Wednesday, 12 June 2019

(युवराज)सिंग वॉज किंग


(अष्टपैलू क्रिकेटपटू युवराजसिंग यानं निवृत्तीची घोषणा केली. कर्करोगाशी लढत पुन्हा मैदानावर उतरणारा हा झुंजार खेळाडू २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतूस सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. झी मराठी दिशा आठवडापत्राच्या विश्वचषकातील सर्वोत्तम लेखमालेत २५ मे रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख थोडा विस्ताराने.)
....

स्पर्धा ऐन भरात आली असताना आणि भारताच्या विजेतेपदाची चाहूल लागली असताना युवराजसिंग म्हणाला होता, एका खास व्यक्तीसाठी मला विश्वचषक जिंकून द्यायचा आहे. सामन्यागणिक खेळ बहरत असताना तो असं बोलला होता. असं म्हणतात की, हे ऐकून सचिनला त्याची पत्नी म्हणाली होती, हे बहुतेक तुलाच उद्देशून आहे.सचिनचं त्यावर उत्तर होतं, नसावं तसं काही. त्याची कुणी तरी खास मैत्रीण असेल. तिच्याचसाठी...
युवराजसिंगची तळपती बॅट. 

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २ एप्रिल २०११ रोजीच्या रात्री युवराजसिंगनं सचिनला खोटं ठरवलं! स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक स्वीकारल्यानंतर तो म्हणाला, हा विश्वचषक सचिनसाठी आहे. आम्ही तो जिंकलाच!

भारत, श्रीलंका आणि बांगला देश यांच्या भूमीवर ही स्पर्धा दि. १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०११ या काळात रंगली. पाकिस्तानला सहयजमानपदाची संधी गमवावी लागली, ती तेथील अशांत परिस्थितीमुळे. आजवरची सर्वोत्कृष्ट असं कौतुक झालेल्या या स्पर्धेची विविध वैशिष्ट्यं आहेत - मायभूमीवर विश्वविजेता होणारा पहिला संघ भारत ठरला. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन आशियाई देशांमध्ये अंतिम सामना झाला.डिसिजन रिव्ह्यू सिस्टीचा (डीआरएस) अवलंब करण्यास तिन्ही यजमान देशांनी मान्यता दिली होती. वेस्ट इंडिजमधील स्पर्धेपेक्षा स्वरूप बदललं. संघ चौदाच होते आणि सामने ४९ झाले. चार गट आणि सुपर एटऐवजी, दोन गट आणि त्यातील प्रत्येकी चार संघ उपान्त्यपूर्व फेरीत, अशी आखणी झाली.

सर्वसाधारणपणे अपेक्षित असलेलेच संघ उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले. बांगला देश मात्र गटातच बाद झाला. गटात पाकिस्तान व गटात दक्षिण आफ्रिका अव्वलस्थानी राहिले. विजेतेपदासाठी झुंजलेल्या भारत व श्रीलंका यांनी गटात दुसरा क्रमांक मिळविला. तब्बल ६५६ धावा झालेल्या लढतीत आयर्लंडने इंग्लंडला तीन गडी राखून हरविले. त्या आधी इंग्लंड-भारत लढत ६७६ धावा होऊन बरोबरीत सुटली होती. उपान्त्यपूर्व सामने फारसे रंगले नाहीत. पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी अनुक्रमे वेस्ट इंडिज व श्रीलंका यांना १० गडी राखून हरवलं. भारतानं ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून आणि न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेवर ४९ धावांनी मात केली.

उपान्त्य फेरीतील चारपैकी तीन संघ आशियाई. त्यातली सर्वांत महत्त्वाची लढत म्हणजे भारत-पाकिस्तान. मोहालीच्या मैदानावर भारतानं पुन्हा पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलं. तिकडे कोलंबोमध्ये श्रीलंकेनं न्यूझीलंडवर पाच गडी राखून आरामात विजय मिळविला. अंतिम सामन्यात काय घडलं, तो इतिहास सगळ्यांनाच तोंडपाठ आहे.

भात्यातला चेंडू आणि खात्यात अजून एक बळी.
 (छायाचित्र सौजन्य : bleacherreport.com)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान युवराजसिंगमुळे पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडूला मिळाला. भारताच्या विजयामध्ये त्याची कामगिरी होतीच तेवढी मोलाची. तसं पाहायला गेलं, तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर इंडेक्समध्ये त्याचा क्रमांक होता तिसरा. यादीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान होता. त्याचे गुण ८०० आणि नंतर पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी, ७९० गुणांसह. युवराजसिंगचे गुण ७६७. असं असतानाही तो सर्वोत्तम कसा ठरला? दिलशानला फलंदाजीत उत्तम गुण, गोलंदाजीत बरे. आफ्रिदी फलंदाजीत जेमतेम, तर गोलंदाजीत उत्तम. युवराजने दोन्ही ठिकाणी सरस कामगिरी केली. म्हणून कोणत्याच विषयात पहिला न येताही, तो एकुणात पहिला आला!

युवराजनं फलंदाजीत चमक दाखवली. एकूण आठ डावांत चार वेळा नाबाद राहून त्यानं ३६२ (सरासरी ९०.५, स्ट्राईक रेट ८६.१९) धावा केल्या. त्यात त्याचं एक शतक व चार अर्धशतकं. त्याच्या डावखुऱ्या फिरकीनं २५.१३ या सरासरीनं १५ बळी घेतले. सामन्यात वाट्याला आलेली १० षटकं प्रभावीपणे टाकण्याची जबाबदारी निश्चित पार पाडीन, असा विश्वास त्यानं कर्णधाराला दिला. एका सामन्यात पाच बळी आणि अर्धशतक, अशी कामगिरी करणारा तो विश्वचषकातला पहिला खेळाडू. तो चार वेळा सामन्याचा मानकरी ठरला.

अर्थात हे एकदम घडलं नाही. स्पर्धा रंगत गेली, तसा युवराज भरात आला. बांगला देशाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. गोलंदाजीत त्यानं काही केलं नाही. अर्धशतक झळकाविणाऱ्या तमीम इक्बालचा झेल घेताना तेवढा तो दिसला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनीनं त्याला बढती दिली. तो आला तेव्हा डावातलं तिसावं षटक चालू होतं. धावफलक दोन बाद १८० अशी चांगली परिस्थिती दाखवत होता आणि जोडीला होता तेंडुलकर. ही संधी साधत युवराजनं ५० चेंडूत ५८ धावा केल्या. टाय झालेल्या या लढतीत त्याच्यातील गोलंदाज पुन्हा अपयशी ठरला. एकही गडी बाद न करता त्यानं सात षटकांत ४६ धावा मोजल्या.

पहिल्या दोन्ही सामन्यांतील गोलंदाजीतील अपयशाची भरपाई युवराजनं आयर्लंडविरुद्ध केली. त्यानं आपल्या वाटच्या १० षटकांमध्ये फक्त ३१ धावा देत पाच गडी बाद केले. आयर्लंडची मधली फळी त्याच्या अचूक डावऱ्या फिरकीपुढं गोंधळून गेली. भारतानं पाच गडी राखून विजय मिळविला. सचिन, सेहवाग, गंभीर, कोहली यांच्याहून अधिक म्हणजे ५० धावा करणारा फलंदाज होता युवराजसिंग. सामन्याचा मानकरी निर्विवादपणे तोच होता. द नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात युवराजनं स्वतःला पुन्हा सिद्ध केलं. दोन बळी आणि संघाची काहीशी घसरगुंडी उडाली असताना नाबाद अर्धशतक यामुळं विजय सहज साध्य झाला. या कामगिरीनं त्याला सलग दुसऱ्यांदा सामन्याचा मानकरी बनवलं.

भारताच्या धावसंख्येला  आकार देणारी युवीची बॅट.
(छायाचित्र सौजन्य : www.sportsadaa.com)
नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत भारतानं गमावली. विश्वविजेत्यांची स्पर्धेतली ही एकमेव हार. या सामन्यात एक बाद २६७ अशी भक्कम परिस्थिती असताना घसरगुंडी उडाली आणि भारताच्या धावा झाल्या सर्व बाद २९६! युवराजनं फक्त १२ धावा केल्या. हाशीम आमला, जॅक कॅलिस, एबी डीव्हिलियर्स यांच्यापुढे त्याच्या फिरकीची मात्रा चालली नाही मुळीच. वेस्ट इंडिजविरुद्ध दोन बाद ५१, गंभीर व तेंडुलकर बाद, अशी स्थिती असताना युवी मैदानात उतरला. त्यानं कोहलीबरोबर १२२, नंतर धोनीबरोबर ४५ धावांची भागीदारी केली. संघाला सुस्थितीत नेऊन तो बाद झाला, तेव्हा त्याच्या नावापुढे खणखणीत ११३ धावा (१२३ चेंडू, १० चौकार व दोन षटकार) होत्या. मग वाट्याला आलेल्या चार षटकांत त्यानं डेव्ह थॉमस व आंद्रे रसेल यांचे बळी मिळविले. सामन्याचा मानकरी कोण, हा प्रश्न नव्हताच.

विश्वचषकासाठी संघात निवड होईल की नाही, याची खात्री नसताना युवी वर्षभर आधीपासून स्वप्न पाहत होता ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचं. तो म्हणतो,त्या सामन्यात मी खेळणार आणि विजयात वाटा उचलणार, असं गुलाबी चित्र दिवसाढवळ्याही रंगवत होतो.स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची वेळ आली, तेव्हा युवी पुढंच होत. अहमदाबादला झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात रिकी पाँटिंगनं शतक झळकावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला पाच बाद २६० एवढीच मजल मारता आली. ब्रॅड हॅडीन व मायकेल क्लार्क यांना युवराजनं बाद केल्यानंच धावांच्या वेगाला लगाम बसला. मग बॅट घेऊन त्यानं तेंडुलकर, गंभीर यांच्या मार्गाने संघाला विजयापर्यंत नेलं. भारतानं कांगारूंना पाच गडी राखून हरवलं, तेव्हा तो ५७ धावांवर नाबाद होता. चौथ्या वेळी सामन्याचा मानकरी!

चलो, बॅग भरो, निकल पडो...त्रिफळा उडवल्यानंतर फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखविणारा युवराज.
(छायाचित्र सौजन्य : www.icc-cricket.com)
अंतिम सामन्याहून किती तरी अधिक तणाव असलेल्या मोहालीतील पाकिस्तानविरुद्धच्या उपान्त्य सामन्यात युवराजसिंगला भोपळाही फोडता आला नाही. ही कसर त्यानं गोलंदाजीत भरून काढली. असद शफीक व युनूस खान यांची जोडी जमत आहे, असं वाटत असतानाच त्यानं आधी असदची यष्टी वाकविली. नंतर फक्त तीन धावांची भर पडल्यावर त्याने युनूसला रैनाकडे झेल देणं भाग पाडलं.

आता कसोटी होती अंतिम सामन्याची. विश्वचषकासाठी सर्वस्व पणाला लावण्याची वेळ आली होती. युवराजनं चेंडू हातात असताना नेमक्या वेळी संधी साधली. अर्शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या कुमार संगकाराला चकवलं आणि धोनीच्या हाती झेल देणं भाग पाडलं. त्याचा पुढचा बळी होता तिलन समरवीर. पायचितचं हे अपील पंचांनी फेटाळल्यावर युवीनं धोनीला रिव्ह्यूघ्यायला लावला. तो निर्णय अचूक ठरला आणि अर्धशतकी भागीदारी केलेली समरवीर-माहेला जयवर्धन जोडी फुटली. नंतर धोनीनं विजयाचा षटकार मारला तेव्हा समोर होता युवराज. त्यानं (नाबाद २१) धोनीबरोबर ५४ धावांची भागीदारी केली होती.

विश्वविजेतपदाचं स्वप्न साकार झाल्याचा आनंद.
(छायाचित्र सौजन्य : NDTV Sports)
युवराजसाठी सोपा नव्हता हा प्रवास. त्याच्यासाठी आधीचं वर्ष वाईट्ट म्हणावं असं गेलं होतं. संघातली जागा टिकविण्यासाठी धडप करणं, स्वतःला सिद्ध करणं आवश्यकच होतं. आशियाई चषक स्पर्धेसाठी संघातून त्याला वगळलं होतं. त्याची तंदुरुस्ती आणि हरवलेला सूर याबद्दल शंका व्यक्त झाली होती. ग्लेन मॅकग्रासारखीच परिस्थिती होती त्याची. कशाला घेता त्याला विश्वचषकासाठी?’, असा प्रश्न विचारला जात होता. पण कायाकल्प व्हावा तसं झालं. युवराजरूपी सोनं झळाळून उठलं या स्पर्धेत. संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणालेही,क्रीडाविश्वातलं मी पाहिलेलं कायापालटाचं एक छान उदाहरण म्हणजे युवराज.प्रकृतीच्या कुरबुरी सुरू असतानाही युवी खेळत राहिला. या कुरबुरी म्हणजे कर्करोगानं आपल्या अस्तित्वाची दाखविलेली चाहूल होती, हे नंतर कळून आलं. ती लढाईही अर्थातच युवराजने जिंकली.

Friday, 7 June 2019

पंधरा षट्कांतलं वादळ

विश्वचषकातील सर्वोत्तम-२
(भारत-पाकिस्तान-श्रीलंका १९९)

धावफलकावर दिसणारे आकडे पूर्ण वास्तव सांगत नाहीत. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे १९९६ची स्पर्धा आणि त्यात सर्वोत्तम ठरलेला खेळाडू. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सोळावा. गोलंदाजांच्या यादीत त्याला स्थान नाही. तरीही तो ठरला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू! स्पर्धेवर त्यानं अमीट ठसा उमटविला होता. रोमेश कालुवितरणच्या साथीनं त्यानं पहिल्या १५ षट्कांमध्ये धुमाकूळ घातला.


श्रीलंकेचं विश्वविजेतेपद...मोलाचा वाटा होता
सनत जयसूर्य ह्याचा.
(छायाचित्र सौजन्य : https://twitter.com/cricfinity) 

धावफलक आकडे मांडतो फक्त. ते आकडे कुठल्या परिस्थितीतून उमटले आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय ते कळण्याचा मार्ग नसतो. ते सहज कळत नाही. उदाहरणादाखल हे पाहू -  भारत-पाकिस्तान-श्रीलंका ह्यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या १९९६च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोनशेहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिला आहे – स्पर्धेत पाचशेहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज. सनत जयसूर्याचा क्रमांक तिथे सोळावा आहे. त्याचे सहकारी अर्जुन रणतुंग, असांक गुरुसिंह आणि अरविंद डी’सिल्व्हा त्याच्याहून वरच्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेत किमान आठ किंवा त्याहून अधिक बळी घेणारे १४ गोलंदाज आहेत. त्यात जयसूर्य सोडाच, श्रीलंकेचा एकही खेळाडू नाही.

...असं असलं तरी स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ठरला सनत जयसूर्य. त्याच्या अष्टपैलू खेळाबद्दल. एकूण सहा सामन्यांमध्ये २२१ धावा, सरासरी जेमतेम ३६.८३ आणि सात बळी. झेल घेतले पाच.

हे आकडे चमकदार नाहीत आणि ते जयसूर्यने नेमक्या वेळी केलेल्या खेळाची साक्षही देत नाहीत. म्हणून तर समीक्षक असं सांगतात की, लाहोरला १७ मार्चचा अंतिम सामना होण्याआधीच ह्या पारितोषिकासाठी जयसूर्यची निवड नक्की झाली होती.

श्रीलंकेला विश्वचषक मिळवून देणारं अरविंद डी’सिल्व्हाचं खणखणीत नाबाद शतकही त्याच्या आड आलं नाही. कारण तोवर जयसूर्यानं स्पर्धेवर अमीट ठसा उमटविला होता.

ह्यापेक्षा अधिक अपेक्षा काय? 
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून जयसूर्याची निवड झाल्यावर त्याचा कर्णधार अर्जुन रणतुंग म्हणाला होता, ‘त्यानं झकास फलंदाजी केली, उत्तम क्षेत्ररक्षण केलं आणि जेव्हा त्याच्या हाती चेंडू दिला, तेव्हा त्यानं मोक्याच्या क्षणी महत्त्वाचे बळी घेतले. एखाद्या सहकारी खेळाडूकडून ह्यापेक्षा अधिक अपेक्षा ती काय करायची?’

एक दिवशीय क्रिकेटमध्ये, त्याच्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ लिंबूटिंबू म्हणून गणला जाई. हे चित्र बदलायला कारणीभूत ठरली १९९६ची स्पर्धा. दखलपात्र, ‘चमत्कार घडविण्याची क्षमता असलेला संघ’ अशी त्यांची ओळख झाली. त्याचं कारण विश्वविजेतेपद आणि ते मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा सनत जयसूर्य.

त्यानंतर २००३च्या स्पर्धेत श्रीलंकेनं उपान्त्य फेरीपर्यंत मजल मारली. त्यापुढच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली आणि उपविजेतेपदं मिळविलं.

ह्या स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडला हवं होतं. पण आशिया खंडातील तीन देशांनी इंग्लंडच्या जवळपास दुप्पट बोली लावून स्पर्धेच्या आयोजनाची संधी खेचून घेतली. यजमानाला विश्वचषक जिंकता येत नाही, हा आतापर्यंतचा अनुभव श्रीलंकेनं मोडून काढला. चषक जिंकणारा तो तिसरा आशियाई देश बनला.

ह्या स्पर्धेनं बरेच जुने विक्रम मोडीत काढले, काही नवे पायंडे रचले. खेळण्याचं टाळून प्रतिस्पर्ध्याला पुढे चाल देण्याचा अनुभवही इथंच आला. सुरक्षिततेच्या कारणावरून श्रीलंकेत न खेळण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज ह्यांनी घेतला. त्यामुळं श्रीलंकेला सलामीच्या सामन्यातच ऑस्ट्रेलियाकडून पुढे चाल मिळाली. गटवार लढतीत दोन विजयांचे चार गुण खात्यात सहज जमा झाले. पण त्यामुळे श्रीलंकेच्या कामगिरीला गालबोट लागत नाहीच मुळी.
 

फटकेबाजीला उधाण...स्फोटक जयसूर्य.
(छायाचित्र सौजन्य : sanathjaysuriyablog.wordprss.com) 

स्फोटक, यशस्वी सलामीची जोडी
जयसूर्याच्या धडाकेबाज खेळाच्या परिणामी श्रीलंकेकडे पाहण्याचा क्रिकेट जगताचा दृष्टिकोण बदलला. ह्या स्पर्धेच्या आधीपर्यंत जयसूर्याची ओळख होती, दीर्घ काळ मारा करण्याची क्षमता असलेला डावखुरा फिरकी गोलंदाज. आणि उपयुक्त फलंदाज. कर्णधार रणतुंग आणि संघाचे प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर ह्यांच्या कल्पकतेमुळे जयसूर्याची नवीन ओळख निर्माण झाली.

विश्वचषक स्पर्धेच्या काही महिने आधी जयसूर्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. त्यानंतर यष्टिरक्षक रोमेश कालुवितरण ह्याच्यासह त्याची सलामीची एक अत्यंत स्फोटक, यशस्वी जोडी तयार झाली. क्षेत्ररक्षणावरील निर्बंधांचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना बचावात्मक भूमिका घ्यायला भाग पाडले.

आदल्याच विश्वचषक स्पर्धेपासून नवा नियम लागू झाला होता. एक दिवसाच्या सामन्यांत पहिल्या १५ षट्कांसाठी क्षेत्ररक्षणाचे निर्बंध (तीस यार्डांच्या वर्तुळाबाहेर केवळ दोन क्षेत्ररक्षक) लागू झाले होते. ‘पिंच हिटर’ संकल्पनाही त्याच स्पर्धेत जन्माला आली. पण ती खऱ्या अर्थाने अमलात आणून प्रतिस्पर्ध्यांना दणका दिला तो श्रीलंकेनं.

जयसूर्य व रोमेश कालुवितरण हेयांच्या सलामीच्या जोडीनं सगळं गणितच बदलून टाकलं. तोपर्यंत पहिल्या १५ षट्कांमध्ये ५०-६० धावा पुरेशा मानल्या जात. ही मर्यादा किती निर्दयीपणे ओलांडता येते हे जयसूर्य-कालुवितरण ह्यांनी दाखवून दिलं. त्याचा भारताला दोनदा, इंग्लंड व केनिया यांना प्रत्येकी एकदा फटका बसला.

सुरुवातीच्या ह्या षट्कांमध्ये श्रीलंकेनं केनियाविरुद्ध १२३, भारताविरुद्ध साखळी सामन्यात १०७ आणि उपान्त्य सामन्यात ८६, इंग्लंडविरुद्ध उपान्त्यपूर्व सामन्यात १२१ धावा केल्या. ही स्फोटक सुरुवात सगळं चित्र बदलून टाकणारी होती. त्याचा प्रमुख मानकरी अर्थातच सनत जयसूर्य.

रणतुंगानं स्वातंत्र्य दिलं
खरं तर हे दोघंही काही मूळचे सलामीचे फलंदाज नव्हते. श्रीलंकेचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज मुत्तय्या मुरलीधरन ह्यानं लिहिलं आहे की, मधल्या फळीत खेळताना या दोघांना आपली गुणवत्ता पूर्ण क्षमतेनं दाखविता येत नाही, हे कर्णधार रणतुंग ह्यानं ओळखलं. बेभान, बेडर खेळणाऱ्या या दोघांना सलामीला खेळविण्याचा निर्णय त्यानं घेतला. मुक्तपणे खेळण्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं. तसं खेळताना लवकर बाद झालं तरी हरकत नाही. कारण आमचा नंतरच्या फलंदाजांवर विश्वास होता.

रणतुंगच्या ह्या निर्णयातूनच नवा इतिहास लिहिला गेला. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा सनत-रोमेश जोडीनं उठवला. सलामीच्या गोलंदाजांची त्यांनी बेदरकारपणे पिटाई सुरू केली. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू उचलून मारायला ते अजिबात कचरत नव्हते.

दिल्लीत भारताविरुद्ध सनत-रोमेश यांनी पहिल्या तीन षट्कांमध्येच ४२ धावा फटकावल्या. त्यांनी ५३ धावांची झटपट सलामी दिली. जयसूर्याच्या खेळीनं (७६ चेंडूंमध्ये ७९ धावा, ९ चौकार व २ षट्कार) सचिन तेंडुलकरचं नाबाद शतक झाकोळलं गेलं.

कँडी येथील केनियाविरुद्धच्या सामन्यात या जोडीनं ८३ धावांची सलामी दिली. त्यात जयसूर्य याचा वाटा होता ४४ धावांचा – २७ चेंडू, ५ चौकार व ३ षट्कार. संघाचं अर्धशतक साजरं झालं, ते फक्त २० चेंडूंमध्ये.

अष्टपैलू जयसूर्य
फैसलाबादमधील उपान्त्यपूर्व सामन्यात श्रीलंकेनं इंग्लंडचा ५ गडी व ५६ चेंडू राखून सहज पराभव केला तो जयसूर्याच्या अष्टपैलू खेळामुळे. त्यानं आधी ४६ धावा देऊन दोन गडी बाद केले. त्यातला महत्त्वाचा बळी होता तो फिलिप डी’फ्रिटस याचा. इंग्लंडच्या धावसंख्येला आकार आला तो त्याच्याच ६७ धावांमुळे.

त्यानंतर जयसूर्य फलंदाजीसाठी मैदानात उतरला तोच मुळी इंग्लिश गोलंदाजांची कत्तल करण्याचं लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून. त्यानं ३० चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. विश्वचषकातील सर्वांत जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी. ह्या सामन्यात त्यानं ४४ चेंडूंमध्ये १३ चौकार व ३ षट्कार ह्यांच्या सहायानं ८२ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता – १८६.३६. ह्या तडाखेबंद आणि दिमाखदार खेळीमुळं सहज विजय मिळवत श्रीलंकेनं विश्वचषकाची उपान्त्य फेरी पहिल्यांदाच गाठली.

भारत आणि श्रीलंका ह्या सहयजमानांमधला उपान्त्य सामना वेगळ्याच कारणांमुळे गाजला. कोलकात्याच्या प्रेक्षकांच्या वर्तनानं सामना थांबवावा लागला आणि श्रीलंकेनं अंतिम फेरी गाठली.  सामना पूर्ण खेळवला गेला असता, तरी निकालात बदल झाला असता, असं म्हणणं धाडसाचं ठरेल.

पहिल्या १५ षट्कांमध्ये फटकेबाजी करून प्रतिस्पर्ध्याला दोन पावलं माघार घ्यायला लावण्याची श्रीलंकेची योजना स्पर्धेत पहिल्यांदाच फसली ती इथं. श्रीलंकेच्या खात्यावर अवघी एक धाव असताना जावगल श्रीनाथ ह्यानं दोन्ही सलामीवीरांना बाद केलं होतं. असांक गुरुसिंहही लगेच बाद झाला. अरविंद डी’सिल्व्हा, रोशन महानामा ह्यांची अर्धशतकं व त्यांना रणतुंग, हशन तिलकरत्ने ह्यांची मिळालेली साथ यामुळे श्रीलंकेला ५० षट्कांत २५१ धावांची मजल मारता आली.


(छायाचित्र सौजन्य www.sportsgoogly.com)

सचिनसह तीन बळी आणि दोन झेल
फलंदाजीत अपयशी ठरलेल्या जयसूर्य यानं मग आपल्या डावखुऱ्या फिरकीनं कमाल केली. अर्धशतक पूर्ण केलेला सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर व अजय जाडेजा ह्यांचे बळी मिळवून त्यानं भारताची अवस्था एक बाद ९८वरून आठ बाद १२० अशी दयनीय केली. त्यानं दोन झेलही घेतले. भारतीय संघ एवढ्या सहजपणे पराभवाकडे वाटचाल करत असल्याचे पाहून प्रेक्षकांनी हुल्लडबाजी सुरू केली. त्यांच्या गोंधळामुळे सामना थांबवावा लागला. भारत मैदानाबाहेरही पराभूत झाला होता तेव्हा! 

लाहोरला झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाचा सात गडी व २२ चेंडू राखून सहज पराभव केला. या विजयाचा मानकरी होता डी’सिल्व्हा. त्यानं गोलंदाजाची भूमिका पार पाडताना तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला बऱ्यापैकी आकार देणाऱ्या मार्क टेलर व रिकी पाँटिग यांचा त्यात समावेश होता. नंतर डी’सिल्व्हानं नाबाद शतक (१२४ चेंडूंमध्ये १०७ धावा, १३ चौकार) झळकावित विश्वचषकावर श्रीलंकेचं नाव कोरलं! अंतिम सामन्याचा मानकरी निर्विवादपणे तोच होता. जयसूर्य सात चेंडूंमध्ये नऊ धावा करून धावबाद झाला. पण या विजयात त्याचाही हातभार लागलाच – सर्वाधिक धावा करणारा टेलर व मार्क वॉ यांचे झेल त्यानेच टिपले.

जयसूर्यानं दाखविलेल्या रस्त्याचा महामार्ग
ही स्पर्धा श्रीलंकेची, त्यातही सनत जयसूर्याची होती. स्पर्धेत अरविंद डी’सिल्व्हा चार वेळा सामन्याचा मानकरी ठरला, तर जयसूर्य दोन वेळा. पण त्याचा खेळ नेमक्या वेळी अधिक परिणामकारक ठरलेला, संघाच्या वाटचालीला वेगळी दिशा देणारा होता.

जयसूर्याने सहा सामन्यांतील सहा डावांमध्ये ३६.३३च्या सरासरीने, २२१ धावा केल्या त्या फक्त १६८ चेंडूंमध्ये. त्याचा स्ट्राइक रेट तेव्हाच्या काळात अविश्वसनीय वाटावा असाच होता – १३१.५४. त्याच्या बॅटीतून बरसलेल्या २९ चौकारांनी नि ८ षट्कारांनी रसिकांना बेहद्द खूश करून टाकले होते. गोलंदाज म्हणून ३३ एवढ्या सरासरीनं सात गडी बाद करून आणि पाच झेल टिपून त्यानं आपली उपयुक्तता अधोरेखित केली होती. म्हणूनच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू निर्विवादपणे तोच ठरला. त्यानं घालून दिलेली वाट नंतर टी-20च्या जमान्यात महामार्ग बनली आहे.
….….….….

सतीश स. कुलकर्णी
sats.coool@gmail.com
..........................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक1996 #श्रीलंका #सनत_जयसूर्य #पिंच_हिटर #रोमेश_कालुवितरण #अर्जुन_रणतुंगा #ऑस्ट्रेलिया #अष्टपैलू #स्पर्धेतील_सर्वोत्तम #पंधरा_षट्कं  #टी20

#CWC #CWC2023 #CWC1996 #ODI #SriLanka #Sanath_Jayasuriya #Romesh_Kaluwitharana #Arjuna_Rantunga #Aurstralia #Allrounder #pinchhitter #icc #Best_Player #first_15_overs #T20

.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात २७ एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह विस्तारित स्वरूपात.)

.................

आधीचा लेख इथे वाचता येईल

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

.................
मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...




Saturday, 1 June 2019

फलंदाजी धडाकेबाज अन् नेतृत्व अफलातून

विश्वचषकातील सर्वोत्तम-१
(ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड १९९२)


क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे तीन आठवडे 
बाकी आहेत. एक तपानंतर पुन्हा भारतात होणाऱ्या 
ह्या स्पर्धेबाबत स्वाभाविकपणे कमालीचं औत्सुक्य आहे. कोण 
ठरणार विश्वविजेता? कोण असेल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू?
आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 
खेळाडूंच्या कामगिरीचा हा आलेख.
त्याची सुरुवात न्यूझीलंडच्या मार्टिन क्रो ह्याच्यापासून.


उपान्त्य सामन्यात क्रोच्या बॅटचा पाकिस्तानला तडाखा.
निकाल मात्र इम्रानच्या संघाच्या बाजूनेच लागला.
..................................................................

बरीच भवती न भवती होऊन अखेर खेळल्या गेलेल्या आशियाई चषक स्पर्धेकडं विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून भारतीय क्रिकेटप्रेमींनी पाहिलं. पण रंगीत तालमीपेक्षा महत्त्वाचा असतो तो प्रत्यक्ष प्रयोग. सर्वांचे संघ जाहीर होऊन त्याची पहिली घंटा तर झाली आहे. प्रत्यक्ष पडदा उघडेल तो ५ ऑक्टोबर रोजी. हे नाट्य मग पुढचे ४६ दिवस चालेल. दीर्घ काळानंतर एकच देश यजमान असलेल्या ह्या स्पर्धेत १० शहरांमध्ये ४८ सामने होतील.

मोजकेच देश सहभागी असलेल्या ह्या खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा ४८ वर्षांपूर्वी (१९७५मध्ये) झाली. क्रिकेटच्या माहेरघरी - इंग्लंडमध्ये. वि. वि. करमकर ह्यांच्यासारखे दिग्गज क्रीडासमीक्षक अगदी अलीकडेपर्यंत विचारत - ही कसली विश्वचषक स्पर्धा? फार तर हिला राष्ट्रकुल स्पर्धा म्हणा! ते काही असो; क्रिकेटमधल्या पैशामुळं ह्या खेळानं आता हात-पाय पसरले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सदस्य असलेल्या देशांची संख्या शतकापार (१०८) गेली आहे. त्यामुळे चाहते वाढले आहेत आणि त्यांचं कुतूहलही.

कोण जिंकणार?
कोण जिंकणार यंदा विश्वचषक? यजमान विजेते ठरले त्या २०११ आणि २०१९ स्पर्धांची पुनरावृत्ती होईल? स्पर्धेचा मानकरी कोण असेल - फलंदाज, गोलंदाज की कोणी हरहुन्नरी अष्टपैलू? तो विजेत्या संघाचा असेल की पराभवाची चुटपूट लागलेल्या उपविजेत्या संघाचा? औत्सुक्य वाढविणारे प्रश्न....

विश्वचषकाच्या पहिल्या चार स्पर्धांमध्ये प्रत्येक सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू (‘मॅन ऑफ द मॅच’) निवडला गेला; पण पूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूची निवड मात्र केली गेली नाही. ही उणीव दूर झाली पाचव्या स्पर्धेपासून. तेव्हापासून पुढच्या प्रत्येक स्पर्धेत अशा गुणी खेळाडूची निवड केली जाऊ लागली.

नवनवे पायंडे
स्पर्धेची पाचवी आवृत्ती अनेक अर्थांनी वेगळी ठरली. दक्षिण गोलार्धात झालेली ही पहिलीच स्पर्धा. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्यांनी संयुक्तपणे २२ फेब्रुवारी ते २५ मार्च १९९२ या काळात तिचं आयोजन केलं. सत्तरच्या दशकात ‘पॅकर सर्कस’नं खळबळ उडवून दिली होती; तसंच नावीन्य ह्या स्पर्धेत पाहायला मिळालं. खेळाडूंचे रंगीत पोषाख, प्रकाशझोतातील सामने, पांढऱ्या चेंडूचा वापर... ह्या सगळ्याला सुरुवात झाली ती ह्याच स्पर्धेपासून. वादग्रस्त डकवर्थ-लुईस नियमाचा फटका विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला बसला तो ह्याच स्पर्धेत.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संभाव्य विजेत्या संघांच्या यादीत न्यूझीलंडला कुणी फारसं गांभीर्यानं गृहीत धरलं नव्हतं. त्याचं कारणही तसंच होतं. विश्वचषकाच्या अगदी आधी पाहुण्या इंग्लंडनं ह्या सहयजमानांना त्यांच्याच भूमीवर कसोटी आणि एक दिवशीय, अशा दोन्ही मालिकांमध्ये सपाटून मार दिला होता. त्यामुळेच न्यूझीलंड कुणाच्या खिसगणतीत नव्हतं.

विश्वचषक स्पर्धेचं स्वरूप ह्या वेळी पुन्हा एकदा बदललं होतं. ऐन वेळी दक्षिण आफ्रिकेच्या रूपाने नवव्या संघास मान्यता देण्यात आली. त्यातूनच साखळी पद्धत आली. सहभागी सर्व संघांना एकमेकांशी खेळायचं होतं. साखळीतले सगळे सामने आपल्याच देशात, आपल्या नेहमीच्या वातावरणात खेळायला मिळणार, हे न्यूझीलंडसाठी फायद्याचं होतं.

स्पर्धेतला पहिला धक्का 

दोन यजमानांमधील लढतीनं स्पर्धेला सुरुवात झाली. ऑकलंडच्या ईडन पार्कवर हा सामना झाला. निकालाचा अंदाज व्यक्त करताना बहुतेकांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला झुकतं माप दिलं होतं. त्या मागचं कारण शोधणं अवघड नाही. कागदावर कांगारूंचांच संघ सरस दिसत होता. न्यूझीलंडचा कर्णधार मार्टिन क्रो आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात मात्र काही वेगळं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३७ धावांनी हरवून त्यांनी स्पर्धेतला पहिला धक्का दिला. नंतरच्या महिनाभरात असे बरेच धक्के बसलेले पाहायला मिळाले. ह्या विजयी सलामीनंतर न्यूझीलंडचा दबदबा वाढला. त्याला जागत संघाने सलग सात सामने जिंकले. संभाव्य विजेत्याच्या यादीत क्रोच्या संघाचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाऊ लागलं.

शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानकडून पराभव झाला. पण त्यामुळं फार काही बिघडलं, असं वाटत नव्हतं. घात झाला तो उपान्त्य सामन्यात! न्यूझीलंडची गाठ पुन्हा एकदा पाकिस्तानशी पडली. जखमी झालेला क्रो क्षेत्ररक्षणाच्या वेळी मैदानाबाहेर थांबला; अंतिम सामन्यात तंदुरुस्त असावं म्हणून. पण त्याला तंबूत बसून पाहावं लागलं ते सामना हातातून पुरता निसटल्याचं आणि विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न भंगल्याचं! फारशी कोणाची अपेक्षा नसताना एवढं यश आणि यशाची अपेक्षा केली जात असताना अपयशाच्या दरीत कोसळणं...

ह्या स्पर्धेमध्ये मार्टिन क्रो ह्याची कामगिरी अफलातूनच होती. फलंदाज म्हणून आणि धोरणी कर्णधार म्हणूनही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा संघाची अवस्था नाजूक होती – दोन बाद १३. समोर क्रेग मॅकडरमॉट आणि ब्रूस रीड यांचा तोफखाना सुरू होता. सलामीचा रॉड लॅथम बाद झाला तेव्हा संघाच्या धावा होत्या ५३. तिथून पुढं क्रोनं सूत्रं हाती घेतली. केन रुदरफोर्ड याला साथीला घेऊन त्यानं चौथ्या जोडीसाठी ११८ धावांची भागीदारी केली. डाव संपायला एक चेंडू बाकी असताना त्यानं शतक पूर्ण केलं. एकूण ११ चौकारांसह १३४ चेंडूंमध्ये नाबाद १००. कर्णधाराला साजेशी खेळी.

नवा चेंडू फिरकी गोलंदाजाकडे
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड बून व जिऑफ मार्श यांना दुसऱ्याच षट्कात आश्चर्याचा मोठा धक्का बसला. ख्रिस केर्न्स ह्याचं सलामीचं षट्क संपल्यावर मार्टिन क्रोनं चेंडू दिला फिरकी गोलंदाज दीपक पटेल ह्याच्याकडे. नवा चेंडू आणि फिरकी गोलंदाजाच्या हाती? दीपक पटेलची भरपूर पिटाई होणार असं समालोचन कक्षात बसलेल्या दिग्गजांना वाटत होतं. तसं काही घडलं नाही. पटेलनं पहिल्या सात षट्कांत फक्त १९ धावा दिल्या. नंतर त्यानं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅलन बॉर्डर याचा बळी मिळविला. ‘जुगार’ म्हणविला जाणारा डाव क्रोनं हुकमी ठरविला होता.

पहिल्या सामन्यात शतक झलकावल्यानंतर फलंदाज म्हणून क्रोची स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्ध पाच आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद तीन अशा खेळीनंतर त्याचा तडाखा बसला तो झिम्बाब्वे संघाला. त्या सामन्यात त्यानं ८ चौकार व २ षट्कारांसह ४३ चेंडूंमध्ये ७४ धावा तडकावल्या. टी-20 क्रिकेट तेव्हा कुणाच्या स्वप्नातही नव्हतं आणि त्याला साजेशी खेळी. आजच्या भाषेत बोलायचं तर त्याचा स्ट्राईक रेट होता १७२! त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं चेंडूमागे धाव ह्या गतीने नाबाद ८१ धावा चोपताना डझनभर चौकार मारले. भारताविरुद्ध नाबाद २६, इंग्लंडविरुद्ध ८१ चेंडूंमध्ये नाबाद ७३ (चार चौकार) असा रतीब घालत तो संघाला विजयाकडे नेत राहिला.

साखळीतील शेवटचा सामना खेळताना मात्र कर्णधार क्रो अपयशी ठरला. त्याच्या संघाचा पहिला पराभव झाला. पाकिस्तानविरुद्ध त्याला जेमतेम तीन धावा काढता आल्या. उपान्त्य फेरीत पुन्हा पाकिस्तानविरुद्ध ८३ चेंडूंतच त्याने ९१ धावा फटकावल्या. त्यात त्याचे सात चौकार व तीन षट्कार होते. त्याची ही स्फोटक खेळी व्यर्थ ठरली. एकूण तीन वेळा तो सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा होत्या मार्टिन क्रो ह्याच्याच नावावर. त्यानं ११४ सरासरीनं तब्बल ४५६ धावा कुटल्या. त्याचा ‘स्ट्राईक रेट’ ९०.४३ होता. म्हणूनच सर्वानुमते तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. विश्वचषक स्पर्धेत असा बहुमान मिळविणारा पहिला खेळाडू!

कर्णधार क्रो!
केवळ दणकेबाज फलंदाजी केली, स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या ह्यामुळे क्रोची निवड झाली, असं म्हणणं अयोग्यच ठरेल. त्याच्यातील कर्णधारावर ते अन्याय केल्यासारखं होईल. कर्णधार ह्या नात्यानं त्यानं सामन्यागणिक आपली गुणवत्ता सिद्ध केली. विविध कारणांनी आगळ्यावेगळ्या ठरलेल्या ह्या स्पर्धेची काही वैशिष्ट्यं वाढविण्यास त्यानंही हातभार लावला. नवा चेंडू फिरकी गोलंदाजाच्या हाती ठेवण्याची कल्पना त्यातलीच एक. (खरं तर १९७९च्या स्पर्धेत त्याच्याच संघाविरुद्ध भारतानं हा प्रयोग केला होता. तेव्हा भारताचा कर्णधार व्यंकटराघवन ह्याने डावातील दुसऱ्या षट्कासाठी चेंडू बिशनसिंग बेदीकडे सोपविला होता!)

‘पिंच हिटर’ संकल्पनेचा जनकही क्रो हाच होता. पहिल्या १५ षट्कांमध्ये असणारे क्षेत्ररक्षणाचे निर्बंध लक्षात घेऊन, त्याचा फायदा उठविण्यासाठी स्फोटक खेळ करणाऱ्या मार्क ग्रेटबॅच ह्याला स्पर्धेपुरता सलामीवीर बनविण्याचा निर्णय त्यानं घेतला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानं तीन अर्धशतकांसह ३१३ धावा तडकावल्या. हा ‘पिंच हिटर’ सलामीवर दोन वेळा सामन्याचा मानकरी ठरला. जलदगती गोलंदाजांपेक्षा मध्यमगती गोलंदाजावर विश्वास टाकण्याची क्रोची खेळीही यश देऊन गेली. कल्पक धोरणे आखणारा नि त्याची अंमलबजावणी करणारा कर्णधार होता तो. त्यामुळेच अंतिम सामना खेळलेल्या दोन्ही संघांमधील कोणत्याही खेळाडूऐवजी मार्टिन क्रो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला.

अंतिम सामन्यात अक्रम सर्वोत्तम
मेलबर्न इथे २५ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा २२ धावांनी पराभव केला. इंग्लंडला तिसऱ्या वेळी अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानकडून अष्टपैलू खेळ करणारा वसीम अक्रम सामन्याचा मानकरी ठरला. त्याने आधी मोक्याच्या वेळी १८ चेंडूंमध्ये ३३ धावा तडकावल्या. नंतर १० षट्कांत ४९ धावा देऊन तीन गडी बाद केले; त्यात इयान बॉथम आणि लन लॅम्ब यांचा समावेश होता.
.................
(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात २० एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख विस्तारित स्वरूपात.)
.................
(छायाचित्रं stuff.co.nz संकेतस्थळाच्या सौजन्याने)
.................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक1992 #न्यूझीलंड #मार्टिन_क्रो #कर्णधार_क्रो #ऑस्ट्रेलिया #पाकिस्तान #स्पर्धेतील_सर्वोत्तम #पिंच_हिटर

#CWC #CWC2023 #CWC1992 #Captain_Crowe #Martn_Crowe #New_Zealand #Aurstralia #Pakistan #pinchhitter #icc #Player_of_the_Tournament

सचिऽऽन, सचिऽऽन!

  विश्वचषकातील सर्वोत्तम - ४ (दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया - २००३) ‘शांतपणे खेळा’  हा  गांगुलीचा आदेश सचिन-सेहवाग जोडीनं धुडकावला. ...