शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

मुंबई, मॅजेस्टिक, पुस्तकं...


पाहिली, चाळली आणि आवडली ती घेतलीही!
......................................................
मुंबईशी नातं तसं दूरचंच. त्यामुळंच की काय, आकर्षण कायमचं. कोविडची साथ येण्याच्या तीन महिने आधी ते ह्या वर्षातला हा अखेरचा महिना, ह्या चार वर्षांमध्ये मुंबईच्या सहा चकरा झाल्या.

ह्यातला काल-परवाचा (म्हणजे ११-१२ डिसेंबरचा) आणि वर्षाच्या पहिल्या महिन्यातील दौरा मुक्कामी होता. जानेवारीत विश्व मराठी संमेलनासाठी गेलो होतो. त्यामुळं बाहेर कोठे जाणं जमलंच नाही. तीन दिवस संमेलन एके संमेलन.

आता गेलो होतो ते एका गंभीर कौटुंबिक कार्यक्रमासाठी. त्यामुळे तिथे हजेरी लावण्याशिवाय बाकी काही ठरवलं नव्हतं.

सांगायचा मुद्दा हा की, चार वर्षांमध्ये सहा वेळा जाऊनही मनातली मुंबई पाहायचा योग काही जमून येत नाही. बरंच काही मनात आहे. ते प्रत्यक्षात यायला मुहूर्त हवा.

दादरला सेनापती बापट रस्ता, रानडे रस्ता ह्यांवरून फिरायचं आहे. बबनचा चहा प्यायचा आहे.  मामा काणे आहार इथं जाणं बाकी आहे. गिरगावला पणशीकरांकडे जायचं आहे. मरीन ड्राइव्हवर समुद्रकिनारी निरुद्देश चकरा मारायच्या आहेत.

नरिमन पॉइंटपासून चालण्याच्या अंतरावर असलेल्या नॅशनल बुक ट्रस्टच्या दुकानात वेळ घालवायचा आहे. ‘पुढच्या भेटीत नक्की...’ असं म्हणत ते राहूनच जातं दर वेळी.

आताच्या दौऱ्यातली ही गोष्ट. पश्चिम रेल्वेनं दादरला उतरायचं होतं. तिथून मग मध्ये रेल्वेची लोकल पकडून छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस इथं संध्याकाळी पावणेपाच वाजेपर्यंत पोहोचायचं होतं.

दादरला पोहोचल्यानंतर दोन-अडीच तास वेळ हाताशी होता. आहे वेळ तर म्हटलं, ‘मॅजेस्टिक’मध्ये जाऊन येऊ. पुस्तकं चाळू. बऱ्यापैकी जुन्या आवृत्त्यांची पुस्तकं मिळतील. सहज पाहायला न मिळालेली पुस्तकं दिसतील.

‘मॅजेस्टिक’चा शोध घेताना आधी वनमाळी सभागृह दिसलं. त्याच्या प्रवेशद्वारातच एका पुस्तक प्रदर्शनाचा फलक पाहायला मिळाला. वाटलं की जावं आणि पाहावीत थोडी पुस्तकं. तो मोह टाळून पुढे निघालो. कारण ‘मॅजेस्टिक’मध्ये पुरेसा वेळ देता येणार नाही म्हणून.

अजून चार पावलं पुढे आल्यावर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दिसलं. तिकडे वळणारे पाय मागं खेचले. एकच लक्ष्य - मॅजेस्टिक.

इंटरनेटच्या मदतीने पत्ता शोधला. त्यानुसार मॅजेस्टिक ग्रंथदालन ‘प्लाझा सिनेमा’समोर आहे. शोध घेत चाललो आणि ‘प्लाझा सिनेमा’चं दर्शन झालं. वाटलं, वा! सोपंय की काम. ‘मॅजेस्टिक’चं नाव आणि लौकिकही मोठा. त्यामुळं मोठी पाटी दिसेल, असा समज.

मोठीच काय छोटीही पाटी दिसली नाही. त्यामुळे पुढे पुढे चालत राहिलो. दुकान मागं सोडून फारच पुढे आलो, हे कळलं ‘मॅप’ची मदत घेतल्यावर. रिव्हर्स गीअर टाकणं भागच होतं.

भर दुपारची वेळ असूनही दादरच्या पदपथावर तोबा गर्दी होती. धक्का न खाता किंवा न देता चालणं मुश्किलच. त्यात परत हातातली बॅग संभाळण्याचं काम.

एका विक्रेत्याला विचारलं तर त्यानं सांगितलं, ‘शिवाजी मंदिरात जा. तिथं आहे ‘मॅजेस्टिक’चं दुकान.’ त्याचे आभार मानून गेलो आणि आत शिरल्यावर ‘मॅजेस्टिक’ची पाटी!

खूप मोठं, प्रशस्त आणि ऐसपैस दालन असेल, असं मनातलं चित्र. पण हा समज पहिल्या झटक्यातच दूर झाला. नाटकाचं तिकीट काढायला आलेली मोजकी मंडळी बसली होती.

उत्साहात दुकानामध्ये शिरलो. पण त्याच वेळी मनाला बजावलं, घड्याळाकडं लक्ष द्यायचं. फार वेळ रमायचं नाही. संध्याकाळची दख्खनची राणी गाठायची आहे.

आधी नव्या पुस्तकांच्या दालनात गेलो. बरीच पुस्तकं होती. पण हवीहवीशी वाटणारी त्यात फारच कमी होती. त्यांच्या किमतीही चांगल्या. प्रश्न तो नव्हता. ‘अर्रऽऽ, हे घेतलंच पाहिजे हं!’, असं वाटणारी कमी दिसली.

खट्टू झालो बराचसा. मनाशी म्हटलं आता निघू. काही न घेताच टाटा करू. काउंटरवर बसलेल्या दोघांच्या नजरेला नजर न देता बाहेर पडू.

मिठाईच्या दुकानातून, तयार कपड्यांच्या दालनातून आणि पुस्तक प्रदर्शनातून रिकाम्या हातांनी आणि खिसा हलका न होता बाहेर पडणं शास्त्रसंमत नाही, असं म्हणतात. ह्या ‘तत्त्वा’नुसार आजवर वागत आलो.

ह्या तत्त्वाला हरताळ फासला जाण्याचा योग आला होता. वाटलं की, चला पहिल्यांदाच असंच निघावं लागणार.

तसं काही व्हायचंच नव्हतं. पुढे आलो आणि मनात, डोक्यात असलेली (शिवाय सवलत मिळणारी!) बरीच पुस्तकं दिसली. मग रेंगाळू लागलो. वाकून, हात उंच करून, गुडघ्यावर बसून पुस्तकं काढू लागलो. चाळू लागलो.

अच्युत बर्व्यांचं ‘सुखदा’ संग्रहात होतं. मध्यंतरी कसे कुणास ठाऊक, त्याला पाय फुटले. त्याच्या अर्पणपत्रिकेतल्या ओळी मनात घर करून आहेत. अप्रतिम! बर्वे लिहितात - 
‘मी चालत होतो रस्त्यातून अनवाणी
डोळ्यांत माझिया म्हणून आले पाणी
संपलेच रडणे परंतु जेव्हा दिसला
शेजारी माणुस पायच नव्हते ज्याला!’


...बाकी काही नाही, तरी निव्वळ ह्या चार ओळींसाठी ते पुस्तक संग्रहात असणं फार महत्त्वाचं वाटतं. तर तिथल्या कप्प्यात ‘सुखदा’ दिसलं. सुखद धक्का. एक प्रत घ्यावी की दोन घ्याव्यात? मनात संभ्रम. मोह टाळत एकच घेतली.

तेवढ्यात लक्ष वेधलं ‘लँडमाफिया’च्या मुखपृष्ठानं. ‘लोकसत्ता’मधला जुना सहकारी बबन मिंड ह्याची ही कादंबरी. तीही घ्यायलाच हवी. नियोजित संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे ह्यांचं ‘पांढर’ही दिसलं. ते वाचलं की नाही आठवत नव्हतं. संग्रहात नाही, हे नक्की.


‘सेंट्रल बस स्टेशन’ लिहिणारे वसंत नरहर फेणे आवडते लेखक. त्यांची ‘शतकान्तिका’ आणि ‘निर्वासित नाती’ ह्यासह आणखी एक-दोन पुस्तकं सहज दिसली.  ‘शतकान्तिका’ बहुतेक संग्रहात आहे. पण नसलंच तर? सोडलेल्या संधीबद्दल नंतर हळहळ वाटायला नको. म्हणून ते आणि ‘निर्वासित नाती’ घेऊन ठेवलं.

अशी ही हवीहवीशी पुस्तकं चाळण्यात वेळ जाऊ लागला. यशवंत पाठक छान ललित लिहितात. त्यांचं ‘मोहर मैत्रीचा’ नजरेस पडलं आणि ‘हवंच हे’ असा मनाचा कौल मिळाला.


पुरुषोत्तम धाक्रसांचं ‘चित्तपावन’ दिसलं. लेखक म्हणून त्यांचं फारसं वाचलेलं नाही. पुस्तक पाहिलं की नाही, हेही आठवत नाही. त्यामुळेच ते दिसताक्षणी घेऊन टाकलं.

राजेन्द्र बनहट्टी ह्यांचे दोन-तीन संग्रह, एक कादंबरी कपाटात आहे. त्यांचं ‘गंगार्पण’ दिसलं. (हेही आधी आणलेलं असावं, असा संशय आहे! 🤔 😀). पुन्हा तेच. नंतर खेद नको म्हणून तेही घेतलं.


त्या दिवशीची खरेदी.
.......................
बघता बघता सात-आठ पुस्तकं झाली. आता बास झालं, असं स्वतःला बजावत होतो. तेवढ्यात अचानक ‘चिद्घोष’ डोकावलं. लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी. पन्नास वर्षांपूर्वीच्या कथांचा तो संग्रह. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं.

एका कोपऱ्यात ‘युद्धस्य कथा रम्या’ शीर्षकाचं छोटंसं ७६ पानांचं पुस्तक होतं. लेखकाचं नाव - चित्रकार डी. डी. रेगे! चित्रकार आणि लेखक असा संगम असल्यामुळं तेही घेतलं.

बघता बघता दहा पुस्तकं झाली की. बरोबरच्या ओझ्यात किती भर टाकायची हा प्रश्नच होता. कारण आपल्याच खांद्यावर आपलंच ओझं नंतरचे आठ ते दहा तास बाळगायचं होतं. साडेतीन-चार तासांच्या प्रवासानंतर गाडी बदलायची होती.

अजून बराच वेळ घालवायला आवडलं असतं. पाच-दहा पुस्तकांची भर टाकायलाही परवडलं असतं. कमी पडत असलेल्या वेळेचा आणि सामान वागवण्याच्या मर्यादेचा विचार केला. मनाविरुद्धच आवरतं घेतलं. गंमत म्हणजे घेतलेल्या पुस्तकांपैकी दोन तर निम्मी-अर्धी प्रवासात वाचूनही झाली.

‘मॅजेस्टिक’मध्ये जायचंच, पुस्तकं चाळायची असा हट्ट का बरं होता? स्वतःच्या पैशाने पुस्तकं खरेदी करण्याची सुरुवात त्यांच्या पुण्यातल्या नारायण पेठेतील दालनातून झाली. पुस्तकांवर लिहिलेल्या एका लेखात त्याचा उल्लेख केला आहेच.

... पुस्तकदिन असेल तेव्हा असेल. ‘मॅजेस्टिक’च्या दालनात माझ्यापुरता तो  छोट्या स्वरूपात साजरा झाला.
आणि हो, पुस्तकाच्या दुकानातून ‘रिकाम्या हातानं बाहेर पडायचं नाही’ हे तत्त्वही पाळलं गेलं! 👍
....
#पुस्तक #मॅजेस्टिक #सुखदा #मुंबई #वसंत_नरहर_फेणे #ज्ञानेश्वर_नाडकर्णी #पुस्तक_दिन

१४ टिप्पण्या:

  1. पुस्तकं... त्यानं पाहिली, त्यानं चाळली आणि त्यानं घेतलीही... सर, छान लेख!

    उत्तर द्याहटवा
  2. लेख फार आवडला. "मिठाईच्या,तयार कपड्यांच्या आणि पुस्तकांच्या दुकानातून रिकाम्या हाताने परत जायचं नाही "--हा फंडा मस्तच आहे!!

    खरं तर तुमच्यासाठी पुस्तकांचं दुकान सर्वात आधी असणार .

    जाता जाता केलेलं मुंबईचं वर्णनसुद्धा आवडलं.
    - डॉ. विद्या सहस्रबुद्धे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. लेख वाचायला घेतला नि वाचतच राहिलो . पुस्तकांचं वेड असणाऱ्यांचं असंच होत असतं!
    - कमलाकर धारप, नागपूर

    उत्तर द्याहटवा
  4. छानच. 👍👌👌👌👌
    पुस्तके ही आनंदमयी ठेव🙏👍👍👍
    पुस्तकाच्या दुकानातून खरच रिकामं, पुस्तक न घेताच बाहेर पडणं शक्यच नाही. 😄🍁👍🙏👌👌👌
    - ओंकार

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान. वाचला. आवडलाही.
    - प्रा. राजेंद्र दास, सोलापूर

    उत्तर द्याहटवा
  6. छान आहे लेख... अभिनंदन.
    मॅजेस्टिकचा शोध मजेशीर आहे.
    मला वाटते ठाणे येथे घंटाळी रस्त्यावर मॅजेस्टिक चं ऐसपैस आकाराचं दुकान आहे... पुढच्या वेळी!
    - विजय कापडी, गोवा

    उत्तर द्याहटवा
  7. व्वा व्वा... जिवाची मुंबई करणारे अनेक असतात; पण पुस्तकांच्या(च) गावात रमणारे विरळाच. त्यात ‘सतीश कुलकर्णी’ आहेच, हा व्यक्तिशः माझ्यासाठी आनंदाभिमानाचा भाग!!
    - मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली

    उत्तर द्याहटवा
  8. छानच. मॅजेस्टिक आणि आयडियल ह्यांच्याकडे कुरियर optionही बहुदा असतो. घरपोहोच पाठवतात.
    - उमा शालिनी सुहास, गोवा

    उत्तर द्याहटवा
  9. पुस्तकवेडे आहात हे सिद्ध झालं. पुस्तकातही कोणते घ्यायचे कोणते नको, हे एका दिवसात ठरवून केलेत . मी नाही असलं काही कधी काळी केलं. खूप कवतुक वाटलं, हा एक दिवसाचा प्रपंच पाहून!
    - श्री. के. वनपाल, नगर

    उत्तर द्याहटवा
  10. लेख आवडला. पुस्तक म्हटलं की असंच होतं. मॅजेस्टिक च कशाला? फुटपाथवर बसलेल्या एका पुस्तकांच्या स्टॉलवर बंगळुरू मधे मी पुस्तकं चाळत होते. ३ निवडली. त्याला पैसे देणार तेवढ्यात पोलिसांची धाड बघून विक्रेत्यानं घाईघाईनं गाशा गुंडाळला व पळत सुटला. मी ती फुकट मिळालेली घेऊन मुक्कामी परतले. 😁
    - प्रियंवदा कोल्हटकर

    उत्तर द्याहटवा
  11. 👍🙏 पुस्तकांची सहल मस्त!
    - स्मिता जोशी कानडे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  12. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    लेख छानच आहे; पण मॅजेस्टिक बद्दल अजून माहिती हवी होती. 🙏🏻
    - विकास पटवर्धन, नगर

    उत्तर द्याहटवा
  13. मॅजेस्टिक ची सफर छानच. 🤙👌
    - सुधीर लक्ष्मण देशपांडे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  14. व्वा !
    छान...
    सोन्यापेक्षा मौल्यवान खरेदी.
    👌🏼
    बबन मिंडे घेतले हे तर लय भारी...
    😊
    - विवेक विसाळ, पुणे

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...