Tuesday 21 September 2021

राजीव-स्मृती नि खारीचा वाटा!

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्याला, आपल्या सभोवतालाला अनेक धक्के दिले. जवळची माणसं पाहता पाहता कायमची दूरच्या प्रवासाला गेली. त्यातल्या काहींचं निधन 'अकाली' शब्दाची व्याप्ती पुरेशी स्पष्ट करणारं होतं. त्यापैकीच एक म्हणजे काँग्रेसचे तरुण खासदार राजीव सातव. मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात त्यांच्या निधनाची बातमी अक्षरशः कोसळली. अवघा महाराष्ट्र, देश हळहळला. पक्षीय अभिनिवेश लांब ठेवून लोक मोकळेपणानं आपल्या दुःखाला वाट मोकळी करून देत व्यक्त होत राहिले. त्यात हळहळ होती, खंत होती. पक्षीय राजकारण ह्या दुःखापासून शेकडो मैल दूर होतं.

राजीव सातव ह्यांच्या निधनाला जेमतेम चार महिने झाले. त्यांचा आज (दि. २१ सप्टेंबर) जन्मदिन. ह्यानिमित्ताने कळमनुरी येथे आज  'संसदरत्न राजीव सातव स्मृतिपुष्प' ह्या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन होत आहे. नांदेडच्या अभंग पुस्तकालयानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक कॉफी-टेबल आकाराचं आणि २७२ पानांचं आहे. सातव ह्यांच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यांत त्यांच्या कारकिर्दीचा सर्वांगीण आढावा घेणारा हा स्मृतिग्रंथ प्रकाशित होत आहे. ह्या कामात सहभागी होण्याची संधी मिळाली, ते काम उत्तम होईल, ह्यासाठी चांगल्यापैकी हातभार लागला, ह्याचं मोठं समाधान आहे.

पुस्तकाचे संपादक व नांदेडचे पत्रकार संजीव कुळकर्णी ह्यांनी जूनमध्ये ह्या पुस्तक-प्रपंचाची कल्पना दिली. त्यासाठी आम्ही एकदा औरंगाबाद येथे भेटलोही. तिथं त्यांनी सातव ह्यांचे स्वीय सहायक दत्ता सुतार ह्यांचा लेख संपादनासाठी दिला. (खरं म्हणजे नंतर लेख पाहिल्यावर लक्षात आलं की, त्याचं पुनःलेखनच करणं आवश्यक आहे.) दरम्यान, पुस्तक अधिक विविधांगी व्हावं, ह्यासाठी मीही संजीव कुळकर्णी ह्यांना काही नावं सुचविली. त्यापैकी पत्रकार मंगेश वैशंपायन व अभिजित घोरपडे ह्यांना ती कल्पना पसंत पडली आणि त्यांनी लिहिण्याचं मान्य केलं. मंगेशनं तर लेख माझ्याकडेच पाठवून 'पुढचं सगळं तूच बघ' असं सांगितलं. राजीव ह्यांचा महाविद्यालयीन सहअध्यायी असलेल्या एकालाही लेखाची विनंती केली होती. 'मला आवडेल लिहायला,' असं कळवून त्याला काही लिहायला जमलंच नाही. नगर जिल्ह्यातील एका नेत्यालाही ह्याबाबत विनंती केली. 'माझे चांगले संबंध होते त्यांच्याशी. नक्की लिहिणार मी,' असं आश्वासन देणाऱ्या त्या नेत्यानं नंतर फोनला उत्तर दिलं नाही आणि न लिहिण्यासाठी काही सबबही सांगितली नाही. असो!

आमच्या 'शब्दकुल मीडिया'तर्फे दोन पुस्तकांच्या संपादनाची-निर्मितीची कामं झाली आहेत. शब्दांकनापासून, लिहिण्यापासून, मुद्रितशोधन-ब्लर्ब ह्यापासून ते थेट पृष्ठरचनेपर्यंत. छापण्यास तयार, अशा स्वरूपात. नगरचे उद्योजक दिलीप चंदे ह्यांच्या व्यक्तित्वाचा व कर्तृत्वाचा सर्वांगीण आढावा घेणारं 'समर्पयामी' सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. कॉफी-टेबल बुक पद्धतीची त्याची निर्मिती आहे. एकदम वेगळी, आकर्षक. त्याचे चार विभाग आहेत. चारही विभागांना नेमकी शीर्षकं व त्याला जुळणारा श्लोक/अभंग आहे. हे पुस्तक पाहण्यासाठी म्हणून संजीव कुळकर्णी ह्यांना दिलं होतं. आनंदाची बाब म्हणजे 'संसदरत्न'ची निर्मिती 'समर्पयामी'च्या धर्तीवर, ते डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली. साधारण तोच आकार, ('समर्पयामी' चौरस, तर हे आयताकृती.) तीच पद्धत. तिथं चार विभाग होते, इथं तीन आहेत. म्हणजे 'समर्पयामी'च्या कामाला एक प्रकारे मिळालेली ती दादच होय.

दत्ता सुतार ह्यांचा लेख पाहिला आणि हबकलोच. तो होता ६ हजार १७९ शब्दांचा. स्वीय सहायक ह्या नात्यानं गेलं दशकभर सातव ह्यांच्या अगदी जवळ राहिल्यानं सुतार ह्यांच्याकडं सांगण्यासारखं बरंच काही होतं आणि अजूनही असेल. त्यांचं नातंही मुरलेलं होतं. त्यामुळे त्यांनी अगदी भावनावश होऊन लिहिलं होतं. स्वाभाविकच होतं ते. त्यांनी हा लेख लिहिला, तेव्हा सातव ह्यांचं निधन होऊन महिनाही लोटला नव्हता. लेखकाच्या भावपूर्ण शैलीचा सूर न बदलता, त्याच्या आशयाला नि मांडणीला फार धक्का न लावता लेखाचं पुनःलेखन आणि संपादन करायचं होतं.संदर्भ जोडून घेणं, काही गाळलेल्या जागा भरणं, नित्य परिचयामुंळ थोडक्यात येणाऱ्या गोष्टींना काही सविस्तर संदर्भ जोडणं असं काम करायचं होतं. कम्प्युटरसमोर तीन रात्री ठाण मांडून बसून, हा लेख पूर्ण केला, तेव्हा त्यात जवळपास साडेसातशे शब्दांची भर पडलेली होती. लेखाचे शब्द झाले होते, तब्बल ६ हजार ९०९! पुनःलेखन, संदर्भ जोडून घेणं आणि वाक्यरचना व्यवस्थित करणं, असं हे मोठं काम होतं. आपण लिहिलेला लेख त्याच सुरात एवढा नेटका झाल्याचं पाहून सुतारही मनस्वी खूश झाले.

सुतार ह्यांचा हा लेख खरंच फार सुंदर आणि खूप काही सांगणारा आहे. त्यामुळे त्याला शीर्षकही वैशिष्ट्यपूर्ण हवं, असं ठरवलं होतं. त्यानुसार लेखाला एक नव्हे, तर पाच शीर्षकं दिली -  

'आकाशी तो चमचमणारा अवचित कोसळला तारा...', हे मला आवडलेलं शीर्षक.

पण जातीचा उपसंपादक एकाच शीर्षकावर कधी समाधान मानत नाही. तो हातचे असावेत म्हणून अजून दोन-तीन शीर्षकं मनात योजून ठेवतो. मी नुसती मनात योजून न ठेवता आणखी शीर्षकं दिली -  'उल्कापात!', 'लखलखत्या ताऱ्याचा अस्त', 'हे दुःख कोण्या जन्माचे...' आणि 'राजकारणातील संत'. त्यातलं कोणतं शीर्षक निवडलं हे आता पुस्तक पाहूनच समजेल.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, कळमनुरीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व सातव ह्यांचे कॉलेजमित्र डॉ. बबन पवार ह्यांचेही लेख संजीव कुळकर्णी ह्यांनी संपादनासाठी पाठविले. त्या लेखांचं संपादन करताना सातव ह्यांच्याविषयी नवं काही समजलं. मंगेशच्या लेखातून त्यांची लोकसभेतील आणि विशेषतः गेल्या वर्षी शेतकरी कायद्यांच्या विरोधातली कामगिरी लक्षात आली. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व संजीव कुळकर्णी ह्यांचेही लेख प्रकाशनाआधीच वाचायला मिळाले... एक नजर टाकण्यासाठी, त्यामध्ये काही कमी-जास्त नाही ना, हे बारकाईने बघण्यासाठी म्हणून. काम संपता संपता विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या-लेखांचं संकलन असलेला एक लेखही संपादकांनी पाठवला. तोही नीटनेटका करून दिला. सुरुवात आणि शेवट आकर्षक! त्यात काही गुजराती दैनिकांची कात्रणं होती. अलीकडे दोन महिन्यांत दोनदा मी गुजरातेत जाऊन आल्याने मला गुजराती वाचता येतं, असा का कोण जाणे त्यांचा समज झालेला.


गुजरातमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी
व्यक्त केलेलं दुःख.

सातव ह्यांच्या निधनानंतर सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात लिहून आलं. त्याचं संकलन झालं पाहिजे, अशी चर्चा आमच्या औरंगाबाद भेटीत झाली. ते काम अस्मादिकांवरच सोपविण्यात आलं. त्यासाठी खूप वाचून बरेच मुद्दे काढले होते; साधारण अडीच ते तीन हजार शब्द. पण संपादनाच्या आणि पुनःलेखनाच्या कामात लिहायला वेळच मिळत नव्हता. अखेर म्हटलं, लेख भरपूर झाले असतील. ह्या लेखावाचून पुस्तकाचं काही अडणार नाही. नकोच लिहायला. पण हा लेख असावा, असं कुळकर्णी ह्यांना अगदीच शेवटच्या टप्प्यात वाटलं. त्यामुळं पुन्हा एकदा 'फेसबुक', 'ट्विटर'ची पानं चाळून पाहिली. देशभरातील कार्यकर्त्यांना सातव ह्यांच्या निधनाचं मनापासून दुःख झाल्याचं त्यांचे 'ट्वीट' पाहताना जाणवलं. त्यात गुजरातमधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.  त्यातून मग 'सामाजिक माध्यमांवर उसळलेल्या भावलाटा' हा साधारण चोवीसशे शब्दांचा लेख आकाराला आला. त्यासाठी वेगवेगळ्या पोस्टमधून सात-आठ छायाचित्रंही काढली.

लेखकांनुसार, म्हणजे राजकीय नेते, पत्रकार-संपादक, कार्यकर्ते-स्नेही-मित्र असे विभाग पुस्तकात करावेत, असं उशिरा ठरलं. ह्या विभागांची शीर्षकं देण्याची जबाबदारीही माझ्याकडे आली. चार विभाग करावेत असं माझं मत होतं. त्यानुसार त्याला नावं सुचविली - 'राजस सुकुमार...', 'श्रेयस', '...अधुरी एक कहाणी', 'नेता... खरा नि हिरा', 'चमक विजेची, परी क्षणाची...'. ह्या शीर्षकाच्या विभागात काय असेल ह्याचा अंदाज येण्यासाठी स्वतंत्र सात-आठ ओळीही लिहिल्या.

पुस्तकाचे तीन विभाग ठरले व त्यानुसार शीर्षकंही निवडली. त्यानंतर प्रश्न आला तो विभागणी करणाऱ्या ह्या पानांच्या मागे मजकूर काय टाकायचा? अवांतर वाचन त्यासाठी उपयोगाला आलं आणि ह्या तिन्ही विभागांना सोयीचा होईल, असा मजकूर मिळाला मला.

संपादन, पुनःलेखन, शीर्षकं देणं हे माझं आवडतं काम. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ते करताना बरं वाटलं. एका तरुण नेत्याच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा स्मृतिग्रंथ आहे. त्याच्या निर्मितीत चांगला हातभार लागल्याचं समाधान मोठंच आहे.

-------------

#RajeevSatav #SansadRatna #ShabdkulMedia #AbhangNanded #Kalamnuri #Corona #SocialMedia #Congress #GujaratCongress #RajeevSatav_Memoirs

Friday 10 September 2021

राहू जपून, थोडं अजून...

मत्प्रिय भक्तांनो...

नमस्कार, प्रणाम, नमस्ते.

वणक्कम.

सलाम वालेकुम.

सत् श्री अकाल.

आणि, हाय..!

हे म्हणजे अगदी रेडिओवरच्या निवेदकांसारखं झालं ना? त्या 'एफ. एम.'वरच्या चिवचिव चिमण्या नि मिठूमिठू पोपट करतात तसं. एका दमात सगळ्यांना साद घालायची! अभिवादन करतानाच सगळ्यांना आपलंसं करायचं.

... तर सांगायचा मुद्दा तुम्ही सगळेच माझे आहात की. मांडवात आरती म्हणताना काय, विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचताना काय... तिथं कुणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन नसतो. तिथं दिसतो तो माझा भक्तच. म्हणून मग मी पण थोड्या वेळासाठी 'आर. जे.' झालो. कसं वाटतंय 'आरजे गणेशा' किंवा 'आरजे विनायका' ऐकायला? की 'आरजे विघ्नहर्ता' अधिक योग्य राहील?

रेडिओवरनं आठवलं, खरं तर ठरवलं होतं की, तुम्हाला 'मित्रों...' अशी साद घालायची. नंतर विचार केला नको बुवा. तशी हाक मारली की, सावरून बसता तुम्ही. हातातलं सगळं काम सोडून रेडिओ, टीव्ही.पुढं ठाण मांडता. मग त्याच्यावरून पुढचे काही दिवस फेसबुक, ट्विटर इत्यादी माध्यमांतून एकमेकांवर तुटून पडता. 'भक्त'-'अंधभक्त'-'गुलाम' ही आणि अशी शेलकी विशेषणं वापरता. नको म्हटलं. तुम्ही सगळेच्या सगळे माझे लाडके भक्त. माझ्या 'मन की बात'वरून तुमच्यात लठ्ठालठ्ठी नको. ह्या उत्सवाच्या काळात तर नकोच.


छायाचित्र सौजन्य - www.devillierart.com
हे पत्र कशासाठी आणि तेही अगदी शेवटच्या क्षणी, असा प्रश्न पडला असेलच तुमच्यातल्या बऱ्याच जणांना. मनात बऱ्याच दिवसांपासून होतं संवाद साधण्याचं. मनातलं ओठांवर आलं. तेच सांगावं म्हटलं. 'होठों में ऐसी बात' म्हणणार होतो. पण लगेच तुम्हाला आठवायची त्या गाण्यावरची पुण्याच्या नातूबागेतली सजावट. नजरेसमोर यायचे त्या गाण्यावर थिरकरणारे शेकडो, हजारो रंगबिरंगी लखलखते दिवे. तुमचं, सार्वजनिक मंडळांचं आवडतं गाणंय ते. इतकी वर्षं ऐकून ऐकून मलाही पाठ झालंय. असो! मुद्द्यावर येतो. ओठांवर आलेलं मी काही गिळून नाही टाकणार. भले-बुरे सगळे अनुभव पचवावेत, पोटात साठवावेत, असा माझ्या तुंदील तनूचा अर्थ आहेच. पण आता पोटातून ओठांवर आलेलं जे काही सांगतोय, त्यानं खळबळ वगैरे काही माजणार नाही. जे पाहायला मिळालं, जे ऐकायला मिळतंय त्यावरून मनात आलं ते सांगतो.

निघण्याची सगळी तयारी करून, आवरून बसलो होतो. अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी नवी पितांबरं, उपरणी भरून झाली. ह्या उत्सवाच्या दिवसात खिरापत, पंचखाद्य, फळं, पेढे, मोदक ह्याचा मारा होणार हे माहिती असल्यानं श्रावणात एकभुक्तच राहिलो होतो. मोदकांच्या कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटलं होतं. पार्वतीआईनं नेहमीप्रमाणं मायेनं नि काळजीनं सल्ला दिलाच निघताना, 'थोडं जपून खा रे बाळा! तळलेलं कमी खा.' 'मोदक श्रेष्ठ कोणते? तळणीचे की उकडीचे?' तुमचा हा फेसबुकीय वाद आमच्या मातुःश्रींपर्यंत पोहोचलेला आहे बरं! आपला मतलब त्या तसल्या कळकट, शिळ्या वादाशी नाही; ताटभरून मोदक असल्याशी!!

मेघराजाच्या रूपात तांडव करून बाबा दमले होते. त्यामुळे लांबूनच त्यांचा निरोप घेतला. तेवढ्यात आमचे मूषकमहाराज आले नि म्हणाले, ''देवाधिदेवा, अहो काय चाललंय पृथ्वीवर, तुमच्या प्रिय भारतवर्षात! केवढी गर्दी बघा ती. तुमची मूर्ती, नारळ, फुलं-दूर्वा, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी रस्ते कसे वाहताहेत बघा. अहो, जिकडं बघावं तिकडं 'ट्राफीक ज्याम' दिसतंय. कसं काय होणार हो!''

मी म्हणालो त्याला, ''बा मूषका, इतकी वर्षं मला घेऊन जातोस आणि ही गर्दी, हा उत्साह पहिल्यांदाच पाहिल्यासारखं काय सांगतोस. नवं काही बोल.. ट्विटरवरचा नवा ट्रेंड सांग, फेसबुकवरचा खमंग रंगलेला वाद सांग...''

हा थट्टेचा सूर मूषकराजांना पटलेला नाही, हे त्यांच्या इवल्याशा चेहऱ्यावर लगेच दिसलं. ''गणराया, गांभीर्यानं घ्या मला कधी तरी. नेहमीसारखी परिस्थिती राहिलेली नाही सध्या. ती कोरोना महामारी आलेली लक्षात आहे ना तुमच्या. यंदा मार्च, एप्रिल, मे महिने कसे गेले आठवतंय ना?''

मूषकराजांचं ऐकावं म्हणून मग मीही एक नजर टाकली, तर काय. सांगत होता ते खरंच होतं की. केवढी गर्दी! नजर टाकावी तिकडं माणसंच माणसं दिसत होती. हातात पिशव्या, एकमेकांना धक्का देत, वाहनांची दाटी चुकवत वाट काढणारी. रस्त्याच्या कडेला बसलेले विक्रेते. कुणाच्या नाकावर मास्कच नाही, तर कुणी तो हनुवटीवर अडकवलेला. कुणी खोकतोय, तर कुणी थुंकतोय. अरे! एवढ्यात सगळं विसरलात की काय, सोळा-सतरा महिने अनुभवलेलं. तो कोरोनानामक राक्षस अर्धमेला झाल्यासारखा वाटत असला, तरी अजून पूर्णपणे खतम नाही झालेला. लस घेतली असेल तुम्ही. पण म्हणून काय झालं! कोरोनाला आव्हान न देता 'तू परत ये, तू परत ये...' असं आवाहन करत असल्यासारखंच वाटलं मला ते सगळं चित्र पाहून.

नाही म्हटलं तरी हे उघड्या डोळ्यांनी बघितल्यावर हादरलोच थोडा मी. म्हणूनच पत्र लिहायला बसलो लगेच. निघण्याची घाई-गडबड सुरू असताना, वेळ काढून लिहितोय. प्रत्येक मंगल कार्याची पहिली अक्षता देऊन तुम्ही मला मनोभावे आमंत्रण देता. उत्सवाचं तुमचं आमंत्रण मिळालंय. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं तुम्ही मागच्या वर्षी बऱ्यापैकी शांतपणे सांगितलं होतं. म्हणून यंदा थोडं निवांत जावं असं ठरवलं होतं. यायचं तर असतंच की दर वर्षी.

कोरोनामुळं गेल्या वर्षी परिस्थिती नाजूकच होती. म्हणून उत्सव जपूनच साजरा केला ना तुम्ही. विनाकारण बाहेर पडायचं नाही, मोठ्या संख्येनं सगळ्यांनी जमायचं नाही. सूर्य मावळला की, आपापल्या घरात बसायचं... हे सगळे नियम तुम्ही पाळले ना गेल्या वर्षी पाच-सहा महिने? त्याचे चांगले परिणामही दिसले. हो ना? पण काय सांगावं, यंदाही परिस्थिती फार काही बदललेली नाही बुवा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण सगळे चांगलेच पोळून निघालो, आठवतंय ना? आत्ता आत्ताची तर गोष्टंय ती. तिसऱ्या लाटेचा इशारा सगळे तज्ज्ञ देत असताना एवढे कसे बेफिकीर! डॉक्टरचं, कंपौंडरचं कुणाचंही ऐका... पण भल्याचं असेल ते ऐकाच बुवा.


छायाचित्र सौजन्य - www.peepsburgh.com

हे दिवस पावसाचे. आणि उत्सवाचे. दोन्हींत चिंब भिजण्याचे. माझी तुम्ही आतुरतेनं वाट पाहत असता. मीही तेवढाच उत्सुक असतो तुम्हाला भेटायला. एव्हाना गल्लीबोळात, रस्तोरस्ती मंडप उभे राहिलेले असतात. त्यावरून वृत्तपत्रांत बातम्या आलेल्या असतात, काही सजग, जागृत नागरिक पत्रंही लिहितात. मंडळांचे कार्यकर्ते थोडे जास्तच उत्साहात असतात. सजावटी ठरलेल्या असतात. ढोल-ताशा पथकांना सुपारी दिलेली असते. तुम्ही सगळे माझ्या उत्सवात दहा-अकरा दिवस धमाल करता. एक से बढकर एक देखावे असतात. लहान मुलांसाठी, त्यांच्या आई-बाबांसाठी, आजी-आजोबांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरं...असं खूप काही असतं. तुम्हाला नाचायचंही असतं बेफाम. आपला बुवा नाचण्याला बिल्कुल विरोध नाही. नाचायला काय पब किंवा डिस्कोथेकच हवा काय प्रत्येक वेळी? मिरवणुकीतल्या तुमच्यातल्या दोन-पाच जणांचा पदन्यास बघून माझेही पाय थिरकायला लागतात. तसं वागणं योग्य ठरणार नसतं ना. कारण 'उत्सवमूर्ती' असतो मी.

दर वर्षी एक तरी गाणं हिट होतच असतं उत्सवाच्या निमित्तानं. ते 'ज्वेल थीफ'मधलं गाणं तुम्हाला सांगितलंच. पुढं कधी तरी 'गाओ ओम शांति ओम...' आलं. शांतता पाळायला एवढं ओरडून, ढणढण वाजवतं सांगावं लागतं होय. त्या वर्षी हा शांतिजप ऐकताना कान किटून गेले माझे. परत काय आहे की, मला एकाच वेळी अनेक गाणी ऐकणं भाग असतं. एका मंडपाचा ध्वनिवर्धक माझ्या समोर लताबाईंनी गायिलेली आरती ऐकवत असतो, तर दुसऱ्या मंडपाचा कर्णा 'चल छय्या, छय्या' म्हणत माझ्या कर्णाकडेच रोखलेला असतो. 'शांताबाई, शांताबाई...' असं कोण कुणाला पुकारतंय हे ऐकावं म्हटलं तर तिसरीकडून 'पार्वतीच्या बाळा...' अशी लडिवाळ हाक कानी पडते. 'देवा श्री गणेशा' एका बाजूला चालू असतं, तर लांबून कुठून तरी 'देवा हो देवा गणपति देवा...' असं मला आळवत कुणी 'हमसे बढकर कौन?' अशी प्रौढी मिरवत असतं.

हे उत्साहभारित वातावरण मलाही फार सुखद वाटत असतं. कधीच कंटाळा येत नाही. वर्तमानपत्रांत देखाव्याची पान भरून छायाचित्रं येतात. 'देखावे पाहता पाय थकले, पण डोळे नाही निवले' हे नेहमीचंच यशस्वी वाक्य कुणा बातमीदार-उपसंपादकाला द्यायचं असतं. एखादा उत्साही उपसंपादक 'रंग गुलाली ढोल वाजती, आले आले गणपती' असं उत्सवी शीर्षक देऊन बहार आणत असतो.


छायाचित्र सौजन्य - www.subpng.com

पण यंदाही, सलग दुसऱ्या वर्षी ह्या सगळ्यावर नाही, पण बऱ्याचशा कार्यक्रमांपुढं फुली मारायचीच. नियम पाळू. मला छान मखरात बसवा, गौरींची मस्त सजावट करा...पण हे सगळं आपल्यापुरतं; त्याला सार्वजनिक स्वरूप नको. यंदाही सजावटीचा भव्य मांडव नको. दर्शनाला आणि आरतीला गर्दी नकोच. तुम्ही मनोमन केलेला नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचणारच. आशीर्वादासाठी माझा हात उंचावलेलाच आहे. गाणी नको, ढोल-ताशे नको, पाय थिरकावणारा नाच नको आणि गर्दीचा उत्सवी उत्साह नकोच नको.

हे सगळं मलाही थोडंच गोड वाटतं? खंत आहेच की. चुकल्यासारखं वाटतंय. लागोपाठ दुसऱ्या वर्षी भक्तांपासून थोडं लांबच राहायचं? पण इलाज नाही. मला सांगा, मास्क लावलेल्या रूपात माझं दर्शन तुम्हाला आवडेल का? तुमचे फुललेले चेहरे बघताना माझी अवस्था 'रूप पाहता लोचनी, सुख जालें वो साजणी' अशी होते. तुम्ही मास्क बांधूनच येणार. मग मला तुमचा फुललेला चेहरा कसा दिसणार? आणि मास्क न लावताच आलात, तर मला नाही हं आवडणार. नकोच ते! 

फ़िराक़ गोरखपुरीसाहेबांचा शेर आहे - 

तुम मुख़ातिब भी हो, क़रीब भी हो
तुमको देखें कि तुम से बात करें

माझी अवस्था अगदी तशीच आहे मित्रांनो. पण सध्याचा काळ लक्षात घेऊन तुम्हाला जवळून पाहण्यापेक्षा हा दुरून संवाद साधणंच योग्य आहे, असं मला वाटतं. ती म्हण आहे ना, एका जत्रेनं देव काही म्हातारा होत नाही. एकच्या ऐवजी आपण दोन उत्सव म्हणू.

मला बोलावलंत, मी आलोय. दर वर्षीच्या उत्साहानंच तुम्ही 'आधी वंदू तुज मोरया' असं म्हणाच. ऐकताना छान वाटतं. पण तसं म्हणताना मी वर जे काही लिहिलंय ते ध्यानात घेऊन 'सगळं ऐकू तुझे मोरया' असंही वचन मला द्या. पुढच्या वर्षी धमाल करू. दोन वर्षांची कसर पुरेपूर भरून काढू. हो ना?

ऐक्यं बलं समाजस्य तदभावे से दुर्बल:
तस्मादैक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्रहितैषिण:||

... ह्या श्लोकाचा भावार्थ असा की, ऐक्य हीच समाजाची ताकद आहे. ऐक्य नसलेला समाज आणि पर्यायाने तो देश दुबळा ठरतो. म्हणूनच राष्ट्रहिताचा विचार करणारे ऐक्याला प्रोत्साहन देतात. ह्या महामारीला पिटाळून लावण्यासाठी आपल्याला असंच ऐक्य दाखवावं लागेल.

यंदा निश्चयच करू. दीड वर्ष ठाण मांडून बसलेल्या ह्या कोरोना-विघ्नाला हरवू या, पुढच्या वर्षी दुपटीनं आनंद साजरा करू या. तुम्ही म्हणता ना मला, 'पुन्हा पुन्हा तुम्ही यावे, विद्या ज्ञान आम्हा द्यावे'. आतापुरतं एवढं ज्ञान बास झालं की. 

काळजी करू नका, आवश्यक ती काळजी मात्र घ्या. बाकीचं पाहायला मी आहे ना समर्थ! 

तुमचा सगळ्यांचा,

बाप्पा

.....

#Ganesh #GaneshFestival #Covid19 #socialmedia #facebook #twitter #bhakt #LordGanesh #mankibaat #गणेशोत्सव #होठों_में_ऐसी_बात

#भक्तांशी संवाद

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...