Saturday 19 August 2023

भेट त्याची-माझी...


तुमच्या-माझ्या आयुष्यात अनेक #खोट्या_वाटणाऱ्या_खऱ्या_गोष्टी घडतात. चालता चालता अनुभव येतो. पण ह्या गोष्टी प्रत्येक वेळी त्या सांगितल्या जातातच, असं नाही. काही वेळा वाटतं, ‘कशाला कुणाला सांगायचं? विश्वास नाही बसणार. जाऊ द्या.’ काही वेळा त्या विसरून जातात. काही मात्र, का कुणास ठाऊक, लक्षात राहतात. तसा अनुभव पुनःपुन्हा येतो. आणि मग ते सांगितल्याशिवाय राहावत नाही.
 
कारण काहीच नव्हतं. पण अलीकडेच ‘त्याची’ आठवण आली. सहज. चालत असताना त्यानं दिलेले दोन अनुभव आठवले.  बऱ्याच दिवसांत त्याचं दर्शन घडलं नाही, हे अचानक लक्षात आलं. त्याची भेट घडणार होती किंवा ठरावीक काळानं दिसतो, असं काही नाही. योगायोग बघा, त्यानंतर काही दिवसांतच तो भेटला.

स्वातंत्र्यदिनी कार्यक्रम होता. मित्र, स्नेही, ओळखीची मंडळी भेटतात म्हणून त्या कार्यक्रमाला गेलो. रेंगाळलो होतो. बरेच जण भेटत होते. ख्याली-खुशाली विचारली जात होती. मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो टिपले जात होते. पुन्हा भेटण्याचे वायदे केले जात होते.

तेवढ्यात तो समोर आला. दोन्ही हात जोडून नमस्कार करीत आणि चेहऱ्यावर ओळखीचं लाघवी हसू आणत म्हणाला, ‘‘साहेब नमस्कार. लय दिवसांनी भेटलात.’’

हा इसम कोण आहे, हे लक्षात यायला थोडा वेळच लागला. तेवढ्यात तो म्हणाला,   ‘‘मी नाव विसरलो बघा तुमचं.’’ मग सहज आढळणाऱ्यांतली दोन-तीन आडनावं घेऊन त्यानं खडा टाकला. त्याचा अंदाज काही बरोबर आला नाही. पण जवळपास पोहोचला. त्यालाच होकार देऊन टाकला.

ओळख असल्याचं मी मान्य करतोय, हे लक्षात आल्यामुळे धीर चेपला त्याचा. थोडं अधिकच जवळ येऊन बोलायला लागला. त्यामुळे त्याच्या तोंडाचा ‘वास’ आला. ट्यूब पेटली...अरे तोच हा!

दोन्ही हातांमध्ये माझा हात आदराने घेऊन त्याची टकळी सुरू झाली. ‘‘आपली बहीण हितंच काम करती. ती बघा त्या तिकडे आहे...’’ कार्यक्रमाच्या यजमान संस्थेशी जवळीक दाखवून तो विश्वासार्हता सिद्ध करू पाहत होता.

तीन-चार वर्षांपूर्वीची संध्याकाळ. फिरून घरी परत चाललो होतो. दहा हजार पावलांच्या लक्ष्यापैकी बऱ्यापैकी अंतर चालून झालेलं. पण बाकी असलेलं अंतरही अगदीच कमी नव्हतं. आपल्याच नादात चालत होतो. रस्त्यातल्या एका पेट्रोल पंपाच्या जवळ मोटरसायकल उभी करून फाटकासा तरुण उभा होता. त्याचा अवतार पाहून वाटावं की, बिचारा दिवसभर काम करून पार दमलाय. अतिशय अदबीनं त्यानं हाक मारली,  ‘नमस्कार सर... ओळखलंत का?’ त्यानं स्वतःचं आडनाव (पुन्हा तेच. सगळीकडे सहज आढळणारं) सांगितलं, महापालिकेत कामाला आहे असंही म्हणाला. जुनी ओळख असल्यासारखा आणि रोज नाही, पण नियमित भेटत असल्यासारखा संवाद होता त्याचा. मग मी कुठे काम करतो, ह्याचा अंदाज बांधायला लागला.

एवढ्या जवळिकीनं बोलतोय म्हटल्यावर वाटलं, असेल कुठे तरी ओळख झालेली. मग सांगितलं त्याला की, आता अमूक अमूक करतोय. आधीच्या ऑफिसात नाही आता. तोच धागा पकडून तो चटकन् म्हणाला, ‘‘तरीच बरं का. परवा मी ऑफिसात जाऊन आलो, तर तुम्ही दिसला नाहीत! चौकशी केली मी तुमची तिथं. पण कुणी काही नीट सांगितलं नाही.’’

हे ऐकल्यावर वाटलं, नक्कीच ओळखीचा आहे बरं  हा. तशा खुणा माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या त्याला दिसल्या असतील का? बहुतेक. कारण लगेच म्हणाला, ‘‘पेट्रोल संपलं गाडीतलं. नेमके पैसे नाहीत आज. महिनाअखेर आहे ना. तीस-एक रुपये द्या, आतापुरते.’’ खिशात पाकीट नव्हतं. पण असावेत म्हणून शर्टाच्या खिशात ठेवलेली विसाची एक नि दहाची एक नोट होती. त्या दिल्या. तो खूश झाला. नमस्कार करीत निरोप घेताना म्हणाला, ‘दोन दिवसांत ऑफिसांत आणून देतो बघा...’

आता हा कुठल्या ऑफिसात पैसे परत आणून देणार, ही शंका त्या क्षणी आली नाही. पाच मिनिटं पुढं चालत आल्यावर ते लक्षात आलं. मनाशीच म्हणालो, असो!

मग बरेच दिवस गेले. तो लक्षातून गेला. असं कुणी फसवलं हे आत कुठं तरी दडून बसलं. रक्कंम फार नव्हती. फक्त ३० रुपये.

पण तो पुन्हा भेटणार होता. आमच्या दोघांच्या नशिबात परस्परांच्या भेटी लिहिलेल्याच जणू. पुन्हा तशीच एका संध्याकाळ. नेहमीप्रमाणंच चालण्यासाठी बाहेर पडलो होतो. एका चौकात अचानक तो समोर आला. त्याच अदबीनं हाक. तीच ओळख दाखवण्याची पद्धत. तसाच लीनपणे नमस्कार. तोच नाव-आडनावाचा खेळ. स्वतःची तीच ओळख पटवून देणं...

एव्हाना अंदाज आला होता. तो खरा ठरवत त्यानं ह्या वेळी ५० रुपयांची मागणी केली. जवळ गाडी नव्हती. त्याला एक अत्यावश्यक औषध घेऊन रिक्षानं घरी जायचं होतं. पाकीट कुठं तरी हरवलेलं किंवा फार गर्दी नसलेल्या रस्त्यावरही मारलेलं. औषधाची एकच गोळी घेऊन त्याला घरच्या कुणाची तरी तातडीची गरज भागवायची होती.

अक्कलखाती जमा केलेल्या ३० रुपयांची एंट्री पुन्हा वर आली. हा गडी ‘सराईत’ आहे, हे लक्षात आलं. त्याला नकार देऊन पुढे चालू लागलो. ‘साहेब, साहेब...’ अशा हाका मारत तो चार पावलं मागे मागे आला. मग थांबला.

दोन्ही वेळा त्यानं स्वतःचं आडनाव एकच सांगितलं होतं. आणि नोकरीचं ठिकाणही! खरंही असेल ते. कारणं मात्र वेगळी. सहज पटतील अशी.

त्या भेटीलाही दोन वर्षं सहज उलटून गेली असावीत. पण कशी कुणास ठाऊक ‘त्याची’ त्या दिवशी अचानक आठवण झाली. तो पुन्हा भेटलं, तर काय सांगायचं, हेही मनाशी ठरवलं. तो पुन्हा भेटेलच, असं कशावरून? पण तसं वाटत होतं खरं.

...आणि वाटलं ते खरं ठरलं. आठवण झाल्यानंतर महिनाभरातच तो दिसला. भेटला. एकदम समोर येऊन. वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखी सलगी दाखवत.

तो बोलत होता. आपली ओळख किती घट्ट आहे, ते पटवत देऊन पाहत होता. त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडत म्हणालो, ‘‘अरे, ओळखतो ना मी तुला. चांगलं ओळखतो. तुला दोन वेळा पैसे दिले होते. एकदा त्या अमूक तमूक ठिकाणी दीडशे रुपये पेट्रोलला आणि मग नंतर इथं इथं १०० रुपये. अडीचशे रुपये दिलेत की मी तुला.’’

मी एकदा नव्हे, तर दोन वेळा पैसे दिल्याचं ठिकाणाचा दाखला देत सांगताच तो एकदम सर्दावला. सलगी दाखवताना दिसणारा आत्मविश्वास एकदम गेला. तो गरीब बापुडा झाला. हे बोलायचं ठरवलं मागं, तेव्हा वाटलं होतं की, तो पैसे घेतल्याचं मान्यच करणार नाही. तो अंदाज मात्र चुकला. पैसे घेतल्याचं लगेच मान्य करून म्हणाला, ‘‘हो साहेब. दिले तुम्ही पैसे. दोनदा दिलेत.’’

‘‘परत देतोस ना आता? एवढ्या दिवसांनी भेटला आहेस, तर देऊन टाक लगेच!’’ ह्या मागणीनं तो अधिकच खचला. ‘आत्ता नाहीत ना पैसे,’ म्हणत मागं मागं सरकू लागला.

तेवढ्यात कुणी तरी ओळखीचं आलं. त्याच्याशी हात मिळवत होतो. त्याचा फायदा घेत तो दिसेनासा झाला. न मिळालेल्या २२० रुपयांचं ओझं घेऊन गायब झाला. त्या छोट्याशा जागेतील मोजक्या गर्दीत ‘तो’ जणू विरघळून गेला...
................

(चित्रांचं सौजन्य : www.dreamstime.com)
................

#खोट्या_वाटणाऱ्या_खऱ्या_गोष्टी #भेट #अनुभव #पैसे #तो #संध्याकाळ #चालता_चालता #अनुभव

................

(अशाच लेखनासाठी कृपया  Follow करा, ही विनंती)

No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...