’ या इ-नियतकालिकाचे वर्गणीदार झालो. (त्याची विपत्रे नियमित आणि मोफत मिळतात म्हणूनच!) आता ‘bizarre news’ देवनागरीत कसे खरडावे, हे भरपूर प्रयत्न करूनही न समजल्याने आम्ही ते शब्द तसेच ठेवले आहेत. आमचे हे अज्ञपण सुज्ञांच्या ध्यानी आले असेलच.
ते सोडा. या इ-नियतकालिकांकडून नियमित येणाऱ्या बातम्या आमची
माहितीची भूक उत्तमप्रकारे भागवितात, हे आवर्जून सांगितलेच पाहिजे. उदाहणार्थ - लास वेगासमध्ये
फिरणाऱ्या एका पाहुण्याच्या डोक्यावर धारांचा वर्षाव झाला, पाऊस
आला या आनंदात तो फेसबुकावर टाकण्यासाठी कविता रचण्याचे मनात आणत होता. तेवढ्यात
त्याला कळले की, त्याची पावसाची शंका योग्य नसून, एका पोट्ट्याने केलेली ती लघुशंका आहे. आणखी एक म्हणजे कॅनडाच्या
पोलिसांनी अग्निशामक दलातील एका जवानास अटक केली. एका गावात लागलेल्या एकोणीसपैकी 18 आगी लावण्यात (आणि नंतर विझविण्यात) त्याचाच हात होता म्हणे!
फ्लोरिडामध्ये पिस्तूल साफ करता करता गोळी उडून एक तरुण जखमी झाला. आणि ते
त्याच्या दोन दिवसांनंतर लक्षात आले ते शर्ट बदलताना. त्याचे नाव ‘संजूबाबा’ वगैरे होते का, याचा
तपशील त्यात नाही. ‘कॉर्न ऑन द कॉब चॅलेंज’मध्ये भाग घेणाऱ्या एका चिनी महिलेला थोडे टक्कल कसे पडले, विस्कॉनसिन नदीत मासेमारी करणाऱ्या एकास 60
वर्षांपूर्वीचे बीअरचे कॅन कसे सापडले आणि ते रिकामेच आढळल्यावर त्याला कशी हळहळ
वाटली...
पण एवढ्या सगळ्या बातम्या (नियमित) वाचताना एक खंत मनात होतीच.
या साऱ्या (विचित्र) विश्वाच्या नकाशावर भारताचे नाव औषधालाही सापडत नाही. पण
गेल्याच आठवड्यात ती दूर झाली. वैद्यकशास्त्राच्या मदतीनं दलजिंदरकौर यांनी
बाहत्तराव्या वर्षी आई होण्याचं सुख अनुभवलं. त्यांचे पती मोहिंदरसिंग गिल 79 वर्षांचे आहेत.
... गेल्या आठवड्यात ही बातमी वाचली आणि आपला देश कशात आणि
कुठेच मागे नाही, याचा पुन्हा एकदा अभिमान वाटला. ‘... की जय!’ असे किंचाळण्याचा हुरूप आम्हास नव्याने
आला. तूर्त, असो!
---
(पूर्वप्रसिद्धी - दैनिक सकाळ, 19 मे 2016)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
मुसाफिर हूँ यारों...
ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...
-
रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं !...
-
वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून (मराठी) वृत्तपत्रं वाचतो आहे. पोटासाठी म्हणून २८ वर्षं वृत्तपत्रातच काम करतो आहे. कुणी तरी काम करताना द...
-
अशोक... 'फोन वाजला की भीतीच वाटते. सध्या जगणं म्हणजे अगतिकता, अस्थिरता, अस्वस्थता एवढंच आहे.' व्हॉट्सॲप मेसेजमध्ये स्वातीताईंनी लिहि...
-
शे गाव ! तीर्थक्षेत्र शेगाव. गजाननमहाराजांचं शेगाव. हजारो भाविक-भक्त असोशीनं तिथं जातात , जाण्याची आस बाळगून असतात ते शेगाव. शेगावला ज...
-
अँड्र्यू लिलिको (छायाचित्र सौजन्य - http://www.europe-economics.com ) ' आ मच्याकडील, ब्रिटनमधील निकषांनुसार हे अगदी सर...