Wednesday 12 June 2019

सिंग वॉज किंग

विश्वचषकातील सर्वोत्तम - 

(भारत, श्रीलंका व बांग्ला देश - २०११)


‘खास व्यक्तीसाठी विश्वचषक जिंकायचा आहे,’ असं युवराजसिंग म्हणाला होता. विश्वविजेता बनण्याकडं भारतीय संघाची वाटचाल तेव्हा चालू झाली होती. कोण होती ही ‘खास व्यक्ती’ ? स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला युवराजसिंग. विजयामध्ये त्याची कामगिरी होतीच तेवढी मोलाची! स्पर्धेआधी मरगळ आलेल्या युवीला सचिननंच प्रेरणा दिली. मग सामन्यागणिक त्याचा खेळ बहरत गेला. 


‘चलो, बॅग भरो, निकल पडो...’ त्रिफळा उडवल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजाला तंबूचा रस्ता
दाखविणारा युवराज. (छायाचित्र सौजन्य : www.icc-cricket.com)
............................................................

विश्वचषक पुन्हा भारतात आला, तेव्हाची ही गोष्ट. म्हणजे भारताला तिसऱ्या वेळी (संयुक्तपणे) स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली होती. महत्त्वाचं म्हणजे चषक खरंच भारतात आला. २८ वर्षं वाट पाहायला लावून.

स्पर्धा ऐन भरात होती. भारतीय संघाला आणि त्याच्या कोट्यवधी पाठीराख्यांना विजेतेपदाची चाहूल लागली होती. त्याच वेळी युवराजसिंग म्हणाला होता, ‘एका खास व्यक्तीसाठी मला विश्वचषक जिंकून द्यायचा आहे.’

सामन्यागणिक खेळ बहरत असताना युवराज असं बोलला होता. असं म्हणतात की, हे ऐकून सचिनला त्याची पत्नी म्हणाली, ‘हे बहुतेक तुलाच उद्देशून आहे.’ सचिनचं त्यावर उत्तर होतं, ‘नसावं तसं काही. त्याची कुणी तरी खास मैत्रीण असेल. तिच्याचसाठी...’

सचिनसाठी विश्वचषक जिंकलाच!
ज्याच्याबद्दल त्या भारतीय संघातल्या सर्वांनाच अतीव आदर होता, त्या सचिनला खोटं ठरवलं युवराजनं! मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २ एप्रिल २०११ रोजीच्या रात्री  स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून युवराजची निवड झाली. ते पारितोषिक स्वीकारल्यानंतर तो म्हणाला, ‘हा विश्वचषक सचिनसाठी आहे. आम्ही तो जिंकलाच!’

ही स्पर्धा दि. १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०११ ह्या काळात भारत, श्रीलंका आणि बांग्ला देश ह्यांच्या भूमीवर रंगली. पाकिस्तानला सहयजमानपदाची संधी गमवावी लागली, ती तेथील अशांत परिस्थितीमुळे.

‘आजवरची सर्वोत्कृष्ट’ असं कौतुक झालेल्या ह्या स्पर्धेची विविध वैशिष्ट्यं आहेत - मायभूमीवर विश्वविजेता होणारा पहिला संघ भारत ठरला. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन आशियाई देशांमध्ये अंतिम सामना झाला. ‘डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम’चा (डी. आर. एस.) अवलंब करण्यास तिन्ही यजमान देशांनी मान्यता दिली होती.

वेस्ट इंडिजमधील स्पर्धेपेक्षा स्वरूप बदललं. संघ चौदाच होते आणि सामने ४९ झाले. चार गट आणि ‘सुपर एट’ऐवजी, दोन गट आणि त्यातील प्रत्येकी चार संघ उपान्त्यपूर्व फेरीत, अशी आखणी झाली.

सर्वसाधारणपणे अपेक्षित असलेलेच संघ उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले. बांग्ला देश मात्र गटातच बाद झाला. ‘अ’ गटात पाकिस्तान व ‘ब’ गटात दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी राहिले. विजेतेपदासाठी झुंजलेल्या भारत व श्रीलंका यांनी गटात दुसरा क्रमांक मिळविला.

सहाशेहून अधिक धावा
तब्बल ६५६ धावा झालेल्या लढतीत आयर्लंडने इंग्लंडला तीन गडी राखून हरविले. त्या आधी इंग्लंड-भारत लढत ६७६ धावा होऊन बरोबरीत सुटली होती. उपान्त्यपूर्व सामने फारसे रंगले नाहीत. पाकिस्तान आणि श्रीलंका ह्यांनी अनुक्रमे वेस्ट इंडिज व श्रीलंका यांना १० गडी राखून हरवलं. भारतानं ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून आणि न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेवर ४९ धावांनी मात केली.

उपान्त्य फेरीतील चारपैकी तीन संघ आशियाई. त्यातली सर्वांत महत्त्वाची लढत म्हणजे भारत-पाकिस्तान. मोहालीच्या मैदानावर भारतानं पुन्हा पाकिस्तानला अलगद चित केलं. तिकडे कोलंबोमध्ये श्रीलंकेनं न्यूझीलंडवर पाच गडी राखून आरामात विजय मिळविला. अंतिम सामन्यात काय घडलं, तो इतिहास सगळ्यांनाच तोंडपाठ आहे.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान युवराजसिंगमुळे पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडूला मिळाला. भारताच्या विजयामध्ये त्याची कामगिरी होतीच तेवढी मोलाची. तसं पाहायला गेलं, तर ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर इंडेक्स’मध्ये त्याचा क्रमांक होता तिसरा. यादीत पहिल्या क्रमांकावर होता श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान. त्याचे गुण ८०० आणि नंतर होता पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी, ७९० गुणांसह.

युवराजसिंगचे गुण ७६७. असं असतानाही तो सर्वोत्तम कसा ठरला? दिलशानला फलंदाजीत उत्तम गुण, गोलंदाजीत बरे. आफ्रिदी फलंदाजीत जेमतेम, तर गोलंदाजीत उत्तम. युवराजनं दोन्ही ठिकाणी सरस कामगिरी केली. म्हणून कोणत्याच विषयात पहिला न येताही, तो एकुणात पहिला आला!

असा खेळला युवराज

भात्यातला चेंडू आणि खात्यात अजून एक बळी.
(छायाचित्र सौजन्य : bleacherreport.com)
.............................................
युवराजनं फलंदाजीत चमक दाखवली. एकूण आठ डावांत चार वेळा नाबाद राहून त्यानं ३६२ (सरासरी ९०.५, स्ट्राईक रेट ८६.१९) धावा केल्या. त्यात त्याचं एक शतक व चार अर्धशतकं. त्याच्या डावखुऱ्या फिरकीनं २५.१३ या सरासरीनं १५ बळी घेतले. सामन्यात वाट्याची १० षटकं प्रभावीपणे टाकू शकतो, असा विश्वास त्यानं कर्णधाराला दिला.

एका सामन्यात पाच बळी आणि अर्धशतक, अशी कामगिरी करणारा विश्वचषक स्पर्धेतला पहिला खेळाडू म्हणजे युवराज.  एकूण चार वेळा तो सामन्याचा मानकरी ठरला.

अर्थात हे एकदम घडलं नाही. स्पर्धा रंगत गेली, तसा युवराज भरात आला. बांग्ला देशाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. गोलंदाजीत त्यानं काही केलं नाही. अर्धशतक झळकाविणाऱ्या तमीम इक्बालचा झेल घेताना तेवढा तो दिसला.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनीनं बढती दिली. बॅट परजत युवराज मैदानात आला तेव्हा डावातलं तिसावं षटक चालू होतं. धावफलक दोन बाद १८० अशी चांगली परिस्थिती दाखवत होता आणि जोडीला होता तेंडुलकर. ही संधी साधत युवराजनं ५० चेंडूत ५८ धावा केल्या. टाय झालेल्या ह्या लढतीत त्याच्यातील गोलंदाज पुन्हा अपयशी ठरला. एकही गडी बाद न करता त्यानं सात षटकांत ४६ धावा मोजल्या.

आयर्लंडविरुद्धची करामत
पहिल्या दोन्ही सामन्यांतील गोलंदाजीतील अपयशाची भरपाई युवराजनं आयर्लंडविरुद्ध केली. त्यानं आपल्या वाटच्या १० षटकांमध्ये फक्त ३१ धावा देत पाच गडी बाद केले. आयर्लंडची मधली फळी त्याच्या फिरकीपुढं गोंधळून गेली. भारतानं पाच गडी राखून विजय मिळविला. सचिन, सेहवाग, गंभीर, कोहली यांच्याहून अधिक म्हणजे ५० धावा करणारा फलंदाज होता युवराजसिंग. सामन्याचा मानकरी निर्विवादपणे तोच होता.

द नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात युवराजनं स्वतःला पुन्हा सिद्ध केलं. दोन बळी आणि संघाची काहीशी घसरगुंडी उडाली असताना नाबाद अर्धशतक. त्याच्या ह्या खेळामुळं विजय सहज साध्य झाला. या कामगिरीनं त्याला सलग दुसऱ्यांदा सामन्याचा मानकरी बनवलं.

नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत भारतानं गमावली. विश्वविजेत्यांची स्पर्धेतली ही एकमेव हार. ह्या सामन्यात एक बाद २६७ अशी भक्कम परिस्थिती असताना घसरगुंडी उडाली आणि भारताच्या धावा झाल्या सर्व बाद २९६! युवराजनं फक्त १२ धावा केल्या. हाशीम आमला, जॅक कॅलिस, एबी डीव्हिलियर्स यांच्यापुढे त्याच्या फिरकीची मात्रा चालली नाही मुळीच.

खणखणीत शतक
वेस्ट इंडिजविरुद्ध दोन बाद ५१, गंभीर व तेंडुलकर बाद, अशी स्थिती असताना युवी मैदानात उतरला. त्यानं कोहलीबरोबर १२२, नंतर धोनीबरोबर ४५ धावांची भागीदारी केली. संघाला सुस्थितीत नेऊन तो बाद झाला, तेव्हा त्याच्या नावापुढे खणखणीत ११३ धावा (१२३ चेंडू, १० चौकार व दोन षटकार) होत्या. मग वाट्याला आलेल्या चार षटकांत त्यानं डेव्ह थॉमस व आंद्रे रसेल यांचे बळी मिळविले. सामन्याचा मानकरी कोण, हा प्रश्न नव्हताच.

विश्वचषकासाठी संघात निवड होईल की नाही, ह्याची खात्री नसताना युवरजा वर्षभर आधीपासून स्वप्न पाहत होता ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचं. तो म्हणतो, ‘त्या सामन्यात मी खेळणार आणि विजयात वाटा उचलणार, असं चित्र मी दिवसाढवळ्याही रंगवत होतो.’ स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची वेळ आली, तेव्हा युवी पुढंच होता.

अहमदाबादला झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात रिकी पाँटिंगनं शतक झळकावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला पाच बाद २६० एवढीच मजल मारता आली. ब्रॅड हॅडीन व मायकेल क्लार्क ह्यांना युवराजनं बाद केलं आणि कांगारूंच्या धावांच्या वेगाला लगाम बसला. मग बॅट घेऊन त्यानं तेंडुलकर, गंभीर यांच्या मार्गाने संघाला विजयापर्यंत नेलं. भारतानं कांगारूंना पाच गडी राखून हरवलं, तेव्हा तो ५७ धावांवर नाबाद होता. चौथ्या वेळी सामन्याचा मानकरी!

अंतिम सामन्याहून किती तरी अधिक तणाव असलेल्या मोहालीतील पाकिस्तानविरुद्धच्या उपान्त्य सामन्यात युवराजसिंगला भोपळाही फोडता आला नाही. ही कसर त्यानं गोलंदाजीत भरून काढली. असद शफीक व युनीस खान यांची जोडी जमत आहे, असं वाटत असतानाच त्यानं आधी असदची यष्टी वाकविली. नंतर फक्त तीन धावांची भर पडल्यावर त्यानं युनीसला रैनाकडे झेल देणं भाग पाडलं.

मोक्याच्या वेळी बळी
आता कसोटी होती. विश्वचषकासाठी सर्वस्व पणाला लावण्याची वेळ आलेली. कोट्यवधी भारतीयांचे डोळे संघाकडे लागलेले. युवराजनं चेंडू हातात असताना नेमक्या वेळी संधी साधली. अर्शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या कुमार संगकाराला चकवलं आणि धोनीच्या हाती झेल देणं भाग पाडलं.

युवराजचा पुढचा बळी होता तिलन समरवीर. पायचितचं हे अपील पंचांनी फेटाळल्यावर युवीनं धोनीला ‘रिव्ह्यू’ घ्यायला लावला. तो निर्णय अचूक ठरला आणि अर्धशतकी भागीदारी केलेली समरवीर-माहेला जयवर्धन जोडी फुटली. नंतर धोनीनं विजयाचा षटकार मारला तेव्हा समोर होता युवराज. त्यानं (नाबाद २१) धोनीबरोबर ५४ धावांची नाबाद भागीदारी केली होती.

सोपा नव्हता हा प्रवास युवराजसाठी. त्याच्यासाठी आधीचं वर्ष वाईट्ट म्हणावं असं गेलं होतं. संघातली जागा टिकविण्यासाठी धडपड करणं, स्वतःला सिद्ध करणं आवश्यकच होतं. आशियाई चषक स्पर्धेसाठी संघातून त्याला वगळलं होतं. त्याची तंदुरुस्ती आणि हरवलेला सूर याबद्दल शंका व्यक्त झाली होती.

सोनं झळाळून उठलं


युवराजसिंगची तळपती बॅट. भारताच्या धावसंख्येला ती आकार देती झाली.
 (छायाचित्र सौजन्य : www.sportsadaa.com)
...........................................
आधीच्या स्पर्धेतील ग्लेन मॅकग्रासारखीच परिस्थिती होती युवराजची. ‘कशाला घेता त्याला विश्वचषकासाठी?’, असा प्रश्न विचारला जात होता. पण कायाकल्प व्हावा तसं झालं. युवराजरूपी सोनं झळाळून उठलं या स्पर्धेत. संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणालेही, ‘क्रीडाविश्वातलं मी पाहिलेलं कायापालटाचं एक छान उदाहरण म्हणजे युवराज.’

प्रकृतीच्या कुरबुरी सुरू असतानाही युवी खेळत राहिला. ह्या कुरबुरी म्हणजे कर्करोगानं आपल्या अस्तित्वाची दाखविलेली चाहूल होती, हे नंतर कळून आलं. ती लढाईही अर्थातच युवराजने जिंकली.

ज्या सचिनसाठी विश्वचषक जिंकून दिला, असं युवराज म्हणाला, त्यानंच प्रेरणा दिली होती. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वीच सचिनला जाणवलं की, युवराजचं काही तरी बिघडलेलं आहे. त्याच्यात तेवढा उत्साह दिसत नाही.

सचिन ‘क्रिकटुडे’ संकेतस्थळाशी ह्याबद्दल सविस्तर बोलला नंतर. तो म्हणाला, ‘मरगळल्यासारखं दिसणाऱ्या युवराजला बांग्ला देशाविरुद्धच्या सामन्याच्या आदल्या रात्री मी रूमवर जेवायला बोलावलं. खूप वेळ गप्पा मारत बसलो आम्ही. त्याला मी म्हणालो, ‘गड्या, तू थकल्यासारखा दिसतोयस. हे काही चालायचं नाही. उद्यापासून आपण खास प्रॅक्टिस करू. तू थोडा जोर लावला पाहिजेस, असं मला वाटतं. आपण एकत्र सराव करू. तुझा खेळ नक्की उंचावेल, ह्याची मला खातरी आहे.’’

श्रीलंकेला सहा गडी राखून पराभूत करीत भारतानं विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं. गौतम गंभीरने (९७) घातलेल्या पायावर कर्णधार धोनीने (७९ चेंडूंमध्ये नाबाद ९१) कळस चढविल्यानं हा विजय साध्य झाला. तो सामन्याचा मानकरी निवडला गेला.


विश्वविजेतपदाचं स्वप्न साकार झाल्याचा आनंद.
(छायाचित्र सौजन्य : NDTV Sports)
........................................

‘फिनिशर’ धोनीचा षटकार
ह्या सामन्यात धोनीनं स्वत:ला बढती दिली. कोहली बाद झाल्यावर तो मैदानात उतरला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला - हा एवढ्या वर का आला? कारण तोवर विश्वचषकातल्या त्याच्या सर्वोच्च धावा होत्या ३४. गंभीरबरोबर शतकी भागीदारी करून त्यानं डावाला आकार दिला. मग युवराजला साथीला घेतलं. नुवान कुलशेखरच्या चेंडूवर लाँग-ऑनवर धोनीनं खेचलेल्या षट्कारानं दोन गोष्टींवर शिक्कामोर्तब केलं – भारताच्या विश्वविजेतेपदावर आणि त्याच्यातील ‘फिनिशर’वर!

.................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक2011 #युवराजसिंग #युवी #सचिन_तेंडुलकर #भारत #पाकिस्तान #ऑस्ट्रेलिया #श्रीलंका #बांग्लादेश #स्पर्धेतील_सर्वोत्तम #सामन्याचा_मानकरी #एमएस_धोनी #डीआरएस

#CWC #CWC2023 #CWC20011 #ODI #YuvrajSingh #Yuvi #Sachin_Tendulkar #India #Bharat #MS_Dhoni #Pakistan #Aurstralia #SriLanka #BanglaDesh #icc #Best_Player #MoM #drs

.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात  मे २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह आणि विस्तारित स्वरूपात.)
.................

आधीचा लेख इथे वाचता येतील - 

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/WC-Jaysurya.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/cwc-LanceKlusener.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/Sachin2003.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/McGrath2007.html
.................

मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...

1 comment:

  1. युवराजच्या एकूण कारकिर्दीचा आलेख मांडणारा उत्कृष्ट लेख." लढवय्या युवराज" म्हणून कायम लक्षात राहील.

    ReplyDelete

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...