Saturday 1 June 2019

फलंदाजी धडाकेबाज अन् नेतृत्व अफलातून

विश्वचषकातील सर्वोत्तम-१
(ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड १९९२)


क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे तीन आठवडे 
बाकी आहेत. एक तपानंतर पुन्हा भारतात होणाऱ्या 
ह्या स्पर्धेबाबत स्वाभाविकपणे कमालीचं औत्सुक्य आहे. कोण 
ठरणार विश्वविजेता? कोण असेल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू?
आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 
खेळाडूंच्या कामगिरीचा हा आलेख.
त्याची सुरुवात न्यूझीलंडच्या मार्टिन क्रो ह्याच्यापासून.


उपान्त्य सामन्यात क्रोच्या बॅटचा पाकिस्तानला तडाखा.
निकाल मात्र इम्रानच्या संघाच्या बाजूनेच लागला.
..................................................................

बरीच भवती न भवती होऊन अखेर खेळल्या गेलेल्या आशियाई चषक स्पर्धेकडं विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून भारतीय क्रिकेटप्रेमींनी पाहिलं. पण रंगीत तालमीपेक्षा महत्त्वाचा असतो तो प्रत्यक्ष प्रयोग. सर्वांचे संघ जाहीर होऊन त्याची पहिली घंटा तर झाली आहे. प्रत्यक्ष पडदा उघडेल तो ५ ऑक्टोबर रोजी. हे नाट्य मग पुढचे ४६ दिवस चालेल. दीर्घ काळानंतर एकच देश यजमान असलेल्या ह्या स्पर्धेत १० शहरांमध्ये ४८ सामने होतील.

मोजकेच देश सहभागी असलेल्या ह्या खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा ४८ वर्षांपूर्वी (१९७५मध्ये) झाली. क्रिकेटच्या माहेरघरी - इंग्लंडमध्ये. वि. वि. करमकर ह्यांच्यासारखे दिग्गज क्रीडासमीक्षक अगदी अलीकडेपर्यंत विचारत - ही कसली विश्वचषक स्पर्धा? फार तर हिला राष्ट्रकुल स्पर्धा म्हणा! ते काही असो; क्रिकेटमधल्या पैशामुळं ह्या खेळानं आता हात-पाय पसरले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सदस्य असलेल्या देशांची संख्या शतकापार (१०८) गेली आहे. त्यामुळे चाहते वाढले आहेत आणि त्यांचं कुतूहलही.

कोण जिंकणार?
कोण जिंकणार यंदा विश्वचषक? यजमान विजेते ठरले त्या २०११ आणि २०१९ स्पर्धांची पुनरावृत्ती होईल? स्पर्धेचा मानकरी कोण असेल - फलंदाज, गोलंदाज की कोणी हरहुन्नरी अष्टपैलू? तो विजेत्या संघाचा असेल की पराभवाची चुटपूट लागलेल्या उपविजेत्या संघाचा? औत्सुक्य वाढविणारे प्रश्न....

विश्वचषकाच्या पहिल्या चार स्पर्धांमध्ये प्रत्येक सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू (‘मॅन ऑफ द मॅच’) निवडला गेला; पण पूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूची निवड मात्र केली गेली नाही. ही उणीव दूर झाली पाचव्या स्पर्धेपासून. तेव्हापासून पुढच्या प्रत्येक स्पर्धेत अशा गुणी खेळाडूची निवड केली जाऊ लागली.

नवनवे पायंडे
स्पर्धेची पाचवी आवृत्ती अनेक अर्थांनी वेगळी ठरली. दक्षिण गोलार्धात झालेली ही पहिलीच स्पर्धा. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्यांनी संयुक्तपणे २२ फेब्रुवारी ते २५ मार्च १९९२ या काळात तिचं आयोजन केलं. सत्तरच्या दशकात ‘पॅकर सर्कस’नं खळबळ उडवून दिली होती; तसंच नावीन्य ह्या स्पर्धेत पाहायला मिळालं. खेळाडूंचे रंगीत पोषाख, प्रकाशझोतातील सामने, पांढऱ्या चेंडूचा वापर... ह्या सगळ्याला सुरुवात झाली ती ह्याच स्पर्धेपासून. वादग्रस्त डकवर्थ-लुईस नियमाचा फटका विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला बसला तो ह्याच स्पर्धेत.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संभाव्य विजेत्या संघांच्या यादीत न्यूझीलंडला कुणी फारसं गांभीर्यानं गृहीत धरलं नव्हतं. त्याचं कारणही तसंच होतं. विश्वचषकाच्या अगदी आधी पाहुण्या इंग्लंडनं ह्या सहयजमानांना त्यांच्याच भूमीवर कसोटी आणि एक दिवशीय, अशा दोन्ही मालिकांमध्ये सपाटून मार दिला होता. त्यामुळेच न्यूझीलंड कुणाच्या खिसगणतीत नव्हतं.

विश्वचषक स्पर्धेचं स्वरूप ह्या वेळी पुन्हा एकदा बदललं होतं. ऐन वेळी दक्षिण आफ्रिकेच्या रूपाने नवव्या संघास मान्यता देण्यात आली. त्यातूनच साखळी पद्धत आली. सहभागी सर्व संघांना एकमेकांशी खेळायचं होतं. साखळीतले सगळे सामने आपल्याच देशात, आपल्या नेहमीच्या वातावरणात खेळायला मिळणार, हे न्यूझीलंडसाठी फायद्याचं होतं.

स्पर्धेतला पहिला धक्का 

दोन यजमानांमधील लढतीनं स्पर्धेला सुरुवात झाली. ऑकलंडच्या ईडन पार्कवर हा सामना झाला. निकालाचा अंदाज व्यक्त करताना बहुतेकांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला झुकतं माप दिलं होतं. त्या मागचं कारण शोधणं अवघड नाही. कागदावर कांगारूंचांच संघ सरस दिसत होता. न्यूझीलंडचा कर्णधार मार्टिन क्रो आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात मात्र काही वेगळं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३७ धावांनी हरवून त्यांनी स्पर्धेतला पहिला धक्का दिला. नंतरच्या महिनाभरात असे बरेच धक्के बसलेले पाहायला मिळाले. ह्या विजयी सलामीनंतर न्यूझीलंडचा दबदबा वाढला. त्याला जागत संघाने सलग सात सामने जिंकले. संभाव्य विजेत्याच्या यादीत क्रोच्या संघाचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाऊ लागलं.

शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानकडून पराभव झाला. पण त्यामुळं फार काही बिघडलं, असं वाटत नव्हतं. घात झाला तो उपान्त्य सामन्यात! न्यूझीलंडची गाठ पुन्हा एकदा पाकिस्तानशी पडली. जखमी झालेला क्रो क्षेत्ररक्षणाच्या वेळी मैदानाबाहेर थांबला; अंतिम सामन्यात तंदुरुस्त असावं म्हणून. पण त्याला तंबूत बसून पाहावं लागलं ते सामना हातातून पुरता निसटल्याचं आणि विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न भंगल्याचं! फारशी कोणाची अपेक्षा नसताना एवढं यश आणि यशाची अपेक्षा केली जात असताना अपयशाच्या दरीत कोसळणं...

ह्या स्पर्धेमध्ये मार्टिन क्रो ह्याची कामगिरी अफलातूनच होती. फलंदाज म्हणून आणि धोरणी कर्णधार म्हणूनही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा संघाची अवस्था नाजूक होती – दोन बाद १३. समोर क्रेग मॅकडरमॉट आणि ब्रूस रीड यांचा तोफखाना सुरू होता. सलामीचा रॉड लॅथम बाद झाला तेव्हा संघाच्या धावा होत्या ५३. तिथून पुढं क्रोनं सूत्रं हाती घेतली. केन रुदरफोर्ड याला साथीला घेऊन त्यानं चौथ्या जोडीसाठी ११८ धावांची भागीदारी केली. डाव संपायला एक चेंडू बाकी असताना त्यानं शतक पूर्ण केलं. एकूण ११ चौकारांसह १३४ चेंडूंमध्ये नाबाद १००. कर्णधाराला साजेशी खेळी.

नवा चेंडू फिरकी गोलंदाजाकडे
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड बून व जिऑफ मार्श यांना दुसऱ्याच षट्कात आश्चर्याचा मोठा धक्का बसला. ख्रिस केर्न्स ह्याचं सलामीचं षट्क संपल्यावर मार्टिन क्रोनं चेंडू दिला फिरकी गोलंदाज दीपक पटेल ह्याच्याकडे. नवा चेंडू आणि फिरकी गोलंदाजाच्या हाती? दीपक पटेलची भरपूर पिटाई होणार असं समालोचन कक्षात बसलेल्या दिग्गजांना वाटत होतं. तसं काही घडलं नाही. पटेलनं पहिल्या सात षट्कांत फक्त १९ धावा दिल्या. नंतर त्यानं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅलन बॉर्डर याचा बळी मिळविला. ‘जुगार’ म्हणविला जाणारा डाव क्रोनं हुकमी ठरविला होता.

पहिल्या सामन्यात शतक झलकावल्यानंतर फलंदाज म्हणून क्रोची स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्ध पाच आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद तीन अशा खेळीनंतर त्याचा तडाखा बसला तो झिम्बाब्वे संघाला. त्या सामन्यात त्यानं ८ चौकार व २ षट्कारांसह ४३ चेंडूंमध्ये ७४ धावा तडकावल्या. टी-20 क्रिकेट तेव्हा कुणाच्या स्वप्नातही नव्हतं आणि त्याला साजेशी खेळी. आजच्या भाषेत बोलायचं तर त्याचा स्ट्राईक रेट होता १७२! त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं चेंडूमागे धाव ह्या गतीने नाबाद ८१ धावा चोपताना डझनभर चौकार मारले. भारताविरुद्ध नाबाद २६, इंग्लंडविरुद्ध ८१ चेंडूंमध्ये नाबाद ७३ (चार चौकार) असा रतीब घालत तो संघाला विजयाकडे नेत राहिला.

साखळीतील शेवटचा सामना खेळताना मात्र कर्णधार क्रो अपयशी ठरला. त्याच्या संघाचा पहिला पराभव झाला. पाकिस्तानविरुद्ध त्याला जेमतेम तीन धावा काढता आल्या. उपान्त्य फेरीत पुन्हा पाकिस्तानविरुद्ध ८३ चेंडूंतच त्याने ९१ धावा फटकावल्या. त्यात त्याचे सात चौकार व तीन षट्कार होते. त्याची ही स्फोटक खेळी व्यर्थ ठरली. एकूण तीन वेळा तो सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा होत्या मार्टिन क्रो ह्याच्याच नावावर. त्यानं ११४ सरासरीनं तब्बल ४५६ धावा कुटल्या. त्याचा ‘स्ट्राईक रेट’ ९०.४३ होता. म्हणूनच सर्वानुमते तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. विश्वचषक स्पर्धेत असा बहुमान मिळविणारा पहिला खेळाडू!

कर्णधार क्रो!
केवळ दणकेबाज फलंदाजी केली, स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या ह्यामुळे क्रोची निवड झाली, असं म्हणणं अयोग्यच ठरेल. त्याच्यातील कर्णधारावर ते अन्याय केल्यासारखं होईल. कर्णधार ह्या नात्यानं त्यानं सामन्यागणिक आपली गुणवत्ता सिद्ध केली. विविध कारणांनी आगळ्यावेगळ्या ठरलेल्या ह्या स्पर्धेची काही वैशिष्ट्यं वाढविण्यास त्यानंही हातभार लावला. नवा चेंडू फिरकी गोलंदाजाच्या हाती ठेवण्याची कल्पना त्यातलीच एक. (खरं तर १९७९च्या स्पर्धेत त्याच्याच संघाविरुद्ध भारतानं हा प्रयोग केला होता. तेव्हा भारताचा कर्णधार व्यंकटराघवन ह्याने डावातील दुसऱ्या षट्कासाठी चेंडू बिशनसिंग बेदीकडे सोपविला होता!)

‘पिंच हिटर’ संकल्पनेचा जनकही क्रो हाच होता. पहिल्या १५ षट्कांमध्ये असणारे क्षेत्ररक्षणाचे निर्बंध लक्षात घेऊन, त्याचा फायदा उठविण्यासाठी स्फोटक खेळ करणाऱ्या मार्क ग्रेटबॅच ह्याला स्पर्धेपुरता सलामीवीर बनविण्याचा निर्णय त्यानं घेतला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानं तीन अर्धशतकांसह ३१३ धावा तडकावल्या. हा ‘पिंच हिटर’ सलामीवर दोन वेळा सामन्याचा मानकरी ठरला. जलदगती गोलंदाजांपेक्षा मध्यमगती गोलंदाजावर विश्वास टाकण्याची क्रोची खेळीही यश देऊन गेली. कल्पक धोरणे आखणारा नि त्याची अंमलबजावणी करणारा कर्णधार होता तो. त्यामुळेच अंतिम सामना खेळलेल्या दोन्ही संघांमधील कोणत्याही खेळाडूऐवजी मार्टिन क्रो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला.

अंतिम सामन्यात अक्रम सर्वोत्तम
मेलबर्न इथे २५ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा २२ धावांनी पराभव केला. इंग्लंडला तिसऱ्या वेळी अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानकडून अष्टपैलू खेळ करणारा वसीम अक्रम सामन्याचा मानकरी ठरला. त्याने आधी मोक्याच्या वेळी १८ चेंडूंमध्ये ३३ धावा तडकावल्या. नंतर १० षट्कांत ४९ धावा देऊन तीन गडी बाद केले; त्यात इयान बॉथम आणि लन लॅम्ब यांचा समावेश होता.
.................
(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात २० एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख विस्तारित स्वरूपात.)
.................
(छायाचित्रं stuff.co.nz संकेतस्थळाच्या सौजन्याने)
.................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक1992 #न्यूझीलंड #मार्टिन_क्रो #कर्णधार_क्रो #ऑस्ट्रेलिया #पाकिस्तान #स्पर्धेतील_सर्वोत्तम #पिंच_हिटर

#CWC #CWC2023 #CWC1992 #Captain_Crowe #Martn_Crowe #New_Zealand #Aurstralia #Pakistan #pinchhitter #icc #Player_of_the_Tournament

No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...