रोज ठरल्यानुसार संध्याकाळी फिरायला चाललो होतो. ‘मॉर्निंग वॉक’ आपल्या नशिबात नाही. अरुणोदयाऐवजी सूर्यास्त पाहावा लागतो. संध्याकाळी तर संध्याकाळी. चालणं महत्त्वाचं.
घरातून बाहेर पडताना नेहमीप्रमाणं आरशात डोकावलं. नीटनेटकं असण्यापेक्षा लोकांचं लक्ष वेधलं जाईल, एवढा काही अवतार नाही ना, हे तपासलं. डोळ्यांवर चष्मा, खिशात पाकीट आणि मोबाईल आहे, ह्याची खातरी करून घेतली.
ह्यातला मोबाईल सोडला सोडला तर बाकीच्या दोन गोष्टी तशा अनावश्यक. लांबचं बघायला आता चष्म्याची गरज नाही. (टक्केटोणपे खाऊन ती दूरदृष्टी आली आहे!) चालायला जायचं म्हणजे काही घ्यायचं नसतं. म्हणून पाकीट आणि त्यात पैसे असणंही फार महत्त्वाचं नाही.
मोबाईल मात्र पाहिजेच. फार काही महत्त्वाचे फोन येतात म्हणून नाही. किती पावलं चालली त्याचं मोजमाप करण्यासाठी. साधारण दहा हजार पावलांचं लक्ष्य असतं. त्याची बॅटरी पुरेशी आहे ना, हे पाहिलं होतंच.
घराबाहेर पडलो. ‘कोणता रस्ता घेऊ आज पायी?’, अशी नेहमीसारखीच द्विधा मनःस्थिती झाली. मग ठरवून किल्ल्याकडे कूच केली.
जाताना डाव्या हाताला पुस्तकाचं दुकान लागलं. दुकानदारानं ओळखीचं हसू फेकलं नि खुशीत हातही हलवला. हसणं ठीक आहे; हात का हलवला बुवा? किस खुशी में?
मान खाली घालून चालू लागलो. आवश्यक असतं ते. नसता खड्ड्यांमधल्या रस्त्यावर उगीच पाय लचकायचा. नगरकरांचे ‘पाऊल वाकडे’ पडेल, ह्याची महापालिका पुरेपूर काळजी घेत असते. त्यामुळे ‘तू जपून टाक पाऊल जरा, रस्त्यावरून चालणाऱ्या नगरकरा’ हे आमचं जणू ‘राष्ट्रीय गीत’ आहे. जगातली सर्वांत अव्वल नंबरची महापालिका, असा काही ‘युनेस्को’नं अजून आमच्या महापालिकेचा गौरव केला नाही. त्या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या बहुसंख्या पालिका आहेत म्हणे.
चालताना उगीचंच जाणवत होतं, लोक बघताहेत आपल्याकडे. तो ‘सिक्स्थ सेन्स’ का काय असतो ना, त्यानुसारची जाणीव.
थोडं डावीकडे, थोडं उजवीकडे, थोडं सरळ पाहत चालत होतो. पुन्हा जाणवलं. येणारे-जाणारे आपल्याकडे बघताहेत. म्हणजे अगदी टक लावून नाही. पण न्याहाळतात.
शर्टची बटनं खाली-वर झालेली नाहीत ना? तपासून पाहिलं. खालची गुंडी वर नि मधलं काजं रिकामंच असं काही झालं नव्हतं. सगळं ठीकठाक.
दोन अवखळ कॉलेजकुमारी दुचाकीवरून बागडत चालल्या होत्या. माझ्या समोरून येत होत्या. जाणवलं की, त्या (आपल्यालाच!) न्याहाळताहेत. मागं बसलेलीनं तर बोट दाखवलं हो चक्क. खुसुखुसू हसल्या.
सुखावलो. म्हटलं वा! ही नव्या शर्टाची किमया दिसते. मग छाती किंचित बाहेर काढून आणि पोट शक्य तेवढं आत ओढून चालू लागलो. तसं करत चालणं एखाद्या मिनिटापेक्षा जास्त वेळ शक्य नव्हतं. पुन्हा नेहमीसारखंच खांदे पाडून, छाती आत घेऊन पदयात्रा चालू.
येणारे-जाणारे हळूच नजर टाकतच होते. त्यातले काही तर कुजबुजत होते, असा भास झाला. मग थोडी शंका आली. केस विस्कटलेले नाहीत ना, ह्याची खातरजमा केली. तरीही समाधान होईना.
चष्मा? जागेवर.
मोबाईल खिशातून डोकावतोय? नाही.
त्याचा टॉर्च चालूय का? बिलकूल नाही.
पँटची झिप? व्यवस्थित.
गर्दीचा चौक लागला. एरवी असतो तसा वाहतूक नियंत्रक दिव्यांखाली अंधार होता. पोलीसमामा होते. पायी चालणारे आम्ही काही जण शक्य तेवढं संकोचून पलीकडं जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे.
हवालदाराचं आमच्याकडे लक्ष गेलं. एका बाजूची वाहतूक एका हाताने थांबवून त्यानं आम्हा सहा-सात जणांना रस्ता ओलांडायची खूण केली. त्याच्या समोरून जाताना त्यानं एक प्रसन्न हास्य फेकलं.
पत्रकार असलो, तरी पोलिसांपासून कायम चार हात लांबच राहिलेलो. कधीही आत (म्हणजे पोलीस ठाण्यात!) गेलेलो नाही. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याशी, कर्मचाऱ्याशी घसट म्हणावी, अशी ओळख नाही. त्याची गरज भासली नाही. व्यावसायिकदृष्ट्या किंवा अन्य ‘उद्योगां’साठी म्हणूनही!
मग हवालदार का हसला? ओळखतो की काय आपल्याला? कसं काय बुवा? मनात पुन्हा शंका.
थोडंसं पुढे. एका उपाहारगृहासमोर स्कूटरवर एका दादामाणूस बसला होता. रस्त्याच्या जवळपास मधोमध. लेफ्ट ऑफ द सेंटरच म्हणा की!
असा दादामाणूस दिसला की, मनात घाबरायला होतं. तसं झालंही. त्याच्यासमोरून पार होण्यासाठी अर्धा मिनिट लागला. तो डोळे ह्या टोकाकडे त्या टोकाकडे फिरवून न्याहाळत होता. चेहरा निर्विकार. पण त्यामागचा थंडपणा जाणवत होता. आपल्याला ‘गिऱ्हाईक’ म्हणून बघतोय की काय? मन चिंती ते वैरी न चिंती!
आता निवांत रस्ता लागला. माणसांची गर्दी संपली. तरीही अधूनमधून दिसणारी माणसं मलाच पाहाताहेत, हे जाणवत राहिलंच.
थोडं पुढं गेलो. भीती दाखवून एक मोटर पुढं गेली. रस्त्याच्या कडेनंच चालत होतो. तो पार कडेला गेलो. ती चार चाकी पुढे जाऊन दहा-पंधरा फुटांवर थांबली. गाडीचं दार धाडकन् उघडून बाहेर पडलेल्या सद्गृहस्थानं हाक मारली.
मित्र होता तो. मला पाहून थांबला. खूप दिवसांनी दिसत होतो आम्ही एकमेकांना.
हातात हात मिळवत म्हणाला, ‘‘अरे, कुठंयस तू? फिरणं चालू का अजून?’’
चौकशी थांबवत मित्र म्हणाला, ‘‘तोंडाला काय बांधलंय ते? गेला कोरोना, अब डरो ना! काढून टाक मास्क तो. कुणी तरी घातलाय का? ‘हा कोण वेडा’ अशा नजरेनं लोक बघतात तुझ्याकडे. दे फेकून!’’
... छोट्या प्रवासात जाणवलेल्या ‘सिक्स्थ सेन्स’चा पुरता उलगडा झाला! ‘टकमक टकमक का बघती मला?’, प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं.
.........
(छायाचित्रं विविध संकेतस्थळांच्या सौजन्यानं)
#पदयात्रा #संध्याकाळचे_फिरणे #कोरोना #मास्क #येता_जाता #सिक्स्थ_सेन्स #Mask #walk #Mask_Walk
लेख आवडला
उत्तर द्याहटवाखूप छान..पत्रकार असलो, तरी पोलिसांपासून कायम चार हात लांबच राहिलेलो. हे ही कौतुकास्पद आणि दुर्मिळ आहे
उत्तर द्याहटवा😃😃👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवाखूपच सस्पेन्स वाढवला होता शेवटपर्यंत, मास्क वापरणारे वेडे आहेत, असे सध्या लोक समजत आहेत. अपवाद महाराष्टाच्या उपमुख्यमंत्र्यांचा! ते मात्र या बाबतीत खूप जागरूक असतात.
छान लिहिलंय नेहमीप्रमाणे.
👍🏻👍🏻
- जगदीश निलाखे, सोलापूर
खासच 😀
उत्तर द्याहटवा- डॉ. ऊर्मिला चाकूरकर, पैठण
छान रंगवले आहे. असेच लिहित जा.
उत्तर द्याहटवा- श्री. के. वनपाल, नगर
नेहमीप्रमाणे खुसखुशीत व सुंदर लिखाण.
उत्तर द्याहटवामास्क थोडा बाजूला ठेऊ पत्रकारमहोदय! विषय रोडच्या बाबतीत. तर माझे प्रामाणिक मत असे आहे, नगरची महानगरपालिका व राजकारणी खूप अंधश्रद्ध, जुन्या लोकांना न दुखवणारे आहेत. यांची आजही अशी श्रद्धा आहे की, चांदबीबी परत नगरला येईल व परत येईल तेव्हा रस्ता चुकू नये, याची पुरेपूर काळजी हे घेतात. तसेंच चांदबीबी ला चांगले वाटावे की, तिच्या काळात रस्त्याची एवढी वाईट अवस्था नव्हती! म्हणून हे लोक रस्ते किमान समपातळीतसुद्धा करत नाही. नगरच्या मुर्दाड लोकांना त्याच्या लायकीप्रमाणे रस्ते मिळाले आहेत.
- विकास पटवर्धन, नगर
छानच!
उत्तर द्याहटवामीही विचार करत होतो काय झाले असेल... पण मास्क! तो तर आपल्या शरीराचा एक भाग झाला आहे आता.
पण काढ बाबा आता. नाही तर आपले मामु काढतीलच सर्वांचे येत्या शनिवारी...
😜😜
- विवेक विसाळ, पुणे
मस्त. खरंय..!
उत्तर द्याहटवाभीतीने सवयच होऊन गेलीय. त्यामुळे लोकांचा 'तिरका' विनोदी कटाक्ष आपल्याला नंतर उमगतो!!
- चंद्रकांत कुटे, मुंबई
वाचलं. भारीच😃
उत्तर द्याहटवा- प्रा. डॉ. श्रीनिवास भोंग, संगमनेर
Hahaha... खूप खूप छान 👌👌🙏
उत्तर द्याहटवा- मंगेश वैशंपायन, दिल्ली
माणूस... सवयीचा गुलाम!
उत्तर द्याहटवा- चंद्रशेखर रामनवमीवाले, करमाळा
छान जमलीय भट्टी.
उत्तर द्याहटवाचालत राहा!
थोर अमेरिकन विचारवंत लेखक हेन्री डेव्हिड थोरो पट्टीचा भटक्या होता. तो म्हणायचा, माझ्या डोळ्यांपेक्षा माझ्या पायांनाच अधिक दिसते!
दुर्गा भागवत ह्यांनी पायांविषयी फार कनवाळूपणे लिहिले आहे. त्या म्हणतात, आपले पाय आपल्याला पाहिजे तिथे घेऊन जातात; केवढी मोलाची गोष्ट आहे ही!
- प्रल्हाद जाधव, मुंबई
खूप छान निरीक्षण. रस्त्याच्या अवस्थेचं, येणाऱ्या-जाणाऱ्याचं. लेखाच्या शेवटपर्यंत उत्सुकता (सस्पेन्स) कायम राहाते व शेवटी एकदाचा उलगडा होतो. एक मात्र बाकी खरं आहे, आजकाल मुखपट्टी वापरणारा 'odd man out' या प्रकारात मोडतो.
उत्तर द्याहटवा- दिलीप वैद्य, पुणे
फिरंगोजी छान रंगवलाय. शर्टची बटन, पॅंटचे झिप नेहमीच गोंधळ घालून फजीती करतात. चप्पलेचा अंगठ्याने तरी का मागे राहावे?
उत्तर द्याहटवा२५ वर्षांचा बॅचलर. सकाळी नटून-थटून ऑफिसला चालला होता. कधीही न हसणारी तरुणी हसली. हायसं वाटणं साहजिकच. ऑफिसमध्ये आता सहकारीही हसले. पाहतो तर पॅंटच्या झिपमधून काळा करदोडा गोंड्यासह घड्याळाच्या लोलकाप्रमाणे अंदोलन घेत होता. दृष्ट लागली तरी चालेल पण कंबर करदोडा मुक्त केली. अर्थात हा माझा स्वानुभव!
= श्रीराम वांढरे, भिंगार, अहमदनगर