Friday, 7 June 2019

सनत जयसूर्य... पंधरा षट्कांतले वादळ

(झी मराठी दिशा साप्ताहिकाने प्रसिद्ध केलेल्या विश्वचषकातील सर्वोत्तम मालिकेत २७ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला दुसरा लेख.)
...... 

सनत जयसूर्य... उधाणलेली फलंदाजी.
(छायाचित्र सौजन्य - www.sportsgoogly.com)
धावफलक आकडे मांडतो फक्त. ते आकडे कुठल्या परिस्थितीतून उमटले आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय ते त्यातून सहज कळत नाही. भारत-पाकिस्तान-श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या १९९६च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोनशेहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिला आहे – स्पर्धेत पाचशेहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज. सनत जयसूर्याचा क्रमांक तिथे सोळावा आहे. त्याचे सहकारी अर्जुन रणतुंग, असांक गुरुसिंह आणि अरविंद डीसिल्व्हा त्याच्याहून वरच्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेत किमान आठ किंवा त्याहून अधिक बळी घेणारे १४ गोलंदाज आहेत. त्यात जयसूर्य सोडाच, श्रीलंकेचा एकही खेळाडू नाही.

...असं असलं तरी स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ठरला सनत जयसूर्य. अष्टपैलू खेळाबद्दल. एकूण सहा सामन्यांमध्ये २२१ धावा, सरासरी जेमतेम ३६.८३ आणि सात बळी. झेल घेतले पाच. हे आकडे चमकदार नाहीत. पण ते जयसूर्यने नेमक्या वेळी केलेल्या खेळाची साक्षही देत नाहीत. म्हणून तर समीक्षक असं सांगतात की, लाहोरला १७ मार्चचा अंतिम सामना होण्याआधीच या पारितोषिकासाठी जयसूर्यची निवड नक्की झाली होती. श्रीलंकेला विश्वचषक मिळवून देणारं अरविंद डीसिल्व्हाचं खणखणीत नाबाद शतकही त्याच्या आड आलं नाही. कारण तोवर जयसूर्यानं स्पर्धेवर अमीट ठसा उमटविला होता.

या स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडला हवं होतं. पण आशिया खंडातील तीन देशांनी इंग्लंडच्या जवळपास दुप्पट बोली लावून स्पर्धेच्या आयोजनाची संधी खेचून घेतली. यजमानाला विश्वचषक जिंकता येत नाही, हा आतापर्यंतचा अनुभव श्रीलंकेनं मोडून काढला. हा चषक जिंकणारा तो तिसरा आशियाई देश बनला. या स्पर्धेनं बरेच जुने विक्रम मोडीत काढले, काही नवे पायंडे रचले. खेळण्याचं टाळून प्रतिस्पर्ध्याला पुढे चाल देण्याचा अनुभवही इथंच आला. सुरक्षिततेच्या कारणावरून श्रीलंकेत न खेळण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज या संघांनी घेतला. त्यामुळं श्रीलंकेला सलामीच्या सामन्यातच ऑस्ट्रेलियाकडून पुढे चाल मिळाली. गटवार लढतीत दोन विजयांचे चार गुण खात्यात सहज जमा झाले. पण त्यामुळे श्रीलंकेच्या कामगिरीला गालबोट लागत नाहीच मुळी.

आदल्याच विश्वचषक स्पर्धेपासून नवा नियम लागू झाला होता. एक दिवसाच्या सामन्यांत पहिल्या १५ षट्कांसाठी क्षेत्ररक्षणाचे निर्बंध (तीस यार्डांच्या वर्तुळाबाहेर केवळ दोन क्षेत्ररक्षक) लागू झाले होते. पिंच हिटर संकल्पनाही त्याच स्पर्धेत जन्माला आली. पण ती खऱ्या अर्थाने अमलात आणून प्रतिस्पर्ध्यांना दणका दिला तो श्रीलंकेनं. जयसूर्य व रोमेश कालुवितरण यांच्या सलामीच्या जोडीनं सगळं गणितच बदलून टाकलं. तोपर्यंत पहिल्या १५ षट्कांमध्ये ५०-६० धावा पुरेशा मानल्या जात. ही मर्यादा किती निर्दयीपणे ओलांडता येते हे जयसूर्य-कालुवितरण जोडीनं दाखवून दिलं. त्याचा भारताला दोनदा, इंग्लंड व केनिया यांना प्रत्येकी एकदा फटका बसला. या षट्कांमध्ये श्रीलंकेनं केनियाविरुद्ध १२३, भारताविरुद्ध साखळी सामन्यात १०७ आणि उपान्त्य सामन्यात ८६, इंग्लंडविरुद्ध उपान्त्यपूर्व सामन्यात १२१ धावा केल्या. ही स्फोटक सुरुवात सगळं चित्र बदलून टाकणारी होती. त्याचा प्रमुख मानकरी अर्थातच सनत जयसूर्य.

खरं तर हे दोघंही काही मूळचे सलामीचे फलंदाज नव्हते. श्रीलंकेचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज मुतय्या मुरलीधरन यानं लिहिलं आहे की, मधल्या फळीत खेळताना या दोघांना आपली गुणवत्ता पूर्ण क्षमतेनं दाखविता येत नाही, हे कर्णधार रणतुंगानं ओळखलं. बेभान, बेडर खेळणाऱ्या या दोघांना सलामीला खेळविण्याचा निर्णय त्यानं घेतला. मुक्तपणे खेळण्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं. तसं खेळताना लवकर बाद झालं तरी हरकत नाही. कारण आमचा नंतरच्या फलंदाजांवर विश्वास होता.

रणतुंगाच्या या निर्णयातूनच नवा इतिहास लिहिला गेला. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा सनत-रोमेश जोडीनं उठवला. सलामीच्या गोलंदाजांची त्यांनी बेदरकारपणे पिटाई सुरू केली. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू उचलून मारायला ते अजिबात कचरत नव्हते. दिल्लीत भारताविरुद्ध सनत-रोमेश यांनी पहिल्या तीन षट्कांतच ४२ धावा फटकावल्या. त्यांनी ५३ धावांची झटपट सलामी दिली. जयसूर्याच्या खेळीनं (७६ चेंडूंमध्ये ७९ धावा, चौकार व षट्कार) सचिन तेंडुलकरचं नाबाद शतक झाकोळलं गेलं. कँडी येथील केनियाविरुद्धच्या सामन्यात या जोडीनं ८३ धावांची सलामी दिली. त्यात जयसूर्य याचा वाटा होता ४४ धावांचा – २७ चेंडू, चौकार व षट्कार. संघाचं अर्धशतक साजरं झालं, ते फक्त २० चेंडूंमध्ये.

फैसलाबादमधील उपान्त्यपूर्व सामन्यात श्रीलंकेनं इंग्लंडचा गडी व ५६ चेंडू राखून सहज पराभव केला तो जयसूर्याच्या अष्टपैलू खेळामुळे. त्यानं आधी ४६ धावा देऊन दोन गडी बाद केले. त्यातला महत्त्वाचा बळी होता तो फिलिप डीफ्रिटस याचा. इंग्लंडच्या धावसंख्येला आकार आला तो त्याच्याच ६७ धावांमुळे. त्यानंतर जयसूर्य फलंदाजीसाठी मैदानात उतरला तोच मुळी इंग्लिश गोलंदाजांची कत्तल करण्याचे लक्ष्य ठेवून. त्यानं ३० चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. विश्वचषकातील सर्वांत जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी. या सामन्यात त्यानं ४४ चेंडूंमध्ये १३ चौकार व षट्कार यांच्या सहायानं ८२ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता – १८६.३६. या दिमाखदार विजयामुळे श्रीलंकेनं विश्वचषकाची उपान्त्य फेरी पहिल्यांदाच गाठली.

भारत आणि श्रीलंका या सहयजमानांमधला उपान्त्य सामना वेगळ्याच कारणांमुळे गाजला. कोलकात्याच्या प्रेक्षकांच्या वर्तनानं सामना थांबवावा लागला आणि श्रीलंकेनं अंतिम फेरीत प्रवेश केला. अर्थात्, सामना पूर्ण खेळवला गेला असता, तरी निकालात बदल झाला असता, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. पहिल्या १५ षट्कांमध्ये फटकेबाजी करून प्रतिस्पर्ध्याला दोन पावलं माघार घ्यायला लावण्याची श्रीलंकेची योजना पहिल्यांदाच फसली. श्रीलंकेच्या खात्यावर अवघी एक धाव असताना जावगल श्रीनाथ यानं दोन्ही सलामीवीरांना बाद केलं होतं. असांक गुरुसिंहही लगेच बाद झाला. अरविंद डीसिल्व्हा, रोशन महानामा यांची अर्धशतके व त्यांना रणतुंग, हशन तिलकरत्ने यांची मिळालेली साथ यामुळे श्रीलंकेला ५० षट्कांत २५१ धावांची मजल मारता आली.

फलंदाजीत अपयशी ठरलेल्या जयसूर्य यानं मग आपल्या डावखुऱ्या फिरकीनं कमाल केली. अर्धशतक पूर्ण केलेला सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर व अजय जाडेजा यांचे बळी मिळवून त्यानं भारताची अवस्था एक बाद ९८वरून आठ बाद १२० अशी दयनीय केली. त्यानं दोन झेलही घेतले. भारतीय संघ एवढ्या सहजपणे पराभवाकडे वाटचाल करत असल्याचे पाहून प्रेक्षकांनी हुल्लडबाजी सुरू केली. या गोंधळामुळे सामना थांबवावा लागला. भारत मैदानाबाहेरही पराभूत झाला होता तेव्हा!

लाहोरला झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाचा सात गडी व २२ चेंडू राखून सहज पराभव केला. या विजयाचा मानकरी होता डीसिल्व्हा. त्यानं गोलंदाजाची भूमिका पार पाडताना तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला बऱ्यापैकी आकार देणाऱ्या मार्क टेलर व रिकी पाँटिग यांचा त्यात समावेश होता. नंतर डीसिल्व्हानं नाबाद शतक (१२४ चेंडूंमध्ये १०७ धावा, १३ चौकार) झळकावित विश्वचषकावर श्रीलंकेचं नाव कोरलं! अंतिम सामन्याचा मानकरी निर्विवादपणे तोच होता. जयसूर्य सात चेंडूंमध्ये नऊ धावा करून धावबाद झाला. पण या विजयात त्याचाही हातभार लागलाच – सर्वाधिक धावा करणारा टेलर व मार्क वॉ यांचे झेल त्यानेच टिपले.

(छायाचित्र सौजन्य - sanathjayasuriyablog.wordpress.com)
ही स्पर्धा श्रीलंकेची, त्यातही सनत जयसूर्याची होती. स्पर्धेत अरविंद डीसिल्व्हा चार वेळा सामन्याचा मानकरी ठरला, तर जयसूर्य दोन वेळा. पण त्याचा खेळ नेमक्या वेळी अधिक परिणामकारक ठरलेला, संघाच्या वाटचालीला वेगळी दिशा देणारा होता. त्याने सहा सामन्यांतील सहा डावांमध्ये ३६.३३च्या सरासरीने, २२१ धावा केल्या त्या फक्त १६८ चेंडूंमध्ये. त्याचा स्ट्राइक रेट तेव्हाच्या काळात अविश्वसनीय वाटावा असाच होता – १३१.५४. त्याच्या बॅटीतून बरसलेल्या २९ चौकारांनी नि षट्कारांनी रसिकांना बेहद्द खूश करून टाकले होते. गोलंदाज म्हणून ३३ एवढ्या सरासरीनं सात गडी बाद करून आणि पाच झेल टिपून त्यानं आपली उपयुक्तता अधोरेखित केली होती. म्हणूनच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू निर्विवादपणे तोच ठरला. त्यानं घालून दिलेली वाट टी-20च्या जमान्यात महामार्ग बनली आहे.

No comments:

Post a Comment

'हिंडता फिरता' अध्यक्ष उदगीरला लाभता

  'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्या...