‘इट्स कमिंग होम...’ विश्चचषक अखेर घरी आल्याचा आनंद. (सौजन्य : www.theguardian.com) |
– माईक हेसन
(न्यूझीलंडच्या संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक)
या सामन्याचा खरा निकाल ‘टाय’ असायला हवा होता! वास्तविक इंग्लंड व न्यूझीलंड
दोन्ही संघ समान होते असे दिसले. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हे मान्य करून
हस्तांदोलन करायला हवे, हे खिलाडू उत्तर झाले असते. पण पैसा,
अति देशभक्ती आणि प्रेक्षागारातील गर्जना अधिक ताकदवान ठरल्या.
- सायमन
जेनकिन्स (स्तंभलेखक, ‘द गार्डियन’)
मुख्य सामना व महाषट्क झाल्यानंतरही
दोन्ही संघांमधील फरक ओळखता येत नसेल (त्यांच्यातील विजेता ठरविता येत नसेल) तर
चषक विभागून देणे योग्य होते.
- क्रेग
मॅकमिलन (न्यूझीलंड संघाचे मुख्य फलंदाजी प्रशिक्षक)
...विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील
आजवरचा सर्वाधिक थरारक, श्वास कोंडून धरायला लावणारा अंतिम सामना झाला. इंग्लंडचा
संघ विजेता ठरला. त्या निकालानंतर अनेक जण व्यक्त होत आहेत. प्रतिक्रिया बोलून
दाखवित आहेत. एकूण १०० षट्कांच्या खेळानंतर आणि त्यानंतरच्या महाषट्कानंतर (‘सुपर ओव्हर’) इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात (किंचित
का होईना) सरस कोण याचा निकाल लागला नाही. त्यामुळेच आय. सी. सी.ने स्पर्धेसाठी
बनविलेल्या नियमावलीच्या (Playing Conditions) आधारे निकाल
लावण्यात आला, चषकाचा मानकरी ठरविण्यात आला. ज्याचे चौकार अधिक तो संघ विजेता, अशी
तरतूद त्यात होती. त्यातूनही बरोबरीच साधली गेली असती, तर दोन्ही संघांना संयुक्त
विजेते घोषित करण्यात आले असते. बाद फेरीतील सामना बरोबरीत सुटला तर निर्णयासाठी
काय तरतुदी आहेत, याची चर्चा भारत-न्यूझीलंड उपान्त्य सामन्यात पावसाने व्यत्यय
आणल्यावर झाली होतीच.
सामन्यानंतर मात्र ‘हा रडीचा डाव आहे’ असं म्हणत आयसीसीवर टीका सुरू
झाली आहे. त्यात माजी क्रिकेटपटू, संघटक, पत्रकार, स्तंभलेखक, सर्वसामान्य चाहते
असे सगळेच आहेत. खरंच हा आय. सी. सी.नं खेळलेला रडीचा डाव होता का? आणि तसा तो असेल तर ते आधी कोणाच्या लक्षात का आलं नाही? त्याला आधी कोणी विरोध का केला नाही? स्पर्धेसाठी
बनविलेल्या नियमावलीची १४० पानांची (छोट्या
मासिकाच्या आकाराची) पुस्तिका आहे. कोणत्याही क्रिकेट मंडळाने, खेळाडूने,
तज्ज्ञाने त्यातील तरतुदींवर आधी आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही.
अधिक चौकार मारणारा संघ विजयी, या
तरतुदीबद्दल गौतम गंभीर यानंही त्याच्या तडकफडक शैलीत ट्विट केलं आहे. तो लिहितो, ‘कोणी किती चौकार मारले, यावर एवढ्या महत्त्वाच्या सामन्याचा निकाल कसा
लावला जातो, हेच समजत नाही. आयसीसीचा हा नियमच हास्यास्पद आहे.’ गंभीर आणि अनेक जण आता तावातावाने बोलत आहेत, त्यांना या नियमावलीतील
हास्यास्पद असं काही आधी आढळलं नाही का?
‘क्रिकइन्फो’चे माजी व्यवस्थापकीय संपादक मार्टीन विल्यमसन यांनीही यावर टीका करताना
वेगळं उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलं आहे की, अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडच्या
बाजूने बेटिंग केलेल्या सर्वांचे पैसे ऑस्ट्रेलियाच्या ‘स्पोर्ट्सबेट’ने परत केले! ‘विश्वचषकाचा
विजेता अशा प्रकारे ठर(वि)णं अगदीच लाजिरवाणं आहे. आय. सी. सी.च्या हास्यास्पद आणि
विसंगतीपूर्ण निर्णयाची किंमत बेटिंग करणाऱ्यांना चुकवावी लागू नये, असं (आम्हाला)
वाटतं,’ असं त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
बरोबरीच्या प्रसंगात अंतिम
सामन्याचा निकाल लावण्यासाठी चौकारांचाच नियम का ठेवला? ज्याचे कमी गडी बाद झाले तो संघ विजयी ठरविण्याचा नियम का नाही? चौकार जास्त मारले याचाच अर्थ त्या संघाने अधिक चेंडू निर्धाव म्हणून (‘डॉट बॉल’) खेळून काढले. मग कमी चेंडू निर्धाव
खेळणाऱ्या संघाला विजयी का घोषित करायचे नाही? हे आणि असे
अनेक प्रश्न विचारण्यात आले. नियमावली हास्यास्पद ठरविण्यात आली.
प्रसिद्ध समालोचक हर्ष भोगले यांनी
याबाबत केलेली ट्विट डोळ्यांत अंजन घालणारी आहेत. त्यांनी लिहिलं आहे की, चौकारांच्या
संख्येवर विजेता संघ ठरवणं, हा काही नवा नियम नाही. खूप दिवसांपासून तो आहे.
नियमांमध्ये काही बदल हवे आहेत का, असं संघांना विचारलं जातं, तेव्हा ते आहेत ते
नियम जसेच्या तसे स्वीकारतात. प्रत्येक व्यवस्थेत काही उणे-अधिक असतंच. ते
खेळाडूंना दाखवलं जातं आणि ते मान्य करूनच ते खेळतात. नियमांबद्दल आरडाओरड, त्रागा
करणे सर्वांत सोपं आहे. नियमात तुम्हाला अपेक्षित असलेले बदल करण्यासाठी मेहनत
घेणं मात्र फार कठीण, गैरसोयीचं असतं.
ही स्पर्धा होती आणि तिचा विजेता
ठरवणं आवश्यक होतं. मग तो कोणत्याही मार्गाने का ठरेना! स्पर्धा सुरू होण्याआधी नियम ठरलेले होते. ते काही अंतिम सामन्याच्या
वेळी इंग्लंडची सोय पाहून बनवलेले नव्हते, हे इयान विल्यम्स यांचं ट्विट हर्ष
भोगले यांच्या म्हणण्याला दुजोराच देणारं आहे.
शेवटच्या
चेंडूवर धावबाद आणि विजेतेपद हुकले.
हताश मार्टीन गप्टील आणि त्याची समजूत काढणारा
जिमी नीशम.
(सौजन्य : www.theguardian.com) |
विजयी झालेल्या संघाचं अभिनंदन
करतानाच हरलेल्या संघाचं सांत्वन करण्याला, त्यांच्या खेळाबद्दल दोन कौतुकाचे शब्द
बोलण्याचा प्रघात आहे. ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’
म्हणविलं जाणारं क्रिकेट त्यापासून दूर कसं असेल? इथे तर
नेमकं कोण विजयी याचा निर्णय १०२ षट्कांच्या खेळानंतर न लागूनही चषकापासून वंचित
राहिलेल्या न्यूझीलंडचा संघ होता. त्यामुळेच न्यूझीलंडचं सांत्वन करण्याची लाटच
उसळली.
उपान्त्य सामन्यातील विजयानंतर
किवीजचा कर्णधार केन विल्यमसन यानं भारतीय क्रिकेटप्रेमींची समजूत काढताना अंतिम
सामन्यात पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद
म्हणून की काय, असंख्य भारतीयांचा पाठिंबा न्यूझीलंडला होता. विश्वचषक ‘ब्लॅक कॅप्स’नं जिंकावा असंच त्यांना वाटत होतं. या
इच्छाकल्पित चिंतनाचा भंग झाल्याच्या निराशेमुळंच या प्रतिक्रिया व्यक्त होत
असाव्यात. त्यात राग आहे, टीका आहे, खिल्ली आहे, टवाळी आहे. ‘सामना इंग्लंडनं जिंकला, पण मनं न्यूझीलंडनं!’, ‘तुझ्या विजयाहून शहरात चर्चा तर माझ्या पराभवाचीच अधिक आहे,’ असे डायलॉगही समाज माध्यमातून दिसतात.
इंग्लंडच्या विजयापेक्षा
न्यूझीलंडचा पराभव पचवणं भारतीय चाहत्यांना अधिक जड गेलेलं दिसतं. भारताची अंतिम
फेरीची संधी हुकवणाऱ्या न्यूझीलंडच्या विरोधात आपले क्रिकेटप्रेमी असणं स्वाभाविक
मानलं गेलं असतं. मागच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीयांच्या सदिच्छा
न्यूझीलंडच्या बाजूने होत्या. त्याचं कारण म्हणजे अंतिम सामन्यातला दुसरा संघ होता
उपान्त्य फेरीत भारताला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा. त्या पार्श्वभूमीवर इथं चित्र
उलटंच. साखळीत भारताची विजयी घोडदौड थांबविणारा इंग्लंड संघ समोर होता, हे त्याचं
निमित्त असावं. दीडशे वर्षं राज्य करणाऱ्या इंग्रजांवर आपला राग आहेच. न्यूझीलंडला
दिलेल्या पाठिंब्यातून इंग्लंडबद्दलचा राग, चीड व्यक्त होत असावी का?
विश्वचषकापासून अगदी थोड्या अंतरानं
लांब राहिलेल्या न्यूझीलंडचा खेळ चांगलाच झाला. त्याचं कौतुक व्हायला हवंच. पण ते
कौतुक अशा पद्धतीने केलं जात आहे की, वाटावं इंग्लंडचा खेळ जणू अगदीच भिकार झाला.
त्या दर्जाचा खेळ न करताच त्यांना विश्वविजेतपद मिळालं (किंवा मिळवून दिलं गेलं!) आहे. वस्तुस्थिती तशी नाही. खरं तर न्यूझीलंडच्या अगदी घशात गेलेला हा
सामना इंग्लिश खेळाडूंनी दोन ते तीन वेळा अलगद बाहेर काढला.
ज्यावर विश्वचषक विजेता ठरला, त्या चौकारांचीच
गोष्ट पाहू या. न्यूझीलंडच्या फलंदाजांना १९.२ ते ३४.३ षट्कांच्या दरम्यान एकही
चौकार मारता आला नाही. विसावं षट्क टाकणाऱ्या अदिल रशीदच्या पहिल्या चेंडूवर केन
विल्यमसनने चौकार मारला. त्यानंतर ९३ चेंडूंनंतर तो सीमापार झाला. एवढी कंजूष
गोलंदाजी करणाऱ्यांना, प्रामुख्यानं रशीद व लियम प्लंकेट यांच्या कौशल्याला दाद द्यायला
हवी की नको? तीच गत शेवटच्या ११ षट्कांची. त्यात
न्यूझीलंडला फक्त एक चौकार व एक षट्कार मारायला जमलं. ज्या षट्कांमध्ये धावांची
गती वाढविली जाते, संधी शोधून फटकेबाजी केली जाते, त्या षट्कांमध्ये इंग्लिश
गोलंदाजांनी एवढा अचूक, किवी फलंदाजांना जखडून ठेवणारा मारा केला नसता, तर..?
शिस्तबद्ध, अचूक गोलंदाजी करणाऱ्या
कॉलीन डी ग्रँडहोमनं आपल्या पहिल्याच षट्कात जॉनी बेअरस्टोचा झेल सोडला. किंवा
त्याच्याकडून तो सुटला. त्या वेळी बेअरस्टो १८ धावांवर खेळत होता. त्यानंतर २९
धावांची भर पडल्यावर न्यूझीलंडला दुसरं यश मिळालं. बेअरस्टो आणखी १८ धावा
काढल्यावर बाद झाला. तो झेल ग्रँडहोमनं तेव्हाच पकडला असता, तर..?
न्यूझीलंडच्या डावातली सर्वांत मोठी
७४ धावांची भागीदारी दुसऱ्या जोडीसाठी झाली. बेन स्टोक्स व जोस बटलर यांनी नाजूक
अवस्थेतून संघाला सावरता पाचव्या जोडीसाठी ११० धावा जोडल्या. शेवटच्या काही
षट्कांत अतिशय दमलेला, धापा टाकणारा स्टोक्स धाव पळताना कुचराई करीत नव्हता.
त्याच्या या झुंजार खेळीचं महत्त्व नाही का अजिबात. त्यानं असा झुंजार खेळ केला
नसता, तर..?
दोन्ही संघांची षट्कं आणि धावा याची
तुलना केल्यावर दिसतं की, अगदी पंचेचाळिसाव्या षट्कापर्यंत इंग्लंड न्यूझीलंडहून
मागंच होतं. शेवटून दुसऱ्या षट्कात नीशमच्या गोलंदाजीवर स्टोक्सने मारलेला फटका
ट्रेंट बोल्टच्या हातात गेला. तेव्हा त्याला तोल सावरता आला नाही आणि त्याचा पाय
सीमारेषेवर पडला. त्यानंतर स्टोक्सने २२ धावा कुटल्या. हा झेल झाला असता, तर..?
वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्राथवेटचा
झंजावात पाहता न्यूझीलंडचा साखळी सामन्यातला पहिला पराभव तिथेच झाला असता. त्या
वेळीही नीशमच्याच गोलंदाजीवर शेवटून दुसऱ्या षट्कातच बोल्टनेच त्याचा सीमारेषेवर
अफलातून झेल घेतला होता. तेव्हाही असाच तोल गेला असता, तर..?
क्रीजमध्ये
पोहोचल्यानंतर आपण हे हेतुत: केलं
नाही असं स्पष्ट करीत बेन स्टोक्सने
केलेली कृती माफी मागणारी होती.
(सौजन्य : www.cricket.com.au)
|
मार्टीन गप्टीलने केलेली फेक
स्टोक्सच्या बॅटला लागून चेंडू सीमापार गेला. यात स्टोक्सचा तसा काहीच दोष नव्हता.
तसं त्यानं लगेच हातवारे करून स्पष्टही केलं. एवढंच काय चेंडू सीमेकडं जात असताना
दोन्ही फलंदाज धावले नाहीत. या चेंडूवर पाचऐवजी सहा धावा देण्याची चूक पंचाकडून
झाली. त्यात ना स्टोक्स सहभागी होता ना त्याचा संघ. पंचांची ही चूक म्हणजे निर्णय
घेण्यातली त्रुटी होती, असं ती दाखवून देणारे माजी पंच सायमन टॉफेल म्हणतात. ही एक
धाव कमी गेली असती, तर न्यूझीलंड जिंकलंच असतं असं मानायला तेही तयार नाहीत. ‘ओव्हर-थ्रोचा चौकार देऊ नका; पळून काढल्या तेवढ्याच
दोन धावा असू द्या,’ अशी विनंती स्टोक्सनं पंचांना लगेचच
केल्याचं बेनचा सहकारी जेम्स अँडरसन यानं नंतर सांगितलंच. (आपण असं काही केलं/सांगितलं नाही, असा खुलासा नंतर स्टोक्सनं केला.)
थोडक्यात ही सगळी ‘असं झालं असतं तर...’ आणि ‘तसं
झालं नसतं तर...’ या पद्धतीची कहाणी आहे. स्पर्धेची न पटणारी
नियमावली, काही घडलेल्या आणि काही बिघडलेल्या गोष्टी यावर चर्चा चालूच राहणार.
वास्तव एवढंच आहे की, इंग्लंडनं
सामना जिंकला आहे. न्यूझीलंडपेक्षा आठ चौकार अधिक मारून. इंग्लंडनं पहिल्यांदाच
विश्वचषक जिंकला, हेच खरं. अगदी नेमकेपणानं आणि समालोचक व माजी क्रिकेटपटू ईशा
गुहा हिच्या शब्दांचा आधार घेऊन सांगायचं, तर इंग्लंडच्या पुरुष संघाने
पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला, हेच सत्य आहे!
...
स्पर्धेतील
सर्वोत्तम खेळाडू केन विल्यमसन. सचिनच्या हस्ते त्यानं हे उत्तेजनार्थ पारितोषिक
स्वीकारलं.
(सौजन्य : www.dnaindia.com)
|
पुरस्कार देऊन सांत्वन?
स्पर्धेतील
सर्वोत्तम खेळाडू म्हणून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याची निवड झाली. एकूण
परिस्थिती पाहिली, तर न्यूझीलंडचं सांत्वन करण्यासाठी म्हणून त्याची निवड झाली
असावी, अशी शंका यावी. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विल्यमसन
(एकूण धावा ५७८) चौथा आहे. स्पर्धेत पाच शतकं झळकाविण्याचा विक्रम करणारा रोहित शर्मा (६४८)
पहिल्या क्रमांकावर आणि त्याच्या पाठोपाठ डेव्हिड वॉर्नर (६४७) आहे. बांगला देशाचा
शकीब अल हसन याच्या धावा ६०६ आणि बळी ११. अगदी अफलातून अष्टपैलू खेळ. इंग्लंडच्या
पहिल्या आणि शेवटच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या स्टोक्सनं ४६५ धावा केल्या
आणि सात बळी घेतले. क्षेत्ररक्षण करतानाही तो उठून दिसला. पण स्पर्धेचा नायक
ठरण्याऐवजी हा खेळाडू खलनायक म्हणविला गेला! रोहित, वॉर्नर व शकीब यांचा विचार का झाला नाही, हे कधीच कळणार नाही.
खिलाडू वृत्ती व चतुरस्त्र नेतृत्व यामुळे विल्यमसनचं पारडं अधिक जड झालं, असं
पारितोषिक वितरण करताना सांगण्यात आलं. मैदानावर खेळाडू वृत्ती दाखविणं अपेक्षितच
आहे. ती दाखविली नाही, तर कारवाई होते. नेतृत्वगुणाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर
विल्यमसन उजवा होता; पण तो इतरांहून फार प्रतिभावान होता,
असं सिद्ध करणाऱ्या खूप काही गोष्टी नाहीत.
तिन्ही तज्ञांशी मी सहमत आहे.वर्ल्ड कप सारखा खेळ आणि गल्ली पातळीवरचा नियम स्पर्धेची लाज घालवणारा ठरला.
उत्तर द्याहटवाजर तर... खुपच तपशीलवार आणि मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं असणारं...
उत्तर द्याहटवामुळात व्यवहारात जर असं झालं असतं तर अशा कपोलकल्पित बाबींना काहीही किंमत नसते, असं आमचे गुरू सांगतात. पण आपलं मन वेडं आहे, ते स्वप्नरंजन सोडत नाही. न्युझीलंडला अनुकंपा मिळण्यात आपला साहेबांवरचा राग आहेच!
जर हा अंतिम सामना आपल्या भावाभावात (भारत-पाक) झाला असता तर! आणि आपण वा भाऊ जिंकला असता तर!
तिसरं महायुद्ध परवडलं असतं इतके पेटले असते नेटकरी.
हर्षा भोगलेंचं विधान या चेल्यांनी समजून घेतलं पाहिजे. खरं सत्य आहे ते. सत्य खरंच असतं म्हणा!
मानलं पण, या चर्वितचर्वणाची यथासांग दखल घेतली आपण. आपल्या लेखणीला कुर्निसात...
लेख अतिशय उत्तम लिहिला असून , अगदी योग्य मूल्यमापन केले आहे
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख लेख. (लेखाचे शीर्षक) हे बहुतांश वापरले जाणारे वाक्य आहे. त्याच्या मर्यादा आणि पुस्तकीपण बिलकुल अधोरेखित करणारी आणि बाहेरचे दृश्य अलगद आत, अगदी आत आणून ठेवणारी ही खिडकी!
उत्तर द्याहटवाते तसे म्हणण्याचे कारण आहे.
अगदीच तांत्रिक माहिती फार सुलभपणे देणे. दुसरे - आतापर्यंत झालेला वेळ आणि सारे आधीच कोठे तरी वाचले असूनही त्याचा अजिबात पत्ता लागू न देणारा लेखनातील ओघ. तिसरे आणि महत्त्वाचे, या खेळाबद्दल कोणतीही टोकाची भूमिका (अंगावर न येणारी) न घेता, तरीही सगळी वस्तुस्थिती, आकडेवारी आणि उद्धृतं वापरून ठरलेला मुद्दा समोर ठेवण्याचे कसब.
मला इतकेच म्हणायचे आहे. बाकी स्तुती वगैरे होण्यास काबील असे सारे...
- प्रदीप रस्से, जळगाव
मस्त लेख! जे झालं ते झालं. आता पुढं जायला हवं.
उत्तर द्याहटवा- सत्येन भंडारी, नगर
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीतील सर्वच मुद्द्यांचा चांगला परामर्श घेतला आहे. या सगळ्यांमध्ये केन विल्यमनसनची प्रतिक्रिया समंजस आणि चांगली होती. या नियमांची आधी माहिती दिली होती. त्यामुळे कुणालाही दोष देणं त्यानं टाळलं. त्यानं हा निर्णय खिलाडूवृत्तीने स्वीकारला, हे खरं तर वाखाणण्याजोगं होतं.
उत्तर द्याहटवागंभीरसारख्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे बिनडोकपणाचा नमुना आहेत. नियम आधी ठरलेला असतो; आयत्या वेळी तो बनविलेला नाही, हे त्यांना कळत नाही का? असो.
या लढतीने क्रिकेट-षौकिनांचे चांगले मनोरंजन केले. अशा लढती वारंवार बघायला नाही मिळत. ब्लॉग अतिशय उत्तम आणि लौकिकाला साजेसा असाच आहे.
- प्रबोधचंद्र सावंत, पुणे
फार सुंदर लेख! हर्ष भोगले म्हणतात ते बरोबर आहे. नियम अगोदरच बनविले होते. त्यामध्ये कोणाला बदल सुचवावे वाटले नाही. माझ्या मते त्या बाबतीत कोणी तेवढा विचारच केला नसावा की, अशी काही परिस्थिती निर्माण होईल.
उत्तर द्याहटवाभारतीय प्रेक्षक आणि क्रिकेटरसिक यांना 'संगम'मधील एक गाणे लागू होते - 'हर दिल जो प्यार करेगा, वो गाना गायेगा, दिवान सेंकडों मे पहचाना जायेगा...' आणि स्पर्धेच्या नियमांच्या बाबतीत त्याची पुढची ओळ - 'अपनी अपनी सब ने कह दी, लेकिन हम चूपचाप रहे'!
- विकास पटवर्धन, नगर