बिकानेरला जाताना मध्य प्रदेशातील नयागांव येथे चहासाठी थोडाच वेळ थांबलो. पण तेवढ्या वेळात लक्ष वेधून घेतलं भाज्यांनीच. |
ह्या प्रश्नाला बहुतेकांचं उत्तर 'रविवार' येईल. बहुदा हे माहीत असल्यामुळंच उमाकांत काणेकर ह्यांनी गाणं लिहिलंय पूर्वी - 'रविवार माझ्या आवडीचा...' बच्चेकंपनीप्रमाणं मोठ्यांचीही ही आवड आहे, ह्यात नवल नाही. त्याच्या मागचं कारण साधं-सोपं आहे. तो अनेकांच्या सुटीचा वार असतो. साप्ताहिक सुटी. आठवडाभर काम केल्यानंतर (किंवा तसं केल्याचं साहेबाला दाखवल्याची कसरत आठवडाभर केल्यानंतर) येणारा हमखास विश्रांतीचा दिवस. असं आवडत्या वाराबद्दल आजपर्यंत तरी कुणी विचारलेलं नाही. समजा, कुणी ते काढून घेण्याचा प्रयत्न केलाच, तर सांगीन, 'आधी शुक्रवार आणि आता मंगळवार.' हे दोन्ही देवीचे वार. तुळजाभवानीचे आणि जगदंबेचे. इतक्या वर्षांच्या आणि तीन-चार वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये ह्या दोन वारांना साप्ताहिक सुटी कधीच आली नाही. त्या दिवशी कधी लॉटरी वगैरे लागलेली नाही. आयुष्याला फार मोठी (सुखद) कलाटणी ह्याच दोन वारी कधी मिळाली, असंही काही घडल्याचं आठवत नाही. तरीही ते सुखाचे वार. होते, आहेत आणि असतीलही...
आधी शुक्रवार आणि अलीकडच्या काही वर्षांत मंगळवार हे महत्त्वाचे दिवस ठरले, त्याचं कारण राहत असलेल्या गावात-शहरात त्या दिवशी असलेला आठवडे बाजार. बाजाराचा दिवस म्हणजे मंडईचा दिवस.
जिवंत चित्र. सळसळता उत्साह
मंडई! शब्द नुसता ऐकला की, डोळ्यांसमोर उभं राहतं एक जिवंत चित्र. सळसळता उत्साह. दिसू लागतात हिरव्यागार, ताज्या ताज्या, कोवळ्या भाज्यांचे ढीग. स्वस्त नि मस्त भाज्या. जाणवते तिथली दाटी. ऐकू येतं भाजीवाल्यांचं ओरडणं. भरपूर पायपीट करायला लावणारं, बोलायला लावणारं, 'घेता किती घेशील दो करांनी...' अशा संभ्रमात पाडणारं, 'जड झाले ओझे...' म्हणायला भाग पाडणारं ठिकाण म्हणजे मंडई. तिथं रंगांची उधळण पाहायला मिळते. ओलसर ताजा वास छाती भरून टाकतो. माणसांचे हर तऱ्हेचे नमुने तिथं अगदी सहज दिसतात.
आपल्याकडे मंडई म्हणजे भाजीबाजार. शब्दकोशही तेच अर्थ सांगतात. मॅक्सिन बर्नसन ह्यांच्या शब्दकोशात मंडईचा अर्थ दिला आहे 'भाजीबाजार.' मोल्सवर्थ अधिक चित्रमयरीत्या तो अर्थ सांगतो. तो मंडईला 'A green market' म्हणतो. भाज्या आणि फळांची ठोक पद्धतीने विक्री होणारं शहरातलं स्थान, अशी मंडईची व्याख्या त्याच्या शब्दकोशात दिली आहे. 'भाजीपाल्याची जेथें मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते असें शहरांतील ठिकाण; भाजीपाल्याचा बाजार' म्हणजे मंडई, असं महाराष्ट्र शब्दकोशात (यशवंत रामकृष्ण दाते) सांगितलं आहे. उत्तर भारतात मात्र तसं नाही. तिथं अनेक प्रकारच्या 'मंडी' आहेत - अनाज मंडी, फल मंडी, कपास मंडी. आपण ज्याबद्दल बोलतोय ती सब्जी मंडी. 'मंडी' म्हणजे त्यांच्यासाठी बाजार. कानपुरात तर म्हणे 'कपड़ा मंडी'ही आहे.
शाळकरी वयात असल्यापासून ह्या स्थलमाहात्म्यानं भुरळ घातलेली आहे. एखादी भाजी खायला नकार असेल, पण भाजी आणायला तो कधीच नसतो. मंडईत जाऊन भाज्या पाहणं, शेलक्या भाज्या निवडणं, भाव करणं हे आवडीचं काम. करमाळ्याच्या मध्य वस्तीत असलेली मंडई मोठी छान होती. प्रशस्त जागेत असलेल्या ह्या मंडईला छान भिंतीचं संरक्षण होतं. तिच्या चारही दिशांना दारं होती. पश्चिमेच्या दारातून शिरलं की, समोर श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिराची सुबक इमारत दिसायची. तिथंही वर्दळ असायची; पण मंडईएवढी नाही. करमाळ्याचा बाजार शुक्रवारचा. त्या दिवशी मंडई चारही बाजूंनी भरलेली दिसायची. एरवी दक्षिण दिशेला, पूर्वेला फार कोणी नसायचं. शुक्रवारी मात्र रस्त्यावरही विक्रेते बसलेले. उत्तर आणि पूर्व दिशेला विक्रेत्यांसाठी बांधलेले ओटे. ते बहुतेक बागवानांच्या ताब्यात. बाकी शेतकरी विक्रेते खालीच बसलेले दिसत. गावोगावच्या मंडयांचं नामकरण झालेलं असतं. श्री संत सावता माळी, महात्मा फुले ह्यांची नावं प्रामुख्यानं दिसतात. करमाळ्याची मंडई मात्र अनामिक होती. अलीकडच्या काळात तिचं बारसं झालेलं असेल, तर माहीत नाही.
पावट्याच्या शेंगा सोलण्याचं काम किचकट. ते चिकाटीनं केल्यावर चविष्ट उसळ खाण्याचा योग असतो. |
तालुक्याच्या गावागावांतून शुक्रवारी भाजी विकायला शेतकरी यायचे. गवार, भेंडी, दोडके, वांगी, मेथी...अशी भाजी असायची. कोबी, फ्लॉवर ह्या शहरी भाज्या मानल्या जात. दुर्मिळ असत. कोबी तेव्हा श्रीमंतांची भाजी होती, हे आज खरंही वाटणार नाही. बहुतेक भाज्या देशी, गावरान असायच्या. गवार, वांगी, काकडी गावरान आहे, असा प्रचार विक्रेत्यांना करावा लागायचा नाही. कारण भाज्यांचं संकरित बियाणं गावोगावी पोहोचायचं होतं. भाजीपाला हे शेतीतलं, शेतकऱ्यांचं मुख्य उत्पन्न नव्हतं. तो माळवं घ्यायचा, जमेल तसं विकायचा, ते तेल-मीठ-मिरचीच्या खर्चासाठी. आठवड्याची हातमिळवणी करण्यासाठी.
काटेरी वांगी नि कोवळी गवार
एरवी कधी भाजी आणायला गेलो की नाही, हे आठवत नाही. शुक्रवार मात्र चुकवला नाही. त्या दिवशीची हमखास खरेदी म्हणजे छोटी-छोटी काटेरी वांगी. नुसत्या तेलावर परतावीत अशी. बोटानं मोडली तरी तुकडा पडेल अशी कोवळी गवार. गावरान गवार. निवडताना खाज सुटणारी. शनिवारी सकाळचा जेवणाचा बेत नक्की असायचा. भरलेली वांगी किंवा गवारीची भरपूर कूट घालून केलेली भाजी. वांग्याला सोबत भाकरीची नि गवारीला चपातीची. ही गवार खूपच कोवळी असली, तर तिची नुसती परतूनही भाजी फर्मास होई. अशी ही गवार सहसा कोणत्या हॉटेलात का मिळत नाही?
करमाळ्यानंतर पाहिलेली मंडई म्हणजे पुण्याची. पुण्याची मंडई थोरच. तिला तर साक्षात विद्यापीठाचा दर्जा! तिथं फार वेळा गेलो नाही. ह्या मंडईच्या बाहेरच्या 'मार्केट हॉटेल'नं अनेक रात्री पोटाला आधार दिलाय. त्याच्या जवळच रात्रभर खन्नाशेट पत्रकारांना घेऊन मैफल रंगवत असायचे. ह्या मैफलीत दोन-तीन वेळाच सहभागी झालो असेन, तेही थोडं कडेकडेनेच. बाजीराव रस्त्यावरून मंडईच्या दिशेनं जायला लागलो की, अनेक छोटे छोटे भाजीविक्रेते बसलेले दिसतात. त्यांच्याचकडून बऱ्याच वेळा भाजी घेतली. पुण्यातली लक्षात राहिलेला भाजीबाजार म्हणजे डेक्कन कॉर्नरचा. विमलाबाई प्रशालेच्या बसथांब्यापासून गरवारे पुलापर्यंतच्या भाजीविक्रेते बसलेले असायचे. बसथांब्याजवळ पौ़ड आणि जवळपासच्या गावांतून आलेले शेतकरी विक्रेते. त्यांच्याकडे ताज्या पालेभाज्या छान मिळायच्या. दीक्षितांच्या 'इंटरनॅशनल'जवळच्या एक आजीबाई अजूनही लक्षात आहेत. त्यांच्याकडे मिरची, कोथिंबीर आणि आलं एवढंच मिळायचं. त्याचे वाटे करून ठेवलेले. मिरचीचा एक वाटा घेतला की, त्यात त्या दोन-चार हमखास वाढवून टाकायच्या.
काकडी आणि मटार ह्यासाठी पुणे फार आधीपासून लक्षात राहिलेलं आहे. काकडी म्हणजे आमच्याकडे हिरव्यागार लांबलचक नि जाडजूड. पुण्याची मावळी काकडी म्हणजे छोटी. दोन घासांत संपवता येईल, अशी. पुण्यात असताना कधी मटार किंवा काकडी मंडईतून आणल्याचं मात्र आठवत नाही. आता काकड्या उदंड झाल्या. नगरला बाराही महिने काकडी मिळते. तिचे भाव तीन वर्षांत अगदी कमाल म्हणजे ४० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मध्यंतरी एका विक्रेत्याकडे काकडी दिसली. सगळी साधारण एकसारखीच. गुळगुळीत दंडगोलासारखी. कुठेही बाक न आलेली. वेगळी दिसतेय म्हणून आणली. खाल्ल्यावर लक्षात आलं फसलो! तिला काही चवच नाही. मग कळलं ती म्हणे हरितगृहात पिकवलेली. निगुतीनं वाढवलेली. मग कधी तरी वाचलेलं आठवलं की, हाताची पाचही बोटं सारखी नसतात, तसं निसर्गातही एकसमान काही नसतं. एकाच रोपाची वांगी वेगवेगळ्या आकाराची असतात. काही लहान, मोठी. काही गोल, तर काही उभट. काही किडलेली, तर काही किडीला हरवून वाढलेली. म्हणून तर सगळं काही सारखं असावं, ह्याचा आग्रह धरायचा नाही. थोडं कमी, थोडं जास्त असणारच. समानता दिसली म्हणजे समजावं की, निसर्गनियमांत कुणी तरी हस्तक्षेप केलेला आहे. तो कधी माणसाचा असतो, कधी त्यानं थोडं अधिकच फवारलेल्या औषधांचा.
भाजीविक्रेत्यांचा चितळे रस्ता
पुण्याहून नगरला आलो. इथं मंडया भरपूर आहेत आणि त्या नावालापुरत्याच आहेत. हे कागदोपत्री महानगर असलं, तरी व्यवहार अगदी अस्सल नगरी! रावबहादूर चितळे ह्यांचं नाव दिलेला रस्ता प्रामुख्यानं भाजीविक्रेत्यांसाठीच आहे. तिथली नेहरू मंडई नावापुरती होती. ती मागेच पाडूनही टाकली. गंजबाजारातही मंडई आहे. तिथं मात्र विक्रेते असतात. कारण बाहेरच्या बाजूला भाजी विकायला बसावं अशी जागाच नाही. निव्वळ नाइलाज! वाडिया पार्कचं भव्य आणि निरुपयोगी स्टेडियम बांधून होण्याच्या आधी तिथल्या महात्मा गांधी उद्यानात भाजी बाजार स्थिरावला होता. तिला मंडई नाही म्हणता येणार. दर मंगळवारी तिथं तोबा गर्दी असायची. आजूबाजूच्या खेड्यांतून बरेच विक्रेते यायचे. आम्ही काही पत्रकार मैदानावर सकाळी क्रिकेट खेळायला जात होतो बरेच दिवस. तासभर खेळून झालं की, राम पडोळेच्या 'चंद्रमा'मध्ये चहा पिता पिता दीड तास जाई. मग भाजीची खरेदी. माझ्यामुळं तिथं भाजी घेण्याची सवय दोन-चार समव्यावसायिकांना लागली. त्यासाठी त्यांच्या गृहमंत्र्यांनी मला नक्कीच दुवा दिला असेल तेव्हा. नगर-मनमाड रस्त्यावर नागापूर औद्योगिक वसाहत आहे. तिथं संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेने भाजीवाले दिसतात. एखादा किलोमीटर अंतरात असतात ते. सावेडी भागातही असाच मोठा भाजीबाजार राहतो. ह्या सगळ्यांमुळे नगरकरांची चांगली सोय होत असली, तरी वाहतुकीच्या कोंडीची तक्रारही नेहमीच होते. चितळे रस्त्यावरची भाजीविक्रेत्यांची 'अतिक्रमणे' हटवण्याची कारवाई किती वेळा झाली असेल, ह्याची गणतीच नाही. 'चितळे रस्त्यानं घेतला मोकळा श्वास' अशा बातमीच्या शीर्षकाची शाई वाळत नाही, तोवर गुदमरायला सुरुवातही झालेली असते.
मंडईत जायचं, घरच्यांनी दिलेल्या यादीबरहुकुम भाजी घ्यायची, पैसे मोजायचे नि चालू पडायचं, अशा पद्धतीनं भाजी घेण्यात मजा नाही. सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास मस्त चहा-पाणी करून घराबाहेर पडावं. नाश्ता झालेला असेल तर उत्तमच. सोबत दोन दणकट पिशव्या असाव्यात. भाजीची यादी वगैरे करू नये. फक्त घरून सांगितलेल्या भाज्या न विसरण्याची काळजी घ्यावी. कुणी जोडीदार असेल तर उत्तमच. मंडईत गेल्यावर आधी एक चक्कर मारून यावी. कोणत्या भाज्यांची आवक किती आहे, त्यामुळे त्या कितपत स्वस्त मिळतील ह्याचा अंदाज त्यामुळे येतो. नेहमीच्या भाजीविक्रेत्या ताई-मावशी-मामा ह्यांच्या हाकेला हातानेच 'येतो परत' अशी खूण करत प्रतिसाद द्यावा. मग कुणाकडे काय घ्यायचं, हे ठरवून त्याप्रमाणे खरेदी करावी. कधी तरी आपण घेतलेली भाजी कोपऱ्यात बसलेल्या मावशीकडे फार चांगली नि स्वस्त असल्याचं समजतं. अशा वेळी फार हळहळ करत बसू नये. संपवायची ताकद असेल, तर तिथनंही घ्यावी ती. दोन्ही पिशव्या भरगच्च झाल्या, खिसा थोडा हलका झाला की, समाधानानं मंडईतून निघावं. एक-दोन भाज्या हव्या असूनही घेता आल्या नाहीत, ह्याची थोडी हळहळही वाटत राहावी.
'भाजीला आणायला निघालो/निघाले', 'भाजीला आणलं' हे प्रचलित नगरी शब्दप्रयोग आहेत. तर अशा ह्या भाजीला आणणाऱ्यांचे प्रामुख्याने तीन ढोबळ प्रकार दिसतात. ठरलेल्या विक्रेत्याच्या दुकानापुढे उभं राहायचं. भाजी पाहायची नि ही अर्धा किलो, ती एक किलो दे आणि 'हो लिंबं-मिरचीही टाका' असं फर्मान सोडायचं. तोलून दिलेली भाजी पिशवीत घ्यायची आणि विक्रेता सांगील तेवढे पैसे द्यायचे. गाडीला लाथ मारून लगेच पसार. ह्या वर्गातली मंडळी भाजीकडं आपुलकीनं, चिकित्सकपणे पाहत नाही. तिला हाताळत नाहीत की कौतुकानं पाहत नाहीत. भाव एवढा (कमी किंवा जास्त) कसा, असा प्रश्न त्यांना पडत नाही. ते भाजी निवडून घेत नाहीत. शेलकं तेच मिळेल, अशी त्यांची खातरी असते.
दुसरा वर्ग असतो तो हिंडून चार ठिकाणी भावाची चौकशी करून भाजी घेणारा. तो दर्जा आणि भाव ह्यातला समतोल साधत असतो. प्रसंगी मापात एखादं वांगं किंवा कारलं जास्त टाकावं म्हणून सांगत असतो. भावाची शक्य तेवढी घासाघीस करत असतो. ग्राहकांचा शेवटचा प्रकार म्हणजे बरंच हिंडून, मोजकीच भाजी घेणारा. तो सतत बजेट तपासत असतो. भरपूर घासाघीस करणारा हा ग्राहकवर्ग आर्थिकदृष्ट्या गरीबच असतो, असं काही मानायचं कारण नाही. घासाघीस करणं, त्यात विजय मानणं ही त्याची वृत्ती असते. आता ह्या साऱ्यांमध्ये उपप्रकार असतातच.
ह्यातल्या कोणत्या प्रकारात अस्मादिक मोडतात, ह्याचा अंदाज लेख पूर्ण वाचूनच करावा. वाढपी ओळखीचा असल्यावर पंगतीत फायदा होतो म्हणतात. अगदी तसंच मंडईतही असतं. भाजीवाली मावशी, मामा, दादा ओळखीचा असणं चांगलंच असतं. एखादी कमी उपलब्ध असलेली, ठरावीक हंगामातच येणारी भाजी ते आठवणीनं आणतात आणि तुमच्यासाठी राखून ठेवतात. त्यामुळंच मी दलालांऐवजी शक्यतो शेतकऱ्यांकडूनच भाजी घेतो. ओळखीच्या भाजीवाल्या ताईंना एकदा शेवग्याचा कोवळा पाला आणायला सांगितला. पुढच्या आठवड्यात त्यांनी एवढी पानं आणली की, ती न्यायची कशी असा प्रश्न. पुढं तो घरी आणल्यावर 'हा ढीगभर पाला खायला एखादी शेळी का नाही आणली?' असा टोमणा! त्याच ताईंनी एकदा पाथरीची भाजी आणली. तिला त्या बावन्न गुणांची भाजी म्हणत होत्या. शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यास ती उपयोगी आहे म्हणतात. तिलाही माझ्याशिवाय कुणी वाली नव्हता.
भाज्या घेताना घासाघीस करायची नाही, असं पूर्वी कधी तरी ठरवलं आहे. ठरवलेलं पाळलंच जातं, असं फार थोडं. पण त्यात हे आहे. एखादी भाजी महाग वाटली, तर ती त्या दिवशी घेणं टाळायचं. पण घासाघीस करायची नाही. केळी आणि हंगामी फळं विकणाऱ्या दोन आजीबाई अशाच ओळखीच्या झाल्या. त्या सांगतील त्या दरानं आणि त्या सांगतील तेवढी फळं घ्यायची. त्यांचं ऐकल्याचं फळ चांगलंच मिळतं!
नेहमीच झुकतं माप
आणखी दोन-तीन गोष्टी पाळल्यामुळं भाजीखरेदी कायम आनंदाची होती. विक्रेत्यानं सांगितल्यावर 'काही कमी-जास्त नाही का?' असं हटकून विचारायचं. मग काही वेळा 'श्री ४२०'मधल्या राज कपूरच्या भूमिकेत जायचं. भाजी २० रुपये अर्धा किलो सांगितल्यावर विचारायचं २५ रुपयांनी नाही का देणार? मग ती मावशी किंवा मामा मनापासून हसतात. त्यांच्याकडून मग नेहमीच वाजवी भाव लावला जातो. हेच मापाबाबत पाळायचं. भाजीवाल्यांचं माप नेहमीच झुकतं असतं. पारडं फारच झुकायला लागलं, तर आपणच 'बास बास! किती टाकताय? माप झालं की...' असं म्हटल्यावर मामा-मावशीच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसून येतंच. माप झाल्यावरही दोन भेंड्या, एक वांगं टाका म्हणणारी गिऱ्हाइकं त्यांच्या सवयीची असतात. 'मापात पाप नको', 'आपलं शेतकऱ्याचं माप असं असतंय...', 'राहू द्या की दोन जास्त...' असं म्हणणारेच दिसतात. ठरलेल्या भावापेक्षा मी रुपया-दोन रुपये जास्त देणार आहे का, असं विचारल्यावर त्याचंही उत्तर निर्मळ हास्यातून मिळतं.
मंडईत गेलं, दिसेल ती भाजी घेतली, पैसे मोजले, की आपलं काम संपलं, ही काही भाजी खरेदीची योग्य पद्धत नाही. भाज्या आणताना आपण काय घेतो, ह्याचं भान ठेवावंच लागतं. अंबाडीची कितीही कोवळी जुडी दिसली, तरी ती पटकन घेऊन चालत नाही. आधी मेथीच्या बारीक पानाच्या, बुटक्या रोपांच्या दोन जुड्या घेतल्यात. घरी हवा म्हणून पालकही घेतलेला आहे, ह्याचं भान ठेवावं लागतं. मुगाच्या शेंगा घेतल्यावर चवळीकडं ढुंकूनही पाहायचं नाही. मटार (नगरमधलं प्रचलित नाव 'वटाणा') घेतल्यावर फ्लॉवरचा एखादा गड्डा असू द्यावा. तुरीच्या आणि पावट्याच्या शेंगा घेतल्यावर त्या आपल्यालाच सोलायच्या आहेत, हे मनाला बजवावं लागतं. त्यामुळे अर्ध्याऐवजी एक किलो घेण्याचा मोह टळतो. काळ्या मसाल्याची भरून करायची म्हणून छोटी, काटेरी वांगी घेतल्यावर भरताची वांगी कितीही चांगली दिसली, तरी त्यांना त्या दिवसापुरता टाटा करायचा असतो. नसता घरी आपलंच भरीत होण्याची भीती असते. दुधी भोपळा, डांगर, चक्की अशी फळं एकाच वेळी कधीच घ्यायची नसतात. कारण त्या खरेदीचं केलेलं समर्थन अंतिमतः निष्फळच ठरणार असतं. अळूची गड्डी घेतल्यावर चुक्याची जुडी घेणं अनिवार्य असतं. पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या नि फळभाज्या ह्याचा समतोल साधला गेलाच पाहिजे. कालच्या जेवणात कोणती भाजी होती, हेही लक्षात राहात असेल तर बरंच. लिंबू, मिरची आणि कोथिंबीर घ्यायला विसरणं, ह्यासारखा दुसरा गुन्हा नाही! कारण खुद्द संत सावता माळी ह्यांनी सांगितलेलं आहे -
लसुण-मिरची-कोथिंबिरी। अवघा झाला माझा हरीं।।
भाज्यांची मापंही ठरलेली असतात. पालेभाज्यांची जुडीच असते किंवा वाटा असतो. क्वचित एखादीच पालेभाजी वजनावर विकली जाते. कांदे-बटाटे किंवा मटार कुणी पाव किलो मागताना दिसत नाही. ते किलोनेच घ्यावे लागतात. अळूची पानं कितीही स्वस्त असली, तरी त्याच्या अर्धा डझन जुड्या घेण्यात काही गंमत नसते. कोथिंबीर हिरवीगार, ताजी दिसली तरी तिच्या फार तर दोन जुड्या घ्याव्यात. कोथिंबीर वडीचाच बेत असेल तर गोष्ट वेगळी. पुण्यात मध्यंतरी आदेश काढण्यात आला होता की, पालेभाज्याही किलोवरच विकल्या जाव्यात. त्याची अंमलबजावणी काही झाली नाही. आलं, मिरच्या ह्यांचे पूर्वी वाटे विकले जायचं. फार झालं तर त्याची मागणी छटाक-दोन छटाक (पन्नास किंवा शंभर ग्रॅम) अशी मर्यादित असे. अलीकडे मिरच्या नि आलंही पाव-पाव किलो सहज घेतलं जातं. आपलं स्वयंपाकघर जास्त मसालेदार नि तामसी होत चालल्याचंच हे लक्षण. लसणाचंही तसंच. तो किलो-किलोनेच घेतला जातो. लिंबं पूर्वी नगावर मिळत. आता ती तोलून घ्यावी लागतात. डाळिंब, संत्री, मोसंबी ही फळंही वजन करूनच मिळतात. केळी आजही डझनावर दिली जातात. पण दक्षिणेतून येणारी बुटकी, पातळ सालीची केळी किलोच्या मापात घ्यावी लागतात. कलिंगड नगावर मिळतं, पण खरबुजाचा प्रवास वजनकाट्यातून होतो.
परवलीचा शब्द - गावरान
'गावरान' हल्ली मंडईतील परवलीचा शब्द बनला आहे. गावरान म्हणजे देशी वाण. छोट्या कांद्याएवढा दिसणारा लसूण गावरान आहे, म्हणून सांगितला जातो. लांबलचक हिरवीगार गवारीची शेंगही गावरान आहे, असं भाजीवाले सांगतात. मेथी गावरान असेल तर ती बुटकी असते. तिची पानं लहान आणि चवीला कडवट असतात. अळूची पानं फताडी नसतील, तरच गावरान. जाडजूड फोपशी आणि लांबलचक शेवग्याची शेंग गावरान नसण्याचीच शक्यता अधिक. गावरान भेंडी आता क्वचित पाहायला मिळते. तिच्या अंगाला काटे असतात आणि चिकट असल्यामुळे तिची भाजी करण्याचं काम चिकाटीचंच!
मंडयांचाही एक नूर असतो. बाजाराच्या दिवशी तो अधिक स्पष्टपणे जाणवून येतो. सकाळी आठ-नऊच्या सुमारास तिला नुकतीच कुठं जाग येऊ लागलेली असते. शेतकरी येत असतात, सोयीची जागा शोधत असतात. एखादी जागा बरी वाटली त्यांना, तर तिथून नेहमीची मंडळी उठवत असतात. मंडईत कायमस्वरूपी दुकान थाटलेल्या मंडळींचा माल ठोक बाजारामधून टेम्पो-रिक्षा ह्यातून येताना दिसतो. दहानंतर सूर जुळायला सुरुवात होते. मोठ्या संख्येने ग्राहक यायला सुरुवात होते. त्यात घरातले कर्ते, गृहिणी असतात, सख्ख्या शेजारणी मिळून आलेल्या असतात. काही आजोबा नातवंडांना बाजार दाखवायला घेऊन येतात. पण हल्ली ते चित्र दुर्मिळच. नातवंडं आजी-आजोबांना गाडीवरून सुळकन येऊन सोडून जातात आणि परत घेऊन जायला कधी येऊ असं विचारून तसंच वेगानं भुर्र होतात.
गर्दी, भाव, विक्री, आवक हे सारं नंतरचे दोन-तीन तास चरम सीमेवर असतं. साडेबारा-एकनंतर मंडई थोडी आळसावते. मंडळी जवळच्या शिदोऱ्या सोडतात. नेहमीचे विक्रेते घरून आलेल्या डब्यात जेवायला काय आहे ते पाहतात. कुणी तरी तिथलाच कांदा फोडून घेतो. कोणी एखादी मिरची कचकन् दाताखाली चावून जेवणाची मजा वाढवत असतो. इथून पुढचे दीड-दोन तास थोडे निवांत असतात. संध्याकाळी चारच्या सुमारास मंडईत पुन्हा हलचाल वाढते. ती संध्याकाळी साडेपाच-सहा वाजता दाटी होते. ऑफिसातून घरी परतणारे, सकाळी कामामुळं यायला न जमलेलं, थोड्या कमी दर्जाच्या राहिलेल्या भाज्या स्वस्तात मिळतील म्हणून आलेले कष्टकरी त्यात असतात. पण ही गर्दी सकाळसारखी ताजी टवटवीत नसते. तिला शिळेपण आलेलं असतं. काम पटकन उरकून जाण्याची घाई सगळ्यांनाच असते. कितीही पाणी मारलं तरी भाजी ताजी दिसत नाही तसं ह्या गर्दीचं असतं.
मंडईत बाजूला इतरही दोन-तीन दुकानं असतात. त्यातलं एखादं तरी सुक्या मासळीचं असतं. वाणसामान, मसाल्याचे पदार्थांचेही एक-दोन तंबू दिसतात. वडा-पावची एखादी गाडी बाजूला दिसते. चहावाला किटली आणि बुटकुले कागदी कप घेऊन सारखा फिरत असतो. बाजारकर वसूल करणारा महापालिकेचा कर्मचारीही सकाळी दिसतो.
भाजीबाजार रोजच्या आयुष्यात महत्त्वाचा असला तरी त्याला दुय्यम मानलं जातं. अन्य वस्तू खरेदी करताना दराबाबत कोणी कमी-जास्त करू लागलं की, दुकानदार फटकारतो, 'घासाघीस करायला ही काय भाजीमंडई आहे काय!' परवाच एक गमतीशीर अनुभव आला. चितळे रस्त्यावर नकली दागिने विकणाऱ्यानं स्टॉल थाटला होता. कानातलं, गळ्यातलं, हातातलं, चमकी-टिकल्या असं गृहिणी-उपयोगी साहित्य विकत होता. त्याच्या जवळ बसलेल्या महाविद्यालयीन वयाच्या भाजीविक्रेतीला काही तरी घ्यायचं होतं. भाव काही कमी नाही का, असं ती म्हणाल्याबरोबर तो फाटका विक्रेता म्हणाला, 'बाई, घ्यायचं तर घे. ही काही भाजी नाही भाव करायला...'
नारेश्वर (गुजरात) येथे नर्मदामय्याला भेटून परतताना घाटावर दिसली ही माउली. तुरीच्या शेंगा विकणारी. |
मंडई. पुण्यासारखं प्रत्येक गावातली मंडई म्हणजे विद्यापीठ नसेल. पण ती एक शाळा आहे, एवढं नक्की. काय खावं, केव्हा खावं हे शिकवणारी. बाजारभावाचा अंदाज देणारी. काय पिकतं नि काय विकतं हे सांगणारी. हिशेब करायला लावणारी, पण निव्वळ हिशेबी वागायला न शिकवणारी. शेतकऱ्याशी संबंध आणणारी. भाजी आता रोज मिळते. घरपोहोचही मिळते. मंडयाही भरलेल्या असतात. पण मंगळवार नि शुक्रवार माझे आवडते वार आहेत, ह्यावर त्याचा काही परिणाम होणार नसतो!
------------------------
(पूर्वप्रसिद्धी : 'शब्ददीप' दिवाळी अंक २०२१. आभार : श्री. प्रदीप कुलकर्णी व श्री. विनायक लिमये)
(छायाचित्रे : शब्दकुल)
....
#मंडई #भाजी #पालेभाजी #भाजी_मंडई #भाजीबाजार #शेतकरी #करमाळा #पुणे #नगर #गावरान #घासाघीस #vegetables #vegetable_market #green_market