चॅम्पियन्स करंडक - १
![]() |
विजयावर शिक्कामोर्तब झालं बुवा! यजमान पाकिस्तानविरुद्धच्या जयाचा----------------------------------------- |
फार वाट पाहायला लावून चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेची नवी आवृत्ती अखेर सुरू झाली. सलामीच्या लढतीतच यजमान पाकिस्तानला पराभव पचवावा लागला. ब्लॅक कॅप्सनं शानदार सांघिक खेळ केला. पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी केलेली आतषबाजी आकर्षक खरी; पण सामन्याच्या निकालावर परिणाम न करणारी!
------------------------------
विजेतेपदाच्या शिखरावरून पराभवाच्या गर्तेत! चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या पाकिस्तानची ही कहाणी. स्पर्धेतील सलामीचा सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये बुधवारी खेळला गेला. त्यात न्यू झीलँडनं यजमानांना ६० धावांनी हरवलं. (किती टीव्ही. संच आज फुटले असतील बरं!)
पहिल्याच घासाला खडा लागला, हे खरं. मागच्या (२०१७) स्पर्धेतही असंच झालं होतं. पहिल्या सामन्यात भारताकडून सव्वाशे धावांनी पराभूत झालेल्या पाकिस्ताननं नंतर उचल खाल्ली. पुढच्या लढतींत उत्तम खेळ करीत करंडक जिंकला. तोही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावरच दणदणीत विजय मिळवून! असं असलं तरी घरच्या मैदानावरचा आजचा पराभव अधिक लागणारा म्हटला पाहिजे.
पस्तिसावं षट्क
पाकिस्तानच्या डावातलं पस्तिसावं षट्क आणि त्यातला शेवटचा चेंडू. न्यू झीलँडचा कर्णधार मिचेल सँटनर ह्यानं बाबर आज़म ह्याला पुन्हा लालूच दाखविली. मोहाचं आमंत्रण स्वीकारत बाबरनं स्वीप मारायचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागून उंच उडाला. आणि स्क्वेअर लेगला असलेल्या केन विल्यमसन ह्याच्या हातात आरामात जाऊन बसला!
बाबर तंबूत परतत असताना वेळी टीव्ही.च्या पडद्यावर दोन दृश्यं लागोपाठ दिसली.
पहिलं होतं उत्साही प्रेक्षक हताश झाल्याचं. त्यांना अपेक्षित असलेला षट्कार किंवा दोन चेंडू आधी बसलेला चौकार पुन्हा दिसला नाही. पाकिस्तानच्याव (तोवर अवघड झालेल्या) विजयाची एकमेव आशा असलेला बाबर आज़म बाद झाल्याचा धक्का समर्थकांना बसलेला उघड दिसत होतं.
त्याच्या पाठोपाठ दुसरं दृश्य दिसलं - बरेच प्रेक्षक स्टेडियम सोडून परत निघाले होते. आपला संघ सामना जिंकेल ही अपेक्षा त्यांनी सोडली होती. म्हणूनच त्यांनी स्टेडियमचा निरोप घेतला.
बाबरच्या रूपानं यजमान पाकिस्तान संघानं सहावा गडी गमावला होता. राहिलेल्या ९६ चेंडूंमध्ये तब्बल १६८ धावा काढायच्या होत्या. हे आव्हान पेलण्याची क्षमता असलेलं कोणी राहिलेलं नाही, हे ओळखूनच पाठीराख्यांनी काढता पाय घेतला होता.
नंतरची आतषबाजी
स्टेडियम सोडणाऱ्यांना आणि चमत्काराची आशा बाळगून म्हणा किंवा ‘तिकीट काढून आलोच आहोत तर पूर्ण सामना पाहू तरी...’ असं म्हणत स्टेडियममध्ये बसलेल्यांना नंतर काही आतषबाजी होईल, ह्याची कितपत कल्पना होती? पुढच्या ८० चेंडूंमध्ये १०७ धावा फटकावल्या गेल्या.
त्याची सुरुवात खुशदिल शहा ह्यानं केली. आधी त्यानं सँटनरच्या आणि मग मायकेल ब्रेसवेलच्या षट्कात दोन-दोन चौकार लगावत आपला इरादा स्पष्ट केला. बाबर बाद झाला तेव्हा १२ धावांवर खेळत असलेल्या खुशदिलनं चौफेर आक्रमण करीत घरच्या प्रेक्षकांचं दिल खूश करणारी खेळी केली. त्यानं ३८ चेंडूंतच अर्धशतक फटकावलं. सातव्या क्रमांकावरच्या फलंदाजानं टिच्चून केलेली खेळी.
खुशदिल, शाहीन शहा आफ्रिदी, नसीम शहा आणि हारिस रौफ ह्या गोलंदाजांनी फलंदाजांच्या भूमिकेत सहा षट्कार लगावले. (चेंडू हातात होता, तेव्हा त्यांना न्यू झीलँडच्या फलंदाजांनी सात षट्कार लगावले होते!) ही फलंदाजी आकर्षक, मनोरंजक होती, हे नक्की. पण यजमानांची नौका विजयाच्या तिराला लावण्यासाठी तिचा उपयोग नव्हता. फार तर उद्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीच, तर निव्वळ धावगतीमध्ये ही फटकेबाजी फायदेशीर ठरेल.
ब्लॅक कॅप्सचं वर्चस्व
दोन शतकं आणि तीन अर्धशतकांची नोंद झालेल्या ह्या सामन्यात न्यू झीलँडचं - ब्लॅक कॅप्सचं - वर्चस्व ठळकपणे दिसलं. प्रारंभीची १५-२० आणि शेवटची १२ षट्कं सोडली, तर सामन्यावर पाहुण्यांचं वर्चस्व पाहायला मिळालं.
पहिल्या पॉवर प्लेमध्ये न्य़ू झीलँडला फार काही करता आलं नाही. सलामीवर डेव्हन कॉनवे आणि भरवशाचा केन विल्यमसन ह्यांना गमावून जेमतेम ४८ धावा. डावातली निम्मी षट्कं पूर्ण झाली, तेव्हा पाहुण्यांची धावांची गती षट्कामागे जेमतेम साडेचार होती. त्याची भरपाई त्यांनी उत्तरार्धात २०७ धावा चोपून केली.
चाचपडत खेळणारा डॅरील मिचेल ह्याला बाद केल्याचा आनंद पाकिस्ताननं व्यक्त केला खरा; पण तोच क्षण सामना त्यांच्या हातून (हळूच) निसटण्याचा होता म्हटलं तरी चालेल. कारण नंतर सलामीवीर विल यंग आणि यष्टिरक्षक-फलंदाज टॉम लॅथम ह्यांची जोडी जमली. त्यांनी आधी जम बसवला आणि मग फटकेबाजी केली. त्यांच्या शतकी भागीनं संघ सुस्थितीत आला.
यंगपेक्षा लॅथमचं शतक अधिक आक्रमक, अधिक आकर्षक फटक्यांचं. पण यंग ज्या परिस्थितीत टिकून राहिला, ती महत्त्वाची. तो आधी खेळपट्टीवर स्थिरावला आणि मग त्यानं वर्चस्व मिळवलं. त्यानं भक्कम पायाभरणी केली आणि त्यावर लॅथम व ग्लेन फिलिप्स ह्यांनी त्रिशतकी इमारत रचली.
यंग-लॅथम ह्याची शतकी भागीदारी पूर्ण होण्याच्या थोडं आधी, चौतिसाव्या षट्कात हारिस रौफ ह्यानं लॅथमला चांगलंच सतावलं. आधी यष्ट्यांमागं झेल घेतल्याचं अपील तिसऱ्या पंचांनी फेटाळलं. त्याच्या पुढच्याच चेंडूवर सलमान आगा ह्यानं त्याचा झेल सोडला.
ह्या षट्कात तावून-सुलाखून परीक्षा देऊन पुढं आलेल्या लॅथमनं मग चूक केली नाही. यंग बाद झाल्यावर त्याला ग्लेन फिलिप्सची जोरदार साथ मिळाली. फिलिप्सचं अर्धशतक फक्त ३४ चेंडूंमध्ये आकाराला आलं.
नसीम शहा आणि फिरकी गोलंदाज अबरार अहमद ह्यांनी पहिल्या टप्प्यात पकडून मारा केला. अबरार ह्यानं पहिल्या सहा षट्कांत फक्त १९ धावा दिल्या. नंतरच्या चार षट्कांमध्ये मात्र २८ धावा त्यानं दिल्या. छोटी धाव घेऊन लक्ष्मणरेषेच्या खूप अलीकडून चेंडू टाकणाऱ्या रौफ ह्याचीही कथा अशीच. पहिल्या सहा षट्कांमध्ये ३७ आणि हाणामारीच्या चार षट्कांमध्ये तब्बल ४६ धावा त्यानं मोजल्या!
हुकमी एक्का निष्प्रभ
शाहीन शहा आफ्रिदी हा पाकिस्तानचा हुकमाचा एक्का. तो आज निष्प्रभ ठरला. त्याला बळी तर मिळाला नाहीच; पण फिलिप्स व लॅथम ह्यांनी त्याला सीमारेषेबाहेर बिनधास्त फटकावलं. ब्लॅक कॅप्सनी अखेरच्या १० षट्कांचा पुरेपूर उपयोग करीत ११३ धावांची भर घातली. पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला निर्धाव षट्क टाकता आलं नाही.
पाकिस्तानच्या डावाची सुरुवात मुळीच आश्वासक नव्हती. ट्रेन्ट बोल्टच्या शैलीची आठवण करून देणारा मॅट हेन्री आणि उंचापुरा, तगडा विल ओ'रॉर्क ह्यांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा केला. सौद शकील आणि कर्णधार महंमद रिजवान लवकर बाद झाले. धोकेदायक फलंदाज अशी ओळख असलेल्या रिजवानचा फिलिप्सनं घेतलेला झेल अफ्लातून होता. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला बावीसच धावा करता आल्या आणि तेही दोन गडी गमावून.
सामन्यातील दुसराच चेंडू अडवताना जखमी होऊन फकर जमान ह्याला मैदान सोडावं लागलं. फलंदाजीला मात्र तो चौथ्या क्रमांकावर आला. त्याची व बाबर आज़मची जोडी जमत होती. ही भागीदारी सामना रंगवणार असं वाटत असताना मायकेल ब्रेसवेल ह्यानं त्याची फिरकी घेतली. स्लॉग स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्याचा त्रिफळा उडाला. त्या आधीच्या षट्कातच फिलिप्सच्या गोलंदाजीवर त्याला कॉनवेकडून जीवदान मिळालं होतं.
एक बाजू लावून धरलेल्या बाबरच्या जोडीला सलमान आगा आला. त्यानं सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यानं सत्तावीस ते एकोणतीस ह्या तीन षट्कांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. पाहता पाहता तो बाबरच्या जवळ पोहोचला होता.
जमलेली जोडी फुटली!
चौथ्या जोडीसाठी झालेली ५९ चेंडूंतील ५८ धावांची भागीदारी मोडीत काढली नॅथन स्मिथ ह्यानं. पहिल्याच षट्कात त्यानं शॉर्ट मिडविकेटला उभ्या असलेल्या ब्रेसवेलकडे झेल देणं आगाला भाग पाडलं. ह्या भागीदारीच्या शेवटाबरोबर पाकिस्तानची पराभवाकडे वाटचाल सुरू झाली. नंतरच्या फलंदाजांनी जोरदार हल्लाबोल केला, तेव्हा न्यू झीलँडचे गोलंदाज हतबल झाल्यासारखे दिसले. पण ही आतषबाजी फार उशिरा होती. जत्रा संपून गेल्यानंतरची...
न्यू झीलँडकडून कर्णधार सँटनर व ओ'रॉर्क ह्यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पण अधिक कौतुक करावं लागेल मॅट हेन्री ह्याचं. त्यानं अचूक मारा केला आणि ७.२ षट्कांमध्ये फक्त २५ धावा देऊन दोन गडी बाद केले.
चॅम्पियन्स करंडकाच्या मागच्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये गटाबाहेरही पडता न आलेल्या न्य़ू झीलँडसाठी सलामीच्या लढतीतील विजय मोठाच आश्वासक आहे. अर्थात ही सुरुवात होती फक्त...
.....
(छायाचित्र सौजन्य : ‘ब्लक कॅप्स’ एक्स अकाउंट)
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #न्यूझीलँड_पाकिस्तान #विल_यंग #टॉम_लॅथम #ग्लेन_फिलिप्स #बाबर_आज़म #शाहीन_आफ्रिदी #ब्लॅक_कॅप्स #ICC_Champions_Trophy #Pakistan_NewZealand #Black_Caps
कालची ही मॅच पाहिल्याचा अनुभव हे वर्णन वाचताना आला...
उत्तर द्याहटवा( बाकी , पाकिस्तान चा सामना पाहणे म्हणजे " सामना " विकत घेऊन वाचण्यासारखं आहे...🤓
,😛🤣
हटवाउत्तम चिरफाड
हटवा