Wednesday 30 August 2023

विखे साहित्य पुरस्काराच्या पडद्याआड


विखे साहित्य पुरस्कार वितरण - २०२२. केरळचे तेव्हाचे राज्यपाल आरिफ महंमद खान, साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, डॉ. रावसाहेब कसबे ह्यांच्यासह
पुरस्कारप्राप्त सर्व लेखक आणि कलावंत. 
......................................................
नोकरीनिमित्त नगरमध्ये (१९८८) आलो, तेव्हा #साहित्य_संमेलनाचा वाद नुकताच कुठं थंड होऊ लागला होता. प्रवरानगरला होणारं साहित्य संमेलन रद्द झालं होतं. त्याबद्दल फार काही माहीत नव्हतं; तुरळक बातम्या वाचल्या होत्या. पुढे १९९६मध्ये नगरकरांनी - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोनई शाखेनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी आम्ही उत्सुक असल्याचं कळवलं. त्या विनंतीचा विचार झाला नाही. संमेलन आळंदीला झालं. त्या वेळी #‘लोकसत्ता’मध्ये ‘नगरी नगरी’ सदर लिहीत होतो. नगरकर असल्यामुळे संमेलन नाकारल्याचा स्वाभाविकच राग आला. मग ‘प्रवरेचं पाणी पचेना आणि मुळेचं पाणी रुचेना’ शीर्षकानं लिहिलं. ते वाचून खूश झालेल्या नामदेवराव देसाई ह्यांनी शाबासकी दिली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी #अहमदनगरला संमेलन झालं. ते भरपूर गाजलं. त्या संमेलनाच्या भरभरून बातम्या लिहिल्या.

‘सोनई’नं (थाटात) संमेलन घेतल्यावर, ‘प्रवरा’ मागं राहणार नाही, अशी अटकळ तेव्हा अनेकांनी बांधली होती. पण जुना अनुभव लक्षात घेऊन प्रवरा परिसरानं पुन्हा कधी साहित्य संमेलनाचं यजमानपद मिळावं म्हणून प्रयत्न केले नाहीत. दरम्यानच्या काळात प्रवरानगरला #साहित्य_पुरस्कार सुरू झाले. सहकारी साखर कारखानदारीचे जनक विठ्ठलराव विखे ह्यांच्या जयंतीदिनी - नारळी पौर्णिमेला, #‘पद्मश्री_विखे_साहित्य_पुरस्कार’ समारंभपूर्वक वितरित होऊ लागले. प्रा. रंगनाथ पठारे ह्यांना १९९३मध्ये हा पुरस्कार जाहीर झाला. हे लक्षात आहे दोन कारणांमुळं - माझी अगदी स्पेशल ओळख करून दिलेला, त्याच्याबरोबर चहा पिलेला आणि जेवण करण्याची संधी लाभलेला हा एकमेव मोठा लेखक. ‘केसरी’तील मित्र-सहकारी पद्मभूषण देशपांडे ह्यानं त्यांची ओळख करून दिलेली. दुसरं कारण म्हणजे त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली ‘हारण’ पूर्ण वाचलेली होती. चित्रपटीय वाटूनही ती आवडलेली! त्या वर्षी ठरवलं की, आवडत्या लेखकाला मिळणारा हा पुरस्कार पाहायला आणि त्याला ऐकायला जायचं. पण ते जमलं नाहीच.

‘लोकसत्ता’मध्ये रुजू झाल्यावर ह्या कार्यक्रमाला जायचं ठरवलंच. त्याचं कारण झालं #‘कोल्हाट्याचं_पोर’ला मिळालेला पुरस्कार. #ग्रंथालीच्या सुदेश हिंगलासपूरकर ह्यांनी आवर्जून ते घ्यायला लावलेलं. #डॉ._किशोर_शांताबाई_काळे ह्यांचं हे आत्मकथन फार आवडलं, चटका लावून गेलं. पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल आत्मीयता वाटावी अशा आणखी काही गोष्टी होत्या - लेखक नेरल्याचा. आमच्या करमाळा तालुक्यातलं गाव. त्याच गावी वडिलांनी अडीच-तीन वर्षं शिक्षक म्हणून नोकरी केलेली. डॉ. काळे ह्यांची मुलाखत घ्यायची ठऱवलं. त्यानुसार ती मिळालीही. सोबत होता अशोक तुपे. डॉ. काळे अगदी मनमोकळं बोलले. राज्य पातळीवरच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली ही त्यांची बहुतेक पहिलीच मुलाखत असावी. (त्या मुलाखतीला मला ‘बायलाईन’ मिळाली नाही आणि विशेष असूनही ती आतल्या पानात प्रसिद्ध झाली, ही अजून एक आठवण!) त्या कार्यक्रमाला प्राचार्य राम शेवाळकर आणि प्राचार्य डॉ. म. वि. कौंडिण्य उपस्थित होते. दोघांचीही भाषणं विलक्षण झाली. कोणाचं किती भाषण बातमीत घ्यायचं हे ठरवताना तारांबळ उडाली. पण दुसऱ्या दिवशी अंक पाहिल्यावर वाटलेलं समाधान सांगता न येणारं.

‘रुची’ आणि ‘नगरी नगरी’
त्यानंतरची पुढची चार-पाच वर्षं परिपाठ बनला. विखे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला जायचं. त्याची बातमी करायची. रात्री अशोक तुपे ह्याच्यासह आणखी काही मित्रांबरोबर मनसोक्त गप्पा मारायच्या. ते सारेच कार्यक्रम फार मनापासून ऐकले, त्याच्या बातम्या लिहिल्या. ह्याच पुरस्काराबद्दल एक गमतीची आठवण - पुरस्कारासंबंधीचं एक पत्र होतं. ते प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील ह्यांनाही मिळालं. त्यांनी त्या पत्रातल्या शुद्धलेखनाच्या-प्रमाणलेखनाच्या पाच-पंचवीस चुका काढल्या आणि ‘रुची’ मासिकाला पाठविल्या. मासिकाच्या मुखपृष्ठावरच ते पत्र प्रसिद्ध झालं! प्रसिद्ध लेखक-अनुवादक विलास गिते ह्यांनी तो अंक दिला आणि ‘नगरी नगरी’मध्ये त्यावर दणकून लिहिलं!

पुढे बातमी देण्याची जबाबदारी माझ्याकडून (का कुणास ठाऊक!) काढून घेतली. पण कार्यक्रमाला जाण्याचं सोडलं नाही. रजा टाकून कार्यक्रमाला जात होतो, ते थेट २००२पर्यंत. बातमी मला लिहायची नसली, तरी ती देणारा ‘लीड’बद्दल चर्चा करायचाच. पुण्याला बदली झाल्यामुळे प्रवरेच्या ह्या साहित्य संमेलनाला हजेरी लावणं खंडित झालं. आसाराम लोमटे ह्यांच्या ‘इडा पिडा टळो’वर विखे साहित्य पुरस्काराची मुद्रा उमटली, त्या वर्षी जायचं होतं. ते राहूनच गेलं...

कार्यक्रमाला जाणं थांबलं तरी त्याच्या बातम्यांकडे नेहमीच लक्ष असायचं. नारळी पौर्णिमेच्या काही दिवस आधी पत्रपरिषद घेऊन पुरस्कारांची घोषणा होई. निवडसमितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. रावसाहेब कसबे ह्यांचं नाव वृत्तपत्रीय टिप्पणीत असे. प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमध्ये त्यांनीच घोषणा केल्याचा उल्लेख असायचा. पुरस्काराच्या पहिल्या वर्षापासून डॉ. कसबे निवडसमितीत काम करीत आहेत. असा पुरस्कार देण्याची कल्पनाही काही अंशी त्यांचीच. समितीतील नावं बदलत गेली. पण पद्धत बदलली नाही. त्यामुळेच कुतूहल होतं की, ही समिती खरंच अस्तित्वात आहे की कागदोपत्री? समितीचे सदस्य पुस्तकं वाचून निवड करतात की कुणी तरी एक जण सांगतो आणि त्यावर सह्या होतात? संयोजक-यजमान म्हणून विखे कुटुंबीयांचा कोणा एखाद्याच्या नावासाठी, कोणत्या पुस्तकासाठी आग्रह असतो का?

दीर्घ काळ चाललेला उपक्रम
... असे सारे प्रश्न पडण्यात गैर काहीच नसावं. त्याची उत्तरं मिळवायची, तर निवडसमितीतल्या सदस्यांशीच बोलायला हवं. विखे साहित्य पुरस्काराचं यंदाचं तेहेतिसावं वर्ष आहे. साहित्यबाह्य संस्थेकडून असा एखादा उपक्रम एवढा दीर्घ काळ चालविला जाणं, हे फार महत्त्वाचं आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे ह्यांनी ह्या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर कुठलाही खंड न पडू देता हा मोठा साहित्य उपक्रम त्याच थाटात चालू ठेवण्यात मंत्री राधाकृष्ण विखे ह्यांनी अजिबात हयगय केलेली नाही. मधली दोन वर्षं कोविडमुळं जाहीर कार्यक्रम झाला नाही. पण पुरस्कारांची नेहमीप्रमाणं घोषणा झाली आणि सर्वांना ते त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने देण्यात आले. ह्या पुरस्कारांमध्ये आणखी काही गटांची दोन दशकांमध्ये भर पडली आहे. साहित्याबरोबर संस्कृतीशी, विशेषतः लोककला-लोककलावंतांशी नातं जोडण्यात आलं. म्हणूनच थोडं पडद्याआड डोकावून निवडसमितीतल्या सदस्यांशी बोलून ही सर्व प्रक्रिया नेमकी कशी चालते, ह्याची माहिती करून घ्यायचं ठरवलं.

वर म्हटल्याप्रमाणे डॉ. कसबे निवडसमितीचे अध्यक्ष आहेत. प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर निमंत्रक सदस्य म्हणून काम पाहतात. साहित्य अकादमी आणि मराठी भाषा समितीच्या कामात सहभागी असलेले डॉ. दिलीप धोंडगे आणि प्राचार्य एकनाथ पगार सदस्य म्हणून काम करतात. डॉ. कसबे सोडून ह्या तिन्ही सदस्यांशी बोलणं झालं आणि त्यातून ही प्रक्रिया समजून घेता आली.

‘‘समितीतल्या कुणाचाच कोणत्याच नावाबद्दल आग्रह नसतो. आम्ही सारे चर्चा करून एकमतावर येतो आणि मगच पुरस्कारविजेत्याचं नाव जाहीर होतं. एवढी साधी सोपी प्रक्रिया आहे ही,’’ असं प्रा. डॉ. दिलीप धोंडगे म्हणाले. वर्षभरात आमच्या चार-पाच बैठका होतात. प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचा आम्ही बारकाईने विचार करतो. वर्षभरात येणारी पुस्तकं प्रत्येक जण आपापल्या परीनं वाचतो, त्याची नोंद ठेवतो. यादी करतो. ती यादी बैठकीत ठेवली जाते. त्यातून निवड होते, असं त्यांनी स्पष्ट केलं. समिती कुणाकडून पुस्तकं मागवत नाही किंवा पुरस्कारासाठी ती पाठविण्याचं आवाहनही करीत नाही, ह्या मुद्द्यावर त्यांचा भर होता.

पुरस्कारांसाठी काही निकष असतीलच ना? प्रा. धोंडगे म्हणाले, ‘‘जीवनगौरव पुरस्कारासाठी नाव ठरवताना त्या लेखकाच्या पूर्ण कारकिर्दीचा, त्याच्या कार्याचा विचार केला जातो. एके काळी उत्तम काम करून जनतेला रिझविणाऱ्या आणि आता विस्मृतीत गेलेल्या लोककलावंताचा खास शोध घेतो आम्ही. विशेष ग्रंथ पुरस्कारासाठी त्या लेखकाचं योगदान, विशेष साहित्यकृती ह्याच विचार करतो. समाजप्रबोधनाचं काम करण्यात माणसांप्रमाणेच काही नियतकालिकं, संस्थाही पुढे असतात. त्यामुळे यंदा त्यासाठी ‘समाजप्रबोधन पत्रिका’ची निवड झाली.’’

पुरस्काराआधी संमती
बैठकांनंतर अंतिम निकाल तयार झाल्यावर तो डॉ. रावसाहेब कसबे ह्यांच्यापुढे ठेवला जातो. त्यांचंही वाचन असतंच. पुरस्काराची घोषणा करण्याआधी ते संबंधित व्यक्तीशी आम्हा सगळ्यांच्या साक्षीनं दूरध्वनीवरून संपर्क साधतात आणि तिची संमती घेतात. तिच्यासाठी हा सुखद धक्काच असतो. कुणी निवड केली, हा प्रश्न समोरून हमखास येतो आणि मला वाटतं, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, असंही प्रा. धोंडगे म्हणाले.

प्रा. धोंडगे ह्यांच्या मते हा नगर जिल्ह्यातील अतिशय उत्तम उपक्रम आहे. साहित्यिक-सांस्कृतिक भरणपोषण करण्यासाठी हा पुरस्कार मोलाचं काम करीत आहे.

प्रा. एकनाथ पगार ह्यांचंही म्हणणं काही वेगळं नाही. ह्या समितीत विनादडपण काम करण्याचा आनंद ते काही वर्षांपासून उपभोगत आहेत. योग्यता हाच सर्वांत महत्त्वाचा निकष आम्ही लावतो, असं सांगून ते म्हणाले, ‘‘जीवनगौरव पुरस्कारासाठी नाव शोधताना आम्ही त्या लेखकाची समाजाशी आणि साहित्य-कलांशी असलेली निष्ठा, नाते पाहतो. त्याच्या कामामुळे प्रगतिशील समाज निर्माण होण्यास मदत होते आहे आणि त्याच्याकडून उद्बोधनाबरोबरच प्रेरणा मिळते, हेही बघतो. वाङ्मयकृती निवडताना ती त्या वर्षातील अतुलनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण असावी, हाच आमचा आग्रह असतो. विचारदर्शन, तत्त्वचिंतन, समीक्षा, ललित... असं कोणतंही बंधन त्यासाठी नाही.’’

वाङ्मयीन मूल्यांचा-जीवनमूल्यांचा मिलाफ

निवडसमितीच्या कार्यपद्धतीबद्दल प्रा. पगार ह्यांनी विस्तारानं माहिती दिली. (कै.) विठ्ठलराव विखे ह्यांनी हयातभर केलेल्या कामाचा संदर्भ निवडसमिती मानते, असं स्पष्ट सांगून ते म्हणाले, ‘‘सर्वच सदस्यांनी वर्षभर पुस्तकं वाचणं, वाचलेल्या पुस्तकांची यादी करणं, परस्परांशी चर्चा अशा पद्धतीनं काम चालतं. आमच्या बैठकांमध्ये लेखक किंवा साहित्यकृतीचं वैशिष्ट्यं सांगितलं जातं. वाङ्मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये ह्यांचा मिलाफ आम्ही जाणीवपूर्वक पाहतो. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात, त्या विठ्ठलराव विखे पाटील ह्यांच काम गोरगरीब समाज, शेतकरी, कामकरी, मजूर ह्यांच्यासाठी होतं. त्या वर्गाशी नातं दृढ करणाऱ्या लेखक, कलावंत ह्यांचा विचार होतोच. आमच्या निवडीमध्ये हा घटक निश्चित असतो. सहकार, कृषिउद्योग विकास ह्याच्याशी निष्ठा असलेल्या लेखकाच्या बाजूनं सामान्यत: पारडं झुकतंच.’’

यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ समीक्षक निशिकांत ठकार आहेत. त्यांच्याबद्दल अगदी भरभरून बोलताना प्रा. पगार म्हणाले, ‘‘ठकार सरांचं सगळं काम हिंदीतील साहित्य मराठीत आणणं आणि आणि मराठीतलं साहित्य हिंदी वाचकांपर्यंत नेणं असं आहे. इतकी वर्षं अतिशय ताकदीने ते हे काम करीत आले. शिवाय उत्तम समीक्षक आहेत. अनुवाद म्हणजे भाषिक देवघेवीचं सांस्कृतिक कार्य आहे. त्यांच्या कामामुळे आपल्या जीवनाच्या कक्षा विस्तारित होण्यास मोठी मदत होते.’’

‘‘निवडसमितीत इतकी वर्षं काम करतो आहे, कारण मला त्यातून आनंद मिळतो. वर्षभर वाचत राहतो, मराठीतले महत्त्वाचे लेखक त्यामुळे कळतात,’’ अशी भावनाही प्रा. पगार ह्यांनी व्यक्त केली.

निमंत्रक असलेले प्रा. डॉ. सलालकर समितीतील वयाने सर्वांत लहान सदस्य. पुन्हा ते लोणीच्या महाविद्यालयात काम करीत असलेले. पण ‘ते तटस्थ आणि साहित्याचे उत्तम अभ्यासक आहेत,’ असं प्रा. धोंडगे अगदी आग्रहानं सांगतात आणि त्यांच्या निरपेक्षपणाची ग्वाहीच देतात.

सात्रळ महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. सलालकर ह्यांच्याकडे प्रा. शंकर दिघे ह्यांचं लक्ष गेलं. प्रसिद्ध लेखक अरुण साधू ‘पायोनीअर’ ग्रंथाचं काम करीत होते, तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी ह्या तरुण प्राध्यापकावर सोपविण्यात आली. ते साहित्याचे अभ्यासक असल्याचं प्रा. दिघे ह्यांनी एव्हाना ओळखलं आणि त्यांना निवडसमितीच्या बैठकीला येण्यास त्यांनी सांगितलं. त्यानंतर २००७पासून ते काम करीत आहेत.

निवडसमितीचे सदस्य आणि संस्थेशी संबंध ह्यामुळे डॉ. सलालकर ह्यांना खूप काही माहिती आहे. त्याबद्दल ते दिलखुलासपणे सांगतात, ‘‘निवडसमितीचं काम निरपेक्षपणे चालतं. सर्व सदस्य प्रसिद्धिपराङ्मुख आहेत. कुणालाही चमकोगिरी करण्याची सवय नाही. शक्य तेवढं चांगलं निवडण्याचा प्रयत्न असतो. ‘हे पुस्तक बघा, ते वाचून पाहा’, असं आम्ही एकमेकांना सुचवतो. अनेकदा असं घडलं की, आमच्याकडे पुस्तकं आलेली नसतातच. आमच्यापैकी कुणाच्या तरी वाचनात ती येतात. मग तो सदस्य बैठकीत ते ठेवतो. इतर सदस्य वाचतात आणि पुरस्कार मिळतो.’’

...पारडं स्वाभाविकच झुकतं
डॉ. सलालकर म्हणाले, ‘‘आमचं सर्वांचं व्यक्तिगत वाचन भरपूर आहे. वर्षभर आमचा संवाद चालूच असतो. नवीन काही दिसलं-पाहिलं-वाचलं का, हाच त्या संवादातला मुख्य मुद्दा असतो. आमच्या बैठकी खेळीमेळीत होतात. वाङ्मयीन दर्जा महत्त्वाचा आम्ही मानतोच; पण सर्वांत महत्त्वाचा ठरतो तो जीवनविषयक दृष्टिकोण. पद्मश्री विखे पाटील ह्यांनी केलेलं काम आमच्यापुढे आहेच. त्यामुळे बहुजनांच्या दबलेल्या आवाजाला वाचा फोडणाऱ्या लेखकाकडं आमचं पारडं स्वाभाविकपणे झुकतं.’’
 
पुरस्कारांना आता तीस वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. एवढ्या वर्षांत विखे कुटुंबीयांचा काही तरी हस्तक्षेप झाला असेल? कुणासाठी तरी त्यांनी शिफारस केली असेल? निवडसमितीतलं तिन्ही सदस्य ह्याबाबत ठामपणे नकारार्थी बोलतात. प्रा. सलालकर म्हणाले, ‘‘विखे कुटुंबातील कोणी कसली शिफारस केल्याचं मला आठवत नाही. अमक्यालाच पुरस्कार का दिला, तमक्याचं नाव का नाही, असं आम्हाला कुणीही कधीही विचारलं नाही. आम्ही निर्णय घेतो, माध्यमांमध्ये जाहीर करतो आणि मग विखे कुटुंबीयांना कळवतो. कुणाच्या शिफारशीमुळे पुरस्कार मिळत नाही, हा संदेश डॉ. कसबे ह्यांनी अचूकपणे दिलेला आहे.’’

हस्तक्षेप? अजिबात नाही!
‘‘हस्तक्षेप? अजिबात नाही! शिफारस नाही, नाव सुचवणं नाही - सरळ नाही किवा आडवळणाने नाही. काहीही नाही. ही आमच्या दृष्टीने आनंददायी गोष्ट. समिती निर्णय घेईल, हे त्यांचं मत. निवडसमितीला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे,’’ असं प्रा. धोंडगे म्हणाले. अगदी तसंच मत व्यक्त करीत प्रा. पगार म्हणाले, ‘‘कुणाचाही, कुठल्याही पातळीवर हस्तक्षेप नसतो. पुरस्कारासाठी पुस्तकं मागविली जात नाहीत किवा शिफारशी मागविल्या जात नाहीत. महत्त्वाचं काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घ्यायची, हाच मुख्य उद्देश आहे.’’

महाराष्ट्रात दर वर्षी विविध साहित्य संमेलनं होतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दर खेपेला नवीन वाद जन्म घेतो. अशी लाखो रुपयांची उधळपट्टी करून संमेलन घेण्यात अर्थ नाही इथपासून ते संमेलन ही मराठी भाषेची-महाराष्ट्राची विशेष ओळख आहे, ती व्हायलाच हवीत, अशी मतं हिरीरीनं मांडली जातात. संमेलन आयोजित करण्याचा एक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर प्रवरानगर परिसर त्या वाटेकडं पुन्हा गेला नाही. पण विखे साहित्य पुरस्काराच्या निमित्तानं तिथं एक परंपरा सुरू झाली आहे. ती तीस वर्षं अखंड चालू आहे. हे एक छोट्या प्रकारचं संमेलनच म्हणायला हवं. कारण तिथे लेखक दिसतात, दर वर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण ऐकायला मिळतं. सामान्य वाचकाला ह्यापेक्षा अधिक काय हवं असतं?
----------
#विखे_साहित्य_पुरस्कार #साहित्य_संमेलन #विठ्ठलराव_विखे #प्रवरा_परिसर #कोल्हाट्याचं_पोर #रंगनाथ_पठारे #रावसाहेब_कसबे #विखे_कुटुंबीय #जीवनगौरव_पुरस्कार #विखे #ग्रंथाली #नगरी_नगरी #नगर

---------------
(अशा लेखांचे दुवे इ-मेलवर मिळण्यासाठी कृपया Follow करा, ही विनंती.)

Saturday 19 August 2023

भेट त्याची-माझी...


तुमच्या-माझ्या आयुष्यात अनेक #खोट्या_वाटणाऱ्या_खऱ्या_गोष्टी घडतात. चालता चालता अनुभव येतो. पण ह्या गोष्टी प्रत्येक वेळी त्या सांगितल्या जातातच, असं नाही. काही वेळा वाटतं, ‘कशाला कुणाला सांगायचं? विश्वास नाही बसणार. जाऊ द्या.’ काही वेळा त्या विसरून जातात. काही मात्र, का कुणास ठाऊक, लक्षात राहतात. तसा अनुभव पुनःपुन्हा येतो. आणि मग ते सांगितल्याशिवाय राहावत नाही.
 
कारण काहीच नव्हतं. पण अलीकडेच ‘त्याची’ आठवण आली. सहज. चालत असताना त्यानं दिलेले दोन अनुभव आठवले.  बऱ्याच दिवसांत त्याचं दर्शन घडलं नाही, हे अचानक लक्षात आलं. त्याची भेट घडणार होती किंवा ठरावीक काळानं दिसतो, असं काही नाही. योगायोग बघा, त्यानंतर काही दिवसांतच तो भेटला.

स्वातंत्र्यदिनी कार्यक्रम होता. मित्र, स्नेही, ओळखीची मंडळी भेटतात म्हणून त्या कार्यक्रमाला गेलो. रेंगाळलो होतो. बरेच जण भेटत होते. ख्याली-खुशाली विचारली जात होती. मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो टिपले जात होते. पुन्हा भेटण्याचे वायदे केले जात होते.

तेवढ्यात तो समोर आला. दोन्ही हात जोडून नमस्कार करीत आणि चेहऱ्यावर ओळखीचं लाघवी हसू आणत म्हणाला, ‘‘साहेब नमस्कार. लय दिवसांनी भेटलात.’’

हा इसम कोण आहे, हे लक्षात यायला थोडा वेळच लागला. तेवढ्यात तो म्हणाला,   ‘‘मी नाव विसरलो बघा तुमचं.’’ मग सहज आढळणाऱ्यांतली दोन-तीन आडनावं घेऊन त्यानं खडा टाकला. त्याचा अंदाज काही बरोबर आला नाही. पण जवळपास पोहोचला. त्यालाच होकार देऊन टाकला.

ओळख असल्याचं मी मान्य करतोय, हे लक्षात आल्यामुळे धीर चेपला त्याचा. थोडं अधिकच जवळ येऊन बोलायला लागला. त्यामुळे त्याच्या तोंडाचा ‘वास’ आला. ट्यूब पेटली...अरे तोच हा!

दोन्ही हातांमध्ये माझा हात आदराने घेऊन त्याची टकळी सुरू झाली. ‘‘आपली बहीण हितंच काम करती. ती बघा त्या तिकडे आहे...’’ कार्यक्रमाच्या यजमान संस्थेशी जवळीक दाखवून तो विश्वासार्हता सिद्ध करू पाहत होता.

तीन-चार वर्षांपूर्वीची संध्याकाळ. फिरून घरी परत चाललो होतो. दहा हजार पावलांच्या लक्ष्यापैकी बऱ्यापैकी अंतर चालून झालेलं. पण बाकी असलेलं अंतरही अगदीच कमी नव्हतं. आपल्याच नादात चालत होतो. रस्त्यातल्या एका पेट्रोल पंपाच्या जवळ मोटरसायकल उभी करून फाटकासा तरुण उभा होता. त्याचा अवतार पाहून वाटावं की, बिचारा दिवसभर काम करून पार दमलाय. अतिशय अदबीनं त्यानं हाक मारली,  ‘नमस्कार सर... ओळखलंत का?’ त्यानं स्वतःचं आडनाव (पुन्हा तेच. सगळीकडे सहज आढळणारं) सांगितलं, महापालिकेत कामाला आहे असंही म्हणाला. जुनी ओळख असल्यासारखा आणि रोज नाही, पण नियमित भेटत असल्यासारखा संवाद होता त्याचा. मग मी कुठे काम करतो, ह्याचा अंदाज बांधायला लागला.

एवढ्या जवळिकीनं बोलतोय म्हटल्यावर वाटलं, असेल कुठे तरी ओळख झालेली. मग सांगितलं त्याला की, आता अमूक अमूक करतोय. आधीच्या ऑफिसात नाही आता. तोच धागा पकडून तो चटकन् म्हणाला, ‘‘तरीच बरं का. परवा मी ऑफिसात जाऊन आलो, तर तुम्ही दिसला नाहीत! चौकशी केली मी तुमची तिथं. पण कुणी काही नीट सांगितलं नाही.’’

हे ऐकल्यावर वाटलं, नक्कीच ओळखीचा आहे बरं  हा. तशा खुणा माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या त्याला दिसल्या असतील का? बहुतेक. कारण लगेच म्हणाला, ‘‘पेट्रोल संपलं गाडीतलं. नेमके पैसे नाहीत आज. महिनाअखेर आहे ना. तीस-एक रुपये द्या, आतापुरते.’’ खिशात पाकीट नव्हतं. पण असावेत म्हणून शर्टाच्या खिशात ठेवलेली विसाची एक नि दहाची एक नोट होती. त्या दिल्या. तो खूश झाला. नमस्कार करीत निरोप घेताना म्हणाला, ‘दोन दिवसांत ऑफिसांत आणून देतो बघा...’

आता हा कुठल्या ऑफिसात पैसे परत आणून देणार, ही शंका त्या क्षणी आली नाही. पाच मिनिटं पुढं चालत आल्यावर ते लक्षात आलं. मनाशीच म्हणालो, असो!

मग बरेच दिवस गेले. तो लक्षातून गेला. असं कुणी फसवलं हे आत कुठं तरी दडून बसलं. रक्कंम फार नव्हती. फक्त ३० रुपये.

पण तो पुन्हा भेटणार होता. आमच्या दोघांच्या नशिबात परस्परांच्या भेटी लिहिलेल्याच जणू. पुन्हा तशीच एका संध्याकाळ. नेहमीप्रमाणंच चालण्यासाठी बाहेर पडलो होतो. एका चौकात अचानक तो समोर आला. त्याच अदबीनं हाक. तीच ओळख दाखवण्याची पद्धत. तसाच लीनपणे नमस्कार. तोच नाव-आडनावाचा खेळ. स्वतःची तीच ओळख पटवून देणं...

एव्हाना अंदाज आला होता. तो खरा ठरवत त्यानं ह्या वेळी ५० रुपयांची मागणी केली. जवळ गाडी नव्हती. त्याला एक अत्यावश्यक औषध घेऊन रिक्षानं घरी जायचं होतं. पाकीट कुठं तरी हरवलेलं किंवा फार गर्दी नसलेल्या रस्त्यावरही मारलेलं. औषधाची एकच गोळी घेऊन त्याला घरच्या कुणाची तरी तातडीची गरज भागवायची होती.

अक्कलखाती जमा केलेल्या ३० रुपयांची एंट्री पुन्हा वर आली. हा गडी ‘सराईत’ आहे, हे लक्षात आलं. त्याला नकार देऊन पुढे चालू लागलो. ‘साहेब, साहेब...’ अशा हाका मारत तो चार पावलं मागे मागे आला. मग थांबला.

दोन्ही वेळा त्यानं स्वतःचं आडनाव एकच सांगितलं होतं. आणि नोकरीचं ठिकाणही! खरंही असेल ते. कारणं मात्र वेगळी. सहज पटतील अशी.

त्या भेटीलाही दोन वर्षं सहज उलटून गेली असावीत. पण कशी कुणास ठाऊक ‘त्याची’ त्या दिवशी अचानक आठवण झाली. तो पुन्हा भेटलं, तर काय सांगायचं, हेही मनाशी ठरवलं. तो पुन्हा भेटेलच, असं कशावरून? पण तसं वाटत होतं खरं.

...आणि वाटलं ते खरं ठरलं. आठवण झाल्यानंतर महिनाभरातच तो दिसला. भेटला. एकदम समोर येऊन. वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखी सलगी दाखवत.

तो बोलत होता. आपली ओळख किती घट्ट आहे, ते पटवत देऊन पाहत होता. त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडत म्हणालो, ‘‘अरे, ओळखतो ना मी तुला. चांगलं ओळखतो. तुला दोन वेळा पैसे दिले होते. एकदा त्या अमूक तमूक ठिकाणी दीडशे रुपये पेट्रोलला आणि मग नंतर इथं इथं १०० रुपये. अडीचशे रुपये दिलेत की मी तुला.’’

मी एकदा नव्हे, तर दोन वेळा पैसे दिल्याचं ठिकाणाचा दाखला देत सांगताच तो एकदम सर्दावला. सलगी दाखवताना दिसणारा आत्मविश्वास एकदम गेला. तो गरीब बापुडा झाला. हे बोलायचं ठरवलं मागं, तेव्हा वाटलं होतं की, तो पैसे घेतल्याचं मान्यच करणार नाही. तो अंदाज मात्र चुकला. पैसे घेतल्याचं लगेच मान्य करून म्हणाला, ‘‘हो साहेब. दिले तुम्ही पैसे. दोनदा दिलेत.’’

‘‘परत देतोस ना आता? एवढ्या दिवसांनी भेटला आहेस, तर देऊन टाक लगेच!’’ ह्या मागणीनं तो अधिकच खचला. ‘आत्ता नाहीत ना पैसे,’ म्हणत मागं मागं सरकू लागला.

तेवढ्यात कुणी तरी ओळखीचं आलं. त्याच्याशी हात मिळवत होतो. त्याचा फायदा घेत तो दिसेनासा झाला. न मिळालेल्या २२० रुपयांचं ओझं घेऊन गायब झाला. त्या छोट्याशा जागेतील मोजक्या गर्दीत ‘तो’ जणू विरघळून गेला...
................

(चित्रांचं सौजन्य : www.dreamstime.com)
................

#खोट्या_वाटणाऱ्या_खऱ्या_गोष्टी #भेट #अनुभव #पैसे #तो #संध्याकाळ #चालता_चालता #अनुभव

................

(अशाच लेखनासाठी कृपया  Follow करा, ही विनंती)

Friday 4 August 2023

महानोर आणि ‘संवाद’

 


(छायाचित्र आंतरजालावरून साभार)

सकाळी उठल्यावर सहज टीव्ही. चालू केला आणि पहिलीच बातमी कानी पडली ती निसर्गकवी ना. धों. महानोर ह्यांच्या निधनाची. ती ऐकल्यावर एक गोष्ट लगेच आठवली. त्यांच्याशी झालेल्या फोन-संवादाची.

गोष्ट जुनी आहे. साधारण १४-१५ वर्षांपूर्वीची. महिना होता डिसेंबरचा. ‘लोकसत्ता’च्या ‘मराठवाडा वृत्तान्त’मध्ये पहिल्या पानावर रोज एक लेख प्रसिद्ध केला जाई.  सदराचं नाव होतं ‘संवाद’.

हे सदर माझ्या फार आवडीचं. कारण रोजच्या कामाची सुरुवातच मुळी लेखाच्या संपादनानं होई. नवं असं काही वाचायला मिळण्याचा आनंद वेगळाच! रोज नवा लेखक. ‘मराठवाडा वृत्तान्त’च्या ‘संवाद’मध्ये लिहिण्याला प्रतिष्ठा होती. थोडी अतिशयोक्ती करायची, तर त्यासाठी थोडी स्पर्धाही होती हौशी लेखक-कवींमध्ये. कारण विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये ते लेखन जाई. जिल्हानिहाय वेगळी आवृत्ती आणि काही तालुक्यांसाठी उपआवृत्ती  असण्याच्या काळात हे थोडं दुर्मिळच होतं.

त्या वर्षीसाठी जवळपास पाच-सहा लेखक निश्चित झाले होते. शेवटची एक-दोन नावं ठरवायची होती. त्यातलं एक नाव तरी बिनीचं हवं होतं. सहज मनात आलं, ना. धों. महानोर लिहितील? होतील सहजासहजी तयार? प्रयत्न तर करू, असं म्हणत त्यांचा क्रमांक मिळवला. तो बहुतेक त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणाचा तरी असावा. दोन-तीन वेळा प्रयत्न केला; पण त्यावरून त्यांच्याशी संपर्क होतच नव्हता.

पण तो योग लिहिलेला असावा. त्या दिवशी दुपारी सहज क्रमांक फिरविला आणि पलीकडे साक्षात महानोर होते! त्यांना ओळख करून दिली. सदराविषयी सांगितलं आणि म्हणालो, ‘‘ह्या वर्षी तुम्ही सदरासाठी आठवड्यातील एक दिवस लिहावं, अशी फार इच्छा आहे. आमची विनंती आहे...’’

दुसऱ्याच क्षणी पलीकडून उत्तर आलं, ‘‘लिहीन की. आवडेल मला.’’ 

ना. धों. ह्यांनी बहुतेक ह्या सदराबद्दल ऐकलं होतं. वाचण्यातही आलं असणार त्यांच्या. आधी कुणी कुणी लिहिलंय ह्यातली दोन-चार नावं त्यांना माहीत असावीत. त्यांचा होकार ऐकला आणि फार मोठी उडी मारल्याचा आनंद झाला.

वरिष्ठांच्या दालनात त्या दिवशीच्या बातम्यांची चर्चा चालू होती - बहुतेक ‘पुणे वृत्तान्त’ची. तिथे गेलो आणि सांगितलं,  ‘‘शेवटचं नाव पक्कं झालं. महानोर! लिहायचं मान्य केलं त्यांनी!!’’

तिथेही क्षणभर सन्नाटाच. महानोर ह्यांच्यासारखा अतिशय प्रसिद्ध कवी-लेखक विभागीय आवृत्तीसाठी लिहायला तयार झाला, ही खरंच मोठी गोष्ट होती. भानावर येऊन एका सहकाऱ्यानं विचारलं, ‘‘तुमची नि महानोरांची एवढी ओळख आहे, सांगितलं नाही कधी!’’

ओळख? श्री. महानोर ह्यांच्याशी  पहिल्यांदाच बोललो होतो. तरीही त्यांनी लिहिण्याचं मान्य केलं होतं. मानधन किती, कोणत्या दिवशी वगैरे काही चौकशी न करता ते होकार देते झाले. त्याचं साधं-सोपं कारण मला वाटलं होतं, तेच सांगितलं - ‘लोकसत्ता’ नावाची पुण्याई! म्हणून तर ओळख नसताना पहिल्या फटक्यात त्यांनी माझी विनंती मान्य केली होती.

नवं वर्षं उजाडलं आणि महानोरांचं लेखन चालू झालं. ते बहुतेक सांगत असावेत आणि कुणी तरी लिहून घेत असावं. कारण माझ्याकडे जो मजकूर येई, त्याचा ओघ लिहिण्याचा नव्हता, तर बोलण्याचा होता. इतर लेखकांना जेवढं मानधन होतं, तेवढंच श्री. महानोर ह्यांना मिळत असे. त्याबद्दल त्यांनी कधीही चौकशी केली नाही किंवा ते मिळायला उशीर झाला, तर तक्रार केली नाही.

नंतर का कुणास ठाऊक मे किंवा जूनमध्ये श्री. महानोर ह्यांनी आपला मोहरा जळगावच्या साहित्य संमेलनाकडे (१९८४) वळवला. त्याच्या स्वागत किंवा संयोजन समितीत ते होते. संमेलनाची धुरा बहुतेक ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी ह्यांच्याकडे होती. सलग तीन किंवा चार आठवडे ते ह्याच संमेलनाच्या संयोजनाबद्दल टीका करीत होते. त्यांचा रोख श्री. चौधरी ह्यांच्याकडे होता.

हे जळगावचं प्रकरण अचानक थांबलं. श्री. महानोर ह्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होणार होती. त्यामुळे काही महिने तरी लिहायला जमणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ‘संवाद’मध्ये सहा महिने लिहून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर पुन्हा कधी त्यांना फोन करण्याचा प्रसंग आला नाही.

महानोरांची अजून एक आठवण आहे ती परभणी संमेलनाची. त्या संमेलनातल्या त्यांच्या मुलाखतीने मोठे आकर्षक, सनसनाटी मथळे मिळवले होते. ‘करंदीकर, बापट, पाडगावकर यांनी काव्यवाचनाची गोडी घालवली’ असा बॉम्बगोळाच त्यांनी टाकला होता. त्याचे पडसाद बराच काळ (मराठी) साहित्यविश्वात उमटत राहिले. त्यांच्या त्या मुलाखतीनंतर काही महिन्यांनीच श्री. मंगेश पाडगावकर नगर येथे आले होते. तेव्हा ह्याबाबत विचारल्यावर त्यांनी ‘मी बोललंच पाहिजे असं नाही’ असं सांगून विषयाला पूर्णविराम दिला होता. (ती आठवण इथे वाचता येईल - https://khidaki.blogspot.com/2015/12/blog-post_30.html)

पुण्यात २०१०मध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी. (दोन वर्षांनी त्यांनी माझ्या ‘शब्दसंवाद’ पुस्तकाला एक विस्तृत ब्लर्ब लिहिला, हा वेगळाच योगायोग!) त्या संमेलनावर एक दुःखद छाया होती कविवर्य विंदा करंदीकर ह्यांच्या निधनाची. संमेलनाच्या दोन आठवडे आधी हा कवी हे जग सोडून गेला होता. संमेलनाचं उद्घाटन श्री. महानोर ह्यांच्या हस्ते झालं. त्या वेळी त्यांचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्याच्या दोन आठवणी आहेत - एक तर हे त्यांचं भाषण खूप लांबलं. त्यात त्यांचा सारा भर राहिला तो विंदा करंदीकर ह्यांचं आपल्यावर किती प्रेम होतं, हे सांगण्यावर.

महानोरांनी ‘मराठवाडा वृत्तान्त’साठी जवळपास सहा महिने लिहिलं. त्यांचा लेख असलेला एकही अंक संग्रहात नाही. वाटलं होतं की, ते वर्षभर लिहितील आणि त्याचं एक सुंदर पुस्तक येईल. पण ती सगळीच कहाणी अर्ध्यावर राहिलेली... त्यांच्या निधनासारखीच हळहळ लावणारी!
....
#महानोर #निसर्गकवी #लोकसत्ता #मराठवाडा_वृत्तान्त #सदर_लेखन #संवाद #पुणे_साहित्य_संमेलन #विंदा_करंदीकर #जळगाव_साहित्य_संमेलन

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...