सोमवार, २९ जानेवारी, २०२४

मराठीचा जागर, गजर वगैरे

विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस पहिला

 

अनुदान देऊन उद्घाटनाच्या किंवा समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये समस्त उपस्थितांना खूश करून टाकणारी आश्वासने देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारमधील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ह्यांच्यावर असते ती साहित्य संमेलनात. त्याच राज्य सरकारनं संमेलनाचं यजमानपद भूषविण्याची जबाबदारी मागच्या वर्षापासून स्वीकारली. विश्व मराठी संमेलन. जगभरात स्थिरावलेल्या मराठी माणसांना मायभूमीत एकत्र आणणं, हे त्याचं उद्दिष्ट. त्याचं पहिलं पर्व मागच्या वर्षी मुंबईत पार पडलं. नवीन पर्व नव्या शहरात, म्हणजे नवी मुंबईत सुरू झालं आणि वर्षानुवर्षे जसं म्हणण्याची प्रथा आहे, त्यानुसार आज ह्या संमेलनाचं सूप वाजेल.
 
तांत्रिक कारणांमुळे यंदाचं संमेलन उशिरा आयोजित करावं लागलं, असं ह्या संमेलनाचे एक खांबी तंबू असलेले मराठी भाषामंत्री दीपक केसरकर ह्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सांगितलं. तथापि ही तांत्रिक किंवा अन्य कारणं काय, ह्याचं बरंच चर्वितचर्वण माध्यमांमधून आधीच झालेलं आहे.
 
बहुसंख्य लोकांचा सहभाग किंवा हजेरी असलेले कार्यक्रम शक्यतो वेळेवर सुरू होणार नाहीत, ह्याची पुरेपूर दक्षता घेणं ही आपली प्रथा आहे. ती इथंही पाळली गेली. संमेलनाचं उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता होणार होतं. आंदोलन मिटवल्याचा गुलाल अंगावर घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तासभर उशिराने आले. साधारण पाच मिनिटं बोलून ते पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. सलग दुसऱ्या वर्षी मला ह्या संमेलनाचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं; पण तो मान राज्यपालांचा होता. तर ते असो!
 
संमेलनाच्या पहिल्याच दिवशी (प्रथेनुसारच!) भरगच्च कार्यक्रम होते. पण हा दिवस लक्षात राहील तो दोन गोष्टींसाठी – राज्यपालांचं मुद्द्याला धरून असलेलं फक्त १४ मिनिटांचं भाषण आणि मराठी पुस्तकांचं जग ही चर्चा. दोनच वक्ते असलेली ही चर्चा विषयाला धरून झाली. लेखक आणि मग पुस्तकविक्रेते बनलेले संजय भास्कर जोशी, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले ह्यांनी नेमकी मांडणी केली.
 
राज्यपालांची खंत
मला ओघवतं मराठी बोलता येत नाही, ह्याचं दुःख होतं, खेद वाटतो, असं राज्यपाल रमेश बैस ह्यांनी सुरुवातीलाच सांगितलं. मराठी बोललेलं कळणाऱ्या आणि वाचता येणाऱ्या राज्यपालांनी मराठीची शिकवणी लावलेली आहे. श्री. केसरकर ह्यांनी आधीच ते सांगितलं होतं. त्याला श्री. बैस ह्यांनी जाहीर दुजोरा दिला.
 
श्री. बैस लहानाचे मोठे झाले रायपूरमध्ये. मराठी संस्कृतीची थोडी-फार छाप असलेलं हे शहर. ते म्हणाले, मराठी कुटुंबं भरपूर असलेल्या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो. त्या कुटुंबांमधल्या मुलांशी खेळलो. ती मुलं घरात मराठीमध्ये संवाद साधत. माझ्याशी मात्र हिंदीत किंवा छत्तीसगढी भाषेत बोलत. ते मराठीत बोलत नव्हते, ह्याची खंत आज वाटते. त्यातून एवढंच स्पष्ट झालं की, समोरच्याच्या भाषिक भावना दुखावू नयेत ह्याची काळजी इथून तिथून सगळीकडचा मराठी माणूस घेतो, हेच चिरंतन सत्य!
 
लोक इंग्रजीत का बोलतात? त्यांना त्याच भाषेतून संवाद साधणं आवश्यक वा गरजेचं का वाटतं? त्याचं उत्तर देताना श्री. बैस म्हणाले, प्रभावशाली व्यक्तींचं समाज अनुकरण करीत असतो. ते इंग्रजीत बोलतात म्हणून समाज त्याच भाषेत बोलू पाहतो. इंग्रजीच अभिजात भाषा असल्याचा गैरसमज शिक्षितांनी निर्माण केला.
 
आपल्या देशात प्रामुख्याने दोन वर्ग आहेत – इंग्रजी बोलणारा व न बोलणारा. भारतीय भाषांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची वेळ यावी, ह्याचा साधा सरळ अर्थ असा की, काळ तर मोठा कठीण आला..!’, असंही राज्यपाल म्हणाले.
 
मराठी तरुणांच्या यशकथा पोहोचवा
मराठीचं महत्त्व कसं वाढेल किंवा ते वाढविण्यासाठी काय करावं लागेल, असं विचारून श्री. बैस ह्यांनी त्याचं उत्तर सविस्तर दिलं. ते म्हणाले, मराठी तरुणांना नवोद्यमी बनवा. त्यांनी पैसे कमवायला (धननिर्मिती) सुरुवात केल्यावर मराठीला महत्त्व येईल. महाराष्ट्रातील नेत्यांनी तरुणांशी चर्चा करावी, संवाद साधावा. मराठी तरुणांच्या  यशकथा विविध माध्यमांतून समाजापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. बोलीतील साहित्य वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावं.
 
शालेय शिक्षण मातृभाषेतूनच द्यायला हवं, ह्या मुद्द्यावर भर देत श्री. बैस ह्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाटी साक्ष दिली. राज्यपालांनी भाषणाचा समारोप जय मराठी!’ अशा घोषणेनं केला आणि त्याच्या पुढच्याच मिनिटाला  सूत्रसंचालक ताईंनी आभार मानण्यासाठी नव्हे, तर ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी कोणाला तरी व्यासपीठावर आमंत्रित केलं!
 
वाचन संस्कृती कमी होत आहे, मराठीचं (आणि ती बोलणाऱ्या माणसांचं) काही खरं नाही, अशी रडगाणी गाण्याचे काही मुहूर्त असतात – साहित्य संमेलन, मराठी भाषा दिन वगैरे. मराठी पुस्तकांचा खप तर वर्षानुवर्षं टिंगलीचा, उपहासाचा विषय आहे. ह्या साऱ्याला खणखणीत उत्तर मिळालं मराठी पुस्तकांचं जग ह्या परिसंवादातून. अशा महत्त्वाच्या विषयावरची चर्चा ऐकण्यासाठी कमीत कमी श्रोते सभागृहात असावेत, हे ओघानंच आलं. आधीचा गाण्याचा, कवितांचा सुश्राव्य कार्यक्रम ऐकल्यानंतर बरीच मंडळी पाय मोकळे करायला आणि चहाने घसा ओला करायला बाहेर पडली होती.
 
रडकथा थांबवा
मराठी वाचन-संस्कृतीचं काही खरं नाही, ही सांस्कृतिक रडकथा थांबवा, असं श्री. संजय भास्कर जोशी ह्यांनी सुरुवातीलाच खणखणीतपणे सांगितलं. सजग वाचक, लेखक आणि सात वर्षांपासून पुस्तकाचं दुकान चालविणारा विक्रेता ह्या नात्यानं पुढची १५-२० मिनिटं त्यांनी जे काही सांगितलं, ते फार दिलासा देणारं होतं.
 
रडणं फार सोपं आहे. समाजात नकारत्मकतेला बरेच बरे दिवस आहेत आणि सकारत्मकतेला अंग चोरून उभं राहावं लागतं, असं सांगून श्री. जोशी म्हणाले, पुस्तकांवर अपार प्रेम आणि अफाट कष्ट करण्याची तयारी असेल, तर चिंता करण्यासारखी परिस्थिती मुळीच नाही. वाचणारा वर्ग किती होता पूर्वी? साडेतीन-चार टक्क्यांच्या घरात. तीच टक्केवारी आजही कायम आहे. पण लोकसंख्या किती वाढली आहे, ह्याचा विचार कराल की नाही? म्हणजे टक्केवारी कायम असली, तरी वाचकसंख्या निश्चित वाढलेली. गेल्या १५-२० वर्षांत मोठा बदल झाला आहे आणि तो म्हणजे पालक आपल्या मुलांना खासप्रसंगी पुस्तकं भेट म्हणून देतात.
 
मराठी ग्रंथव्यवसायाची क्षमता किती आहे? श्री. जोशी ह्यांच्या म्हणण्यानुसार ती पाच ते सहा अब्ज रुपयांच्या घरात आहे. सध्या एक ते सव्वा अब्जाच्या दरम्यान हा व्यवसाय रेंगाळतो आहे. ती निश्चित वाढविता येईल आणि त्यासाठी परदेशस्थ मराठीमित्रांना जाहीरपणे निमंत्रण देत श्री. जोशी म्हणाले, ही बाजारपेठ वाढविण्यासाठी सर्जनशील प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी लेखक, वाचक, प्रकाशक, विक्रेते आणि समीक्षक ह्यांनी एकत्र आलं पाहिजे.
 
श्री. जोशी ह्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे असे –
ü  समस्या असल्या, चुका झाल्या असल्या तरी मराठी पुस्तकांचं जग भरपूर वाढविता येण्यासारखं आहे.
ü  धार्मिक आणि पाकक्रियेचीच पुस्तकं खपतात, हे धादांत खोटं आहे. मांडणी बदलून पाहा, निवड बदलता येईल.
ü  माझ्या दुकानात येणारी तरुण मुलं प्रामुख्याने कुरुंदकर, जी. ए. आणि नेमाडे ह्यांची पुस्तकं घेतात.
ü  महाराष्ट्रातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये (ललित) पुस्तकांचं एकही दुकान नाही, ही शरम वाटण्यासारखीच गोष्ट.
ü  सध्याची सर्वांत मोठी समस्या म्हणजे सुमार पुस्तकांची बेसुमार निर्मिती. आणि वाचकांची मागणी असणारी पुस्तकं उपलब्ध नाहीत.
ü  कॉस्ट अकाउंटंट ह्या नात्यानं सांगतो की, पुस्तकविक्रीचा व्यवसाय फार उत्तम आहे!
ü  समाज वाचायला चातकासारखा उत्सुक आहे. मराठी समाजात उत्तमोत्तम वाचक आहेत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे.
ü  समाज सुंदर करण्याचा मार्ग म्हणजे मुलांच्या हाती पुस्तकं देणं. वाचणाऱ्या समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न तुलनेने फार कमी उद्भवतात.
 
आयुष्यातली गेली ६५ वर्षं रोज नित्यनियमाने पुस्तक वाचणाऱ्या ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले ह्यांनी संयतपणे थोडी वेगळी भूमिका मांडली. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्यांची भूमिका (ह्या जगाच्या) अलीकडली, पलीकडली आणि चोहीकडली होती. आपल्या आयुष्यातल्या तीन टप्प्यांनुसार त्यांनी पुस्तकाचं जग दाखवलं.
 
तेव्हा लेखक हीरो वाटत
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तो पहिला टप्पा. तो साधारण १९९०पर्यंत गृहीत धरला त्यांनी. त्या टप्प्यात लेखक जमात छोटी होती. पुस्तकं रंगरूपानं सामान्य आणि दिसायला रुक्ष, नीरस. समाजाला, विशेषतः वाचणाऱ्यांना लेखक हीरो वाटत. समाजाचं मनोभान टिकविण्याचं काम लेखकांनी केलं.
 
दुसरा टप्पा म्हणजे जागतिकीकरण-उदारीकरणाचा, १९९०नंतरचा. त्याबद्दल मंगला गोडबोले म्हणाल्या, छपाईचं तंत्रज्ञान सुधारलं, जगभरातल्या कल्पनांच दर्शन झालं. परिणामी पुस्तकं आकर्षक, देखणी झाली. पुस्तकांचं जग व्यापक झालं. नाना विषय आले. फॅक्ट+फिक्शन असा फॅक्शन प्रकार रूढ झाला. वेगवेगळ्या जगांचा परिचय करून देणारा रिपोर्ताज नावाचा प्रकार लेखनात आला. पण सन २०००नंतर ललित लेखन बरंच कमी झालं. तरल आणि उत्कट प्रेमकथा आता वाचायला मिळत नाहीत, अशी हळहळ त्यांनी बोलून दाखविली.
 
दुर्मिळ झाले संपादक
तिसऱ्या टप्प्यात, २०१०नंतर सामाजिक माध्यमांचा वरचष्मा दिसू लागला. ह्या काळात मासिक नावाची संस्था लोप पावली आणि लेखनावर संपादनाचा संस्कार नसणं, ह्या दोन महत्त्वाच्या बाबी मंगला गोडबोले ह्यांना खटकतात. त्या म्हणाल्या, समाजमाध्यमावर जे लिहिलं जात, त्याची गुणवत्ता तपासणारी, दुरुस्ती करणारी कोणतीच यंत्रणा नाही. मराठीत संपादक आता फार दुर्मिळ झाले आहेत. लेखकही एवढे चतुर की, ते लेखन बदलण्याऐवजी संपादकच बदलतात!”
 
ह्या टप्प्याची काही वैशिष्ट्यंही मंगला गोडबोले सांगतात. विषयाची व्याप्ती प्रचंड वाढलेली आहे. विज्ञानावर रंजकपणे ललित शैलीत लिहिलं जातंय आणि त्याला वाचकही आहेत. अभ्यास करून लिहिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मानसशास्त्र, बालसंगोपन, ललितकला आदी विषयांवर पुस्तकं येत आहेत.
 

मंगला गोडबोले
(छायाचित्र सौजन्य - राजहंस प्रकाशन)
.................
पुस्तकांची गर्दी ह्या टप्प्यात वाढलेली दिसते, असं सांगून मंगला गोडबोले म्हणाल्या,
लेखकांची आता थोडंही थांबायची तयारी नाही. खूप लेखकांना आपलं लेखन सुमार आहे, हे वाटतच नाही. बक्षिसांची संख्याही वाढली आहे. बक्षीस न मिळालेलं पुस्तक दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी वेळ आली आहे. (त्या हे म्हणाल्या, तेव्हा मला वाटलं की, उठून त्यांना सांगावं की, पुस्तकाला बक्षीस न मिळालेला मी लेखक आहे आणि त्याबद्दल आता बक्षीस द्या! 😆)
 
मंगला गोडबोले ह्यांची काही महत्त्वाची निरीक्षणं –
ü  एकच चांगलं पुस्तक लिहून थांबणाऱ्यांची संख्या वाढली. सातत्य नाही, ही गंभीर गोष्ट.
ü  मराठीतील उत्तम प्रतिभा जास्त करून चित्रपटांकडे वळली आहे.
ü  मराठी पुस्तकांचं जग आकाराने विशाल झालं आहे आणि मराठी साहित्यसृष्टी अधिक उत्सवी बनली आहे.
ü  मराठी मासिकं नाहीत आणि चांगले संपादकही नाहीत.
ü  सरकारकडून अपेक्षा आहेतच – बक्षिसं देता ती पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवावीत, पुस्तकांच्या दुकानांना अनुदान द्यावं, पुस्तकांचा टपालखर्च कमी करा.
ü  मराठी भाषेचं सौंदर्य झपाट्यानं लयाला जाताना दिसतं.
ü  मोठ्या शहरांमध्येही पुस्तकाची दुकानं कमी होत चालली आहेत.
 
मंगलाताईंनी समारोप करताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली – अन्न-वस्त्र-निवारा ह्याप्रमाणं पुस्तकं हीही चौथी मूलभूत गरज आहे. रोजचा दिवस गोड करण्याची ताकद फक्त आणि फक्त पुस्तकांमध्ये आहे.
 
उद्घाटनानंतर झालेला पहिला कार्यक्रम म्हणजे जयू भाटकर ह्यांनी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे व साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे ह्यांच्याशी साधलेलेला संवाद. मराठीच्या वैश्विक प्रचारासाठी हा विषय होता.
 
डॉ. शोभणे म्हणाले, परदेशस्थ मराठी मंडळी मराठी साहित्यावर आणि संस्कृतीवर प्रेम करणारी आहेत. पण मराठई साहित्यामध्ये त्यांचं चित्रण प्रामुख्याने नकारात्मकच आलं. त्यांच्याही अडचणी आपण समजून घेणे आवश्यक आहे. आपली माणसं परदेशात जातात ह्यात गैर काही नाही. तो अनुबंध टिकवून ठेवणं आवश्यक आहे.
 
पाच ते दहा वयोगटातील मुलांना वाचनाकडे आकृष्ट करण्यासाठी त्यांच्या पातळीवरची पुस्तकं तयार करण्याची गरज डॉ. शोभणे ह्यांनी मांडली. क्रमिक पुस्तकांकडे गांभीर्याने पाहायला हवं, असं सांगताना त्यांनी जुन्या क्रमिक पुस्तकांचं व्यापक रूपाचं उदाहरण दिलं.
 
आपणच त्यांना दूर लोटतो?
उषा तांबे म्हणाल्या, परदेशात राहणाऱ्या मराठी माणसांची तिसरी पिढी आपल्यापासून तुटली, असं मानणं सोडून द्यावं. आपणच त्यांना दूर लोटतो आहोत का?”
 
वाचनसंस्कृतीबद्दल तांबे म्हणाल्या, वृत्तपत्रांचं वाचन कमी झालं, त्याची कारणं वेगळी आहेत. पुस्तकं आता सर्व स्तरांतील लोक वाचतात. मध्यमवर्गीय पुस्तकांपासून काहीसे दूर झाले असले, तरी नवशिक्षितांमध्ये वाचनाची भूक प्रचंड आहे. त्याचं दर्शन साहित्य संमेलनातील पुस्तक प्रदर्शनात घडतं.

कवितेचं गाणं होताना हा पहिल्या दिवशीचा सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम म्हणावा लागेल. कवी-गीतकार प्रवीण दवणे, गायिका पद्मजा फेणाणी आणि संगीतकार कौशल इनामदार त्यात सहभागी झाले होते. त्यात मजा आणली कौशल इनामदार ह्यांनी. परदेशातील मराठी माणसांनी आपले अनुभवही सांगितले. त्यातून उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचं कार्य किती व्यापक आणि विविध पातळ्यांवरचं आहे, हे समजलं.
 
संमेलनाचा पहिला दिवस उशिरा चालू झाला आणि उशिराच संपला. खंड न पडता एका मागोमाग एक कार्यक्रम होत राहिले. त्यामुळे जमलेली मंडळीच आपापल्या सोयीनुसार विश्रांती घेत होती, हे दिसलं.
...........
#मराठी #विश्व_मराठी_संमेलन #मराठी_साहित्य #वाचन_संस्कृती #राज्यपाल_बैस #मंगला_गोडबोले #मराठी_पुस्तके #परदेशस्थ_मराठी
.........
दुसरा भाग इथं आहे -

https://khidaki.blogspot.com/2024/01/Vishwa-Marathi2.html

५ टिप्पण्या:

  1. प्रत्यक्ष उपस्थित असल्यासारख वाटल.....

    उत्तर द्याहटवा
  2. पहिला भाग काही दिवसांपूर्वी 'खिडकी'मध्ये वाचला. फार छान आहे.

    प्रत्येक वक्त्याच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे व्यवस्थितपणे मांडण्याची तुमची शैली मला आवडली.

    - विद्या सहस्रबुद्धे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. मंगला गाेडबाेले यांनी नाेंदविलेली निरीक्षणे ही केवळ निरीक्षणे नसून, सत्य परिस्थिती आहे. अलिकडे पैसे घेऊन पुरस्कार वाटणाèया संस्था प्रत्येक शहरात उदयास आलेल्या आहेत. कित्येकांनी तर हा व्यवसायच करून टाकलेला आहे. राेज एक ना एक पुस्तक प्रकाशित हाेत असल्याने रद्दीमध्ये प्रचंड वाढ हाेत आहे. अलिकडे काळजाला हात घालणारे लिखाण खूप दुर्मिळ झालेले आहे. वृत्तपत्रांमध्ये पूर्वी दर्जेदार कविता आणि ललित लेख यायचे. आता हे सर्व बंद झालं आहे. लिहिणाèयांची संख्या इतकी वाढली की, प्रत्येक जण स्वत:ला लेखक समजू लागला आहे. या परिस्थितीमुळे माझ्यासारख्या वाचकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मंगला गाेडबाेले यांनी या विषयाला वाचा ाेडल्याने त्यांचा मी व्यक्तिश: खूप खूप आभारी आहाेत.

    उत्तर द्याहटवा
  4. पहिला भाग वाचला .बरे झाले तुम्ही तपशीलवार लिहिले आहे
    आमच्या सारखे जे तेथे जाऊ शकले नाही त्यांच्यासाठी तुम्ही ..संजय..चे काम केले आहे ..धन्यवाद

    मंगलाताईंची जी ठळक वैशिष्ट्ये तुम्ही नोंदवलीत त्यांच्याशी मी सहमत आहे..
    सध्या लोकांकडे पैसे ही खुळखुळत आहेत आणि व्हाट्सएप वर पाठविलेले त्यांचे लेख ..त्यांच्याच मित्र मैत्रिणीने वाखाणलेले , अंगठा दाखविलेले बघून जो तो स्वतः ला लेखक समजतोय आणि पुस्तक प्रकाशित करतोय .
    काही काही तर ...सुमार...तरी म्हणावे का असे वाटतात.. खरे तहानलेले वाचक त्यामुळे तसेच राहतात. " डूब " शोधत बसतात.

    धन्यवाद .

    - सौ. स्वाती वर्तक

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...