Sunday 19 November 2023

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

 


‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!!

‘आवाज’ आणि ‘खिडकी’ हेही जवळचंच नातं आहे. खिडकी-चित्रांसाठी प्रसिद्ध असलेला हा दिवाळी अंक.

दिवाळी अंकांच्या फराळामध्ये ह्या विनोदी वार्षिकाला मागणी भरपूर. तो नित्यनियमाने प्रकाशित होतो, त्याला यंदा ७३ वर्षं पूर्ण झाली. आणि यंदाच्या अंकाच्या माध्यमातून एका लेखकानं अर्धशतकही गाठलं. तीच खेळपट्टी, तोच फलंदाज...अर्धशतकानंतरही तीच उमेद अन् तोच उत्साह.

दिवस दिवाळीचे आहेत, तसेच क्रिकेट विश्वचषकाचेही आहेत. म्हणून हे अर्धशतक आवर्जून नोंद घेण्यासारखं. त्याची माहिती काहीशा गमतीनेच मिळाली.


लेखक विजय ना. कापडी
.....................
विनोदी कथालेखक विजय ना. कापडी ह्यांना दोन वर्षांपूर्वी ‘चिकूची कृपा’ ही कथा आवडल्याचं कळवलं. दरम्यानच्या काळात आमचा फारसा संपर्क झाला नाही.

दिवाळीच्या पंधरवडाभर आधी श्री. कापडी ह्यांचा निरोप आला. ‘खिडकी’ वाचून त्यांना वाटलं की, माझा ‘आवाज’शी काही संबंध आहे की काय? तसा तो येण्याची एक अंधूक शक्यता वीस वर्षांपूर्वी निर्माण झाली होती.

‘लोकमत’च्या विनोदी कथा स्पर्धेत टोपणनावाने लिहिलेल्या कथेला पारितोषिक मिळालं होतं. त्यावरून ‘आवाज’च्या संपादकांनी पत्र लिहून ‘चांगली कथा’ पाठविण्यास कळवलं होतं. तशी कथा काही सुचली नाही आणि ‘आवाज’चा लेखक होण्याची संधी हुकली.

मूळ विषयापासून भरकाटायला नको. तर श्री. विजय कापडी ह्यांच्याशी संवाद सुरू राहिला. दिवाळीच्या अगदी पहिल्या दिवशी त्यांच्याकडे ‘आवाज’चा अंक पोहोचला. त्यातील कथेच्या पानाचं छायाचित्र त्यांनी पाठवलं. कळवलं, ‘‘अद्दल’ ही माझी कथा, ‘आवाज’मध्ये प्रसिद्ध झालेली पन्नासावी कथा! पहिली १९७२मध्ये पहिली आणि यंदा पन्नासावी!’

हे वाचून चकितच झालो. एक दिवाळी अंक, एक लेखक आणि त्याच्या सलग ५० कथा. अद्भुतच! क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं तर ‘स्ट्राईक रेट’ शंभराला भिडणारा!

पहिला प्रश्न पडला, असा काही विक्रम अन्य कोण्या लेखकाच्या किंवा दिवाळी अंकाच्या नावावर असेल का? एवढं दीर्घ काळ कोणी लिहिलं असेल का? आणि कोणत्या संपादकानं ते प्रसिद्ध केलं असेल का?

हे सारे प्रश्न थेट लेखक श्री. विजय कापडी ह्यांनाच विचारावं म्हटलं. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून ‘बोलायची’ तयारी दाखविली.

हा लेखक ब्याऐंशीच्या घरात असून, पणजीजवळच्या ताळगाव येथे निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखात जगतो आहे. त्यांचं बालपण हुबळीमध्ये गेलं. गणित व संख्याशास्त्र विषयांमध्ये पदवीधर झाल्यावर त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेत तीन तपं नोकरी केली.

आकड्यांमध्ये गुरफटलेले श्री. कापडी लेखनाकडे, त्यातही विनोदी लेखनाकडे कसे काय वळाले? ते म्हणाले, ‘‘विनोदाकडेच माझा कल होता. चौथी-पाचवीत असताना पहिल्यांदा ‘चांदोबा’ वाचला. त्यात विनोदी काही नाही म्हणून पोस्टकार्डावर एक विनोद लिहून थेट मद्रासला पाठवला. गंमतीचा भाग म्हणजे तो ‘चांदोबा’मध्ये प्रसिद्ध झाला. त्याबद्दल हेडमास्तरांनी पुस्तक बक्षीस दिलं - 
केशवकुमारांचा विडंबन संग्रह ‘झेंडूची फुलें’. त्यातली ‘परिटास--’ एवढीच कविता कळाली.’’

शाळेतील पुस्तक-पेटीत श्री. विजय कापडी ह्यांना एक दिवस ‘किर्लोस्कर’ मासिक मिळालं. त्यामधील गंगाधर गाडगीळ ह्यांची ‘बंडूच्या छत्र्या’ त्यांना बेहद्द आवडलेली कथा. घरी येणाऱ्या पाहुण्यांची त्यांची आत्या फर्मास नक्कल करी. त्यातूनच विनोद मुरत गेला. वयाच्या विशीपासूनच त्यांचं ‘मार्मिक’मध्ये लेखन सुरू झालं. त्यानंतर दहा वर्षांनी ‘आवाज’मध्ये पहिली कथा प्रसिद्ध झाली.

ह्या आगळ्या अर्धशतकाच्या निमित्ताने श्री. विजय कापडी ह्यांच्याशी झालेला संवाद असा - 


पन्नासावी कथा.
............
एकाच दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध होणाऱ्या कथांचं अर्धशतक हे ऐकायला-वाचायलाच मोठं रोमांचक, विलक्षण आहे. ‘आवाज’मध्ये यंदा तुमची पन्नासावी कथा प्रसिद्ध झाली. काय भावना आहे?
- ‘आवाज’मध्ये पन्नासावी कथा प्रसिद्ध झाल्याचं पाहताच मला जग जिंकल्याचा आनंद झाला. (कदाचित माझं जग खूपच लहान असण्याचाही हा परिणाम असावा!) माझ्या आतापर्यंतच्या विनोदी साहित्य लेखनातील ही फार मोठी घटना आहे, असं मला वाटलं. इतरांना तसं वाटतं की नाही, मला ठाऊक नाही!

एवढं सातत्यानं एकाच दिवाळी अंकासाठी कोणी लिहिल्याचं तुम्हाला माहिती आहे?
- ‘आवाज’ व इतर अंकांसाठी सातत्यानं लिहिणाऱ्या काही लेखकांची नावं माझ्या माहितीची आहेत. पण पन्नास-बावन वर्षांच्या दीर्घ काळात त्यांच्या ५० कथा प्रसिद्ध झाल्या असतील की नाही, ह्याबद्दल मी साशंक आहे. अशी माहिती माझ्या कानांवर आलेली नाही किंवा वाचनातही नाही.



पहिली कथा.
........................

तुम्ही पहिली कथा स्वतःच ‘आवाज’ला पाठविली की, संस्थापक-संपादक श्री. मधुकर पाटकर ह्यांनी पत्र पाठवून कथा मागितली? पहिलीच कथा प्रसिद्ध झाली की, आधी एखाद-दुसरी नापसंत करण्यात आली? त्यामुळे तेव्हा तुम्ही नाराज झाला होता का?
- माझी पहिली कथा १९७२ साली ‘आवाज’मध्ये प्रसिद्ध झाली. संपादकांनी पत्र पाठवून माझ्याकडून कथा मागवावी; त्यातल्या त्यात  ‘आवाज’चे संपादक पाटकर ह्यांनी कथा मागवावी, इतकं काही त्या काळात माझं नाव झालेलं नव्हतं. त्यांनी तोंडी सांगितल्यावरूनच मी १९७०मध्ये कथा पाठवली होती. ती काही त्यांना पसंत पडली नाही.
मग पुढच्या वर्षी म्हणजे १९७१मध्ये कथा पाठविलीच नाही. पण १९७२ साली तोंडी आमंत्रण मिळाल्यावर मी पाठवलेली ‘अिंटरव्ह्यूच्या लखोट्याचं सोमायण’ ही कथा त्यांनी प्रसिद्ध केली. त्यांनी नापसंत केलेल्या पहिल्या कथेच्या बाबतीत मी नाराज झालो नाही.

तुमची आणि भाऊंची (श्री. मधुकर पाटकर) ओळख आधीची की संपादक-लेखक म्हणून परिचय झाला? तो कसा व कितपत वाढला?
- संपादक पाटकर ह्यांच्याशी माझा अजिबातच परिचय नव्हता. ‘मार्मिक’चे सहायक संपादक आणि ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, त्या श्री. द. पां. खांबेटे ह्यांच्या निवासस्थानी आमची भेट झाली. पण त्यांनी कथा मागितली नाही. पुढे १९६९ साली ‘हंस’च्या विनोद विशेषांकातील कथा वाचून त्यांना कथा मागावी, असं वाटलं. त्यांचं तोंडी आमंत्रणही मला पुरेसं वाटलं!
आमचा परिचय १९८०नंतर वाढला. मी त्यांच्या निवासस्थानी आणि छोट्याशा छापखान्याच्या जागी मुद्दाम जाऊन भेट घेऊ लागलो. ‘आवाज’च्या सुरुवातीच्या खडतर दिवसांच्या आठवणी, कागद मिळविण्यासाठी त्यांना कराव्या लागलेल्या लटपटी ह्या गप्पा मला आवडायला लागल्या. मी जणू त्यांच्या घरचाच झालो...

कथेची मागणी करणारे संपादकांचे पत्र साधारण केव्हा यायचे? तुम्ही खास ‘आवाज’साठी कथा लिहीत होता की, लिहिलेल्या कथांपैकीच एखादी पाठवत होता?
- ‘दिवाळी अंकासाठी कथा पाठवा’ अशा उत्साहवर्धक मजकुराचे पत्र जून महिन्यात पाठविण्यात येते. कथा पाठविण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट असते. ‘आवाज’व्यतिरिक्त ‘मोहिनी’, ‘जत्रा’, ‘बुवा’ आणि इतर अंकांच्या संपादकांकडून पत्रे येत. विनोदी साहित्याचीच मागणी असे. त्यातल्या त्यात मला बऱ्या वाटणाऱ्या गोष्टींपैकी एक मी ‘मोहिनी’साठी आणि दुसरी ‘आवाज’साठी पाठवत असे. पाठवलेली कथा संपादकांना पसंत पडत असे, हाच अनुभव आहे.

कशा प्रकारची कथा हवी, हे भाऊ पाटकर तुम्हाला सांगत? की तुमचे सूर चांगले जुळल्यामुळे तुम्ही पाठवाल ती कथा ते प्रसिद्ध करीत?
- कथा वाचताना आपल्याला हसू यायला हवं, एवढी एकच अट असे. विषय, मांडणी ह्याबद्दलचं सर्व स्वातंत्र्य लेखकांना देण्यात येई.

ह्या प्रवासातली दोन वर्षं अशी आहेत की ‘आवाज’च्या अंकात तुमचं नाव नव्हतं. काय कारण त्याचं?
- माझी १९७९ सालची कथा पसंत पडून आणि कथाचित्र तयार असूनही प्रकाशित झाली नाही. तशी चौकट अंकात पाहून मला खूप राग आला होता. माझ्या बरोबरच शिरीष कणेकर ह्यांचाही लेख मागे राहिला.

मग ती कथा ‘वाया’ गेली म्हणायचं का..?
- तीच कथा १९८०च्या अंकात समाविष्ट केली. तेव्हा वर्षभराचा राग पुरता निवळला! तुम्ही म्हणता तशी ती ‘वाया’ गेली नाही.

...आणि नंतर एका वर्षीही तुमची कथा नव्हती. त्याबद्दल वाचकांची काही प्रतिक्रिया समजली?
- हो; १९९६च्या अंकात. त्याचं कारण फार दुर्दैवी आहे. त्या वर्षी खुद्द पाटकर, माझे स्नेही हास्य-चित्रकार श्री. वसंत गवाणकर आणि माझे बाबा, ह्यांचं लागोपाठ निधन झालं. त्याचा मला बसलेला धक्का फार मोठा होता. त्यामुळेच लिहू शकलो नव्हतो. त्यामुळे त्या वर्षीचा ‘आवाज’ माझ्या कथेविना प्रसिद्ध झाला. त्या काळात मी चेन्नई येथे होतो. त्यामुळे कुणाचीही काही प्रतिक्रिया असल्यास ती माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही!

‘आवाज’ने ‘लेखक’ म्हणून तुम्हाला काय दिले? ह्या वार्षिकाविना लेखक कापडी अशी कल्पना करता येईल का?
- ‘‘आवाज’चा लेखक’ ह्या शब्दांना लेखक / इतर संपादक महत्त्व देतात, असं मला वाटतं. ‘आवाज’च्या आधी दहा वर्षे मी ‘मार्मिक’, ‘मोहिनी’मधून लक्षवेधी लेखन (माझ्या मते!) केलं. पण ‘विनोदी लेखक’ हे (हवं हवंसं) लेबल ‘आवाज’मध्ये कथा येऊ लागल्यावरच मिळालं. इतर अंकांच्या संपादकांची ‘कथा पाठवा’ अशी मागणी करणारी पत्रे येऊ लागली. मुळात ‘आवाज’व्यतिरिक्तही इतर अंकांमध्ये लेखन केलं / करतो आहे, त्यामुळे ‘आवाजविना लेखक कापडी’ अशी कल्पना करणंच अप्रस्तुत वाटतं.

तुम्हाला ‘आवाज’मध्ये कोणाचं लेखन वाचायला आवडे?
- सुरुवातीच्या काळात जयवंत दळवी, शं. ना. नवरे, बा. भ. पाटील, वि. आ. बुवा ह्यांच्या कथा मी आवर्जून वाचत असे. मला त्या आवडतही. नंतरच्या काळात प्रभाकर भोगले, अशोक पाटोळे, अशोक जैन ह्यांच्या कथा / लेख मला आवडत. मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले ह्यांच्या कथा मी वाचतो. श्रीकांत बोजेवार हे अलीकडचं नाव आहे. ह्या व्यतिरिक्त ‘आवाज’ सोडून ‘मोहिनी’, ‘जत्रा’, ‘बुवा’ ह्या अंकांतील लेखनही मी आवर्जून वाचायचो.

ह्या अर्धशतकामध्ये ‘आवाज’मध्ये काय काय स्थित्यंतरं झाली?
- ‘आवाज’ म्हणजे काहीशा चावट कथा, घडीचित्रांमधून निर्माण झालेला विनोद, हे स्वरूप फारसं बदललं नाही. लेखक / चित्रकार काळानुरूप बदलले; पण त्यांच्या मांडणीत लक्षवेधी फरक जाणवला नाही. विनोद ह्या विषयाला वाहिलेल्या अंकात आजही ‘आवाज’ला पसंती मिळते, हे खरं आहे.
मराठी विनोदी साहित्याचा आढावा घेण्यासाठी अभ्यासकाला ‘आवाज’ आणि ‘मोहिनी’ ह्यांना डावलून चालण्यासारखं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. हास्यचित्रं ह्या दोन्ही अंकांचा ‘स्ट्राँग पॉइंट’ आहे. पूर्वीच्या मानानं कथाचित्रं अधिक उठावदार वाटतात.
....................................

#दिवाळी_अंक #विनोदी_दिवाळी_अंक #आवाज #लेखक #विजय_कापडी #कथा #कथांचे_अर्धशतक #विनोदी_कथा #मधुकर_पाटकर #खिडकी #खिडकी_चित्रं
....................................

3 comments:


  1. विजय कापडी ह्यांची मुलाखत वाचली. छान, मनमोकळी उत्तरे दिली आहेत त्यांनी. तुम्ही नेमकेपणाने प्रशअन विचारले आहेत. त्यामुळे मुलाखत रंगत गेली आहे.

    दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध होणं, हे लेखकाचं जणू स्वप्नच असतं! तीस-चाळीस वर्षांपूर्वी तर ते नक्कीच अभिमानास्पद वाटायचं. पूर्वी विजय कापडी ह्यांच्या कथा मी वाचल्या आहेत. हल्ली वाचन कमी झाले आहे.

    सलग पन्नास वर्षे नित्यनेमाने दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध होणं हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे असा विक्रम अन्य कोणा मराठी लेखकाच्या नावावर नसावा.

    आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथा कधी ‘साभार परत’ही आल्या नाहीत!
    - डॉ. विद्या सहस्रबुद्धे, पुणे

    ReplyDelete
  2. माझ्या लेखांचे पेणमधील वाचक श्री. सदानंद कामत चिंचलीकर ह्यांनी थोड्या वेळापूर्वी ही मुलाखत पाठवली. एका चांगल्या लेखकाची माहिती झाली.

    कोणत्या तरी अंकासाठी लेखन करणाऱ्या ज्येष्ठाची मुलाखत आपला मित्र स्वतःच्या ब्लॉगसाठी घेतो, ह्याचा मला मनस्वी आनंद झाला.
    - राजेंद्रप्रसाद मसूरकर, रत्नागिरी

    ReplyDelete
  3. काय योगायोग! मी मागविलेल्या पाच दिवाळी अंकांचं पार्सल नुकतंच मिळालं. त्यात 'आवाज' आहे.
    - प्रियवंदा कोल्हटकर

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...