रचना - शब्दकुल |
‘ध’चा ‘मा’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ळ’चा ‘ल’ केला जात होता आणि ‘चलता है...’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘तिलक’. बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘बालासाहब’. नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्ही गावं एक होतात. बातमी नेमकी कुठली ते कळायला मार्ग नाही. लोणावळे, जळगाव, भुसावळ, करमाळा आदी स्थाननामांतील आणि काळे, साळी, माळी, जगदाळे, बाळू आदी व्यक्तिनामांतील ‘ळ’ जाऊन तिथं ‘ल’ कसा येतो?
हिंदीमध्ये ‘ळ’च्या जागी ‘ल’ का, हा प्रश्न पुण्यातील
आयुर्विमा अधिकारी प्रकाश निर्मळ ह्यांना छळत होता. हा अक्षरबदल खटकत होता. त्यांनी
दाद मागायचं ठरवलं. अक्षरांतर होऊ नये, ह्यासाठी २०१८पासून प्रयत्न सुरू केले. 'ळ'ऐवजी 'ल'चा वापर चुकीचा
आहे. हिंदीमध्ये 'ळ'च वापरावा, अशी मागणी करीत त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व राज्यपाल कार्यालय; केंद्रीय
गृहमंत्रालयाचा राजभाषा विभाग, उच्च शिक्षण मंत्रालयाचा हिंदी विभाग, प्रसारण मंत्रालय यांना वारंवार पत्रं लिहिली. आग्रही
पाठपुरावा केला. त्यांच्या धडपडीला
यश आलं. केंद्रीय हिंदी संचालनालयानं 'ळ'च्या वापराबाबत
परिपत्रक काढलं. 'ळ' अक्षर हिंदीच्या परिवर्धित वर्णावलीत
स्वीकारण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे रेल्वे, बॅंका,
केंद्र सरकारी कार्यालयांना स्थानिक नावात बदल करता येणार नाही. म्हणजेच
(विशेषनामात) 'ळ' आहे म्हणून त्या जागी
'ल' वापरता येणार नाही.
श्री. निर्मळ ह्यांच्या एकांड्या शिलेदारीच्या यशाच्या दोन बातम्या एवढ्यात वाचण्यात आल्या. 'ळ'ला हिंदी संचालनालयानं मान्यता दिल्याची बातमी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये सप्टेंबरच्या अखेरीस प्रसिद्ध झाली. ‘‘ळ’च्या वापरासाठी पंतप्रधानांना माजी संमेलनाध्यक्षांचे पत्र’ ह्या शीर्षकाची बातमी दैनिक लोकमतमध्ये गेल्या शनिवारी आली. त्यामुळंच 'ळ'चा आणि त्याचबरोबर त्यासाठी सुफळ पाठपुरावा करणाऱ्या श्री. निर्मळ ह्यांचाही मागोवा घ्यायचं ठरवलं. तो घेताना बऱ्याच गोष्टी हाती लागल्या.
'ळ'बद्दल मोल्सवर्थ कृत मराठी - इंग्रजी शब्दकोशातील (सुधारित पाचवे पुनःमुद्रण) नोंद अशी आहे -
The thirty-fourth consonant. It differs greatly from English L. It never occurs initially.
बहुसंख्य भारतीय भाषांमध्ये 'ळ' आहे. राजस्तानी, हरयाणवी, गढ़वाली, कुमाउंनी, नेमाडी, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमीळ, कोकणी, गुजराती, ओडिया ह्या सगळ्या भाषांमध्ये हे अक्षर आहे. संस्कृत, उर्दू, आसामी, बंगाली अशा काही मोजक्याच भाषांमध्ये ते नाही. मध्यंतरी वाचण्यात आलं की, हिंदी काही त्या अर्थाने भाषा नाही. विविध २२ (संख्या कमी-अधिक असेल!) बोलींचा तो समुच्चय आहे. श्री. निर्मळ तर हिंदीची व्याख्या 'उर्दूतले कठीण शब्द वगळून त्या ऐवजी संस्कृत शब्दांना घेऊन बनलेली 'देवनागरी उर्दू' भाषा' अशी करतात! गुजरातीमध्येही हे अक्षर आहेच. सुप्रसिद्ध अभिनेते परेश 'रावल' ह्यांचे आडनाव 'रावळ' असेच असल्याचा उल्लेख विकिपीडियावर दिसतो. मी 'परेश रावळ' असंच नाव वापरत होतो, तेव्हा त्याला काहींनी हरकत घेतली होती. प्रचलित ते वापरावं, असं त्यांचं म्हणणं! 'ललित'च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र ह्यांनी म. गो. रांगणेकर ह्यांचं व्यक्तिचित्र रेखाटलं आहे. दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई व पी. व्ही. नरसिंह राव त्यांच्या 'कुलवधू' नाटकाचे चाहते होते, अशी माहिती देत श्री. मिश्र गंमत सांगतात - मोरारजीभाई 'कुलवधू'ऐवजी 'कुळवधू' म्हणायचे!
ह्याच विषयाला ब्लॉगच्या माध्यमातूनच वाचा फोडलेली आढळते ती श्री. तुषार कुटे ह्यांनी. 'मेरी आवाज़' ब्लॉगवर जून २०११मध्ये लिहिलेल्या ''ळ' का शब्दप्रयोग' शीर्षकाच्या लेखात ते लिहितात की, 'हिंदीमध्ये 'ळ'चा वापर का केला जात नाही, असाच प्रश्न मला पडतो.' 'ळ'च्या जागी 'ल' वापरल्यामुळे होणाऱ्या गल्लत-गफलतींची उदाहरणे त्यांनी दिली आहेत. 'तमिळ', 'मल्याळम' ह्या भाषांचा उल्लेख हिंदीत 'तमील', 'मल्यालम' करणं चुकीचं आहे, ह्याकडे लक्ष वेधून ते लिहितात की, 'ळ' का प्रयोग अगर हिंदी में करना शुरू किया जाए तो शायद इस जुबान की अन्य दक्षिण भारतीय भाषाओं में होने वाली दूरी और कम हो सकती है. (संदर्भ - https://tusharkute.wordpress.com)
भाषाशास्त्राचे अभ्यासक अविनाश बिनीवाले ह्यांचा 'महाराष्ट्र टाइम्स'मधील 'गळून पडणारे ‘ष’ आणि ‘ळ’’ शीर्षकाचा लेखही आढळला. त्यांनी लिहिले आहे की, बहुतेक मराठी भाषिकांचा समज असतो, की 'ळ' हा ध्वनी फक्त मराठीत आहे. 'ळ' अक्षर असलेली मराठी ही जगातली एकमेव भाषा आहे, असे सांगणारेही भेटत असतात. संस्कृतात 'ळ' अक्षर नाही हे खरे; पण अभिजात संस्कृतहूनही जुन्या असलेल्या ऋग्वेदाच्या वैदिक भाषेत 'ळ' आहे. ऋग्वेदाची सुरुवातच 'अग्निमीळे पुरोहितम्' अशी आहे... भारतात 'ळ्' असलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुमारे ५० कोटी आहे.
अशीच चर्चा वाचायला मिळाली http://mr.upakram.org संकेतस्थळाच्या एका धाग्यावर. जगाच्या पाठीवर राहणाऱ्या, विविध देशांचं पाणी चाखून आलेल्या मंडळींनी त्यात आपले अनुभव लिहिले आहेत. तमीळनाडूतील नेत्या कनीमोळी ह्यांचं नाव गाजू लागलं, तेव्हा हिंदी, मराठी माध्यमांमध्ये त्यांचं नाव 'कनीमोझी' असं प्रसिद्ध होई. त्याच्याही खूप आधी सत्तर-ऐंशीच्या दशकांमध्ये 'द्रविड मुन्नेत्र कझागम' असं पक्षाचं नाव येत होतं. त्याचा संदर्भ 'रोचना' ह्यांच्या प्रतिक्रियेत येतो. त्यांनी लिहिलंय की, तमिळ भाषेतही 'ळ'चा उच्चार वादाचा विषय आहे; काहीसा आणि-आनि ह्यासारखाच. 'ऋषिकेश' लिहितात की, माझ्या माहितीनुसार तमिळमध्ये दोन प्रकारचे उच्चारी 'ळ' आहेत. त्यासाठी तमिळ लिपीमध्ये वेगवेगळ्या खुणा आहेत. मात्र इंग्रजीतच काय पण संस्कृत, हिंदीतही दोन्ही 'ळ' नाहीत. त्यावर मिहिर कुलकर्णी ह्यांनी लिहिलं आहे की, ते दोन 'ळ' मल्याळममध्येही वेगळे आहेत. अर्थात दोन्ही आपल्या मराठी 'ळ'पेक्षा थोडे वेगळे आहेत...माझा तमिळ रूममेट तर ल, ळ आणि ऴ ह्या सर्वांचा उच्चार 'ळ' असाच करतो. उदा. हेळो, माळेगाव, अळेपुळा, तमिळ, मळ्याळम इ.
'ळ'-'ल' अक्षरांतरामुळे शब्दांचे अर्थ कसे बदलतात, ह्याची उदाहरणं https://www.bytesofindia.com ह्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर वाचायला मिळतात. उदाहरणार्थ : अंमल - राजवट आणि अंमळ - थोडा वेळ; खल - गुप्त चर्चा आणि खळ - गोंद; कल - रोख, ओढा आणि कळ - वेदना किंवा यंत्राचे बटन; छल - कपट आणि छळ - त्रास इत्यादी.
हे असं बरंच काही वाचल्यावर श्री. प्रकाश निर्मळ ह्यांच्या कामाचं महत्त्व अधिकच जाणवलं. त्यांच्याशी बोलावं आणि त्यांनाही बोलतं करावं वाटलं. हे करण्यामागची त्यांची भूमिका समजून घ्यावी, त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, त्यात काय अडचणी आल्या, हे माहीत करून घ्यावं वाटलं. त्यातूनच ही मुलाखत आकाराला आली. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी सविस्तर उत्तरं दिली. ह्याच मुलाखतीचा संपादित अंश 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मुंबई आवृत्तीत सोमवारी प्रसिद्ध झाला आहे.
Ø हिंदीत लिहिता-बोलताना सरसकट ‘ळ’चा ‘ल’ केला जातो. हे जवळपास सर्वांच्याच पचनी पडलं होतं. असं
असताना तुम्हाला ह्यामध्ये काय खटकत होतं? केव्हापासून?
- खरं तर ‘ळ’ आणि ‘ल’ ह्यांच्या उच्चारामध्ये खूपच फरक आहे. महाराष्ट्रात आपण उच्चारप्रधान
भाषा, लिपी वापरतो. उच्चाराबाबत अतिशय काटेकोर असलेल्या संस्कृतला ‘देवभाषा’ मानतो. शब्दांना मंत्रांचे स्थान देतो. लांबून ऐकायला
सारखेच वाटणारे ‘श’-‘ष’चे उच्चार
स्वतंत्र दर्शवतो. ‘सहस्र’ शब्द ‘सहस्त्र’ लिहू नये, उच्चारू नये असा आग्रह धरतो. असे असताना
टिळकचे हिंदीत होणारे ‘तिलक’ स्वीकारणं मला पटत नव्हतं. एवढं सुंदर लोणावळा हे नाव, त्याची मोडतोड व्हावी; साळी समुदायाचे नावच बदलून टाकावे हे पटत नव्हते. भातात खडा लागावा तसं
किंवा एखादं सुंदर गाणं कुणी भसाड्या आवाजात गायिल्यावर कानाला खटकतं, तसा ‘ळ’चा ‘ल’ कायम खटकत होता आणि अजूनही
खटकतो. ‘घननिळा
लडिवाळा’सारख्या
गीतातून ऐकू येणाऱ्या ह्या नितांत श्रवणीय उच्चाराची ‘देवनागरी उर्दू’ने इतकी वर्षं जी वाट लावली, ती
आक्षेपार्ह आहे.
Ø हल्ली आपल्याकडे भाषेबद्दल, विशेषतः मराठी लिहिण्या-बोलण्याबद्दल ‘समजलं म्हणजे झालं ना!’ अशी (तडजोडीची) भूमिका सहजपणे घेतली जाते. अशा जमान्यात तुम्हाला ‘ळ-ल’ची ‘तडजोड’ का मान्य नव्हती? भाषेच्या शुद्धतेबद्दल हा दुराग्रह आहे, असं कुणी ऐकवलं नाही?
- खूप लोकांनी
ऐकवलं. खिल्लीसुद्धा उडवली. ‘इथे लोक ‘thanks’चं ‘thx’ करतात आणि तुम्ही
एका अक्षरासाठी आकाश-पाताळ एक करता! हे सोडून द्या,’ असंही म्हणाले.
राजभाषा विभागातील महिला अधिकारी म्हणाली की, इसमे कुछ भी होने वाला नही.
लक्ष्यप्राप्तीपर्यंत स्वस्थ बसायचं नाही, हे माझ्या संस्थेनं शिकवलं; उच्चारांच महत्त्व पालकांनी.
मंत्रोच्चार नीट जमले नाहीत म्हणून एका पुरोहिताला नारळ देणारे माझे वडील आणि
बोलताना प्रमाणभाषेचा आग्रह धरणारी आई, ह्यांच्यामुळे उच्चाराबाबत नेहमीच सजग
राहिलो. माझी ग्रामीण बोली वऱ्हाडी, अस्सल गावरान शैलीत बोलता येते मला. पण
प्रमाणभाषेत बोलताना प्रत्येक उच्चार स्पष्ट असावा, ह्याबाबत मी नेहमीच काटेकोर
राहिलो. शुद्धतेचा आग्रह आहे, दुराग्रह मात्र नाही! कुणाला ‘ण’, ‘ळ’ म्हणताच येत नाही,
हे समजू शकतो. पण लिहितानाही कुणी तसं करीत असेल, तर ते चूकच.
Ø सरकारी पातळीवरच्या व्यवहारात ‘ळ’ऐवजी ‘ल’ वापरणे (आता) अयोग्य ठरेल. तो केंद्रीय हिंदी संचालनालयाच्या सूचनेचा भंग असेल. हा मोठा बदल करण्याकरिता तुम्ही पाठपुरावा केला. आता समाधानी आहात का?
- केंद्रीय हिंदी
संचालनालयाच्या सहायक संचालकांनी मला पत्राने कळवलं की, आम्ही हा वर्ण विस्तारित
वर्णमालेत स्वीकारला असून, त्याच्या वापराची प्रक्रिया सुरू आहे. ते वाचून खूप
आनंद झाला. राजभाषा विभागाने ह्याबाबत काही सांगण्यास असमर्थता दर्शविल्यावर हिंदी
संचालनालयाने दिलेले हे स्पष्टीकरण भारताच्या भाषिक व्यवहाराला नवे वळण देणारे
ठरणार आहे. बदलाबाबत स्पष्ट बोलायचं, तर मी अजून समाधानी नाही. लढा सुरूच आहे.
त्यांनी ‘ळ’ वर्ण मराठी आणि समस्त अहिंदी भाषांचा वर्ण मानून विस्तारित
वर्णमालेत घेतला. तो क्रमिक पुस्तकांतून यायला हवा असेल, तर ‘ळ’ मानक वर्णमालेतच
आला पाहिजे. विस्तारित वर्णमालेची अंमलबजावणीही तातडीने होणं आवश्यक आहे.
Ø ह्या त्रुटीबद्दल दाद मागावी, त्यासाठी पाठपुरावा करावा, हे तुम्हाला नेमकं कसं सुचलं?
- सार्वजनिक हितासाठी
एखादी बाब योग्य वाटत नसेल, तर त्याबाबत तक्रार करायला लोक घाबरतात. संबंध
बिघडतील, अडचणी येतील म्हणून आपल्यापुरता उपाय शोधण्याची प्रवृत्ती असते. त्यात
काही चूक नाही. मी मात्र खटकणाऱ्या गोष्टींविरुद्ध नेहमीच स्पष्ट भूमिका घेत आलो
आणि त्यासाठी चिवटपणे मागेही लागलो. प्रसंगी अनेक नकारात्मक लोकांशी शत्रुत्वही
पत्करले. हीच सवय ह्या पाठपुराव्यासाठी कामी येते आहे.
Ø पाठपुरावा करण्याची सुरुवात कशी झाली? कोणकोणत्या पद्धतीनं आणि कोणकोणत्या संस्थांशी तुम्ही संपर्क साधला?
- सर्व मार्गांनी
ह्याचा पाठपुरावा केला आणि तो अजूनही चालू आहे. ह्याला सुरुवात झाली माझ्या
राजस्थान दौऱ्यापासून. तो हिंदीभाषी प्रदेश समजला जातो. त्या प्रदेशाची राजभाषा ‘हिंदी’ म्हणजे
राजस्थानच्या दृष्टीने खडी बोली आहे. तिथे ‘ळ’चा प्रचुर प्रमाणात
उच्चार करताना लोक दिसले. लोकांशी चर्चा केली. तेथील वृत्तवाहिन्या बघितल्या. त्या
भाषेचा थोडा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की, राजस्थानच्या लोकभाषेतच ‘ळ’ आहे. नंतर लक्षात
आलं की, उत्तराखंड, हरयाणा, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेशातील काही भागात ‘ळ’चे उच्चारण आणि
लेखनही होतं. म्हणजे भारताच्या निम्म्याहून अधिक भागात ‘ळ’चे उच्चारण होतें.
संस्कृतसह १४ भाषांमध्ये ‘ळ’चे लेखन होते. हे
लक्षात आल्यावर ‘दूरदर्शन’, ‘इंडिया टीव्ही’, ‘झी टीव्ही’ ह्यांना लिहिले.
काही मराठी वाहिन्यांना, प्रसारण मंत्रालयाला, राजभाषा विभागालाही लिहिले. खूप
पत्रव्यवहार केला. सुरुवातीला काहीच उत्तर आले नाही. कुणाशी, कसा पाठपुरावा
करायचा, हे नंतर नेमकं कळाल्यावर प्रतिक्रिया येणं सुरू झालं. सुरुवातीला
अमरावतीचे माझे मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे नेते दिनेश सूर्यवंशी, नेहमीच्या
संपर्कातील साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक
श्रीकांत बोजेवार, अमरावतीचे सुरेश अकोटकर, नागपूरच्या शुभांगी भडभडे आणि विविध
मराठी दैनिकांमधील पत्रकारमित्र ह्यांनी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
Ø राजकीय किंवा सरकारी व्यवहारात हिंदीचा एकुणात वरचष्मा असताना आपल्या म्हणण्याची दखल घेतली जाईल, ह्याबद्दल कितपत आशावादी होता?
- सध्याच्या
सरकारबाबत माझा अनुभव खूप चांगला असल्यामुळे आशावादी होतो, आहे. सकारात्मक
राहिल्यावरच संघर्ष करता येतो. सरकारी यंत्रणेबाबत नकारात्मक असाल, तर तुमचे
मुद्दे पटवून देणे शक्य होत नाही. कार्यालयीन वर्णमालेतील ‘ळ’ची अंमलबजावणी व मूळ
वर्णावलीमध्ये ‘ळ’च्या समावेशाबाबतची माझी मोहीम नक्की यशस्वी होईल.
Ø पंतप्रधान, त्यांचे कार्यालय, केंद्रीय मंत्री आदींना तुम्ही निवेदने पाठविली. त्यांच्याकडून किती त्वरेने आणि कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला?
- प्रत्येक वेळी
प्रतिसाद मिळाला नसला, तरी पत्राची दखल घेतली जाते असं दिसतं. ह्या
पाठपुराव्यासाठी वेळोवेळी वेगवेगळी सामाजिक माध्यमे वापरली.
Ø स्थाननामे आणि व्यक्तिनामे ह्यांबाबतच बदलासाठी आग्रही राहिलं पाहिजे, असंच तुमचं म्हणणं होतं/आहे ना?
- अर्थातच. विशेषनाम
कोणत्याही भाषेत तसेच राहते. हिंदी उच्चारप्रधान भाषा आहे. राजभाषा तर सर्वसमावेशक
असायला हवी. त्यामुळे तिने संकीर्ण लिपी वापरू नये, प्रादेशिक उच्चारांचा सन्मान
करावा, असे माझे मत आहे. हिंदीमध्ये ‘ळ’ नसता आणि
देवनागरीतही तो नसता, तरी इंग्रजीने ‘छ’साठी केली, तशी
तरतूद हिंदीला वर्णमालेत करावी लागलीच असती.
Ø भाषा हे काही तुमचे (व्यावसायिक किंवा व्यावहारिक) कार्यक्षेत्र नाही. आपले लेखक, प्राध्यापक, पत्रकार ह्यांनी ‘ळ-ल’चा मुद्दा उचलून धरल्याचं ऐकिवात नाही. की तसे काही प्रयत्न पूर्वी झाल्याचं आणि त्याला यश न आल्याचं तुम्हाला माहीत आहे?
- असा प्रयत्न
करणारा मी पहिलाच का, ह्याबद्दल काहीच माहिती नाही. पण ह्या निमित्ताने हिंदीतील
विस्तारित वर्णमालेत ‘ळ’ स्वीकारला गेल्याचे जगाला पहिल्यांदा कळालं, एवढं मात्र मी
खात्रीपूर्वक सांगतो.
Ø हा बदल व्यवहारात येण्यासाठी माध्यमांनी काय करावे, असे तुम्हाला वाटते? सर्वसामान्य मराठी भाषकांकडून तुमच्या ह्याबाबत काय अपेक्षा आहेत?
- मराठी माध्यमांनी
हा विषय खूप लावून धरला. आघाडीवरची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी, अनेक
डिजिटल चॅनेल व सामाजिक माध्यमांतील ग्रूप ह्यांनी हा विषय प्राधान्याने प्रसारित
केला. साहित्य क्षेत्रातूनही अपेक्षित प्रतिसाद मिळतो आहे. फक्त जनसामान्यांचा
प्रतिसाद वाढला पाहिजे. जिथे ‘ळ’चा ‘ल’ होतो, तिथे त्यांनी
लगेच पत्र द्यावे. कारण दुर्लक्षामुळेच आपल्या समृद्ध प्रादेशिक भाषांचे खूप
नुकसान होत आहे. ‘देवनागरी उर्दू’मुळे राजस्थानीची झाली, तशी
मराठीची अवस्था होऊ नये म्हणून मराठी माणसाने आणि हिंदी, अहिंदी भाषकांनी, प्रादेशिक
भाषांनी सतत जागरूक राहिले पाहिजे.
Ø हे सर्व करताना तुम्हाला कुणाची विशेष साथ (संस्था/व्यक्ती/माध्यमे) मिळाली?
- गणेश देवी, नागनाथ कोत्तापल्ले, श्रीपाद भालचंद्र जोशी, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, रा. रं. बोराडे, प्रदीप निफाडकर, राजन खान, मिलिंद जोशी, सदानंद देशमुख, नरेंद्र लांजेवार, रवींद्र शोभणे, किशोर सानप, सतीश तराळ, नरेशचंद्र काठोळे, भरत यादव, घनश्याम पाटील, महेंद्र आकांत, राजन लाखे, सतीश जैन, गोपी सरडे, विलास मराठे, महेश केळुसकर, मंगेश विश्वासराव, गोवर्धन देशमुख, विजया वाड, विनिती ऐनापुरे ह्यांनी मला पाठिंबा दिला. ह्या विषयावर मी अजूनही नवीन माहिती मिळवत असतो. लेख लिहितो, टिपणं काढतो. कुणाला तरी ट्वीट, इ-मेल करतो, पत्र पाठवतो. माहितीच्या अधिकाराचा वापर करतो. माझं काम सुरूच आहे. माजी संमेलनाध्यक्ष आणि २० साहित्यिक ह्यांच्याशी नुकतेच जुळले. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे, पिंपरी-चिंचवड), विदर्भ साहित्य संघ, मातंग साहित्य परिषद, समरसता साहित्य परिषद, मराठी एकीकरण समिती आदी ह्या चळवळीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सामील होत आहेत.
....