गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

मॅक्सवेलचे मायाजाल, अफगाणी आत्मघात


,,, तर बुधवारी सकाळी कधी तरी व्हॉट्सॲपवरच्या एका गटात आलेला हा संदेश. मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर मंगळवारी (दि. ७ नोव्हेंबर) झालेल्या सामन्याचं एवढ्या कमी शब्दांत नेमकं वर्णन करणाऱ्या ह्या माणसाचं कौतुकच करावं तेवढं थोडंच!

वानखेडे स्टेडियमवरच्या लढतीत - लढत कसली, एकतर्फी सामन्यात दिसत होती सपशेल शरणागती.  पाच वेळा विश्वचषक जिंकणारा संघ लीन-दीन भासत होता. आशिया खंडातला एक नवा संघ नव्या उमेदीसह पुढे येत होता. आधी तीन विश्वविजेत्यांना पराभूत करणारा अफगाणिस्तानचा संघ सलग चौथ्या विजयाकडे आणि चौथ्या विश्वविजेत्यांना हरविण्याच्या दिशेने घोडदौड करत होता. 

समुद्र किनाऱ्यालगतच्या मुंबईत त्या दिवशी, त्या संध्याकाळी वादळ धडकण्याचा कसलाही अंदाज हवामान खात्यानं वर्तविलेला नव्हता. त्यामुळे त्याचं नामकरण करण्याचाही प्रश्न नव्हता. बाकी मुंबई सोडून फक्त वानखेडे स्टेडियमवर वादळ येणार, असंही काही कोणाला वाटलं नसावं.

शक्यता चिरडल्या, स्वप्नं चुरडली
‘वादळापूर्वीची शांतता’ असं आपण वाचतो, ऐकतो ते हेच असणार. कोणाला काही न सांगता, काही चिन्हं न दिसता सामन्याच्या शेवटच्या पावणेदोनशे चेंडूंमध्ये झंझावात आला. त्यानं अनेक शक्यता चिरडल्या, नाना स्वप्नं चुरडली. त्या कल्पनातीत वादळाचं, चक्रावर्ताचं नाव - ग्लेन मॅक्सवेल.

सामन्यातील साधारण ७० षट्कं अफगाणिस्तानचा खेळ उजवा झालेला. त्यातही पूर्वार्धातली शेवटची दहा आणि उत्तरार्धातील पहिली २० षट्कं त्यांचं एकहाती वर्चस्व दाखविणारी. विश्वचषकात आता सवयीचा झालेला आणखी एक धक्का हा संघ देणार, हे जवळपास नक्की झालेलं. परिणामी उपान्त्य फेरीच्या जागेवर लक्ष ठेवून असलेल्या दोन संघांची धडधड वाढलेली.


विजयी वीर. त्यानं एकहाती सामना जिंकून दिला.
(सौजन्य : क्रिकेट ऑस्ट्रेलिया)
.......................................
हे चित्र बदलण्यास कारणीभूत ठरले १२ चेंडू. विसावं षट्क संपलं तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था होती ७ बाद ९८. ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार पॅट कमिन्स हीच भरवशाची जोडी उरलेली. त्यांच्यावर तरी भरवसा किती ठेवायचा? बादही व्हायचं नाही आणि दोनशेच्या आसपास धावाही काढायच्या? टिकून राहणं, पळत राहणं, धावा जोडणं... सगळंच साधायचं होतं.

आधीच्या दोन षट्कांमध्ये मार्कस स्टॉयनिस व मिचेल स्टार्क ह्यांचे बळी मिळाल्यामुळे राशिद खान भरात आलेला. त्यांचे चेंडू चांगले वळत होते. डावातलं एकविसावं आणि स्वतःचं चौथं षट्क राशिद टाकत होता. पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलनं स्वीप मारायचा प्रयत्न केला. बॅटच्या वर कुठे तरी लागून चेंडू मि़ड-ऑफ भागात उंच उडाला.

नशीब खूश - तीन वेळा
राशिद मागे धावला आणि थांबला. त्यानं कर्णधार हशमतुल्ला शाहिदी ह्याला धावताना पाहिलं. तो धावला खरा; पण उशीरच झाला. मॅक्सवेलचा झेल काही त्याला पकडता आला नाही. मॅक्सवेलवर नशीब खूश होतं. पहिली वेळ.

पुढचं षट्क डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमदचं. त्याचा दुसरा चेंडू मॅक्सवेल सहज खेळायला गेला आणि तो निघाला गुगली. झपकन त्याच्या पॅडवर आदळला. पंचांनी अपील उचलून धरलं.

उगीच शंका नको म्हणून मॅक्सवेलनं ‘रीव्ह्यू’ घेतला. त्यालाच फारसा विश्वास नसावा. पॅव्हिलियनची वाट त्यानं पकडली होती.

आश्चर्य! चेंडूची उसळी थोडी जास्तच होती. मॅक्सवेल बचावला. नशीब पुन्हा खूश. दुसऱ्या वेळी.


मुजीब उर रहमानच्या हातून झेल सुटला?
छे:, सामना निसटला!!
...................................
त्याच षट्कातला पाचवा चेंडू होता टॉप स्पिनर. आधीच्या अनुभवातून मॅक्सवेल शहाणा झाला नव्हता काय? एवढा काय तो जिवावर उदार झाला होता? त्यानं पुन्हा एकवार स्वीप मारण्याचा प्रयत्न केला.

असा बेदरकार फटका झेलण्यासाठी शॉर्ट फाईन लेगला सापळा लावलेला होताच. 
अजिबात नियंत्रण नसलेला मॅक्सवेलचा फटका. तिथं उभ्या असलेल्या मुजीब उर रहमानच्या हातात गेलेला. चेंडूभोवती हात फक्त घट्ट पकडण्याचंच काम होतं. तेही त्यानं केलं नाही. तिसरी सोनेरी संधी अफगाणिस्तानने सोडली. सामना बहुदा तिथंच त्यांच्या हातून निसटला.

नशीब तिसऱ्या वेळी मॅक्सवेलवर खूश. ती नियती किंवा कोण असते, ती अफगाणिस्तानच्या दुर्दैवाला खदखदून हसत म्हणाली असेल, ‘जा बाळ मॅक्सवेल. खेळ मनसोक्त. इथून पुढचा डाव तुझा असेल. केवळ तुझाच असेल रे!’

अफगाणिस्तान संघानं आत्मघात करून घ्यायचंच ठरवलं होतं. त्याला मॅक्सवेल किंवा त्याला खंबीर साथ देणारा कमिन्स तरी काय करणार? त्यांंनी जिंकण्याची संधी देऊ केली होती.

रहमानच्या हातून लोण्याचा गोळा निसटला, तेव्हा मॅक्सवेल ३४ धावांवर (३९ चेंडू) होता. ऑस्ट्रेलियाच्या धावा होत्या ११२. त्यानंतर सामन्यात १५० चेंडूंचा खेळ झाला. त्यात १८१ धावा निघाल्या. मॅक्सवेल त्यातले ८९ चेंडू खेळला आणि त्याने धावा केल्या १६७.

काय चूक केली, हे मुजीब उर रहमानला सामन्याच्या शेवटच्या षट्कात मॅक्सवेलनं दाखवून दिलं. दुसरा चेंडू ऑफ यष्टीच्या बाहेर. मिडविकेटवरून षट्कार. मग पुन्हा तसाच, पण थोडा अधिक वेगाचा चेंडू. परिणाम लाँग-ऑनवर षट्कार. नंतरच्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. षट्कातला पाचवा आणि इतिहासात स्थान मिळविणारा सामन्यातला शेवटचा चेंडू मधल्या यष्टीवर आणि डीप मिडविकेटवर उत्तुंग षट्कार!

विश्वचषकातच्या इतिहासातलं कोणत्याही फलंदाजाचं हे पहिलंच द्विशतक. आणि तेही अशा कठीण परिस्थितीत. ह्या अप्रतिम खेळीत मॅक्सवेलनं अनेक विक्रमांची मोडतोड केली.

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे
मागच्या आठवड्यात गोल्फ कार्टवरून पाठीवर पडून डोक्याला इजा झालेला मॅक्सवेल पार दमला होता. त्याचे पाय धावायला तयार नव्हते. त्याच वेळी हात थांबायला तयार नव्हते. ना. वा. टिळकांच्या कवितेतील ‘क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे’ ओळीची आठवण करून देत मॅक्सवेल खेळत होता. धावण्याला आलेली मर्यादा त्यानं उत्तुंग फटके मारून भरून काढली.


उत्तुंग! मॅक्सवेलचा फटका आणि त्याची नाबाद द्विशतकी खेळीही.
(सौजन्य : एक्स संकेतस्थळ)
.................................

आतड्यापर्यंत गेलेला घास. फक्त पचवणं बाकी. पण जबड्यात हात घालून तोच घास एकहाती बाहेर काढण्याची किमया मिस्टर मॅक्सवेल ह्यांनी केली!

मॅक्सवेलच्या १५२, म्हणजे ७५ टक्के धावा कव्हर ते मिडविकेट ह्या पट्ट्यात आहेत. दहापैकी नऊ षट्कार लाँग-ऑन ते मिडविकेट ह्या पट्ट्यात आहेत. एकच षट्कार आणि तीन चौकार थर्ड मॅनला आहेत. लेगला चारच चौकार आहेत. यष्ट्यांच्या मागे त्याला मिळालेल्या धावा आहेत ४९. त्यात जवळपास अर्धा डझन चौकार.


मॅक्सवेलच्या विक्रमी डावातील फटक्यांचा नकाशा.
(सौजन्य : क्रिकेट ऑस्ट्रेलिया)
.................................
पॉइंट ते यष्टिरक्षक ह्या कोपऱ्यात मॅक्सवेलच्या २६ धावा आहेत. ह्या धावा भाषेत म्हणजे नगरी भाषेत ‘कत्त्या’ लागून मिळालेला बोनस. मॅक्सवेल हुकुमी खेळला. त्याला हव्या त्या ठिकाणी त्यानं चेंडू धाडला. चेंडू त्याची आज्ञा विनातक्रार पाळत होता. असे डाव कधी तरीच पाहायला मिळतात.

ग्लेन मॅक्सवेल आपल्या संघात असणं म्हणजे देवानं दिलेली किती अमूल्य देणगी आहे, हे संघनायक पॅट कमिन्सला त्या दिवशी कितव्यांदा तरी कळलं असेल. त्याचा अफलातून खेळ 
२२ यार्डांवरून पाहण्याची संधी कमिन्सला मिळाली!

कमिन्स त्या बद्दल स्वतःला भाग्यवान मानत असेल का? त्याचे एकाहून एक सरस फटक पाहताना त्याने आ वासला असेल ना? खणखणीत हुकमी षट्कार आणि नेत्रदीपक ड्राइव्ह साठवण्यासाठी त्याने डोळे किती मोठे केले असतील?

कमिन्सची साथ मोलाचीच
ह्याच मॅक्सवेलला मोलाची साथ दिली कर्णधारानं. ह्या साऱ्या दोन तासांच्या नाट्यात न डगमगता ठामपणे मैदानावर उभा राहिला तो. त्यानं धावा डझनभरच काढल्या; पण तब्बल ६८ चेंडू कोणत्याही मोहाला बळी न पडता खेळून काढले. त्याच्या पहिल्या पाच धावा सात चेंडूंमध्ये होत्या. म्हणजे नंतर त्यानं किती संयम दाखवला असेल, ह्याची कल्पना येते.

नवीन उल हक आणि राशिद खान ह्यांनी प्रारंभी केलेल्या मेहनतीवर मॅक्सवेल-कमिन्स जोडीनं पाणी पाडलं. बदाबदा. त्यात विजयाचं स्वप्न कुठल्या कुठे वाहून गेलं.

काही प्रश्न विचारावेत का?
मॅक्सवेलच्या खेळीचं महत्त्व तसूभरही कमी न करता काही प्रश्न विचारता येतील. ह्या सामन्याच्या दुसऱ्या डावात कर्णधाराचीच भूमिका बजावणारा महंमद नबी एवढ्या उशिरा गोलंदाजीला का आला? कांगारूंना जिंकण्यासाठी १०६ धावा हव्या असताना आणि मॅक्सवेलचं शतक झाल्यावर चौतिसाव्या षट्कात तो गोलंदाजीला आला.

सव्वाचार धावांची इकॉनॉमी असलेला नबी पहिल्या षट्कापासूनच धावा दाबून ठेवायच्या अशाच मनोवृत्तीनं गोलंदाजी का करीत होता, हेही न उलगडलेलं कोडं.

राशिदनं सात षट्कं टाकल्यानंतर मधली दहा षट्कं त्याला बंद का केलं? विशेषतः त्याला सूर सापडलेला असताना... नंतरही त्याला दोन षट्कांचा हप्ता देऊन शेवटचं षट्क राखून ठेवण्यानं काय साधलं?

विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पहिलं शतक काढलं
सलामीवीर इब्राहीम जदरान ह्यानं. त्याची ही खेळी
सुंदरच होती.
(सौजन्य : एक्स संकेतस्थळ)
.................................

नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी करण्याचा निर्णय अफगाणिस्तानचा सलामीवर इब्राहीम जदरान ह्यानं सार्थ ठरवलं. देशातर्फे विश्वचषकातील पहिलं शतक (१२९ नाबाद १४३ चेंडू, ८ चौकार व ३ षट्कार) त्यानं झळकावलं.

इब्राहीमनं सहाव्या जोडीसाठी राशिद खानबरोबर २७ चेंडूंमध्येच ५८ धावांची भागीदारी केली. राशिदनं तीन षट्कार व दोन चौकारांसह १८ चेंडूंमध्ये तडाखेबंद ३५ धावा केल्या. हे दोघे, अजमत उमरजाई व महंमद नबी ह्यांच्यामुळेच अफगाणिस्तानने शेवटच्या १० षट्कांमध्ये ९६ धावा केल्या.

पहिल्या पन्नास षट्कांतला हा विक्रम, पराक्रम शेवटच्या वीस-पंचवीस षट्कांमध्ये पुसून टाकण्यात आला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी स्टार्क, हेजलवूड, कमिन्स, झम्पा ह्या गोलंदाजांना तोंड देऊन ऑस्ट्रेलियापुढे मोठं लक्ष्य ठेवलं होतं. तीनशेच्या उंबरठ्याला जवळ असलेलं. दुर्दैवानं त्यांचं महत्त्व धावपुस्तिकेतील आकड्यांपुरतं उरलं.

दिवस मॅक्सवेलचा होता.
डाव मॅक्सवेलचा होता.
हा दिवस आणि हा डाव अद्भुतरम्य चमत्कारांचा होता.
हे चमत्कार घडविणारा एकमेवाद्वितीय ग्लेन मॅक्सवेल होता!
....................

(दैनिक नगर टाइम्समधील सदरात बुधवारी प्रसिद्ध झालेला लेख विस्ताराने.)
....................

#विश्वचषक23 #ग्लेन_मॅक्सवेल #पॅट_कमिन्स #ऑस्ट्रेलिया #अफगाणिस्तान #द्विशतक #वादळ
#ऑस्ट्रेलिया_अफगाणिस्तान #इब्राहीम_जदरान #राशिद_खान 

#cricket #CWC23 #Glenn_Maxwell #Pat_Cummins #Australia #Afghanistan #double_century #AustraliavsAfghanistan #Maxwell_mirracle #Ibrahim_Zadran #Rashid_khan

1 टिप्पणी:

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...