गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

नको नकोसा ‘विक्रम’ टळला


महंमद सिराज...स्वप्नवत मारा. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा बळी. (छायाचित्र सौजन्य आयसीसी)
.....................................................
नवं वर्ष आणि नव्या (नकोशा) ‘विक्रमा’चा भोज्जा गाठण्यापासून भारत-दक्षिण आफ्रिका ह्यांना लांबच राहावं लागलं. कोणत्याही कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे पहिले डाव संपण्याचा हा विक्रम. एकाच दिवशी सर्वाधिक गडी बाद होण्याचा पराक्रम. काही फलंदाजांसाठी तर एकाच दिवसांत दोन वेळा बाद होण्याची नामुष्की.

केपटाऊनच्या द न्यूलँड्सच्या स्टेडियमची खेळपट्टी खिशात घेऊन जगभर फिरावं, असं बुधवारी (दि. ३ जानेवारी) काहींना वाटलं असेल. त्यात महंमद सिराज, कगिसो रबाडा, लुंगी इनगीडी, नांद्रे बर्गर, जसप्रीत बुमराह, मुकेशकुमार हे दोन्ही संघांतील गोलंदाज नक्की असणार.

त्याच वेळी अशा खेळपट्टीवर पुन्हा परीक्षा द्यायला लागू नये, अशीही काहींची भावना असेल. उदाहरणार्थ यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, डीन एल्गर, टोनी डी’झोरजी वगैरेंची.

तब्बल १२२ वर्षांपूर्वी...
ह्या चालू असलेल्या कसोटीत तब्बल १२२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडता मोडता राहून गेला. ही कसोटी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्यांच्यामध्ये मेलबर्न इथे १ ते ४ जानेवारी १९०२ ह्या दरम्यान खेळली गेली. वर्षाअखेरीच्या पार्टीत दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी काय खाल्लं (किंवा पिलं!) होतं कुणास ठाऊक! पहिल्याच दिवशी मेलबर्नच्या खेळपट्टीनं गोलंदाजांना भरभरून साथ दिली.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे मिळून २५ फलंदाज बाद झाले. एवढे फलंदाज बाद झाले म्हटल्यावर धावा कमीच असणार. तर तसंही नाही. अडीच डावांमध्ये २२१ धावा निघाल्या. फक्त त्यात कोणाचं शतक सोडाच अर्धशतकही नव्हतं. आठ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव ३२.१ षट्कांमध्ये ११२ धावांवर आटोपला. सातव्या क्रमांकावर आलेला उजव्या हाती फलंदाज रेजिनल्ड अलेक्झांडर डफ ह्याच्या धावा सर्वाधिक - ३२. अकराव्या क्रमांकावर आलेल्या अर्नी जोन्स ह्याच्याही धावा १४. ह्याशिवाय जो डार्लिग (कर्णधार), क्लेम हिल व ह्यू ट्रम्बल ह्यांनीच काय ती दुहेरी धावसंख्या गाठली. सलामीच्या व्हिक्टर ट्रम्परसह तिघांना भोपळा फोडता आला नाही.

अल्प वेळचा आनंद
यजमानांना झटपट गुंडाळल्याचा आनंद पाहुण्या इंग्लंड संघाला फार वेळ लाभला नाही. त्यांचाही डाव गडगडला. जेमतेम १५.४ षट्के चाललेल्या डावात त्यांना फक्त ६१ धावा करता आल्या. म्हणजे कांगारूंना ५१ धावांची आघाडी.

इंग्लंडकडून सर्वाधिक धावा (२७) गिल्बर्ट जेसप ह्यानं केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार आर्ची मॅकलॅरेन ह्याला एकट्यालाच दुहेरी धावसंख्या करता आली. चौघे शून्यावर बाद झाले असताना, तळाच्या तीन फलंदाजांनी मात्र खातं (कसंबसं) उघडलं.

कांगारूंच्या डावात चेंडू सात वेळा सीमापार गेला. त्यातले पाच चौकार डफचे आणि दोन डार्लिंगचे. इंग्लंडकडूनही दोनच फलंदाजांना चौकार मारता आले. त्यातले दोन जेसपचे व एक अकराव्या क्रमांकावर खेळणाऱ्या कॉलीन ब्लाईद ह्याचा. सामन्यातील एकमेव षट्कार जेसप ह्याचा. गमतीचा भाग म्हणजे दोन्ही संघांच्या इतर खात्यात सहा-सहा धावा आणि त्याही ‘बाय’च्या रूपाने.

दोनच गोलंदाज पुरेसे
प्रतिस्पर्ध्यांचे १०-१० गडी बाद करण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गोलंदाज पुरेसे ठरले. पण सगळेच बळी काही जलदगती गोलंदाजांनी मिळविले नाहीत. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज सिडनी बार्न्स (६/४२) ह्याला साथ मिळाली ती डावखुरा फिरकी गोलंदाज ब्लाईदची (४/६४). त्यांनी मिळून पाच षट्कं निर्धाव टाकली. बार्न्सने ब्लाईदपेक्षा फक्त एक चेंडू अधिक टाकला.


ऑस्ट्रेलियाचा माँटी नोबल
(सौजन्य विकिपीडिया)
..................
इंग्लंडचा डाव गुंडाळला ह्यू ट्रम्बल (३/३८) आणि माँटी नोबल (७/१७) ह्या उजव्या हातानं ऑफब्रेक टाकणाऱ्या गोलंदाजांनी. त्यामुळेच धावपुस्तिकेत यष्टिरक्षक जेम्स केली ह्याच्या नावावर दोन यष्टिचितचं श्रेय पाहायला मिळतं. नोबल मध्यमगती मारा करीत असल्याचीही नोंद मात्र आहे.

पहिल्याच दिवशी दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची फ्या फ्या उडाली ती सिडनी बार्न्सच्या आगखाऊ गोलंदाजीमुळे. त्यानं चौघांना बाद केलं, तर जेम्स केली धावचित झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था होती ५ बाद ४८.

ह्या पार्श्वभूमीवर केप टाऊन इथं चालू असलेल्या दक्षिण आफ्रिका व भारत ह्यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवसाच्या खेळाकडे पाहता येईल. इथे दोन्ही संघांचे डाव ७५.१ षट्कांत संपले आणि धावा निघाल्या २०८. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटीतील पहिल्या दोन डावांतील धावसंख्या ह्यापेक्षा कमी म्हणजे १७३. त्यासाठी लागलेली षट्कंही कमीच - ४७.५.

ह्या दोघांची पाटी कोरीच
त्या सामन्यात दोन-दोन गोलंदाजांनी हे काम केलं. ह्या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या डावात प्रत्येकी चार गोलंदाजांचा उपयोग केला. त्यातील प्रसिद्ध कृष्ण आणि मार्को यानसेन ह्यांची पाटी कोरीच. दक्षिण आफ्रिकेच्या नावावर चौकार चारच. भारताच्या चार फलंदाजांचे मिळून १९ चौकार व एक षट्कार.

आता पुन्हा त्या सामन्याकडे वळू या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने फलंदाजीच्या क्रमवारीत बरेच बदल केले. सलामीवीर ट्रम्पर आठव्या क्रमांकावर आला. पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या डफला तर त्यांनी दहाव्या क्रमांकावर पाठवलं. त्याचा अर्थातच उपयोग झाला.

पहिल्या दिवशी ६२.५ टक्के फलंदाज बाद होऊनही सामन्याचा निकाल लागण्यासाठी चौथ्या दिवशी खेळावं लागलं ते कांगारूंच्या चिवट फलंदाजीमुळं. दुसऱ्या दिवशीच्या खेळात त्यांनी आणखी चार गडी गमावताना २५२ धावांची भर घातली. डावखुऱ्या क्लेम हिलनं चिवट फलंदाजी केली. त्याचं शतक एका धावेनं हुकलं. नवव्या जोडीसाठी त्यानं डफच्या साथीनं ६७ धावा केल्या.

एकमेव शतकी भागीदारी
खरी कमाल केली ती डफ आणि वॉरविक आर्मस्ट्राँग ह्या अखेरच्या जोडीनं. सामन्यातील सर्वांत मोठी आणि एकमेव शतकी भागीदारी (१२०) ही त्यांची किमया. डफनं शतक झळकावलं, तर आर्मस्ट्राँग ४५ धावा काढून नाबाद राहिला.

इंग्लंडनं सहा गोलंदाजांचा वापर केला. बार्न्सला सात बळींसाठी १२१ धावा मोजाव्या लागल्या. लेगब्रेक टाकणाऱ्या लेन ब्राँड ह्यानं एका बळीसाठी ११४ धावांची किंमत चुकती केली. पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवूनही नंतर दोघांना शंभराहून अधिक धावा द्याव्या लागल्या, हीही ह्या सामन्यातली गंमतच की.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं ५३ धावा जोडूनच अखेरचा गडी गमावला. त्यांचा डाव ३५३ धावांवर संपला. दिवसभराचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं पाच गडी गमावले होते आणि लक्ष्य २५८ धावा दूर होतं.

जॉनी टिल्डसली अर्धशतक करून नाबाद होता, हाच काय तो इंग्लंडसाठी दिलासा. त्यानं विली क्वाईफ, जेसप आणि ब्राँड ह्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या भागीदाऱ्या केल्या. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. चौथ्या दिवशी टिल्डसली (६६) बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव १७५ धावांत संपला.

गोलंदाज सहा; यश दोघांनाच
इंग्लंडचा २२९ धावांनी पराभव. त्यांनी दोन्ही डावांमध्ये मिळून केलेल्या धावांपेक्षा फक्त सात कमी! ऑस्ट्रेलियानंही दुसऱ्या डावात सहाच गोलंदाज वापरले. यश मात्र नोबल (६/६०) आणि ट्रम्बल (४/४९०) ह्यांनाच मिळालं.

कसोटी सामन्यात एकाच दिवशी ह्यापेक्षाही अधिक गडी बाद झाले आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते इंग्लंड-ऑस्ट्रेलिया ह्याच आद्य प्रतिस्पर्ध्यांमधलं. क्रिकेटच्या पंढरीत म्हणजे द लॉर्ड्स मैदानावर झालेली ही कसोटी दोनच दिवसांत निकाली निघाली.

दि. १६ व १७ जुलै १८८८. पहिल्या दिवशी १३ गडी बाद आणि दुसऱ्या दिवशी तब्बल २७! दोन्ही संघांच्या चार डावांत धावपुस्तिकेत फक्त एकाच डावाची तीन आकड्यांत नोंद आहे. ऑस्ट्रेलिया पहिला डाव ११६. नंतरचे तिन्ही डाव साठीच्या घरात गुंडाळले गेलेले.

दोन्ही डावांत शतकाच्या आत
ह्या सामन्यात ६१ धावांनी पराभूत झालेल्या इंग्लंडच्या धावा पहिल्या डावात ५३ आणि दुसऱ्या डावात ६२. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव साठ धावांमध्ये संपलेला. डब्ल्यू. जी. ग्रेस (इंग्लंड) आणि जे. जे. फेरिस (ऑस्ट्रेलिया) ह्यांनाच दोन्ही डावांत दुहेरी धावसंख्या करता आली. बिच्चाऱ्या ॲलेक बॅनरमन ह्याला दोन्ही डावांत शून्यावरच तंबूत परतावं लागलं!

कसोटी इतिहासातील हा अठ्ठाविसावा सामना गोलंदाजांनीच गाजवला. ऑस्ट्रेलियाच्या चार्ली टर्नर ह्यानं दोन्ही डावांत पाच-पाच गडी बाद केले. फेरिसनं सात आणि इंग्लंडच्या बॉबी पील ह्यानं आठ बळी घेतले.

ह्याच दोन संघांमध्ये द ओव्हल मैदानावर १० ते १२ ऑगस्ट १८९६ ह्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात एकाच दिवशी तब्बल दोन डझन फलंदाज बाद झाले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडनं पहिल्या डावातले नऊ आणि दुसऱ्या डावातले पाच फलंदाज गमावले. दरम्यान ऑस्ट्रेलियाचाही पहिला डाव संपलेला. एवढे गडी बाद होत असताना धावा मात्र २३५ निघाल्या.

दोन्ही संघांचे पहिले डाव शंभरीच्या पुढे आणि दुसरे डाव शतकाच्या आत. ऑस्ट्रेलियाच्या ह्यू ट्रम्बल ह्यानं दोन्ही डावांत सहा-सहा गडी बाद केले. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जॅक हर्न ह्यानं १० बळी मिळविले.

अफगाणिस्तानवर आफत
एकाच दिवशी दोन्ही डाव खेळावे लागून पराभूत होण्याची पाळी अफगाणिस्तानवर बंगळुरूमध्ये आली. १४ व १५ जून २०१८ रोजी झालेल्या ह्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २४ गडी बाद झाले. भारताचे पहिल्या डावातील चार आणि अफगाणिस्तानचे लागोपाठ २०. ‘फॉलोऑन’चं खरोखर पालन झालं.

दक्षिण आफ्रिकेत केपटाऊनच्याच मैदानावर बारा वर्षांपूर्वी झालेल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी २३ फलंदाजांना तंबूचा रस्ता पकडावा लागला. दि. ९ ते ११ नोव्हेंबर २०११ दरम्यान झालेल्या ह्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव शतकाला चार धावा कमी असतानाच संपला. त्यानंतर त्यांनी कांगारूंना दुसऱ्या डावात ४७ धावांतच गुंडाळलं. ग्रीएम स्मिथ आणि हाशीम आमला ह्यांनी चौथ्या डावात झळकावलेली शतकं हे सामन्याचं अजून ऐक वैशिष्ट्य होय.

एका दिवसात २२ गडी बाद झाले असे सहा कसोटी सामने आहेत. त्यातील तीन सामने इंग्लंडचे व प्रत्येकी दोन सामने भारत आणि न्यूझीलंडचे आहेत. चार कसोटी सामन्यांमध्ये एकाच दिवशी २१ फलंदाज बाद झाले. आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या दहापैकी एकही सामना आशियाई देशांमध्ये खेळला गेलेला नाही. असे २० कसोटी सामने आहेत की, ज्यात कोणत्या तरी एका दिवशी २० गडी बाद झाले.

दक्षिण आफ्रिका - भारत ह्यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोणत्या वळणावर जातो, ह्याचं उत्तर दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या तासाच्या खेळात मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, काही झालं तरी हुकलेला ‘विक्रम’ करण्याची संधी साधणं ह्या सामन्यात तरी शक्य नाही. त्याचं वाईट वाटू नये म्हणून कदाचित असेल, एकही धाव न करता सहा फलंदाज गमावण्याचा पराक्रम भारतानं करून दाखवलेला आहेच.
.....
(सांख्यिकी तपशील सौजन्य https://www.espncricinfo.com)

.....

#क्रिकेट #भारत #दक्षिण_आफ्रिका #कसोटी_सामना #इंग्लंड #ऑस्ट्रेलिया #गोलंदाजी 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...