दिल्लीतील वनवास संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा जल्लोष. (छायाचित्र सौजन्य - ‘ए. पी.’) -------------------------------------- |
लोकसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये राजधानीतल्या सर्वच्या सर्व जागा जिंकूनही विधानसभा मात्र भा. ज. प.ला हुलकावणीच देत राहिली. नाही म्हणायला २०१३च्या निवडणुकीत हर्षवर्धन ह्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ३२ जागांपर्यंत मजल मारली होती. पण बहुमत नाही. पहिल्याच निवडणुकीत २८ जागा जिंकणारे आपचे अरविंद केजरीवाल काँग्रेसच्या पाठिंब्यावर अल्प काळासाठी मुख्यमंत्री झाले.
आपला बाहेरून पाठिंबा घेऊन सत्तेवर आलेले कोणतेही सरकार काँग्रेस फार काळ टिकू देत नाही, सत्ताधाऱ्यांना स्वास्थ्य लाभू देत नाही. केजरीवाल ह्यांना त्या प्रयोगाचा अनुभव आला.
काँग्रेसच्या ‘बाहेरून सासुरवासामुळे’ केजरीवाल ह्यांना राजीनामा द्यावा लागला आणि २०१५मध्ये विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक झाली. त्यात ‘आप’ने चमत्कारच घडविला. सत्तरपैकी ६७ जागा पक्षाने जिंकल्या. वर्षभरापूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजधानीतल्या सर्व जागा जिंकणाऱ्या भा. ज. प.च्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या. त्या वेळी भा. ज. प.च्या परिस्थितीवर कोणी तरी एक छान विनोदही केला होता -
पहले चार कम थे,
अब चार से भी कम है।
😅😆😇
पुढे २०२०च्या निवडणुकीतही फार काही वेगळे झाले नाही. भाजपच्या जागा तीनवरून आठवर गेल्या, एवढेच. काँग्रेसला सलग दुसऱ्या निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही.
‘मोदी है तो मुमकीन है...’ घोषणेवर दिल्लीकर भा. ज. प. कार्यकर्त्यांचा ह्या वेळी खरंच विश्वास बसला असेल. (छायाचित्र सौजन्य - ‘इंडिया टुडे इन्स्टाग्राम’) ------------------------------------- |
ह्या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातील लढत वेगळीच होती. एक माजी मुख्यमंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव अशी ही निवडणूक लक्षवेधक होणार, ह्याची शंकाच नव्हती.
मदनलाल खुराना ह्या दिग्गज नेत्याच्या जागी साहिबसिंह वर्मा मुख्यमंत्री झाले. ही गोष्ट तीन दशकांपूर्वीची. खुराना काही गप्प बसले नाहीत. त्यांनी वर्मांना त्रास देणं सुरू केलं म्हणतात.
पण वर्मांना खुराना कमी आणि कांद्या-टोमॅटोची भाववाढ जास्त भोवली. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या जागी सुषमा स्वराज ह्यांना भा. ज. प.नं आणलं. सुषमांच्या चेहऱ्याचा, वलयाचा काही फायदा झाला नाही. भा. ज. प.च्या हातून राजधानी निसटली ती निसटलीच. तीन वेळा काँग्रेस आणि सव्वादोन(!) वेळा आम आदमी पक्षाची सत्ता आली.
आधी राजीव गांधी आणि नंतर सोनिया ह्यांच्या आतल्या वर्तुळात असलेल्या शीला दीक्षित दिल्लीच्या दीर्घ काळ मुख्यमंत्री राहिल्या. तीन वेळा. त्यांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवतच अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभेच्या मैदानात उतरले. त्या वेळी परिस्थितीच अशी होती की, काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर आरोप करावा आणि तो त्याला चिकटावा. स्वाभाविकच ‘आप’ने पदार्पणातच मुसंडी मारली.
पुढच्या दोन निवडणुकांत ‘आप’ने देशाच्या राजधानीतून काँग्रेसला तर संपवलंच; पण भा. ज. प.लाही धोबीपछाड दिला. राजकारणाचं ‘केजरीवाल प्रारूप’ सुरुवातीला मध्यमवर्गाला भावलं. दिल्ली सोडली तर उर्वरित देशाचा लवकरच भ्रमनिरास झाला.
पुढे नेतेगिरी, साधेपणा ह्याच्या नशेत केजरीवाल वाहत गेले, असं दिसतंय. ‘नशा करी पक्षाची दुर्दशा’ हे त्यांच्या पक्षाबाबत खरं ठरलेलं आता पाहायला मिळतंय. त्यांना स्वतःला नवी दिल्ली मतदारसंघात पहिल्या पराभवाची चव चाखायला मिळाली.
![]() |
परवेश साहिबसिंग ------------- |
हा निकाल म्हणजे संदीप दीक्षित ह्यांनी एक प्रकारे सूड उगवला, असंच म्हणावं लागेल. त्यांच्या आईवर केजरीवाल ह्यांनी बेछूट आरोप केले होते. निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव केला होता. त्या पराभवामुळे राजधानीतलं शीला दीक्षित नावाचं प्रस्थ संपून गेलं. केजरीवालांना आता दीक्षित ह्यांच्यामुळंच पराभूत व्हावं लागलं, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातंय. अर्थात दीक्षित उमेदवार नसते, तर ती सर्व मतं केजरीवाल ह्यांच्या पारड्यात पडली असती, असं मानणं अंकगणिती भाबडेपणा आहे.
प्रत्येक निकालानंतर असा भाबडेपणा पराभूत झालेल्या पक्षाचे नेते वा समर्थक आणि त्यांच्याबद्दल हळवा कोपरा असलेले राजकीय पंडित करीतच असतात. मतांची टक्केवारी किंवा अल्प-स्वल्प मताधिक्याकडे बोट दाखवून ते स्वतःचंच समाधान करून घेत असतात. तसं आता दिल्लीतही होईल.
मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागा, ह्यांचे समीकरण ह्यांमध्ये नेहमीच अंतर असते. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ह्या निवडणुकीत २२ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाला ४३.५७ टक्के मते आहेत.
भा. ज. प.च्या वाट्याची मते आहेत ४५.५६ टक्के. जागा मात्र ४८. म्हणजे आपपेक्षा फक्त दोन टक्के मते अधिक मिळवून भा. ज. प.ने त्यांच्या दुप्पट जागा जिंकल्या आहेत. दिल्लीच्या निकालाचे विश्लेषण करताना आणि भा. ज. प.चा विजय कसा सफाईदार नाही, हे दाखविण्यासाठी मताच्या टक्केवारीचा असा आधार नक्कीच घेतला जाईल.
सत्तेच्या शर्यतीत उतरलेल्या वरील दोन पक्षांव्यतिरिक्त इतरांचीही मतं लक्षात घ्यावी लागतील. काँग्रेसला ६.३४ टक्के मते आहेत. त्या पक्षाची मते मागच्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी वाढली आहेत. आणि असं असूनही सलग तिसऱ्या निवडणुकीत त्यांना खातं उघडणं जमलेलं नाही.
ह्या आधीच्या निवडणुकीत आपला ५३.५७ टक्के, भा. ज. प.ला ३८.५१ टक्के आणि काँग्रेसला सव्वाचार टक्के मते होती. भा. ज. प.च्या आठ पट जागा तेव्हा आपने जिंकल्या होत्या.
निवडणुकीच्या निकालाचा कौल दिसू लागताच विशिष्ट विश्लेषक, पत्रकार ह्यांची रडगाणी सुरू झाली आहे. त्यातलं एक फार भर देऊन सांगितलं जातंय. ते म्हणजे आप आणि काँग्रेस ह्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. तेच भोवलं आणि भा. ज. प.चं फावलं.
काँग्रेसच्या उमेदवारांनी ‘खाल्लेल्या’ मतांमुळे दिल्लीतील १३ मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. म्हणजे मताधिक्याहून काँग्रेसच्या उमेदवाराला जास्त मतं आहेत, त्याचा हा परिणाम, असं सांगितलं जातंय. रडीचाच डाव खेळायचा म्हटला की, कसेही युक्तिवाद करता येतात आणि शोधही लावता येतात. त्याचंच हे एक उदाहरण होय.
जशी ही एक बाजू, तशी दुसरीही बाजू असेलच की ह्या निकालाला. काँग्रेसच्या उमेदवारांमुळे किती मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाला? बावीसपैकी नऊ म्हणजे तब्बल ४० टक्के जागांवर आपचा काँग्रेसमुळे फायदा झालेला आहे. मुख्यमंत्रीही आतिशा ह्याही काँग्रेसच्या अलका लांबा ह्यांच्यामुळे कशाबशा विजयी झाल्या आहेत. ‘आप’साठी काँग्रेसचा उमेदवार फायदेशीर ठरलेल्या जागांचा निकाल असा -
बुराड़ी - संजीव झा (आप) - १,२१,१८१, शैलेंद्रकुमार (संयुक्त जनता दल)- १,००,५८०
मताधिक्य - २०,६०१ आणि काँग्रेसचे महेश त्यागी ह्यांना मिळालेली मते - १९,९२०
दिल्ली कँटोन्मेंट - वीरेंदरसिंग कडियान (आप) - २२,१९१, भुवन तंवर (भारतीय जनता पक्ष) - २०,१६२.
मताधिक्य - २,०२९ आणि काँग्रेसचे उमेदवार प्रदीपकुमार उपमन्यू ह्यांना मिळालेली मते - ४,२५२
आंबेडकरनगर - डॉ. अजय दत्त (आप) - ४६,२८५, खुशीराम चुनार (भाजप) - ४२,०५५
मताधिक्य - ४,२३० आणि काँग्रेसचे उमेदवार जयप्रकाश ह्यांना मिळालेली मते - ७,१७२
ओखला - अमानतुल्ला खान (आप) - ८८, ९४३, मनीष चौधरी (भाजप) - ६५,३०४
मताधिक्य - २३,६३९ आणि त्यानंतरच्या दोन पराभूत उमेदवारांना मिळालेली मते ५२,२९७ - शिफ़ा उर रहमान खान (एआयएमआयएम) - ३९,५५८ व अरिबा खान (काँग्रेस) - १२,७३९.
कोंडली - कुलदीपकुमार मोनू (आप) - ६१,७९२, प्रियांका गौतम (भाजप) - ५५,४९२
मताधिक्य - ६,२९३ आणि काँग्रेसचे उमेदवार अक्षयकुमार ह्यांना मिळालेली मते - ७,२३०
पटेलनगर - प्रवेशरत्न (आप) - ५७,५१२, राजकुमार आनंद (भाजप) - ५३,४६३
मताधिक्य - ४,०४९ आणि काँग्रेसच्या उमेदवार कृष्णा तीरथ ह्यांना मिळालेली मते - ४,६५४
सदर बजार - सोमदत्त (आप) - ५६,६७७, मनोजकुमार जिंदाल (भाजप) - ४९,८७०
मताधिक्य - ६,३०७ आणि काँग्रेसचे उमेदवार अनिल भारद्वाज ह्यांना मिळालेली मते - १०,०५७
सीमापुरी - वीरसिंह धिंगान (आप) - ६६,३५३, कु. रिंकू (भाजप) - ५५,९८५
मताधिक्य - १०,३६८ आणि काँग्रेसचे उमेदवार राजेश लिलोठिया ह्यांना मिळालेली मते - ११,८२३
आणि हा सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ. मावळत्या मुख्यमंत्री आतिशी तिथल्या उमेदवार होत्या.
काल्काजी - आतिशी मार्लेना (आप) - ५२,१५४, रमेश बिधुरी (भाजप) - ४८,६३३
मताधिक्य - ३,५२१ आणि काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा ह्यांना मिळालेली मते - ४,३९२
एकूणच ही निवडणूक वेगळी झाली. ‘आप’च्या अहंकाराला थापविणारी, भा. ज. प.ला सुखावणारी आणि काँग्रेसला पुन्हा नाकारणारी. पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की, निवडणुकीत मिळालेली मतं आणि जागा, ह्यांचं समीकरण वेगळंच असतं.
........
#दिल्ली_निवडणूक #भाजप #आप #काँग्रेस #अरविंद_केजरीवाल #साहिबसिंग_वर्मा #शीला_दीक्षित #परवेश_साहिबसिंग #नवी_दिल्ली
एक नंबर
उत्तर द्याहटवा