मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

राजीव-स्मृती नि खारीचा वाटा!

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्याला, आपल्या सभोवतालाला अनेक धक्के दिले. जवळची माणसं पाहता पाहता कायमची दूरच्या प्रवासाला गेली. त्यातल्या काहींचं निधन 'अकाली' शब्दाची व्याप्ती पुरेशी स्पष्ट करणारं होतं. त्यापैकीच एक म्हणजे काँग्रेसचे तरुण खासदार राजीव सातव. मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात त्यांच्या निधनाची बातमी अक्षरशः कोसळली. अवघा महाराष्ट्र, देश हळहळला. पक्षीय अभिनिवेश लांब ठेवून लोक मोकळेपणानं आपल्या दुःखाला वाट मोकळी करून देत व्यक्त होत राहिले. त्यात हळहळ होती, खंत होती. पक्षीय राजकारण ह्या दुःखापासून शेकडो मैल दूर होतं.

राजीव सातव ह्यांच्या निधनाला जेमतेम चार महिने झाले. त्यांचा आज (दि. २१ सप्टेंबर) जन्मदिन. ह्यानिमित्ताने कळमनुरी येथे आज  'संसदरत्न राजीव सातव स्मृतिपुष्प' ह्या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन होत आहे. नांदेडच्या अभंग पुस्तकालयानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक कॉफी-टेबल आकाराचं आणि २७२ पानांचं आहे. सातव ह्यांच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यांत त्यांच्या कारकिर्दीचा सर्वांगीण आढावा घेणारा हा स्मृतिग्रंथ प्रकाशित होत आहे. ह्या कामात सहभागी होण्याची संधी मिळाली, ते काम उत्तम होईल, ह्यासाठी चांगल्यापैकी हातभार लागला, ह्याचं मोठं समाधान आहे.

पुस्तकाचे संपादक व नांदेडचे पत्रकार संजीव कुळकर्णी ह्यांनी जूनमध्ये ह्या पुस्तक-प्रपंचाची कल्पना दिली. त्यासाठी आम्ही एकदा औरंगाबाद येथे भेटलोही. तिथं त्यांनी सातव ह्यांचे स्वीय सहायक दत्ता सुतार ह्यांचा लेख संपादनासाठी दिला. (खरं म्हणजे नंतर लेख पाहिल्यावर लक्षात आलं की, त्याचं पुनःलेखनच करणं आवश्यक आहे.) दरम्यान, पुस्तक अधिक विविधांगी व्हावं, ह्यासाठी मीही संजीव कुळकर्णी ह्यांना काही नावं सुचविली. त्यापैकी पत्रकार मंगेश वैशंपायन व अभिजित घोरपडे ह्यांना ती कल्पना पसंत पडली आणि त्यांनी लिहिण्याचं मान्य केलं. मंगेशनं तर लेख माझ्याकडेच पाठवून 'पुढचं सगळं तूच बघ' असं सांगितलं. राजीव ह्यांचा महाविद्यालयीन सहअध्यायी असलेल्या एकालाही लेखाची विनंती केली होती. 'मला आवडेल लिहायला,' असं कळवून त्याला काही लिहायला जमलंच नाही. नगर जिल्ह्यातील एका नेत्यालाही ह्याबाबत विनंती केली. 'माझे चांगले संबंध होते त्यांच्याशी. नक्की लिहिणार मी,' असं आश्वासन देणाऱ्या त्या नेत्यानं नंतर फोनला उत्तर दिलं नाही आणि न लिहिण्यासाठी काही सबबही सांगितली नाही. असो!

आमच्या 'शब्दकुल मीडिया'तर्फे दोन पुस्तकांच्या संपादनाची-निर्मितीची कामं झाली आहेत. शब्दांकनापासून, लिहिण्यापासून, मुद्रितशोधन-ब्लर्ब ह्यापासून ते थेट पृष्ठरचनेपर्यंत. छापण्यास तयार, अशा स्वरूपात. नगरचे उद्योजक दिलीप चंदे ह्यांच्या व्यक्तित्वाचा व कर्तृत्वाचा सर्वांगीण आढावा घेणारं 'समर्पयामी' सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. कॉफी-टेबल बुक पद्धतीची त्याची निर्मिती आहे. एकदम वेगळी, आकर्षक. त्याचे चार विभाग आहेत. चारही विभागांना नेमकी शीर्षकं व त्याला जुळणारा श्लोक/अभंग आहे. हे पुस्तक पाहण्यासाठी म्हणून संजीव कुळकर्णी ह्यांना दिलं होतं. आनंदाची बाब म्हणजे 'संसदरत्न'ची निर्मिती 'समर्पयामी'च्या धर्तीवर, ते डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली. साधारण तोच आकार, ('समर्पयामी' चौरस, तर हे आयताकृती.) तीच पद्धत. तिथं चार विभाग होते, इथं तीन आहेत. म्हणजे 'समर्पयामी'च्या कामाला एक प्रकारे मिळालेली ती दादच होय.

दत्ता सुतार ह्यांचा लेख पाहिला आणि हबकलोच. तो होता ६ हजार १७९ शब्दांचा. स्वीय सहायक ह्या नात्यानं गेलं दशकभर सातव ह्यांच्या अगदी जवळ राहिल्यानं सुतार ह्यांच्याकडं सांगण्यासारखं बरंच काही होतं आणि अजूनही असेल. त्यांचं नातंही मुरलेलं होतं. त्यामुळे त्यांनी अगदी भावनावश होऊन लिहिलं होतं. स्वाभाविकच होतं ते. त्यांनी हा लेख लिहिला, तेव्हा सातव ह्यांचं निधन होऊन महिनाही लोटला नव्हता. लेखकाच्या भावपूर्ण शैलीचा सूर न बदलता, त्याच्या आशयाला नि मांडणीला फार धक्का न लावता लेखाचं पुनःलेखन आणि संपादन करायचं होतं.संदर्भ जोडून घेणं, काही गाळलेल्या जागा भरणं, नित्य परिचयामुंळ थोडक्यात येणाऱ्या गोष्टींना काही सविस्तर संदर्भ जोडणं असं काम करायचं होतं. कम्प्युटरसमोर तीन रात्री ठाण मांडून बसून, हा लेख पूर्ण केला, तेव्हा त्यात जवळपास साडेसातशे शब्दांची भर पडलेली होती. लेखाचे शब्द झाले होते, तब्बल ६ हजार ९०९! पुनःलेखन, संदर्भ जोडून घेणं आणि वाक्यरचना व्यवस्थित करणं, असं हे मोठं काम होतं. आपण लिहिलेला लेख त्याच सुरात एवढा नेटका झाल्याचं पाहून सुतारही मनस्वी खूश झाले.

सुतार ह्यांचा हा लेख खरंच फार सुंदर आणि खूप काही सांगणारा आहे. त्यामुळे त्याला शीर्षकही वैशिष्ट्यपूर्ण हवं, असं ठरवलं होतं. त्यानुसार लेखाला एक नव्हे, तर पाच शीर्षकं दिली -  

'आकाशी तो चमचमणारा अवचित कोसळला तारा...', हे मला आवडलेलं शीर्षक.

पण जातीचा उपसंपादक एकाच शीर्षकावर कधी समाधान मानत नाही. तो हातचे असावेत म्हणून अजून दोन-तीन शीर्षकं मनात योजून ठेवतो. मी नुसती मनात योजून न ठेवता आणखी शीर्षकं दिली -  'उल्कापात!', 'लखलखत्या ताऱ्याचा अस्त', 'हे दुःख कोण्या जन्माचे...' आणि 'राजकारणातील संत'. त्यातलं कोणतं शीर्षक निवडलं हे आता पुस्तक पाहूनच समजेल.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, कळमनुरीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व सातव ह्यांचे कॉलेजमित्र डॉ. बबन पवार ह्यांचेही लेख संजीव कुळकर्णी ह्यांनी संपादनासाठी पाठविले. त्या लेखांचं संपादन करताना सातव ह्यांच्याविषयी नवं काही समजलं. मंगेशच्या लेखातून त्यांची लोकसभेतील आणि विशेषतः गेल्या वर्षी शेतकरी कायद्यांच्या विरोधातली कामगिरी लक्षात आली. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व संजीव कुळकर्णी ह्यांचेही लेख प्रकाशनाआधीच वाचायला मिळाले... एक नजर टाकण्यासाठी, त्यामध्ये काही कमी-जास्त नाही ना, हे बारकाईने बघण्यासाठी म्हणून. काम संपता संपता विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या-लेखांचं संकलन असलेला एक लेखही संपादकांनी पाठवला. तोही नीटनेटका करून दिला. सुरुवात आणि शेवट आकर्षक! त्यात काही गुजराती दैनिकांची कात्रणं होती. अलीकडे दोन महिन्यांत दोनदा मी गुजरातेत जाऊन आल्याने मला गुजराती वाचता येतं, असा का कोण जाणे त्यांचा समज झालेला.


गुजरातमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी
व्यक्त केलेलं दुःख.

सातव ह्यांच्या निधनानंतर सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात लिहून आलं. त्याचं संकलन झालं पाहिजे, अशी चर्चा आमच्या औरंगाबाद भेटीत झाली. ते काम अस्मादिकांवरच सोपविण्यात आलं. त्यासाठी खूप वाचून बरेच मुद्दे काढले होते; साधारण अडीच ते तीन हजार शब्द. पण संपादनाच्या आणि पुनःलेखनाच्या कामात लिहायला वेळच मिळत नव्हता. अखेर म्हटलं, लेख भरपूर झाले असतील. ह्या लेखावाचून पुस्तकाचं काही अडणार नाही. नकोच लिहायला. पण हा लेख असावा, असं कुळकर्णी ह्यांना अगदीच शेवटच्या टप्प्यात वाटलं. त्यामुळं पुन्हा एकदा 'फेसबुक', 'ट्विटर'ची पानं चाळून पाहिली. देशभरातील कार्यकर्त्यांना सातव ह्यांच्या निधनाचं मनापासून दुःख झाल्याचं त्यांचे 'ट्वीट' पाहताना जाणवलं. त्यात गुजरातमधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.  त्यातून मग 'सामाजिक माध्यमांवर उसळलेल्या भावलाटा' हा साधारण चोवीसशे शब्दांचा लेख आकाराला आला. त्यासाठी वेगवेगळ्या पोस्टमधून सात-आठ छायाचित्रंही काढली.

लेखकांनुसार, म्हणजे राजकीय नेते, पत्रकार-संपादक, कार्यकर्ते-स्नेही-मित्र असे विभाग पुस्तकात करावेत, असं उशिरा ठरलं. ह्या विभागांची शीर्षकं देण्याची जबाबदारीही माझ्याकडे आली. चार विभाग करावेत असं माझं मत होतं. त्यानुसार त्याला नावं सुचविली - 'राजस सुकुमार...', 'श्रेयस', '...अधुरी एक कहाणी', 'नेता... खरा नि हिरा', 'चमक विजेची, परी क्षणाची...'. ह्या शीर्षकाच्या विभागात काय असेल ह्याचा अंदाज येण्यासाठी स्वतंत्र सात-आठ ओळीही लिहिल्या.

पुस्तकाचे तीन विभाग ठरले व त्यानुसार शीर्षकंही निवडली. त्यानंतर प्रश्न आला तो विभागणी करणाऱ्या ह्या पानांच्या मागे मजकूर काय टाकायचा? अवांतर वाचन त्यासाठी उपयोगाला आलं आणि ह्या तिन्ही विभागांना सोयीचा होईल, असा मजकूर मिळाला मला.

संपादन, पुनःलेखन, शीर्षकं देणं हे माझं आवडतं काम. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ते करताना बरं वाटलं. एका तरुण नेत्याच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा स्मृतिग्रंथ आहे. त्याच्या निर्मितीत चांगला हातभार लागल्याचं समाधान मोठंच आहे.

-------------

#RajeevSatav #SansadRatna #ShabdkulMedia #AbhangNanded #Kalamnuri #Corona #SocialMedia #Congress #GujaratCongress #RajeevSatav_Memoirs

२ टिप्पण्या:

  1. खिडकीतून डोकावणं नेहमीच औत्सुक्याचं... आज वेदनेची किनार... संजूभाऊ हे व्यक्तिमत्त्व अफलातून... ठरवलं की ते मनापासून करणार...

    राजीव सातव यांची माझी फक्त एकवेळ भेट... व्यासपीठावर... एकदा त्यांचा फेबुसंदेश... एवढ्या संचितावर तो माणूस काळजात राहिला...

    उत्तर द्याहटवा
  2. सतीश, या स्मृतिग्रंथाच्या निमित्ताने तुमच्या हातून एक खूप मोठं काम घडलं आहे याचं समाधान तुमच्या शब्दांतून पूर्णपणे प्रतिबिंबित झालं आहे. अभिनंदन!
    एकाच मजकुरासाठी तुम्हाला अत्यंत समर्पक अशी किती वेगवेगळी आणि सुंदर शीर्षकं सुचतात याचं मला नवल वाटतं. मात्र दत्ता सुतार यांच्या दीर्घ लेखाचं संपादन करताना शब्दांची काटछाट करण्याऐवजी तुम्ही त्यात अधिक भर घातलीत हे कसं काय?
    या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन झाल्यावर संपादक श्री. संजीव कुलकर्णी आणि तुम्ही या दोघांचंही कौतुक होईलच पण मी त्या आधीच हे एवढं मोठं शिवधनुष्य पेलल्याबद्दल तुम्हा दोघांचं कौतुक आणि अभिनंदन करते.
    मृदुला जोशी

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...