सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

विराटने पुन्हा साधलेला ‘मौका’

चॅम्पियन्स करंडक - ३


शतक पूर्ण आणि विजयावर शिक्कामोर्तब!
(छायाचित्र सौजन्य : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद)

-------------------------------------
यजमान पाकिस्तानची सगळी भिस्त आता ‘जर आणि तर’च्या
समीकरणावर आहे. स्पर्धेतील त्यांच्या गच्छंतीवर भारतीय
संघानं दुबईत रविवारी जवळपास शिक्कामोर्तब केलं!
विराट कोहलीनं दमदार शतक झळकावत
‘टायगर अभी...’ अशी जणू डरकाळीच फोडली.
----------------------
आधी कुलदीपच्या फिरकीचं जाळं आणि नंतर कोहलीची झळाळती खेळी. ह्या दोन करामती पाकिस्तानला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यासाठी पुरेशा ठरणार आहेत, असं दिसतं.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत गटामध्येच सलग दुसरा पराभव यजमानांच्या वाट्याला आला. आता त्यांच्या स्वप्नाचा डोलारा ‘असं झालं तर...’ आणि ‘तसं झालं तर...’ ह्या दोन पोकळ वाशांवर उभा आहे. स्वप्न स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठण्याचं. आपण यजमान असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्याच देशातील प्रेक्षकांसमोर खेळायचं आणि करंडक उंचवायचा, हे स्वप्न. पण लाहोर गाठणं फार दूर दिसतंय तूर्त तरी.

पाकिस्तानचा संघ आता ह्या समीकरणांवर अवलंबून आहे -
गटातील लढतीत सोमवारी बांग्लादेशानं न्यू झीलँडला हरवलं पाहिजे.
भारताकडूनही न्यू झीलँडचा पराभव व्हायला हवं.
गटातील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा बांग्लादेशावर दणदणीत विजय.

असंच सगळं झालं, ‘जर आणि तर’ प्रत्यक्षात आल्यावरच पाकिस्तान उपान्त्य फेरीत जाण्याची आशा आहे. ही सगळी समीकरणं जुळून आली, तर पाकिस्तानचं नशीब जोरावर, असंच म्हणणं भाग पडेल.

यजमानपद लाभाचं नाहीच!
पण एकूणच कटकटी करीत मिळविलेलं यजमानपद पाकिस्तानला फारसं लाभकारक ठरत नाही, असं दिसतंय. दोन वर्षांपूर्वी आशिया चषक स्पर्धेच्या वेळी असंच झालं. पाकिस्तानचा संघ काही अंतिम सामन्यात पोहोचला नाही. भारत आणि श्रीलंका ह्यांच्यातील लढत श्रीलंकेतच झाली. आता ती दुबईत होणार का, हे पाहण्याची उत्सुकता आहे.

विराट कोहली कोठे चुकतोय, ह्याबद्दल सुनील गावसकर, अनिल कुंबळे ह्यांच्यासारख्या मातबरांनी हा सामना सुरू होण्यापूर्वी भाष्य केलं होतं. त्यानं आत्मविश्वास गमावलाय की काय, अशीही शंका बऱ्याच जणांनी बोलून दाखवली होती.

पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराटच्या बॅटला अधिकच धार येते, हा अनुभव आहेच. मेलबर्नमधली त्याची ती खेळी आठवतेय ना..! त्याचा तो डाव अधिक आक्रमक आणि निर्णायक. दुबईत आज तो तुलनेनं शांत खेळला. अधिक ठामपणे आणि तेवढ्याच निर्धारानं. त्यानं टीकाकारांची तोंडं बंद केली आणि आपल्या कोट्यवधी पाठीराख्यांना (पुन्हा एकदा) खूश करून टाकलं! पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळी सहकारी खेळाडूंनी त्याची फिरकी घेताना सांगितलं होतं, ‘नव्या खेळाडूनं सचिनपा जींच्या पाया पडावं लागतं!’ त्याच सचिनच्या पंक्तीत तो आज बसला. त्याच्या शतकसंख्येचा मैलाचा दगड ओलांडून.

खुशदिल शहाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने सीमापार धाडत विराटने शतक पूर्ण केलं. आणि भारतीय विजयावर शिक्कामोर्तबही. हा त्याचा फक्त सातवा चौकार होता. तेवढेच चौकार त्याच्या निम्मे चेंडू खेळून जवळपास निम्म्या धावा करणाऱ्या शुभमन गिल ह्याचेही आहेत. श्रेयस अय्यरचेही पाच चौकार आहेत. पण विराटचा स्ट्राईक रेट ह्या दोघांहून सरस. त्याचं शतक १११ चेंडूंमध्ये. म्हणजे स्पष्ट होतं की, त्यानं फलंदाजीचं आक्रमण कसं धावतं ठेवलं ते...


विराट... पाकिस्तानविरुद्ध आणखी एक अप्रतिम खेळी.
(छायाचित्र सौजन्य : दैनिक डॉन)

.......................................
निर्णायक भागीदाऱ्या
जोरदार फटकेबाजी करीत नसीम शहा आणि शाहीन शहा आफ्रिदी ह्यांच्या माऱ्याची धार बोथट करणारा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यावर विराट मैदानात उतरला आणि विजयी पताका फडकावूनच मैदानाबाहेर आला. अर्धशतक हुकलेल्या शुभमन गिल ह्याच्या जोडीनं त्यानं ६९ धावांची, दोन धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत ५६ धावा टोलविणाऱ्या श्रेयस अय्यर ह्याच्या बरोबर ११४ धावांची भागीदारी केली. ह्याच निर्णायक भागीदाऱ्यांनी पाकिस्तानी गोलंदाजी दुबळी ठरवली.

इथं एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी की, रोहित व गिल ज्या चेंडूंवर बाद झाले, ते अफाटच होते. अन्य कोणताही फलंदाज त्यावर बाद झाला असता.

‘जलदगती गोलंदाजीवर धावा काढायच्या आणि फिरकी जपून खेळायची’, अशा व्यूहरचनेनुसारच विराट व अन्य फलंदाज खेळले. लेगस्पिनर अबरार अहमद ह्यानं एक बळी घेत १० षट्कांमध्ये फक्त २८ धावा दिल्या. ही तूट अन्य गोलंदाजांकडून त्यांनी वसूल केली. दरम्यान, एकेरी-दुहेरी धावा पळत राहून त्यांनी धावफलक हलता ठेवला आणि धावांची गतीही मंदावू दिली नाही. पहिलं षट्क सोडलं तर पाकिस्तानची धावसंख्या भारताहून सरस कधीच नव्हती.

सलामीच्या सामन्यात बांग्लादेशाचा निम्मा संघ गारद करणाऱ्या महंमद शमीची सुरुवातच स्वैर होती. पहिल्याच षट्कात त्यानं पाच वाईड चेंडू टाकले! नंतर त्याला लय सापडली. असं होऊनही पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला फार काही करता आलं नाही. संघानं अर्धशतक गाठलं होतं ते दोन गडी गमावून.

हार्दिक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल करणाऱ्या बाबर आज़म दुसऱ्या चेंडूवर राहुलकडे झेल देऊन परतला. सहाच चेंडू पडले आणि इमाम उल-हक अक्षरच्या अचूक फेकीने धावबाद झाला. इमाम हा इंझमामचा खरा वारस असल्याची खातरी त्यामुळं अनेकांना पटली!

निर्धाव चेंडूंचं शतक
सौद शकील आणि कर्णधार महंमद रिजवान ह्यांनी मग पुढची जवळपास २४ षट्कं पडझड होऊ दिली नाही. त्यांची १०४ धावांची भागीदारी १४४ चेंडूंमधली. ह्या भागीदारीनं धावसंख्येला आकार दिला आणि डावाला खीळही घातली. वरच्या फळीतल्या फलंदाजांना डावातील पहिल्या १६१पैकी १०० चेंडूंवर एकही धाव करता आली नाही. संपूर्ण डावाचा विचार केला, तर तीनशेपैकी १४७ चेंडू निर्धाव गेले.


अक्षरकडून कुलदीपचं कौतुक...
........................
पाकिस्तानच्या डावात १४ चौकार आणि तीन षट्कार होते; त्यातला पहिला षट्कार बेचाळिसाव्या षट्कात होता. शकील व रिजवान जोडी खेळत असताना मधल्या षट्कांमध्ये धावा दाबण्याची चांगली कामगिरी तिन्ही फिरकी गोलंदाजांनी केली. त्यांनी मिळून आज पाच बळी मिळवले. दोन फलंदाज धावबाद झाले त्या फेकी अक्षर पटेलच्या होत्या.

पराभव का झाला?
आजच्या ह्या लढतीत पाकिस्तानचा पराभव का झाला? ‘डॉन’ दैनिकानं त्याची कारणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात म्हटलंय - 
ह्या वेळी आपण नेमकं कशामुळे हरलो हो?
भारतीय गोलंदाज चेंडू काय हातभर स्विंग करीत होते की काय?
हार्दिक पंड्या एकदम ताशी दीडशे किलोमीटरच्या वेगानं चेंडू फेकू लागला होता का?
भारतीय फलंदाजांना काही विशेष सवलत किंवा वातावरणाचा फायदा मिळाला का?
भारतीय संघाकडे असं कोणतं अपूर्व किंवा असामान्य कौशल्य होतं?

... ह्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर एका शब्दाचं - ‘नाही!’ ह्यापैकी काहीही नाही. ‘मध्यमगती’ अशी आपण हेटाळणी केलेल्या त्यांच्या गोलंदाजांनी दिशा आणि टप्पा पकडून मारा केला. त्याच्या उलट आपल्या कथित तेज गोलंदाजांचा मारा स्वैर होता. त्यांनी झेल घेतले, आपण सोडले. त्यांचे फलंदाज टिच्चून खेळले आणि आपल्या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या.

थोडक्यात, अशा कुवतीच्या संघाला हरविण्यासाठी कोणालाही खास काही कर्तृत्व बजावण्याची गरजच नाही!

हा सामना चालू असताना पाकिस्तानी चाहत्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या मजेशीर होत्या. काही जण थोडे आशावादी आणि नंतर निकाल स्पष्ट झाल्यावर आपल्याच संघाची टर उडवणारेही भरपूर. शमीचं पहिलं षट्क आणि रोहितचं बाद होणं, ह्याच दोन्ही वेळा पाकिस्तानी संघाच्या पाठीराख्यांच्या अपेक्षा फार उंचावल्या होत्या. अर्थात आशेचा हा फुगा लगेचच फुटला.

चॅम्पियन्स करंडकाच्या २०१७मधील अंतिम सामन्यानंतर भारतानं सलग सहा वेळा पाकिस्तानला धूळ चारली आहे. हे सगळेच विजय मोठे खणखणीत आणि निर्विवाद.

‘शारजा हार जा...’ असं म्हणण्याचा जमाना कधीच मागं पडला. आता ‘दुबई है, दिल जीत जा...’ म्हणण्याचा काळ आहे. पाकिस्ताननं ते रविवारी पुन्हा एकदा अनुभवलं. भारतानं पुन्हा एकदा ‘मौका’ साधला!
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #भारत_पाकिस्तान #विराट_कोहली #कुलदीप_यादव #दुबई #महंमद_शमी #अक्षर_पटेल #मौका_मौका #ICC_Champions_Trophy #India_Pakistan #Virat_Kohli #Shami #Kuldeep #Axar_Patel

1 टिप्पणी:

  1. भारताचा विजय रविवारचा आनंद अधिक द्विगुणित करणारा कारण विराट च शतक
    साहेब
    खुप।सुंदर
    आपले अभिनंदन

    उत्तर द्याहटवा

अफगाणी सनसनाटी

  चॅम्पियन्स करंडक - ४ चितपट! मिरवा रे पठ्ठ्याला... इंग्लंडला हरवल्याचा आनंद साजरा करताना अफगाणिस्तानच्या नवीद ज़दरान ह्यानं अजमतुल्ला ह्याल...