चॅम्पियन्स करंडक - ४
धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ पहिल्यापासून अठ्ठेचाळिसाव्या षट्कापर्यंत पुढेच होता. एकोणपन्नासाव्या षट्कात ते १० धावांनी मागे पडले आणि अखेर आठ धावांनी पराभूत. अफगाणिस्तानचा सनसनाटी विजय. श्रेय शतकवीर ज़दरान आणि अष्टपैलू अजमतुल्ला ह्यांना!
-------------------------------------------
सामना संपला. निकाल लागला. सामन्याचा मानकरी कोण?
शतकवीर इब्राहीम ज़दरान? पाच बळी घेणारा आणि ४१ धावा करणारा अजमतुल्ला ओमरजाई?
निर्णय घेणं मोठं कठीण होतं. पण ज़दरानचं पारडं जड ठरलं. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सर्वाधिक व्यक्तिगत धावा करणारा, अफगाणिस्तानला तीनशेच्या पार नेणारा ज़दरान ह्या ऐतिहासिक विजयातला सर्वांत मोलाचा खेळाडू ठरला!
अफगाणिस्तानच्या सनसनाटी म्हणाव्या, अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा बळी ह्या दोघांची संयुक्त कामगिरी होती. आदिल रशीदने सर्व ताकदीनिशी लगावलेला फटका ज़दरान ह्यानं लाँग ऑफला झेलला. गोलंदाज होत अजमतुल्ला!
फारसा गाजावाजा होत नाही, टीव्ही.च्या पडद्यावर आक्रमण करणाऱ्या जाहिरातींचा ओघ नाही, प्रेक्षकांनी तुडुंब भरलेली स्टेडियम नाहीत... अशा वातावरणात ‘नको नकोशी’ झालेली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढे पुढे जात आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आज झालेल्या चुरशीच्या सामन्याने तिला थोडी धुगधुगी मिळेल.
दुसऱ्यांदा लोळवलं
जागतिक स्पर्धेत इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा लोळवण्याची कामगिरी अफगाणिस्ताननं केली. ही लढत धावांच्या पावसाची, तरीही मोठ्या अटीतटीची झाली. तिचा निकाल सामन्याच्या अखेरच्या षट्कात लागला. तोवर विजयाचा लंबक कधी इकडे, तर कधी तिकडे झुकत होता.
तीन-तेरा वाजणं म्हणजे काय, ह्याचा (कडवट!) अनुभव जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला बुधवारी आला. विजयासाठी शेवटच्या १४ चेंडूंमध्ये १६ धावांची गरज आणि तीन गडी बाकी, अशी स्थिती होती त्यांची. पण मोक्याच्या १३ चेंडूंमध्ये अखेरचे तिन्ही गडी त्यांनी गमावले. धावा केल्या फक्त आठ एकेरी. त्यातले दोन बळी होते अजमतुल्ला ह्याचे. आणि उंच उडालेल्या फटक्यांचं झेलात व्यवस्थित रूपांतर करण्याची जबाबदारी महंमद नबी ह्यानं पेलली.
भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करण्याच्या उंबरठ्यावर होता. त्या वेळी ग्लेन मॅक्सवेल आडवा आला. त्याला साथ दिली अफगाणी खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हं लाहोरमध्ये दिसत होती. चेंडू अडवताना क्षेत्ररक्षक गोंधळत होते. फेकी व्यवस्थित होत नव्हत्या. ही सगळी दडपण आल्याचीच चिन्हं होती. मैदानावर सतत सळसळत्या उत्साहात असणाऱ्या रशीद खानकडून अठ्ठेचाळिसाव्या षट्कातील पहिल्या चेंडूवर एक अवघड झेल सुटला.
त्या जीवदानाचा फायदा आर्चरला घेता आला नाही. त्यानंतर फक्त तीन धावांची भर घालून तो बाद झाला. पण त्या षट्कात अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या त्या जेमी ओव्हरटनच्या बळीने. ह्या सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज होता जेमी. ते अपयश त्याला फलंदाजीतून धुवायचं होतं. शतकवीर जो रूटच्या साथीनं त्यानं अर्धशतकी भागीदारी करून यशाला खुणावलं होतं. पण अजमतुल्लाच्या हळुवार चेंडूनं घात केला. लाँग ऑनला महंमद नबीनं त्या झेलाचा सहर्ष स्वीकार केला. सामन्याचा निकाल तिथंच ठरला.
रूटचं सहा वर्षांनी शतक
सलामीवीर फिल सॉल्ट आणि जेमी स्मिथ लवकर बाद झाल्यावर दुसरा सलामीवीर बेन डकेट (३८) व जो रूट ह्यांनी तिसऱ्या जोडीसाठी ६८ धावांची भागीदारी केली. डकेट बाद झाल्यावर सगळी सूत्रं जो रूटनं स्वीकारली. एक दिवशीय सामन्यातलं त्याचं शतक तब्बल सहा वर्षांनी झालं! त्याचं ह्या आधीचं शतक मायदेशी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत होतं.
![]() |
हताश, निराश... संघाला विजयाजवळ आणलं, पण ध्येय पूर्ण होण्याआधीच बाद झाल्यानं जो रूटला आपली निराशा लपवणं कठीण गेलं. (छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी. ) ........................... |
धावांच्या पाठलागाचं समीकरण पाहिलं, तर अठ्ठेचाळिसावं षट्क संपेपर्यंत इंग्लंड अफगाणिस्तानच्या पुढेच होतं. एकोणपन्नासाव्या षट्कात ते १० धावांनी मागे पडले आणि अखेरच्या षट्कात आठ धावांनी पराभूत झाले.
यष्टिरक्षक सलामीवर रहमनुल्ला गुरबाज, सादिकुल्ला अटल, रहमतुल्ला शहा हे तिघे तंबूत परतले तेव्हा अफगाणिस्तानच्या धावा होत्या ३७. ही सगळी करामत जोफ्रा आर्चरच्या धारदार माऱ्याची. पण पहिल्या सहा षट्कांत २२ धावा देऊन ३ बळी घेणाऱ्या आर्चरच्या कामगिरीवर शेवटच्या चार षट्कांत पाणी पडलं. त्यात ४२ धावा निघाल्या.
ह्या पडझडीतून सावरलं सलामीवीर ज़दरान व कर्णधार हशमतुल्ला शाहिदी ह्यांनी. त्यांनी सावध खेळत १०३ धावाची भागीदारी केली. शाहिदी बाद झाला तिसाव्या षट्कात आणि संघाच्या धावा होत्या १४०. त्यानंतर ज़दरान ह्यानं टॉप गीअर टाकला. तो व अजमतुल्ला ओमरजाई (तीन षट्कारांसह ३१ चेंडूंमध्ये ४१) ह्यांनी ६३ चेंडूंमध्ये ७२ धावांची भागीदारी केली.
ज़दरानचा झंझावात
![]() |
कृतज्ञ... शतकानंतर इब्राहीम ज़दरान ह्याचे प्रेक्षकांना, संघातील सवंगड्यांना अभिवादन. (छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी. ) ......................... |
ह्या पराभवानंतर इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध साडेतीनशेहून अधिक धावा केल्यावरही संघाला पराभवच पाहावा लागला. ‘नशीब आपल्या बरोबर नव्हतं,’ अशी खेळाडूंनी त्या वेळी स्वतःचीच समजूत घालून घेतली असेल. पण आजच्या पराभवानंतर चित्र विपरीत झालं. ‘जंटलमन क्रिकेटर’ असणाऱ्या बटलरचं कर्णधारपदही स्वाभाविकच धोक्यात आलं आहे.
सामना तो आणि हा
विश्वचषक स्पर्धेमध्ये दिल्लीतील सामन्यात अफगाणिस्ताननं इंग्लंडवर ६९ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात रूट, बटलर, ज़रदान, अजमतुल्ला ह्यांची कामगिरी डावीच होती. त्या सामन्यात सर्वाधिक ८० धावा करणारा रहमनुल्ला गुरबाज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तीन बळी घेऊन इंग्लंडचं शेपूट गुंडाळणाऱ्या आणि झटपट २३ धावा करणाऱ्या रशीद खानच्या कामगिरीकडं दुर्लक्षच झालं. त्याची पुनरावृत्ती इथंही झाली. सॉल्ट, रूट, बटलर हे महत्त्वाचे फलंदाज बाद करणाऱ्या अजमतुल्ला ओमरजाई ह्याच्या अष्टपैलू कामगिरी निश्चितच सामन्यातील सर्वोत्तम ठरण्याएवढी महत्त्वाची होती. पण आपल्याला सगळ्यांना गोलंदाजांपेक्षा फलंदाजच जास्त आवडतात!
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #अफगाणिस्तान_इंग्लंड #इब्राहीम_ज़दरान #अजमतुल्ला_ओमरजाई #जो_रूट #रशीद_खान #महंमद_नबी #जोस_बटलर #ICC_Champions_Trophy #Afghanistan_England #Ibrahim_Zadran #Azmatullah_Omarzai #Joe_Root #Mohammad_Nabi #Rashid_Khan #Jos_Buttler
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा