Friday, 26 July 2019

एका लेखकाचा मृत्यू


मधल्या काळात बरेच दिवस माझ्या इ-मेलची सिग्नेचर दोन ओळींची होती. नंतर ती बदलली. त्या ओळी फार नकारात्मक वाटतात. शक्य असतील तर बदलाव्यात, असं एकानं सुचवलं म्हणून. त्या जागी नवीन काही आलं नाही.


सर से सीने तक कही, पेट से पाव तक कही
इक जगह हो तो कहें, दर्द इधर होता है...

ओळी कुठून घेतल्या होत्या, हे पक्कं माहीत आहे. पुरुषोत्तम बोरकर यांच्या लिखाणातलं आणि मनाला भिडलेलं होतं ते. हे त्यांच्या पुस्तकात आहे की, त्यांनी पाठविलेल्या कुठल्या इ-मेलमध्ये, ते शोधावं लागेल. सिग्नेचरमधल्या त्या ओळी उडवल्या. मनातून काही खोडल्या गेल्या नाहीत.

ही गोष्ट शुक्रवारची (दि. १९ जुलै). फेसबुक पाहत असताना पुस्तकांशी संबंधित गटात एका तरुणानं आपली इच्छा व्यक्त केली होती – मला पूर्ण वेळ लेखन करून जगायचं आहे. शक्य आहे का ते?

त्यावर प्रतिक्रिया देण्याची इच्छा झाली - मराठीत तूर्तास तरी असं काही संभवनीय नाही. लिहिण्याची हौस वगैरे ठीक. पण मराठीत लिहून पोट भरण्याची खात्री नाही... असंच लिहायचं होतं. तेवढ्यात खालच्या काही प्रतिक्रिया पाहिल्या. एक-दोघांनी त्याचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला होता. चेतन भगत वगैरे नावे देऊन. पण बऱ्याच प्रतिक्रिया माझ्या मताशी जुळणाऱ्याच होत्या.

पुस्तकप्रेमींच्या गटातून बाहेर पडलो. डोळ्यांसमोर पुढची पोस्ट आली ती पुस्तकाशी संबंधितच. पुरुषोत्तम बोरकर यांच्या निधनाची (वाईट) बातमी देणारी. खरं तर त्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये आलेली ही बातमी वाचली नव्हती. आणि दुपारचं जेवण करून थोडं निवांत म्हणून बसलो असताना, ही बातमी. हादरलोच.

सुन्न व्हायला झालं. ते दुखणं पुन्हा फणा काढून वर आलं! वेदना होतीच. कुठे होती, किती होती, कशी होती... हे नाही सांगता येणार. बोरकर यांच्या बोलण्यातून ती अधूनमधून जाणवायची. त्यांच्या विनोदाच्या, उपहासाच्या, टवाळीच्या लिहिण्यातून हा आपादमस्तक व्यापून राहिलेला दर्द पाहिलेला आहे.

आठवायला लागलो, बोरकरांशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं ते? फार दिवसांपूर्वी. किमान वर्षभरात तरी त्यांच्याशी संवाद झाला नव्हता. फोनवरून नाही किंवा इ-मेलवरूनही. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात का कुणास ठाऊक, त्यांची आठवण झाली होती. करू नंतर फोन म्हणून हातात घेतलेला फोन बाजूला ठेवून दिला होता तेव्हा.

शेवटचं बोलणं खरंच कधी झालं होतं? बोरकरांचं वऱ्हाडी गोडव्याचं बोलणं कधी ऐकलं होतं? मग आठवलं की, पत्नीची तब्येत कशी आहे, हे विचारण्यासाठी मध्यंतरी कधी तरी त्यांना फोन केला होता. कर्करोगाशी चालू असलेली झुंज अखेर संपल्याचं त्यांनी तेव्हा सांगितलं. त्यानंतर एक-दोनदा बोललो असू आम्ही कदाचित. इ-मेलवरून संवादही खूप महिन्यांपूर्वी झाला. एवढ्यात तर त्यांची इ-मेल नाही किंवा कुठल्या लेखनावर प्रतिक्रियाही नाही. या दीड वर्षामध्ये एवढं लिहिलं आणि त्यातल्या कुठल्याच लेखनावर त्यांना व्यक्त व्हावं वाटलं नाही? त्यांची एखाद्या ओळीचीही प्रतिक्रिया आली नाही, हे लक्षात कसं आलं नाही?

सध्या काय चालू आहे, नवीन संकल्पना काय आहे, हेही बोरकर यांनी एवढ्यात कळवलं नव्हतं. नवीन काही हाती लागलं किंवा कल्पना सुचली की, ते उत्साहानं फोन करून सांगत. बरोबर वर्षापूर्वी आलेली त्यांची इ-मेल. त्यात एवढंच विचारलं होतं – मोबाईल नंबर बदलला काय? कृपया नवीन नंबर कळवा. काही मायना नाही, एखाद-दोन काव्यपंक्ती नाहीत. काळजाला हात घालणारा शेर नाही. बोरकरांचीच इ-मेल होती का ती?

न राहवून मोबाईलमध्ये असलेला बोरकर यांचा क्रमांक काढला. कोण कुणाचं सांत्वन करणार? फोन कोण घेईल बरं - घेईल की नाही? काही बोलेल की बोलणार नाही? बोरकरांचे चिरंजीव केदार यांनी फोन घेतला. काय झालं, कसं झालं... सगळं काही सांगितलं. नाव सांगितल्यावर त्यांनी ओळखलंही. मुंबई-पुण्यातून, महाराष्ट्रातून कुठून कुठून फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं. खूप वेळ बोललो. बऱ्याच आठवणी. बोलताना कळलं की, गेल्या वर्षभरापासून ते इ-मेल वगैरेपासून थोडं लांबच होते. डोळ्यांचा त्रास होता काही तरी. बोरकरांना बुधवारी रात्री आठ-साडेआठच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. तीव्र झटका. सगळा दहा-पंधरा मिनिटांचा खेळ! रुग्णालयात न्यायलाही जमलं नाही. कुणाला काही न सांगता, निरोपही न घेता एक लेखक सहजपणे निघून गेला.

पुरुषोत्तम बोरकर नावाच्या भन्नाट लेखकाची ओळख होण्याचा योग होता नशिबात! त्याला जून-जुलैमध्ये बरोबर नऊ वर्षं झाली. निमित्त ठरलं एक छोटा लेख. पुस्तकांविषयी आठवड्याला लिहीत होतो. संग्रहात असलेली पुस्तकं. त्यांचा साधा परिचय. तो वाचल्यावर पुस्तक पाहायची-चाळायची, वाचायची इच्छा व्हावी असा. गाजलेली पुस्तकं घ्यायची नाहीत. या आठवड्यात कोणत्या पुस्तकावर लिहायचं बुवा, असा प्रश्न डोक्यात घोळत असताना, कधी तरी घेऊन ठेवलेलं आमदार निवास रूम नं. १७५६ हाताला लागलं. शरण तुला, दलाला!’ या शीर्षकानं लेख २० जून २०१० रोजी प्रसिद्ध झाला.

तोपर्यंत साधारण २०-२२ पुस्तकांवर लिहून झालं होतं. सनसनाटीबद्दल लिहिल्यावर श्री. ल. ना. गोखले यांनी इ-मेलवरून चौकशी केली होती. बाकी कुणी नाही. आमदार निवासबद्दल लिहून झाल्यानंतर दोन दिवसांनी कार्यालयात कुणी तरी सांगितलं, तुझ्यासाठी बोरकरांचा फोन आला होता. नुसत्या आडनावावरून काही कळलं नाही. त्यांनी आपला क्रमांकही दिला नसावा. दिला असला, तरी तो लिहून घेण्याची तसदी संबधिताने घेतली नसेल बहुतेक.

दुसऱ्या दिवशी कार्यालयात आल्यावर तासाभरात फोन आला. कुलकर्णीसाहेब... नाही का मी पुरुषोत्तम बोरकर बोलतोय. तुम्हाला माझी इ-मेल मिळाली ना? भाऊ, काय सुंदर लिहिलं हो तुम्ही पुस्तकावर!’ साक्षात लेखकाचा फोन. पसंतीची दाद देणारा. पण त्यांची इ-मेल मिळाली नव्हती. नंतर ती मिळाली, तर ते पत्र जोडलं गेलेलं नव्हतं. दोन-तीन फोननंतर आणि साधारण आठवड्याच्या प्रयत्नांनंतर इ-मेल आली. अडचण येऊ नये म्हणून सोबत फाँटची सगळी माहिती असलेलं जोडपत्र.

पत्राचा मायनाच अक्षरस्नेही होता. कृत्रिम वाटणारं विशेषण. मुद्दाम जोडलेला शब्द वाटावा. थेट भेटीत लक्षात आलं की, हे विशेषण अकृत्रिम स्नेहातून आलं होतं. आपलं पुस्तक कुणा एकाला आवडलं आणि त्याला त्यावर लिहावं वाटलं, याचा आनंद बोरकरांना लपविता आला नव्हता. रसिकराज वाचक म्हणून त्यांनी गौरव केला. फोन नंबर आणि घरचा पत्ताही विचारलेला. नवी कादंबरी १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी त्यांनी प्रकाशकाकडे दिली होती. ती दोन महिन्यांत प्रकाशित होणार होती. तिची प्रत पाठविण्यासाठी पत्ता हवाच. मेड इन इंडिया वाचली का? नसेल तर तीही कुरीअरने पाठवून देतो, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यांच्या या इ-मेलला जुलैला उत्तर दिलं. एका पत्रकारानं नाही, तर भारावलेल्या, लेखक-भक्त वाचकानं जसं लिहावं तसं.

बोरकर तेव्हा पुण्यातच होते. पिंपळे सौदागरला मुलासह राहत होते. केदार तिथं नोकरी करीत होता. फोनवर विचारून एक दिवस लेखकमहोदय थेट कार्यालयात हजर झाले. सिटी बसने एवढा लांबचा प्रवास करून. आपल्या चाहत्याला भेटण्यासाठी म्हणून. साधा शर्ट-पँट, जॅकेट. डोळ्यांना चष्मा. चष्म्याआडून चमकणारे डोळे. त्यात खूप कुतुहल. गोल चेहऱ्यावर दिसणारी आपुलकी नि हसू. खांद्यावर अडकवलेली शबनम. खूप जुनी ओळख असल्यासारखं बोलले ते. संपादकांची ओळख करून देतो म्हणालो, तर ते काही उत्सुक दिसले नाहीत. तुम्हालाच भेटायला आलो, म्हणाले. एक लोकप्रिय लेखक संपादकाची ओळख करून घेण्यासाठी आसुसलेला नव्हता.

अधूनमधून फोन चालू राहिले आमचे. एके दिवशी बोरकरांनी धक्का दिला. नवी कादंबरी तुम्हाला अर्पण करतोय, असं त्यांनी सांगितलं. अरेच्चा! हा सगळाच अनुभव माझ्यासाठी नवीन. १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारीच्या अर्पणपत्रिकेचं प्रूफ त्यांनी पाठवलं. त्या चौघांमध्ये मी एक. पहिल्यांदाच अर्पणपत्रिकेत नाव. तेही भन्नाट, वेगळं लिहिणाऱ्या लेखकाच्या पुस्तकात. काही दिवसांनी त्यांनी कादंबरीही पाठवली. ती अर्थातच एका बैठकीत वाचून झाली.

यथावकाश बोरकर कुटुंबानं पुणं सोडलं. मीही स्वगृही परतलो. इ-मेलवरून संपर्कात होतो. अधूनमधून बोरकरांचा फोन येई. कधी कुलकर्णीसाहेब, तर कधी आहात का राजे जागेवर!’ असं मिठ्ठास भाषेत विचारत. बोलताना बरं का भाऊ, तुम्हाला वाटेल की, हा बोरकर काईचा काई सांगून राह्यलाय बरं... असं सगळं खास वऱ्हाडी हेलात असे. खूप वेळ फोन चालत आमचे. पुस्तक लिहिण्याचा आग्रह करत ते.

अस्वस्थतेतून आम आदमीच्या कविता लिहिण्याचा नाद लागला. चालू घडामोडींवर टीका-टिप्पणी, कवितेच्या शैलीत. त्याचं पद्यासारखं वाटणारं गद्य असं नामकरण केलं. अशाच एकदा बारा-चौदा रचना बोरकरांना वाचण्यासाठी इ-मेलवरून पाठवून दिल्या. त्या सगळ्या एका बैठकीत वाचून त्यांनी रात्रीच कधी तरी फोन केला. त्यांनी केलेल्या कौतुकानं अक्षरश: भारावून जायला झालं.

सविस्तर प्रतिक्रिया कळविण्यासाठी बोरकरांनी जून २०१३ रोजी इ-मेल पाठविली.
अहले-जुबाँ भी आखिर गूंगे बने हुए है
जिंदा रहेंगे कब तक मुर्दा जमीर लेकर...
असं लिहीत त्यांनी भरभरून कौतुक केलं होतं. या रचनांमधून जनतेच्या दुःखनाडीवर बोट ठेवले आहे, असं लिहितानाच आणखीही काही अतिशयोक्त असणारी (वाटणारी नव्हे!) विशेषणं अस्मादिकांबद्दल वापरली होती. अहले-जुबाँ म्हणजे सरस्वतीपुत्र, असा अर्थ त्यांनीच त्यात दिला.

बोरकरांनी पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव केला होता. त्या खुशीतच त्यांचं हे कौतुकपत्र काही जणांशी शेअर केलं. ते वाचून कवी संजय बोरुडे यांनी लिहिलं – मेड इन इंडियाआमदार निवाससारख्या पुस्तकांनी बोरकरांनी मराठी साहित्याला अस्सल देशी लेणे बहाल केले आहे. त्यांची दाद म्हणजे आपल्या लेखणीचा अजोड सन्मानच!

एव्हाना बोरकरांना काही अडचणी जाणवू लागल्या होतं, असं जाणवलं. नव-नायकांच्या चरित्रलेखनाचं, पुस्तकांचं शब्दांकन करून देण्याचं काम ते करीत. तुमच्याकडे साखर-सम्राट, सहकार-सम्राट भरपूर आहेत हो. एखादं काम असेल त्यांचं तर सांगा हो भाऊ मला, असं म्हणत ते. पत्रकार म्हणून माझ्याबद्दल त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या. एखाद्या स्वप्निल कवी-लेखकासारख्याच. अचानक त्यांनी १९ ऑगस्ट २०१३ला इ-मेलमधून चार वात्रटिका पाठविल्या. सध्याचं लेखन म्हणून.
कोनाड्यातील हे दीपस्तंभ
हे विजेरीतले दिवे
खुराड्यातच झेपा घेती
हे गरुडांचे थवे
ही वात्रटिका निवडणुकीच्या काळात लिहीत असलेल्या एका सदरात वापरली. त्यांना तसं कळवलंही.

माझं पहिलं पुस्तक जून २०१४मध्ये प्रसिद्ध झालं. त्याची प्रत पुरुषोत्तम बोरकर यांना न पाठवणं शक्यच नव्हतं. पुस्तक मिळाल्याबरोबर ते वाचून त्यांनी ११ जूनला लगेच इ-मेलनं पत्र पाठवलं. अक्षरस्नेही सतीशभाऊ अशी सुरुवात करून त्यांनी लिहिलं होतं – पहिलं पुस्तक कुरवाळण्याचा आनंद काही औरच असतो. अवर्णनीय असतो. या तुमच्या आनंदात मीही मनापासून सहभागी आहे. एका नवोदित लेखकाला आपल्या बिरादरीत किती सन्मानानं सामावून घेण्याचा हा प्रयत्न. केवढी आपुलकी. पुढं त्यांनी लिहिलं की, तुम्ही दुसऱ्यांच्या व्यथावेदनांनी छिन्न-खिन्न होत असता. पोतराज होऊन चाबकाचे फटके आपल्या हाताने आपल्याच पाठीवर मारून घेत असता. पण इलाज नसतो. याबाबतीत एक शेर आठवतो :
ये कहना हमने ही, तूफाँ में डाल दी कश्ती
कसूर अपना है, दरिया को क्या बुरा कहना...

असं कौतुक करून झाल्यावर बोरकर मग आपल्या मूळ स्वभावाला साजेसं लिहितात – पहिले अपत्य दणदणीत झाले. मात्र याबाबतीत नियोजन वगैरे करू नये! म्हणून मैत्रीप्रीत्यर्थ अशा शुभेच्छा देतो की, किमान अष्टपुस्तकी लेखक भव:’. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. पुस्तकावर त्यांनी मोठा लेख लिहिला आणि तो २८ जून रोजी इ-मेलने पाठविला. का कुणास ठाऊक, त्या इ-मेलचा मायना रिस्पेक्टेड सर असा होता. त्याच्या दुसऱ्याच रात्री दीर्घ काळ आमचा फोन चालला. पत्राला उत्तर न दिल्यामुळं नाराजी जाणवली. पण बहुतेक सगळं बोलणं जगण्यातल्या अडचणींबद्दल चाललं होतं.

पुस्तकाच्या वेळी बोरकरांमधल्या बेरकी, अनुभवी, जाणत्या लेखकानं एक सल्ला दिला - आता एक प्रकाशन डायरी आणा. त्यातली पुरस्कारांची यादी पाहा. प्रत्येकाला द्या एक एक पुस्तक पाठवून... हां, अजिबात लाजायचं नाही. त्यांचा हा सल्ला पाळला नाही.

पु. ल. देशपांडे आणि बोरकर.
त्यांच्या स्मार्ट फोनच्या डीपीवरून घेतलेलं हे छायाचित्र.
मेड इन इंडियाबद्दल मी काय लिहावं! एवढं नक्की की, ती हातात घेतल्यावर पूर्ण वाचूनच खाली ठेवली. तिचा नायक पंजाबराव. त्याला जगण्यात विलक्षण रस आहे. क्रिकेट, राजकारण, सिनेमा, संगीत, साहित्य, वृत्तपत्रं, लेखन-वाचन…. सगळ्यांमध्ये त्याला रुची आहे, गती आहे. त्याच्या बोलण्यावरून ते समजतं. बोरकर यांची तीन-चार वेळा भेट झाल्यावर आणि खूप वेळा फोनवर बोलल्यामुळं आता वाटतं की, पंजाब म्हणजे खुद्द पुरुषोत्तम बोरकर असावेत! तेच हजरजबाबी बोलणं, त्या कोट्या, ते व्यथित होणं, ती जुनी गाणी, ते शेर...

बोरकराचं स्वतंत्र लेखन गेल्या काही वर्षांत जवळपास थांबल्यासारखं झालं होतं. वृत्तपत्रातली नोकरी त्यांनी केव्हाच सोडली होती. केवळ लेखनावर जगत होते ते. चरित्रात्मक पुस्तकांचं शब्दांकन करीत. त्यासाठी त्यांची अपेक्षाही कधीच मोठी नव्हती. बरं का सतीशभौ, आपल्याला काय, महिन्याला २०-२२ हजार रुपये मिळाले तरी बास. शबनम गळ्यात अडकवून, पेन-ड्राइव्ह खिशात ठेवून ते खामगावहून पुण्याला अधूनमधून चक्कर मारत. अशातच त्यांच्या पत्नीला कर्करोग झाला. नित्य उपचार मोठे खर्चिक होते. त्या चिंतेनं त्यांना दीर्घ काळ पिडलं. उपचारासाठी मदतीचं आवाहन करणारी बातमीही प्रसिद्धीसाठी पाठविली होती. पण त्यातून काहीच साधलं नाही. लेखकाच्या डोक्यावरचं चिंतेचं ओझं कमी झालं नाही. मन असं थाऱ्यावर नसताना, तेव्हाही त्यांच्या डोक्यात कॅन्सरचे दिवस असं पुस्तक लिहिण्याची कल्पना घोळत होती.

चरित्र लिहिता येईल, अशी दोन माणसं मला नगरमध्ये आढळली. नगरमधल्या महनीय व्यक्तींची ओळख करून देणारं एक पुस्तक पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. उपयोगी पडेल म्हणून त्याची प्रत बोरकरांना पाठवून दिली. त्यातल्या एकाला भेटायला म्हणून ते नगरमध्ये आले होते. थकलेले, दमले-भागलेले, काही तरी हरवलेले. घरी आले. तासभर बसले. गप्पा मारल्या. खरं तर त्यांच्या त्या नगरच्या मुक्कामात मैफल रंगवायची होती. त्यांचं लेखन मनापासून आवडणाऱ्या तिघा-चौघांना सांगितलं होतं. पण बोरकरांना असं काही नको होतं. नको. कुणाला बोलवू नका. मी तुमच्या घरी येईन, थोडा वेळ बसेन, थोडं काही खाईन आणि माझ्या कामाला जाईन, असं त्यांनी स्वच्छ शब्दांत सांगितलं.

नगरमधली दोन कामं त्यांना मिळाली नाहीत आणि दोन मिळाली. लेखनाचं पूर्ण झालेलं काम द्यायला ते येणार होते. आले असणारच. पण न भेटताच गेले. त्या पुस्तकाची त्यांनी सांगितलेली रक्कम पुरुषोत्तम बोरकर नावाला न्याय देणारी नव्हती. काही वेळा तर शब्दांकनाचं श्रेय देणंही टाळल्याचं त्यांनी एकदा व्यथित होऊन सांगितलं होतं.

स्वातंत्र्यानंतर खेड्यातली बदललेली मूल्ये आणि खेड्यांनी गमावलेली स्वतःची ओळख, याची कथा मेड इन इंडियामध्ये ओघवत्या शैलीत, बोचकारत, हसवत, उपहास करीत मांडली आहे. एका वेगळ्या धाटणीची कादंबरी. ती लिहिणाऱ्या बोरकरांना लेखक म्हणून स्वतंत्रपणे जगायचं होतं. त्यासाठी त्यांनी एका राजकीय पक्ष-संघटनेच्या मुखपत्राच्या संपादनाची स्वीकारलेली जबाबदारीही तीन-चार महिन्यांतच सोडून दिली. बोरकरांनी लेखक म्हणून तीन कादंबऱ्यांच्या माध्यमातून खूप काही दिलं. त्यांना काय मिळालं?

फक्त आणि फक्त लेखनाच्या बळावर जगण्याच्या लेखकाच्या त्या बाण्याचं, स्वप्नाचं काय झालं, याचं विदारक वास्तव समोर आहे. एका इ-मेलमध्ये बोरकरांनी लिहिलेला हा शेर त्यांनाच केवढा लागू पडतो -
झुकता नही तो काट दे सर मेरा जिंदगी
मुझसे मेरे गुरूर की कीमत वसूल कर...
...
(अवश्य वाचा - शरण तुला, दलाला!’ - https://khidaki.blogspot.com/2019/07/AamdarNiwas.html)

17 comments:

 1. बोरकर यांचं शब्दचित्र छान रेखाटलं आहे. त्यांचं फारसं काही वाचलेलं नसतानाही, ते खूप माहितीतले आहेत, असं वाटतं राहतं. तुमची शैली छान आहे.
  - विनय गुणे, संगमनेर

  ReplyDelete
 2. So touching! तुमच्या शब्दांत जादू आहे. चित्रं दिसायला लागतात...
  - अॅड. स्वप्निल जोशी, औरंगाबाद

  ReplyDelete
 3. कठीण भलतेच लिहिणे, त्याहून कठीण मृत्युलेख लिहिणे...

  एका बहुआयामी लेखकाच्या जीवनाचा आढावा घेणारा अतिशय ओघवत्या भाषेतील तुझा लेख म्हणजे मृत्युलेख कसा असावा, याचं उत्तम उदाहरण आहे.

  पुरुषोत्तम बोरकर यांचं लेखन, पुस्तकं माझ्या वाचनात नाही आली. पण तुझ्या या लेखाने त्यांच्या लेखनाबाबतची उत्सुकता चाळवली, हे नक्की. मराठी लेखकांची अवस्था, अस्वस्थती ही विदारकता तू मनाला भिडणाऱ्या शब्दांत मांडली आहेस...

  तू ज्या पद्धतीने बोरकरांचं जीवन आणि त्यांच्या लेखनाबद्दल लिहिले आहेस, त्याबद्दल 'हॅट्स ऑफ टू यू..!'
  - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

  ReplyDelete
 4. खूपच जिव्हाळ्यानं लिहिलं आहे. बोरकरांची अस्वस्थता आणिा वेदना जाणवते. तुमचं-त्यांचं नातंही सहजपणे उलगडत जातं. अशी माणसं आयुष्य समृद्ध करतात.
  - माधवी कुंटे, मुंबई

  ReplyDelete
 5. लेख आवडला. लेखकास आपल्याबद्दल असलेले प्रेम, स्नेह व आपुलकी जाणवते. वाचून नि:शब्द झालो.
  - वसंत कुलकर्णी, पुणे

  ReplyDelete
 6. भाऊ... मन उद्विग्न करणारा प्रवास! झुकता नही तो काट दे सर मेरा जिंदगी...
  - चंद्रकांत कुटे, मुंबई

  ReplyDelete
 7. पुरुषोत्तम बोरकर हे अतिशय चांगले लेखक होते. सर्जनशील लेखनाला सन्मान नसला, तरी किमान प्रतिष्ठाही मिळत नाही हे वेळोवेळी दिसतं. याचा बोरकरांना त्रास झाला असणं स्वाभाविक आहे, त्याचा परिणाम त्यांच्या उपजीविकेवर आणि आपोआपच जगण्यावर झाला, याचं खूप दुःख होतं. वाईट झालं.
  अवधूत

  ReplyDelete
 8. लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचीच नसून मराठी, मराठी लेखकांची होत असलेली अवहेलना आपल्या लेखातून दिसून येते.
  - श्रीराम वांढरे

  ReplyDelete
 9. हा मृत्युलेख नसून जीवनलेख आहे. बोरकरांच्या साहित्याबद्दल फारशी माहिती नसणार्‍या वाचकाला त्याबद्दल कुतूहल आणि ते वाचायची इच्छा जागृत करण्याची ताकद तुमच्या लेखात आहे. त्यामुळेच अक्षरस्नेही ही उपाधी तुम्हाला लाभली असावी.
  मराठीची अक्षरे मेळवण्याची हातोटी तुम्हाला आहेच.
  असंच लिहीत चला. पण शक्यतो असल्या माणसांच्या हयातीत म्हणजे त्यांना भेटण्याची संधी हुकल्याची चुटपुट कमी होईल.

  ReplyDelete
 10. बऱ्याच दिवसांनंतर एक उत्तम लेख वाचनात आला. मराठी लेखकांची अवस्था खरंच दयनीय आहे. लेख मात्र झक्कास!
  - दिलीप वैद्य, पुणे

  ReplyDelete
 11. दारव्हेकरांचं नाव, बाकीबाबचं आडनाव असलेला हा लेखक तुमच्यामुळे कळला. हृदयस्पर्शी झालाय लेख. त्यांच्या पुस्तकांची नावं लिहून घेतलीत. अवश्य वाचेन.
  - प्रियंवदा कोल्हटकर, मुंबई

  ReplyDelete
 12. मराठी साहित्य जगतात स्वतंत्र पाऊलवाट निर्माण करणारे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांच्या लेखातून आपल्या सारखाच "सगळ्यात राहून रंग माझा वेगळा"जपणाऱ्या लेखकातील वास्तववादी माणसाचे दर्शन घडले. अभिनंदन उपचार ठरेल, खूप चांगला लेख.

  ReplyDelete
 13. अप्रतिम लेख. मराठीत एवढा उत्तम लेखक होऊन गेला आणि आपण वाचलाच नाही ही दुर्दैवी जाणीव झाली. त्यांची पुस्तकं नक्की वाचेन.
  - प्रसन्न करंदीकर

  ReplyDelete
 14. आपला लेख वाचला . व्यक्तिचित्रण उत्तम आहे. माझे मराठी साहित्य वाचन खूप कमी असल्याने मला श्री. बोरकर यांची काहीच माहिती नव्हती; ती आपल्या ब्लॉग मुळे मिळाली.

  केवळ लेखनावर चरितार्थ चालविणे,आपल्या प्रादेशिक भाषांत जवळ जवळ अशक्यच आहे. अपवाद वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे यांचा. कदाचित काही वृत्तपत्रीय स्तंभलेखकांना शक्य असेल. बहुतेक सर्व लेखक 'स्वान्त सुखाय' लिहितात , थोडा पैसे मिळाल्यास उत्तमच!!

  इंग्रजी स्तभलेखक शोभा डे, खुशवंत सिंग यांना पैसे भरपूर मिळत होते. कारणे वेगळी आहेत.
  - अशोक जोशी, बंगळुरू

  ReplyDelete
 15. फारच छान लेख...
  So touching....

  ReplyDelete
 16. लेख चांगला झाला आहे. वाचायला पुरुषोत्तम बोरकर नाहीत, हेच वाईट.

  पहिल्या लॉकडाउन काळात मुंबईला असताना शंकर सारडांचे 'शब्दधन' पुस्तक ग्रंथालयातून आणले होते. त्यात 'आमदार निवास... चा परिचय होता. ग्रंथालय उघडल्यावर ते पुस्तक प्रथम आणायचे, अशी मनाने नोंद घेतली पण अद्याप ग्रंथालये उघडली नाहीत. आणि मला पुस्तक वाचता आले नाही. आपल्या लेखामुळे त्यांच्या सर्वच पुस्तकांबद्दल उत्सुकता वाटू लागली. पुस्तके वाचायला मिळतील, पण लेखक बघायला मिळणार नाही, ही खंत आहे.

  तुम्ही अतिशय आत्मीयतेने, आदराने, जिव्हाळ्याने त्याच्याबद्दल लिहिले आहे. यापेक्षा काय लिहू?
  - उज्ज्वला केळकर

  ReplyDelete

अशोकला आठवताना...

अशोक... 'फोन वाजला की भीतीच वाटते. सध्या जगणं म्हणजे अगतिकता, अस्थिरता, अस्वस्थता एवढंच आहे.' व्हॉट्सॲप मेसेजमध्ये स्वातीताईंनी लिहि...