Saturday 30 December 2017

स्वप्न ‘हायजिन सिटी’चं!

खाद्यसाधन हे एक प्रकारचे योगसाधन आहे. अनेक इंद्रियांवर विजय मिळवून खावे लागते. त्यांत मुख्य आवरावे लागते ते स्वच्छतेचे इंद्रिय. त्यानंतर आरोग्यविषयक पाणचट कल्पना...
माझे खाद्यजीवन’ : ‘हसवणूक’, पु. ल. देशपांडे

वाचताना हा मजकूर खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत वाटतो खरा. हसूही येतं. वर्षानुवर्षं आपण ऐकत असलेल्या चव आणि स्वच्छता या व्यस्त प्रमाणाला पु. ल. यांच्यासारख्या मोठ्या लेखकानं दिलेलं हे प्रमाणपत्र वाचून बरं वाटतं. भज्यांचा घाणा तळताना कपाळावरचा घाम मनगट-तळव्यानं निपटत तोच कढईत टाकून तेल पुरेसं तापलं की नाही, हे पाहणारा भट्टीवाला आपण ऐकून असतो. बेकरीतले कारागीर पावाचा मैदा कसा कुंभारासारखा पायानं तुडवतात, याचे किस्सेही कोणी कधी तरी सांगितलेले असतात. त्यामुळंच चवीची स्वच्छतेशी सांगड घालण्याचं कारण नाही, असा (गैर)समज खोलवर रुजलेला असतो.

ऐकून-वाचून हसण्यापुरतं हे ठीक आहे. प्रत्यक्षात पोटपूजा करताना चित्र थोडं विचित्र असलं, तर कपाळावर आठ्या उमटतात.स्वच्छतेचे इंद्रिय आवरण्याचा सल्ला देणारे पु. ल. याच लेखात पुढे लिहितात,  मथुरेची रबडी ही कशी दिसते हे मी अजूनही पाहू शकलो नाही. त्या भांड्यावर सहस्रावधी मक्षिकांचा कुंभमेळा जमलेला असतो. हलवाई हा मुख्यतः मक्षिकापालन करतो. मला वाटते, माशा हाकलण्यासाठी तो सारखा हात हलवत असतो, म्हणूनच त्याला 'हलवाई' म्हणत असावेत.

ही गोष्ट नगरची. पाव आणण्यासाठी एक गृहिणी बेकरीत गेली होती. तिथं तिला दिसलं की, एका कर्मचाऱ्याला सोरायसिस आहे. त्यानं बनवलेला पाव मुलांना द्यायचा? आपण खायचा? कल्पनेनं तिच्या अंगावर काटा आला. एका उपाहारगृहात काम करणाऱ्या मावशींनी स्वच्छता, पाणी, भाज्या बनविणं याबाबत कशी बेफिकिरी असते, ते सांगितलं आणि नंतर एका उपाहारगृहात दिसलेलं (अस्वच्छ) चित्र पाहून ही गृहिणी अधिकच अस्वस्थ झाली. हे सारं बदललं पाहिजे असं तिला मनापासून वाटू लागलं. ग्राहकब्रँडबद्दल एवढे आग्रही असतात, मग त्यांनी खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत का आग्रह धरू नये? मेन्यूएवढंच महत्त्व ते पदार्थ बनविताना स्वच्छता-आरोग्य पाळण्याला का नसावं? याबाबत जागरूकता का नाही? बाईंच्या मनात असे प्रश्न उभे राहिले. ते छळू लागले.
 
प्रेरक तंत्राचा लँडमार्क हा अभ्यासक्रम औरंगाबाद येथे करताना या गृहिणीपुढं एक संधी चालून आली. त्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट उद्दिष्ट मनात ठेवून प्रकल्प करायचा होता. मनात प्रश्न होतेच. त्यातूनच कल्पना सुचली आणि ठरलं - फूड हायजिनबद्दल काम करायचं. अन्नपदार्थ स्वच्छ कसे मिळतील, एवढ्याचसाठी काम करायचं!

अस्वस्थ असलेल्या त्या गृहिणीला - वैशाली रोहित गांधी यांना ही कल्पना सुचली आणि हायजिन फर्स्टचा जन्म झाला. या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नगरसारख्या मध्यम शहरात पावणेतीन वर्षांमध्ये मूलभूत आणि लक्षणीय काम होताना दिसत आहे. खाद्यपदार्थ बनविताना-विकताना स्वच्छता हवी, हे पटवून देणं हाच संस्थेचा उद्देश. हातगाडीपासून हॉटेलापर्यंत स्वच्छता पाळण्याचा आग्रह, त्यासाठी जागृती आणि प्रबोधन. अशा मुद्द्यांवर काम करणारी ही नगरमधली पहिली आणि एकमेव संस्था. नगरमध्ये गेल्या पंधरवड्यात झालेल्या कार्यक्रमात हॉटेल आयरिस प्रीमियरला या वर्षीचं हायजिन फर्स्ट - फाइव्ह स्टार मानांकन देण्यात आलं. स्वच्छता-आरोग्यपूर्ण वातावरण एवढाच या मानांकनाचा निकष होता. त्यासाठी हायजिन फर्स्टच्या सदस्यांनी वेळोवेळी तिथे जाऊन पाहणी केली.
हायजिन फर्स्टकडून पंचतारांकित मानांकन मिळविणाऱ्या नगरच्या हॉटेल आयरिस प्रीमियरचे कर्मचारी प्रमाणपत्र आनंदाने दाखविताना.
वैशाली गांधी यांना संस्था सुरू करून असं काम करावं वाटलं आणि त्याला घरातून पाठिंबा मिळाला. पती डॉ. रोहित व सासूबाईंसह इतरांनी त्यांना त्यासाठी मोकळीक दिली. असं काम करण्याचा उद्देश बोलून दाखविला आणि हायजिन फर्स्टच्या टीममध्ये लगेच मनीष बोरा, विजय देशपांडे, नवीन दळवी, रूपाली बिहाणी, सविता कटारिया, वैशाली झंवर, निर्मल गांधी, दीपाली चुत्तर, अन्न निरीक्षक आदिनाथ बाचकर आदी सहभागी झाले. पत्नीला साथ द्यायला डॉ. रोहित गांधी होतेच. सध्या संस्थेच्या कामकाजात जवळपास २५ जण नियमितपणे भाग घेतात. त्यामध्ये स्वच्छतादूत डॉ. आश्लेषा भांडारकर, वैशाली झंवर, प्रा. गिरीश कुकरेजा, वैशाली मुनोत, कीर्ती शिंगवी, रजत दायमा, सागर शर्मा, पियूष शिंगवी, मयूर राहिंज, मेहेर प्रकाश तिवारी, ईश्वर बोरा, अशोक सचदेव, प्रसाद बेडेकर आदींचा समावेश आहे. वैशाली गांधी यांनी ट्रस्ट म्हणून संस्थेची नोंदणी केली आहे.

मिठाया, विशेषतः दुधापासून बनविलेल्या मिठायांबाबत फार काळजी घ्यावी लागते. दुग्धजन्य पदार्थ अनेकदा त्रासदायक ठरतात. त्याला काही वेळा भेसळीचं निमित्त असलं, तरी पदार्थ बनविताना स्वच्छतेची काळजी न घेणं हेही महत्त्वाचं कारण असतं. हे लक्षात घेऊनच हायजिन फर्स्टने पहिला कार्यक्रम ठरविला मिठाई उत्पादकांसाठी. संस्थेने मिठाई व्यावसायिकांसाठी कार्यशाळा घेतली. त्यात स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगितलं. कार्यशाळेनंतर पाठपुरावा ठेवला. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं, अशी अपेक्षा होती. शहरातील प्रसिद्ध बंबईवाला मिठाई दालनाचा या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. चहाची टपरी, खाद्यपदार्थांची हातगाडी, मिठायांची दालनं, भोजनशाळा, उपाहारगृहं... जिथं-जिथं खाद्यपदार्थ तयार करून विकले जातात, अशा प्रत्येक प्रकारासाठी रोल मॉडेल तयार करण्याचं संस्थेनं ठरवलं. आरोग्याचे-स्वच्छतेचे सगळे निकष पूर्ण करील, अशा निवडक व्यावसायिकांना 'हायजिन फर्स्ट अॅप्रसिएशन अॅवॉर्ड'ने सन्मानित करण्याचा प्रयोग पहिल्याच वर्षी करण्यात आला. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते १२ डिसेंबर २०१५ रोजी या प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं.
चटपटीत भेळेचा आनंद आता अधिकच वाढला.
चोख स्वच्छता आणि त्याबद्दल प्रमाणपत्र.
वैशाली गांधी  व दीपाली चुत्तर यांनी आनंद भेळच्या
संचालकांना प्रमाणपत्र दिले.
एकदा प्रमाणपत्र देऊन गौरवून चालणार नाही; त्यातून मोहिमेचं यश आणि होणारी जागृती तेवढ्यापुरतीच राहील, असं हायजिन फर्स्टमध्ये काम करणाऱ्यांच्या लक्षात आलं. या उपक्रमाबद्दल व्यावसायिकांना नेहमीच आस्था वाटावी आणि त्यांनी स्वच्छतेचं तत्त्व कायमस्वरूपी अंगीकारावं, यासाठी मग स्टार रेटिंगची कल्पना पुढे आली. या उपक्रमाची जबाबदारी स्वीकारली अशोक सचदेव यांनी. त्यात प्रत्येक गोष्टीसाठी गुणांकन ठरवण्यात आलं. म्हणजे कर्मचाऱ्यांचे कपडे स्वच्छ असतील तर एक गुण, अॅप्रन असेल तर एक गुण, तो स्वच्छ असेल तर अजून एक गुण... या प्रमाणे. त्यासाठी टप्प्यानुसार वाटचालही ठरवून देण्यात आली. उपाहारगृहांसाठी ३५ दिवसांचे पाच टप्पे ठरविण्यात आले. त्यात काय अपेक्षित आहे, हे नक्की करण्यात आलं. हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांसाठी १५ दिवसांचे तीन टप्पे होते. त्यानुसार अंमलबजावणी होते का, याची प्रत्येक टप्प्यात पाहणी करण्यात आली.

हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांसाठी हायजिन फर्स्टने गेल्या डिसेंबरमध्ये एक वेगळीच स्पर्धा आयोजित केली - स्वच्छ अन्नपदार्थ पुरवा आणि हमखास बक्षीस मिळवा!’ त्यात नगरच्या तीन विभागांमधील तब्बल ५५ व्यावसायिकांनी भाग घेतला. स्वच्छतेचं महत्त्व पटावं, सवय लागावी म्हणून या व्यावसायिकांना कचराकुंड्या देण्यात आल्या; तिथं काम करणाऱ्यांना अॅप्रन, टोपी असं साहित्य पुरविण्यात आलं. स्वच्छतेचं पालन होतं की नाही, हे ग्राहकांनी कळवावं म्हणून मिस्ड कॉल देण्याची सोयही करण्यात आली. या उपक्रमाचं फलित म्हणजे प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यावसायिकांनी स्वच्छतेचा वसा केवळ स्पर्धेपुरता नव्हे, तर कायमचा म्हणून स्वीकारला! मोहिमेला आलेलं हे मोठंच यश, असं वैशाली गांधी मानतात.

संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील बचपन स्कूलमध्ये
जागृतीपर कार्यक्रम. प्रा. गिरीश कुकरेजा यांनी 
छोट्या मित्रांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

हातगाडीवाले, उपाहारगृहे यांना मोहिमेत थेट सहभागी करून घेतानाच, हायजिन फर्स्टने प्रबोधन-जनजागृती या पातळ्यांवरही काम सुरू ठेवलं. संस्थेच्या सदस्यांनी नगरमधील व जिल्ह्यांतील काही शाळांमध्ये, दादी-नानी क्लबसारख्या सामाजिक संस्थांमध्ये जाऊन खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचं महत्त्व पटवलं. स्वच्छतेबद्दल डॉक्टरांएवढं अधिकारवाणीनं कोण सांगणार आणि त्यांनी सांगितलं की, ते कोण टाळणार? संस्थेनं हे ओळखलं आणि आपल्या या कामात नगरमधील डॉक्टरांना सहभागी करून घेतलं. स्वच्छतेचा संदेश देण्याच्या या कामात शहरातील १०० डॉक्टर आनंदानं सहभागी झाले. हायजिन फर्स्टची तशी माहितीपर प्रबोधनात्मक भित्तीपत्रकं त्यांनी आपल्या दवाखान्यात-रुग्णालयात लावली.

हायजिन फर्स्टचा स्वच्छतेचा आग्रह केवळ खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांपुरताच नाही. समाजाशी असलेली बांधिलकी खऱ्या अर्थाने जपण्यासाठी संस्थेनं अंगणवाड्याही गाठल्या. छोट्या मुलांना पोषणआहार देणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही स्वच्छता जपली गेली पाहिजे; तिथं तर ती अधिक महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन नगर तालुक्यातील ५३ अंगणवाड्यांमध्ये काम सुरू आहे. त्याला जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा, पदाधिकारी-अधिकाऱ्यांचा मनापासून पाठिंबा मिळाला. सर्वांच्या प्रयत्नांमधून तिथं हे काम जोमात आणि मनापासून सुरू आहे.
अंगणवाडीपर्यंत पोहोचले हायजिन फर्स्ट. नगर तालुक्यातील निंबोळी येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अॅप्रन, टोप्या आणि कचरापेट्यांचेही वाटप करण्यात आले.
हायजिन फर्स्ट एक टीम म्हणून काम करते हे खरंच. पण या संघाला तेवढाच चतुरस्र कर्णधार लाभला आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं. या अघोषित कर्णधारपदाची जबाबदारी वैशाली गांधी मोठ्या आवडीने पार पाडत आहेत. हे आयुष्यभराचं काम आहे, असं मानणाऱ्या गांधी त्यासाठी आठवड्यातले किमान तीन दिवस देतात. ते करताना घरातल्या कोणत्याच जबाबदारीकडे दुर्लक्ष होऊ न देण्याचं भानही त्या बाळगून असतात. त्या म्हणाल्या, ‘‘सकाळी झोपेतून उठल्यावर पहिला विचार येतो तो याच कामाचा. हायजिन फर्स्ट माझं तिसरं मूलच आहे! या मोहिमेत महिलांनी आपणहून सहभागी व्हावं, ही लोकचळवळ व्हावी. अन्नपदार्थाचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी सरकारनं स्वच्छतेच्या नियमांचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ तयार होतात ती मंगल कार्यालयं, वसतिगृहं, भोजनशाळा इथं स्वच्छता महत्त्वाची आहेच. या प्रवासात नरेंद्र फिरोदिया यांचे भरपूर सहकार्य मिळाले. डॉ. किरण दीपक आणि डॉ. वैशाली किरण यांचीही खूप मदत झाली. 'चितळे बंधू मिठाईवाले'चे गिरीश चितळे यांनी वेळोवेळी कौतुक करून महत्त्वाच्या सूचना केल्या.’’

पंतप्रधान या नात्यानं लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानची संकल्पना बोलून दाखविली. त्याच्याशी नातं सांगणारा हायजिन फर्स्ट उपक्रम साधारण सात महिन्यांतच नगरमधून सुरू झाला. 'स्वच्छ भारत' मोहिमेत देशभरातील ४३४ शहरांची पाहणी करण्यात आली. त्याची यादी यंदाच्या मेमध्ये जाहीर झाली. त्यात नगरचा क्रमांक बऱ्यापैकी खालचा, म्हणजे १८३ होता. याच नगरला हायजिन सिटी बनविण्याचं स्वप्न वैशाली गांधी आणि त्यांचे सारे सहकारी पाहत आहेत. अथक धडपड करीत, न थांबता पुढे पुढे जात, संवाद साधत, प्रबोधन करीत स्वप्नपूर्ती करण्याची मनीषा हायजिन फर्स्ट बाळगून आहे.

लेख किंवा त्यातील अंश पूर्वपरवानगीशिवाय वापरू नये, ही विनंती. )

Saturday 9 December 2017

जैन वाचनालय; मु. पो. बोरी

शंकर वावीकर नावाच्या एका सद्गृहस्थांची १८८६ या साली प्रसिद्ध केलेली वाचन नावाची पुस्तिका माझ्या संग्रही आहे. तिच्या प्रस्तावनेत असं म्हटलेलं आहे की, हल्लीचे प्रोफेसर आणि शिक्षक हे टेक्स्टबुकांव्यतिरिक्त काही वाचत नाहीत. म्हणजे शंभराहून अधिक वर्षं आपण तीच तक्रार (...वाचक कमी झाले आहेत) करत आलो आहोत.
- अक्षरनिष्ठांची मांदियाळी, पान क्रमांक 136, अरुण टिकेकर (पहिली आवृत्ती, ३१ मार्च २००५, डिंपल पब्लिकेशन)
.                 
.
.
औरंगाबादहून नांदेडला दोन रस्त्यांनी जाता येतं. चालकानं परभणीला न जाता औंढा नागनाथमार्गे नांदेड गाठायचं ठरवलं होतं. त्या दिवशी मला औंढ्याचं दर्शन घडवायचं त्याच्या मनात असेल कदाचित. जालना सोडल्यावर बोरीची (तालुका जिंतूर, जिल्हा परभणी) आठवण झाली आणि वाहनचालक सिद्धार्थला विचारलं, ‘‘आपल्याला बोरीला जायचंय. जाता येईल का? वेडंवाकडं तर होणार नाही ना, अंतर फार वाढणार नाही ना?’’ तसं काही होणार नाही, असा दिलासा देत सिद्धार्थनं जिंतूरवरून गाडी बोरीकडं वळवली. जिंतूरपासून १६ किलोमीटरवर बोरी. तिथनं परभणी ३० आणि नांदेड साधारण ८० किलोमीटर. बोरीमध्ये नेमिनाथ जैन याला भेटायचं होतं. लोकसत्ताचा जुना वार्ताहर. एवढ्या वर्षांनंतर हा माणूस आपल्याला ओळखतो का हे पाहायचं होतं. त्याहून कुतुहल होतं, तो चालवित असलेल्या वाचनालयाबद्दल. त्याबद्दल त्याच्या तोंडून सहा-सात वर्षं बरंच काही ऐकलं होतं. लाडक्या आणि गुणी लेकराचे गुण अभिमानी बापाने भरभरून गावेत, त्याच पद्धतीनं नेमिनाथ वाचनालयाबद्दल नेहमी सांगत असे. म्हणून ते एकदा पाहायचं होतंच. त्याच कारणाने त्याच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला.

नेमिनाथ जैन आता वार्ताहर नाही. स्वमालकीच्या लोकदिलासा साप्ताहिकाचा संपादक आहे तो! त्याहून महत्त्वाचं म्हणजे कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयचा ग्रंथपाल आहे. ग्रंथपालनाचा अधिकृत अभ्यासक्रम पूर्ण केलेला ग्रंथपाल! स्वागतासाठी चौकात आलेल्या नेमिनाथनं घरी नेलं. पाच मिनिटं बसलो. पाणी पिऊन झालं की, तो म्हणाला, ‘‘चला, वाचनालय पाहून येऊ.’’

घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर एक छोटी, टुमदार, मस्त रंगवलेली इमारत होती. दर्शनी वाचनालयाचा मोठा फलक. आत गेल्यावर चकीत व्हायला झालं. दोन छान खोल्या. दोन्ही मस्त सजविलेल्या...तस्विरी, वेगवेगळे फलक, वाचनाचं महत्त्व सांगणाऱ्या पाट्या, बसायला खुर्च्या. एकदम स्वच्छ. भिंतीच्या कप्प्यांमध्ये, कपाटांत छानपैकी ठेवलेली पुस्तकंच पुस्तकं. त्यांची वर्गवारीही व्यवस्थित. पाहातच राहावं असं, प्रसन्न वाटायला लावणारं सारं काही. सरकारच्या इतर क वर्गात असलेल्या जयकुमारजी जैन वाचनालयात सध्या साडेसहा हजार पुस्तकं आहेत. नियमानुसार या वर्गाच्या वाचनालयात एक हजार पुस्तकं हवीत. नेमिनाथनं त्याच्या साडेसहा पट पुस्तकं जमवली आहेत.

टापटीप, रंगरंगोटी, भरपूर पुस्तकं, आरामशीर बैठकव्यवस्था एवढीच काही जैन वाचनालयाची वैशिष्ट्यं नाहीत. या सगळ्यांहून महत्त्वाचं म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी ते पूर्णपणे मोफत आहे! पहिली ते सातवीपर्यंतचे ३०८ विद्यार्थी वाचनालयाचे सभासद आहेत. वाचनालय सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत सुरू असतं. रोज ३५-४० मुलं पुस्तक बदलायला येतात. या बालवाचकांचं देवाण-घेवाण कार्ड आहे. त्यावर पुस्तक दिल्याच्या व्यवस्थित नोंदी आहेत. तिथंच बसून वाचायचं असल्यास मुला-मुलींसाठी स्वतंत्र कक्ष आहेत.


हे सगळं कशासाठी? नेमिनाथ जैन मनापासून सांगतो, ‘‘ग्रामीण भागातील लहान मुलांना वाचण्याची आवड लावण्यासाठी!’’ वाचनालयाचे संचालक व पत्रकार दीपक राजूरकर त्याला दुजोरा देताना म्हणाले, ‘‘पुस्तकात मस्तक बसावे, एवढ्याचसाठी. म्हणजे मग मस्तकात पुस्तक बसते. विद्यार्थी विचार करायला शिकतो.’’

वाचनसंस्कृती रुजविण्याच्या आणि जपण्याच्या उद्देशानेच नेमिनाथने वडिलांच्या स्मरणार्थ १९९९मध्ये हे वाचनालय सुरू केलं. त्याचा उद्देश सफल होताना दिसतो. एका गावात ३०० विद्यार्थी वाचनालयाचे सभासद असणं, ही लक्षणीय बाब आहे. मुलांना वाचण्याची आवड लावण्याबरोबरच त्यांच्यासाठी दर वर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात. उत्कृष्ट बालवाचक पुरस्कार वाचनालयातर्फे दिला जातो. याशिवाय विद्यार्थी नसलेले १०८ (प्रौढ) सभासद आहेत. त्यांच्यासाठी शुल्क आहे. किती? दरमहा पाच रुपये! मागासवर्गीयांना शुल्क आकारायचं नाही, असं वाचनालयाच्या संचालक मंडळानं ठरवलं आहे.

प्रामुख्यानं मुलांसाठी असलेल्या या वाचनालयाचा ग्रंथसंग्रह एकसुरी नाही. कथासंग्रह, कादंबऱ्या, प्रवासवर्णन, कवितासंग्रह, चरित्रं-आत्मचरित्रं, धार्मिक अशी सर्व प्रकारची पुस्तकं आहेत. मुलं प्रामुख्यानं गोष्टीची पुस्तकं आणि थोरांची चरित्रं वाचतात. दोन खोल्यांच्या या टुमदार वाचनालयात ३२ साप्ताहिकं व मासिकं आणि ७ दैनिकं नियमित येतात. त्याचाही लाभ घेणारे वाचक आहेत.

जैन सार्वजनिक वाचनालयाला सरकारचं अनुदान मिळतं; पण ते सर्व गरजा पूर्ण होतील एवढं नाही. मग सगळा खर्च कसा भागतो? लोकसहभाग हे त्याचं उत्तर. गावकरी देणगी देतात, पुस्तकं भेट देतात. प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे नेहमीच पुस्तकांची भेट देतात, असं नेमिनाथनं आवर्जून सांगितलं. त्याच्या आयुष्यात या वाचनालयाइतकं महत्त्वाचं काहीच नाही. म्हणून तर घर बांधण्याच्या आधी त्यानं गाठीचा पैसा खर्च करून वाचनालयाची छोटेखानीच, पण अतिशय सुंदर इमारत आकाराला आणली.

मध्यंतरी एका कार्यक्रमानिमित्त जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांनी जैन वाचनालयास भेट दिली. सगळं पाहून त्यांनी अचंब्यानं, कौतुकानं नेमिनाथ! लायब्ररी अशीही असती होय!!’ असे उद्गार काढल्याची आठवण नेमिनाथ आणि राजूरकर सांगतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तकं आणि फर्निचर याकरिता त्यांनी मोठ्या आनंदाने वाचनालयाला मदत केली.

बोरी काही तालुक्याचं गाव नाही. लोकसंख्या असेल १८ हजारांच्या घरात. (विकिपीडियाच्या म्हणण्याप्रमाणे २०११च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या १३ हजार ४३८ आहे.) गावात दोन महाविद्यालयं, दोन उच्चमाध्यमिक व चार माध्यमिक विद्यालयं आणि पाच प्राथमिक शाळा आहेत. गावात दोन ब वर्ग वाचनालयंही आहेत. विकिपीडियानंच बोरीचं आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित केलं आहे - या गावाचं लिंगगुणोत्तर ९४२, म्हणजे महाराष्ट्र राज्याहून (९२९) अधिक आहे. म्हणजे दर हजार पुरुषांमागे ९४२ महिला. अशा या गावासाठी असं वैशिष्ट्यपूर्ण वाचनालय म्हणजे अभिमानास्पद गोष्ट होय.

वाचनसंस्कृती लयास चालली आहे, वाचक कमी होत आहेत, टीव्ही-नेटमुळे आता कोण वाचतंय हो!’... या आणि अशा काही वाक्यांच्या साथीनं वाचनसंस्कृतीबद्दल रडण्याची साथ जुनीच आहे. ती किती जुनी आहे, हे अरुण टिकेकर यांनी लिहिलंच आहे. काहीच न करता अशा नुसत्या रडण्यानं वाचनसंस्कृती वर्धिष्णू होणार नाही, हे नक्की. नेमिनाथ आणि त्याचे सहकारी कृतीतून ती संस्कृती जोपासत आहेत. अनुदानासाठी निघालेली वाचनालयं भरपूर आहेत. अधिकाधिक कमिशन देणाऱ्या पुस्तकांची रद्दी तिथं मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमीवर जैन वाचनालयाचं रूप वेगळं वाटणारं आहे.

बोरीमध्ये असलेल्या दोन मंदिरांमध्ये नेमिनाथ नित्यनेमाने पूजा करतो. अगदी मनोभावे. पहिली पूजा असते ती जैन मंदिरात. आणि त्याचं दुसरं मंदिर म्हणजे हे वाचनालय. एका छोट्या गावात उत्तम दर्जाचं, अधिकृत नोंदणी झालेलं, संचालक मंडळ असलेलं हे वाचनालय सुरू आहे. त्याला पुस्तकांच्या रूपाने मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी नेमिनाथ जैन यांचा संपर्क क्रमांक – ९९६०८८७८२४

Saturday 2 December 2017

आम्ही आहोत येथे स्थित...

शेगाव! तीर्थक्षेत्र शेगाव. गजाननमहाराजांचं शेगाव. हजारो भाविक-भक्त असोशीनं तिथं जातात, जाण्याची आस बाळगून असतात ते शेगाव.

शेगावला जाण्याचा योग सात-आठ वर्षांपूर्वी अचानक जुळून आला. आंध्र प्रदेशातील (आता तेलंगणात) बासर इथं सरस्वतीदेवीचं दर्शन घेतलं. तिथून शेगावला जाण्याचं ठरवलं. तोवर शेगावबद्दल फार काही माहीत नव्हतं. म्हणजे ते गजाननमहाराजांचं गाव आहे, याची कल्पना होती. पुण्यातल्या छोट्या-छोट्या दुकानांवर शेगाव कचोरीचे फलक पाहिले होते. पण आपल्याकडची टम्म कचोरीच नेहमी पाहण्यात (आणि कधी तरीच खाण्यात) असल्यानं अन् ती फारशी आवडत नसल्यानं तिकडे कधी फिरकलो नाही.

शेगावचा पहिलाच अनुभव प्रसन्न करणारा ठरला. आनंदसागरनं त्या प्रसन्नतेला वेगळीच झालर चढवली. पुन्हा एकदा, जमेल तेव्हा शेगावला जायचंच असं तेव्हा ठरवलं होतं.

दरम्यानच्या काळात व्हॉट्सॲप नावाचं नवं माध्यम उपलब्ध झालं. त्यावर अधूनमधून गजाननमहाराजांविषयी काही काही येत राहिलं. ते सगळंच्या सगळं काही वाचलं नाही; पण चाळत राहिलो. संस्थानाचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचा कारभार, त्यांचे सहकारी आणि सेवेकरी यांच्याबद्दल बरंच काही (सातत्यानं चांगलंच!) वाचायला मिळालं. वडिलांनी सुनेजवळ एकदा शेगावला जायचं आहे असं कधी तरी बोलून दाखवलं. शेगावला पुन्हा जायचंच, असं पुन्हा एकदा ठरवून टाकलं.

शिखराचे दर्शन...
दिवाळीनंतर महिन्याभरानं बायकोनं सांगितलं - या महिन्यात शेगावला जायचं. तो निर्णयच होता. त्यामुळं तयारी सुरू केली. पहिल्यांदा गेलो, तेव्हा मंदिराजवळच्या भक्तनिवासात राहिलो होतो. त्याच वेळी पाहिलं होतं की, भक्तांच्या निवासाची सोय करण्यासाठी अजून बऱ्याच इमारती उभ्या राहत आहेत. आनंदसागर परिसरामध्ये अशा भव्य इमारती झाल्याचंही ऐकलं होतं. मध्यंतरी एकदा सहज संस्थानाच्या संकेतस्थळाला भेट दिली. ऑनलाईन बुकिंग करता येत असल्याचं तेव्हा समजलं. मग आता तेच करावं म्हणून आठ दिवस आधी संकेतस्थळावर गेलो, तर तशी काही सोय नसल्याचं दिसलं. त्याची चौकशी करावी म्हणून सहज इ-मेल पाठविली. उत्तर कधी येईल, याची काहीच कल्पना नव्हती. पण त्याच दिवशी सायंकाळी, अवघ्या साडेतीन तासांनंतर उत्तर आलं - श्री गजानन महाराज संस्थानच्या खोल्या आरक्षित करण्याची पद्धत नाही. येथे आलेल्या भाविकांना उपलब्ध असलेल्या खोल्या क्रमवार पद्धतीने देण्यात येतात. सोबत संपर्कासाठी चार-पाच दूरभाष क्रमांकही दिले होते. साध्या-सोप्या भाषेत, थोडक्यात पण व्यवस्थित माहिती होती त्यात.

त्याच महिन्यात कधी तरी जळगावचे श्री. प्रदीप रस्से शेगावला दर्शनासाठी जाऊन आलं होते. तो अनुभव त्यांनी लिहिला होता, म्हणून त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं,अवश्य जाऊन या. खोल्या मिळतात; कदाचित थोडं थांबावं लागतं, पण राहण्याची सोय नक्की होते. हा मोठाच दिलासा होता. आम्ही जाणार तेव्हा सुट्या नव्हत्या, शाळाही नुकत्याच चालू झाल्या होत्या. त्यामुळे फार गर्दी नसणार, याची कल्पना होतीच.

आणखी एक गमतीची किंवा योगायोगाची गोष्ट म्हणजे, आम्ही जाण्याच्या दोन-तीन दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲपच्या एका गटावर शेगावचा अनुभव पडलेला. मुंबईच्या विनित वर्तक यांनी जे काही लिहिलं होतं, त्यामुळे जाण्याची ओढ अधिकच वाढली.


भक्तनिवास संकुलातील आरामदायी राहण्याची सोय.
औरंगाबादहून सकाळी अकराच्या सुमारास निघालो आणि वाटेत दोनदा रस्ता थोडा चुकत संध्याकाळी शेगावला पोचलो. वाहनानं थेट आनंदविहार भक्तनिवास संकुलातच पोहोचलो. तिथं सगळीकडे व्यवस्थित माहिती फलक असल्यामुळं चुकण्याचा प्रश्नच नाही. तरीही चाचपडायला झालं, म्हणून एक-दोघांना विचारल्यावर त्यांनी अदबीनं लगेच माहिती दिली. खोली घेण्यासाठी म्हणून गेलो, तर तिथं अजिबात गर्दी नव्हती. आम्हीच फक्त. तिथल्या कर्मचाऱ्यानं किती जण आहेत याची चौकशी करून लगेच पाच जणांसाठी एक प्रशस्त खोली सुचविली - फक्त 950 रुपये. आवश्यक ती कागदपत्र देताच पावती फाडत त्या माउलीनं लगेच खोलीची किल्ली दिल्ली आणि ती कुठं हेही सांगितलं. प्रशस्त खोली होती. सहा जणांना आरामात राहता येईल अशी. स्वच्छ पलंगपोस पांघरलेल्या गाद्या असलेले चार पलंग, चकाचक स्वच्छतागृह, त्यात साबण-टॉवेल, चालू असलेले विजेचे दिवे. जवळच चहा-कॉफीचं यंत्र. सात रुपयांत चहा आणि नऊ रुपयांत कॉफी. ती देणारा एक सेवेकरी.

गजाननमहाराजांच्या दर्शनासाठीच आलो होतो. त्यामुळे लगेच संध्याकाळी मंदिरात गेलो. त्या वेळीही बऱ्यापैकी गर्दी होती. कसं जायचं, कुठून जायचं असले काही प्रश्न फलकांनी सोडविले होते. पादत्राणं ठेवायला जागा, तिथंही सेवेकरी. सहज म्हणून एका माउलीला विचारलं, तर त्यानं दिलेली माहिती थक्क करणारी होती - त्या तिथे नऊ हजार पादत्राणांच्या जोड्या ठेवण्याची सोय होती. म्हणजेच एका वेळी किमान नऊ हजार भाविकांना सहजपणे सामावून घेण्याची मंदिराच्या परिसराची क्षमता. समाधीच्या दर्शनासाठी जातानाही फलकांचं आणि आत्मीय भावनेनं तिथं सेवेकरी म्हणून थांबलेल्या माणसांचं व्यवस्थित मार्गदर्शन होतंच. माझ्या वयस्कर वडिलांचा जिना चढायचा त्रास टाळण्यासाठी दोन सेवेकरी माउलींनी आवर्जून वेगळी वाट दाखविली. समाधीच्या मार्गावर असलेला डिजिटल फलक दर्शनासाठी किती वेळ लागेल, हे दाखवित होता. एक गट सोडला की, ती वेळ बदलली जायची. कसलाही गोंधळ, ढकलाढकली न होता दर्शन व्यवस्थित झालं. तिथला अजून एक अनुभव - फोटो काढायला शिकायचं म्हणून हौसेनं कॅमेरा जवळ ठेवलेला. मंदिराच्या परिसरातील वेगवेगळी छायाचित्रं टिपली. (चुकीमुळं ती आलीच नाहीत, हा भाग वेगळा!) अन्य कोणत्याही देवस्थानाप्रमाणं इथंही गाभाऱ्याची, मूर्तीची, समाधीची छायाचित्रं काढण्यास परवानगी नाही. रांगेत उभं असताना एका माउलीनं विनयानं कॅमेऱ्याकडं बोट दाखवलं. कॅमेरा राहू देतो. छायाचित्रं काढणार नाही, या शब्दांवर विश्वास ठेवून त्यानं मला सहज आत जाऊ दिलं.

त्या दिवशी एकादशी होती. मंदिराच्या परिसरातील प्रसादालयात त्या दिवशी फक्त फराळ मिळत होता. अवघ्या 35 रुपयांत एकादशीचा फराळ पोटभर’! भक्तनिवास संकुलातील भोजनकक्षात 50 रुपयांमध्ये उत्तम जेवणाची सोय होतीच.

दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी सकाळी लवकर मंदिरात दर्शनासाठी गेलो. पुन्हा तोच अनुभव. कोणत्याही तसदीविना महाराजांच दर्शन. मन प्रसन्न करणारा अनुभव. प्रसाद, अभिषेक, देणगी याची माहिती देणारे वेगवेगळे कक्ष. तिथं लगेच माहिती देणारी माणसं. तिथंच एका भिंतीवरील सूचनाफलकामध्ये दोन माहितीचे कागद होते. मंदिरात गेल्या तीन दिवसांचा दानपेटीचा तपशील आणि एक दिवसात मिळालेल्या देणग्यांचा-भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तूंचा चोख हिशेब त्यावर होता. किती रुपयाच्या किती नोटा, नाणी याचा पूर्ण तपशील.

दोन दिवसांच्या दर्शनानंतर काही गोष्टी 'खटकल्या'. त्याही मांडायला हव्यात - कोणत्याही तीर्थक्षेत्री मंदिरात जाण्याआधी हार-नारळ-प्रसादाच्या विक्रेत्यांचा ससेमिरा असतो. काही ठिकाणी त्याचे भाव अवाच्या सवा असतात. काही वेळा हे विक्रेते अंगचटीला येतात. इथंही तसे विक्रेते होते; पण त्यांचा ससेमिरा नव्हता. त्यांच्याकडच्या वस्तूंचे दरही वाजवीच. चांगला हार ते पाच ते दहा रुपयांना विकत होते. मंदिराच्या आवारातील स्वच्छतेबाबत खूप जणांनी लिहिलं आहे. तशी ती होतीच होती. दर्शनाचा ताण नाही, कोणतीही गैरसोय नाही. आपल्या तीर्थक्षेत्रांची ज्याबद्दल प्रसिद्धी आहे, त्याच्या अगदीच विपरीत अनुभव! देव असाही प्रसन्न होत असतो तर!!

दर्शनानंतर जाताना कचोरीची आठवण झाली. दहा रुपयांना दोन, दहा रुपयांना तीन अशा फलकांचा आणि मोठमोठ्या दुकानांचा मोह टाळून चौकशी केली. बेस्ट शेगाव कचोरी कुठे मिळते?’ जाण्यापूर्वी आंतरजालावर शोध घेतलाच होता. चौकशीनंतर तीरथराम शर्मा या नावावर शिक्कामोर्तब झालं. ताजी, गरमागरम कचोरी फक्त सहा रुपयांना. शेगाव कचोरी एवढी प्रसिद्ध आणि चटक लावणारी कशी, याचं उत्तर रेल्वेस्थानकाजवळील त्या छोटेखानी दुकानात मिळालं.
आनंदसागर... एका सुखद सहलीचा प्रारंभ.

महाराजांचं मनोभावे दर्शन झाल्यानंतर आनंदसागर उद्यानाला भेट देणं अपरिहार्यच असतं. तिथं जाण्याआधीच प्रशस्त अल्पोपाहारगृह दिसतं. नाना तऱ्हेचे खाद्यपदार्थ आणि पेयं तिथं मिळतात. अतिशय अल्प दरामध्ये. त्यामुळं पोटपूजा करणं आवश्यकच. त्यानंतरच 325 एकरांवर असलेल्या उद्यानात जाणं श्रेयस्कर. या उद्यानात बरंच काही पाहण्यासारखं आहे. हिरवळ, झाडी, फुलांचे प्रसन्न ताटवे, मत्स्यालय, झुलता पूर... असं खूप काही. पाहण्यात, फोटो काढण्यात वेळ कसा जातो, हे कळतच नाही. धुरांच्या रेषा हवेत सोडणारी झुकझुक गाडीही तिथं आहे. हे उद्यान आणि त्यातील ध्यानकेंद्र मन प्रसन्न करणारं, आखीव-रेखीव, सारं काही टापटिपीचं. एवढं निसर्गरम्य वातावरण असताना तिथं पुलावरून जाताना ऐकविला जाणारा पक्ष्यांचा कृत्रिम किलबिलाट, छोट्या रेल्वेगाडीतून प्रवास करताना बाजूला दिसणाऱ्या प्राण्यांच्या भव्य प्रतिकृती खटकतात. सहज, नैसर्गिक वातावरणाला तीट लावल्यासारखं वाटतं.

शेगाव तीर्थस्थळ आहेच; पण देवस्थानाच्या कारभाऱ्यांनी त्याला प्रयत्नपूर्वक, हेतुपूर्वक सुंदर पर्यटनस्थळही बनवलं आहे. निवासाची-अल्पोपाहाराची-भोजनाची उत्तम सोय; अगदी पाण्याची बाटलीही जेमतेम 8 रुपयांना. मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि त्याहून खालच्या आर्थिक स्तरातील कुटुंबांसाठी दोन दिवसांची छान सहल होण्यासारखी. कोणताही आर्थिक ताण न येता दोन दिवस इथं मजेत घालवून, गजाननमहाराजांच दर्शन घेऊन ती प्रसन्नता बरोबर घेऊन जाता येते.

शेगावमधील सेवेकरी हा एक वेगळाच प्रकार आहे. त्याबद्दल वेळोवेळी लिहून आलं आहे. डोक्यावर पांढरी टोपी असलेल्या कोणत्याही माणसाला माउली अशी प्रेमानं साद घातली की, तो झटपट तुमच्या मदतीला येतो. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, मदत करण्याची वृत्ती हे सगळंच विलक्षण. भुरळ पाडणारं. त्यांच्या या वागण्याचा इतरांवरही कळत-नकळत प्रभाव पडलेला जाणवतो. पहिल्या दिवशी संध्याकाळी दर्शनासाठी जाताना वाटेत आमचं वाहन पोलिसांनी अडवलं. चालकाकडं सगळी कागदपत्र व्यवस्थित होती. तरुण वाहतूक पोलिसानं कागदपत्रं बारकाईनं पाहिली. नंतर ती व्यवस्थित ठेवायला चालकाला सांगितलं. गाडी सुरू करताना तो म्हणाला, ‘‘उद्याही कदाचित गाड्यांची तपासणी चालू राहील. उद्या कुणी अडवलंच तर काल तपासणी झाली, असं सांगा. म्हणजे लगेच सोडतील.’’ वाहतूक पोलिसानं परगावचं वाहनं अडवलं आणि सर्व काही व्यवस्थित आहे, हे पाहून लगेच सोडलं, असा हा पहिलाच अनुभव.

शेगाव... तिथली व्यवस्था, ती पाहणारं विश्वस्त मंडळ, भाविकांची काळजी घेणारी सारी यंत्रणा, मदतीला तत्पर असलेली माउलीमंडळी... देशभरातल्या तीर्थस्थळांनी शेगावला गुरू केलं पाहिजे, असंच सगळं!
....
#ShivShankarBhau #Shegaon #GajananMaharaj #Pilgrimage #AnandSagar #Mauli #Tourism #ReligiousTourism #Maharashtra #Vidarbha

Saturday 4 November 2017

सरकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखक आणि चिंता

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर येऊन साडेतीन वर्षं झाली आहेत. या सरकारला जनतेकडून पुढचा कौल मिळविण्यासाठी अजून दीड वर्षाचा काळ बाकी आहे. लोकसभेच्या निवडणुकीआधीच, भाजपनं नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं, तेव्हापासून (म्हणजे गेली जवळपास साडेचार-पाच वर्षं) देशाचं राजकारण बहुतांशी याच नावाभोवती फिरत राहिलं आहे - आत्यंतिक लोभ आणि पराकोटीचा द्वेष, या ध्रुवांमध्ये आणि तरीही मध्यबिंदूजवळ कधी न थबकलेलं. या सरकारबद्दल आणि त्याच्या नेतृत्वाबद्दल टोकाची मतं व्यक्त होत आहेत. मधुमेही भक्त आणि कावीळग्रस्त द्वेष्टे परस्परांवर तुटून पडत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची, प्रसारमाध्यमांची (विशेषत: दूरचित्रवाणी वाहिन्यांची) गळचेपी सुरू असल्याची ओरड होत आहे आणि तिचा सूर दिवसेंदिवस टिपेचा लागत असल्याचं दिसतं. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुरस्कार परत करण्याची मोहीम जोरात होती. तिची समाजमाध्यमातून जेवढी खिल्ली उडवली गेली, तेवढाच तिला पाठिंबाही मिळाला. या देशात (म्हणजेच या सरकारच्या काळात) अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे ही भावना आता पुन्हा एकदा तीव्रतेनं व्यक्त होऊ लागली आहे. अलीकडच्या काळात काही टीव्ही. वाहिन्यांच्या संपादकाच्या झालेल्या हकालपट्टीची आणि अन्य काही सामाजिक घटना-घडामोडींची पार्श्वभूमी त्याला आहे.

पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचं विभागीय साहित्य संमेलन नगरला शनिवारी (४ नोव्हेंबर) सुरू झालं. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातील प्रमुख दोन भाषणं याच सूत्राभोवती फिरणारी होती. प्रसिद्ध कथा-कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या भाषणाचा सूर सावध, ऐका आजच्या आणि पुढल्या हाका... असा होता. प्रा. पठारे संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि फुटाणे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. त्यामुळेच या दोघांनी काय सांगितलं, ते महत्त्वाचं मानलं पाहिजे. याचं आणखी एक कारण म्हणजे दोघंही आपापल्या कलेशी बांधिलकी राखून आहेत.

नगरमध्ये २० वर्षांपूर्वी, म्हणजे जानेवारी १९९७च्या पहिल्या आठवड्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. त्याचे अध्यक्ष होते प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार होते आणि संमेलनाचे उद्घाटक होते गिरीश कार्नाड. संयोजकांना अध्यक्ष म्हणून इनामदार फारसे पसंत नसल्यानं, त्यांनी त्याहून मोठा उद्घाटक आणला, अशी कुजबुज तेव्हा झाली होती. (त्या आधीच्या आळंदीच्या संमेलनातही अध्यक्ष शान्ता ज. शेळके आणि उद्घाटक लता मंगेशकर, असा प्रकार झाला होताच.) आणखी एक गोष्ट म्हणजे इनामदार प्रतिज्ञाबद्ध उजवे नसले, तरी कार्ड होल्डर डावेही खचीत नव्हते. तेव्हा केंद्रात एच. डी. देवेगौडा यांचं अल्पमतातलं सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर होतं आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. संमेलनाचे उद्घाटक गिरीश कार्नाड यांचं भाषण फारच गाजलं. जुलूमशाहीला विचाराशी लढता येणार नाही, हाच त्यांच्या भाषणाचा प्रमुख मुद्दा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जी (निर्माण केली गेलेली) प्रतिमा आहे, अगदी तशीच ती त्या काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. ठाकरे यांच्या विरोधात बोलल्याशिवाय आपलं डावेपण किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी असलेली बांधिलकी सिद्ध होत नाही, असं मानणारे खूप जण तेव्हा होते.

 ... जे कोणी वेगळे असण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा म्हणजे सरतेशेवटी पत्रकार, लेखक, कलावंत, विचारवंत यांचा (हे सैनिक) नाश करू पाहतात, विचारशक्ती पूर्णपणे गुंडाळून ठेवणे, हा कोणत्याही लष्करी तत्त्वज्ञानाचा पायाभूत सिद्धांत असतो. त्यामुळे जे विचार करण्याचे धाडस दाखवितात, ते शत्रू ठरतात, ... आपल्या समाजात संकटपरंपरा निर्माण कराव्या लागतात. परिणामी समाजातले लहान लहान समुदाय आत्मसंरक्षण करू शकत नसल्याने लक्ष्य बनतात.  अशी काही विधानं कार्नाड यांनी तेव्हा केली होती. भाषणात सैनिक शब्द आल्यानं ते शिवसेनेच्या विरोधात बोलत आहेत, असा समज होणं स्वाभाविक होतं. पण कार्नाड यांचा सारा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडंच होता. आणि आता पंतप्रधान असलेले मोदी संघाचं तत्त्वज्ञानच मानतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आ(ण)ला आहे!

विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. पठारे यांना कोणी उजवं मानणार नाही किंवा म्हणणार नाही. माझी राजकीय भूमिका मध्यबिंदूच्या डावीकडे  (Left of the center) झुकणारी आहे, असं त्यांनी परळी वैजनाथच्या संमेलनातील मुलाखतीत (२४ एप्रिल १९९८) स्पष्ट केलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत सध्या चमत्कारिक अवस्था आहे. आपण त्याबाबत बोटचेपेपणा करतो, उदासीन राहतो आणि वर त्याचं समर्थनही करतो, असं पठारे तेव्हा म्हणाले होते. त्या तुलनेने त्यांचं आजंच भाषण अधिक नेमकं, भूमिका टोकदारपणे व थेट मांडणारं होतं. आजच्या आदेश देणाऱ्या, भय निर्माण करणाऱ्या या काळात आपल्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य टिकविणे, आपला स्वर, आपले नीतिधैर्य टिकवून प्रकट करणे फार महत्त्वाचे झालेले आहे, असं त्यांनी आपल्या ११ पानी लिखित भाषणाचा समारोप करताना लिहिलं आहे. (३१ ऑक्टोबर २०१७)

उद्घाटनाचा कार्यक्रम (प्रथेप्रमाणंच) लांबल्यानं पठारे यांनी अध्यक्षीय भाषण वाचून दाखवलं नाही. त्यातल्याच काही मुद्द्यांच्या आधारे ते मोकळेपणाने बोलले. आपली संस्कृती गंगा-जमनी आहे; तीच कट्टरतेला उत्तर आहे आणि वैविध्य नैसर्गिक आहे, समाजाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे, हे त्यांचे दोन महत्त्वाचे मुद्द होते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण गंभीर आहे. एक-दोनच औद्योगिक घराणी देशातली सगळी प्रसारमाध्यमं, सांस्कृतिक संस्था यावर ताबा मिळवत असतील, तर ती धोकादायक गोष्ट होय! विरोधाचा आवाज उमटण्याआधीच दाबून टाकणे भयसूचक आहे. अशा परिस्थितीत आपल्याला त्याग करण्यास तयार राहणं आवश्यक आहे. गप्प राहिलो, तर काळ माफ करणार नाही. असहिष्णुतेचं वातावरण सध्या निर्माण केलं जातंय. लोकशाही व्यवस्थेतून पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींबद्दल माझा आक्षेप नाही. पण ते चुकीचं काही करीत असतील, तर प्रतिकार करणं आवश्यक आहे. निरोगी लोकशाहीसाठी वेगवेगळ्या भूमिका व्यक्त होणं आवश्यक आहे. भारतीय समाजव्यवस्थेची प्रौढ समज आपण विसरत चाललो आहोत, असं त्यांच्या खुल्या भाषणाचं सार म्हणता येईल.

पठारे यांच्या लिखित स्वरूपातील अध्यक्षीय भाषणातील काही ठळक मुद्दे असे :
१) ... आपले आजचे जे वर्तमान आहे, ते या ना त्या प्रकारे साहित्याच्या निर्मितीस कारण होत असते. म्हणूनच वर्तमानाचे अस्सल भान ठेवणे आणि किमान मनातल्या मनात तरी त्याला प्रतिक्रिया देत राहणे ही साहित्याच्या निर्मितीची अगदी प्राथमिक अट आहे... कोणतेही अर्थपूर्ण आणि घनसर लेखन करताना लेखकाला/कवीला काही एक जोखीम ही पत्करावीच लागते.

२) ... आपले आजचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वर्तमान कसे आहे? अगदी एका वाक्यात सांगायचे, तर ते भय निर्माण करणारे आहे. ज्या प्रकारच्या विचारधारेचा मोदी पुरस्कार करतात, ती मला मान्य नाही. विचाराच्या अंगाने मी तिच्या दुसऱ्या टोकावर उभा आहे.

३) ... लोकशाहीत विविध स्वरांना मुक्तपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य अपेक्षितच असते. असे, या प्रकारचे आपले स्वातंत्र्य आज प्रश्नांकित झाले आहे. किंवा खरे तर ते धोक्यातच आले आहे असे दिसते... आज आपल्या सगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांनी सत्ताधारी सरकारपुढे नांगी टाकलेली दिसते.

४) सरकारी, निमसरकारी आणि सरकार पुरस्कृत असूनही कायदा करून स्वायत्त ठेवलेल्या अनेक साहित्य आणि संस्कृतीविषयक संस्था यांच्या कामात आजचे सरकार ज्या अमानुष अडाणीपणे हस्तक्षेप करत आहे, ते अत्यंत धोकादायक आहे.

५) (लेखकांच्या) व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याचा मी आदर करतो. त्यांनी त्यांचे ते स्वातंत्र्य जपावे, त्यासाठी पडेल त्या त्यागाची तयारी ठेवावी. आजच्या आदेश देणाऱ्या, भय निर्माण करणाऱ्या या काळात आपल्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य टिकविणे, आपला स्वर, आपले नीतिधैर्य टिकवून प्रकट करणे फार महत्त्वाचे झालेले आहे.

रामदास फुटाणे यांच्या भाषणाचा सूरही हाच होता. मोदी यांचे एके काळचे गुरू आणि शिष्याच्या राजवटीतच पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात रवानगी झालेले माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना वर्ष-दीड वर्षापूर्वी आणीबाणीची आठवण झाली होती. त्याच आणीबाणीची आठवण फुटाणे यांना झाली. आज ज्या पद्धतीचं वातावरण आहे, ते पाहता येत्या सहा महिन्यात, एक वर्षात देश आणीबाणीच्या दिशेनं जाईल. २०१९ची निवडणूक होईल, असं सांगता येत नाही.  कोणत्या दिशेनं देश चाललाय? आठ-दहा कुटुंबांसाठी देश जपतोय का? द्वेषाचा भविष्यकाळ दारात उभा आहे. सत्तेचा खेळ सामान्याच्या चुलीपर्यंत येत असेल, तर आपण (लेखक-कवींनी) भूमिका घेतली पाहिजे. समाजाला निर्भय करायचं, वस्तुस्थिती सांगायचं काम आपण केलं पाहिजे. साहित्यिकांनी बोलण्याची वेळ आली आहे,’ असं त्यांनी सांगितलं. वात्रटिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यंग्यकवितांसाठी फुटाणे प्रसिद्ध आहेत. त्याचा संदर्भ देताना ते म्हणाले, आम्ही व्यंगात अतिशयोक्ती वापरतो. पण कालचं व्यंग आजचं वास्तव होतंय! हे अंतर कमी होत जातं, तेव्हा संकट उभं राहतं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल होणारी ओरड आजची नाही, हे खरंच. ती सातत्याने होत आहे आणि होत राहील. कार्नाड यांचा रोख ज्याबद्दल होता, साधारण त्याच विषयावर २० वर्षांनी प्रा. पठारे व फुटाणे यांना मनापासून, तीव्रपणे बोलावं वाटलं, याचाच एक अर्थ प्रश्न कायम आहे, असा होतो. एक निश्चित की, राज्यकर्ते कोणत्या विचारसरणीचे आहेत, त्यावर त्या ओरडण्याची तीव्रता ठरत असते, असं साधारणपणे दिसतं. कार्नाड बोलत होते, तेव्हा त्यांना कुणी अडवलं नाही. त्या संमेलनात गोंधळ झाला, तो ठाकरे यांच्या निषेधाचा ठराव मांडण्यावरून.

सांप्रत आपण दोन टोकांवर आहोत. अभिव्यक्तीची, व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याची कधी नव्हे एवढी गळचेपी होत आहे, असं काहींना वाटतं. असं काहीही घडत नाही. मोदी आणि भाजप सरकार यांचं सत्तेत असणं मान्य नसलेल्या काही विशिष्ट घटकांनी उठवलेली ही आवई आहे, असं मानणारा आणि त्याबद्दल समाजमाध्यमात तावातावानं व्यक्त होणारा दुसरा मोठा वर्ग आहे. पण एक गोष्ट मान्य करायलाच हवी, पठारे आणि फुटाणे यांना या विषयावर जाहीरपणे चिंता व्यक्त करावी वाटणं, लक्षणीय आहे. समाजातल्या एका घटकाची अशी धारणा होऊ देणं आणि ती दुखरी भावना ठसठसत राहणं, उजव्या, डाव्या किंवा मध्यममार्गी राज्यकर्त्यांसाठी चांगलं नाही, हे नक्की.

... जाता जाता हेही नोंदवायला हवं की, गंगा-जमनी संस्कृतीचं महत्त्व, अपरिहार्यता सांगताना पठारे यांनी तिन्ही उदाहरणं जमनीचीच दिली; गंगेचं एकही नाही! आपण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाहीत, असं पठारे व फुटाणे यांनी आवर्जून नमूद केलं!!
....
(छायाचित्रं  - सदानंद) 

Monday 11 September 2017

एका लेखकाची ‘भेट’

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचा मुक्काम गेल्या शुक्रवारी (म्हणजे ८ सप्टेंबर रोजी) नगरमध्ये होता. एक दिवसाचा उपक्रम – पुस्तक घ्यावे! पुस्तक द्यावे!!’ म्हणजे आपल्या संग्रहातली सुस्थितीतील पुस्तके द्यायची आणि तिथे उपलब्ध असलेल्यांपैकी आपल्याला आवडणारी, न वाचलेली, वाचावी वाटणारी पुस्तके त्या बदल्यात आणायची. अर्थात, या उपक्रमासाठी काही अटी व नियम लागू होत्याच.

उपक्रमाची माहिती ज्या दिवशी समजली, त्याच दिवशी तिथं जाण्याचं ठरवलं. कारण एकच - घरात खूप पुस्तकं झाली आहेत. अडगळ म्हणावीत एवढी. अडगळच... पण समृद्ध! तर या समृद्ध अडगळीतली थोडी-फार तरी निकाली काढायला हवी. इतर मंडळी तरी वाचतील ती. निघण्याच्या आधी पुस्तकं काढण्यासाठी म्हणून बसलो आणि अर्ध्या तासात जेमतेम आठ पुस्तकं निवडता आली. त्यातली चार माझ्या काहीच उपयोगाची नव्हती. बाकीची चार थोड्या जड हातांनीच उचलली.

उपक्रमस्थळी पोहोचल्यावर आयोजकांनी बरोब्बर मला नको असलेलीपुस्तकं नाकारली. या बदल्यात मला पुस्तकं नकोत. ही कुणाला आवडली, तर घेऊन जाऊ द्यात, हे माझं म्हणणंही त्यांनी नम्रपणे नाकारलं. कारण ती पुस्तकं कुणी नेलीच नाहीत, तर प्रतिष्ठानानं तरी त्यांचं ओझं का वाहून न्यायचं? ही कारणमीमांसा नंतर माझ्या लक्षात आली.

पुस्तकं देऊन, त्यांच्या संख्येची नोंद असलेली पावती घेऊन पुस्तकं निवडायला गेलो. बरीच पुस्तकं होती. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास (संग्रहात आहे), आठवणीतील कविता-खंड दोन (उचलावंसं वाटूनही टाळलं) आणि अजून बरीच काही काही... शक्यतो पुस्तकं घ्यायचीच नाहीत किंवा चाराच्या बदल्यात दोनच घ्यायची असं ठरवलं होतं. पण मोह आवरला नाही; जेवढी दिली तेवढीच घेतली. (हक्कच होता ना माझा तो!) त्यात एक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या भाषणांचं संकलन आहे. राजाभाऊ मंगळवेढेकर यांचं आत्मकथन आणि वसंत नरहर फेणे यांचं पंचकथाई. फेणे फार आवडतात. द. वा. पोतदार यांच्या भाषणांचं पुस्तक केवळ औत्सुक्यापोटी घेतलं. नेहमीची सवय - वाचून होईल, नाही होणार; पण असावं आपल्या संग्रहात...

त्यातलंच चौथं आणि सगळ्यांत आधी उचललेलं पुस्तक म्हणजे धूपदान. लेखक - वसंत अ. कुंभोजकर. लेखकाचं हे नाव ओळखीचं होतं. त्यांचं काही तरी वाचलेलं असेलही; पण फार काही वाचल्याचं आठवत नव्हतं. पुस्तक पाहूनच लक्षात आलं की, हे मिळलं तर आत्ताच, नाही तर पुढं मिळण्याची काही खात्री नाही. अशी जुनी पुस्तकं मी बऱ्याचदा तेवढ्या मोहापायी घेतो आणि त्यातल्या बहुतेकांनी मला निराश केलं नाही.


धूपदानचं मुखपृष्ठ जुन्या शैलीतलं आहे. अनंत सालकर किंवा त्याही आधी स्वराज्य साप्ताहिकासाठी चित्रं काढणारे ते चित्रकार... यांच्या धाटणीचं. लेखकाचं मुखपृष्ठावरचं नावही सुलेखनातलं. तीही शैली जुन्या चित्रकारांची आठवण करून देणारी, पण नेमकं नाव न आठवणारी. अगदी छोटं पुस्तक - जेमतेम ११६ पानांचं. तिथंच चाळून पाहिलं, तर दिसलं किर्लोस्कर प्रेस प्रकाशन. मनाशी म्हटलं, मग तर घ्यायलाच पाहिजे.

पुस्तकांच्या या प्रदर्शनातून थेट कार्यालयात गेलो. व्यक्तिचित्रांचं एक द्यायचं पुस्तक सहकाऱ्याला दिलं. दोन कवितासंग्रह होते, ते असेच एकाला दिले. न परतीच्या बोलीवर! रात्री घरी आल्याबरोबर पुस्तकं चाळायला घेतली. मंगळवेढेकरांच्या आत्मकथेतली चार-पाच पानं वाचली. ते पंढरपूर-मंगळवेढ्याचे असल्यामुळे थोडी जास्त आस्था. मग हातात घेतलं, धूपदान. त्यातली पहिलीच झपाटलेली कथा वाचून संपविली आणि निर्णय बरोबर ठरल्याचं समाधान वाटलं.

या छोट्या संग्रहात कुंभोजकर यांच्या ११ कथा आहेत. पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या नावाची. ती पाहिल्यावरच वाटलं की, कुंभोजकर एक तर औरंगाबादचे असावेत किंवा औरंगाबादकर झाले असावेत. (तोपर्यंत पुस्तकाची पाठराखण पाहिली नव्हती. त्यातून ते स्पष्ट झालं.) कारण वा. ल. यांच्याविषयी औरंगाबादकरांना फार आत्मीयता, अभिमान. त्यांची थोरवी अनेक शिष्य आतापर्यंत सांगताना ऐकलं आहे.

संग्रहातल्या राहिलेल्या कथा काल रात्री आणि आज दुपारी दूरदर्शनवर सुजाता (तो पाहिला, ते तलत महमूदचं जलते है जिसके लिए... गाणं ऐकायचं म्हणून.) पाहिल्यानंतर वाचून काढल्या. शीर्षककथा सगळ्यांत शेवटी आहे. ती घडते त्या शहराचं नाव हसीनाबाद आहे. पहिल्या १००-१५० शब्दांतलं वर्णन वाचून मला ते औरंगाबादचंच आहे, असं वाटलं. हे हसीनाबाद नावही सूचक आहे, हे कथा वाचून झाल्यावर कळतं. ही गोष्ट संपवली आणि वाटलं, आपलं समाधान या लेखकापर्यंत पोचवलंच पाहिजे. लेखकाची ती मोठी पावती असते. (अनेक लेखक अशा पावत्यांना चिठोऱ्या मानतात, हेही माहीत आहे.) ल. ना. गोखले आणि प्रभाकर पेंढारकर यांच्याकडून अशा पावतीची मनस्वी पावती मिळालेली आहे!

कुंभोजकर यांचा ठावठिकाणा मिळवायचा कसा? त्यांचा जन्म १९२८चा; हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं जुलै १९६९मध्ये. कुणा औरंगाबादकरालाच विचारू म्हटलं. तिथला आपला सध्या विकिपीडिया आहे तरुण पत्रकार संकेत कुलकर्णी. त्याला संध्याकाळी फोन लावला आणि त्याला हे माहितीच नसेल, अशा थाटात प्रस्तावना केली. वसंत कुंभोजकर नावाचे लेखक आहेत, हे त्याला माहीत होतं. ते औरंगाबादमध्ये राहतात, हेही त्यालाच ठाऊक होतं. राधाकृष्ण मुळी यांनी परवाच त्यांच्याबद्दल फेसबुकवर लिहिल्याचंही संकेतनं सांगितलं. हे सगळं ऐकून छान वाटलं!

हा संग्रह ४८ वर्षांपूर्वीचा, लेखक कुंभोजकर यांनी तेव्हा नुकतीच चाळिशी ओलांडलेली. त्यांची पहिली कथा सत्यकथामधून प्रसिद्ध झाल्याचीं, त्यांनी औरंगाबादमध्ये प्राध्यापकी केल्याची माहिती पाठराखणीमधून मिळाली. संग्रहातल्या सगळ्याच कथा छान आहेत. त्यात मध्यमवर्गीय दिसतात, उच्चवर्गीय दिसतात, कष्टकरीही येतात. आयुष्याचं गाडं पुढं ढकलण्यासाठी छोट्या दिसणाऱ्या आणि नकोशा असणाऱ्या कराव्या लागणाऱ्या तडजोडीही तिथं दिसतात. त्या न करण्याची हिंमत दाखविणारी पात्रंही आहेत. झपाटलेलीमधली आत्याबाई विलक्षण आहे. तिच्या नवऱ्यानं भरल्या संसारात आत्महत्या केली, असं कथेत मध्येच एकदा येऊन जातं. त्याचा संबंध मग थेट कथा संपताना येतो. या आत्याबाईचं वर्णन कुंभोजकर यांनी अशा पद्धतीनं केलं आहे की, त्या थेट आपल्यासमोर उभ्या राहतात.

अभिसारिकाही विलक्षण. नवऱ्याचा सहवास आणि वेळ लाभावा म्हणून आसुसलेली एका संपन्न कुटुंबातली तरुणी. नावाप्रमाणे ही कथा धीट; पण तो धीटपणा अतिशय सूचकपणे व्यक्त झाला आहे. अन्यथा कथेची गरज म्हणून इथं प्रगल्भ भाषेत बरंच काही स्वस्तलिहिता येण्याचं स्वातंत्र्य घेता आलं असतं. तेच जाणवतं, धिंडवडे आणि जळवा कथांमध्ये. क्रिकेटच्या सामन्यापासून सुरू होणारी जळवा लेखक वेगळ्याच वळणावर नेतो आणि वाचणाऱ्याला सुन्न करून टाकतो. स्वतःवर खूश असलेला आणि माझं कधीच चुकत नाही, चुकणारही नाही असा ताठा सदैव बाळगणाऱ्या उच्चशिक्षित शिक्षकाची घसरगुंडी पीळमधून दिसते.

कुंभोजकर शिक्षकी पेशात होते म्हणून की काय, बहुसंख्य कथांची पार्श्वभूमी शैक्षणिक आहे. माणसाचं मन कसं असतं, कसं चालतं याचंही ते छान वर्णन करतात. मनातली अशीच घालमेल होते, अस्वस्थ करून सोडते कोंडी आणि हरवलेली डायमेन्शन्स या कथा. त्यातल्या कोंडीचा शेवट वाचकाचा जीव भांड्यात पाडणारा आहे.

निजामी औरंगाबादवर कुंभोजकर यांचं प्रेम आहे, याची जाणीव दोन कथा करून देतात. एक म्हणजे धूपदान आणि दुसरी रोझ मार्व्हेल. या दोन्ही तशा प्रेमकथा. विफल प्रेमाच्या सुन्न कथा.

माझ्या वयाहून फक्त पाच वर्षांनी लहान असलेलं हे छोटं पुस्तक तसं चांगल्या अवस्थेत मिळालं. त्याची बांधणी वरच्या बाजूनं थोडी खिळखिळी झालेली आहे. पहिल्याच आवृत्तीतली ही प्रत. तिची तेव्हाची किंमत चार रुपये. कागद बऱ्यापैकी पिवळा पडला असला, तरी वाचनीयतेला काही बाधा येत नाही. टंक बऱ्यापैकी बारीक असला, तरी आजही स्पष्ट वाचता येतो असा. पुस्तकात लेखकाचा पत्ता, स्वामित्वहक्क कोणाचा, मुखपृष्ठ कोणाचं याचा काही उल्लेख नाही.

आणखी एक – कुंभोजकर किंवा प्रकाशक किर्लोस्कर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लिपीशुद्धीच्या प्रेमात असावेत. पुस्तकात जागोजागी अि ( नव्हे), अी (च्या ऐवजी), अु ( नाही) अशी अक्षरे दिसतात. सावरकरांनी अक्षराला सुचविलेल्या पर्यायाचा मात्र वापर त्यांनी केल्याचे दिसत नाही.

असो! खूप दिवसांपासून खूप वेगवेगळ्या पुस्तकांवर लिहायचं आहे. वसंत कुंभोजकर या आता नव्वदीत असलेल्या लेखकानं त्यांच्या विलक्षण वाचनीय कथांच्या संग्रहानं या कोंडीला वाट फोडली आहे.

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...