Friday 4 August 2023

महानोर आणि ‘संवाद’

 


(छायाचित्र आंतरजालावरून साभार)

सकाळी उठल्यावर सहज टीव्ही. चालू केला आणि पहिलीच बातमी कानी पडली ती निसर्गकवी ना. धों. महानोर ह्यांच्या निधनाची. ती ऐकल्यावर एक गोष्ट लगेच आठवली. त्यांच्याशी झालेल्या फोन-संवादाची.

गोष्ट जुनी आहे. साधारण १४-१५ वर्षांपूर्वीची. महिना होता डिसेंबरचा. ‘लोकसत्ता’च्या ‘मराठवाडा वृत्तान्त’मध्ये पहिल्या पानावर रोज एक लेख प्रसिद्ध केला जाई.  सदराचं नाव होतं ‘संवाद’.

हे सदर माझ्या फार आवडीचं. कारण रोजच्या कामाची सुरुवातच मुळी लेखाच्या संपादनानं होई. नवं असं काही वाचायला मिळण्याचा आनंद वेगळाच! रोज नवा लेखक. ‘मराठवाडा वृत्तान्त’च्या ‘संवाद’मध्ये लिहिण्याला प्रतिष्ठा होती. थोडी अतिशयोक्ती करायची, तर त्यासाठी थोडी स्पर्धाही होती हौशी लेखक-कवींमध्ये. कारण विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये ते लेखन जाई. जिल्हानिहाय वेगळी आवृत्ती आणि काही तालुक्यांसाठी उपआवृत्ती  असण्याच्या काळात हे थोडं दुर्मिळच होतं.

त्या वर्षीसाठी जवळपास पाच-सहा लेखक निश्चित झाले होते. शेवटची एक-दोन नावं ठरवायची होती. त्यातलं एक नाव तरी बिनीचं हवं होतं. सहज मनात आलं, ना. धों. महानोर लिहितील? होतील सहजासहजी तयार? प्रयत्न तर करू, असं म्हणत त्यांचा क्रमांक मिळवला. तो बहुतेक त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणाचा तरी असावा. दोन-तीन वेळा प्रयत्न केला; पण त्यावरून त्यांच्याशी संपर्क होतच नव्हता.

पण तो योग लिहिलेला असावा. त्या दिवशी दुपारी सहज क्रमांक फिरविला आणि पलीकडे साक्षात महानोर होते! त्यांना ओळख करून दिली. सदराविषयी सांगितलं आणि म्हणालो, ‘‘ह्या वर्षी तुम्ही सदरासाठी आठवड्यातील एक दिवस लिहावं, अशी फार इच्छा आहे. आमची विनंती आहे...’’

दुसऱ्याच क्षणी पलीकडून उत्तर आलं, ‘‘लिहीन की. आवडेल मला.’’ 

ना. धों. ह्यांनी बहुतेक ह्या सदराबद्दल ऐकलं होतं. वाचण्यातही आलं असणार त्यांच्या. आधी कुणी कुणी लिहिलंय ह्यातली दोन-चार नावं त्यांना माहीत असावीत. त्यांचा होकार ऐकला आणि फार मोठी उडी मारल्याचा आनंद झाला.

वरिष्ठांच्या दालनात त्या दिवशीच्या बातम्यांची चर्चा चालू होती - बहुतेक ‘पुणे वृत्तान्त’ची. तिथे गेलो आणि सांगितलं,  ‘‘शेवटचं नाव पक्कं झालं. महानोर! लिहायचं मान्य केलं त्यांनी!!’’

तिथेही क्षणभर सन्नाटाच. महानोर ह्यांच्यासारखा अतिशय प्रसिद्ध कवी-लेखक विभागीय आवृत्तीसाठी लिहायला तयार झाला, ही खरंच मोठी गोष्ट होती. भानावर येऊन एका सहकाऱ्यानं विचारलं, ‘‘तुमची नि महानोरांची एवढी ओळख आहे, सांगितलं नाही कधी!’’

ओळख? श्री. महानोर ह्यांच्याशी  पहिल्यांदाच बोललो होतो. तरीही त्यांनी लिहिण्याचं मान्य केलं होतं. मानधन किती, कोणत्या दिवशी वगैरे काही चौकशी न करता ते होकार देते झाले. त्याचं साधं-सोपं कारण मला वाटलं होतं, तेच सांगितलं - ‘लोकसत्ता’ नावाची पुण्याई! म्हणून तर ओळख नसताना पहिल्या फटक्यात त्यांनी माझी विनंती मान्य केली होती.

नवं वर्षं उजाडलं आणि महानोरांचं लेखन चालू झालं. ते बहुतेक सांगत असावेत आणि कुणी तरी लिहून घेत असावं. कारण माझ्याकडे जो मजकूर येई, त्याचा ओघ लिहिण्याचा नव्हता, तर बोलण्याचा होता. इतर लेखकांना जेवढं मानधन होतं, तेवढंच श्री. महानोर ह्यांना मिळत असे. त्याबद्दल त्यांनी कधीही चौकशी केली नाही किंवा ते मिळायला उशीर झाला, तर तक्रार केली नाही.

नंतर का कुणास ठाऊक मे किंवा जूनमध्ये श्री. महानोर ह्यांनी आपला मोहरा जळगावच्या साहित्य संमेलनाकडे (१९८४) वळवला. त्याच्या स्वागत किंवा संयोजन समितीत ते होते. संमेलनाची धुरा बहुतेक ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी ह्यांच्याकडे होती. सलग तीन किंवा चार आठवडे ते ह्याच संमेलनाच्या संयोजनाबद्दल टीका करीत होते. त्यांचा रोख श्री. चौधरी ह्यांच्याकडे होता.

हे जळगावचं प्रकरण अचानक थांबलं. श्री. महानोर ह्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होणार होती. त्यामुळे काही महिने तरी लिहायला जमणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ‘संवाद’मध्ये सहा महिने लिहून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर पुन्हा कधी त्यांना फोन करण्याचा प्रसंग आला नाही.

महानोरांची अजून एक आठवण आहे ती परभणी संमेलनाची. त्या संमेलनातल्या त्यांच्या मुलाखतीने मोठे आकर्षक, सनसनाटी मथळे मिळवले होते. ‘करंदीकर, बापट, पाडगावकर यांनी काव्यवाचनाची गोडी घालवली’ असा बॉम्बगोळाच त्यांनी टाकला होता. त्याचे पडसाद बराच काळ (मराठी) साहित्यविश्वात उमटत राहिले. त्यांच्या त्या मुलाखतीनंतर काही महिन्यांनीच श्री. मंगेश पाडगावकर नगर येथे आले होते. तेव्हा ह्याबाबत विचारल्यावर त्यांनी ‘मी बोललंच पाहिजे असं नाही’ असं सांगून विषयाला पूर्णविराम दिला होता. (ती आठवण इथे वाचता येईल - https://khidaki.blogspot.com/2015/12/blog-post_30.html)

पुण्यात २०१०मध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी. (दोन वर्षांनी त्यांनी माझ्या ‘शब्दसंवाद’ पुस्तकाला एक विस्तृत ब्लर्ब लिहिला, हा वेगळाच योगायोग!) त्या संमेलनावर एक दुःखद छाया होती कविवर्य विंदा करंदीकर ह्यांच्या निधनाची. संमेलनाच्या दोन आठवडे आधी हा कवी हे जग सोडून गेला होता. संमेलनाचं उद्घाटन श्री. महानोर ह्यांच्या हस्ते झालं. त्या वेळी त्यांचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्याच्या दोन आठवणी आहेत - एक तर हे त्यांचं भाषण खूप लांबलं. त्यात त्यांचा सारा भर राहिला तो विंदा करंदीकर ह्यांचं आपल्यावर किती प्रेम होतं, हे सांगण्यावर.

महानोरांनी ‘मराठवाडा वृत्तान्त’साठी जवळपास सहा महिने लिहिलं. त्यांचा लेख असलेला एकही अंक संग्रहात नाही. वाटलं होतं की, ते वर्षभर लिहितील आणि त्याचं एक सुंदर पुस्तक येईल. पण ती सगळीच कहाणी अर्ध्यावर राहिलेली... त्यांच्या निधनासारखीच हळहळ लावणारी!
....
#महानोर #निसर्गकवी #लोकसत्ता #मराठवाडा_वृत्तान्त #सदर_लेखन #संवाद #पुणे_साहित्य_संमेलन #विंदा_करंदीकर #जळगाव_साहित्य_संमेलन

2 comments:

  1. अनोख्या आठवणी आहेत. एक लेखक व्यक्तिगत जीवनात कसे असतात/वागतात हे कुतूहल अनेकदा असते. ते काही अंशी या आठवणी वाचताना पूर्ण होते

    ReplyDelete
  2. अशा लेखामुळे लेखणीमागचा लेखक समजतो.

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...