शनिवार, २४ एप्रिल, २०२१

अशोकला आठवताना...


अशोक...

'फोन वाजला की भीतीच वाटते. सध्या जगणं म्हणजे अगतिकता, अस्थिरता, अस्वस्थता एवढंच आहे.' व्हॉट्सॲप मेसेजमध्ये स्वातीताईंनी लिहिलं होतं. स्वातीताई म्हणजे दिवंगत लेखक लक्ष्मण लोंढे ह्यांच्या पत्नी. त्यांच्याशी शुक्रवारी सकाळी झालेला संवाद.

हा भीतिदायक फोन वाजायचंच बंद केलं तर? म्हणजे गुरुवारी दुपारनंतर मला ते जमलं असतं तर? तू व्हेंटिलेटरवर असल्याचा अभिजितचा निरोप वाचून फोन बंदच करून ठेवायला पाहिजे होता. कारण मग एकामागून एक वाजत गेलेले फोन मला ऐकू आलेच नसते. अर्थातच् ती बातमीही कळली नसती. अज्ञानातील काही तास समाधानाचे गेले असते.

'ह्यातून बरा होणार तो. माझा त्याच्यावर विश्वास आहे,' असा दिलासा मी अभिजितला, तुझ्या लाडक्या लेकाला कोणाच्या जिवावर दिला होता? तुझ्याच ना! कोण कुणाला दिलासा देत होतं? मी त्याला की मी मला?

साधारण वर्ष-दीड वर्षापूर्वी लेखक पुरुषोत्तम बोरकर गेले. त्यांच्या आठवणी लिहिल्या. त्या लेखावर डॉ. हेली दळवी ह्यांनी प्रतिक्रिया दिली होतं की, 'असंच लिहीत चला. पण शक्यतो असल्या माणसांच्या हयातीत. म्हणजे त्यांना भेटण्याची संधी हुकल्याची चुटपुट कमी होईल.'

डॉ. दळवी ह्यांची प्रतिक्रिया आज पुन्हा आठवतेय. तुझ्याबद्दल लिहिताना. तुला भेटता आलं नाही, ह्याची चुटपूट त्यांना नक्की वाटत राहील.

पण मग कधी लिहायला हवं होतं तुझ्याबद्दल? पंधरवड्यापूर्वी मनाशी ठरवलं होतं की, तुझ्या एकसष्टीला लिहायचं. म्हणजे अजून जवळपास चार वर्षं आणि पाच महिन्यांनंतर. तेव्हा तू असशील (आणि मीही असेन) असं किती सहजपणे गृहीत धरलं होतं मनाशी. आणि हो, लिहिण्यासाठी निमित्त वगैरे पाहिजे असतं ना. ते पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात आम्हाला शिकवलं होतं, 'रिलेव्हन्स' पाहिजे.

कधी लिहिता आलं असतं तुझ्याबद्दल कौतुकानं? तुला तो राज्य सरकारचा वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कार मिळाला तेव्हाच्या मुहूर्तावर? वरुणराज भिडे पुरस्कार तुला जाहीर झाला तेव्हा तर आनंदानं खूप जणांना एस. एम. एस. पाठवून कळवलं होतं. लिहिण्यासाठी तीही वेळ चांगली होती.

आपल्या क्षेत्रात अलीकडे असं एकमेकांबद्दल चांगलं लिहायची पद्धत नाही. स्पर्धक वृत्तपत्रांच्या पत्रकारांची नावं शक्यतो छापायची नाहीत. अगदीच टाळता येत नसलं, तर वृत्तपत्राचं नाव आणि त्याचं पद द्यायचं नाही. 'ज्येष्ठ पत्रकार' म्हणायचं फक्त. अशा वातावरणात लिहिलं असतं जरी, तर ते कुठे छापलं असतं? ब्लॉग नव्हतो लिहीत तेव्हा. असंच लिहून इ-मेलवरून पाठवता आलं असतं सगळ्यांना. ते वाचल्यावर तुझी प्रतिक्रिया काय झाली असती? कोणी भरभरून स्तुती करायला लागलं की, तू लगेच संकोचून जायचास. तुझा एरवीचा मोठा आवाज लहान व्हायचा. आक्रसून घ्यायचास तू स्वतःला.

तू रुग्णालयात दाखल झालास. पहिल्या आठवडाभरात तुझ्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती. एकदा बोललो, तर तुझा आवाज फार खोल गेलेला होता. लगेच थांबलो. मग गंमत म्हणून, तुला बरं वाटावं म्हणून एक चारोळी केली -

वाघ पिंजऱ्यात अडकलाय 
तब्येतीनं थोडा हडकलाय 
दोन-चार दिवसांत बाहेर पडणार 
डरकाळ्यांना पुन्हा सुरुवात होणार! 

ह्या ओळी अभिजितला पाठवल्या. त्या तुला वाचून दाखवल्याचं आणि ऐकून तू हसल्याचं त्यानं सांगितलं. तुलाही त्या व्हॉट्सॲपवर पाठविल्या होत्या. तू पाहिल्याच्या दोन निळ्या टिक दिसतात अजून मला. त्यानंतर पाठविलेले तीन मस्त व्हिडिओ मात्र तू काही पाहिले नाहीस अजून. त्यातला एक तर तुझ्या खास विषयाचा होता - पाच-पन्नास जातीच्या आंब्याचं प्रदर्शन. त्याच्यावर काही त्या दोन निळ्या खुणा उमटल्याच नाहीत.

अभिजितचा सोमवारी संध्याकाळी फोन आला. तू खूश आहेस, असं सांगून तो म्हणाला, 'घरी येतो उद्या सकाळी काका. अण्णा म्हणाले, सतीशकाकाकडून भरपूर पुस्तकं घेऊन ये वाचायला. अंतोन चेकाव्हच्या कथा आण.'

चेकाव्हच्या अनुवादित कथांचा संग्रह आहे माझ्याकडे. पण तो असा लगेच सापडणार नाही. अभिजितला सांगितलं की, चेकाव्ह-बिकाव्ह काही नाही. चांगली पुस्तकं देतो तुला.

कम्प्युटरसमोरच्या खुर्चीवर पाच-सहा पुस्तकं गेल्या मंगळवारपासून पडली आहेत. त्यात मोहन पाटील ह्यांच्या दोन ग्रामीण दीर्घकथांचा संग्रह आहे. त्यातली 'खांदेपालट' तुला आवडली असती. किंवा कदाचित आवडलीही नसती. 'राजकारण असं नाही खेळत', असं म्हणत तू मग गावपातळीवरच्या राजकारणाचे काही पदर उलगडून दाखविले असते. 'थांब' म्हणेपर्यंत फोनवर बोलत राहिला असतास.

'शापित यक्ष' तुला नक्की आवडलं असतं, अशोक. अवलिया रिचर्ड बर्टनचं हे चरित्र वाचून तू 'लय भारी' अशी दाद दिली असतीस. थोडासा त्याच्याच जातकुळीतला आहेस तू, असं वाटतं. अतिदक्षता विभागात तीन आठवडे राहून त्रासलेल्या तुला गडगडाटी हसता यावं, म्हणून शरद वर्दे ह्यांची दोन पुस्तकं काढून ठेवली होती. नवी कोरी.

आणखी एक पुस्तक आहे सई परांजप्यांचं 'सय'. 'लोकरंग'मधलं त्यांचं सदर तू नियमित वाचलं असणारच. आपलंच वर्तमानपत्र न वाचण्याएवढा बनचुका पत्रकार झाला नव्हतास तू. 'लोकसत्ता'मध्ये येणारी सगळी सदरं नियमित वाचायचास. मग कोणी काय लिहिलंय, हे कधी तरी फोनवर सांगायचास. आपला अंक आपण सोडून इतर सगळ्यांनी वाचावा, अशी नव्या युगातील पत्रकारांची धारणा आहे. त्याला तू अपवाद.

... तर ही काढून ठेवलेली पुस्तकं अजून पडून आहेत. आता ती परत जागेवर हलवावी लागतील. परत कधी ती निघतील तेव्हा त्यांना चिकटलेली तुझी आठवण असेलच.

अशोक, आपली ओळख नेमकी कधी झाली? निमित्त ‘लोकसत्ता’चं हे नक्की. नगर आवृत्ती सुरू करण्याचा निर्णय अचानक झाला. टिळक रस्त्यावरच्या ‘हॉटेल संकेत’मध्ये आपल्या मुलाखती झाल्या. अरुण टिकेकर संपादक होते. जॉर्ज वर्गिस, संजय पवार होते मुलाखतीला. तेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो. ओळख झाली. मार्चचा पहिला आठवडा होता - १९९४. 

तू तेव्हा ‘सार्वमत’मध्ये काम करत होतास. मी ‘केसरी’मध्ये. तुझं ‘सार्वमत’साठी वसंतराव देशमुखांनी 'इन्व्हेन्शन' केलं आणि महादेव कुलकर्णी ह्यांनी 'लोकसत्ता'साठी 'डिस्कव्हरी'! ‘लोकसत्ता’च्या त्या आवृत्तीनं नगर जिल्हा ढवळून टाकला. अनेक नव्या गोष्टींची सुरुवात झाली. तू बहुतेक लगेच रुजू झालास. आवृत्तीचं मुख्यालय सोडून बाहेरच्या ठिकाणी ‘लोकसत्ता’नं नेमलेला तू पहिला ‘स्टाफर’ असशील बहुदा. आणि करार करून नेमणूक झालेला संपादकीय विभागातलाही तू पहिलाच असावास. नंतरच्या काळात अशा अनेक पहिल्यावहिल्या गोष्टींचा तू मानकरी होतास. त्याची सुरुवात तिथनं झाली.

दि. ३० एप्रिल १९९४. आवृत्तीच्या कामाचा पहिला दिवस. त्या आधी आपली जोरदार बैठक झालेली. जिल्हाभरात, छोट्या-मोठ्या गावांमध्ये मिळून पाऊणशे अर्धवेळ वार्ताहर नेमलेले. दुपारी कधी तरी तुझी बातमी हातात पडली. श्रीरामपुरात वर्षभरात एड्सने किती जणांचा मृत्यू झाला, हे सांगणारी बातमी होती ती. एड्स हा तेव्हा फार चर्चेचा विषय होता. ती बातमी वाचेपर्यंत तुझं काही कार्यकर्तृत्व माहीत नव्हतं मला. बातमीचं संपादन केलं खरं; पण एका सहकाऱ्याला म्हटलं, ‘हा बहुतेक आपल्याला पहिल्याच महिन्यात नोटीस मिळवून देणार.’ त्यानंही बातमी पाहून त्या भीतीला दुजोरा दिला.

आम्ही तुला ओळखत नव्हतो, एवढंच त्या शेरेबाजीनं यथावकाश स्पष्ट झालं. तुझी ती पहिली बातमीही खणखणीत होती. त्याच काय, पण नंतरच्या तुझ्या कुठल्याच बातमीनं कोर्टाची नोटीस आल्याचं मला तरी आठवत नाही. हळुहळू अशोक तुपे हे नाव गाजू लागलं. श्रीरामपुरात राहून तू पुण्यात काय, मुंबईतही पोहोचलास. आवृत्ती सुरू होण्याच्या आधी तू वितरण विभागाबरोबर जीव तोडून पळत होता. त्यामुळे तू म्हणजे त्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत! वितरण, जाहिरात आणि अर्थातच बातमी...नगर जिल्ह्याच्या उत्तर भागातल्या कोणत्याही प्रश्नावर रामबाण उत्तर शोधण्यासाठी एकच पर्याय - ‘राजे’.

अशोक तुपे वेगळ्या बातम्या देतो, वेगळ्या पद्धतीनं विचार करतो, हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. वार्ताहरांच्या बैठका तू गाजवायचास. बोलायला उभा राहिलास की, पहिल्या काही मिनिटांतच बैठकीचा नूर बदलून जायचा. नवनवीन कल्पना, विषय मांडायचास. आधी झालेल्या चर्चेला वेगळा दृष्टिकोण द्यायचास. अशा बैठका संपल्यावर मग ‘अशोक एकटाच फार बोलतो’ अशी तक्रार काही वार्ताहर करायचे. ‘खरं तर अशोकचं ऐकून घेण्यासाठी वेगळी बैठक घ्यायला हवी,’ असंही आम्ही विनोदानं म्हणत असू.

श्रीरामपूरच्या बातम्या ‘लोकसत्ता’मध्ये वरच्या पातळीवर विशेष गांभीर्यानं घेतल्या जाऊ लागल्या. त्यातलं एक निमित्त मला आठवतं. सोनिया गांधी ह्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनण्यावर आक्षेप घेत आणि त्यांच्या विदेशी असण्याकडं बोट दाखवित शरद पवार ह्यांनी काँग्रेस सोडली. हे कसं झालं, हे सांगणारी बातमी तू रात्री साडेआठच्या सुमारास फॅक्सनं पाठविली. तुझी राजकीय बातमी म्हणजे खणखणीतच. ती लगेच पुण्याला पाठविली. तेव्हा आपले निवासी संपादक आनंद आगाशे होते. त्यांना तुझी बातमी सांगितली. चकितच झालेले, पण तसं बोलण्यातून जाणवू न देता, ते मला म्हणाले, ‘अरे तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. तुम्ही कसली बातमी देता!’ त्यांचं म्हणणं गैर नव्हतं. पण एवढंच सांगितलं की, अशोकनं बातमी दिलीय म्हटल्यावर त्यात दम आहे. त्याच्याशी तुम्हीच एकदा बोला. त्या दिवशी नाही, पण दुसऱ्या दिवशी तू आगाशेसाहेबांना फोन केला. तुझी माहिती खरी होती, हे त्यांच्या लक्षात आलं होतंं आणि त्यानंतर तू त्यांचा लाडका झाला. एवढा की, ‘लोकसत्ता’ सोडल्यानंतर त्यांनी मला एकदा बजावलं होतं, ‘तू आणि अशोक वेड्यासारखा काही निर्णय घेऊ नका. आहात तिथंच थांबा. निरोप दे माझा अशोकला.'

आगाशेसाहेबांची मुंबईला बदली झाली आणि त्यांनी सर्व आवृत्त्यांच्या पहिल्या पानासाठी एकच अँकर द्यायचा, असं नियोजन केलं. नगरमधून अँकरसाठीची पहिली बातमी स्वाभाविकच तुझी होती, अशोक. एका कार्यशाळेच्या निमित्तानं ते नगरला आले होते. गप्पांच्या ओघात मी तुला हसत हसत सहज काही म्हणालो. आगाशेसाहेबांना वाटलं की, मी तुझी टिंगल करतोय. त्यामुळे थोडं रागावूनच ते म्हणाले होते, ‘अशोकचा ऑल एडिशन अँकर असतो बरं!’ ते आणखी काही वर्षं ‘लोकसत्ता’मध्ये राहिले असते, तर  तुझ्या कारकीर्दीला वेगळं वळण मिळालं असतं. तू आताच्या चार-पाच वर्षं आधीच राज्य पातळीवर गाजू लागला असता. तुला ह्याची काही कल्पना होती?

तुझ्याबरोबर काम करताना मजा यायची, अशोक. एकदा बातमी दिली की, मग त्याबद्दल कसलाच आग्रह नसायचा तुझा. कोणत्या बातमीला तू स्वतःच ‘बाय-लाईन’ दिल्याचं मला कधीच आठवत नाही. बातमी कापली, नावं गाळली, आतल्याच पानात लागली, खालीच लागली, हेडिंगच चागंलं दिलं नाही, बातमी उशिराच लागली... सर्वसामान्यपणे वार्ताहरांच्या ज्या नित्यनेमाच्या तक्रारी असतात, त्या तुझ्याकडून कधीच ऐकायला मिळाल्या नाहीत. तो तुझा कर्मयोग असावा बहुतेक.

एवढ्या वर्षांमध्ये इतक्या वेळी आपण बोलल्यावर जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट - पगारवाढ, बढती, रजा, नोकरीत मिळणारा न्याय... ह्याबद्दल निर्विकार होतास तू. आपल्या बोलण्यात हा विषय अपवादानेच कधी आला असेल. मिळत होतं, त्यावर खूश असावास तू. म्हणजे कुठं तरी आत थोडी खंत असली, तरी त्याबद्दल कधी जाहीर वाच्यता केली नाहीस. तू तक्रार केली नाही किंवा ‘मला अमूक तमूक पद द्या’ असं कधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्याही सुचवलं नाही. परिणामी आहे त्यावर तू खूश आहेस, असं वरिष्ठांना वाटलं असणार. मध्यंतरी तुझ्या ‘वार्ताहर’ ह्या पदामागे ‘वरिष्ठ’ एवढाच शब्द चिकटला. तुझ्या नावामागे सहसंपादक, सहायक संपादक; किमान विशेष वार्ताहर ह्यापैकी काही असणं मला तरी आवडलं असतं. सुमारांच्या सद्दीतल्या अनेक सन्मानीयांना संपादकपदाची सुगी साधत असताना, तुला ते मिळू नये, ह्याची खंत वाटतेच राहून राहून.

‘सार्वमत’चे आद्य संपादक वसंतराव देशमुख तुझे पत्रकारिततले गुरू. त्यांच्याबद्दल तुझ्या मनात कायम आदर होता. त्यांचं निधन झाल्यानंतर संपादकपदासाठी तुझंच नाव चर्चेत होतं. तू नेमका काय निर्णय घेशील, ह्याची चाचपणी वरिष्ठांनी माझ्याकडे केली होती. तू वेगळं काही करावंस असं मनातून वाटत असतानाही मी सांगितलं होतं की, अशोक काही असा वेगळा निर्णय घेणार नाही. मला माहीत होतं ते.

‘ॲग्रोवन’ सुरू होण्याच्या वेळी मी मुलाखतीसाठी जाऊन आलो. मग संपादक निशिकांत भालेराव ह्यांनी पुन्हा चर्चेला बोलावलं. तुला घ्यावं, असं मी त्यांना आग्रहानं सांगत होतो. तेही सहमत होते. मग माझ्या भवितव्याचा वगैरे निर्णय बाजूला ठेवून आमच्या दहा-पंधरा मिनिटं गप्पा झाल्या त्या तुझ्याचबद्दल. मधल्या काळात, साधारण दहा वर्षांपूर्वी तू मला ऑफर दिलीस - ‘पुण्यनगरीला’ निवासी संपादक म्हणून जातोस का? पण बाबा शिंगोटे ह्यांनी तुलाच ह्यापेक्षा मोठं पद आणि केवळ संयोजनाची जबाबदारी देऊ केलीस, तेव्हा तू निर्णय घ्यायला कचरलास. त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं ओझं नको होतं, तुला बहुतेक.

दोन-एक वर्षांपूर्वी एका नव्या सायंदैनिकाचा प्रस्ताव माझ्याकडे आला. संपादकपदासाठी तूच कसा योग्य, हे मी संबंधिताला समजावलं. आम्ही दोघं तुला भेटायला आलो होतो श्रीरामपुरात. होय-नाही, असं नेमकं काहीच सांगितलं नाहीस तू. उलट दैनिकाऐवजी ‘ॲप’ कसं फायद्याचं राहील आणि तेच नव्या जमान्याचं माध्यम कसं आहे, हे सांगत राहिलास. पुढे त्या दैनिकाचं काही झालंच नाही. तू होय म्हणाला असता, तर हलचाल झाली असती कदाचित. मस्त फोनवर बोलावं, वेगवेगळे विषय अभ्यासावेत आणि दणकून लेख-बातम्या लिहाव्यात, हेच बरं, असं तू ठरवून टाकलं होतंस मनाशी.

तुझ्याकडे अफाट किस्से होते अशोक. तुझं आयुष्यच तसं होतं. पुणे जिल्ह्यातून वडील कसे आले नि तुपे कुटुंब कान्हेगावला कसं स्थिरावलं, ह्याचा इतिहास तू सांगितलास. अण्णासाहेब शिंदे ह्यांना तू मनापासून मानायचास. तसंच गोविंदराव आदिकांबद्दल. त्यांचा तर तू एके काळचा कार्यकर्ता. जोशभरल्या जवानीत पतित पावन, हिंदू एकता, स्टुडंट्स फेडरेशन अशा उजव्या ते डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये आंदोळलेला. ह्याच डाव्या, तेजतर्रार बाण्यातून तू वसंतराव देशमुख ह्यांना ‘तुमची माध्यमं म्हणजे भांडवलदारांची हस्तक’ असं सुनावलं होतंस. तुझ्या तारुण्यसुलभ असंतोषाला त्यांनी बरोबर वाट काढून दिली आणि आपल्या दैनिकाचा बातमीदार नेमलं. त्यांच्याबद्दलची ही कृतज्ञता तू अखेरपर्यंत जपलीस. वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार वितरणाला दिग्गज पत्रकार पाहुणे म्हणून लाभले, ह्याचं बहुतांशी श्रेय तुलाच. पहिल्याच वर्षी जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली ती पाथर्डीच्या श्यामसुंदर शर्मा ह्यांची. त्यांच्या नावाबद्दल मी आग्रह धरला, तो ‘केसरी’साठी त्यांनी केलेल्या बातमीदारीचा अनुभव लक्षात ठेवून. हा आग्रह तुला मान्य झाला. वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी योग्य माणसं निवडणं, सगळ्यांचा कल पाहून पुरस्कारासाठी निवड करणं, हे अवघड काम तू बरीच वर्षं शांतपणे करीत राहिलास.

कसं कुणास ठाऊक, पण आपले संबंध पहिल्या दिवसापासून ‘अरे-तुरे’चेच राहिले. आधी आपण सहकारी होतो. लवकरच मित्र बनलो. मला नगर सोडून पुण्याला जावं लागल्यानंतर आपलं औपचारिक नातं संपलं. उपसंपादक-वार्ताहर संबंध संपुष्टात आले आणि मग आपण केवळ मित्र राहिलो. कधी तरी भेटणारे, पण काळाच्या त्या अंतरानं दुरावा न पडणारे घट्ट मित्र.

इतक्या वर्षांनंतर हे आवर्जून सांगावं वाटतं की, तुला कुठलाच गंड नव्हता अशोक. कोणत्याही समूहात सहज मिसळून जाणं तुला जमायचं. तसा विश्वास तुझ्यात होता आणि समोरच्यालाही द्यायचास. अभिजितनं परवा सांगितलं की, तो एकदा घरी आलेला आहे माझ्या. आधी आठवलं नाही. मग लक्षात आलं. तेव्हा तो खूप गप्प गप्प होता. त्याला तू म्हणालास, अरे, काही नाही आपलंच घर आहे हे. असंच एकदा वहिनींना दवाखान्यात घेऊन आला होतास तू. कधी न पाहिलेल्या माणसांच्या घरी आल्यानं त्या स्वाभाविकच संकोचल्या होत्या. तू म्हणालास, ‘आपला मित्रय सतीश. घरच्यासारखं वागायचं इथं.’

आणखी एक - कार्यालयीन राजकारण, असूया, हेवा ह्या सगळ्यांपासून तू दूर राहिलास नेहमी. कुणाचा दुस्वास केला नाहीस की कुणाबद्दल कंड्या पिकवल्या नाहीत.

ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड टाळणं आणि ताकदवान पत्रकार असल्याचा अहंगंड न बाळगणं, ह्या गोष्टी सोप्या नव्हेत. त्या दोन्ही तुला साधल्या. म्हणजे तसं काही तू जाणूनबुजून ठरवलं नव्हतंस. उपजत होतं ते. अनेक मोठमोठ्या माणसांचा उल्लेख झाल्याावर तू सहज म्हणायचास, ‘आपला मित्र आहे तो. परवाच तासभर फोन झाला.’ हे सांगण्यामागे मिरवण्याचा हेतू काही नसायचा. जाता जाता समोरच्याला माहितीसंपृक्त करून सोडणे, एवढंच! संवाद साधण्याची कला तुला वश होती. दोन महिन्यांपू्र्वी आपण एकत्र पुण्याला गेलो. शेजारी बसलेल्या तरुणाला तू इतक्या सहजपणे बोलतं केलंस की, त्यानं त्याच्या पॅकेजचीही माहिती सहज  दिली. त्यानंतरच्या अर्ध्या तासात तू पुढं बसलेल्या सिंधी व्यापाऱ्याला खुलवलं.

प्रसिद्ध लेखिका शान्ता ज. शेळके ह्यांनी आपले गुरू श्री. म. माटे ह्यांच्याबद्दल लिहिलंय की, ’जातीयतेकडे पाहण्याचा निर्मळ दृष्टिकोण त्यांनी मला दिला.’ हे वाक्य तुला तंतोतंत लागू होतं. तू जाती-जमातींची वैशिष्ट्यं, गुणावगुण सांगायचास. पण त्यामागे कोणताही ग्रह नव्हता. त्यामुळेच रामदास आठवले पक्षाच्या कार्यक्रमात बोलावून तुझा खास सत्कार करायचे आणि ते तू कौतुकाने सांगायचास.

अनावर बालसुलभ कुतुहल असलेला माणूस म्हणून तू कायम लक्षात राहशील. पाहायला मिळणाऱ्या प्रत्येक नव्या गोष्टीबद्दल तुला विलक्षण रस असे. आधी ते सगळं तू समजून घ्यायचास आणि मग इतरांना समजून सांगायला मोकळा! तुझी आकलनशक्ती टिपकागदासारखी. पटकन सारं शोषून घेणारी. तुझ्या आवडीच्या विषयांचा एक एक हंगाम असे. त्यात ती एकच लाट असायची. म्हणजे तो ठरावीक काळ तू त्याच विषयावर बोलत राहायचास. त्यातलं नवीन काय ते सांगायचास. अभिजित मध्यंतरी कोटा (राजस्तान) इथं होता, त्या काळात वेळोवेळी झालेल्या फोनमध्ये कोट्याबद्दल मला खूप काही ऐकायला मिळालं. असंच दीक्षित डाएटबद्दल. ते किती फायद्याचं हे तू माझ्या घरी बसून चहा प्यायला नकार देताना समजावून सांगितलं.

खर्चात कपात म्हणून श्रीरामपूरचं कार्यालय बंद करण्यात आलं; तुला असलेल्या सहकारी वार्ताहराची जागाही माणूस मिळत नाही म्हणून रद्दच झाली. हा मधला काळ तुला फार अवघड गेला, हे खरंय ना अशोक? ती दीड-दोन वर्षं तू अस्वस्थ होता. आपली उपेक्षा होतेय, अशी नकळती चुटपूट लागली होती. पण ह्याही परिस्थितीवर तू मात केली. तुला काही कम्प्युटरशी फारशी मैत्री करता आली नाही. पण त्यानंतर सुरुवातीला मोबाईल आणि मग स्मार्ट फोन ह्यांना जिगरी दोस्त बनवलं तू. मोबाईलमुळं तुला राज्यभर, राज्याबाहेर कुणाशीही सहज संपर्क साधता येऊ लागला. स्मार्टफोनवरील इंटरनेटमुळे  जगाशी जोडून घेतलंस तू स्वतःला. तू गेल्या दशकभरात जी जोरदार कामगिरी केलीस ना, त्याचं रहस्य ह्यातच आहे. तू देशभरातली विविध वृत्तपत्रं पहाटेच स्मार्टफोनवर पाहायचास. अनेक तांत्रिक बाबींची माहिती तू ह्या माध्यमातून सहजपणे मिळविली. तुझ्यामधला मूळचा चाणाक्ष वार्ताहर-पत्रकार ह्या सोयीमुळं अधिक स्मार्ट बनला.

तुझी कॉपी भारी असायची. अक्षर सुवाच्य वगैरे नाही. घाईघाईत, उडतं लिहिलेलं; पण उपसंपादकाला वाचता येणारं. लिहिण्यात वेलांट्या-उकाराच्या चुका भरपूर असत. दीर्घ लिहिण्याकडे तुझा कल. ह्याबाबत तुला रागवून काही उपयोग नसायचा. कारण ‘आहे हे असं आहे बुवा’ असं म्हणत तुझे दोन्ही हात वर! प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या कार्यशाळेत प्रा. लीला गोविलकर ह्यांचं भाषेविषयी सत्र होतं. ग्रामीण भागातील रहिवासी सहसा दीर्घ स्वरात बोलतात, असं त्यांनी ओघात सांगितल्यावर तू पटकन मला म्हणाला, ‘माझ्या सगळ्या वेलांट्या आणि उकार दुसरे का असतात, हे कळलं ना आता!’

‘लोकसत्ता’च्या नगरच्या अंकात सहा वर्षं ‘नगरी-नगरी’ सदर लिहिलं. त्याचा तू एक महत्त्वाचा चाहता. त्यासाठी अनेकदा विषय दिले, फोटो दिले. पण सदराचा उल्लेख तू कायम ‘नगरनगरी’ असा तरी करायचास किंवा ‘रसिकवाला’ असा. मध्यंतरी तू म्हणालास, ‘मला ना कादंबरी लिहायचीय. पण तुझ्यासारखी शैली नाही ना, सतीश.’

हे ऐकून हसू आलं - कादंबरीचं नाही, तर शैलीचं. एवढ्या विविध विषयांवर इतकं लिहिलेल्या तुझ्या नावावर आतापर्यंत किमान दोन पुस्तकं असायला हवी होती, अशोक. बातम्यांच्या फार मागं लागण्यापेक्षा आता पुस्तकाच्या मागं लाग, असं तुला पाच वर्षांपूर्वीच ऐकवून झालं होतं. आता तू एकदम कादंबरीच लिहायची ठरवलेली. म्हणालो, ‘तू लिहायला तर सुरुवात कर. बाकीचं मी बघतो.’ अस्सलपणात थोडी कमतरता राहते, तेव्हा शैलीचा मेक-अप जरुरीचा असतो. माहितीच्या उणिवेचं नकटेपण शैलीच्या रंगरंगोटीत लपवावं लागतं. माहितीचा खजिना असलेल्या तुझ्या लिखाणाला, ह्या मेक-अपची गरज नव्हती. पण तेच तुला समजावून सांगणं अवघड होतं.

अकाली जाणं, हा शब्दप्रयोग खूप वेळा वाचला, वापरला. त्याचा अर्थ तू सांगितलास, अशोक. गेल्या दीड दशकात ग्रामीण भागातील खूप तरुण उच्चशिक्षण, विशेष शिक्षण घेऊन माध्यमांमध्ये आले. त्यांच्यासाठी तू ‘आयडॉल’ असणं अगदीच स्वाभाविक. ग्रामीण पत्रकारितेची माध्यमातील मुख्य प्रवाहाला दखल घ्यायला लावण्याचं काम कळत-नकळत तू केलंस. तुझ्या जाण्यामुळं कुटुंबाचं, अनेक मित्रांचं, तू काम करीत असलेल्या वृत्तपत्राचं मोठं नुकसान झालंच आहे. पण त्याहून मोठी हानी झाली आहे ती ओरडण्याची ताकद नसलेल्या एका मोठ्या समाजघटकाची. त्यांचा आवाज बनण्याचं काम तू साडेतीन दशकांच्या विलक्षण पत्रकारितेत केलं.

१ मे ही तारीख जवळ आलीच आहे. ही तारीख आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, हे तुला सांगायला नकोच. 'नगरच्या मातीचा, महानगरांच्या धर्तीचा' असं बिरूद लावत 'लोकसत्ता'ची नगरची आवृत्ती १९९४मध्ये ह्याच दिवशी सुरू झाली. त्याला यंदा २७ वर्षं पूर्ण होतील.

वर्धापनदिन. त्याच दिवशी तुझा दशक्रियाविधी आहे. तुला माहितीय का, 'लोकसत्ता-नगर'च्या त्या आपल्या पहिल्या संघातला तूच एकमेव खेळाडू उरला होतास. बाकी सगळे पांगले. कोणी निवृत्त झालं, कोणी बाहेर पडलं, कोणाला निरोपाचा नारळ दिला.

संपादकीय, जाहिरात, वितरण... कोणत्याच विभागात त्या वेळचा एकही माणूस आता तिथे नाही. तूच होतास फक्त. ह्या आवृत्तीच्या पहिल्या दिवसापासून सलग २७ वर्षं काम करणारा तू एकटाच. आपल्या त्या संघातल्या साखळीतला शेवटचा दुवा तुझ्या रूपाने होता. तोच तुटला!

हे सगळं लिखाण म्हणजे तुझ्या कामाचा आढावा नाही, अशोक. किंवा ही तुझी कार्यमीमांसाही नाही. ह्या आहेत फक्त आठवणी. अस्वस्थ होऊन वर आलेल्या. तुझ्याबद्दलच्या, तुझ्या बातम्यांबद्दलच्या, तुझ्या गप्पांबद्दलच्या. तुझ्याबरोबर रंगलेल्या मैफलींच्या. तास तास चालणाऱ्या तुझ्या फोनच्या.

ह्या सगळ्यांत आता भर पडणार नाही.
पण ह्या आठवणी बुजणारही नाहीत.
कारणपरत्वे किंवा अकारणही त्या येतच राहतील.
किमान मी असेपर्यंत तरी...

#Journalism #RuralJournalism #AgriJournalism #Journalist #media #Maharashtra  #AshokTupe #Loksatta #Ahmednagar #Shrirampur #News

२७ टिप्पण्या:

  1. सकाळमध्ये असताना मी काहीतरी बातमी केली होती, की लेख लिहिला होता आठवत नाही. पण तेव्हा त्यावरून तुमचं बोलणं झालं असावं. तुपेंनी तुमच्याकडून नंबर घेऊन मला फोन केला होता. बराच वेळ बोलले. नंतरही एकदा बहुतेक बोलणं झालं आमचं. तुम्ही आणि महादेव कुलकर्णी एका कार्यक्रमाला मसापमध्ये आलात, तेव्हाही त्यांची आठवण निघाली होती.
    मी श्रीरामपूरला कधी गेलो नाही. पण त्यांना भेटायला पाहिजे होतं, असं वाटतं. आता काय उपयोग!

    उत्तर द्याहटवा
  2. पण त्याहून मोठी हानी झाली आहे ती ओरडण्याची ताकद नसलेल्या नसलेल्या एका मोठ्या समाजघटकाची. त्यांचा आवाज बनण्याचं काम तू साडेतीन दशकांच्या विलक्षण पत्रकारितेत केलं.
    🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. सर आपण राजेंबद्दल लिहिलेल्या आठवणी डोळ्याच्या कडा ओलावून गेल्या. खूप दिलदार व्यक्तिमत्व होते राजे. 'बातमीला समर्पक हेडिंग देण्यात सतीशचा हात जिल्ह्यात कुणीच धरणार नाही' असं ते म्हणायचे. खूप छान व्यक्त झालात सर. राजेंचं जाणं मनाला हुरहूर लावून गेलं...

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच समर्पक व ओघवत्या शब्दात तुम्ही अशोक तुपे अर्थात आमचे राजे याना चित्रित केले. त्यांच्या आठवणी पुसल्या जाणे कधीच शक्य नाही. तुम्ही लिहिलेल्या आठवणींमधून राजे नव्याने समजले. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  5. सतीश सर तुम्ही नेमकी निरिक्षण मांडली आहेत.मुंबई, पुण्यात गेल्याशिवाय पत्रकारिता करता येत नाही असं मानणाऱ्या सर्वांसाठी राजे हे आयडॉल होते. श्रीरामपूरमध्ये राहून ते दिल्लीच्या पत्रकारांपेक्षाही अधिक चिंतन करत होते. त्यांनी आपले स्वतःचे स्थान निर्माण केले होते. दुसऱ्याचे कौतूक करण्याचे औदार्य या माणसाकडे होते. मी त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान. स्पर्धक दैनिकातील. पण, माझी एखादी बातमी, लेख आवडला की फोन करायचे. अर्थातच तो फोन किमान 15-20 मिनिटांचाच असायचा. हा माणूस संपादक व्हायला हवा असे मलाही नेहमी वाटायचे. पण, ते स्वतः दुसऱ्यांची नावे सुचवायचे. तुम्ही म्हणतात ते खरे आहे, लेख वा बातमी लिहून संपादकासमोर ठेवा हाच धर्म त्यांनी जपला.

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम. अशोकडोळ्यांसमोर उभा केलास .पाणी आलं डोळ्यांत... ������
    - उमेश आठलेकर, नारायणगाव (पुणे)

    उत्तर द्याहटवा
  7. 'खिडकी'मध्ये लिहिलेला अशोकराव तुपे ह्यांच्याबद्दलचा 'अशोकला आठवताना...' हा संपूर्ण लेख आज फेसबुकवर वाचला. अनिल पांडे यांनी शेअर केला होता.
    वाचताना मी स्वतः ला हरवून बसलो होतो. आत्तापर्यंतच्या तुमच्या लेखातील अधिक भावलेला हा लेख. आपल्या सहकाऱ्यांनाही वाचता आले पाहिजे, हे ह्यातून समजले. बारीक- बारीक गोष्टींच्या नोंदी, तारखा, स्वभावाचे कंगोरे आणि घडामोडी खूप बारकाव्याने नव्हे तर अंतःकरणापासून तुम्ही लिहिल्या म्हणून अशोकराव मला चांगलेच उमगले. पण ह्या माणसाला भेटता आलं असतं तर भारीच वाटले असते. अशोकरावांना भावपूर्ण श्रद्धांजली...
    ����
    - दत्ता उकिर्डे, राशीन (कर्जत, नगर)

    उत्तर द्याहटवा
  8. हा सविस्तर लेख वाचला.
    तुपेसाहेबांच्या विचारांची, तसेच त्यांच्या कार्याची उंची कळली.
    ग्रामीण भागातील प्रतिभावंताना आपण नेहमीच लिफ्ट दिली आहे. त्यांचे कर्तृत्व अधोरेखित करीत राहिलात.
    जिवलग मित्रांच्या जाण्याने आपल्याला झालेले दुःख शब्दगणिक जाणवत होते.
    तुपेसाहेबांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
    - हरिहर धुतमल, लोहा (जि. नांदेड)

    उत्तर द्याहटवा
  9. प्रदीर्घ आहे पण परिपूर्ण आहे. अशोक तुपे ह्यांच्या कर्तबगारीचा संपूर्ण पट उकलून सांगितला आहे.
    ��
    - विवेक विसाळ, पुणे

    उत्तर द्याहटवा
  10. खूप आठवणी, अनेक वर्षांच्या. शेवट तर चटका लावणारा...
    भावपूर्ण श्रद्धांजली अशोक तुपे साहेबांना...
    ������������
    - सुधीर चपळगावकर, नगर

    उत्तर द्याहटवा
  11. लेख वाचला. फार मनापासून लिहिलाय. From the bottom of your heart!
    ������
    - अभय जोशी, पुणे

    उत्तर द्याहटवा
  12. अशोक तुप्यांवरचा लेख वाचला. फार दुःखद गोष्ट. लेख सुंदर झालाय.
    - प्रदीप कुलकर्णी, पुणे

    उत्तर द्याहटवा
  13. सतीश, लेख वाचला. खूपच छान. राजेंचे वर्णन हुबेहूब केलंय.
    जवळच्या माणसाबद्दल किती किती लिहू, असे होते. पण तुझी जातकुळी संपादकाची असल्याने अशोकवर नेमकं लिहिलं आहे. खूप दिवसांनंतर सुंदर मृत्युलेख वाचायला मिळायला.
    खरंच, अशोक म्हणायचा तेच खरं आहे, की तुझ्याकडे शैली आहे.
    - प्रमोद माने, औरंगाबाद

    उत्तर द्याहटवा
  14. लेख वाचला. तरीही अपूर्ण वाटला... त्यांच्या फक्त पत्रकारितेवर वेगळा प्रकाश टाकला, तर हल्लीच्या काही पत्रकारांमध्ये अर्ध्या हळकुंडात आलेलं पिवळेपण किमान शेखी मिरवताना तरी कमी होईल...
    अशोकराजेंना भावपूर्ण आदरांजली ��
    - दीपक रोकडे, नगर

    उत्तर द्याहटवा
  15. अप्रतिम... खूप लांबून, थोडी-फार माहिती असलेला अशोक, तू तो गेल्यानंतर माझा अगदी जवळचा मित्र बनवलास. असले हरफनमौला माझे किती खास असतात हे तुला तरी नक्की माहितीच आहे. अफलातून व्यक्तिमत्त्व तुझ्या लिखाणातून समोर उभे राहिले. मनापासून आभार. एक भन्नाट माणूस जसाच्या तसा आमच्यासमोर उभा केल्याबद्दल. त्याची कधी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही याची खंत मनात कायम राहील.
    ����
    - सुधीर देशपांडे, औरंगाबाद

    उत्तर द्याहटवा
  16. अशोकला आठवताना... 'खिडकी' कमी पडल्याचं जाणवलं . तरीही अशोकच्या विविधांगी पत्रकारितेबरोबरच त्याच्या विविध पैलूंची ओळख झाली. 'लोकसत्ता'च्या मुलाखतीपासून तर शरद पवारांपर्यंतच्या बातमीपर्यंतच्या आठवणीतून या 'बाप'माणसाच्या पत्रकारितेचा दबदबा लक्षात आला. आजची आठवणींची खिडकी सर्वांगसुंदर आणि संस्मरणीय...
    ������������
    - प्रताप देशपांडे, नगर

    उत्तर द्याहटवा
  17. तुपे यांच्याबद्दल खूप ऐकले होते. पण त्यांची भेट न झाल्याची हुरहूर आता वाटते.
    शरद कारखानीस.

    उत्तर द्याहटवा
  18. लेख वाचताना आपोआप डोळे भरून आले. पण खरंच आहे श्री. दळवी म्हणाले ते, असे नितांत सुंदर लेख अशा आगळ्यावेगळ्या माणसांच्या हयातीतच लिहिले गेले पाहिजेत. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही याची हळहळ वाटणार नाही.इतके बारीक सारीक तपशील लक्षात ठेवून नेमक्या शब्दात मांडणं हे कौशल्य याही लेखात प्रकर्षाने जाणवतं. अशोक तुपे यांच्यासारखे पत्रकार आता अभावानेच दिसतात. खूपच मोठा आवाका.
    अतिशय मनापासून आदरांजली. मनात फार दुखःद भावना आहेत.

    उत्तर द्याहटवा
  19. Ashok was really great for every one to help in all calamities.
    Adv sayaram Bankar
    X Truste Shani mandir Shingnapur

    उत्तर द्याहटवा
  20. अशा धोकादायक वातावरणात, समाजमन जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःला झोकून देणारे पत्रकार विरळच. आपला लेख वाचून अशोक तुपे या नगरीत परतले असंच वाटू लागते. 
    असो "चल उड़ जा रे पंछी कि अब ये देश हुआ बेगाना...." कदाचित हेच नियतीला मान्य असेल.

    श्रीराम वांढरे.
    भिंगार,अहमदनगर.

    उत्तर द्याहटवा
  21. अशोक विषयी तुझा लेख वाचताना खूप भरून आलं. अशोक केवळ सहकारी नव्हता.. तो मित्र झाला होता पहिल्या काही भेटीतच. खूप शिकायला मिळालं अशोककडून. एक चांगला मित्र गमावून बसलो आपण.

    उत्तर द्याहटवा
  22. अशोकजींशी व्यक्तीशः ओळख नसली तरी तुमच्या शब्दांजलीतून तुम्ही ती करून दिलीत. खूप भावली.आणि अशा व्यक्तीचा सहवास, मैत्री तुम्हाला किती सम्रुध्द करून गेली हे जाणवलं
    स्वाती लोंढे

    उत्तर द्याहटवा
  23. सतीश, अशोकचे मैत्र लाभले याचा हेवा वाटावा असे आपण सारे ‘अशोकबंधू’!त्याच्याबाबत किती आणि काय काय सांगावे याचा ठाव लागू येऊ नये इतके तो आपल्याला समृद्ध करून गेला. अशोकबाबत कितीही लिहिलं तरी तो दशांगुळे उरतोच.
    आपला हक्काचा लाघवी अशोक आता आपल्या आस-पास नसणार आहे हे वास्तव अधिक वेदनादायी आहे.
    - महेंद्र पंढरपुरे (फेसबुकवरून)

    उत्तर द्याहटवा
  24. राजेंचा उलगडा यापेक्षा होऊच शकत नाही.....
    खूपच सुंदर भावना प्रकटीकरण कारण राजेंच व्यक्तिमत्त्व व लेखक सतिशजी व त्यांच्यातील जिव्हाळा,....
    राजे...��
    ������
    - जयंत चौधरी (फेसबुकवरून)

    उत्तर द्याहटवा
  25. अशोक तुपे यांच्याबद्दलच्या आठवणीतून त्यांची ओळख झाली त्याचप्रमाणे त्यांच्याशी संबंधित म्हणून आपलाही अधिक परिचय लेखनातून झाला. अशोक तुपे यांनी पत्रकारिता करताना ग्रामीण भागाशी असलेली नाळ कधी विलग होऊ दिली नाही हे विशेष म्हटले पाहिजे आणि आपल्या पाव शतकाच्या संबंधांवरील लेखातून हे अधोरेखित योग्य प्रकारे व्यक्त झाले आहे.
    - मुकुंद नवरे

    उत्तर द्याहटवा
  26. शैलीचा आवही न आणता शैलीदार झालेला लेख. अशोक हा मित्र, सहकारी, जाणता पत्रकार सर्व बाजूंनी सम्यक उभा केला आहेत. आम्हा मुंबईकरांना श्रीरामपुरातल्या अशोक तुपे यांचं नाव ऐकून तरी कसं माहीत असणार? पण आज ओळख झाली ती तुमच्यामुळे आणि मग आता त्यांना कधीच भेटता येणार नाही या जाणिवेने हळहळ अधिकच वाढली.
    - मृदुला जोशी, मुंबई

    उत्तर द्याहटवा

आजोबा सांगतात, ‘ॲक्ट पॉझिटिव्ह’

  डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू ...