राज्याच्या राजकारणाचा शकट जिथून हाकला जातो, त्या इमारतीला पूर्वी ‘सचिवालय’
म्हणत. ‘लाल दिव्या’ला ते नापसंत होतं.
नामांतर केलं. राजधानीतील ती इमारत ‘मंत्रालय’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
नामांतर झालं. पण तिथले ‘सत्ताधीश’ बदलले का? उत्तर ‘नाहीच’ असं आहे. दाम
मोजून घेऊन काम करवून देणाऱ्या एजंटांचा, दलालांचा सत्तेच्या वर्तुळातील बुजबुजाट
कायम आहे. एक नाही, अनेक. ही जमात राहते आमदार निवासात, खाते-पिते पंचतारांकित
हॉटेलांत. आणि काम? बढती, बदली, निलंबन, लिकर परमिट,
आश्रमशाळांची परवानगी. सगळी कामं करतात ही मंडळी. मंत्रालयाशी संधान साधून
असल्यामुळे आलेली ‘पावर’. कोणत्याही
अडचणींवरचा उड्डाणपूल म्हणजे ही जमात.
हे मत एका एजंटाचंच. त्याचं नाव-गाव-जात-धर्म विचारू नका. तो ते सांगणार नाही.
तसं स्पष्ट केलंय त्यानं. आमदार निवासात ‘पोपटराव’ म्हणून
विचारा; कोणीही घालून देईल त्याची गाठ. कोणी त्याला ‘मिठ्ठूमिया’ म्हणून साद घालतं, तर कोणी ‘राघोबादादा पेशवे’ म्हणतं. पत्रकारमित्र रघुनाथ जोशी
त्याला ‘पप्पूशेठ’ म्हणतो. पोपटरावांचा
मुक्काम आमदार निवासात.
‘आमदार
निवास रूम नं. १७५६’ ही
कादंबरी पुरुषोत्तम बोरकर यांची. पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनानं या कादंबरीची
पहिली आवृत्ती १३
डिसेंबर १९९९ रोजी प्रकाशित केली. या ८६ पानांच्या कादंबरीची किंमत ७५ रुपये आहे. अवचित कधी तरी घेतलेलं
हे पुस्तक परवा परवा वाचण्यात आलं.
आई-वडील परलोकी आणि बहीण नवऱ्याघरी गेल्यामुळे पोपटराव एकटा
पडलेला. ‘ग्रेज्युएट्स ऑफ नागपूर युनिव्हर्सिटी आर नॉट अॅप्लीकेबल’च्या शेऱ्यांनी
घायाळ! राजधानीत येतो स्वप्नं डोळ्यांत घेऊन. ती
तुकड्या-तुकड्यांनी विरत जातात. ठरतो एक नि:संग एजंट. पैसा
फेको, काम देखो.
खोली आमदाराची आणि राज्य पोपटरावचे. त्याचा संचार कुठं नाही? त्याच्या ओळखी
कुणाशी नाहीत? अफाट भ्रष्टाचारानं पद गमावलेला माजी
राज्यमंत्री कागदराव गगनबावडेकर त्याच्याकडे येतो – सत्तेचं वलय पुन्हा लाभावं
यासाठी त्याला त्याच्या बाबावर सिनेमा काढायचाय. पोपटराव दिग्दर्शक गाठून देतो.
खान्देशातील बाबासाहेब तुपटाकळीकर पन्नाशीत पोहोचलेले.
त्यांचं राजकीय स्वप्न भव्य होतं...सेंट्रेल हॉलमध्ये तैलचित्र किंवा
मंत्रालयाच्या आवारात पुतळा! जेमतेम एकदा ग्रामपंचायतीत निवडून आले.
वारुणीचा चषक पुढे असला की, त्यांच्या स्वप्नांचे तुकडे अधिक झळाळते होतात. ‘बाथ’, ‘वॉश’, ‘डिनर’, ‘लंच’, ‘ड्रिंक्स’ अशा शब्दांचे त्यांना वेड. तूर्त ते पोपटरावांच्या संगतीनं दलाली करतात.
‘शिक्षणमहर्षी’ म्हणवून घेण्यासाठी नागपूरचा पुढारी
आसुसलेला. आता त्याला फक्त आश्रमशाळा हवी. त्यासाठी १० लाख नगद मोजण्याच्या तयारीनिशी
पोपटरावांकडे आलेला. अडचण नको म्हणून मुलींच्या वसतिगृहाच्या वॉर्डनलाही त्यानं
सोबत आणलेलं आहे.
पुसदचा भावी आमदार बिक्कनसिंग राठोड. त्याला त्याच्या
आमदाराला नडायचं आहे. पोपटरावशी खल करतो. मार्ग सापडतो. रघुवीरचा मित्र प्रेमानंद
भुसावळकर. ‘निर्लज्जम् सदा सुखी’ असं बोधवाक्य घेऊन पिवळी पत्रकारिता करणारा. तो लाख रुपयांच्या मोबदल्यात
दोन दिवसांत डझनभर बातम्यांचा अंक बिक्कनसिंगला देतो. आमदार देशमुखांची पुरती
बदनामी करणारा.
‘समाजसेवा’ करणारी किन्नरी तारापोरवाला, अय्याशी राजकारणी फैज अहमद बुखारी,
कारकुनाचा मुलगा हृषीकेश ऊर्फ रॉकी, आमदार निवासातल्या खोल्यांमध्ये केवळ उजव्या
हाताच्या अंगठ्यावरून भविष्य पाहणारे होराभूषण बाबा अमरनाथ, जनमहाकवी खग्रास
सूर्यभेदी! अशी अनेक माणसं भेटतात इथं. किडनी विकणारा दुबेही
इथंच राहायचा.
या कादंबरीला सलग असं एक कथानक नाही. तुकड्या-तुकड्याने ती पुढं सरकत राहते.
पण या प्रत्येक तुकड्याला सांधणारा दुवा म्हणजे पोपटराव. हा प्रत्येक तुकडा
अस्वस्थ करणारा. आपल्या लोकशाहीबद्दल आणि पिळवणूक करणाऱ्यांबद्दल संताप निर्माण
करणारा. वांझ संताप.
खादीशुभ्र, अटारणे असे शब्द; ‘मंत्रालय ते आमदार निवास हाच खरा दलाल
स्ट्रीट’ अशी विधानं. भाषा वेगळी, भन्नाट. मंत्रालयाचा अख्खा
परिसर उभा राहतो डोळ्यांपुढे. ‘ग़म तो इसका है, ज़माना है
कुछ ऐसा खरिदरा। एक मुज़रिम दुसरे मुज़रिम को कहता है बुरा...’, ‘शुक्रिया ऐ मेरे कात़िल, ऐ मसिहा मेरे। जहर जो
तूने दिया, वो दवा हो बैठा...’ अशा पानापानावरच्या ओळी.
नायकाची मन:स्थिती दाखवतात त्या. शि. द. फडणीस यांचं
मुखपृष्ठ बेफाम. टोकाचा उपहास हसवतो आणि दगड झालेल्या मनावर एकेक ओरखडाही उठवत
राहतो.
...
(पूर्वप्रसिद्धी
: दि. २० जून २०१०)
या मनस्वी लेखकाला भेटायला हवं होतं. आता काय?... राहून गेलं.
उत्तर द्याहटवा- सुभाष नाईक.