मुख्य सामग्रीवर वगळा

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

'धूपदान'... अचानक 'भेटलेला' लेखक

‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमात गेलो होतो. घरातली पुस्तके द्यायला
आणि नसलेली तेथून काही मिळाली तर पाहायला. चार दिली, चार पुस्तके आणली. त्यातील 
‘धूपदान’ कथासंग्रह वसंत अ. कुंभोजकर ह्यांचा.
त्या संग्रहातील कथांबद्दल, लेखकाबद्दल ललित टिपण...
----------------------
धूपदान वसंत अ कुंभोजकर कथासंग्रह मराठी पुस्तके
धूपदान - वसंत अ. कुंभोजकर
..................
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या
‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाचा मुक्काम गेल्या शुक्रवारी (म्हणजे ८ सप्टेंबर २०१७ रोजी) नगरमध्ये होता. एक दिवसाचा उपक्रम – ‘पुस्तक घ्यावे! पुस्तक द्यावे!!’

म्हणजे आपल्या संग्रहातली सुस्थितीतील पुस्तके द्यायची आणि तिथे उपलब्ध असलेल्यांपैकी आपल्याला आवडणारी, न वाचलेली, वाचावी वाटणारी पुस्तके त्या बदल्यात आणायची. अर्थात, या उपक्रमासाठी काही अटी व नियम लागू होत्याच.

उपक्रमाची माहिती ज्या दिवशी समजली, त्याच दिवशी तिथं जाण्याचं ठरवलं. कारण एकच - घरात खूप पुस्तकं झाली आहेत. अडगळ म्हणावीत एवढी. अडगळच... पण समृद्ध! तर या समृद्ध अडगळीतली थोडी-फार तरी निकाली काढायला हवी. इतर मंडळी तरी वाचतील ती.

निघण्याच्या आधी पुस्तकं काढण्यासाठी म्हणून बसलो आणि अर्ध्या तासात जेमतेम आठ पुस्तकं निवडता आली. त्यातली चार माझ्या काहीच उपयोगाची नव्हती. बाकीची चार थोड्या जड हातांनीच उचलली.

त्यांनी का ओझं वाहायचं?

उपक्रमस्थळी पोहोचल्यावर आयोजकांनी बरोब्बर ‘मला नको असलेली’ पुस्तकं नाकारली. ‘ह्या पुस्तकांच्या बदल्यात मला पुस्तकं नकोत. ही कुणाला आवडली, तर घेऊन जाऊ द्यात,’ हे माझं म्हणणंही त्यांनी नम्रपणे नाकारलं. कारण ती पुस्तकं कुणी नेलीच नाहीत, तर प्रतिष्ठानानं तरी त्यांचं ओझं का वाहून न्यायचं? ही कारणमीमांसा नंतर माझ्या लक्षात आली.

पुस्तकं देऊन, त्यांच्या संख्येची नोंद असलेली पावती घेऊन पुस्तकं निवडायला गेलो. बरीच पुस्तकं होती. ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ (संग्रहात आहे), ‘आठवणीतील कविता-खंड दोन’ (उचलावंसं वाटूनही टाळलं) आणि अजून बरीच काही काही...

शक्यतो पुस्तकं घ्यायचीच नाहीत किंवा चाराच्या बदल्यात दोनच घ्यायची असं ठरवलं होतं. पण मोह आवरला नाही
; जेवढी दिली तेवढीच घेतली. (हक्कच होता ना माझा तो!) त्यात एक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांच्या भाषणांचं संकलन आहे. राजाभाऊ मंगळवेढेकर ह्यांचं आत्मकथन आणि वसंत नरहर फेणे ह्यांचं ‘पंचकथाई’. फेणे फार आवडतात.

द. वा. पोतदार ह्यांच्या भाषणांचं पुस्तक केवळ औत्सुक्यापोटी घेतलं. नेहमीची सवय -
‘वाचून होईल, नाही होणार; पण असावं आपल्या संग्रहात...’

त्यातलंच चौथं आणि सगळ्यांत आधी उचललेलं पुस्तक म्हणजे ‘धूपदान’. लेखक - वसंत अ. कुंभोजकर. लेखकाचं हे नाव ओळखीचं होतं. त्यांचं काही तरी वाचलेलं असेलही; पण फार काही वाचल्याचं आठवत नव्हतं.

पुस्तक पाहूनच लक्षात आलं की, हे मिळलं तर आत्ताच, नाही तर पुढं मिळण्याची काही खात्री नाही. अशी जुनी पुस्तकं मी बऱ्याचदा तेवढ्या मोहापायी घेतो आणि त्यातल्या बहुतेकांनी मला निराश केलं नाही.

जुन्या शैलीतलं मुखपृष्ठ

‘धूपदान’चं मुखपृष्ठ जुन्या शैलीतलं आहे. अनंत सालकर किंवा त्याही आधी ‘स्वराज्य’ साप्ताहिकासाठी चित्रं काढणारे ते चित्रकार... ह्यांच्या धाटणीचं. लेखकाचं मुखपृष्ठावरचं नावही सुलेखनातलं. तीही शैली जुन्या चित्रकारांची आठवण करून देणारी, पण नेमकं नाव न आठवणारी.

अगदी छोटं पुस्तक - जेमतेम ११६ पानांचं. तिथंच चाळून पाहिलं, तर दिसलं
‘किर्लोस्कर प्रेस प्रकाशन’. मनाशी म्हटलं, मग तर घ्यायलाच पाहिजे.

पुस्तकांच्या प्रदर्शनातून थेट कार्यालयात गेलो. व्यक्तिचित्रांचं एक द्यायचं पुस्तक सहकाऱ्याला दिलं. दोन कवितासंग्रह होते, ते असेच एकाला दिले. न परतीच्या बोलीवर! रात्री घरी आल्याबरोबर पुस्तकं चाळायला घेतली. मंगळवेढेकरांच्या आत्मकथेतली चार-पाच पानं वाचली. ते पंढरपूर-मंगळवेढ्याचे असल्यामुळे थोडी जास्त आस्था.

मग हातात घेतलं,
‘धूपदान’. त्यातली पहिलीच ‘झपाटलेली’ कथा वाचून संपविली आणि निर्णय बरोबर ठरल्याचं समाधान वाटलं.

ह्या छोट्या संग्रहात कुंभोजकर ह्यांच्या ११ कथा आहेत. पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे प्रा. वा. ल. कुलकर्णी ह्यांच्या नावाची. ती पाहिल्यावरच वाटलं की, कुंभोजकर एक तर औरंगाबादचे (आता छत्रपती संभाजीनगर) असावेत किंवा औरंगाबादकर झाले असावेत. (तोपर्यंत पुस्तकाची पाठराखण पाहिली नव्हती. त्यातून ते स्पष्ट झालं.) कारण वा. ल. ह्यांच्याविषयी औरंगाबादकरांना फार आत्मीयता, अभिमान. त्यांची थोरवी अनेक शिष्य आतापर्यंत सांगताना ऐकलं आहे.

संग्रहातल्या राहिलेल्या कथा वाचून काढल्या, त्या काल रात्री आणि आज दुपारी दूरदर्शनवर ‘सुजाता’ (तो पाहिला, ते तलत महमूदचं ‘जलते है जिसके लिए...’ गाणं ऐकायचं म्हणून.) पाहिल्यानंतर. शीर्षककथा सगळ्यांत शेवटी आहे. ती घडते त्या शहराचं नाव ‘हसीनाबाद’ आहे.

पावती द्यायला हवी

पहिल्या १००-१५० शब्दांतलं वर्णन वाचून मला ते औरंगाबादचंच आहे, असं वाटलं. हे ‘हसीनाबाद’ नावही सूचक आहे, हे कथा वाचून झाल्यावर कळतं. ही गोष्ट संपवली आणि वाटलं, आपलं समाधान ह्या लेखकापर्यंत पोचवलंच पाहिजे. लेखकाची ती मोठी पावती असते. (अनेक लेखक अशा पावत्यांना ‘चिठोऱ्या’ मानतात, हेही माहीत आहे.) ल. ना. गोखले आणि प्रभाकर पेंढारकर ह्यांच्याकडून अशा पावतीची मनस्वी पावती मिळालेली आहे!

कुंभोजकर यांचा ठावठिकाणा मिळवायचा कसा? त्यांचा जन्म १९२८चा; हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं जुलै १९६९मध्ये. कोणा औरंगाबादकरालाच विचारू म्हटलं. तिथला आपला सध्या ‘विकिपीडिया’ आहे तरुण पत्रकार संकेत कुलकर्णी. त्याला संध्याकाळी फोन लावला आणि त्याला हे माहितीच नसेल, अशा थाटात प्रस्तावना केली.

वसंत कुंभोजकर नावाचे लेखक आहेत, हे संकेतला माहीत होतं. ते औरंगाबादमध्ये राहतात, हेही त्याला ठाऊक होतं
च. राधाकृष्ण मुळी ह्यांनी परवाच त्यांच्याबद्दल फेसबुकवर लिहिल्याचंही संकेतनं सांगितलं. हे सगळं ऐकून छान वाटलं!

हा संग्रह ४८ वर्षांपूर्वीचा, लेखक कुंभोजकर यांनी तेव्हा नुकतीच चाळिशी ओलांडलेली. त्यांची पहिली कथा ‘सत्यकथा’मधून प्रसिद्ध झाल्याची, त्यांनी औरंगाबादमध्ये प्राध्यापकी केल्याची माहिती ‘ब्लर्ब’मधून मिळाली.

संग्रहातल्या सगळ्याच कथा छान आहेत. त्यात मध्यमवर्गीय दिसतात, उच्चवर्गीय दिसतात, कष्टकरीही येतात. आयुष्याचं गाडं पुढं ढकलण्यासाठी छोट्या दिसणाऱ्या आणि नकोशा असणाऱ्या कराव्या लागणाऱ्या तडजोडीही तिथं दिसतात. त्या न करण्याची हिंमत दाखविणारी पात्रंही आहेत.

‘
झपाटलेली’मधली आत्याबाई विलक्षण आहे. तिच्या नवऱ्यानं भरल्या संसारात आत्महत्या केली, असं कथेत मध्येच एकदा येऊन जातं. त्याचा संबंध मग थेट कथा संपताना येतो. ह्या आत्याबाईचं वर्णन कुंभोजकर यांनी अशा पद्धतीनं केलं आहे की, त्या थेट आपल्यासमोर उभ्या राहतात.

‘अभिसारिका’ही विलक्षण. नवऱ्याचा सहवास आणि वेळ लाभावा म्हणून आसुसलेली एका संपन्न कुटुंबातली तरुणी. नावाप्रमाणे ही कथा धीट; पण तो धीटपणा अतिशय सूचकपणे व्यक्त झाला आहे. अन्यथा ‘कथेची गरज’ म्हणून इथं प्रगल्भ भाषेत बरंच काही ‘स्वस्त’ लिहिता येण्याचं स्वातंत्र्य घेता आलं असतं.

तेच जाणवतं,
‘धिंडवडे’ आणि ‘जळवा’ कथांमध्ये. क्रिकेटच्या सामन्यापासून सुरू होणारी ‘जळवा’ लेखक वेगळ्याच वळणावर नेतो आणि वाचणाऱ्याला सुन्न करून टाकतो. स्वतःवर खूश असलेला आणि ‘माझं कधीच चुकत नाही, चुकणारही नाही’ असा ताठा सदैव बाळगणाऱ्या उच्चशिक्षित शिक्षकाची घसरगुंडी ‘पीळ’मधून दिसते.

कथांची पार्श्वभूमी शैक्षणिक

कुंभोजकर शिक्षकी पेशात होते म्हणून की काय, बहुसंख्य कथांची पार्श्वभूमी शैक्षणिक आहे. माणसाचं मन कसं असतं, कसं चालतं याचंही ते छान वर्णन करतात. मनातली अशीच घालमेल होते, अस्वस्थ करून सोडते ‘कोंडी’ आणि ‘हरवलेली डायमेन्शन्स’ या कथा. त्यातल्या ‘कोंडी’चा शेवट वाचकाचा जीव भांड्यात पाडणारा आहे.

निजामी औरंगाबादवर कुंभोजकर ह्यांचं प्रेम आहे, याची जाणीव दोन कथा करून देतात. एक म्हणजे ‘धूपदान’ आणि दुसरी ‘रोझ मार्व्हेल’. या दोन्ही तशा प्रेमकथा. विफल प्रेमाच्या सुन्न कथा.

माझ्या वयाहून फक्त पाच वर्षांनी लहान असलेलं हे छोटं पुस्तक तसं चांगल्या अवस्थेत मिळालं. त्याची बांधणी वरच्या बाजूनं थोडी खिळखिळी झालेली आहे. पहिल्याच आवृत्तीतली ही प्रत. तिची तेव्हाची किंमत चार रुपये.

कागद बऱ्यापैकी पिवळा पडला असला, तरी वाचनीयतेला काही बाधा येत नाही. टंक बऱ्यापैकी बारीक असला, तरी आजही स्पष्ट वाचता येतो असा. पुस्तकात लेखकाचा पत्ता, स्वामित्वहक्क कोणाचा, मुखपृष्ठ कोणाचं ह्याचा काही म्हणून उल्लेख दिसत नाही.

आणखी एक – कुंभोजकर किंवा प्रकाशक किर्लोस्कर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या लिपीशुद्धीच्या प्रेमात असावेत. पुस्तकात जागोजागी ‘अि’ (‘इ’ नव्हे), ‘अी’ (‘ई’च्या ऐवजी), ‘अु’ (‘उ’ नाही) अशी अक्षरे दिसतात. सावरकरांनी ‘र’ अक्षराला सुचविलेल्या पर्यायाचा मात्र वापर त्यांनी केल्याचे दिसत नाही.

असो! खूप दिवसांपासून खूप वेगवेगळ्या पुस्तकांवर लिहायचं आहे. वसंत कुंभोजकर या आता नव्वदीत असलेल्या लेखकानं त्यांच्या विलक्षण वाचनीय कथांच्या संग्रहानं या कोंडीला वाट फोडली आहे.
........
(टीप - हा लेख २०१७मध्ये 
‘एका लेखकाची ‘भेट’’ ह्या मूळ शीर्षकाने प्रसिद्ध केला होता. त्यानंतर श्री. कुंभोजकर ह्यांच्याबद्दल काही समजले नाही.)
........

वाचायला आवडतील असे पुस्तके, लेखक ह्यांच्याबद्दलचे अन्य काही लेख 👇


टिप्पण्या

  1. धन्यवाद ! तुमच्या लेखणीतून पुस्तक वाचण्याची इच्छा दुणावली..एकदातरी नक्कीच वाचेन

    उत्तर द्याहटवा
  2. वा.उत्सुकता वाढलीये. जुन्या लेखकाची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम लेखन.
    कुंभोजकर मूळचे औरंगाबादचे नसावेत, कारण सोलापूर जिल्ह्यात कुंभेज नावाचे गाव आहे. असो हा एक तर्क.
    कुंभोजकरांविषयी तुम्ही आत्मीयतेनं लिहिलंय. त्यांच्या कथांचं रसग्रहणही मार्मिक. भिडलेली कथा अंतरात मुरत जाते. अशा अनेक कथांनी माझ्याही अंतःकरणात दडून आहेत.
    १९६० ते ८० च्या दशकातील अनेक दिवाळी अंकात कुंभेजकर भेटतात. मागे जुन्या दिवाळी अंकांसंदर्भात एक प्रकल्प केला होता, तेव्हा हे ध्यानात आलं. त्यांची लेखणी बहुप्रसवा नाही, पण काळजाला भिडणारी निश्चितच आहे. मजा आली. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  4. लेखाच्या निमित्ताने माझी व वसंत अ. कुंभोजकर यांची आणि त्यांच्या कथांची ओझरती भेट घडवून आणलीत. धन्यवाद! `ग्रंथ तुमच्या दारी` उपक्रमाच्या वेळचा प्रसंग चांगला मांडला आहे. कंसातली वाक्ये मजा आणणारी. छानच लेख.
    - संजय आढाव

    उत्तर द्याहटवा
  5. `खिडकी`त डोकावलो. पुस्तक वाचायला प्रोत्साहन देणारी मांडणी.
    - मंगेश कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  6. लेख छान आहे. कुंभोजकर यांचं नाव ऐकलं आहे, पण दुर्दैवानं अजून काही वाचलेलं नाही. हा लेख वाचून त्यांच्या लेखनाविषयी उत्सुकता वाटली. त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पोस्टमध्ये मजकुरासोबत दिलं असतं, तर एकूण मांडणीला आणखी पूरकता आली असती, असं वाटतं. शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  7. काय सांगू? तुमचं विपत्र वाचल्यावर क्षणाचाही विलंब न करता हा लेख वाचला. कारणं दोन. एक तो तुम्ही लिहिला आणि दोन आपल्या परमप्रिय अशा पुस्तकावर आहे. सांगायला आनंद वाटतो की, तुमचा हा अनुभव वाचून त्याचा हेवा वाटला. अशी पुस्तके देणारे व घेणारे वाचक आपणही झालो असतो तर..! आणखीही सांगता आलं असतं पण इथे थांबतो.
    - मंगेश नाबर

    उत्तर द्याहटवा
  8. `...लेखकाची `भेट`` वाचून ते पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली.
    - विवेक विसाळ

    उत्तर द्याहटवा
  9. कुंभोजकरांवरचा लेख आवडला. छान आहे. तुमच्या समृद्ध अडगळीतील पुस्तके कोणती होती? नगरला आलो की घेईन म्हणतो वाचायला.
    -प्रशांत पिंपळनेरकर.

    उत्तर द्याहटवा
  10. इंटरनेट, मोबाईलचा हा जमाना. इंटरनेटवर-मोबाईलवर ऐकावे, पाहावे, वाचावे. सारं कांही झटपट. पुस्तकाचं ओझं हाताला सहन होत नाही. परिणामी पुस्तकरूपी मोबाईल वापरणारे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहेत. पट्टीचे लेखक-कवीही शोधावे लागतात. वाचनालयं, पुस्तक प्रदर्शनं ओस पडत आहेत. यांचंच एक प्रदर्शन झालं आहे. अशा या झटपट जमान्यात आपण खारीच्या वाट्याने वाचनसंस्कृती जतन करीत आहात-समृद्ध करीत आहात. म्हणूनच आपणाला शोधावे लागत नाही; सहज सापडते!
    - श्रीराम वांढरे

    उत्तर द्याहटवा
  11. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ' ग्रंथ तुमच्या दारी' या योजनेशी मी गेली २ वर्षे जोडलेली आहे. मी एक समन्वयक आहे. या योजनेमुळे इथे दुबईमध्ये राहून देखील मराठी वाचता येते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ---------- हा लढा केवळ एका अक्षराचा नाही. मराठीच्या अस्मितेचे अढळपद टिकवून ठेवण्याचा संघर्ष आहे.  'तिलक' किंवा 'जलगाव' ही मोडतोड थांबविण्यासाठी पुण्याच्या श्री. प्रकाश निर्मळ ह्यांनी केंद्रीय मंत्रालयांपर्यंत चिवट पाठपुरावा केला. केंद्रीय हिंदी संचालनालयाने अखेर विस्तारित वर्णावलीत 'ळ'  स्वीकारला. ऋग्वेदापासून ते आधुनिक उपबोलींपर्यंत ५० कोटी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या 'ळ' अक्षराची ही रंजक भाषिक यात्रा. सोबत प्रकाश निर्मळ ह्यांची मुलाखत... ---------------- ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्...

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...
html