Saturday, 23 April 2022

बातमी...मराठीतली नि इंग्रजीतली

 

‘वागशीर’ला जलावतरणानिमित्त तुताऱ्यांनी सलामी.
(छायाचित्र नौदलाच्या संकेतस्थळावरून साभार.)

बातमी म्हणजे काय? तिची व्याख्या? पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण घेणाऱ्यांना आठवेल कदाचित की, ‘बातमी’ आणि ‘बातमी-लेखन’ विषय शिकविणाऱ्या कोण्या मुरब्बी पत्रकारानं त्यांना पहिल्याच तासाला हा प्रश्न विचारला असेल. त्यानंतर पाच-सहा-सात व्याख्या पुढे आल्या असतील. त्यातली NEWS : North-East-West-South ही सोपी, सुटसुटीत व्याख्या बहुतके भावी पत्रकारांना पटली असेल. सोपी व्याख्या आहे ती.

बातमीत काय हवं? तर त्यात ‘5 W & 1 H’ ह्याची (Who? What? When? Where? Why? How?) उत्तरं मिळायला हवीत. कोण, काय, का, कधी, कुठे आणि कसे, हे ते सहा प्रश्न. मराठीत सहा ‘क’. विद्यार्थ्यांना हेही शिकवलं जातं. ‘Comment is free, but facts are sacred.’ वयाच्या सव्विसाव्या वर्षी ‘द मँचेस्टर गार्डियन’च्या (आताचं प्रसिद्ध दैनिक द गार्डियन) संपादकपदी नियुक्ती झालेल्या सी. पी. स्कॉट ह्यांचे हे प्रसिद्ध उद्धृतही जाणत्या पत्रकार-संपादकानं विद्यार्थ्यांना ऐकवलं असेलच. बातमी देणं किती जोखमीचं काम आहे, हेच शिकवायचं असतं त्यातून. कारण बातमी म्हणजे तथ्य आणि फक्त तथ्य. (त्यामुळेच आम्हाला कदाचित ‘News is sacred and comment is free.’ असं शिकवलं गेलं.)

पत्रकारितेला सुरुवात केली आणि त्यानंतर वर्षभरातच ‘केसरी’च्या नगर कार्यालयात एक माध्यमतज्ज्ञ प्राध्यापक आले होते. आम्ही दीड-दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या ‘रानडे इन्स्टिट्यूट’मध्ये जे शिकलो होतो, ते त्यांनी वीस-पंचवीस मिनिटांत मोडीत काढलं. अमेरिकी पत्रकारितेची साक्ष देत त्यांनी सांगितलं की, बातमीत ती देणाऱ्याचं मत आलं तरी चालतं. किंबहुना ते यायला हवंच. त्यानंतरची बरीच वर्षं आम्ही जुन्या चौकटींची मर्यादा संभाळतच काम करीत राहिलो. ती ताणली; नाही असं नाही. त्याचं कारणही ज्येष्ठ संपादक चंद्रकांत घोरपड्यांनी शिकवलं होतं - संपादकांनी घालून दिलेली चौकट जास्तीत जास्त ताणतो, तोच चांगला उपसंपादक!  

हे सगळं आठवण्याचं-लिहिण्याचं कारण तीन दिवसांपूर्वी वाचलेली एक बातमी. त्याच्या संदर्भात ‘फेसबुक’वर लिहिलेलं एक टिपण आणि त्यावर आलेल्या काही मोजक्या प्रतिक्रिया.

आपल्या नौदलाची ताकद वाढविणाऱ्या ‘आयएनस वागशीर’ पाणबुडीचे बुधवारी (दि. २० एप्रिल) जलावतरण झाले. स्कॉर्पिन श्रेणीतली ही सहावी पाणबुडी. हिंद महासागरात खोलवर आढळणाऱ्या शिकारी माशावरून (सँडफिश) तिचे नामकरण करण्यात आले. (संदर्भ - दै. लोकसत्ता आणि The Economic Times - Named after sandfish, a deadly deep water sea predator of the Indian Ocean.)

विविध मराठी दैनिकांमध्ये गुरुवारी ही बातमी प्रसिद्ध झाली. माझ्याकडे सहा दैनिकं येतात. त्यातील चार दैनिकांची आवृत्ती स्थानिक - नगरची आहे आणि दोन पुण्याच्या आवृत्ती. ‘लोकसत्ता’ने पहिल्या पानावर पाणबुडीच्या छायाचित्रासह तिची वैशिष्ट्ये मुद्द्याच्या रूपांत दिली आहेत. त्यात कुणाची नावं नाहीत. वाराची मात्र चूक झाली आहे. बुधवारी जलावतरण झालं असताना, मुद्द्यांमध्ये गुरुवार पडलं आहे. ‘दिव्य मराठी’ने आतील पानात मोठे छायाचित्र आणि आटोपशीर बातमी प्रसिद्ध केली.

जलयुद्धयान म्हणून की काय माहीत नाही, पण ‘सकाळ’ने तिला पहिल्या पानावर तळाव्याची (‘अँकर’) जागा दिली आहे. पानावरील मुख्य बातमीनंतर वाचकाचे लक्ष तळाच्या बातमीकडे - ‘अँकर’कडे वेधले जाते म्हणतात. ही बातमी सर्वांत तपशीलवार आहे. त्यात ‘वागशीर’ची वैशिष्ट्ये वेगळ्या चौकटीत दिली आहेत. ‘लोकमत’ने अग्रलेखासमोरच्या पानावर अगदी वरच्या बाजूला पाणबुडीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि सोबतीची बातमी कऱ्हाडची आहे. ‘आयएनस वागशीर’ची वातानुकूलित यंत्रणा तिथे तयार झाल्याची माहिती ही बातमी देते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पहिल्या पानावर नेमकं घडीवर छायाचित्र प्रसिद्ध केलं आणि त्याच्या ओळीच थोड्या तपशिलानं दिल्या.

प्रामुख्यानं अर्थविषयक दैनिक अशी ओळख असलेल्या ‘बिझनेस स्टँडर्ड’च्या पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झालेली ‘वागशीर’ची बातमी मला मराठी दैनिकांहून खूप वेगळी वाटली. ‘सेकंड फ्रंट पेज’ म्हणजे शेवटच्या पानावर अगदी ठळकपणे प्रसिद्ध झालेल्या ह्या बातमीचे शीर्षक ‘Launched with a coconut, a boost to submarine fleet’ असे तीन स्तंभांमध्ये तीन पायऱ्यांचे (मराठी पत्रकारितेच्या परिभाषेत - तीन कॉलमी, तीन डेकचे!) आहे. दोन ओळींच्या उपशीर्षकात बातमी नेमकी काय आहे ते समजून येते.

बातमीचा पहिला परिच्छेद ‘लीड’ किंवा ‘इंट्रो’ म्हणून ओळखला जातो. तो जेवढा गोळीबंद होतो, तेवढी बातमी अधिक प्रमाणात शेवटापर्यंत वाचली जाते. जुन्या पत्रकारितेत मोजक्या शब्दांत आणि मोजक्या वाक्यांमध्ये बातमीतील सर्वांत महत्त्वाचा भाग सांगणाऱ्या ‘लीड’ला फार महत्त्व होते. बातमीचा हा पहिला परिच्छेद पस्तीस ते चाळीस शब्दांचा आणि तीन ते चार वाक्यांचा असावा, असा आग्रह असे.

बातमीत माहिती असावी, मतप्रदर्शन नसावे, असा आग्रह धरला जाई. बातमीदाराने मनाचे काही लिहू नये किंवा टिप्पणी करू नये, असे सांगितले जाई. हा कर्मठपणा किंवा सोवळेपणा एकविसाव्या शतकाच्या आधीपासून संपला. इंग्रजी दैनिकांनी जुने निकष मोडून नवे रूढ केले.

‘इंट्रो’च्या किंवा बातमीच्या सोवळेपणाच्या कुठल्याही (जु्न्या) निकषांमध्ये ‘बिझनेस स्टँडर्ड’ची ही बातमी बसत नाही. तिचा पहिलाच परिच्छेद मजेशीर नि वेगळी माहिती देणारा आहे. त्याचा ‘वागशीर’शी, त्या पाणबुडीच्या मालिकेशी, भारतीय नौदलाशी किंवा कार्यक्रम जिथे झाला त्या माझगाव गोदीशी थेट काही संबंध नाही. ‘जगभरातील कोणत्याही नौदलात एखादे लढाऊ जहाज दाखल केले जाते, तेव्हा त्या युद्धनौकेला मानवंदना दिली जाते, ती महिलेच्या हस्ते फेसाळत्या शाम्पेनची बाटली फोडून.’ बातमीचं हे पहिलं वाक्य. ही परंपरा २०१४मध्ये ब्रिटिश महाराज्ञी एलिझाबेथ (दुसरी) ह्यांनी काही पाळली नाही. ब्रिटनच्या शाही नौदलात विमानवाहू नौका दाखल करण्यात आली, तेव्हा राणीनं खास स्कॉटिश ‘बोमोर सिंगल माल्ट व्हिस्की’ची बाटली फोडली. ब्रिटिश महाराज्ञी (शत्रूराष्ट्र) फ्रान्सची शाम्पेन का म्हणून बरे वापरील? आणि तेही आपलं आरमार अधिक सज्ज होत असताना? ही व्हिस्की शाम्पेनप्रमाणे फेसाळती होती की तिच फवारे उडाले की नाही, ह्याची माहिती मात्र बातमीत नाही.

पहिले दोन परिच्छेद असे लिहिल्यानंतर वार्ताहर अजय शुक्ल ‘वागशीर’कडे वळतात. तिसऱ्या परिच्छेदात ते लिहितात फेसाळती शाम्पेन किंवा स्कॉटिश सिंगल माल्ट वापरण्याची पद्धत भारतात नाही. इथे प्रमुख पाहुण्या महिलेने नारळ फोडून (आपल्या भाषेत ‘श्रीफळ वाढवून’!) सलामी दिली. तो मान मिळाला संरक्षण सचिवांच्या गृहमंत्री वीणा अजयकुमार ह्यांना. त्यानंतर स्कॉर्पिन शब्दाच्या स्पेलिंगमधली गंमतही त्यांनी सांगितली आहे. बातमीत त्यांनी ‘Scorpene’असंच लिहिताना कंसात स्पष्टीकरण केलं आहे - scorpion हा इंग्रजी शब्द फ्रेंच असा लिहितात!

बातमीत मग पुढे स्कॉर्पिन पाणबुडी मालिकेची सविस्तर माहिती आहे. त्यात तांत्रिक तपशील आहेत नि आर्थिक माहितीही आहे. मालिकेतील आधीच्या पाच पाणबुड्यांबद्दलही लिहिलं आहे. सर्वांगानं माहिती देणारी अशी ही बातमी म्हणावी लागेल. मराठी माध्यमांच्या तुलनेनं खूप सविस्तर.

ही बातमी वाचताना मजा आली. हे काही पहिलंच उदाहरण नव्हे. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये असं चालूच आहे. बातमी वाचल्यावर विचार करताना लक्षात आलं की, आता कुठलीही बातमी ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’, विविध संकेतस्थळांमुळं काही मिनिटांत कळते. वृत्तपत्रांमध्ये काही तासांनंतर छापून येणारी बातमी तुलनेने शिळीच म्हटली पाहिजे. ती ताजी नसणार, हे उघडच. पण ती किमान वेगळी वाटण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी ती लिहिण्याची धाटणी, तिचे शीर्षक देण्याची पद्धत बदलली पाहिजे. नित्य नवे प्रयोग करायचे स्वातंत्र्य वार्ताहर-उपसंपादकांना मिळायला हवे. मुद्रित माध्यमांमध्ये पूर्वी आग्रह असलेला ‘गोळीबंद लीड’ आता डिजिटल, सामाजिक माध्यमांसाठी आवश्यक आहे. त्यांना थोडक्यात आणि तातडीनं वाचकांपर्यंत ‘बातमी’ पोहोचवायची असते.

सहज म्हणून एक उदाहरण - नगरच्या जुन्या नगरपालिकेच्या इमारतीत वरच्या मजल्याला आग लागली. ‘कौन्सिल हॉल’ म्हणून ते सभागृह प्रसिद्ध आहे/होते. आग लागली ती एक मेच्या सायंकाळी पाच-साडेपाच वाजता. दैनिकांनी कामगार दिनाची सुटी घेणे नुकतेच सुरू केले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोणताच अंक प्रकाशित होणार नव्हता.

ही बातमी आता थेट तिसऱ्या दिवशी, म्हणजे तीन मे रोजी सकाळी वाचकांना दिसणार होती - घटना घडल्यानंतर किमान ३६ तासांनी. आमच्या वार्ताहराने सरधोपट पद्धतीने बातमी लिहिली आणि उपसंपादकाने ‘कौन्सिल हॉल आगीत खाक’ असे चाकोरीबद्ध, पठडीतले शीर्षक दिले.

आग लागल्यानंतर बरेच नगरकर थेट घटनास्थळी जाऊन पाहून आणि आवश्यक ती हळहळ व्यक्त करून आले होते. त्यांना माहीत असलेलीच बातमी आम्ही दीड दिवसाने त्यांच्या समोर टाकणार होतो. उपसंपादकाला तसे म्हटल्यावर त्याचे उत्तर होते, ‘बातमीत तसं वेगळं काही लिहिलंच नाही.’

थोडा वेळ थांबून शीर्षक दिलं - ‘आग माथ्याला, बंब पायथ्याला!’ आग लागलेल्या ह्या इमारतीला अगदी खेटूनच अग्निशामक दलाचं मुख्य कार्यालय आहे. त्यांना ही आग लगेच आटोक्यात आणता आली नव्हती. अर्थात, हे शीर्षक म्हणजे फक्त मलमपट्टी होती. तथापि त्यानं वाचक बातमी वाचण्याकडे वळेल, एवढं तरी साधणार होतं.

उद्या असं काही होईल का? बातमी जाणून घेण्याची ओढ असलेले डिजिटल माध्यमांकडे, सामाजिक माध्यमांकडे वळतील आणि बातमीमागची बातमी किंवा घटनेमागचा कार्यकारण भाव, विश्लेषण वाचण्यासाठी ते मुद्रित माध्यमांवर अवलंबून राहतील?

....

#वागशीर #पाणबुडी #नौदल #वृत्तपत्रे #बातमी #मराठी_इंग्रजी #लीड #बातमीची_व्याख्या #5W&1H #media #print_media #digital_media #social_media #thebusinessstandard

15 comments:

 1. बातमीच्या विषयाची बातमी, खूप छान विश्लेषण करणारा लेख. या बाबतच्या बातम्या वाचल्या होत्या, पण बातमी मागच्या बातमीसाठी बातमीकडे कालानुरूप कसे पहावे हे शिकविणारा हा लेख आहे.

  ReplyDelete
 2. बातमीचं मस्त विश्लेषण!

  ReplyDelete
 3. बातमी म्हणजे नेमकं काय याचं पाठ्यपुस्तकीय विवेचन आवडलं . कारण रोज सकाळी उठल्यापासून आपण ढीगभर बातम्या वाचत असतो

  ReplyDelete
 4. मला वाटते बातमीदाराचा उगम देवर्षि नारदमुनी पासून झाला असावा. पृथ्वी, आकाश, पाताळ या तिन्ही लोकांत संचार करून देवी-देवतांना संदेश, समाचार, सूचना देणे हे नारदमुनीचं काम. नारदमुनी ही ब्रम्हदेवांची निर्मिती. साहजिकच बातमीदाराची वंशावळ ब्रम्हदेवांपर्यंत पोहचते असे म्हणण्यास हरकत नाही.

  सबब संपादक, उप-सह-वृत्त संपादक, बातमीदार, वार्ताहार यांनी आपण ब्रह्मदेव, देवर्षि नारदमुनी यांचे वंशज आहोत याची अधून-मधुन का होईना आठवण ठेवावी व "नारायण-नारायण" उच्चारून पवित्र भावनेने बातमी संपादन करावे.

  अर्थात खिडकीतील "बातमी" मुळेचं हा प्रपंच.

  श्रीराम वांढरे.
  भिंगार, अहमदनगर.

  ReplyDelete
 5. ह्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या व होतकरू पत्रकारांसाठी अत्यंत उपयोगी, महत्त्वाचा लेख. तू खराखुरा, हाडाचा पत्रकार आहेस.
  - विकास पटवर्धन, नगर

  ReplyDelete
 6. खूप वेगळा विषय. नेहमीप्रमाणेच अर्थपूर्ण. माध्यमाविषयी अधिक विस्तृत अभ्यास करून केलेले विश्लेषण खूप समर्पक आहे.

  एक बाब निश्चित आहे - मुद्रित माध्यमे चिरायू, चिरंतन असणार आहेत.

  'खिडकी'तली ही झुळूक खूप आनंददायी अशीच..!
  - प्रमोद शाह, पुणे

  ReplyDelete
 7. फार सुंदर विश्लेषण... फारच छान!
  - प्रल्हाद जाधव, मुंबई

  ReplyDelete
 8. एकदा वाचून समाधान होत नाही. पुनःपुन्हा वाचावा, असा हा लेख आहे. खूपच छान.
  - आरिफ शेख, श्रीगोंदे

  ReplyDelete
 9. बातम्यांची बित्तंबातमी..!
  - नितीन खंडाळे, चाळीसगाव

  ReplyDelete
 10. ‘बातमीमागील बातमी’ लिहिण्यासाठी बातमीदार तेवढा जाणकार हवा. अन्यथा, पारंपरिक गोळीबंद लीड बरा. बातमीदार, उपसंपादकांना स्वातंत्र्य दिल्याने बातमीत बातमीच शोधावी लागते, असे सध्या चित्र आहे. अक्षरश: प्रत्येक बातमीचे लीड बदलून घ्यावे लागते सध्या...
  - प्रसाद कुलकर्णी

  ReplyDelete
 11. बदलत्या गरजा लक्षात घेऊन बातमी-लेखन कसे हवे, हे नेमकेपणाने मांडले आहे.
  - अनिल पवार, पुणे

  ReplyDelete
 12. मस्त झाला आहे लेख. मुळात असा विषय सुचल्याबद्दल ‘Great’ असं म्हणतो. मांडणी खरोखरचं उत्तम.
  पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पत्रकारांनीही (तथाकथित हुशार पत्रकारांनी नव्हे) वाचण्यासारखा हा लेख आहे.🙏🙏
  - गणाधीश प्रभुदेसाई, पुणे

  ReplyDelete
 13. इंग्रजी व मराठी वृत्तपत्रे (शिवाय TV वाहिन्याही) यांच्यामध्ये अफाट दरी आहे . कारणे अनेक , त्यावर विचार करणे मी सोडून दिले आहे.

  पाणबुडीबद्दलच्या बातमीनुसार मला मी अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत Portland (ओरेगॉन राज्य) येथे एक अमेरिकी पाणबुडी आतमध्ये जाऊन पहिली होती, त्याची आठवण झाली. ही अमेरिकी आरमारातील डिझेलवर चालणारी शेवटची (व सेवानिवृत्त झालेली) पाणबुडी होती. नंतर तयार झालेल्या सर्व अणुभट्टीवर चालण्याऱ्या आहेत . ही जनतेसाठी कायमची खुली ठेवली आहे.

  INS Vikrant या आपल्या एकुलत्या एक विमानवाहू जहाजास ही १९७५च्या आसपास आतून पाहता आले होते , मुंबई बंदरांत . त्यावेळेस त्याचे Refitting चालू होते . मुख्य म्हणजे मी माझ्या वडिलांनाही हे जहाज पाहण्यास माझ्याबरोबर नेऊ शकलो होतो . त्यावेळेस त्यांच्या चर्येवरील झालेला आनंद माझ्या अजूनही स्मरणात आहे
  - अशोक जोशी, अमेरिका

  ReplyDelete
 14. बातमीबद्दल उत्तम माहिती मिळाली. बातमीला किती महत्त्व आहे, ती लोकांपर्यंत कशी पोचली पाहिजे, हे सर्व सविस्तर कळते. धन्यवाद.

  आज-काल कोण एवढे सिद्धांत, नैतिकता, नियम पाळतो हो? एका वर्तमानपत्राचे फेसबुक पेज तर मुळीच उघडून सुद्धा बघू नये असे आहे. वर चित्रे काही, मथळा कसा, बातमी कशी ...न विचारलेलेच बरे! अगदी प्रथम २-३ वेळा मी फसले खरे. पण आता त्यांचा तद्दन खोटेपणा लक्षात आल्याने तिकडे ढुंकूनही बघावेसे वाटत नाही..इतकी सवंग पत्रकारिता?
  - स्वाती वर्तक, मुंबई

  ReplyDelete
 15. बातमीबद्दलचा लेख वाचून नव्याच गोष्टी कळल्या. ती Sacred असावी हे समजण्यासारखे आहे.
  पण आज त्याला एक वेगळंच रूप मिळालंय. ई-माध्यमांमुळे, व व्यापारी वृत्तीमुळे बातमी आता पावित्र्य गमावून बसली. हे आता सर्वच व्यवसायांचे झालंय. नाही का?

  वागशीरचं उदाहरण आवडलं. धन्यवाद.
  - प्रियंवदा कोल्हटकर

  ReplyDelete

टकमक टकमक का बघती मला?

रोज ठरल्यानुसार संध्याकाळी फिरायला चाललो होतो. ‘मॉर्निंग वॉक’ आपल्या नशिबात नाही. अरुणोदयाऐवजी सूर्यास्त पाहावा लागतो. संध्याकाळी तर संध्या...