Tuesday 30 January 2024

काही अधिक-उणे, बाकी सगळं ओक्के!

विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस दुसरा व तिसरा


कोणत्याही मराठी साहित्य संमेलनाच्या यशाचं मोजमाप अलीकडे दोन निकषांवर केलं जातं – गर्दी किती जमली 
आणि पुस्तकं किती खपली? हे दोन्ही निकष दुसऱ्या मराठी विश्व संमेलनाला लावणं अवघड आहे. आणि तसंही हे काही निव्वळ साहित्य संमेलन नाही. हे विश्व मराठी संमेलन असल्याचा विसर होऊ न देता निकष लावायला हवेत. पुस्तकांची विक्री न झाल्याची रडकथा एका मराठी दैनिकात मंगळवारी (दि. ३०) प्रसिद्ध झालीच आहे. पहिला म्हणजे अर्थात गर्दीचा निकष लावायचा झाला, तर समारोपाच्या दिवशी सभागृहात ती फार दिसली नाही.

भरगच्च कार्यक्रम असलेलं, रेंगाळलेलं, कार्यक्रमपत्रिका फारशी काटेकोरपणाने अमलात न आलेलं, आळसावलेलं असं हे संमेलन होतं. आणि असं असूनही त्यातले काही कार्यक्रम गाजले. त्यातील बातमीमूल्यामुळे माध्यमांना इच्छा असूनही दुर्लक्ष करता आलं नाही.

महत्त्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे शेवटचे दोन्ही दिवस संमेलनाच्या व्यासपीठावरून सरकारवर टीका झाली. ती कोणी कितपत गांभीर्याने घेतली, हे यथावकाश कळेल.

दोन वक्त्यांचा टीकेचा सूर
मराठीचा जागर आणि गजर असं बिरूद मिरविणाऱ्या ह्या संमेलनात मराठीबद्दल जनतेपासून राज्यकर्त्यांपर्यंत कोणालाच काही पडलेलं नाही, असा थेट आरोप केला श्री. मिलिंद शिंत्रे ह्यांनी. ते अमेरिकेतील शाळा वगैरे ठीक आहे. आधी महाराष्ट्राकडं लक्ष द्या, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी रविवारी सुनावलं. ह्या दोघांनाही टाळ्या पडल्या.
 
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाचे मानकरी होते राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर. डॉ. माशेलकरांनी ४५ मिनिटांचं भाषण संपवलं, तेव्हा अवघ्या सभागृहातील श्रोत्यांनी उभं राहून त्यांच्याबद्दल वाटणारा आदर व्यक्त केला.
 
स्वतःचा कडवट मराठी असा सुरुवातीलाच उल्लेख करीत राज ह्यांनी मराठी तुमची ओळख आहे; तीच पुसून का टाकता?’ असं विचारलं. (कडवट आणि कडवा ह्या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये फरक आहे, हे कोणी तरी कोणाला तरी एकदा गोडीगोडीत समजावून सांगायला हरकत नसावी!😇)
 
संमेलनात सर्वाधिक दाद मिळविली ती राज ह्यांनीच. त्यांना पाहण्यासाठी, त्यांचे फोटो काढण्यासाठी आधी व्यासपीठावर आणि नंतर मार्गिकेत तोबा गर्दी झाली होती. त्यांनी मांडलेले काही मुद्दे –
Ø  हिंदी आपली राष्ट्रभाषा नव्हे. राष्ट्रभाषेचा निवाडा झालेलाच नाही. हे मी १५-२० वर्षांपूर्वी बोललो तेव्हा लोक अंगावर आले माझ्या.
Ø  महाराष्ट्रातील शहरांमध्ये हिंदी कानावर पडते, तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते. मराठी समृद्ध भाषा आहे आणि ती घालवण्याचा राजकीय प्रयत्न होत आहे.
Ø  पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा. अन्य जर्मन, फ्रेंच अशा कोणत्याही भाषा शिका हवं तर; पण स्थानिक भाषा शिकलीच पाहिजे. (असा निर्णय सरकारनं घेतल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ह्यांनी नंतर सांगितलं. त्याबद्दल त्यांचे राज ह्यांनी आभारही मानले.)
Ø  पंतप्रधानांना स्वतःचं राज्य, स्वतःची भाषा ह्याबद्दल प्रेम आहे. ते लपून राहत नाही. मग आपणच आपल्या राज्याबद्दलचं प्रेम का लपवतो? प्रत्येक राज्य व देश आपली भाषा आणि आपली माणसं जपतात. मग आपणच गोट्यासारखे घरंगळत का जातो? (ही टीका नाही, तर वस्तुस्थिती आहे.)
Ø  आपण मराठीतच बोलू. समोरच्याला मराठीत बोलायची सवय लावू. तो चुकला तर हसू नका आणि टिंगल करू नका. त्यामुळं ते मराठी बोलायचा संकोच करतात.
 
विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची गरुडझेप असा परिसंवाद असल्याचा उल्लेख कार्यक्रमपत्रिकेत होता. वक्ता म्हणून एकट्या डॉ. माशेलकर ह्यांचं नाव होत. त्यांच्यापर्यंत विषय पोहोचविला होता की नाही, ह्याची शंका यावी. कारण ४५ मिनिटांच्या व्याख्यानात त्यांनी वारंवार मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती असाच उल्लेख केला.

तत्त्वाचा प्रश्न आला की भांडायचं
हळदीच्या  (जिंकलेल्या) लढाईचा डॉ. माशेलकर ह्यांनी आवर्जून उल्लेख केला. ती तत्त्वाची लढाई होती आणि तत्त्वाचा प्रश्न आला की भांडायचंच, हा मराठी बाणा ह्या त्यांच्या टिप्पणीला जोरदार दाद मिळाली. ज्ञानोपासना व देशभक्ती ह्यांचा संगम मराठी माणसांमध्ये आढळतो. तो बाहेर जातो, तेव्हा त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र पोहोचत असतो, असं ते म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी सहाच्या सुमारास संमेलनस्थळी आले. मी चांद्याचा आणि केसकर बांद्याचे. त्यामुळे हे संमेलन चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या मराठी माणसांचे आहे, अशी कोटी त्यांनी केली. त्यांच्या उपस्थितीत मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळालेल्या सनदी अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर ह्यांना आमच्या विदर्भाचे फडणवीस अशी ओळख सांगण्याचा मोह आवरता आला नाही! ‘सर्व नवीन गोष्टींना फडणवीस ह्यांचा पाठिंबा असतो. महाराष्ट्राला लाभलेल्या व्हीजनरी मुख्यमंत्र्यांपैकी एक, असा गौरव मंत्री व संमेलनाचे यजमान दीपक केसरकर ह्यांनी केला.
 
इंग्रजीच्या विरोधाचा सूर अशा संमेलनांच्या व्यासपीठावर कायमच लागताना दिसतो. त्याला छेद देत श्री. फडणवीस म्हणाले, इंग्रजी व्यवहारभाषा झाली आहे. मुलांना हवं तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाका; पण घरी मराठीतच बोला.
 
मराठी मातीमध्येच वैश्विकता आहे. महाराष्ट्र जगाच्या पाठीवर कोठेही दिसतो. मराठी सनातन आणि शाश्वतही आहे. मराठी भाषा विद्यापीठाने जगभरातील मराठी माणसांशी आणि संस्थांशी जोडून घ्यावे, असं श्री. फडणवीस म्हणाले.
 
मराठी मानकांचं जतन
श्री. फडणवीस ह्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. मराठी माणसाच्या पराक्रमाच्या खुणा आणि मानके देशभर आहेत. ती आपला स्वाभिमान वाढविणारी आहेत. त्या मानकांचं जतन केलं जाईल.

व्यवहारात मराठीचा वापर आणि अर्थार्जनाची भाषा ह्या चांगल्या विषयावरची दोन वक्त्यांची चर्चा श्री. फडणवीस ह्यांचं स्वागत करण्यासाठी गुंडाळली गेली. हे वक्ते होते, भारतीय विदेश सेवेतील निवृत्त अधिकारी व ज्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलं आहे ते ज्ञानेश्वर मुळे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (पहिल्यांदाच) मराठी माध्यमातून देऊन तिसरा क्रमांक मिळविलेले श्री. भूषण गगराणी. ह्या दोघांचंही मूळ पीठ कोल्हापूर. त्याचा स्वाभाविकच उल्लेख झाला. श्री. गगराणी म्हणाले की, मराठीतून शिकण्याबद्दल न्यूनगंड वगैरे बाळगण्यासारखी स्थिती कोल्हापुरात नाही. तोच राजमार्ग आहे. तिथं कोणतीही भाषा मराठीतूनच बोलली जाते!
 
श्री. मुळे ह्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे –
Ø  जगात इंग्रजी महत्त्वाचं आहे, पण अनिवार्य नाही. आपली भाषा वापरणारे देशच (किंवा प्रदेशही) सर्वांगीण प्रगती करू शकतात. आपली अर्थार्जनाची भाषा मराठीच आहे. भाषेच्या प्रचारावर लक्ष केंद्रित न करता कला-संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न करायला हवेत.
Ø  प्रभावशाली व्यक्ती व संस्था व्यापक प्रमाणात असणं आवश्यक आहे. आपली प्रभावी माणसे जगभर असावीत. दिल्लीत पूर्वी फार कमी मराठी अधिकारी होते. आता ही संख्या साडेतीनशेच्या घरात आहे.
Ø  भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकार व नागरिक ह्यांनी एकत्र आलं पाहिजे. देशातील महत्त्वाच्या १० विद्यापीठांमध्ये मराठी अध्यासन तातडीने सुरू करायला हवे. त्यासाठी काटकसरी स्वभाव बदलून पैसे खर्च करायला शिकायला हवं.
Ø  तुमचे राजदूत परदेशात आहेत, त्याही पेक्षा देशाच्या विविध प्रांतांमध्ये आहेत. ह्या जवळपास दोन कोटी मराठी माणसांचा आपण मराठीसाठी उपयोग करीत नाही. त्यामुळे ही माणसे, त्या प्रदेशातील संस्था बदलून अमराठी होत आहेत.
Ø  देशभरातील मराठी संस्थांना, शाळा-महाविद्यालयांना सरकारने (आर्थिक) बळ दिलं पाहिजे.
Ø  मराठी माणसं बहुसंख्येनं असतील, तिथे आपले लोकप्रतिनिधी असावेत.
Ø  मराठी माणूस व्याकरणाची उत्तम जाण असलेला आहे. इतर राज्यांहून आपल्याकडे ज्ञानाच्या अनेक शाखा उपलब्ध आहेत. मराठी माणसाचं पाऊल आत्मविश्वासानं पडलं पाहिजे.
 
श्री. गगराणी ह्यांनी मांडलेल्या ठळक गोष्टी -
Ø  अर्थार्जनाचा आणि भाषेचा काय संबंध? रोजगार, व्यवसाय वा अर्थार्जन केवळ भाषेमुळे करता येत नाही. त्यासाठी विविध क्षमता आवश्यक असतात. त्या वाढवाव्या लागतील.
Ø  केवळ भाषिक जाणीव किंवा अस्मिता वाढल्याने अर्थार्जन वाढणार नाही.
Ø  आघाडीवर असलेल्या देशाची भाषा आर्थिक विश्वाची भाषा असते. ती स्वीकारण्यात कमीपणा वाटू नये.
Ø  मराठी माणूस कमी तडजोड करणारा आणि भूमिका घेणारा.
Ø  भाषेच्या विकासात संस्थात्मक उभारणी महत्त्वाची. विश्वकोश मार्गी लावणं हे महाराष्ट्राचं फार मोठं काम आहे.
Ø  भाषा समाजाचा अंगभूत घटक आहे. तो केवळ सरकारचा विषय नाही. सरकार व्यवस्था करू शकतं, ती पुढे नेणं ही समाजाची जबाबदारी.
 
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मराठी भाषा भवनाचं सादरीकरण झालं. श्री. दीपक केसरकर ह्यांनी तिन्ही दिवस सातत्यानं ह्या भवनाची माहिती दिली. मराठीविषयक सर्व कार्यालये ह्या एकाच इमारतीत असतील. मराठीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी ह्या भाषा भवनाचा उपयोग होईल, असं त्यांनी आग्रहानं सांगितलं.


ह्याच सत्रात श्राव्य ज्ञानेश्वरीचं प्रकाशन झालं. एकूण ५२ तास ऐकता येईल, अशी ही ९ हजार ३३ ओव्यांची ज्ञानेश्वरी राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकूण २२ गायकांच्या आणि ५० जणांच्या चमूच्या मदतीनं हे श्राव्य पुस्तक साकारणारे संगीतकार राहुल रानडे ह्यांनी त्यासाठी मदत केलेल्या सर्वांचा अतिशय कृतज्ञतेने उल्लेख केला. त्यांचं पुढचं स्वप्न आहे तुकाराममहाराजांची गाथा अशीच उपलब्ध करणं. त्याचा व्याप असेल – ४५ हजार अभंग, १५ संगीतकार आणि १०० गायक!
 
तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा वापरविषयावरचा परिसंवाद तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात झाला. त्यात मिलिंद शिंत्रे, डॉ. आशुतोष जावडेकर व सुयोग रिसबूड सहभागी झाले. तुम्ही मराठी लोक कोणत्या क्षेत्रात पुढं आहात? काही विचारलं की भूतकाळाकडे बोट दाखविता!’, ह्या अन्य भाषकांच्या सततच्या खिजवण्यामुळे आपण जगातलं सर्वांत मोठं शब्दकोडं बनवलं, असं श्री. शिंत्रे म्हणाले.
 
दृश्यात्मकतेचं आव्हान
ह्या व्यासपीठावर सर्व भाषा समभावाची भूमिका मांडताना डॉ. जावडेकर म्हणाले, जो माणूस कोणत्या एका भाषेवर प्रेम करतो, तो अन्य कोणत्या भाषेचा दुःस्वास करूच शकत नाही. कंटेन्टबद्दल मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ते म्हणाले की, तुमची अभिव्यक्ती मनापासूनची असेल, तर समोरच्याला ती आवडतेच. तुम्ही मांडता, दाखविता ते सजीव आणि सच्चं असेल, तर त्याचा आस्वाद घेणाऱ्याची दाद मिळतेच. दृश्यात्मकतेची व्यापकता सर्वच भाषांसाठी वर्तमानातलं आणि भविष्यातलं मोठं आव्हान आहे.
 
मराठी भाषेपेक्षा मराठी जनांची भावना खूप महत्त्वाची वाटते, असं श्री. रिसबूड म्हणाले. स्मृतिरंजनाची भावना सर्व पिढ्यांतील लोकांना खेचून घेते. ह्या प्रवासात विविध प्रयोग केल्याचं त्यांनी सांगितलं.

कंटेन्ट तयार करताना प्रेक्षकवर्गाची गणितं कशी संभाळता, ह्याला उत्तर देताना श्री. शिंत्रे ह्यांनी षट्कारामागून षट्कार लगावले. त्यांनी व्यक्त केलेला संताप प्रामाणिक होता; त्या मागची चीड स्पष्टपणे दिसत होती. ते काय म्हणाले?
Ø  मराठी माणसांना भाषेबद्दल काही सांगणारे, प्रामाणिक प्रयत्न आवडत नाहीत. त्यांना सवंग मनोरंजन, अरबट-चरबट व्हिडिओ आवडतात.
Ø  प्रत्येक मराठी वृत्तपत्राला आणि वृत्तवाहिनीला आपल्या भाषेविषयी अनास्थाच आहे. ते फक्त धंदा करायला बसले आहेत. कोणत्याही वृत्तपत्राच्या कोणत्याही पानात भाषेविषयीच्या किमान पंचवीस चुका आढळतील. हे वर्षानुवर्षं चालू आहे. वृत्तपत्रे, वाहिन्या ह्यांना भाषेबद्दल अजिबात कळवळा नाही.
Ø  राजकीय पातळीवरही कोणाला भाषेचं काही पडलं नाही. मराठी दिनाच्या कार्यक्रमात मी मंत्रालयचा अर्थ विचारला. तो कोणालाच सांगता आला नाही. मंत्र्यांचं आलय असाच व्याकरणदृष्ट्या चुकीचा अर्थ त्यांनी सांगितला. मंत्र म्हणजे विचारविनिमय जिथे होतो ते मंत्रालय’!
Ø  शालेय पुस्तकांमध्येही चुकीचंच मराठी दिसतं.
 
ह्या संमेलनासाठी विविध देशांमधून आलेल्या मराठी माणसांनी तिन्ही दिवस आपले अनुभव सांगितले. त्यात मराठी शाळा आणि शिवछत्रपतींच्या विचाराचा गजर, हे दोन मुद्दे ठळकपण जाणवले. उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे, अर्थात बीबीएमचे उपक्रम अधिक व्यापक असल्याचं दिसलं. मराठी उद्यमशीलतेला गती देण्याचं उद्दिष्ट असलेल्या गर्जे मराठी ग्लोबलच्या कामाचं स्वरूपही सांगण्यात आलं. सध्या सर्वांमध्येच ज्याची चर्चा जोरात चालते, त्या कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) विषयाचं स्पष्टीकरण करणारं पुस्तक मराठीतून प्रकाशित होणार आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवे कल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, श्री. माधव दाबके ह्यांनी सांगितलं.
 
सरकारी खाक्याची चुणूक
संमेलन सरकारी असल्याची जाणीव अवचितपणे होत होतीच. संमेलनास रोज येणाऱ्यांनी भ्रमणभाष क्रमांक लिहून स्वाक्षरीसह वहीत नोंद करणं आवश्यक होतं. संजय भास्कर जोशी व मंगला गोडबोले कार्यक्रमासाठी वाट पाहत प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या. त्यांच्यापुढेही ती नोंदवही सरकावण्यात आली. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे पहिल्याच सत्रातील परिसंवाद सहभागी होऊन परत निघाले होते. कोणी तरी त्यांना वाटेतच थांबवून ती वही पुढे केली आणि त्यांच्या उपस्थितीची कागदोपत्री अधिकृत नोंद केली! मराठी मराठी असा जयघोष चाललेल्या संमेलनासाठी आलेल्या अनेकांच्या ह्या नोंदवहीतील स्वाक्षऱ्या इंग्रजीत आणि भ्रमणभाष क्रमांक त्याच इंग्रजी आकड्यांत होते.

बाकी मग एवढं नक्की म्हणता येईल, काय संमेलन, काय जेवण, काय थाट... सगळं कसं एकदम ओक्के!’
…..
#मराठी #विश्व_मराठी_संमेलन #मराठी_माणूस #ज्ञानेश्वरी #डॉ._माशेलकर #देवेंद्र_फडणवीस #दीपक_केसरकर #राज_ठाकरे #ज्ञान_तंत्रज्ञान #मराठी_भाषा #अर्थार्जन
....
पहिला भाग इथे वाचता येईल -
https://khidaki.blogspot.com/2024/01/Vishwa-Marathi.html

10 comments:

  1. खूप खूप अभिनंदन. दोन्ही लेख खूप आवडले. प्रत्यक्ष संमेलनच 'नटशेल'. म्हणजे शेंगदाण्याच्या टरफलात वाचायला मिळाले. ठळक फरक एवढाच की,टरफल दाण्यापेक्षा अधिक गोड लागले!

    आतापर्यंत अनेक संमेलनांचे वृत्तान्त वाचून असे पक्के मत झाले की वृत्तान्त लिहावा तो तुम्हीच. (हे अतिशयोक्त विधान नाहिये. मनापासून लिहिलेय.)

    सर्वोत्कृष्ट ब्लॉग लिहिल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. तुमचे दोन्ही लेख वाचून मला छान वाटले. उत्तम वाचनाचा आनंद असतो,हे तुम्हाला वेगळे सांगायला नकोच.
    - विजय कापडी, गोवा

    ReplyDelete
    Replies
    1. आपण नेहमी शेतीतील अरिष्ट आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे खूप तळमळीने अभ्यासपूर्वक मांडता.मराठी साहित्यात त्याचे प्रतिबिंब क्वचितच पडते. शेतकरी हा मराठी माणूस नसावा आणि किंवा त्याच्या जीवनात नाट्य व संघर्ष नसावा असं सारस्वतांना वाटत असावे!

      Delete
    2. श्री. प्रदीप पुरंदरेसाहेब, तुमची प्रतिक्रिया वाचली. दुर्दैवाने का होईना, तुम्ही मांडलेल्या मुद्द्यात पूर्णपणे तथ्य आहे. शेतकरी मराठी माणूस नाही, हेच सत्य म्हणता येईल. किंवा त्याच्याबद्दल जो लिहितो, तो साहित्यिकांमध्ये मोडत नसावा.

      Delete
  2. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणातून त्यांच्या मनात मराठीबद्दल असलेली आत्मीयता झळकली आहे. मराठी मानकांचं जतन करण्याची फडणवीसांनी केलेली घाेषणा स्वागतार्ह आणि मराठी अस्मिता कायम राखण्यासाठी आवश्यक अशीच आहे. परंतु, फडणवीस यांच्या स्वागतासाठी दाेन वक्त्यांची चर्चा गुंडाळावी लागणे, हे काेणत्याही अंगाने याेग्य वाटत नाही. तसे नियाेजन आधीच केले असते तर बरे झाले असते. परंतु, एवढ्या माेठ्या आयाेजनात अशा बाबी टाळणे कठीण जाते, हे समजून घेण्यासारखे आहे.

    -पुंडलिक आंबटकर
    नागपूर

    ReplyDelete
  3. मराठी भाषा विश्व संमेलन चा सविस्तर रिपोर्ट आवडला सतिश.

    ReplyDelete
  4. वाचून चांगले वाटले. थोडक्यात सारे समजू शकले. आपल्या प्रतिक्रिया आणि टिप्पणी आवडल्या. - अरुण प्रभुणे

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर विश्लेषण केले आहे , प्रत्यक्ष हजर असल्याचा आनंद अनुभवता आला ! एक ब्लॉग अनेक प्रकारे मन भरुन गेला ! अप्रतिम लेखन आणि व्यक्त होणं !
    खूप छान …. डॉ. अपर्णा फड़के

    ReplyDelete
  6. दोन्ही लेख वाचले. आवडले, विशेषत: कंसातील टिप्पणं.
    शिंत्रे यांचे षटकार रोचक आहेत. मंत्रालय या शब्दाचा बरोबर अर्थ कळला. धन्यवाद.
    - प्रियंवदा कोल्हटकर

    ReplyDelete
  7. दुसरा लेखही वाचला
    छानच मुद्दे मांडले आहेत तुम्ही.
    श्री. फडणवीस यांचे मराठी प्रेम , गगराणी यांचे विचार ,डॉ माशेलकर यांचे संबोधन आणि शिंत्रे यांचे षटकार आवडले
    मंत्रालयचा अर्थ ..मंत्र्यांचे आलय..... सांगणाऱ्याचे किती कौतुक करावे ?
    असो
    सध्या वृत्त पत्रातील , दूरदर्शन वरील मराठी वाचून मुलांच्या मराठीची काळजीच वाटते

    कडवट आणि कडवा....मधील तुमची कळवळ दिसून आली ..

    धन्यवाद

    सौ. स्वाती वर्तक

    ReplyDelete
  8. महोदय,

    विश्व(?) मराठी संमेलनाचा आपण पोटतिडकीने घेतलेला सखोल आढावा याची प्रथम दाद देतो. खरतर भाषेचा पाया घर आणि शाळा मधूनच रोवला जातो. परंतु मम्मी-ड्याडी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी या मायबोलीचा पाया खिळखिळा केला. स्वतःच्या नावावर किटाण चढलेल्या महाभागांनी व्यासपीठावर येऊन जे ज्ञानामृत पाजले त्यांच्यापैकी किती जणांची मुलं जिल्हा परिषद अथवा नगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत जातात? त्याचं नाटकी रडणं म्हणजे सावत्र आईचं रडणं.

    एकेकाळी मराठी धडे एकदा वाचले कि लक्षात राहत. कवितेला आपोआप चाल लागत. कारण भाषेला व्याकरणाचं सामर्थ्य होतं. लेखक, कवी प्रतिभासंपन्न होते. आता हि प्रतिभा विरळ होत आहे.

    पुढील विश्व(?) मराठी संमेलन मध्ये वृत्तपात्राच जाहिरातपत्र असं नामकरण करण्याचा विचार व्हावा.

    धन्यवाद.
    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहमदनगर.
    (कृपया प्रसिद्ध करावे)



    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...