शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

प्रश्न विचारणारा विजय

चॅम्पियन्स करंडक - २


शतकवीर शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा ह्यांनी जोरदार सलामी दिल्यानंतरही
भारताल विजयासाठी थोडं झगडावं लागलंच.
(छायाचित्र सौजन्य : आयसीसी)
-------------------------

सहा गडी नि एकवीस चेंडू राखून भारताचा विजय, हा दिसणारा निकाल तेवढा काही एकतर्फी नाही. पहिल्या पॉवर प्लेमध्ये निम्मा संघ गारद करूनही बांग्लादेशाला सव्वादोनशेची मजल मारू दिली.
षट्कामागं सहा धावांच्या गतीनं खेळूनही नंतर
भारतीय फलंदाजांनी फिरकीपुढं तलवार म्यान केली.
------------------------------

पहिला पॉवर प्ले संपायच्या आधी निम्मा डाव गुंडाळला असताना प्रतिस्पर्ध्याला किती मजल मारू द्यायची? तो डाव किती षट्के चालू द्यायचा?
पहिला पॉवर प्ले संपता संपता षट्कामागे सहा धावांहून किंचित अधिक गती राखल्यावर डावाला खीळ कशी लावून घ्यायची? आपल्या कोट्यवधी चाहत्यांच्या मनातली धाकधूक किती वाढवायची?

...वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोहित शर्मा आणि त्याच्या भिडूंना चांगल्या रीतीनं देता येतील. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतला पहिला सामना जिंकल्यामुळं आज त्यांना ती द्यावी लागत नाहीत, हे खरंय. पण ‘नेट रन रेट’ मोठा ठेवण्याची संधी भारतीय संघानं दवडली आहे. त्याबद्दल खंतावण्याची वेळ संघावर येणार नाही, अशी अपेक्षा आहे!

बांग्लादेशाविरुद्धच्या सामन्यात सोडलेले सोपे झेल, काहीसं सुस्त क्षेत्ररक्षण, प्रतिस्पर्धी गोलंदाजांना डोक्यावर बसवून घेणं... याबद्दलही खेद करावा लागणार नाही, हीही एक भाबडी आशा!

पहिल्याच षट्कात यश
दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरलेला महंमद शमी, उत्साहाने फसफसलेला हर्षित राणा, गोलंदाजीतील पहिला बदल म्हणून आलेला अक्षर पटेल ह्या सगळ्यांनी आपापल्या पहिल्याच षट्कात संघाला यश मिळवून दिलं. सलामीवीर तनज़िद हसन चेंडूमागे धाव काढत होता. आपला साथीदार सौम्य सरकार आणि कर्णधार नजमुल शांतो भोपळा न फोडताच बाद झाल्याचं दडपण त्यानं घेतलं नव्हतं. शमीच्या दोन षट्कांमध्ये त्यानं तीन कडक चौकार लगावलेले होते.

आत्मविश्वासानं खेळणाऱ्या तनज़िदचा अडथळा अक्षर पटेलनं दुसऱ्याच चेंडूवर दूर केला. तो नाबाद असल्याचा मैदानावरील पंचाचा निर्णय टीव्ही. पंचाने बदलायला लावला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर मुशफिकर रहमानही बाद! हे दोन्ही झेल यष्टिरक्षक राहुलचे.

त्यानंतरचा चेंडू ऑफ यष्टीच्या किंचित बाहेर पडलेला. जाकीर अली तो दाबायला गेला आणि बॅटची कड घेऊन सरळ पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात. झेल सुटला, अक्षरची हॅटट्रिक रोहितमुळे खोडली गेली. आणि मग पुढचा बळी मिळवण्यासाठी भारताला २०६ चेंडू वाट पाहावी लागली.

झेल सुटल्यावर रोहित स्वतःवरच संतापला. त्यानं तीन-चार वेळा जमिनीवर हात आपटून रागाला वाट करून दिली. दोन्ही हात जोडून अक्षरची माफीही मागितली.

गमावलेल्या दोन संधी
त्यानंतर अशाच दोन संधी भारतानं गमावल्या. कुलदीप यादवच्या पहिल्या आणि डावातील विसाव्या षट्कात तौहिद हृदयचा फटका मिडऑफवर उभ्या असलेल्या हार्दिक पंड्याच्या हातातून उडाला. तेविसाव्या षट्कातील पहिल्याच चेंडूवर रवींद्र जाडेजानं जाकीर अली ह्याला बाहेर खेचलं होतं. पण चेंडू सफाईनं घेणं राहुलला जमलं नाही आणि यष्टिचितची संधी हुकली. बांग्लादेशाचं शतकही तोवर पूर्ण झालेलं नव्हतं.


हृदय आणि जाकीर ह्यांनी दोनशेहून अधिक चेंडू खेळत दीडशे धावांची भागीदारी केली.
ह्याच जोडीमुळं बांग्लादेशाच्या धावसंख्येला आकार आला.
(छायाचित्र सौजन्य : दैनिक प्रथम आलो, ढाका)
----------------------------------

भारतीय क्षेत्ररक्षकांनी केलेल्या ह्या कृपावर्षावाचा पुरेपूर फायदा हृदय आणि जाकीर ह्यांनी घेतला. आधी सावध आणि मग संधी मिळेल तशी फटकेबाजी करीत त्यांनी १५४ धावांची भागीदारी केली. रोहित गोलंदाजीत बदल करीत राहिला. त्याला ह्या जोडीनं दाद दिली नाही. त्यांच्यामुळे चाळिसाव्या षट्काअखेरीस बांग्लादेशाची धावगती पहिल्यांदा षट्कामागे चारपेक्षा थोडी जास्त झाली.

शमीचे पाच बळी
महंमद शमीनं जाकीर अलीला कोहलीकडं झेल द्यायला लावून ही जोडी फोडली. तोवर जाकीरनं (६८) संघाच्या धावसंख्येला आकार दिला होता. हृदयनं शानदार शतक झळकावलं. शमीनं शेपटाला फार वळवळ करू दिली नाही. त्यानं पाच गडी बाद करून एक दिवशीय सामन्यातील दोनशे बळीचा टप्पा गाठला. राणानं तीन आणि पटेलनं दोन बळी मिळवले. पंड्या, जाडेजा आणि कुलदीप ह्यांना एकही गडी बाद करता आला नाही. त्यांची गोलंदाजी तेवढी भेदक पडली नाही.

अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर बढती देण्याचं सुखस्वातंत्र्य अनुभवणाऱ्या भारतीय संघासाठी २२९ धावांचं आव्हान फारसं कठीण नव्हतंच. सहा गडी आणि २१ चेंडू राखून त्यांनी ते गाठलंही. पण नवव्या षट्कापासून थेट एकतिसाव्या षट्कापर्यंतचा प्रवास आणि धावांची गती उगीचच काळजी करायला लावणारी होती, हेही खोटं नाही.

मुस्तफिजूर रहमानच्या पहिल्या षट्कानं रोहितला सतावलं. पहिल्याच चेंडूवर पायचितचं जोरदार अपिल झालं. तिथे बहुतेक रोहितला काही जाणवलं असावं. चौथ्या षट्कापासून पूर्वपरिचित रोहित दिसू लागला. मुस्तफिजूरचा त्यानं खरपूस समाचार घेतला. भारतीय संघाचं अर्धशतक आठव्या षट्कात पूर्ण झालं.

डाव बहरू लागतोय असं दिसताच रोहितच्या बहुतेक अंगात येतं. त्या जुन्या प्रयोगाचं आजही दर्शन घडलं. दहाव्या षट्कात तस्कीन अहमदचा चेंडू भिरकावण्याच्या नादात रोहित चुकला आणि बाद झाला.

धावांच्या गतीला ब्रेक
त्यानंतर धावांच्या गतीला का कुणास ठाऊक ब्रेक लागला. नेहमीच्या तुलनेत फार संथ, तरीही विश्वासानं खेळणाऱ्या विराट कोहलीनं शुभमनच्या साथीनं ४३ धावांची भागीदारी केली. लेगस्पिनर रिशाद होसेननं त्याचा बळी मिळवला. त्यानंतर श्रेयस अय्यर व अक्षर पटेल फार काळ टिकले नाहीत. तिसावं षट्क संपलं तेव्हा भारताच्या धावांचा वेग पाचपेक्षाही कमी होता आणि चार गडी बाद झालेले.

जाकीर अलीनं स्क्वेअर लेग सीमारेषेवर के. एल. राहुलचा झेल सोडला नसता तर भारताची परिस्थिती कठीण बनली असती. सुदैवानं साथ दिली. शुभमन गिल व राहुल ह्यांनी ९८ चेंडूंमध्ये ८७ धावांची भागीदारी करीत नाव पैलतिरी सुखरूप पोहोचविली.

ह्या विजयात मोलाचा वाटा उचलला गिलनं. समोर पडझड होत असतानाही तो ठामपणे उभा राहिला. त्याच्या शतकाचं मोल हृदयच्या शतकाएवढंच. दोन बळी घेणारा रिशाद आणि मेहेदी हसन मिराज ह्यांच्या फिरकी माऱ्यानं भारतीय फलंदाजांना जखडून टाकलं होतं, हे नक्की. त्या दोघांच्या २० षट्कांमध्ये ७५ धावा निघाल्या आणि दोघांनीही फक्त एक एक चौकार दिला.

निकाल दाखवतो तेवढा हा सामना एकतर्फी झालेला नाही. तो फार रंगतदार किंवा अटीतटीचा नव्हता, हे खरं. पण पराभूत बांग्लादेश संघानं दोन्ही डावांतल्या मधल्या षट्कांमध्ये छाप सोडली. ‘काल काय झालं’ हे विसरून आणि तरीही त्यातल्या चुकांपासून धडा घेऊन भारताला रविवारी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरावं लागेल.
......
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #भारत_बांग्लादेश #शुभमन_गिल #रोहित_शर्मा #हृदय_जाकीर #महंमद_शमी #ICC_Champions_Trophy #India_BanglaDesh #Rohit_Sharma #Shami #Gill

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अफगाणी सनसनाटी

  चॅम्पियन्स करंडक - ४ चितपट! मिरवा रे पठ्ठ्याला... इंग्लंडला हरवल्याचा आनंद साजरा करताना अफगाणिस्तानच्या नवीद ज़दरान ह्यानं अजमतुल्ला ह्याल...