Wednesday 18 October 2023

गिलचा चौकार... इथं आहे, तिथं नाही!

त्याला सगळे मुक्या स्कोअरर म्हणायचे...हंपायरप्रमाणंच तो स्कोअरर एकदम महत्त्वाचा असतोय हे गल्लीतल्या बिट्ट्या पोरांनाही माहीत असणार. आपल्या टीमचा स्कोअरर जादा रना लावणार आणि विरुद्ध टीमचा कमी. म्हणजे आपण बॅटिंग करत असलो तर. त्यातून शेवटी सणसणीत मारामाऱ्या होणार हे नक्कीच. मॅच समाप्त.

‘‘सबंध गावात प्रामाणिक स्कोअरर म्हणजे एकच. मुक्या स्कोअरर.’’ असं सगळीच पोरं म्हणतात.

- ‘झुंबर’मध्ये लंपन अचूक स्कोअरिंगचं महत्त्व सांगत असतो. ते करणाऱ्याबद्दल त्याच्या मनात अतीव आदर आहे. 

डेंगीच्या डासांनी चावा घेतल्यामुळं शुभमन गिल ह्याला मैदानापासून लांब राहावं लागलं. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तेराव्या अध्यायातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळता आलं नाही.

‘अंतिम सामना नाही; पण त्याहून किंचितही उणा नाही’, असं वर्णन केलं जातं तो भारत-पाकिस्तान सामना शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबादेत झाला. एक दिवशीय क्रिकेटच्या विश्वचषकात आठव्या वेळी हे संघ समोरासमोर उभे ठाकले होते. झुंज झालीच नाही. ८-० की ७-१ ही उत्सुकता पहिल्या डावाच्या उत्तरार्धातच मावळली.


शुभमन...आणखी एका चौकाराचा मोह
....................
ह्या सामन्यासाठी भारतानं संघात एक बदल केला होता. ईशान किशन बाहेर आणि शुभमन आत. डेंगीसारख्या आजारातून नुकताच बरा झालेल्या गिलला (एवढ्या महत्त्वाच्या लढतीत) खेळवावं की नाही? ह्या प्रश्नावर तज्ज्ञ, अनुभवी-जाणते क्रिकेटपटू ह्यांच्यापासून सोशल मीडियावरील कट्ट्यावरच्या चर्चेत कुठेच एकमत नव्हतं.

‘गिल आमच्यासाठी वर्षभरात अतिशय खास खेळाडू ठरला आहे. विशेषतः ह्या मैदानावर (नरेंद्र मोदी स्टेडियम) आणि म्हणूनच तो संघात हवाच,’ असं नाणेफेकीनंतर कर्णधार रोहित शर्मा ह्यानं स्वच्छ शब्दांत सांगितलं.

रोहितबरोबर सलामीला आलेला शुभमन फार काळ टिकला नाही. डावातील तिसऱ्या षट्कातल्या पाचव्या चेंडूवरच तो बाद झाला.

पहिल्या षट्कात शाहीन शहा आफ्रिदीला दोन चौकार बसले होते. त्यामुळं तो जरा चिडूनच होता. त्याचा हा चेंडू किंचित आखूड आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा. आधीच्या षट्कांत चौकाराची आतषबाजी केल्यामुळं गिल उत्साहात होता. पुन्हा आमंत्रण मिळाल्यावर मोह आवरता येणं कठीण.

गिलनं कट मारला. चेंडू बॅटवर व्यवस्थित बसलाही. पण...तो थेट बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या शदाब खानच्या हातात विसावला. पाकिस्तानला दिलासा देणारं पहिलं यश.

गिलची ती अवघ्या ११ मिनिटांची खेळी देखणीच होती. पण अल्पकालीन. ‘चमक विजेची, परि क्षणाची’ असं कवीनं म्हटलंय, तसा तो डाव.


बी. सी. सी. आय.च्या
संकेतस्थळावरील नोंद.
.................
गिल बाद झाला आणि थेट प्रक्षेपण दाखविणाऱ्या टीव्ही. वाहिन्यांवर पट्टी दिसली, संकेतस्थळांच्या वृत्तान्तामध्ये आहे, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं - शुभमन गिल झे. शदाब खान, गो. शाहीन शहा आफ्रिदी १६ (११ चेंडू, चौकार)

ह्याला अपवाद एकच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आय. सी. सी.) संकेतस्थळावरील धावफलक. त्यात नोंद आहे - शुभमन गिल झे. शदाब खान, गो. शाहीन शहा आफ्रिदी १२ (११ चेंडू, चौकार)

क्रिकेटचं ‘बायबल’ मानलं जाणारं ‘विस्डेन’, बी. बी. सी. न्यूज, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, ईएसपीएनक्रिकइन्फो, क्रिकट्रॅकर, क्रिकबझ... अशा विविध संकेतस्थळांवर भारत-पाकिस्तान सामन्याचा वृत्तान्त आणि धावफलक दिसतो.

आय. सी. सी.च्या धावफलकात
गिलच्या धावा १२ व चौकार ३.
............................ 

हे सारे वृत्तान्त, ही संकेतस्थळं गिलच्या धावा १६ आणि चौकार चारच दाखवितात. प्रश्न असा पडतो की, आय. सी. सी.नं गिलच्या चार धावा कुठं हरवल्या? एक चौकार कसा ‘गायब’ केला? आणि तेवढंच महत्त्वाचं म्हणजे ह्या गायब केलेल्या चौकाराचा हिशेब कुठं दाखवला?

आय. सी. सी.च्या धावांचा हिशेब चोख आहे. भारतीय डावात इतर धावांच्या खाती जमा दोन आहेत, असं बहुतांशी माध्यमं दाखवतात. एक लेगबाय, एक वाईड. आय. सी. सी. मात्र ह्या खात्यात सहा धावा दाखविते. लेगबायच्या पाच.

म्हणजे गिलच्या त्या हरवलेल्या चौकाराची एंट्री इतर धावांच्या खात्यात पडली आहे.

हा चौकार कुठला? डावातील दुसऱ्या आणि हसन अलीच्या पहिल्या षट्कातील शेवटचा चेंडू.

शाहीन शहा आफ्रिदीच्या पहिल्याच षट्कात दोन चौकार गेले. त्याचीच पुनरावृत्ती गिलने हसन अलीच्या तिसऱ्या चेंडूवर केली. मिड-ऑफ व एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमापार. पाचव्या चेंडूवर देखणा कव्हर ड्राइव्ह. पुन्हा चौकार

षट्कातला शेवटचा चेंडू. पॅडवर आलेला हा चेंडू शुभमन लेग ग्लान्स करतो. फाईन लेगला चौकार! षट्कातला तिसरा आणि गिलचा चौथा. एका संकेतस्थळावरील धावत्या वर्णनानुसार तो फ्लिकचा फटका होता.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या संकेतस्थळावर दिसतं ते असं - ...good length ball, pitching on leg stump, Shubman Gill glances it down the leg past the keeper and ends the over with a boundary!


गिलचा चौकार ‘गायब’ करणारा हाच तो वादग्रस्त चेंडू आहे. आय. सी. सी.चं संकेतस्थळ ह्या चेंडूबद्दल म्हणतं - Good line and length from Hassan Ali. Shubman Gill is struck on the body while trying a leg glance, resulting in 4 leg byes back behind square.

त्या पहिल्या षट्कात हसन अली ह्यानं १२ धावा दिल्याचं बाकी सगळे सांगतात. आय. सी. सी.च्या मते त्यानं आठच धावा दिल्या.

हे चुकून झालं असावं का? मानवी त्रुटी? तसंही दिसत नाही. हा चारचा हिशेब इतर धावांमध्ये लागतो, तसाच गोलंदाजीच्या अंतिम पृथक्करणातही.

हसन अलीच्या गोलंदाजीची सगळीकडे दिसणारे आकडे असे : ६-०-३४-१
त्याने दिलेल्या धावांतून आय. सी. सी.ने चार बरोबर वजा केल्या आहेत. त्यांनी दाखविलेलं पृथक्करण आहे - हसन अली ६-०-३०-१

विश्वचषक स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आहे. त्यामुळे त्यांनी नोंदविलेली धावसंख्या व तपशीलच भविष्यात अधिकृत मानला जाईल. गिलने चार नाहीत, तर तीनच चौकार मारले, हेच कायम राहील.

धावांची आणि चेंडूंची बिनचूक नोंद ठेवणारा ‘मुक्या स्कोअरर’ आणि त्याचं महत्त्व जाणून असलेला ‘लंपन’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहोचले पाहिजेत बुवा.

मारामाऱ्या होणार नाहीत, मॅच समाप्त होणार नाही. पण वाद तर होतील. कारण असेल एका चौकाराचं.

हा चौकार चोरलेला नाही किंवा दाखविलेलाच नाही, असं नाही. त्याची एंट्री ह्या खात्यातून त्या खात्यात झालेली. दोन्ही पासबुकांतला, अर्थात स्कोअरशीटमधला हिशेब एकदम तंतोतंत जुळतो.

... तरीही प्रश्न पडतोच. चौकार कोणाचा? गिलचा की लेगबायचा?
चुकतंय कोण? आय. सी. सी. की बाकीचे सगळे?
--------------------------------------------------
#क्रिकेट #विश्वचषक_क्रिकेट #विश्वचषक23 #भारत_पाकिस्तान #शुभमन_गिल #आयसीसी #बीसीसीआय #चौकार #हसन_अली #विस्डेन #मुक्या_स्कोअरर

#cricket #world_cup #CWC2023 #India_Pakistan #Shubman_Gill #icc #bcci #boundary #Hassan_Ali #wisden #scorer
#leg_byes

3 comments:

  1. सतिश, खरच तुझ्यासारखा एखादाच अभ्यासू पत्रकार अशी चूक शोधून काढू शकतो.आजकाल जाहिराते चे युग असल्याने कोणी स्कोर बोर्ड कडे बारकाईने पहात पण नाही. बाकी नेहमीप्रमाणे छानच लिखाण

    ReplyDelete
  2. हा वाद संपवण्यासाठी मॅचचा रीप्ले बघावा लागेल. जर अंपायरने लेग बायचा इशारा केला असला तर वाद संपला. नाहीतर ICC ला पत्र लिहावे लागेल.

    ReplyDelete
  3. *सैराट* चित्रपटाची नकळत आठवण करूनदेणारा लेख वाचला. क्रिकेट फारसं कांही कळत नसलं तरी धावा व त्याचा प्रकार याच्या गीणतीत काहीतरी घोटाळा झाला असावा असं दिसत. असो.
    तहान लागली म्हणून *परशा* हापश्यावर पाणी प्यायला गेला. असं कांहीतरी घडल नाही ना?
    आपल्या चिकीत्सकपणाला मनस्वी दाद.

    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहमदनगर.

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...