नाशिकच्या कुसुमाग्रज
प्रतिष्ठानाच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’
उपक्रमाचा मुक्काम गेल्या शुक्रवारी (म्हणजे ८ सप्टेंबर
रोजी) नगरमध्ये होता. एक दिवसाचा उपक्रम – ‘पुस्तक घ्यावे! पुस्तक द्यावे!!’ म्हणजे आपल्या संग्रहातली
सुस्थितीतील पुस्तके द्यायची आणि तिथे उपलब्ध असलेल्यांपैकी आपल्याला आवडणारी, न
वाचलेली, वाचावी वाटणारी पुस्तके त्या बदल्यात आणायची. अर्थात, या उपक्रमासाठी
काही अटी व नियम लागू होत्याच.
उपक्रमाची माहिती ज्या दिवशी समजली,
त्याच दिवशी तिथं जाण्याचं ठरवलं. कारण एकच - घरात खूप पुस्तकं झाली आहेत. अडगळ
म्हणावीत एवढी. अडगळच... पण समृद्ध! तर या
समृद्ध अडगळीतली थोडी-फार तरी निकाली काढायला हवी. इतर मंडळी तरी वाचतील ती.
निघण्याच्या आधी पुस्तकं काढण्यासाठी म्हणून बसलो आणि अर्ध्या तासात जेमतेम आठ
पुस्तकं निवडता आली. त्यातली चार माझ्या काहीच उपयोगाची नव्हती. बाकीची चार थोड्या
जड हातांनीच उचलली.
उपक्रमस्थळी पोहोचल्यावर आयोजकांनी बरोब्बर
‘मला नको असलेली’ पुस्तकं
नाकारली. ‘या बदल्यात मला पुस्तकं नकोत. ही कुणाला आवडली, तर
घेऊन जाऊ द्यात,’ हे माझं म्हणणंही त्यांनी नम्रपणे नाकारलं.
कारण ती पुस्तकं कुणी नेलीच नाहीत, तर प्रतिष्ठानानं तरी त्यांचं ओझं का वाहून
न्यायचं? ही कारणमीमांसा नंतर माझ्या लक्षात आली.
पुस्तकं देऊन, त्यांच्या संख्येची
नोंद असलेली पावती घेऊन पुस्तकं निवडायला गेलो. बरीच पुस्तकं होती. ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ (संग्रहात आहे),
‘आठवणीतील कविता-खंड दोन’ (उचलावंसं
वाटूनही टाळलं) आणि अजून बरीच काही काही... शक्यतो पुस्तकं घ्यायचीच नाहीत किंवा
चाराच्या बदल्यात दोनच घ्यायची असं ठरवलं होतं. पण मोह आवरला नाही; जेवढी दिली तेवढीच घेतली. (हक्कच होता ना माझा तो!)
त्यात एक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या भाषणांचं संकलन आहे. राजाभाऊ
मंगळवेढेकर यांचं आत्मकथन आणि वसंत नरहर फेणे यांचं ‘पंचकथाई’. फेणे फार आवडतात. द. वा. पोतदार यांच्या भाषणांचं पुस्तक केवळ
औत्सुक्यापोटी घेतलं. नेहमीची सवय - ‘वाचून होईल, नाही होणार; पण असावं आपल्या संग्रहात...’
त्यातलंच चौथं आणि सगळ्यांत आधी
उचललेलं पुस्तक म्हणजे ‘धूपदान’. लेखक - वसंत
अ. कुंभोजकर. लेखकाचं हे नाव ओळखीचं होतं. त्यांचं काही तरी वाचलेलं असेलही; पण फार काही वाचल्याचं आठवत नव्हतं. पुस्तक पाहूनच लक्षात आलं की, हे
मिळलं तर आत्ताच, नाही तर पुढं मिळण्याची काही खात्री नाही. अशी जुनी पुस्तकं मी
बऱ्याचदा तेवढ्या मोहापायी घेतो आणि त्यातल्या बहुतेकांनी मला निराश केलं नाही.
पुस्तकांच्या या प्रदर्शनातून थेट
कार्यालयात गेलो. व्यक्तिचित्रांचं एक द्यायचं पुस्तक सहकाऱ्याला दिलं. दोन
कवितासंग्रह होते, ते असेच एकाला दिले. न परतीच्या बोलीवर! रात्री घरी आल्याबरोबर पुस्तकं चाळायला घेतली.
मंगळवेढेकरांच्या आत्मकथेतली चार-पाच पानं वाचली. ते पंढरपूर-मंगळवेढ्याचे असल्यामुळे थोडी
जास्त आस्था. मग हातात घेतलं, ‘धूपदान’.
त्यातली पहिलीच ‘झपाटलेली’ कथा वाचून
संपविली आणि निर्णय बरोबर ठरल्याचं समाधान वाटलं.
या छोट्या संग्रहात कुंभोजकर यांच्या ११ कथा आहेत. पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या नावाची.
ती पाहिल्यावरच वाटलं की, कुंभोजकर एक तर औरंगाबादचे असावेत किंवा औरंगाबादकर झाले
असावेत. (तोपर्यंत पुस्तकाची पाठराखण पाहिली नव्हती. त्यातून ते स्पष्ट झालं.)
कारण वा. ल. यांच्याविषयी औरंगाबादकरांना फार आत्मीयता, अभिमान. त्यांची थोरवी
अनेक शिष्य आतापर्यंत सांगताना ऐकलं आहे.
संग्रहातल्या राहिलेल्या कथा काल
रात्री आणि आज दुपारी दूरदर्शनवर ‘सुजाता’ (तो पाहिला, ते तलत महमूदचं ‘जलते है जिसके लिए...’ गाणं ऐकायचं म्हणून.) पाहिल्यानंतर वाचून काढल्या. शीर्षककथा सगळ्यांत
शेवटी आहे. ती घडते त्या शहराचं नाव ‘हसीनाबाद’ आहे. पहिल्या १००-१५० शब्दांतलं वर्णन वाचून मला ते औरंगाबादचंच आहे, असं
वाटलं. हे ‘हसीनाबाद’ नावही सूचक आहे,
हे कथा वाचून झाल्यावर कळतं. ही गोष्ट संपवली आणि वाटलं, आपलं समाधान या
लेखकापर्यंत पोचवलंच पाहिजे. लेखकाची ती मोठी पावती असते. (अनेक लेखक अशा
पावत्यांना ‘चिठोऱ्या’ मानतात, हेही
माहीत आहे.) ल. ना. गोखले आणि प्रभाकर पेंढारकर यांच्याकडून अशा पावतीची मनस्वी
पावती मिळालेली आहे!
कुंभोजकर यांचा ठावठिकाणा मिळवायचा
कसा? त्यांचा जन्म १९२८चा;
हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं जुलै १९६९मध्ये. कुणा औरंगाबादकरालाच विचारू म्हटलं.
तिथला आपला सध्या ‘विकिपीडिया’ आहे
तरुण पत्रकार संकेत कुलकर्णी. त्याला संध्याकाळी फोन लावला आणि त्याला हे माहितीच
नसेल, अशा थाटात प्रस्तावना केली. वसंत कुंभोजकर नावाचे लेखक आहेत, हे त्याला माहीत
होतं. ते औरंगाबादमध्ये राहतात, हेही त्यालाच ठाऊक होतं. राधाकृष्ण मुळी यांनी
परवाच त्यांच्याबद्दल फेसबुकवर लिहिल्याचंही संकेतनं सांगितलं. हे सगळं ऐकून छान
वाटलं!
हा संग्रह ४८ वर्षांपूर्वीचा, लेखक
कुंभोजकर यांनी तेव्हा नुकतीच चाळिशी ओलांडलेली. त्यांची पहिली कथा ‘सत्यकथा’मधून प्रसिद्ध झाल्याचीं, त्यांनी औरंगाबादमध्ये प्राध्यापकी केल्याची माहिती पाठराखणीमधून मिळाली.
संग्रहातल्या सगळ्याच कथा छान आहेत. त्यात मध्यमवर्गीय दिसतात, उच्चवर्गीय दिसतात,
कष्टकरीही येतात. आयुष्याचं गाडं पुढं ढकलण्यासाठी छोट्या दिसणाऱ्या आणि नकोशा असणाऱ्या
कराव्या लागणाऱ्या तडजोडीही तिथं दिसतात. त्या न करण्याची हिंमत दाखविणारी
पात्रंही आहेत. ‘झपाटलेली’मधली
आत्याबाई विलक्षण आहे. तिच्या नवऱ्यानं भरल्या संसारात आत्महत्या केली, असं कथेत
मध्येच एकदा येऊन जातं. त्याचा संबंध मग थेट कथा संपताना येतो. या आत्याबाईचं
वर्णन कुंभोजकर यांनी अशा पद्धतीनं केलं आहे की, त्या थेट आपल्यासमोर उभ्या
राहतात.
‘अभिसारिका’ही विलक्षण.
नवऱ्याचा सहवास आणि वेळ लाभावा म्हणून आसुसलेली एका संपन्न कुटुंबातली तरुणी.
नावाप्रमाणे ही कथा धीट; पण तो धीटपणा अतिशय सूचकपणे व्यक्त
झाला आहे. अन्यथा ‘कथेची गरज’ म्हणून
इथं प्रगल्भ भाषेत बरंच काही ‘स्वस्त’ लिहिता
येण्याचं स्वातंत्र्य घेता आलं असतं. तेच जाणवतं, ‘धिंडवडे’ आणि ‘जळवा’ कथांमध्ये.
क्रिकेटच्या सामन्यापासून सुरू होणारी ‘जळवा’ लेखक वेगळ्याच वळणावर नेतो आणि वाचणाऱ्याला सुन्न करून टाकतो. स्वतःवर
खूश असलेला आणि ‘माझं कधीच चुकत नाही, चुकणारही नाही’ असा ताठा सदैव बाळगणाऱ्या उच्चशिक्षित शिक्षकाची घसरगुंडी ‘पीळ’मधून दिसते.
कुंभोजकर शिक्षकी पेशात होते म्हणून
की काय, बहुसंख्य कथांची पार्श्वभूमी शैक्षणिक आहे. माणसाचं मन कसं असतं, कसं
चालतं याचंही ते छान वर्णन करतात. मनातली अशीच घालमेल होते, अस्वस्थ करून सोडते ‘कोंडी’ आणि ‘हरवलेली
डायमेन्शन्स’ या कथा. त्यातल्या ‘कोंडी’चा शेवट वाचकाचा जीव भांड्यात पाडणारा आहे.
निजामी औरंगाबादवर कुंभोजकर यांचं
प्रेम आहे, याची जाणीव दोन कथा करून देतात. एक म्हणजे ‘धूपदान’ आणि दुसरी ‘रोझ मार्व्हेल’. या दोन्ही तशा प्रेमकथा. विफल
प्रेमाच्या सुन्न कथा.
माझ्या वयाहून फक्त पाच वर्षांनी
लहान असलेलं हे छोटं पुस्तक तसं चांगल्या अवस्थेत मिळालं. त्याची बांधणी वरच्या
बाजूनं थोडी खिळखिळी झालेली आहे. पहिल्याच आवृत्तीतली ही प्रत. तिची तेव्हाची
किंमत चार रुपये. कागद बऱ्यापैकी पिवळा पडला असला, तरी वाचनीयतेला काही बाधा येत
नाही. टंक बऱ्यापैकी बारीक असला, तरी आजही स्पष्ट वाचता येतो असा. पुस्तकात लेखकाचा
पत्ता, स्वामित्वहक्क कोणाचा, मुखपृष्ठ कोणाचं याचा काही उल्लेख नाही.
आणखी एक – कुंभोजकर किंवा प्रकाशक
किर्लोस्कर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लिपीशुद्धीच्या प्रेमात असावेत.
पुस्तकात जागोजागी ‘अि’ (‘इ’ नव्हे), ‘अी’ (‘ई’च्या ऐवजी), ‘अु’ (‘उ’
नाही) अशी अक्षरे दिसतात. सावरकरांनी ‘र’ अक्षराला सुचविलेल्या पर्यायाचा मात्र वापर त्यांनी केल्याचे दिसत नाही.
असो!
खूप दिवसांपासून खूप वेगवेगळ्या पुस्तकांवर लिहायचं आहे. वसंत कुंभोजकर या आता
नव्वदीत असलेल्या लेखकानं त्यांच्या विलक्षण वाचनीय कथांच्या संग्रहानं या कोंडीला
वाट फोडली आहे.
धन्यवाद ! तुमच्या लेखणीतून पुस्तक वाचण्याची इच्छा दुणावली..एकदातरी नक्कीच वाचेन
उत्तर द्याहटवावा.उत्सुकता वाढलीये. जुन्या लेखकाची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन.
उत्तर द्याहटवाकुंभोजकर मूळचे औरंगाबादचे नसावेत, कारण सोलापूर जिल्ह्यात कुंभेज नावाचे गाव आहे. असो हा एक तर्क.
कुंभोजकरांविषयी तुम्ही आत्मीयतेनं लिहिलंय. त्यांच्या कथांचं रसग्रहणही मार्मिक. भिडलेली कथा अंतरात मुरत जाते. अशा अनेक कथांनी माझ्याही अंतःकरणात दडून आहेत.
१९६० ते ८० च्या दशकातील अनेक दिवाळी अंकात कुंभेजकर भेटतात. मागे जुन्या दिवाळी अंकांसंदर्भात एक प्रकल्प केला होता, तेव्हा हे ध्यानात आलं. त्यांची लेखणी बहुप्रसवा नाही, पण काळजाला भिडणारी निश्चितच आहे. मजा आली. धन्यवाद.
लेखाच्या निमित्ताने माझी व वसंत अ. कुंभोजकर यांची आणि त्यांच्या कथांची ओझरती भेट घडवून आणलीत. धन्यवाद! `ग्रंथ तुमच्या दारी` उपक्रमाच्या वेळचा प्रसंग चांगला मांडला आहे. कंसातली वाक्ये मजा आणणारी. छानच लेख.
उत्तर द्याहटवा- संजय आढाव
`खिडकी`त डोकावलो. पुस्तक वाचायला प्रोत्साहन देणारी मांडणी.
उत्तर द्याहटवा- मंगेश कुलकर्णी
लेख छान आहे. कुंभोजकर यांचं नाव ऐकलं आहे, पण दुर्दैवानं अजून काही वाचलेलं नाही. हा लेख वाचून त्यांच्या लेखनाविषयी उत्सुकता वाटली. त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पोस्टमध्ये मजकुरासोबत दिलं असतं, तर एकूण मांडणीला आणखी पूरकता आली असती, असं वाटतं. शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाकाय सांगू? तुमचं विपत्र वाचल्यावर क्षणाचाही विलंब न करता हा लेख वाचला. कारणं दोन. एक तो तुम्ही लिहिला आणि दोन आपल्या परमप्रिय अशा पुस्तकावर आहे. सांगायला आनंद वाटतो की, तुमचा हा अनुभव वाचून त्याचा हेवा वाटला. अशी पुस्तके देणारे व घेणारे वाचक आपणही झालो असतो तर..! आणखीही सांगता आलं असतं पण इथे थांबतो.
उत्तर द्याहटवा- मंगेश नाबर
`...लेखकाची `भेट`` वाचून ते पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली.
उत्तर द्याहटवा- विवेक विसाळ
कुंभोजकरांवरचा लेख आवडला. छान आहे. तुमच्या समृद्ध अडगळीतील पुस्तके कोणती होती? नगरला आलो की घेईन म्हणतो वाचायला.
उत्तर द्याहटवा-प्रशांत पिंपळनेरकर.
इंटरनेट, मोबाईलचा हा जमाना. इंटरनेटवर-मोबाईलवर ऐकावे, पाहावे, वाचावे. सारं कांही झटपट. पुस्तकाचं ओझं हाताला सहन होत नाही. परिणामी पुस्तकरूपी मोबाईल वापरणारे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहेत. पट्टीचे लेखक-कवीही शोधावे लागतात. वाचनालयं, पुस्तक प्रदर्शनं ओस पडत आहेत. यांचंच एक प्रदर्शन झालं आहे. अशा या झटपट जमान्यात आपण खारीच्या वाट्याने वाचनसंस्कृती जतन करीत आहात-समृद्ध करीत आहात. म्हणूनच आपणाला शोधावे लागत नाही; सहज सापडते!
उत्तर द्याहटवा- श्रीराम वांढरे
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ' ग्रंथ तुमच्या दारी' या योजनेशी मी गेली २ वर्षे जोडलेली आहे. मी एक समन्वयक आहे. या योजनेमुळे इथे दुबईमध्ये राहून देखील मराठी वाचता येते.
उत्तर द्याहटवा