बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

‘चित्रमय’ आठवणी



श्रीरंग उमराणी ह्यांचं रेखाटण.

हे चित्र ‘साधं’ आहे. एका चतकोर कार्डशीटवर पॉइंट पेनाने केलेलं रेखाटण. त्यात सफाई आहे. रेषांची गुंतागुंत दिसते. ही सारी सफाई आणि गुंतागुंत ह्या मिश्रणातून आकारला आलं आहे एक डेरेदार झाड. फार उंच नाही. पण आडवं वाढलेलं.

अभ्यासकांना, दर्दी मंडळींना आणि जाणकारांना ह्या चित्रात विशेष काही वाटणार नाही कदाचीत. पण आधी ‘साधं चित्र’ म्हटलं असलं, तरी ते माझ्यासाठी फार ‘स्पेशल’ आहे.  चित्रकलेच्या बाबत ‘नर्मदेतला गोटा’ असूनही ते जवळपास ३७ वर्षं जपून ठेवलेलं. ते पाहिलं की, अजूनही छान वाटतं. जुन्या आठवणी फिरून जाग्या होतात.

हे चित्र आधी एका वहीवर डकवलेलं होतं. कधी तरी तिथून ते काढून व्यवस्थित ठेवलं. जेव्हा केव्हा ते पाहतो, तेव्हा त्याबद्दल लिहायचं ठरवतो. पण राहून जातं. खरं तर ते छान ‘स्कॅन’ करून इथं द्यायचं होतं. पण ते जमेना. म्हणून मोबाईलवरच त्याचं छायाचित्र काढलं.

चित्राच्या उजव्या कोपऱ्यात तळाला सहज लक्षात येईल, ना येईल अशी सही आहे - ‘श्री ८६’. चित्रकाराची सही; चित्रकाराचं नाव - श्रीरंग उमराणी.

पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात श्रीरंग उमराणी होते. त्यांच्यासह आम्ही चार चौघे जवळचे होतो. आता इथे ‘त्यांचा’ असा आदरपूर्वक उल्लेख केला असला, तरी ते सहा-सात महिने मी त्याला एकेरीच आणि थेट नावाने संबोधत होतो. त्यात त्यालाही तेव्हा काही वावगं वाटलेलं जाणवलं नाही.

वर्गात आमची ओळख झाली. त्यानं नाव सांगितलं.  दोन-तीन महिने आधी  ‘हंस’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका कथेवर ‘श्रीरंग उमराणी’ नाव वाचलं होतं. नाव ऐकल्यावर ती कथा आठवली आणि विचारलं, तूच लिहिलीस का ती कथा?

उत्तरादाखल त्यानं होकार दिला आणि मला विलक्षण आनंद झाला. कारण त्या काळात मी लेखक फक्त मासिका-पुस्तकांतच पाहिले होते. त्यातलाच एक लेखक आपल्या शेजारी बसतो, आपल्याशी बोलतो, हसतो ह्याने फार हरखून गेलो. ‘हंस’ त्या काळात भरात असलेलं मासिक होतं. त्यांच्या कथांची शीर्षकं सहसा एका शब्दाची, बुटकी नि जाडगेली असत. अर्थातच वैशिष्ट्यपूर्ण. कथाही वेगळ्या असत - पानवलकर वगैरेंची ओळख त्यातूनच झालेली. आनंद अंतरकर संपादक म्हणून जोरात होते.

श्रीरंग रोजच्या तासांना नियमित येई. बहुतेक वेळा आम्ही शेजारी बसत असू. क्वचित मी पुढच्या बाकावर. तो पुढे बसण्याचं टाळे. स्वतःहून फारसा बोलत नसे. पण आपण बोललो तर मौन पाळायचा नाही कधी.  अतिशय शांत. कधीही आवाज न चढविता किंवा हातवारे न करता तो संथपणे बोलायचा. सुमित्रा भावे ह्यांचा सख्खा भाऊ असल्याचं त्याच्या तोंडूनच कळलं. त्यांचं नाव ऐकलेलं; पण तेव्हा सुमित्रा भावे नावाच्या ‘बाई’चं मोठेपण कळलं नव्हतं.

आता सदतीस वर्षांनंतर श्रीरंगचा पूर्ण चेहरा आठवत नाही. ते स्वाभाविकच. पण चष्मा लावे तो. त्याच्या अंगात खादीचा छान कुडता दिसायचा. त्याच्या अंगावर कुडत्याशिवाय काहीच पाहिलेलं आठवत नाही. गुडघ्याच्या किंचित खाली येणारा झब्बा (त्याच्या बाह्या मनगटापासून किंचित वर सरकवून घेतलेल्या), पँट आणि बहुतेक शबनमसारखी पिशवी असे. फार जाडी-भरडी नव्हे आणि अगदी रेशमी मुलायम पोताचीही नव्हे ती खादी. लक्ष्मी रस्त्यावरच्या खादी भांडारात मिळते तशीच अगदी. असा एक तरी झब्बा घ्यायची तेव्हा माझी इच्छा होती. ती नंतर सहा-आठ महिन्यांनी पूर्ण केली. पत्रकारिता आणि झब्बा ह्यांचं नातं तेव्हा फार जवळचं होतं.

अभ्यासक्रमात माहिती गोळा करून लेख लिहिण्याची स्पर्धा होती. वृद्धांच्या प्रश्नांवर लिहायचं होतं. ती माहिती मिळविण्यासाठी आम्ही चौघं एकत्रच दोन-तीन ठिकाणी गेलो - श्रीरंग, प्रसाद पाटील, डॉ. प्रदीप सेठिया आणि मी. त्याच कामासाठी आम्ही पु. शं. पतके ह्यांच्याकडेही गेलो होतो. ते फार मोठं व्यक्तिमत्त्व होतं. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असलेल्या आमच्यासाठी त्यांनी अगदी भरपूर वेळ दिला होता. त्या वेळी बोलताना त्यांनी मराठी माणसांबद्दल केलेली दोन विधानं अजून लक्षात आहेत. अर्थात त्याचा संदर्भ इथे देण्यासारखा नाही.

हिंडून, संस्थेत जाऊन, लोकांशी बोलून जमवलेल्या माहितीच्या आधारे वर्गात बसून एक तासात लेख लिहायचा होता. पहिले तीन क्रमांक काढून त्यांना रोख बक्षिसं दिली जाणार होती. ‘लेख लिहिण्याचा तास’ संपल्यानंतर आम्ही चौघे आपटे रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या ‘तुलसी’मध्ये चहा प्यायला गेलो. श्रीरंग लेखक. त्यामुळे त्यानं अगदी सहज मोठा लेख लिहिला असणार, हा माझा स्वाभाविक समज. तसं विचारल्यावर तो म्हणाला, ‘मला नाही बुवा असं ठरावीक वेळेच्या मर्यादेत काही लिहायला जमत.’ त्याच्यासारख्या ‘लेखकाला’ हे अवघड जातं म्हटल्यावर आश्चर्यच वाटलं. त्याच वेळी वाटलं की, त्याला हे प्रकरण जमत नाही म्हटल्यावर आपली काय डाळ शिजणार!

स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अभ्यासक्रमाचे समन्वयक गोपाळराव पटवर्धन म्हणाले होते, ‘निकालात वेगळं सांगावं असं काही नाही. अपेक्षित विद्यार्थ्यांनाच यश मिळालं आहे.’ हे ऐकून तर आपला त्याच्याशी काही संबंधच नाही, असं वाटलं होतं. पण गमतीचा भाग म्हणजे स्पर्धेत डॉ. प्रदीप सेठियासह मला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं! (त्यातील माहितीबद्दल बक्षीस मिळालं की ते लिहिण्याच्या शैलीबद्दल, हे अजूनही कळलेलं नाही!!)

फर्ग्युसन महाविद्यालयात शिकवणाऱ्या शर्मिष्ठा खेर आमच्या आणखी एक सहअध्यायी होत्या. का ते माहीत नाही, पण त्यांना माझ्याबद्दल आपुलकी वाटत असे. दोन-तीन प्रसंगातून ते जाणवलं. तर तो बक्षिसाचा कार्यक्रम संपल्यावर त्या म्हणाल्या, ‘अहो कुलकर्णी, तुमचा लेख ‘माणूस’ला पाठवून द्या. तिथं माझी मैत्रीण (मेधा राजहंस) असते. तिला सांगते मी...’ आणखी एक आश्चर्य - तो लेख ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झाला!

श्रीरंग उमराणीबद्दल सांगण्याच्या ओघात स्वतःबद्दल बरंचसं लिहून झालं. आता मूळ मुद्द्याकडे. एकदा वर्गात शिकवणं चालू असताना सहज बाजूला बसलेल्या श्रीरंगकडे पाहिलं. तो खाली मान घालून अगदी तन्मयतेनं काही गिरवत होता, रेखाटत होता. तास संपल्यावर त्याला विचारलं तर कळलं की कार्डशीटवर तो काही काही रेखाटत असे. एकूणच त्याचा त्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाबद्दल असलेला रस आटून गेलेला, हे लक्षात आलं होतं.

अरे वा! हा लेखकाबरोबर चित्रकारही आहे तर... (आपल्याला अगम्य असलेली आणखी एक कला.) त्याच्याबद्दल मला फारच कौतुक वाटू लागलं. सहज त्याला म्हटलं पाहू दे ना चित्र. तर त्यानं कसलेही आढेवढे न घेता रेखाटण दाखवलं.

जाड पिवळसर कागदाच्या तुकड्यावर काळ्या पॉइंट पेनानं केलेलं होतं ते रेखाटण. ते पाहून पुन्हा ‘हंस’ची आठवण झाली. ते चित्र/रेखाटण फारच आवडलं. तो ते शबनममध्ये सरकवत असताना विचारलं, ‘फारच छान आहे रे. मी घेऊ - देतोस?’

श्रीरंग फार सज्जन माणूस. मला चित्रकलेतलं किवा एकूणच कलेतलं काय कळतं, ह्याचा फार विचार न करता त्यानं देऊन टाकलं - आवडलंय तर राहू दे तुला. जितक्या सहजतेनं त्यानं ते रेखाटलं होतं, त्याच सहजपणे देऊन टाकलं! आयुष्यात पाहिलेली पहिली ताजी ताजी कलाकृती. ती माझ्याकडे आली होती. ‘मालकीची’ झाली होती.

अभ्यासक्रमाची टिपणं ज्या वहीत काढत होतो, तिच्या मुखपृष्ठावर हे छोटं चित्र छान चिटकवलं. बरीच वर्षं ते तसंच होतं. एकदा त्या वह्या दिसल्या आणि चित्रही. मग ते वहीवरून अलगद काढलं. कसलाही धक्का न लागता ते निघालं.

सहज पाहिलं, तरी लक्षात येतं की त्या डेरेदार झाडाच्या उजवीकडे एक ठिपका दिसतो. पाण्याचा एक थेंब चुकून पडलेला. पण त्यानं चित्राचं फार नुकसान केलेलं नाही. आता तर असं वाटतं की ते एक झाडावरचं हिरवं पानच आहे. वरच्या बाजूची एक रेष त्याच्या देठाचा भास निर्माण करते.

अभ्यासक्रम संपला. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. पुढे मग वेगवेगळ्या बातम्यांमधून श्रीरंग उत्तम संगीतकार असल्याचंही समजलं. एका मोठ्या कलावंतानं कुठलाही तोरा न दाखवता किती सहजपणे आपल्याशी तेव्हा जुळवून घेतलं, हे आता समजतंय.

नंतरची काही वर्षं दिवाळी अंक चाळताना/वाचताना एखाद्या कथेवर ‘श्रीरंग उमराणी’ नाव दिसतंय का, हे मोठ्या औत्सुक्याने पाहत होतो. नाही दिसलं कधी. असंही असेल की, त्याचं लिहिणं माझ्या वाचनात आलं नसणार. किंवा बहुतेक त्यानं लिहिणं सोडलं असावं.

ते सहा-सात महिने सोडले, तर पुढे श्रीरंग कधीही भेटला नाही. तो अभ्यासक्रम, त्यातले आम्ही सहकारी त्याच्या लक्षात असण्याची शक्यता अगदीच पुसट आहे. त्यात गैरही काही नाही. पण त्या चित्रभेटीच्या रूपानं त्याच्याशी मैत्री अतूट आहे, असंच मी मानतो. आता कधी भेटलाच तर एकेरीत बोलायला कचरायला होईन. श्रीरंग उमराणी नाव एका मोठ्या कलाकाराचं आहे, हे चटकन् मनात येईल.

एका चित्राच्या ह्या आठवणी. बरेच दिवस लिहायच्या राहून गेलेल्या.
................

#चित्र #रेखाटण #रानडे_इन्स्टिट्यूट #श्रीरंग_उमराणी #पत्रकारिता

८ टिप्पण्या:

  1. दाट फांद्या फांद्यानी डवरलेलं सुंदर झाड आणि त्यावर अनवधानाने उमटलेले देठासकट हिरवे पान ! बऱ्याच तासांची मेहनत वाटते. एका सुंदर चित्रावरील तितकाच सहज सुंदर ललित लेख सतीशजी ! एक लघु काव्यच जणू !!

    उत्तर द्याहटवा
  2. जितक्या तन्मयतेने चित्र रेखाटले, काकणभर जास्त तन्मयतेने आपलं लिखाण. आपल्या उभायातामध्ये वृक्ष हा दुवा ठरला. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी.'

    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहमदनगर.

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय तरल लेख
    एका चित्रावर इतक्या तन्मयतेने , भावपूर्ण शब्दाचे रेखाटलेले हे शब्द चित्रच नाही का?
    खूप सुंदर

    त्यावर चुकून पडलेल्या पाण्याच्या थेंबानेही तुमच्या शैलीत कमाल केली आहे. अतिशय तरल लेख
    एका चित्रावर इतक्या तन्मयतेने , भावपूर्ण शब्दाचे रेखाटलेले हे शब्द चित्रच नाही का?
    खूप सुंदर

    त्यावर चुकून पडलेल्या पाण्याच्या थेंबानेही तुमच्या शैलीत कमाल केली आहे. पण थेंब दोन पडलेले दिसतात..हाहा!
    हे सहज हं...
    - स्वाती वर्तक

    उत्तर द्याहटवा
  4. खूप मनापासून लिहिलेला ललित लेख आहे मोत्याचा सारखी स्मृती उलगडते तिच्यात उमराणी यांचं व्यक्तिचित्र उभं राहातं छान झालाय लेख.
    - माधवी कुंटे, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  5. साध्या रेखाटनाचा वृक्ष प्रथम खरंतर ते एक वाळलेले झाड आणि त्यात एक हिरवे पान अजून जिवंतपणाची साक्ष देत आहे असे वाटले. त्यावरचा जुन्या आठवणींचा लेख छान

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...